वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ७/१५ पृ. २८-३०
  • यहुदी दिनदर्शिका केवढी अचूक आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहुदी दिनदर्शिका केवढी अचूक आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सुरवात करावयाचा बिंदू ठरविणे
  • “सृष्टीचे युग”
  • कालगणनेसाठी आधार
  • परंपरा आणि प्रतिपादन
  • धार्मिक अवशेष
  • दानीएलाची भविष्यवाणी मशीहाच्या आगमनाविषयी भाकीत करते
    बायबल नेमके काय शिकवते?
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ७/१५ पृ. २८-३०

यहुदी दिनदर्शिका केवढी अचूक आहे?

यहुदी दिनदर्शिकेनुसार गुरुवारी, सप्टेंबर १६, १९९३ रोजी, रोश हशोना नावाचा सण होता. परंपरेनुसार, नवे वर्ष येत आहे याची घोषणा करण्यासाठी, शोफर किंवा एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवला गेला. ते वर्ष ५७५४ हे आहे (यहुदी दिनदर्शिका), आणि ते सप्टेंबर १६, १९९३ पासून सप्टेंबर ५, १९९४ पर्यंतच्या काळास पूर्ण करते.

आम्हाला लगेचच दिसून येते की, वेळ मोजण्याच्या यहुदी पद्धतीत आणि पाश्‍चात्य, किंवा आता जी सर्वसामान्यपणे वापरण्यात येते त्या ग्रेगरीयन दिनदर्शिकेत ३,७६० वर्षांचा फरक आहे. हा इतका मोठा फरक का आहे? यहुदी दिनदर्शिका केवढी अचूक आहे?

सुरवात करावयाचा बिंदू ठरविणे

वेळ मोजण्याच्या कोणत्याही व्यवस्थेला एक विशिष्ट सुरवातीचा किंवा संदर्भ बिंदू असला पाहिजे. उदाहरणार्थ, ख्रिस्ती धर्मजगतातील लोक, येशू ख्रिस्ताचा जन्म जेव्हा झाला असे समजतात त्या वर्षापासून वेळेची मोजणी करतात. यास्तव, तेव्हापासूनच्या तारखांना ख्रिस्ती युग असे म्हणण्यात येते. त्यांना बहुतेकवेळा इ. स. असे लिहून स्पष्टपणे दर्शविले जाते. त्याला लॅटिन भाषेत, ॲनो डॉमिनी असे म्हटले जाते ज्याचा अर्थ, “प्रभूच्या वर्षात” असा होतो. त्या काळाआधीच्या तारखांना इ. स., “ख्रिस्तपूर्व” असे चिन्हांकित केले जाते.a पारंपारिक चिनी लोक याचप्रकारे, सा. यु. पूर्व, २६९८, दंतकथेतील येल्लो सम्राट ह्वाँग डी, याच्या कारकीर्दीच्या सुरवातीपासून वेळेची मोजणी करतात. अशाप्रकारे, फेब्रुवारी १०, १९९४ हा दिवस, चिनी लोकांच्या ४६९२ या चांद्रमास वर्षाच्या सुरवातीला चिन्हित करतो. परंतु, यहुदी दिनदर्शिकेबद्दल काय?

द ज्युईश एन्सायक्लोपिडीया म्हणतो: “यहुदी लोकांत, एखाद्या घटनेच्या तारखेची नोंद करण्याची सध्याची सामान्य पद्धत अशी आहे की, ते जगाची सृष्टी झाल्यापासून जितकी वर्ष निघून गेली त्यांची संख्या स्पष्टपणे सांगतात.” ही व्यवस्था, जिला यहुदी लोक सृष्टीचे युग असे म्हणतात ती, सा. युगाच्या नवव्या शतकापासून साधारणपणे वापरण्यात येऊ लागली. यास्तव, यहुदी दिनदर्शिकेच्या तारखा बहुधा ए. एम. या अक्षरांनी चालू होतात. ते ॲनो मुंडी याचे प्रतिनिधित्व करते जे, अब क्रियॉशोने मुंडी याचे संक्षिप्त रूप आहे. याचा अर्थ, “जगाच्या सृष्टीपासून” असा होतो. चालू वर्ष ए. एम. ५७५४ हे असल्यामुळे, वेळ मोजण्याच्या या व्यवस्थेनुसार, “जगाची सृष्टी” ५,७५३ वर्षांआधी घडली असे समजले जाते. ती वेळ कशी ठरवली जाते ते आपण पाहू या.

“सृष्टीचे युग”

एन्सायक्लोपिडीया ज्युडायका (१९७१) असे विवरण पुरवतो: “विविध रब्बींच्या मोजणीमध्ये ‘सृष्टीचे युग’ सा. यु. पूर्व ३७६२ व ३७५८ या वर्षांतील कोणत्या तरी एका वर्षाच्या शरद ऋतुत सुरु झाले. परंतु, सा. युगाच्या १२ व्या शतकापासून असे स्वीकारण्यात येऊ लागले की ‘सृष्टीचे युग’ सा. यु. पूर्व ३७६१ मध्ये (त्या वर्षाच्या ठीक ऑक्टो. ७ रोजी) सुरू झाले. ही मोजणी, पवित्र शास्त्रात व्यक्‍त केलेल्या कालगणनेच्या आणि सुरवातीच्या पवित्र शास्त्रोत्तर यहुदी प्रकाशनांमध्ये सापडणाऱ्‍या गणनेच्या समकालिकतेवर आधारित आहे.”

“जगाच्या सृष्टीपासून” तारीख देण्याची पद्धत विशेषकरून, पवित्र शास्त्र अहवालांच्या रब्बींच्या प्रतिपादनावर आधारित आहे. रब्बी, तसेच ख्रिस्ती धर्मजगताचे विद्वान असे अनुमान काढतात की, पहिला मनुष्य, आदाम याची निर्मिती, जगाची सृष्टी करण्यात आली तेव्हाच झाली असावी. जग आणि त्यातील सर्व गोष्टींची निर्मिती २४ तासांच्या सहा अक्षरार्थ दिवसांमध्ये केली होती, असा त्यांचा विश्‍वास असल्यामुळे ते असे अनुमान काढतात. परंतु, ही गोष्ट मुळीच बरोबर नाही.

उत्पत्तीचा पहिला अध्याय अशी सुरवात करतो: “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली.” मग ते, देवाने “आकारविरहित व शून्य” स्थितीत असलेल्या पृथ्वीचे रूपांतर, मानवांसाठी अनुरूप अशा मूलस्थानात करण्यासाठी, सहा लागोपाठ ‘दिवशी’ काय केले त्याचे वर्णन देते. (उत्पत्ती १:१, २) या दोन टप्प्यांदरम्यान लक्षावधी वर्षे निघून गेली असतील. शिवाय, निर्मितीचे दिवस २४ तासांच्या कालावधीचे, जणू काही निर्माणकर्त्याचे कार्य त्या कालमर्यादेतच सीमित झाले असते. या संदर्भातला एक “दिवस” २४ तासांपेक्षा अधिक कालावधीचा असू शकतो हे, उत्पत्ती २:४ मध्ये दर्शविले आहे. त्यामध्ये निर्मितीच्या सर्व कालावधीला एक “दिवस” असे म्हटले आहे. निर्मितीच्या पहिल्या आणि आदामाला निर्माण केले त्या सहाव्या दिवसामध्ये अनेक हजारो वर्षे निघून गेली. आदामाची सृष्टी, वास्तविक आकाश आणि पृथ्वी यासोबतच झाली असे म्हणणे शास्त्रवचनीय शिवाय वैज्ञानिक देखील नाही. तरीही, “सृष्टीचे युग” सा. यु. पूर्व ३७६१ मध्ये सुरू झाले हे कसे निश्‍चित करण्यात आले?

कालगणनेसाठी आधार

दुःखाची गोष्ट अशी की, ज्या यहुदी प्रकाशनांमध्ये मोजणीवर विचार चालू होते ती प्रकाशने आता सध्या अस्तित्वात नाहीत. फक्‍त पूर्वी सेडर ओलॉम (जगाची व्यवस्था) म्हटलेले कालगणनेचे कार्य मागे पडले. त्याचा संबंध, सा. युगाच्या दुसऱ्‍या शतकाचे तालमूदचे विद्वान योसे बेन हॉलॉफतॉ यांच्याशी लावला जातो. हे कार्य, (याला नंतर, सेडर ‘ओलॉम झुटा नावाच्या मध्ययुगीन इतिहासापासून भिन्‍न असल्याचे दर्शविण्यासाठी सेडर ‘ओलॉम रॉबॉ असे म्हटले जाऊ लागले) आदामापासून, बॉर खोकबॉ या खोट्या मशीहाच्या नेतृत्वाखाली सा. युगाच्या दुसऱ्‍या शतकापर्यंतच्या यहुद्यांनी रोमविरूद्ध केलेल्या क्रांतीपर्यंतच्या कालगणनेचा इतिहास पुरवते. पण, लेखकाला अशा प्रकारची माहिती कोठून प्राप्त झाली?

योसे बेन हॉलॉफतॉ पवित्र शास्त्र अहवालांना अनुसरण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी, ज्या प्रबंधरचनेत तारखांविषयीची स्पष्ट माहिती नव्हती त्यात स्वतःचे मतप्रतिपादन मिळवले. द ज्युईश एन्सायक्लोपिडीया म्हणतो: “अनेक बाबतीत, . . . त्यांनी परंपरेनुसार तारखा दिल्या, आणि अगोदरच्या रब्बींच्या आणि त्यांच्या समवयस्कांचे बोलणे व हॉलॉकोत [परंपरा] याच्या ऐवजी त्यांना त्यात घातल्या.” इतर जण त्यांच्या अंदाजाबद्दल इतके काही खास विचारी नाहीत. यहुदी ज्ञानाचे पुस्तक (इंग्रजी) असे समर्थन करते की: “त्याने, सृष्टीच्या युगापासून मोजणी केली आणि त्याप्रमाणे विविध यहुदी घटना, पहिला पुरूष आदाम याच्यापासून थोर सिकन्दरपर्यंत घडल्या असतील असे गृहीत धरून मनाला येतील तशा तारखा ठरवल्या.” परंतु अशा प्रकारच्या प्रतिपादनांचा आणि भर घातलेल्या मजकूरांचा परिणाम, यहुदी कालगणनेच्या अचूकतेवर व खरेपणावर कसा झाला? आपण पाहू या.

परंपरा आणि प्रतिपादन

रब्बींच्या परंपरेच्या सुसंगतीत, योसे बेन हॉलॉफतॉ यांनी अशी मोजणी केली की, यरुशलेमेतील दुसरे मंदिर फक्‍त ४२० वर्षांसाठी टिकून राहिले. ही गोष्ट, दानीएलाच्या ‘सत्तर सप्तकांच्या,’ किंवा ४९० वर्षांच्या भविष्यवाणीच्या रब्बींची समज यावर आधारित होती. (दानीएल ९:२४) हा कालावधी, पहिल्या मंदिराचा नाश आणि दुसऱ्‍या मंदिराचा विध्वंस याच्या अंतरामधील काळाला लागू केला जात होता. बाबेलोनी हद्दपारीची ७० वर्षे जमेस न धरता, योसे बेन हॉलॉफतॉ या निष्कर्षास पोंहचले की, दुसरे मंदिर ४२० वर्षांपर्यंत टिकून राहिले.

परंतु, हे प्रतिपादन एक गंभीर समस्या समोर उभी करते. बाबेलच्या उच्चाटनाचे (सा. यु. पूर्व ५३९) आणि, दुसऱ्‍या मंदिराचा नाश (सा. यु. ७०) ही दोन्ही वर्षे सुपरिचित ऐतिहासिक तारखा आहेत. यास्तव, दुसऱ्‍या मंदिराचा काळ ४२० वर्षांऐवजी, ६०६ वर्ष इतका हवा होता. या काळाचा अवधी केवळ ४२० वर्षे असे म्हटल्याने, यहुदी कालगणना १८६ वर्षांचा कालावधी जमेस धरण्यामध्ये मागे पडते.

दानीएलाची भविष्यवाणी, यरुशलेमेतील मंदिर किती काळ टिकून राहील याविषयी नाही. उलटपक्षी, मशीहाचे आगमन कधी होईल त्या काळाविषयी या भविष्यवाणीने भाकीत केले. ती भविष्यवाणी स्पष्टपणे दर्शविते की, “यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून मशीहा, अधिपती, असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके [असतील].” (दानीएल ९:२५, २६) यहुदी लोक बंदिवासातून [सा. यु. पूर्व ५३६] आल्यानंतरच्या दुसऱ्‍या वर्षात मंदिराचा पाया घातला असला तरी, ‘अर्तहशश्‍त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षांपर्यंत,’ यरुशलेम शहराच्या पुनर्बांधणीची “आज्ञा” मिळाली नव्हती. (नहेम्या २:१-८) अचूक ऐहिक इतिहास ते वर्ष सा. यु. पूर्व ४५५ असल्याचे शाबीत करते. तशीच ६९ ‘सप्तकांसाठी’ किंवा ४८३ वर्षांसाठी आणखी पुढे मोजणी करत गेल्यावर आम्ही सा. युग २९ मध्ये येऊन पोंहचतो. तो काळ मशीहाच्या प्रकट होण्याचा, येशूच्या बाप्तिस्म्याच्या समयाचा होता.b

रब्बींच्या मतप्रतिपादनामुळे यहुदी कालगणनेत झालेल्या मोठ्या तफावतीच्या दुसऱ्‍या मुद्याचा, अब्राहामाच्या जन्माच्या काळासोबत संबंध आहे. रब्बींनी उत्पत्ती ११:१०-२६ मध्ये नमूद केलेल्या अनुक्रमाने येणाऱ्‍या पिढीत जास्त वर्षे वाढवली व जलप्रलयाच्या काळापासून अब्राहामाच्या (अब्राम) जन्मापर्यंतच्या काळाला २९२ वर्षे नेमून दिली. परंतु, २६ व्या वचनाच्या रब्बींनी केलेल्या प्रतिपादनातच एक समस्या आहे, जे म्हणते की: “तेरह सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला अब्राम, नाहोर, व हारान हे झाले.” यावरून, यहुदी परंपरा असा दावा करते की, अब्राम जन्मला तेव्हा तेरह ७० वर्षांचा होता. परंतु, तेरहला वयाच्या ७० व्या वर्षी अब्राहाम झाला असे ते वचन स्पष्टपणे म्हणत नाही. उलट, ते फक्‍त असे सरळपणे म्हणते की, तो ७० वर्षांचा झाल्यावर त्याला तीन मुलगे झाले.

अब्राहामाच्या जन्माच्या वेळचे तेरहचे खरे वय शोधण्यासाठी आम्हाला पवित्र शास्त्र वृत्तांतच केवळ वाचावा लागेल. उत्पत्ती ११:३२–१२:४ मध्ये आम्हाला कळते की, वयाच्या २०५ या वर्षी तेरहाच्या मृत्युनंतर अब्राहाम आणि त्याच्या कुटुंबाने, यहोवाने आज्ञा केल्यावर हारान सोडले. तेव्हा अब्राहाम ७५ वर्षांचा होता. यास्तव, तेरह ७० वर्षांचा नव्हे तर, १३० वर्षांचा असताना अब्राहामाचा जन्म झाला असावा. अशाप्रकारे, जलप्रलयापासून अब्राहामाच्या जन्मापर्यंतचा काळ, २९२ वर्ष नव्हे तर ३५२ वर्षांचा होता. येथे यहुदी कालगणना ६० वर्षांचा घोळ करते.

धार्मिक अवशेष

सेडर ‘ओलॉम रॉबॉ व इतर तालमूदच्या कालगणनेच्या कार्यांतील अशा प्रकारच्या चुका आणि तफावतींनी, यहुदी विद्वानांमध्ये होणाऱ्‍या चर्चेत खूप गोंधळ आणि बराच वाद निर्माण केला आहे. या कालगणनेचे, परिचित ऐतिहासिक वास्तविकतांसोबत समेट करण्याचे अनेक प्रयत्न केले असले तरी ते पूर्णपणे यशस्वी ठरले नाहीत. का नाही बरे? एन्सायक्लोपिडीया ज्युडायका असे निरीक्षण करतो, “त्यांची आवड धार्मिकतेसारखी पाण्डित्यदर्शक नव्हती. कोणत्याही किंमतीवर परंपरेला उंचावून धरणे आवश्‍यक होते, विशेषकरून भिन्‍न मताच्या पंथाच्या समोर असताना.” त्यांच्या परंपरेमुळे झालेल्या गोंधळाला काढून टाकण्याऐवजी, काही यहुदी विद्वानांनी पवित्र शास्त्र अहवालांची अपकीर्ति करण्याचा प्रयत्न केला. इतरांनी, बाबेल, इजिप्त व हिंदू दंतकथा तसेच परंपरांचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न केला.

परिणामस्वरूप, इतिहासकार “सृष्टीचे युग” याकडे कालगणनेचे विश्‍वसनीय कार्य या दृष्टीने पाहत नाहीत. थोडकेच यहुदी विद्वान त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतात, आणि द ज्युईश एन्सायक्लोपिडीया व एन्सायक्लोपिडीया ज्युडायका यासारखे अधिकारयुक्‍त संदर्भ देखील त्याकडे सर्वसामान्यपणे नकारात्मक दृष्टीने पाहतात. यास्तव, जगाच्या सृष्टीपासून वेळ मोजण्याच्या यहुदी पारंपारिक पद्धतीकडे ते अचूक आहे असे, पवित्र शास्त्र कालगणनेच्या, म्हणजेच यहोवा देवाचे उलगडणारे भविष्यसूचक वेळापत्रकाच्या दृष्टिकोनातून, पाहता येणार नाही.

[तळटीपा]

a पवित्र शास्त्रीय आणि ऐतिहासिक पुरावे दोन्ही, येशू ख्रिस्ताचा जन्म सा. यु. पूर्व २ या वर्षात झाल्याचे दर्शवितात. यास्तव, अचूकतेकरिता, अनेक जण सा. यु. (सामान्य युग) आणि सा. यु. पू. (सामान्य युग पूर्व) ही नावे वापरण्यास पसंत करतात. वॉचटावर संस्थेच्या प्रकाशनांमध्ये याचप्रकारे तारखांना सूचित केले जाते.

b सविस्तर माहितीकरीता, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने छापलेले शास्त्रवचनांवर सूक्ष्मज्ञान, (इंग्रजी) खंड २, पृष्ठ ६१४-१६, ९००-९०२ हे पुस्तक पाहा. तसेच प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख लाभदायक आहे, (इंग्रजी) या पुस्तकातील अध्याय ३, परिच्छेद १८ हे पाहा; तसेच ऑक्टोबर १, ९२ च्या वॉचटावर मधील पृष्ठ ११, परि. ८-११ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा