बॉसनियातील विश्वासाने एका घरचे झालेल्यांची मदत करणे
यहोवाचे साक्षीदार राजकीय संघर्षात काहीच भाग घेत नाहीत. (योहान १७:१६) परंतु, “विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे” बरे करणे या पौलाच्या सल्ल्याचे अनुकरण करत असताना, युद्धग्रस्त भागातील त्यांच्या सहख्रिश्चनांच्या मदतीला ते धावून जातात. (गलतीकर ६:१०, मराठी रेफरन्स बायबल) १९९३-९४ चा हिवाळा जवळ आला तसे, ऑस्ट्रिया आणि क्रोआशिया येथील साक्षीदारांनी बॉसनियातील विश्वासाने एका घरचे झालेल्यांची मदत करण्यासाठी जीव धोक्यात घातला. त्यांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.
मार्च ते ऑक्टोबर १९९३ पर्यंत, बॉसनियात काहीही निवारण साहाय्य पाठवण्याची शक्यता नव्हती. परंतु, ऑक्टोबरच्या सुरवातीला अधिकाऱ्यांनी सूचित केले की ते माल वाहून नेऊ शकतात. तरीही ही कामगिरी धोक्याची होती कारण सर्व बॉसनियाच्या आघाडीवर जोरदार युद्ध चालले होते.
तरीसुद्धा, मंगळवारी, ऑक्टोबर २६, १९९३ रोजी, आमचे ट्रक बॉसनियातील आमच्या सहख्रिश्चनांसाठी १६ टन अन्न आणि जळण घेऊन व्हिएन्नातून निघाले. आमची ओळख व्हावी म्हणून आम्ही प्रांतीय अधिवेशनांचे लेपल कार्ड धारण केले.
क्रोआशिया व बॉसनियाच्या सीमेवर आल्याबरोबर आम्हाला सैन्यतळावर नेण्यात आले जेथे आमच्या ट्रक्सची कसून तपासणी करण्यात आली. सर्बियन क्षेत्रातून प्रवास करण्याच्या आमच्या विनंतीला फेटाळण्यात आले. मध्य बॉसनियातूनच—युद्ध जेथे चालू होते अगदी त्या क्षेत्रामधून जाण्यास परवानगी होती!
प्रयत्न निष्फळ ठरले?
लष्करी संरक्षकांनी आम्हाला एका तपासणी-नाक्यावरून दुसऱ्या नाकावर नेले, आम्ही रणगाडा आणि तोफखान्यांच्या कानठळ्या बसतील अशा विस्फोटांचा आवाज ऐकत होतो. रात्रीच्या वेळी, आम्ही वनराईतून प्रवास केला व आमच्या संरक्षणासाठी आमच्यासोबत दोन रणगाडे आणि एक जीप होती. आमचे ट्रक्स युद्धाच्या आघाडीतून अतिशय हळू जात होते! सकाळपर्यंत आम्ही यशस्वीपणे आमचा प्रवास केला परंतु मग आमच्यावर जेव्हा गोळ्या झाडण्यास सुरवात झाली तेव्हा आम्हाला एका टेकडीच्या मागे लपावे लागले. थोड्या वेळानंतर गोळ्यांचा वर्षाव थांबला आणि आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाला सुरवात केली.
आम्ही जेव्हा एका छावणीजवळ आलो तेव्हा तेथील कमांडरने, आम्ही कोण आहोत व आम्हाला काय हवे होते याची विचारपूस केली. आम्ही त्याला आमचा उद्देश सांगितल्यावर तो म्हणाला, “तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे ते नक्कीच अपयशी ठरणार आहे. छावणीच्या आवारातून तुम्ही सुरक्षित जाऊ शकाल याची शाश्वती नाही. राष्ट्रामध्ये इतकी कडाक्याची अन्नटंचाई आहे की लोक तुमच्यावर हल्ला करून तुमचा सर्व माल चोरून नेतील.” आम्ही माघारी जावे म्हणून त्याने आम्हाला गळ घातली.
आमचे प्रयत्न “अपयशी” ठरणार होते का? युद्धग्रस्त व अन्नटंचाईने पछाडलेल्या भागातून जाऊ शकू पण आमची मालमत्ता आणि आमचे जीव बचावून राहतील ही अपेक्षा करणे व्यर्थ होते का? आता एक गंभीर निर्णय घ्यायचा होता. आम्ही आधीच गोळ्या झाडण्याचा आवाज व बधिर करणारे बाँम्ब स्फोट ऐकले होते. आम्ही सैनिकांसोबत रात्र घालवली तेव्हा, ते युद्धाच्या तीव्रतेसाठी सज्ज असल्याचे आम्हाला दिसून आले. त्यांनी बुलेट-प्रुफ जाकीट घातले होते व त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे होती. तेथील आचाऱ्याने देखील त्याच्या पाठीवर बंदुक अडकवली होती. आणि आमच्या अंगात केवळ शर्ट, नेकटाय आणि लेपल कार्ड होते! अशा परिस्थितीत आम्ही पुढे प्रवास करणे सुज्ञतेचे होते का?
त्रॉव्हनीक शहरात आगमन
असे दिसत होते की, युद्धात भाग घेणाऱ्या तिसऱ्या पार्टीसोबत समेट करणे हीच केवळ आमच्याकरता आशा होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एका तरुणीला, तिसऱ्या पार्टीचे छावणी मुख्यालय कोठे आहे ते विचारले. “येथून ते इतके दूर नाही, या वनराईतून गेल्यावर तुम्हाला एक इमारत दिसेल जी आधी एक इस्पितळ होती,” ती म्हणाली. तेथे जाण्यास आम्ही उत्सुक होतो. आम्ही शिबिरातून निशस्त्र निघाल्याचे पाहून सैनिकांना आश्चर्य वाटले.
पूर्वीचे ते इस्पितळ पूर्णपणे ढासळून गेले होते, पण तेथे एक अधिकारी होता. त्याने आम्हाला, पहिल्यांदा त्याच्या कमांडरसोबत बोलणी करण्यास सांगून मदत करण्याची तयारी दर्शवली. त्याने आम्हाला त्याच्या खटाऱ्या कारमध्ये बसवले व युद्धाच्या आघाडीतून गाडी भरधाव वेगाने नेली. आम्ही एका इमारतीजवळ येऊन थांबलो जेथे कमांडींग अधिकाऱ्याने आमच्यासोबत अंधाऱ्या खोलीत बोलणी करण्याची तयारी दाखवली.
“रात्री आम्हाला तुमच्यावर गोळीबार करावयाचा होता, तुम्हाला काय हवे आहे?” त्याने विचारले.
“आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत, आणि आम्हाला आमच्या बांधवांसाठी निवारण माल घेऊन जायचा आहे.”
त्याला खूपच आश्चर्य वाटले—शिवाय त्याच्यावर प्रभावही पडला—कारण अनेक आठवड्यांपर्यंत कोणतेही निवारण प्रयोजन घेऊन जाणारे ट्रक बॉसनियात येण्यास धजले नव्हते. आमची कसून तपासणी केल्यावर, आम्हाला एक लिखित पुष्टीकरण देण्यात आले. आम्हाला आमचा प्रवास पुढे करण्याची काही शक्यता नाही असे आदल्या रात्री वाटले, परंतु आता आम्ही संरक्षणाविना प्रवास करू शकत होतो!
आम्ही वनराईतून गाडी चालवत एका तपासणी-नाक्यावरून दुसऱ्याला पार करत गेलो, काही वेळा तर युद्धाच्या आघाडीतून गाडी चालवली. धोका असतानाही, आम्ही त्रॉव्हनीक येथे सुखरूप पोहंचलो. आम्ही आल्याचे एका सैनिकाने ऐकल्यावर आमचे बांधव ज्या घरात एकत्र जमले होते तेथे पळत गेला आणि मोठ्याने म्हणाला, “तुमचे लोक ट्रक्स घेऊन पोहंचले बघा!” तुम्ही त्यांच्या आनंदाची कल्पना करू शकता. आम्ही आणलेले अन्न घरात घेऊन गेलो, थोडा वेळ बोललो, परंतु आम्हाला पुढे जायचे होते. अंधार पडत होता आणि आणखी ३२ किलोमीटरर्सचा संकटमय प्रवास करायचा होता.
झन्त्स शहराकडे
एका संरक्षक गाडीने आम्हाला वनराईतून भरधाव वेगाने मार्गदर्शित केले. काही म्हणाले की आम्ही झन्त्सपर्यंत सुखरूप पोहंचू शकणारच नाही, परंतु आम्ही पोहंचलो. त्या शहरात स्मशान शांतता पसरलेली दिसत होती. रस्त्यावर दिवे नव्हते की मोटारी नव्हत्या. झन्त्सला सर्व बाजूंनी वेढा घातलेला होता व त्यामुळे तेथे तीव्र अन्नटंचाई व निराशा पसरली होती.
रस्त्यावरून जात असताना, आम्हाला एक आश्चर्य दिसले—दोन ख्रिस्ती बहिणी साक्षकार्य करत होत्या! आम्हाला नंतर कळले की, आदल्या दिवशी बांधवांनी त्यांच्या सभेमध्ये ठरवले की त्यांना वनराईत जाऊन अन्न शोधून आणावे लागेल कारण त्यांच्याकडचा सर्व साठा संपला होता. आम्ही अगदी वेळेवर पोहंचलो होतो! पहाटे चार वाजता, रस्त्यावर कोणी नव्हते तेव्हा ट्रक्समधील सामान आम्ही खाली उतरवले.
दुसऱ्या दिवशी आम्ही एका सेनापतीला भेटलो ज्याला आम्ही झन्त्सला सुखरूप येऊन पोहंचलो हे पाहून अतिशय आश्चर्य वाटले. त्यांना आम्ही आमच्या अंतिम मुक्कामाच्या ठिकाणी, सारायेवो, येथे जाण्यासंबंधी विचारपूस केली.
सेनापतीने म्हटले, “कैक महिन्यांपासून तेथे कोणीही ट्रकने जाण्याचे साहस केलेले नाही.” शेवटी त्याने आम्हाला डोंगर पार करण्याची परवानगी दिली. त्याने ताकीद दिली, “पण मी तुम्हाला सांगतो, ते फार कठीण आहे, तुम्हाला जेथे जावयाचे आहे तेथपर्यंत पोहंचण्याइतके तुमचे ट्रक्स मजबूत असल्याचे मला दिसत नाही.”
त्या सेनापतीने अतिशयोक्ती केली नव्हती. सारायेवो येथून केवळ ४० किलोमीटर दूर होते पण तेथे जाण्यासाठी आम्हाला १४० किलोमीटरचा वनराईतून प्रवास करावा लागला! आम्ही सारायेवो मार्गे झन्त्स ते यॉब्लनित्स पर्यंत केलेला प्रवास कधीच विसरणार नाही. आम्हाला ताशी केवळ ५ किलोमीटरच्या वेगाने हा प्रवास तीन दिवस आणि दोन रात्री करावा लागला. अंतर कापू शकतो इतक्या हळूहळू आम्ही आमचे ट्रक्स चालवले. चिलखती गाड्या वारंवार त्यावरून गेल्यामुळे तो “रस्ता” ओबडधोबड झाला होता. आम्ही भीतीदायक वाटणाऱ्या खडकांवरून आणि बिळांवरून गाड्या चालवल्या. पुष्कळ वेळा, आम्हाला आमच्या गाडीचे दिवे विझवावे लागले, आणि दोन वेळा आमचे ट्रक्स डोंगराच्या निसरड्या भागातून अक्षरश: घसरत आले. आम्हाला संरक्षण देणाऱ्या एका लष्करी ट्रकने क्षणासाठी दिवे लावले आणि लगेचच त्याच्यावर गोळीबार झाला. काही वेळा आम्हाला खराब झालेले पूल आणि गाडीचे टायर दुरूस्त करावे लागले.
आम्ही सारायेवोच्या सीमाप्रदेशावर येऊन पोहंचलो तेव्हा तेथील कार्यभार पाहणाऱ्या सेनापतीसोबत बोलण्याची आम्ही परवानगी घेतली. तेथे थांबलेलो असताना, आम्ही रस्त्यावरून जाणारा एक ट्रक पाहिला ज्यामध्ये दहा शवे व एक पोते भरून मुंडकी होती; सैनिक त्या शवांना स्वाधीन करण्याविषयी बोलत होते—खरेच ते दुःखद दृश्य, युद्धांचा अंत जेव्हा होईल त्या दिवसाची वाट पाहण्यास लावणारे होते.—यशया २:४.
सकाळी १०.०० वाजता आमच्यातील एकाला सेनापती आणि त्याच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत फक्त मेणबत्ती लावलेल्या एका अंधाऱ्या खोलीत बोलण्याची परवानगी मिळाली.
सेनापतीने विचारले, “तुम्ही कोण आहात?”
“आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत. आम्हाला सारायेवो येथील आमच्या सह साक्षीदारांसाठी अन्न घेऊन जायचे आहे.”
“सारायेवो येथे पुष्कळ यहोवाचे साक्षीदार आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?”
“होय, त्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत.”
मग त्या सेनापतीने एका साक्षीदाराचे नाव सांगितले. “तुम्ही त्याला ओळखता का?”
“होय, तो आमचा मित्र आहे.”
“तो माझाही मित्र आहे. आम्ही दोघे शाळेत सोबत होतो. तो साक्षीदार झाल्यापासून मला त्याची अधिकच गुणग्राहकता वाटते. त्याने तुम्हा लोकांसाठी पुष्कळ काही केले आहे. कृपया आम्हाला यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आणखी सांगा,” असे सेनापतीने म्हटले.
एक तासाची चर्चा घडल्यानंतर, डझनापेक्षा अधिक नियतकालिके आणि माहितीपत्रके सादर केली. दुसऱ्या भेटीनंतर, सेनापतीने आमच्यासाठी खास व्यवस्था केली जेणेकरून निवारण माल सारायेवो येथील बांधवांपर्यंत पोहचता करता येईल.
ते इतके सोपे नव्हते. सुमारे ३० लोकांनी, ज्यामध्ये साक्षीदार नसलेल्यांचा देखील समावेश होता, प्रत्येकी २७ किलो वजनाची पाकीटे मोठ्या परिश्रमाने ओढली. त्या सर्वांनी दोन वेगवेगळ्या रात्री ८.०० वाजेपासून ५.०० वाजेपर्यंत—एकूण १८ तास काम केले. एका वडिलाने सांगितले, की निवारण माल पाहून त्यांचे शेजारी इतके प्रभावित झाले की त्यांनी बांधवांसोबत गुडघे टेकले आणि यहोवाचे आभार मानले! हो, त्यांनाही काही अन्न देण्यात आले!
आमच्या बांधवांना, ११,००० किलोचा निवारण माल मिळाल्याचे पाहून झालेल्या आनंदाची कल्पना करा! परिस्थिती अगदी हलाखीची होती. स्थानिकरीत्या, एक किलो पीठाची DM४५० व DM१,००० (८,७०० व १९,२२० रूपये) च्या मध्ये इतकी किंमत आहे. एक पोतेभरून जळणाची किंमत सुमारे DM४०० (७,७०० रूपये) आणि एक लिटर डिझेलची किंमत DM३० (६२० रूपये) इतकी आहे.
आम्ही येथे येत असताना जितक्या धोक्यांचा सामना केला त्या सर्वांचे आम्हाला प्रतिफळ मिळाले असे आम्हाला वाटले. हा निवारण माल आमच्या बांधवांना मिळाल्यावर त्यांना झालेल्या आनंदावर गंभीर विचार करण्यास आम्हाला बरे वाटले. हा असा एक अनुभव होता जो ते—आणि आम्ही—कधीच विसरणार नाही. परंतु आता आम्हाला घरी पुन्हा जाण्याच्या आव्हानाचा विचार करायचा होता.
घरी परतताना
“आम्ही कोणत्या मार्गाने पुन्हा माघारी जावे?” असे त्या सेनापतीला विचारले.
“तुम्ही ज्या मार्गाने आलात त्याच मार्गाने पुन्हा जा,” त्याने उत्तर दिले.
आम्ही खूप थकलो होतो, शिवाय आमच्याकडे जास्त इंधन आणि जादा टायरही नव्हते. पाऊस पडू लागला, आम्हाला चिखलातून प्रवास करता आला नाही. आम्ही दक्षिणेकडे प्रवास करू शकतो का असे त्या सेनापतीला विचारले.
त्याने म्हटले, “तेथेही इतके जोरदार युद्ध चालले आहे की उंदरालासुद्धा मधून सुखरूप जाता येणार नाही.” परंतु थोड्या वेळाने त्याने पुन्हा विचार केला आणि म्हटले, “बघा प्रयत्न करा, नाहीतरी तुम्ही येथे येण्यात यश मिळवले.”
आम्हाला एक ट्रक सारायेवो येथेच सोडून यावा लागला. कारण आम्ही त्याच्यातील इंधन बाकीच्या तीन ट्रक्समध्ये वाटून घातले. आम्ही मध्यरात्री तेथून प्रवासाला सुरवात केली व पुन्हा वनराईतून गेलो.
आमचा परतीचा प्रवास समस्याविना नव्हता. आम्ही एका लष्करी ट्रक समोर येऊन थांबलो. आम्हाला जो पूल पार करायचा होता त्यावर तो थोडासा अडवा होता. आम्ही पाहिले की त्याचे फक्त एक चाक जरी बाजूला केले तरी आमच्या गाड्यांना जाण्यासाठी जागा मिळेल.
आम्ही एका शस्त्रधारी सैनिकाला विनंती केली. “आम्ही तुमच्या गाडीचे हे एक चाक काढून आमच्या गाड्यांनी पूल पार केल्यावर ते पुन्हा लावून दिले तर चालेल का?”
“तुम्ही जर त्या चाकाला हात लावला तर मी तुम्हावर गोळीबार करीन,” असे त्या सैनिकाने आमच्याकडे त्याची बंदुक रोखून म्हटले.
आम्ही विचार केला की जर या सैनिकाला एखादा कॉफीचा कप दिला तर बरे होईल. काही तासांसाठी आम्ही त्याला १९९१ च्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांविषयी जसे की झाग्रेब येथे झालेल्या अधिवेशनाबद्दल सांगितले. त्यानंतर, त्याची मनोवृत्ती थोडीशी नरम झाली आणि त्याने आम्हाला ते चाक काढू दिले.
यॉब्लनित्स शहराजवळ आमच्यातील एकाने आम्हाला ज्या मार्गाने प्रवास करावयाचा होता त्याविषयी एका कमांडरसोबत बोलणी केली. आम्ही काय करू इच्छित होतो त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. “तुम्हाला नेरतव्हा खोऱ्यातून जायचे आहे?”
त्याला चिंता लागली होती हे अगदी स्पष्ट दिसत होते. नेरतव्हा खोऱ्याच्या डोंगरउतारावर वेगवेगळे लष्कर सज्ज होते. ते एकमेकांवर बेछूट गोळीबार करत होते. जवळजवळ १६ किलोमीटरर्सचा तेथील रस्ता इतका निसरडा आहे की केव्हा धोका येईल ते कळणारच नाही. “असा तो मार्ग आहे आणि तरी तुम्हाला तेथून जाण्याची इच्छा आहे?” तो सेनापती म्हणाला.
या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार केल्यावर, सेनापतीने म्हटले की, आमच्यासोबत जर कोणी अधिकृत व्यक्ती असल्या तरच आम्ही जाऊ शकतो. परंतु ह्या अधिकृत व्यक्तींना आमच्यासोबत येण्याची इच्छा दिसत नव्हती! शेवटी, आम्ही त्यांना विनंती केली, की त्यांनी फक्त दुसऱ्या बाजूच्या लष्कराशी संपर्क साधावा आणि आमच्या जाण्याविषयी त्यांना कळवावे. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी संरक्षणाविना पार जाणार होतो.
आम्ही आमच्या ट्रक्सवर मोठमोठ्या अक्षरांनी मानवकल्याण साहाय्य असे लिहिले. प्रार्थना केल्यावर, आम्ही खोऱ्यातून जाऊ लागलो. जर आमच्यावर गोळीबार झाला तर आमच्या गाड्यांचा वेग वाढवून संशय उत्पन्न करणार नाही असे आम्ही ठरवले.
आम्ही प्राण्यांची शवे, नाश झालेले ट्रक आणि रणगाडे ओलांडून पूलावरून नदीच्या दुसऱ्या बाजूला गेलो आणि पुढील खोऱ्यात शिरलो. अचानक आम्हाला जमिनीवर सुरूंग दिसले ज्यामुळे आम्हाला पुढे जाणे अशक्य होते. आम्ही जोरजोराने ट्रकचा हॉर्न वाजवला आणि दोन सैनिकांनी एका टेकडीच्या मागून डोकावून पाहिले. “तुम्ही कोण आहात?” “काय हवे तुम्हाला?” असे त्यांनी दरडावून विचारले.
आमची ओळख दिल्यावर, आम्ही त्यांना विचारले की ते, तो सुरूंग काढू शकतील का, तेव्हा त्यांनी मान्य केले. शेवटी आम्ही दुसऱ्या बाजूला पोहंचलो.
सैनिकांना आम्हाला पाहून आश्चर्य वाटले. ते हळूच त्यांच्या लपण्याच्या ठिकाणातून बाहेर, त्यांच्या बंदुकी आमच्या दिशेने रोखून, ट्रक जवळ येऊ लागले. आम्ही त्यांना आमचे परवाना कागद सोबतच परवाना पाटीही दाखवली, जी आम्ही युद्धाच्या भागातून जात असताना सुरक्षिततेच्या कारणासाठी काढले होते.
एका सैनिकाने म्हटले, “तुम्ही पुन्हा याल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. तरी तुम्ही एवढ्या अडचणीतून कसे गेला?”
आमच्या विनंतीच्या उलट, ह्या सीमारक्षक दलातील कोणालाही आमच्या येण्याची सूचना दिली गेली नव्हती! त्या अधिकाऱ्याने पुढे म्हटले: “आम्ही आमच्या बंदुकांचा घोडा खेचून इतक्यात तुमच्यावर गोळीबार करण्यास सुरवात करणार होतो.”
मग का केला नाही असे आम्ही त्यांना विचारले.
तेव्हा सैनिकाने म्हटले, “ते मला माहीत नाही. मला वाटत ते तुमच नशीब होतं. परंतु आम्ही जेव्हा तुमच्याकडे आमच्या दुर्बिणीतून पाहिले तेव्हा आम्हाला तुमच्या गाडीवर ‘मानवकल्याण सहाय्य’ हे लेबल लावलेले दिसले. तेव्हा आम्ही तुमच्याबाबतीत काय करावे हे आम्हाला कळले नाही. म्हणूनच तुम्ही सुखरूप आला.” त्यानंतर आम्ही यहोवाला त्याने पुरवलेल्या संरक्षणासाठी अंतःकरणपूर्वक प्रार्थनेने उपकारस्तुती केली.
आमच्या बॉसनियातील बंधू आणि भगिणींची परिस्थिती कठोर असल्या तरी, त्यांच्यातील आत्मा प्रेरक आहे. त्यांच्याकडे ज्या भौतिक गोष्टी आहेत तसेच विश्वास आणि उत्तेजनाचे बोल ते आपसात वाटून घेतात. झन्त्समध्ये एकूण ४० क्रियाशील साक्षीदार आहेत ज्यामध्ये २ खास पायनियर, ११ साहाय्यक पायनियर, आणि १४ बाप्तिस्मा प्राप्त नवोदित आहेत. सारायेवो शहरात अजूनही राहणारे ६५ साक्षीदार शिवाय ४ साहाय्यक पायनियर, १३४ बायबल अभ्यास चालवतात. तेथील साक्षीदार प्रत्येक महिन्याला सरासरी २० तास, इतरांसोबत देवाच्या राज्याच्या सुवार्तेविषयी बोलण्यात खर्च करतात.
खरेच, यहोवाचे साक्षीदार, विश्वासूंच्या एका जागतिक कुटुंबाचे मिळून बनलेले आहेत. विश्वासामध्ये त्यांच्याशी संबंधीत—ज्यांना ते आधी कधीच भेटले नव्हते अशा लोकांच्या भल्यासाठी ते स्वखुषीने त्यांचे जीवन धोक्यात घालतात. का बरे? कारण ते त्यांच्यावर प्रीती करतात. येशू ख्रिस्ताने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) निश्चित, हीच गोष्ट बॉसनियातील विश्वासाने एका घरचे झालेल्यांसोबत घडली आहे.
[२४ पानांवरील नकाशा/चित्रं]
ऑस्ट्रिया
स्लोवेनिया
हंगेरी
क्रोआशिया
बॉसनिया
संर्बिया
त्रॉवनीक
झन्त्स
सारायेवो
ॲड्रायटिक समुद्र
[चित्रं]
बॉसनिया व हेर्जगोविनाला मदत घेऊन जात असताना
[२६ पानांवरील चित्र]
एका उलटलेल्या ट्रकच्या बाजूने हळूहळू जात असताना