वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ११/१ पृ. १६-२२
  • कनवाळू व्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कनवाळू व्हा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दयाळूपणाचे अभुतपूर्व कार्य
  • नव्या व्यक्‍तिमत्त्वाचा भाग
  • मत्सर—दयेसाठी एक अडखळण
  • दयाळूपणास इतर अडथळे
  • आजाऱ्‍यांसाठी कळवळा
  • अशक्‍तांसाठी कळवळा
  • यहोवाच्या कनवाळूपणाचं अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • यहोवा दयेने राज्य करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवा—आमचा कनवाळू पिता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • “कनवाळू” असा
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ११/१ पृ. १६-२२

कनवाळू व्हा

“करुणायुक्‍त हृदय व दयाळूपणा ही धारण करा.”—कलस्सैकर ३:१२, NW.

१. आज दयाळूपणाची अधिक गरज का आहे?

इतिहासात कनवाळूपणाच्या साहाय्याची गरज, अनेकांना या पूर्वी कधीही भासली नव्हती. आजारपण, भूक, बेरोजगारी, गुन्हे, युद्धे, अराजकता, व नैसर्गिक आपत्ती या गोष्टींचा सामना करत असताना लाखोंना मदतीची आवश्‍यकता आहे. परंतु एक समस्या यापेक्षाही अधिक गंभीर आहे व ती मानवजातीची दयनीय आध्यात्मिक स्थिती होय. सैतानाला आपला काळ थोडा असल्याचे माहीत असल्यामुळे, तो ‘सर्व जगाला ठकवीत आहे.’ (प्रकटीकरण १२:९, १२) या कारणास्तव, विशेषपणे खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीच्या बाहेर असणारे लोक, आपले जीवन गमावण्याच्या धोक्यात आहेत आणि बायबल, देवाच्या येणाऱ्‍या न्यायदंडाच्या दिवसात नाश केल्या जाणाऱ्‍यांना पुनरुत्थानाची काही आशा नसल्याचे सांगते.—मत्तय २५:३१-३३, ४१, ४६; २ थेस्सलनीकाकर १:६-९.

२. यहोवाने दुष्टांचा नाश करण्यापासून आपला हात का आवरला?

२ तरीही या शेवटल्या घटकेपर्यंत, यहोवा कृतघ्न व दुष्टांसाठी धीर व दया दाखवीत आहे. (मत्तय ५:४५; लूक ६:३५, ३६) अविश्‍वासू इस्राएल राष्ट्राला शिक्षा देण्यात दिरंगाई दाखवण्यामध्ये जे कारण होते तेच येथेही आहे. “प्रभू यहोवा म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरुन मागे फिरुन जगावे यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरुन मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?”—यहेज्केल ३३:११.

३. आपले लोक नसलेल्या लोकांबद्दल, यहोवाच्या दयाळूपणाचे कोणते उदाहरण आपल्याजवळ आहे व यापासून आपण काय शिकतो?

३ यहोवाने दुष्ट निनवेकरांना देखील कळवळा, दाखवला होता. यहोवाने आपल्या योना संदेष्ट्याला येऊन ठेपलेल्या नाशाबद्दलचा इशारा देण्यासाठी पाठविले. त्यांनी योनाच्या प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद देऊन पश्‍चात्ताप केला. यामुळे, त्या वेळी शहराचा नाश करण्यापासून दयाळू यहोवा देवाने आपला हात आवरला. (योना ३:१०; ४:११) देवाला जर, पुनरुत्थान होण्याची शक्यता असणाऱ्‍या निनवेकरांची कीव वाटली, तर आज सार्वकालिक नाशाचा सामना करणाऱ्‍या लोकांबद्दल त्याला किती अधिकपणे वाटत असेल!—लूक ११:३२.

दयाळूपणाचे अभुतपूर्व कार्य

४. यहोवा आज आपल्या लोकांना कशाप्रकारे दया दाखवीत आहे?

४ यहोवाच्या दयाळू व्यक्‍तिमत्त्वाच्या एकवाक्यतेत, त्याने ‘राज्याच्या सुवार्तेसह’ आपल्या शेजाऱ्‍यांना भेटत राहण्याची आज्ञा आपल्या साक्षीदारांना दिली. (मत्तय २४:१४) लोक, या जीवन वाचविणाऱ्‍या कार्याला कृतज्ञतापूर्वक प्रतिसाद देतात, तेव्हा राज्याचा संदेश समजण्यासाठी यहोवा त्यांची अंतःकरणे उघडतो. (मत्तय ११:२५; प्रेषितांची कृत्ये १६:१४) खरे ख्रिस्ती आपल्या देवाचे अनुसरण करण्यामध्ये, आस्थेवाईक लोकांच्या पुनर्भेटी घेऊन, किंवा शक्य असेल तेथे बायबल अभ्यासाची मदत देऊन कळवळा दाखवतात. अशाप्रकारे, १९९३ मध्ये ४५ लाखांपेक्षा अधिक असणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांनी २३१ देशात घरोघरच्या कार्यात व त्यांच्या शेजाऱ्‍यांसोबत बायबलचा अभ्यास करण्यात एक महापद्‌मापेक्षा अधिक तास खर्च केले. याच्या परिणामात, यहोवाला आपले जीवन समर्पण करुन बाप्तिस्मा घेतलेल्या साक्षीदारांमध्ये स्वतःला गणले जाण्याची सुसंधी नवोदित आस्थेवाईकांना आहे. या कारणास्तव, ते सुद्धा मरत असलेल्या सैतानाच्या जगात अजुनही जखडलेल्या संभवनीय शिष्यांसाठी दयाळूपणाच्या या अभुतपूर्व कार्याची जबाबदारी पार पाडत आहेत.—मत्तय २८:१९, २०; योहान १४:१२.

५. ईश्‍वरी दया तिची मर्यादा गाठते, तेव्हा देवाचा विपर्यास केलेल्या धर्मांचे काय होईल?

५ यहोवा लवकरच ‘रणवीराप्रमाणे’ कार्य करील. (निर्गम १५:३) आपल्या नावासाठी व लोकांसाठी असलेल्या कळवळ्यामुळे तो दुष्टांना काढून टाकील व नवीन धार्मिक जगाची प्रस्थापना करील. (२ पेत्र ३:१३) देवाच्या क्रोधाच्या दिवसाचा प्रथम अनुभव, ख्रिस्ती धर्मजगतामधील चर्चेसना घ्यावा लागेल. देवाने ज्याप्रमाणे बॅबिलॉनच्या राजाच्या हातून जेरुसलेममधील आपल्या मंदिराचा देखील बचाव केला नाही, त्याचप्रमाणे तो स्वतःचा विपर्यास करणाऱ्‍या धार्मिक संघटनांचाही बचाव करणार नाही. देव संयुक्‍त राष्ट्रसंघातील सदस्यांच्या अंतःकरणात, ख्रिस्ती धर्मजगताचा व इतर सर्व प्रकारच्या खोट्या धर्मांचा नाश करण्याचे टाकील. (प्रकटीकरण १७:१६, १७) यहोवा असे म्हणतो, “मी तर कृपादृष्टी करणार नाही, गय करणार नाही, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्या शिरी लादीन.”—यहेज्केल ९:५, १०.

६. यहोवाचे साक्षीदार दया दाखविण्यास कोणत्या मार्गांनी प्रवृत्त झाले आहेत?

