“येशू ख्रिस्त प्रभू आहे” कसा व केव्हा?
“प्रभूने माझ्या प्रभूला म्हटले, मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.” किंग जेम्स व्हर्शन नुसार हे स्तोत्रसंहिता ११०:१ चे भाषांतर आहे. येथे सांगितलेला हा “प्रभू” कोण आहे, व तो कोणाशी बोलत आहे?
इब्री शास्त्रवचनाचे अचूक भाषांतर लगेच पहिल्या प्रश्नाचे उत्तर देते. “यहोवाने माझ्या प्रभूला म्हटले: . . . ” यास्तव, इंग्रजीतील मोठ्या अक्षरातील हे नाव “प्रभू” (LORD) सर्वशक्तीमान देव, स्वतः यहोवाला लागू होते. किंग जेम्स व्हर्शनने ईश्वरी नावासाठी “Lord” ऐवजी “LORD” वापरून त्याला मान्यता दाखवली असले तरी, या दोन्ही पदव्यात घोटाळा निर्माण करणारे ते पहिले नव्हते. कारण इब्रीमधून भाषांतर केलेल्या प्राचीन ग्रीक सेप्ट्युजंटने त्याच्या नंतरच्या प्रतीत “प्रभू” (Lord) अशा लहान अक्षराचा उपयोग केला. का बरे? कारण “Lord” ही पदवी ईश्वरी नावाच्या चार (יהוה) वर्णांऐवजी घालण्यात आली. एक विद्वान ए. ई. गारवी म्हणतात: “यहुदी सभास्थानात शास्त्रवचने वाचली जात असताना, याव्हे [यहोवा] या करारबद्ध नावाच्या ऐवजी, प्रभू [केʹरी·ऑस] या नावाचा वापर अधिक सोपा आणि स्पष्ट केला जात होता.”
पवित्र शास्त्र यहोवाची ओळख “सार्वभौम प्रभू” अशी देते. (उत्पत्ती १५:२, ८; प्रे. कृत्ये ४:२४; प्रकटीकरण ६:१०) त्याला “खरा प्रभू” “अखिल पृथ्वीचा प्रभू” देखील म्हटले आहे. (निर्गम २३:१७, NW; यहोशवा ३:१३; प्रकटीकरण ११:४) तर मग, स्तोत्र ११०:१ मधील दुसरा प्रभू कोण आहे, आणि यहोवाने “प्रभू” म्हणून त्याची ओळख कशी दिली?
येशू ख्रिस्त “प्रभू” आहे
चार शुभवर्तमानात, व खासपणे लूक आणि योहानात येशूला “प्रभू” म्हणून अनेकदा संबोधले आहे. सामान्य युगाच्या पहिल्या शतकात, ही पदवी, “महाशय” याप्रमाणेच आदर व शिष्टाचाराची होती. (योहान १२:२१; २०:१५, किंगडम इंटरलिनियर) मार्कच्या शुभवर्तमानात येशूला संबोधताना अनेकदा “गुरूजी,” किंवा रब्बोʹनी वापरले गेले. (मार्क १०:५१ हे लूक १८:४१, NW सोबत पडताळा.) शौलाने, दिमिष्काच्या रस्त्यावर असताना, “प्रभो तू कोण आहेस?” असा प्रश्न विचारला तेव्हा, त्यामध्ये तीच चौकशीची सर्वसाधारण पद्धत होती. (प्रे. कृत्ये ९:५) परंतु, येशूच्या अनुयायांना त्यांच्या स्वामीची ओळख झाल्यावर, त्यांच्या “प्रभू” म्हणण्याने केवळ आदर देण्यापेक्षाही अधिक काही व्यक्त केले.
येशू स्वर्गात जाण्यापूर्वी त्याच्या मृत्यू व पुनरूत्थानानंतर, त्याच्या शिष्यांना प्रकट झाला, आणि आश्चर्यकारकपणे त्याने म्हटले: “स्वर्गात आणि पृथ्वीवरील सर्व अधिकार मला दिलेला आहे.” (मत्तय २८:१८) नंतर, पेन्टेकॉस्टच्या दिवशी, ओतलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रभावामुळे पेत्राने स्तोत्र ११०:१ चा संदर्भ घेऊन म्हटले: “म्हणून इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करुन ठेवले आहे.” (प्रे. कृत्ये २:३४-३६) येशूला वधस्तंभावरील त्याच्या लज्जास्पद मृत्युपर्यंतच्या विश्वासूपणामुळे, त्याला पुनरूत्थित केले व उच्च बक्षीस दिले. त्यानंतर स्वर्गात त्याला प्रभुत्त्व दिले.
प्रेषित पौलाने पेत्राच्या शब्दांची खात्री पटवली, त्याने लिहिले की देवाने “सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेहि नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला [ख्रिस्ताला] उंच करुन स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले.” (इफिसकर १:२०, २१) येशू ख्रिस्ताचे प्रभुत्त्व इतर सर्व प्रभुत्त्वापेक्षा वरचढ आहे, आणि ते नवीन जगामध्येही असेल. (१ तीमथ्य ६:१५) त्याला “अत्युच्च” केले आणि “सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते” त्याला दिले, जेणेकडून “देवपित्याच्या गौरवासाठी . . . येशू ख्रिस्त हा प्रभू आहे” असे प्रत्येकाने कबूल करावे. (फिलिप्पैकर २:९-११) अशाप्रकारे स्तोत्र ११०:१ च्या पहिल्या भागाची पूर्णता झाली, आणि “देवदूत आणि अधिकारी व सत्ताधीश” येशूच्या प्रभुत्त्वाच्या अधीन झाले.—१ पेत्र ३:२२; इब्रीयांस ८:१.
इब्री शास्त्रवचनात, “प्रभूंचा प्रभू” हे पारिभाषिक नाव केवळ यहोवालाच लागू होते. (अनुवाद १०:१७; स्तोत्रसंहिता १३६:२, ३) परंतु, प्रेरित होऊन पेत्राने ख्रिस्त येशूविषयी असे म्हटले: “तोच सर्वांचा [किंवा, “आमच्या सर्वांचा,” गुडस्पीड] प्रभू आहे.” (प्रे. कृत्ये १०:३६) खरोखर तो “मेलेल्यांचा व जिवंताचाही प्रभू” आहे. (रोमकर १४:८, ९) ख्रिस्ती लोक, येशू ख्रिस्ताचा त्यांचा प्रभू आणि स्वामी म्हणून त्वरित स्वीकार करतात आणि त्याच्या मौल्यवान रक्ताने विकत घेतलेली त्याची प्रजा या नात्याने ते स्वेच्छेने त्याला आज्ञाधारकता दाखवितात. तसेच येशू ख्रिस्त पेन्टेकॉस्ट ३३ च्या सा. यु. पासून त्याच्या मंडळ्यांवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू या नात्याने राज्य करीत आला आहे. परंतु आता, १९१४ पासून त्याला, स्तोत्र ११०:१, २ च्या पूर्णतेत त्याच्या वैऱ्यांना ‘त्याचे पदासन’ करण्याच्या क्षमतेसह राजकीय अधिकार देण्यात आला आहे. त्यांच्यावर ‘प्रभुत्व’ गाजविण्याची त्याची वेळ झाली होती.—इब्रीयांस २:५-८; प्रकटीकरण १७:१४; १९:१६.
तर मग, येशूने त्याचे मरण आणि पुनरूत्थानाच्या आधी जे म्हटले की, “माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे,” हे कसे समजले पाहिजे? (मत्तय ११:२५-२७; लूक १०:२१, २२) आधी चर्चा केल्याप्रमाणे हे काही पूर्ण विधान नाही. मत्तय आणि लूक हे दोन्ही संदर्भ, जगातील बुद्धी असलेल्यांकडून ज्ञान कसे लपले परंतु, तो त्याच्या पित्याला “पूर्णपणे ओळखत” असल्यामुळे त्याने त्याच्याद्वारे त्याला प्रकट केले, याविषयी येशू बोलत होता. त्याचा पाण्याने बाप्तिस्मा झाल्यावर व देवाचा तो आत्मिक पुत्र बनल्यावर, येशू स्वर्गात असलेले त्याचे आधीचे जीवन आठवू शकत होता, परंतु नंतरच्या प्रभुत्वापासून हे, काही अंशी वेगळे होते.—योहान ३:३४, ३५.
येशूला प्रभू म्हणून वेगळ्याप्रकारे ओळखणे
ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे काही अनुवाद, इब्री शास्त्रवचनांतील उताऱ्यात यहोवा देवाचा, “प्रभू” असा स्पष्ट उल्लेख केला असताना, त्याचा अनुवाद करताना समस्या उभी राहते. उदाहरणार्थ, लूक ४:१९ ची यशया ६१:२ सोबतची तुलना, किंग जेम्स व्हर्शन किंवा न्यू जरुसलेम बायबलमधून करा. काही लोक, येशूने “प्रभू” ही पदवी यहोवाकडून घेतली व तो देहधारी असताना खरोखर यहोवाच होता, असे समजतात, परंतु कोणताही शास्त्रीय आधार नसलेला हा वादाचा मुद्दा आहे. शास्त्रवचनात यहोवा देव आणि त्याचा पुत्र, येशूला एकमेकांपासून सूक्ष्मपणे वेगळे दाखवले आहे. येशूने त्याच्या पित्याचे नाव कळवले आणि त्याचे प्रतिनिधित्व केले.—योहान ५:३६, ३७.
इब्री शास्त्रवचनातून ग्रीक शास्त्रवचनात घेतलेल्या संदर्भातील खालील उदाहरणे लक्षात घ्या. प्रे. कृत्ये ४:२४-२७ मध्ये यहोवा देव आणि त्याचा अभिषिक्त जण, किंवा मशीहा, या दोघांविषयी सांगितले आहे. ज्याचे अवतरण स्तोत्र २:१, २ मधून घेतले आहे. यशया ४०:१३, १४ चा संदर्भ घेऊन रोमकर ११:३३, ३४ देव बुद्धी व ज्ञानाचा उगम असल्याबद्दल स्पष्टपणे उल्लेख करते. करिंथमधील ख्रिश्चनांना लिहिताना, पौलाने या अवतरणांचा पुन्हा उल्लेख केला, “प्रभूचे [यहोवा, NW] मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे?” नंतर पुढे म्हणते, “आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे.” प्रभू येशूने अनेक महत्त्वाच्या बाबतीत त्याच्या अनुयायांना यहोवाचे मन सांगितले.—१ करिंथकर २:१६.
कधी कधी इब्री शास्त्रवचनातील वचन यहोवाचा उल्लेख करते, परंतु, त्याचे सामर्थ्य व अधिकार सुपूर्त करण्याने त्याची पूर्णता येशू खिस्तामध्ये होते. उदाहरणार्थ, स्तोत्र ३४:८ मध्ये आम्हाला “परमेश्वर [यहोवा, NW] किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा,” असे सांगितले आहे. परंतु पेत्र, ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला लागू करतो, तो म्हणतो: “ह्याचा तुम्ही अनुभव घेऊन पाहिला आहे.” (१ पेत्र २:३) पेत्र यातील तत्त्व घेऊन ते येशू ख्रिस्ताविषयी देखील कसे सत्य आहे, ते दाखवतो. ख्रिस्ती लोक, यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताचे ज्ञान घेऊन आणि तसे कार्य करुन, पिता आणि पुत्राकडील आशीर्वादांचा आनंद घेऊ शकतील. (योहान १७:३) पेत्राने अशाप्रकारे केलेला हा वापर, सार्वभौम प्रभू यहोवा आणि प्रभू येशू ख्रिस्त हे एकच व्यक्ती आहेत असा होत नाही.—NW इंग्रजी पवित्र शास्त्रातील १ पेत्र २:३ या वचनाची तळटीप पाहा.
यहोवा देव आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांच्यामधील तुलनात्मक स्थानांना प्रेषित पौलाने स्पष्ट केले, त्याने म्हटले: “आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहो; आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघे झाले व आपण त्याच्या द्वारे आहो.” (१ करिंथकर ८:६; १२:५, ६) इफिसमधील ख्रिस्ती मंडळीला लिहित असताना, पौलाने “प्रभू एकच,” येशू ख्रिस्त जो, “देव जो सर्वांचा पिता तोहि एकच” यापासून वेगळा असल्याचे ओळखले.—इफिसकर ४:५, ६.
यहोवा सर्वांवर परात्पर आहे
१९१४ पासून प्रकटीकरण ११:१५ मधील शब्द खरे ठरले आहेत: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे [यहोवा देव] व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; आणि तो युगानुयुग राज्य करील.” द न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट (खंड २, पृष्ठ ५१४) म्हणते: “जेव्हा ख्रिस्त सर्व शत्रूंना आपल्या पायाखाली ठेवील (१ करिंथ. १५:२५), तेव्हा तो देवपित्याच्या अंकित होईल. अशाप्रकारे, येशूच्या प्रभुत्वाने त्याचा उद्देश पूर्ण केलेला असेल आणि देव सर्वांना सर्वकाही झालेला असेल. (१ करिंथ. १५:२८).” येशू ख्रिस्त त्याच्या हजार वर्षिय राजवटीच्या अंतास, पित्याने, सर्वशक्तीमान देवाने त्याला दिलेला अधिकार व सामर्थ्य तो परत करील. अशारीतीने, सर्व महिमा आणि उपासना यहोवाला जो “आपल्या प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आहे” त्याला दिली जावी.—इफिसकर १:१७.
येशू जरी आता प्रभूंचा प्रभू असला, तरी त्याला कधीही देवांचा देव म्हटले नाही. यहोवा सर्वांवर परात्पर राहतो. अशाप्रकारे यहोवा “सर्वांना सर्वकाही” होईल. (१ करिंथकर १५:२८) येशूचे प्रभुत्व त्याला ख्रिस्ती मंडळीचा मस्तक म्हणून योग्य स्थान देते. आम्ही या जगातील उच्च अधिकारावर अनेक शक्तीशाली “प्रभू” पाहत असलो तरी, आम्ही जो प्रभूंचा प्रभू आहे त्यावर आपला भरवसा ठेवू शकतो. तरीपण, येशू ख्रिस्त त्याच्या उच्च स्थानावर आहे, तो अजूनही त्याच्या पित्याच्या अंकित आहे, “अशा हेतूने की, देव सर्वांवर अधिपत्य गाजवो.” (१ करिंथकर १५:२८, द ट्रान्सलेटरर्स न्यू टेस्टामेंट) येशूचे शिष्य त्याला प्रभू म्हणून कबूल करत असले तरी, त्याचे अनुकरण करता येण्यासाठी, त्याने लीनतेचे किती उत्तम उदाहरण मांडले!
[३० पानांवरील संक्षिप्त आशय]
“नव्या करारातील लेखक जेव्हा देवाविषयी बोलतात, तेव्हा त्यांचा अर्थ, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता असा होतो. येशूविषयी बोलतात तेव्हा, ते त्याविषयी [देव] बोलत नाहीत किंवा ते त्याला देव समजत नाहीत. तो देवाचा ख्रिस्त, देवाचा पुत्र, देवाची बुद्धी, देवाचे वचन आहे. इतकेच नव्हे तर, काही अंशी नीका संप्रदायासारख्या असलेल्या सेंट जॉनच्या प्रस्तावनेला शुभवर्तमानापेक्षा कनिष्ट दर्जा देऊन वाचले पाहिजे; इंग्रजीत येते त्याप्रमाणे ग्रीक मध्ये उपपदाविना [थि·ऑसʹ] प्रस्तावना इतकी स्पष्ट नाही.” —“येशू ख्रिस्ताचे देवत्व,” लेखक जॉन मार्टिन क्रेड.