र्वांडातील आपल्या बांधवांचा साहसी विश्वास
आफ्रिकन राष्ट्राच्या र्वांडात मोठ्या प्रमाणावर झालेल्या कत्तलीच्या बातम्या, १९९४ या वर्षाच्या सुरवातीला बाहेर पडू लागल्या तेव्हा संपूर्ण विश्वाला धक्काच बसला. तेथे मुलकी युद्ध उसळले होते—शतकांपासून असलेले शत्रुत्व कळसास पोहंचले होते.
कायदा आणि व्यवस्था संपूर्णपणे मोडकळीस आलेल्या परिस्थितीचा सामना करीत र्वांडातील २,००० व त्यापेक्षा अधिक साक्षीदारांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी तेथून पळून जाण्यास भाग पडले. सुमारे १,३०० लोकांना, झाइरे व टान्झानियाच्या जवळपास निर्वासित शिबिरांमध्ये संरक्षण मिळाले. परंतु काही जणांना तेथे पोहंचण्यास उशीर झाल्यामुळे बचावता आले नाही. आम्हाला हे कळवण्यास दुःख होते की आमचे जवळजवळ ४०० बंधू आणि भगिणी—प्रौढ आणि मुले, सर्व नागरिकच होते—या पिसाळलेल्या हिंसेत मरण पावले. संपूर्ण जगभरातील ख्रिश्चनांना या धैर्यशील सत्वनिष्ठा राखणाऱ्यांना गमावल्यामुळे दुःख वाटते, परंतु पुनरूत्थानाविषयी बायबलच्या अभिवचनाद्वारे ते सांत्वन प्राप्त करून घेतात.—योहान ११:२५.
र्वांडा येथे बचावलेल्या बंधू आणि भगिणींचे कसे चालले आहे? पुष्कळ राष्ट्रांतून वडिलांना प्रत्यक्षात चौकशी करण्यासाठी तेथे पाठविण्यात आले. एका अहवालातून असे सांगण्यात आले की र्वांडातील बांधवांनी “बऱ्याच प्रतिष्ठेने व धैर्याने” परिस्थितीचा सामना केला. उदाहरणार्थ, तेथील बांधवांनी सर्व प्रथम, बायबल प्रकाशनांसाठी विनंती केली. ‘त्यांना पुष्कळ गोष्टींची अत्यंत गरज असूनही भौतिक मदतीपेक्षा आध्यात्मिक मदत मिळण्याविषयी जास्त काळजी वाटत आहे असे दिसते,’ असा तो अहवाल समाप्तीस म्हणतो. शिबिरांमधील परिस्थिती जुन्या पद्धतीची असली तरी, ‘आमचे बांधव जेथे राहतात तो सर्वात स्वच्छ भाग आहे.’
वॉचटावर संस्थेने अन्न, ब्लँकेटस्, कपडे, शूज व औषधे विकत घेण्यासाठी निधि गोळा केले. फ्रान्समधील आमच्या बांधवांनी उदार मनाने देणग्या दिल्या, व जून महिन्याच्या सुरवातीला जवळजवळ दोन टन साठा र्वांडातील आपल्या गरजू बांधवांना पाठविण्यात आला.
अशा परिस्थितींमुळे एक उत्तम साक्ष देण्यात आली यात काहीच आश्चर्य करण्यासारखे नाही. आमच्या र्वांडा येथील बांधवांना सह साक्षीदारांकडून अशाप्रकारची मदत आणि आधार मिळाला, शिवाय इतरांनाही त्यातून मदत करण्यास शक्य झाले ही वस्तुस्थिती पाहून निरीक्षकांवर अतिशय प्रभाव पडला आहे. शिबिरांमधील फक्त साक्षीदारांनाच त्यांच्या धर्मातील सदस्यांनी येऊन भेटी दिल्या असेही काही जणांनी बोलून दाखवले!
र्वांडातील आमच्या बांधवांची ही दयनीय स्थिती आम्हाला याची आठवून करून देते की “शेवटल्या काळी,” माणसे “क्रूर” व “हिंसक” होतील. (२ तीमथ्य ३:१-५; टुडेज इंग्लिश वर्शन) सध्या यहोवा त्याच्या लोकांना भौतिक धोक्यांपासून चमत्कारिक संरक्षणाचे अभिवचन देत नसला तरी तो, त्यांची आध्यात्मिकता आणि त्याच्यासोबतच्या नातेसंबंधाचे संरक्षण करील तसेच ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीत आता नष्ट झालेल्यांचे पुनरूत्थान करील असे अभिवचन देतो. (स्तोत्र ९१:१-१०) बचावलेल्या आमच्या र्वांडातील बांधवांना या सत्वपरीक्षेच्या काळात यहोवा मदत करो व टिकवून ठेवो हीच त्याच्या चरणी आपण नेहमी प्रार्थना करूया.—स्तोत्र ४६:१.