६ अजूनही वेळ असल्यामुळे, यहोवाचे साक्षीदार तारणाविषयी असलेला देवाचा संदेश आवेशाने प्रचार करुन आपल्या शेजाऱ्‍यांबद्दल कळवळा दाखवीत आहेत. तसेच स्वाभाविकपणे, शक्य असलेल्या ठिकाणी भौतिक गरजा पुरविण्याद्वारे ते आपल्या शेजाऱ्‍यांना मदत देखील करतात. असे असले तरी याबाबतीत, त्यांची प्रथम जबाबदारी आपल्या निकटच्या कौटुंबिक सदस्यांच्या व विश्‍वासामुळे नातेसंबंधात आलेल्यांच्या गरजांची काळजी घेण्याची आहे. (गलतीकर ६:१०; १ तीमथ्य ५:४, ८) यहोवाच्या साक्षीदारांनी विविध आपत्तींचा सामना सहन केलेल्या सह विश्‍वासूंसाठी केलेल्या अनेक विशेष कामगिरी निवारण योजना, दयेची उल्लेखनीय उदाहरणे आहेत. तरीसुद्धा, कनवाळूपणा दाखविण्याआधी ख्रिश्‍चनांना संकट प्रसंगासाठी थांबून राहण्याची गरज नाही. दैनंदिन जीवनाच्या चढउताराचा सामना करताना ते लगेच या गुणाचे प्रदर्शन करतात.

नव्या व्यक्‍तिमत्त्वाचा भाग

७. (अ) कलस्सैकर ३:८-१३ मध्ये, दयेची सांगड नव्या व्यक्‍तिमत्त्वासोबत कशी घातली आहे? (ब) कळवळा, ख्रिश्‍चनांना काय करण्यास सोपे बनवतो?

७ आमचा पापमय स्वभाव व सैतानाच्या जगाचे वाईट प्रभाव, ही कनवाळूपणाची अडखळणे आहेत. यामुळेच बायबल आपल्याला “क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे,” यापासून दूर राहण्यास आर्जवते. त्याऐवजी, ‘नवे व्यक्‍तिमत्त्व—देवाच्या प्रतिरुपाप्रमाणे असलेले व्यक्‍तिमत्त्व धारण करण्याचा’ सल्ला आपल्याला दिला आहे. प्रथमतः आपल्याला “करुणायुक्‍त हृदय, दया, नम्रभाव, लीनता व सहनशीलता” धारण करण्याची आज्ञा दिली आहे. या गुणांना प्रदर्शित करण्यास, बायबल व्यावहारिक मार्ग दाखवते. “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; यहोवाने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.” आमच्या बांधवांच्या बाबतीत आम्ही ‘कनवाळूपणा’ विकसित केला असल्यास क्षमा करण्यास अधिक सोपे जाते.—कलस्सैकर ३:८-१३, NW.

८. क्षमा करण्याचा आत्मा असणे, महत्त्वाचे का आहे?

८ दुसऱ्‍या बाजूला पाहता, दयाळूपणाने क्षमा दाखविण्यात उणे पडल्यास, यहोवासोबत आमचा नातेसंबंध धोक्यात येतो. ही गोष्ट, “सर्व देणे फेडीपर्यंत” स्वामीने तुरुंगात टाकलेल्या निष्ठुर दासाच्या दाखल्यात येशूने जोरदारपणे दाखवली. या दासाला अशी वागणूक मिळणे योग्य होते, कारण तो दयेची भीक मागणाऱ्‍या आपल्या सह दासाला दया दाखवण्यात वाईट रीतीने उणा पडला होता. येशूने असे म्हणत या दाखल्याची सांगता केली: “म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताहि त्याप्रमाणेच तुमचे करील.”—मत्तय १८:३४, ३५.

९. कनवाळूपणाचा संबंध, नव्या व्यक्‍तिमत्त्वाच्या अधिक महत्त्वपूर्ण पैलूसोबत कसा आहे?

९ कनवाळू असणे, हा प्रीतीचा महत्त्वपूर्ण पैलू आहे, व प्रीती खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाचे ओळखचिन्ह आहे. (योहान १३:३५) याप्रकारे, नव्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल बायबलचे वर्णन असा समारोप करते: “पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.”—कलस्सैकर ३:१४.

मत्सर—दयेसाठी एक अडखळण

१०. (अ) आमच्या अंतःकरणात मत्सराला मूळ धरु देण्यास काय कारणीभूत ठरु शकते? (ब) मत्सरामुळे कोणते वाईट परिणाम घडू शकतात?

१० आपल्या पापमय स्वभावामुळे, मत्सराची भावना आपल्या अंतःकरणात सहजपणे मूळ धरु शकते. एखादा बांधव किंवा बहिणीकडे आपल्याजवळ नसलेली नैसर्गिक योग्यता किंवा भौतिक संपदा, असू शकते. किंवा कदाचित एखाद्याला खास आध्यात्मिक आशीर्वाद व विशेषाधिकार मिळालेले असतील. अशांबद्दल आम्ही मत्सर बाळगल्यास, त्यांना कनवाळूपणे वागवणे आपल्याला जमेल काय? कदाचित नाही. उलटपक्षी, टीकात्मक भाष्य किंवा निर्दयी कृत्यांमध्ये मत्सराच्या भावना प्रकट होऊ शकतात, कारण येशूने मानवांबद्दल म्हटले: “अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.” (लूक ६:४५) इतर जण अशा टीकेची बाजू घेतील. अशाप्रकारे, एखाद्या कुटुंबाची किंवा देवाच्या लोकांच्या मंडळीची शांती भंग पावू शकते.

११. योसेफाच्या दहा भावांनी त्यांच्या अंतःकरणातून कळवळ्याला कसे काढून टाकले व कोणत्या परिणामासह?

११ एका मोठ्या कुटुंबात काय घडले, त्याचा विचार करा. योसेफ आपल्या पित्याचा लाडका असल्यामुळे, याकोबाच्या दहा थोरल्या मुलांनी धाकट्या योसेफाबद्दल मत्सर वाढविला. याचा परिणाम, ते “त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले.” नंतर योसेफाला ईश्‍वरी स्वप्ने पडण्याचा आशीर्वाद प्राप्त झाल्याने यहोवाची कृपा त्याजवर असल्याचे शाबीत झाले. यामुळे त्याच्या बांधवांना ‘अधिकच द्वेष करण्यास’ कारण मिळाले. त्यांनी मत्सराला आपल्या अंतःकरणातून मुळासहित काढून न टाकल्यामुळे दयेला काही जागा राहिली नाही व गंभीर पाप करण्याप्रत त्यांना निरवले गेले.—उत्पत्ती ३७:४, ५, ११.

१२, १३. आपल्या अंतःकरणात मत्सराची भावना आल्यास, आपण काय केले पाहिजे?

१२ त्यांनी योसेफाला निर्दयीपणे दास्यत्वात विकले. आपल्या पातकाला लपविण्यासाठी, त्यांनी योसेफाला हिंस्र पशुने मारुन टाकले असा विचार करण्यास आपल्या पित्याला फसविले. काही वर्षांनंतर, दुष्काळामुळे इजिप्तला जाऊन अन्‍न खरेदी करण्यासाठी त्यांना जाणे भाग पडले तेव्हा त्यांचे पाप उघडकीस आले. योसेफ अन्‍नसामग्रीचा व्यवस्थापक असेल म्हणून त्यांनी त्याला ओळखले नाही. योसेफने त्यांच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप लावला व तुम्ही आपला धाकटा भाऊ, बन्यामिनाला येथे आणल्याशिवाय मदतीची अपेक्षा करु नये, असे त्यांना सांगितले. या वेळी बन्यामिन त्यांच्या पित्याचा आवडता झाला होता व याकोब त्याला जाऊ देणार नसल्याचे त्यांना माहीत होते.

१३ यास्तव, योसेफासमोर उभे असताना, त्यांच्या विवेकाने त्यांना असे कबूल करण्यास प्रेरित केले: “आपण आपल्या भावाविषयी [योसेफ] अपराधी आहोत, कारण आपण त्याच्या जिवाचे दुःख पाहिले तेव्हा तो दयेची याचना करीत असतानाही आपण त्याचे ऐकले नाही म्हणून हे दुःख आपणांवर आले आहे.” (उत्पत्ती ४२:२१, NW) योसेफाने आपल्या दयाळू पण खंबीर वागणुकीने भावांच्या पश्‍चात्तापाच्या खरेपणाला शाबीत करण्यासाठी त्यांना मदत केली. नंतर त्याने आपली ओळख पटविली व उदारपणे त्यांना क्षमा केली. कौटुंबिक ऐक्यता पुन्हा स्थापित झाली. (उत्पत्ती ४५:४-८) ख्रिश्‍चन या नात्याने आपण यापासून धडा शिकला पाहिजे. मत्सराचे वाईट परिणाम ओळखून, आपण मत्सरी भावनांना काढून त्या जागी ‘कनवाळूपणा’ भरण्यामध्ये मदत व्हावी म्हणून यहोवाकडे प्रार्थना केली पाहिजे.

दयाळूपणास इतर अडथळे

१४. आपण स्वतःला अनावश्‍यकपणे हिंसाचाराच्या प्रभावाखाली आणण्याचे का टाळले पाहिजे?

१४ आपण दयाळू बनण्यामध्ये आणखी एक अडथळा म्हणजे, अनावश्‍यकपणे स्वतःला हिंसाचाराच्या प्रभावाखाली आणणे हा आहे. हिंसाचार असणारे खेळ व मनोरंजन हिंसाचाराची तृष्णा वाढवतात. बायबलच्या काळात, मूर्तिपूजक लोक रोमी साम्राज्याच्या आखाड्यात मल्लभूमीवर मरुपर्यंत तरवारीने लढत देणाऱ्‍या स्पर्धा व मानवांना यातना देणारे इतर प्रकार, नियमितपणे पाहत असत. एका इतिहासकाराच्या मते अशा मनोरंजनाने, “पशूजगतापासून मनुष्य वेगळा दाखवत असलेली सहानुभूतीची भावना नष्ट केली.” आजच्या आधुनिक जगातील अधिकांश मनोरंजन अशाच प्रकारचे आहे. कनवाळूपणा राखण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनी वाचन साहित्य, सिनेमा व दूरदर्शनवरील कार्यक्रम यांची निवड करण्याबद्दल बरेच निवडक असले पाहिजे. स्तोत्र ११:५ मधील शब्दांना ते सुज्ञतापूर्वक लक्षात ठेवतात: “हिंसाचाराची आवड धरणाऱ्‍याचा यहोवा निश्‍चितच द्वेष करतो,” NW.

१५. (अ) एखादी व्यक्‍ती दयेच्या गंभीर उणीवेच्या बाबतीत विश्‍वासघात कशी करु शकते? (ब) खरे ख्रिस्ती सह विश्‍वासूंच्या व शेजाऱ्‍यांच्या गरजांना कसा प्रतिसाद देतात?

१५ आत्मकेंद्रित व्यक्‍ती देखील दया दाखवण्यात उणा पडू शकतो. प्रेषित योहान सांगतो त्यानुसार हे गंभीर आहे: “संसाराची साधने असून व आपला बंधु गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीति कशी राहणार?” (१ योहान ३:१७) अशाचप्रकारे, शेजारधर्माला जागणारा शोमरोनी, या येशूच्या दाखल्यात ढोंगी परुशी व लेव्यात दयाळूपणाची उणीव दिसली. आपल्या अर्धमेल्या यहुदी बांधवाची वाईट स्थिती पाहिल्यावर, ते रस्त्याच्या विरुद्ध बाजूने निघून गेले. (लूक १०:३१, ३२) या उलट, दयाळू ख्रिस्ती आपल्या बांधवांच्या भौतिक व आध्यात्मिक गरजांना लगेच प्रतिसाद देतात. तसेच येशूच्या दाखल्यातील शोमरोनी मनुष्याप्रमाणे, ते अनोळखी लोकांच्या गरजेविषयी देखील काळजी करतात. अशाप्रकारे, शिष्य बनविण्याच्या कार्यात वाढ करण्यासाठी ते त्यांचा वेळ, शक्‍ती, व भौतिक साधने आनंदाने देतात. या रीतीने ते लाखो लोकांच्या तारणास हातभार लावतात.—१ तीमथ्य ४:१६.

आजाऱ्‍यांसाठी कळवळा

१६. आजारपणाच्या परिस्थितीत वागताना आपल्याला कोणत्या मर्यादांचा सामना करावा लागतो?

१६ आजारपण, अपरिपूर्ण, मर्त्य मानवजातीच्या वाट्याला आले आहे. ख्रिश्‍चन याचे अपवाद नाहीत, तसेच त्यांच्यातील अनेक जण वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिकही नाहीत किंवा ते ख्रिस्त व त्याच्या प्रेषितांकडून सामर्थ्य मिळालेल्या आरंभीच्या ख्रिश्‍चनांसारखे चमत्कार देखील करु शकत नाहीत. ख्रिस्ताच्या प्रेषितांचा तसेच त्यांच्या निकटच्या सहकाऱ्‍यांच्या मृत्युनंतर असे अद्‌भुत सामर्थ्य नाहीशे झाले. या कारणामुळे, मेंदूला झालेली इजा व भ्रम याबरोबरच शारीरिक आजारपणाचा त्रास सहन करीत असलेल्यांना मदत करण्याची आपली क्षमता मर्यादित आहे.—प्रेषितांची कृत्ये ८:१३, १८; १ करिंथकर १३:८.

१७. आजार व मृत्यूमुळे हानी झालेल्या ईयोबाला ज्याप्रकारे वागणूक मिळाली त्यापासून आपण कोणता धडा शिकतो?

१७ खिन्‍नतेबरोबर अनेकदा आजारपण येते. उदाहरणार्थ, देवभिरु ईयोबावर सैतानाने आणलेले गंभीर आजारपण व विपत्ती यामुळे ईयोब अतिशय खिन्‍न झाला होता. (ईयोब १:१८, १९; २:७; ३:३, ११-१३) त्याला कनवाळूपणे वागविणाऱ्‍या व ‘धीर देण्याऱ्‍या’ मित्रांची गरज होती. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) उलटपक्षी, तिघे भिकार सांत्वनदाते त्याला भेटावयास आले व ते उतावीळपणे चुकीच्या निर्णयाला पोहंचले. त्यांनी ईयोबावर आलेली विपत्ती त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे आल्याचे सुचविण्याद्वारे ईयोबाची खिन्‍न स्थिती विकोपास नेली. सह विश्‍वासू आजारी किंवा खिन्‍न असतात, तेव्हा ख्रिस्ती लोक कनवाळू असण्याद्वारे त्याप्रकारच्या जाळ्यात पडण्याचे टाळतील. मुख्य गोष्ट म्हणजे, कधीकधी अशा लोकांना सहानुभूतीने ऐकणाऱ्‍या, समज दाखविणाऱ्‍या, व प्रेमळ शास्त्रवचनीय सल्ला देणाऱ्‍या वडील किंवा इतर प्रौढ ख्रिश्‍चनांच्या काही दयावंत भेटींची गरज असते.—रोमकर १२:१५; याकोब १:१९.

अशक्‍तांसाठी कळवळा

१८, १९. (अ) वडिलांनी अशक्‍त किंवा चुका केलेल्यांसोबत कसे वागले पाहिजे? (ब) न्यायदानाची समिती बसविण्याची आवश्‍यकता भासली, तरी पातक केलेल्यास कनवाळूपणे वागवणे महत्त्वाचे का आहे?

१८ विशेषपणे, वडिलांनी कनवाळू असले पाहिजे. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३५) बायबल आज्ञा देते की, “आपण जे सशक्‍त आहो त्या आपण . . . अशक्‍तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.” (रोमकर १५:१) अपरिपूर्ण असल्यामुळे आपण सर्व जण चुका करतो. (याकोब ३:२) म्हणून कोणी एक “एखाद्या दोषात सापडला असला तरी” अशासोबत वागताना सौम्य वृत्तीची गरज असते. (गलतीकर ६:१) वडिलांनी देवाच्या नियमाच्या अवलंबनात अवाजवी असणाऱ्‍या ढोंगी परुश्‍यांप्रमाणे असण्याची इच्छा कधीही धरु नये.

१९ उलट, वडिलांनी यहोवा देव व येशू ख्रिस्ताच्या कनवाळूपणाच्या उदाहरणांचे अनुसरण करण्यास हवे. त्यांचे प्रमुख कार्य, देवाच्या मेंढरांचे पालनपोषण करणे, उत्तेजन देणे व त्यांना तजेला देणे हे आहे. (यशया ३२:१, २) अगणित नियम बनवून गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, ते देवाच्या वचनातील उत्तम तत्त्वांद्वारे अपील करतात. याप्रकारे, वडिलांचे कार्य उभारणी करणे, आपल्या बांधवांच्या अंतःकरणात यहोवाच्या चांगुलपणाबद्दल हर्ष व कृतज्ञता आणणे हे आहे. एखाद्या सह विश्‍वासूने काही क्षुल्लक चूक केल्यास, एखादा वडील सामान्यपणे इतर जण ऐकतील अशा ठिकाणी त्याला सुधारण्याचे टाळील. वडिलास त्याविषयी बोलायचेच असल्यास, त्याला बाजूला घेऊन इतरांना ऐकू जाणार नाही अशा रितीने समस्याची चर्चा करण्यासाठी दयाळूपणाची भावना त्यांना प्रवृत्त करील. (पडताळा मत्तय १८:१५.) एखाद्या बरोबर जमवून घेण्यास कितीही कठीण वाटत असले, तरी वडिलाने सहनशील व साहाय्यकारी असले पाहिजे. त्यांनी अशा लोकांना मंडळीतून बाहेर काढण्यासाठी काहीतरी सबब शोधण्याचा कधीही प्रयत्न करु नये. न्यायदानाची समिती बसविण्याची गरज असली, तरी देखील गंभीर पातक केलेल्या व्यक्‍तीसोबत वागताना वडिलांनी कनवाळूपणा दाखवला पाहिजे. त्यांची सौम्य वृत्ती त्या व्यक्‍तीला पश्‍चात्ताप करण्यास मदत करु शकते.—२ तीमथ्य २:२४-२६.

२०. दयेची भावनात्मक वक्‍तव्ये कधी अनुचित असतात व का?

२० तथापि असेही काही प्रसंग असतात, जेव्हा यहोवाचा सेवक दयाळूपणा दाखवू शकत नाही. (पडताळा अनुवाद १३:६-९.) एखाद्या ख्रिश्‍चनाने बहिष्कृत केलेल्या आपल्या निकटच्या मित्रासोबत किंवा नातेवाईकासोबत “संगत धरु नये” ही गोष्ट त्याच्यासमोर खरी परीक्षा उभी करु शकते. अशा परिस्थितीत एखाद्याने कीव वाटण्याच्या आहारी जाऊ नये हे महत्त्वाचे आहे. (१ करिंथकर ५:११-१३) अशी दृढ भूमिका पाप करणाऱ्‍याला पश्‍चात्ताप करण्याचे प्रोत्साहन देखील देऊ शकते. शिवाय, विरुद्ध लिंगी व्यक्‍तीसोबत वागताना, ख्रिश्‍चनांनी लैंगिक अनैतिक कृत्य करण्याप्रत निरवले जाणारे दयाळूपणाचे अयोग्य स्वरुपाचे आविर्भाव दाखविण्याचे टाळले पाहिजे.

२१. आपण आणखी कोणत्या क्षेत्रात कनवाळूपणा दाखवला पाहिजे व त्याचे कोणते फायदे आहेत?

२१ कनवाळूपणा दाखविण्याची आवश्‍यकता असणाऱ्‍या जसे की, वयस्करांसोबत, ज्यांनी मृत्यूत आपल्या सदस्यांना गमावले अशांसोबत तसेच ख्रिस्ती विश्‍वासात नसणाऱ्‍या सोबत्यांकडील छळाचा सामना करत असलेल्यांसोबत वागण्याविषयीच्या अशा सर्वच क्षेत्रांची चर्चा करण्यास येथे जागा पुरणार नाही. परिश्रमाने कार्य करणाऱ्‍या वडिलांना देखील मायेने वागविले पाहिजे. (१ तीमथ्य ५:१७) त्यांचा आदर करा व त्यांना पाठिंबा द्या. (इब्रीयांस १३:७, १७) प्रेषित पेत्राने लिहिले की, “तुम्ही सर्व . . . कनवाळू व्हा.” (१ पेत्र ३:८,) अपेक्षा करणाऱ्‍या सर्व परिस्थितीत अशा रीतीने कार्य केल्यामुळे, आपण मंडळीत एकता व आनंदाला तसेच बाहेरच्या लोकांना सत्यात आणण्यासाठी चालना देत असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे आपण आपला कनवाळू पिता, यहोवा याचा सन्मान करत असतो.

उजळणीतील प्रश्‍न

▫ यहोवा पापी मानवजातीसाठी दया कशी दाखवतो?

▫ कनवाळू असणे महत्त्वाचे का आहे?

▫ आपण कनवाळू असण्यामध्ये काही अडथळे कोणते आहेत?

▫ आपण आजारी व खिन्‍न असलेल्यांना कशी वागणूक दिली पाहिजे?

▫ कनवाळू असण्याची विशेषपणे कोणाला गरज आहे, व का?

[१९ पानांवरील चौकट]

निर्दयी परुशी

देवाच्या लोकांसाठी विश्रामाचा दिवस, शब्बाथ याचा अर्थ आध्यात्मिक व शारीरिक आशीर्वादाचा होता. तथापि, यहुदी धार्मिक नेत्यांनी पुष्कळ नियम बनवून देवाच्या शब्बाथ नियमाला अनादर दाखवला व लोकांसाठी ते कठीण बनविले. उदाहरणार्थ, एखाद्याचा अपघात झाल्यास किंवा तो आजारी असल्यास, त्याचे जीवन धोक्यात असल्याशिवाय त्याला शब्बाथाच्या दिवशी कोणतीही मदत मिळत नव्हती.

परुश्‍यांच्या संप्रदायात शब्बाथाच्या नियमाचा लावलेला अर्थ फारच कडक होता, त्यात म्हटले आहे: “शब्बाथाच्या दिवशी एखाद्याने शोक करणाऱ्‍यांचे सांत्वन करु नये, तसेच आजाऱ्‍यांनाही भेटू नये.” इतर धार्मिक नेत्यांनी शब्बाथाच्या दिवशी अशा भेटींना अनुमती दिली पण, “रडण्यास मनाई आहे,” अशी अट त्यांनी घातली.

अशाप्रकारे, येशूने नियमशास्त्राची अधिक महत्त्वपूर्ण आवश्‍यकता जसे की न्याय, प्रीती व दया याकडे दुर्लक्ष करणाऱ्‍या यहुदी धार्मिक नेत्यांना उचितपणे दोषी ठरवले. यास्तव त्याने परुश्‍यांना जे म्हटले: “तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडता,” ते आश्‍चर्याचे नव्हे!—मार्क ७:८, १३; मत्तय २३:२३; लूक ११:४२.

[१७ पानांवरील चित्रं]

यहोवाचे साक्षीदार २३१ देशांमध्ये लोकांच्या घरी, रस्त्यावर, तुरुंगात देखील दयेचे अभुतपूर्व कार्य करीत आहेत

[१८ पानांवरील चित्रं]

उदाहरणार्थ, दूरदर्शनवरील हिंसाचाराच्या प्रभावामुळे कनवाळूपणा नाहीसा होतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा