वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ३/१ पृ. ९-१३
  • समर्पित—कोणाला?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • समर्पित—कोणाला?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एक समर्पित राष्ट्र
  • कदर समर्पणाकडे निरवते
  • तुमचे समर्पण जाहीर करा
  • “दररोज” आपल्या समर्पणानुरूप जगणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • तुम्ही यहोवाला समर्पण का केले पाहिजे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • तुम्ही यहोवाला समर्पण करायला तयार आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • तुम्ही समर्पण करून बाप्तिस्मा घेणं का महत्त्वाचं आहे?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ३/१ पृ. ९-१३

समर्पित—कोणाला?

“जे काही परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू.”—निर्गम २४:७.

१, २. (अ) काही लोकांनी स्वतःला कशास वाहून घेतले आहे? (ब) समर्पण हे केवळ धार्मिक बाबींपुरतेच मर्यादित आहे का?

फेब्रुवारी १९४५ मध्ये, जपानच्या याटाबी फ्लाईंग क्रॉप्स या लष्करी तुकडीतील झिरो फायटर विमानाचे वैमानिक एका सभागृहात जमले होते. प्रत्येकाला एक कागद देण्यात आला व त्यात त्याने, तो जपानच्या हवाई हल्ल्यात स्वेच्छेने सदस्य होऊ इच्छितो का हे लिहायचे होते. त्यावेळी उपस्थित असलेला एक अधिकारी म्हणतो: “मला वाटले की, राष्ट्राच्या आणीबाणीच्या काळी स्वतःचे अर्पण करण्यास मला बोलावणे आले होते. मी पुढे व्हावे म्हणून माझ्या भावनिक इच्छेने मला पुढे रेटले. मी त्या कामासाठी स्वतःला सिद्ध केले.” त्याला ओका (शत्रूंवर आत्मघाती मारा करणारे विमान) चालवण्याची तालीम दिली व त्याचा वैमानिक बनवले गेले आणि ते विमान शत्रूंच्या आरमारावर आदळण्यास सांगण्यात आले. तथापि, हे काम पूर्ण करण्याआधी व त्याद्वारे स्वतःचे राष्ट्र व सम्राट यांच्यासाठी आत्म बलिदान करण्याआधीच युद्ध संपले. जपानने युद्धात शरणागती पत्करली तेव्हा त्याचा सम्राटावर असणारा विश्‍वास पार उडाला.

२ एके काळी जपानमध्ये पुष्कळ जण सम्राटाची भक्‍ती करीत होते, ते त्याला जिवंत देव असल्याचे मानीत असत. दुसऱ्‍या देशात भक्‍तीचे असेच अनेक प्रकार होते व आहेत. लाखो लोक मरीया, बुद्ध किंवा इतर दैवतांच्या मूर्त्यांना भजतात. भावना चेतवणाऱ्‍या वक्‍तृत्वाने भारावून जाऊन काही आपला कष्टाने मिळवलेला पैसा दूरदर्शन सुवार्तिकांच्या खिशात, पूर्ण स्वरुपाचे पाठबळ म्हणून भक्‍तिभावाने ओततात. युद्धानंतर निराश झालेल्या जपान्यांनी, आपले जीवन समर्पित करता येईल अशा इतर नवनव्या गोष्टींकडे आपले लक्ष वळवले. काहींना, काम ही ती गोष्ट वाटली. पूर्व असो की, पश्‍चिम, पुष्कळ जन स्वतःला धननिधी प्राप्त करण्यासाठी समर्पित करतात. तरुण लोक आपल्या जीवनात संगीतकारांना केंद्रभागी ठेवतात; ते त्यांच्याच जीवनशैलीचे अनुकरण करतात. आज लोक मोठ्या संख्येने स्वतःची भक्‍ती करतात; ते त्यांच्या इच्छेला भक्‍तीची वस्तू बनवतात. (फिलिप्पैकर ३:१९; २ तीमथ्य ३:२) तथापि, अशा या गोष्टी किंवा लोक खरोखरीच एखाद्याच्या पूर्ण जिवाने केलेल्या भक्‍तीला पात्र आहेत का?

३. भक्‍तीच्या काही गोष्टी कशा व्यर्थ ठरल्या आहेत?

३ वास्तवता सामोरी येते तेव्हा बहुधा मूर्तिपूजकांचा भ्रमनिरास होतो. त्यांच्या मूर्त्या ह्‍या केवळ “मनुष्यांच्या हातच्या कृति आहेत” हे त्या भजणाऱ्‍यांना समजते तेव्हा अशा मूर्त्यांना दिल्या जाणाऱ्‍या भक्‍तीचा परिणाम निराशेत होतो. (स्तोत्र ११५:४) प्रसिद्ध सुवार्तिकांचा भ्रष्टाचार उघड होतो तेव्हा प्रांजळ लोकांचा अपेक्षाभंग होतो. जेव्हा “अस्थिर” अर्थव्यवस्था कोलमडली आणि कामगारांना दिसले की, त्यांच्या हातचे काम गेले तेव्हा त्यांना मानसिक त्रागा होऊ लागला. अलीकडच्या आर्थिक मंदीने धनाच्या पुजाऱ्‍यांना जबर तडाखा दिला. खूप पैसा मिळवू या हेतूने घेतलेले अनेक कर्ज इतके भारी झाले की, त्यांची परतफेड होण्याची काहीच आशा राहिली नाही. (मत्तय ६:२४) ज्यांची इतकी आळवणी करण्यात आली होती ते रॉक संगीत कलाकार व इतर अभिनेते मरण पावतात किंवा त्यांची प्रतिभा कमी होते तेव्हा त्यांच्या चाहत्यांना एकटे सोडण्यात येते. तसेच स्वसंतुष्टीच्या जीवनाक्रमणाचा मागोवा घेणाऱ्‍यांनाही नेहमीच कटू अनुभव मिळतात.—गलतीकर ६:७.

४. लोक कशामुळे आपले जीवन निरर्थक गोष्टींना समर्पित करतात?

४ लोक कशामुळे अशा या निष्फळ गोष्टींना स्वतःला समर्पित करतात? हे बहुतांशी दियाबल सैतानाच्या वर्चस्वाखाली असणाऱ्‍या या जगाच्या आत्म्यामुळे घडते. (इफिसकर २:२, ३) या आत्म्याचा प्रभाव वेगवेगळ्या मार्गांनी दिसतो. एखाद्यावर त्याचे वर्चस्व जो पूर्वजांपासून चालत आलेला असतो त्या कौटुंबिक सांप्रदायाद्वारे जडते. शिक्षण व वाढ ही विचारांवर मोठे प्रभुत्व राखते. नोकरीच्या जागी असलेले वातावरण एखाद्या “चुरशीच्या कामगाराला” कामाचे व्यसन जडवू शकते, जे त्याच्या जीवनास घातक ठरू शकते. जगाची भौतिक वृत्ती, अधिकाधिक प्राप्त करून घेण्याची लालसा वाढवते. पुष्कळांची अंतःकरणे भ्रष्ट झालेली असून ती त्यांना स्वतःच्या स्वार्थी इच्छांची पूर्ती करण्यास लावतात. हा सर्व पाठलाग अशा भक्‍तीच्या पात्रतेचा आहे की नाही याचे परीक्षण करण्यात ते मागे पडतात.

एक समर्पित राष्ट्र

५. साधारण ३,५०० पेक्षा अधिक वर्षांआधी यहोवाला कोणते समर्पण करण्यात आले होते?

५ साधारण ३,५०० पेक्षाही अधिक वर्षांआधी एका राष्ट्राला भक्‍तीला पात्र असणारी अधिक योग्यतेची गोष्ट मिळाली. त्यांनी सार्वभौम यहोवा देवाला स्वतःचे समर्पण केले. या इज्राएल राष्ट्राने एक गट असे सीनायच्या अरण्यात देवाला आपले समर्पण घोषित केले.

६. इज्राएल लोकांना देवाच्या नावाची कोणती अर्थसूचकता होणार होती?

६ कशामुळे इज्राएल लोक हे समर्पण करण्यास प्रवृत्त झाले? ते इजिप्तमध्ये दास्यत्वात असताना यहोवाने त्यांना स्वतंत्र करावे म्हणून मोशेला नियुक्‍ती दिली. आपल्याला ज्या देवाने पाठवले त्याची ओळख लोकांना कशी द्यावी हे विचारले असता देवाने स्वतःचे प्रकटन “मी असावयाचा तोच असणार” असे केले. त्याने मोशेला इज्राएल वंशजाकडे असे म्हणावयास सांगितले: “मी जो असावयाचा, त्याने मला तुम्हांकडे पाठवले आहे.” (निर्गम ३:१३, १४, ओल्ड व्हर्शन) हा शब्दप्रयोग, यहोवा आपले उद्देश पूर्ण करण्यासाठी जे जरुरीचे आहे तसा बनतो याची सूचकता देतो. इज्राएल लोकांच्या पूर्वजांना जे कधीच माहीत नव्हते अशा मार्गाने तो आपल्या अभिवचनांची पूर्ती करणारा आहे असे तो स्वतःला प्रकटविणार होता.—निर्गम ६:२, ३.

७, ८. यहोवा हा इज्राएल लोकांच्या भक्‍तीला पात्र असणारा देव होता याचा त्यांच्याकडे कोणता पुरावा होता?

७ इजिप्त राष्ट्र व त्याच्या लोकांना दहा पीडांनी पीडित झाल्याचे इज्राएल लोकांनी बघितले. (स्तोत्र ७८:४४-५१) मग, स्त्रिया व मुलांचा समावेश असलेल्या अशा तीस लाखांपेक्षा अधिक लोकांनी एकाच रात्री आपल्या सर्व सामानासहित गोशेन प्रांतातून प्रगमन केले; हे खरोखर विलक्षण कृत्य होते. (निर्गम १२:३७, ३८) पुढे तांबड्या समुद्रापाशी देवाने त्याच्या लोकांना फारोच्या लष्करी सेनेपासून वाचवून स्वतःला “रणवीर” असल्याचे दाखवून दिले. हे त्याने समुद्र दुभागून इज्राएल लोकांना पार करून व नंतर पुन्हा त्याचे पाणी पूर्ववत करून त्यात पाठलाग करणाऱ्‍या मिसऱ्‍यांना जलसमाधी देऊन दाखवले. अशाप्रकारे, “परमेश्‍वराने (यहोवा, NW) मिसऱ्‍यांना आपला प्रबळ हात दाखविला तो इज्राएल लोकांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्‍वराचे भय धरिले आणि परमेश्‍वरावर . . . विश्‍वास ठेविला.”—निर्गम १४:३१; १५:३; स्तोत्र १३६:१०-१५.

८ देवाच्या नावाचा काय अर्थ होतो याबद्दलचा जणू पुरावा न मिळाल्याप्रमाणे, इज्राएल लोकांनी यहोवा व त्याचा प्रतिनिधी मोशे यांच्याविरूद्ध अन्‍न व पाण्याच्या उणीवेबद्दल कुरकूर सुरु केली. यहोवाने त्यांच्यासाठी लावे पाठवले, आकाशातून मान्‍ना ओतला आणि मरीबा येथे एका खडकातून पाणी वाहू दिले. (निर्गम १६:२-५, १२-१५, ३१; १७:२-७) आणखी यहोवाने अमालेक्यांच्या हल्ल्यातून देखील इज्राएल लोकांची सुटका केली. (निर्गम १७:८-१३) अशाप्रकारे, नंतर यहोवाने मोशेला जे घोषित केले ते इज्राएल लोक नाकारू शकले नाहीत की, “परमेश्‍वर, परमेश्‍वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, पाप व अपराध ह्‍यांची क्षमा करणारा.” (निर्गम ३४:६, ७) खरेच, यहोवाने स्वतःच्या बाबतीत भक्‍तीला पात्र असणारा असे सिद्ध केले.

९. यहोवाने इज्राएल लोकांना, त्याची सेवा करण्याबद्दल त्यांच्या समर्पणाला व्यक्‍त करण्याची का संधी दिली आणि याला त्यांनी कसा प्रतिसाद दिला?

९ इजिप्तमधून मुक्‍तता घडवून आणल्यामुळे इज्राएल लोकांवर यहोवाची मालकी होती तरी, दयाळू व कृपाळू देव या नात्याने त्याने त्यांना त्याची सेवा करण्याच्या त्यांच्या इच्छेला स्वयंस्फूर्तीने घोषित करण्याची संधी प्रस्तुत केली. (अनुवाद ७:७, ८; ३०:१५-२०) याचप्रमाणे, त्याने त्याच्या व इज्राएल लोकांमधील कराराच्या अटी देखील प्रस्तुत केल्या. (निर्गम १९:३-८; २०:१–२३:३३) ह्‍या अटी मोशेने इज्राएल लोकांना कळवल्या तेव्हा त्यांनी जाहीर केले: “जे काही परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू.” (निर्गम २४:३-७) ते स्वेच्छेने सार्वभौम प्रभु यहोवा याचे समर्पित राष्ट्र झाले.

कदर समर्पणाकडे निरवते

१०. यहोवाला केलेले आपले समर्पण कशावर आधारलेले असावे?

१० निर्माणकर्ता यहोवा आपल्याकडून पूर्ण जिवाच्या भक्‍तीला सतत पात्र राहतो. (मलाखी ३:६; मत्तय २२:३७; प्रकटीकरण ४:११) तथापि, आमचे समर्पण हे भोळेपणा, चंचल भावनांवर आधारित असू नये, किंवा इतरांनी आणि पालकांनी सुद्धा करायला लावले म्हणून करू नये. ते तर यहोवाबद्दलच्या सत्याचे अचूक ज्ञान आणि यहोवाने आपल्यासाठी जे केले आहे त्याची कदर यावर आधारित असले पाहिजे. (रोमकर १०:२; कलस्सैकर १:९, १०; १ तीमथ्य २:४) यहोवाने जसे इज्राएल लोकांना स्वयंस्फूर्तीने आपल्या समर्पणाची घोषणा करण्याची संधी दिली, तसेच तो आपल्यालाही, आपण स्वेच्छेने स्वतःचे समर्पण करावे व त्या समर्पणाला जाहीर करावे म्हणून संधी देतो.—१ पेत्र ३:२१.

११. आपल्या बायबलच्या अभ्यासाने यहोवाबद्दल आपल्याला काय प्रकटविले आहे?

११ बायबलच्या अभ्यासाद्वारे आपल्याला देवाची व्यक्‍ती या नात्याने ओळख मिळते. सृष्टीमध्ये परावर्तित होणाऱ्‍या त्याच्या गुणांची न्याहाळणी करण्यासाठी त्याचे वचन आपल्याला मदत देते. (स्तोत्र १९:१-४) तो कोणी अनाकलनीय गूढ त्रैक्य नाही हे आपल्याला त्याच्या वचनाद्वारे दिसू शकते. त्याला युद्धात कधीही पराजय मिळत नाही, त्यामुळे त्याला आपले देवत्व त्यागण्याचा प्रश्‍नच येत नाही. (निर्गम १५:११; १ करिंथकर ८:५, ६; प्रकटीकरण ११:१७, १८) तो आपली अभिवचने नित्याने पूर्ण करीत आला असल्यामुळे आपल्याला, त्याचे सुंदर नाव यहोवा काय सूचित करते याचे स्मरण मिळत राहते. तो महान उद्देशकर्ता आहे. (उत्पत्ती २:४; स्तोत्र ८३:१८; यशया ४६:९-११) बायबलचा अभ्यास केल्यामुळे देव केवढा विश्‍वासू व भरवसापात्र आहे ते आपल्याला स्पष्टरित्या समजते.—अनुवाद ७:९; स्तोत्र १९:७, ९; १११:७.

१२. (अ) आपल्याला यहोवाकडे कशामुळे आकर्षित केले जाते? (ब) बायबलमध्ये लिखित करण्यात आलेल्या खऱ्‍या जीवनी वृत्तांतांचे अनुभव एखाद्याला यहोवाची सेवा करण्यास कशी चालना देतात? (क) यहोवाची सेवा करण्यासंबंधाने तुम्हाला कसे वाटते?

१२ आपण यहोवाकडे खासपणे ज्यामुळे आकर्षित होतो, ते आहे त्याचे प्रेमळ व्यक्‍तिमत्त्व. मानवांशी व्यवहार करताना तो केवढा प्रेमळ, क्षमाशील व दयाळू आहे हे बायबल प्रदर्शित करते. ईयोबाने आपली सचोटी विश्‍वासूपणे राखल्यावर त्याला यहोवाने कसे समृद्ध केले त्याचा जरा विचार करा. ईयोबाचा अनुभव ठळकपणे सांगतो की, “प्रभु फार कनवाळू व दयाळू आहे.” (याकोब ५:११; ईयोब ४२:१२-१७) दाविदाने व्यभिचार व खून केला तेव्हा यहोवा त्याच्याशी कसा वागला त्याचा विचार करा. होय, जेव्हा एखादा पापी आपल्या ‘भग्न व अनुतप्त हृदयाने’ त्याच्याकडे येतो तेव्हा तो गंभीर पापांची देखील क्षमा करण्यास तयार असतो. (स्तोत्र ५१:३-११, १७) देवाच्या लोकांचा कट्टर छळ करणारा तार्ससचा शौल याच्याशी यहोवाने कसा व्यवहार केला त्याबद्दल विचार करा. ही उदाहरणे, पश्‍चात्तापी जनांचा उपयोग करण्यामध्ये देवाची दया व उदार स्वेच्छा यांना ठळकपणे मांडतात. (१ करिंथकर १५:९; १ तीमथ्य १:१५, १६) अशा या प्रेमळ देवाची सेवा करण्यामध्ये आपले जीवन पणाला लावता येऊ शकेल असे पौलाला वाटले. (रोमकर १४:८) तुम्हाला देखील तसेच वाटते का?

१३. यहोवाने दाखवलेले प्रीतीचे कोणते थोर वक्‍तव्य सरळ अंतःकरणाच्या लोकांना त्याला स्वतःचे समर्पण करण्यासाठी भाग पाडते?

१३ यहोवाने इज्राएल लोकांचे इजिप्तच्या दास्यत्वातून तारण केले, तसेच त्याने आपल्याला पाप व मरणाच्या दास्यत्वातून सुटका करण्याचा आधार—येशू ख्रिस्ताचे खंडणी यज्ञार्पण—पुरवले आहे. (योहान ३:१६) पौल म्हणतो: “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोमकर ५:८) ही प्रेमळ योजना सरळ अंतःकरणाच्या लोकांना येशू ख्रिस्ताद्वारे यहोवाला स्वतःचे समर्पण करण्यासाठी भाग पाडते. “कारण ख्रिस्ताची प्रीति आपल्याला आवरून धरते [“भाग पाडते,” NW] आपण असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले; आणि तो सर्वांसाठी ह्‍याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे.”—२ करिंथकर ५:१४, १५; रोमकर ८:३५-३९.

१४. यहोवाच्या व्यवहाराचे निव्वळ ज्ञान आपल्याला स्वतःचे समर्पण त्याला करण्यास चालना देणारे ठरते का? स्पष्ट करा.

१४ तरीसुद्धा, यहोवाचे व्यक्‍तिमत्त्व आणि त्याने मानवजातीसोबत राखलेला व्यवहार इतक्याच गोष्टी पुरेशा नाहीत. यहोवाबद्दल व्यक्‍तिगत आवड वाढवण्यास हवी. हे कसे करता येईल? देवाच्या वचनाचा आपल्या जीवनात अवलंब करून आणि त्यात आढळणारी तत्त्वे खरीच कार्यवाहित होत आहेत याचा स्वतः अनुभव घेऊन. (यशया ४८:१७) यहोवाने आपल्याला सैतानाच्या अधिपत्याखालील दुष्ट जगातील गाळापासून वाचवले आहे हे आपल्याला जाणवले पाहिजे. (पडताळा १ करिंथकर ६:११.) योग्य तेच करण्याच्या आपल्या झगड्यात आपण यहोवावर विसंबून राहण्याचे शिकतो आणि यहोवा हा जिवंत देव, ‘प्रार्थना ऐकणारा’ आहे याचा आपल्याला स्वतः अनुभव येतो. (स्तोत्र ६२:८; ६५:२) लवकरच आपल्याला त्याच्या समीप आल्याचे वाटू लागते व यामुळेच आपण आपल्या अंतर्यामाच्या भावना त्याच्यावर विश्‍वासाने सोपवू शकतो. आपल्यामध्ये यहोवाबद्दल गाढ प्रीतीची भावना वाढू लागते. याद्वारेच, आपल्याला निःसंशये स्वतःचे जीवन त्याला समर्पित करण्याकडे निरवले जाते.

१५. पूर्वी स्वतःच्या कामाला समर्पित असणाऱ्‍या एका माणसाला यहोवाची सेवा करण्यासाठी कशाने प्रवृत्त केले?

१५ या प्रेमळ यहोवा देवाची ओळख पुष्कळांना घडली असून त्यांनी त्याची सेवा करण्यासाठी स्वतःच्या जीवनाचे समर्पण केले आहे. याचे उदाहरण म्हणून एका विद्युत कर्मचाऱ्‍याचा विचार करा, ज्याचा व्यवसाय खूप जोरात चालला होता. एके काळी, तो सकाळी कामाला सुरवात करून, दिवसभर काम करून, रात्रीचा वेळही कामात घालून दुसऱ्‍या दिवशी सकाळी पाच वाजता घरी येत असे. साधारण तासाभराची विश्रांती घेतल्यावर तो पुन्हा दुसऱ्‍या कामाला लागे. “मी माझ्या कामाला समर्पित होतो,” असे तो आठवून सांगतो. त्याच्या बायकोने बायबलचा अभ्यास सुरु केला तेव्हा तो देखील तिच्यासोबत अभ्यास करू लागला. तो म्हणतो: “आतापर्यंत जितक्या देवांची मी माहिती करून घेतली ते नुसती सेवा करून घेण्यापुरतीच वाट बघत होते, आम्हाला कसलाही लाभ देत नव्हते. पण यहोवाने स्वतः पुढाकार घेऊन, मोठा स्वत्याग पत्करून, स्वतःचा एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर पाठवला.” (१ योहान ४:१०, १९) दहा महिन्यांच्या कालावधीतच या माणसाने यहोवाला स्वतःचे समर्पण केले. त्यानंतर, त्याने जिवंत देवाची सेवा करण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले. त्याने पूर्ण वेळेची सेवा पत्करून जेथे अधिक गरज होती अशा क्षेत्रात स्थलांतर केले. त्याने प्रेषितांप्रमाणेच ‘सर्व काही सोडून येशूला अनुसरले.’ (मत्तय १९:२७) दोन महिन्यांनंतर, त्याला व त्याच्या बायकोला ते राहात होते तेथील वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीच्या शाखेत विद्युतीकरणाच्या कामात मदत करण्यासाठी बोलावण्यात आले. २० पेक्षा अधिक वर्षांपासून तो या शाखेत त्याला जे काम प्रिय वाटते ते—स्वतःसाठी नव्हे तर यहोवासाठी करीत आहे.

तुमचे समर्पण जाहीर करा

१६. यहोवाला समर्पण करण्यामध्ये एखादा कोणती पावले उचलेल?

१६ बायबलचा काही काळ अभ्यास केल्यावर तरुण व वृद्ध, दोघांना, यहोवाबद्दलची व त्याने त्यांच्यासाठी जे केले त्याबद्दलची कदर वाढेल. याद्वारे त्यांना देवाला स्वतःचे समर्पण करण्याची चालना मिळाली पाहिजे. तुम्ही यापैकीचे एक असाल. तुम्हाला यहोवाला स्वतःचे समर्पण कसे करता येईल? बायबलमधून अचूक ज्ञान घेतल्यावर तुम्ही त्या ज्ञानानुरुप कृती केली पाहिजे आणि यहोवा व येशू ख्रिस्त यांच्यावर विश्‍वास ठेवला पाहिजे. (योहान १७:३) पूर्वीच्या कोणत्याही पापी मार्गाक्रमणाबद्दल पश्‍चात्ताप व्यक्‍त करून त्यापासून मागे वळा. (प्रेषितांची कृत्ये ३:१९) आता तुम्ही समर्पण करण्याच्या पातळीला येता, व ते यहोवाला प्रार्थनेद्वारे दृढ शब्दाने व्यक्‍त करता. ही प्रार्थना तुमच्या मनावर दीर्घकालीन परिणाम करील हे नक्की, कारण ही यहोवासोबतच्या नव्या नातेसंबंधाची सुरवात असेल.

१७. (अ) नव्यानेच समर्पण केलेल्या उमेदवारांसोबत वडील तयार केलेल्या प्रश्‍नांची उजळणी का करतात? (ब) एखाद्याच्या समर्पणानंतर त्याने लागलीच कोणते महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यास हवे आणि कोणत्या उद्देशास्तव?

१७ मोशेने इज्राएल लोकांना यहोवासोबत कराराच्या नात्यात येण्याबद्दलच्या अटी स्पष्ट केल्या, तसेच ज्यांनी नुकतेच समर्पण केले आहे अशांना त्यात काय गोवलेले आहे त्याचे सविस्तर परीक्षण करण्याबद्दल यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यातील वडील मदत करतात. प्रत्येकाला बायबलच्या मूलभूत शिक्षणाची पूर्ण समज झाली आहे आणि यहोवाचा साक्षीदार बनण्यामध्ये कशाचा समावेश आहे याची जाणीव आहे अशी खातरी करण्यासाठी ते तयार प्रश्‍नांचा उपयोग करतात. यानंतर, ते समर्पण जाहीर करण्याचा प्रसंग अगदी उचित आहे. नव्यानेच समर्पण केलेल्या व्यक्‍तीला आपण यहोवाच्या नातेसंबंधाच्या विशेषाधिकारात आलो आहोत हे इतरांना कळवण्याची उत्सुकता असेल हे स्वाभाविक आहे. (पडताळा यिर्मया ९:२४.) ही गोष्ट, समर्पणाचे चिन्ह म्हणून पाण्याखाली जाऊन बाप्तिस्मा घेण्याद्वारे केले जाते. पाण्याखाली जाणे व परत त्यातून वर येणे, तो पूर्वीच्या स्वार्थी जीवनाक्रमणाला मृतवत्‌ होतो व नवीन जीवनशैलीने म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याला वर येतो हे सूचित करते. हा काही पवित्र विधी नव्हे, तसेच मिसोगी या शिन्तो धर्मासारखा विधीसंस्कारही नव्हे, जेथे एखाद्या व्यक्‍तीची पाण्याने शुद्धी होते असे समजले जाते.a उलटपक्षी, बाप्तिस्मा हा, प्रार्थनेद्वारे आधीच करण्यात आलेल्या समर्पणाची जाहीर घोषणा होय.

१८. आपले समर्पण निष्फळ जाणार नाही असा आत्मविश्‍वास आपल्याला का असू शकतो?

१८ हा विधीयुक्‍त गंभीर प्रसंग एक अविस्मरणीय अनुभव आहे व तो देवाच्या नव्या सेवकाला, त्याने यहोवाबरोबर आता मिळवलेल्या टिकाऊ नातेसंबंधाचे स्मरण देतो. वैमानिकाने स्वतःचे राष्ट्र व सम्राट यांना केलेल्या समर्पणासारखे हे यहोवाला केलेले समर्पण व्यर्थ जाणार नाही, कारण तो असा एक चिरकालिक सर्वसमर्थ देव आहे, जो स्वतः ठरवतो त्या सर्व गोष्टी पूर्ण करतो. केवळ तोच आपल्या पूर्ण जिवाच्या भक्‍तीला पात्र आहे.—यशया ५५:९-११.

१९. पुढील लेखात कशाची चर्चा करण्यात येईल?

१९ तरीपण समर्पणात आणखी काही समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, समर्पण आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करते? याची चर्चा पुढील लेखात करण्यात येईल.

[तळटीपा]

a देवासाठी मानवजातीचा शोध (इंग्रजी) हे वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क इंकॉ. या संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील पृष्ठे १९४-५ पहा.

तुम्हाला आठवते का?

◻ जगामध्ये होते त्याप्रकारचे समर्पण निराशेत का समाप्त झाले?

◻ इज्राएल लोकांना यहोवास स्वतःचे समर्पण करण्यास कशामुळे प्रवृत्त केले गेले?

◻ आज आपल्याला यहोवास स्वतःचे समर्पण करण्यासाठी कशामुळे प्रवृत्त केले जाते?

◻ आपण देवाला स्वतःचे समर्पण कसे करतो?

◻ पाण्याच्या बाप्तिस्म्याची कोणती अर्थसूचकता आहे?

[१० पानांवरील चित्रं]

इज्राएल सीनाय येथे स्वतःचे यहोवाला समर्पण करतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा