वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ३/१५ पृ. ३-७
  • प्रभूचे सांज भोजन कितीदा साजरे करावे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रभूचे सांज भोजन कितीदा साजरे करावे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • केवळ एकच सण
  • प्रेषितीय पद्धत धोक्यात
  • कलह माजतो
  • धर्मत्यागाची प्रस्थापना
  • आजच्या दिवसाबद्दल काय?
  • प्रभूच्या सांज भोजनाचा विधी का पाळावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल” असावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • सीडर सोहळ्यापासून ते तारणापर्यंत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • यहोवाचे साक्षीदार प्रभुभोजनाचा विधी चर्चपेक्षा वेगळ्या पद्धतीने का पाळतात?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ३/१५ पृ. ३-७

प्रभूचे सांज भोजन कितीदा साजरे करावे?

नाताळ, ईस्टर, “संतांचा” दिवस. ख्रिस्ती धर्मजगतातील बहुतेक चर्चद्वारे अनेक सुटीचे दिवस व सण साजरे केले जातात. परंतु येशू ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना किती सण साजरे करण्यास सांगितले हे तुम्हाला माहीत आहे का? केवळ एकच, हे याचे उत्तर आहे! ख्रिस्ती धर्माच्या संस्थापकाने याच्या व्यतिरिक्‍त इतर कोणत्याही सणाला मान्यता दिली नाही.

स्पष्टतः, येशूने जर एकाच सणाची स्थापना केली, तर तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. येशूने आज्ञापिल्याप्रमाणे अगदी तसाच ख्रिश्‍चनांनी तो साजरा करावा. हा विधी इतका अतुलनीय का होता?

केवळ एकच सण

येशू ज्या दिवशी मरण पावला त्याच दिवशी त्याने ह्‍या सणाची सुरवात केली. त्याने, वल्हांडणाचा यहूदी सण त्याच्या प्रेषितांसोबत साजरा केला होता. मग त्याने त्यांना वल्हांडणाची बेखमीर भाकर देत म्हटले: “हे माझे शरीर आहे; ते तुम्हासाठी दिले जात आहे.” पुढे, येशूने द्राक्षारसाचा प्याला दिला व म्हटले: “हा प्याला माझ्या रक्‍तात नवा करार आहे ते रक्‍त तुम्हासाठी ओतिले जात आहे.” त्याने असेही म्हटले: ‘माझ्या स्मरणार्थ हे करत रहा.’ (लूक २२:१९, २०; १ करिंथकर ११:२४:२६, न्यूव) ह्‍या सणाला प्रभूचे सांज भोजन, किंवा स्मारक म्हटले जाते. येशूने त्याच्या शिष्यांना साजरा करण्यास आज्ञापिलेला हाच केवळ एक सण आहे.

अनेक चर्च असा दावा करतात की, ते या सणाला इतर सणांसोबत पाळतात, परंतु येशूने ज्याप्रकारे आज्ञा दिली त्याच्यापासून अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. कदाचित, लक्षात घेण्यासारखा फरक म्हणजे, ह्‍या सणाची पुनरावृत्ती हा आहे. काही चर्च मध्ये तो महिन्याला, आठवड्याला, किंवा दररोज सुद्धा साजरा करतात. ‘माझ्या स्मरणार्थ हे करा’ असे शिष्यांना सांगताना येशूच्या मनात हाच हेतू होता का? मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर म्हणते: “माझी आठवण म्हणून असे करीत जा.” (१ करिंथकर ११:२४, २५) एखादा स्मारक दिन किंवा वार्षिक दिन कितीदा साजरा केला जातो? बहुधा, वर्षांतून एकदाच.

हेही लक्षात ठेवा की, येशूने ह्‍या सणाची सुरवात केली आणि मग, यहूदी दिनदर्शिकेच्या निसान १४ रोजी, तो मरण पावला.a तो दिवस वल्हांडणाचा होता, व यहूद्यांना, सा.यु.पू. १६व्या शतकात इजिप्तच्या दास्यत्वातून मोठ्या सुटकेच्या अनुभवाची आठवण करून देणारा सण होता. त्या काळी कोकऱ्‍याच्या यज्ञार्पणामुळे यहूद्यांच्या प्रथम जन्मलेल्यांचा बचाव झाला, परंतु यहोवाच्या देवदूताने इजिप्तच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांचा वध केला.—निर्गम १२:२१, २४-२७.

हे आमच्या आकलनास कसे मदत करते? पाहा, ख्रिस्ती प्रेषित पौलाने लिहिले: “आपला वल्हांडणाचा यज्ञपशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले.” (१ करिंथकर ५:७) येशूचे मरण, सर्व मानवजातीला अतिउच्च तारणाची संधी प्राप्त करून देणाऱ्‍या महान वल्हांडणाचे यज्ञ होते. यास्तव, ख्रिश्‍चनांसाठी, ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकाने यहूदी वल्हांडणाची जागा घेतली आहे.—योहान ३:१६.

वल्हांडण हा एक वार्षिक महोत्सव होता. मग, तर्कशुद्धतेत स्मारकविधी देखील त्याचप्रकारचा आहे. वल्हांडण, म्हणजेच येशू ज्या दिवशी मरण पावला तो दिवस यहूदी महिन्याच्या, निसान १४ याच दिवशी नेहमी आला. यास्तव, निसान १४ शी जुळणाऱ्‍या दिनदर्शिकेतील याच दिवशी, ख्रिस्ताच्या मृत्यूचे स्मारक वर्षांतून एकदाच साजरे करण्यास हवे. तो दिवस १९९४ मध्ये, मार्च २६, शनिवारी सूर्यास्तानंतर आहे. तरीसुद्धा, ख्रिस्ती धर्मजगताच्या अनेक चर्चने या दिवसाला, खास साजरा करण्याचा दिवस म्हणून का ठेवले नाही? इतिहासावर टाकलेला एक कटाक्ष आम्हाला या प्रश्‍नाचे उत्तर देईल.

प्रेषितीय पद्धत धोक्यात

यात कोणताही संशय नाही की, सामान्य युगाच्या पहिल्या शतकामध्ये, येशूच्या प्रेषितांद्वारे मार्गदर्शित केलेल्यांनी, त्याने सांगितल्याप्रमाणे प्रभूचे सांज भोजन साजरे केले. परंतु, दुसऱ्‍या शतकाच्या दरम्यान, काही जण त्या स्मरणोत्सवाच्या वेळेत बदल करू लागले. त्यांनी हा स्मारक विधी, निसान १४ शी जुळणाऱ्‍या दिवशी नव्हे तर, आठवड्याच्या पहिल्या दिवशी (आता त्याला रविवार म्हणतात) साजरा करण्यास सुरवात केली. असे का करण्यात आले बरे?

यहुद्यांच्या दिवसाची सुरवात, संध्याकाळच्या सहा वाजेपासून होऊन तो दुसऱ्‍या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संपत होता. येशू, सा.यु. ३३ च्या निसान १४, म्हणजे, गुरुवार संध्याकाळपासून शुक्रवार संध्याकाळपर्यंतच्या कालावधीत मरण पावला. त्याचे पुनरूत्थान, तिसऱ्‍या दिवशी म्हणजे रविवारी पहाटे झाले. काहींना, येशूच्या मृत्यूचा स्मारक दिन, निसान १४ आमच्या दिनदर्शिकेनुसार ज्या दिवशी येणार तो दिवस साजरा करण्याऐवजी, प्रत्येक वर्षाच्या आठवड्यातील कोणत्यातरी ठराविक दिवशी साजरा करायचा होता. येशूच्या मृत्यूच्या दिनापेक्षा पुनरूत्थानाचा दिवस महत्त्वाचा आहे या दृष्टिकोनातून ते पाहू लागले. यास्तव, त्यांनी रविवार हा दिवस निवडला.

येशूने त्याच्या पुनरूत्थानाचा दिवस नव्हे तर, मृत्यूचा दिन साजरा करण्याची आज्ञा दिली होती. शिवाय, यहूदी वल्हांडणाचा सण प्रत्येक वर्षी, आम्ही सध्या वापरत असलेल्या ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार, वेगवेगळ्या दिवशी आल्यामुळे, स्मारक विधीच्या बाबतीत देखील हीच गोष्ट खरी असणे स्वाभाविक आहे. याकरता पुष्कळ जण मूळ व्यवस्थेलाच चिकटून राहिले आणि प्रत्येक वर्षी निसान १४ याच दिवशी प्रभूचे सांज भोजन साजरे केले. कालांतराने त्यांना, “चौदावा दिवस पाळणारे” म्हणून संबोधण्यात आले.

काही विद्वानांनी ओळखले की हे “चौदावा दिवस पाळणारे,” मूळ प्रेषितीय नमुन्याला अनुसरत होते. एका इतिहासकाराने म्हटले: “पास्ख [प्रभूचे सांज भोजन] हा दिवस पाळण्याच्या बाबतीत, आशिया मायनरच्या चर्चचा चौदाव्या दिवसाचा वापर यरूशलेम चर्चसोबत चालू राहिला. ह्‍या चर्चेसने, २ ऱ्‍या शतकात निसान १४ चा त्यांचा पास्ख, येशूच्या मृत्युच्या परिणामामुळे झालेल्या मुक्‍ततेचा स्मरणोत्सव साजरा केला.”—स्टडीया पॅटरिसटीका खंड ५, १९६२, पृष्ठ ८.

कलह माजतो

आशिया मायनर मधील बहुतेक जणांनी प्रेषितीय पद्धतीचे अनुकरण केले तरी, रोममध्ये रविवार हा दिवस साजरा करण्यासाठी बाजूला राखून ठेवला होता. आशिया मंडळींचा प्रतिनिधी, स्मुर्णाचा पॉलिकार्प याने, सा.यु. १५५ मध्ये या विषयीची व इतर समस्यांची चर्चा करण्यासाठी रोमला भेट दिली. दुःखाची गोष्ट अशी की, ह्‍या बाबतीत कोणतेच एकमत झाले नाही.

ल्यॉन्सच्या इरेनियसने एका पत्रात असे लिहिले: “आमच्या प्रभूचा शिष्य योहान व ज्यांच्यासोबत संगती राखली होती अशा इतर प्रेषितांसोबत पॉलिकार्प जे काही पाळत होता ते, न पाळण्याची गळ [रोमचा] अनिसीटस त्याला घालू शकला नाही; शिवाय पॉलिकार्प देखील अनिसीटसला, तो सण पाळण्याची गळ घालू शकला नाही, कारण अनिसीटसने म्हटले की, त्याला त्याच्यासमोर असलेल्या वडिलांच्या पद्धतीला धरून राहिलेच पाहिजे.” (युसेबीयस, खंड ५, अध्याय २४) पॉलिकार्पने वारंवार त्याची भूमिका प्रेषितांच्या अधिकारावर आधारली, परंतु अनिसीटसला रोममधील पूर्वीच्या वडिलांची पद्धत अपिलकारक वाटली हे लक्षात घ्या.

हा कलह, सामान्य युगाच्या दुसऱ्‍या शतकाच्या शेवटी अधिक तीव्र झाला. व्हिक्टर नावाच्या एका विशिष्ट व्यक्‍तिला, सा.यु. १९० च्या सुमारास रोमचा बिशप म्हणून निवडण्यात आले. त्याचा असा विश्‍वास होता की, प्रभूचे सांज भोजन रविवारच्या दिवशीच साजरे केले जावे, व यासाठी त्याने होता होईल तितक्या अनेक इतर नेत्यांचा पाठिंबा मिळवला. व्हिक्टरने आशियातील मंडळींना रविवारच्या व्यवस्थेला स्वीकारण्यास दबाव आणला.

आशिया मायनर मधील मंडळींच्या वतीने उत्तर देताना, इफिसच्या पॉलिक्रेट्‌सने ह्‍या दबावाला शरण जाण्यास नकार दिला. त्याने म्हटले: “आम्ही त्या दिवसात कोणताही फेरबदल, किंवा त्यात आणखी कशाचीही भर घालणार नाही वा त्यातून काही कमी करणार नाही.” त्यानंतर त्याने प्रेषित योहानासमवेत अनेक अधिकाऱ्‍यांची यादी दिली. पुढे त्याने म्हटले, “ह्‍या सर्वांनी, शुभवर्तमानानुसार पास्खचा चौदावा दिवस आचरला, त्यात त्यांनी कसलाही फेरफार केला नाही.” पॉलिक्रेट्‌सने आणखी असे म्हटले: “तर मग, बंधुंनो, . . . मी माझ्यापरिने, धमक्यांना घाबरत नाही. कारण माझ्यापेक्षाही उत्तम असलेले म्हणाले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—युसेबीयस, पुस्तक ५, अध्याय २४.

व्हिक्टर या प्रत्युत्तरामुळे असंतुष्ट झाला. एक ऐतिहासिक कार्य म्हणते की “आशियातील अनेक चर्चना त्याने बहिष्कृत केले, व त्याच्या मतानुसार असलेल्या चर्चने बहिष्कृत केलेल्या चर्चसोबत प्रभू भोजनाचा विधी आचरू नये” असे म्हणून त्याचे परिपत्रक पाठवले. परंतु, “त्याच्या पक्षाच्या सर्वच सुज्ञ आणि प्रामाणिक लोकांनी ह्‍या अविचारी व उद्धट निर्णयाला स्वीकारले नाही, त्यांच्यातील अनेकांनी त्याला स्पष्टपणे लिहून . . . प्रेम, ऐक्यता व शांती जोपासण्याचा सल्ला दिला.”—बींगहॅमचे ॲन्टीक्वीटीज ऑफ द ख्रिश्‍चन चर्च, पुस्तक २०, अध्याय ५.

धर्मत्यागाची प्रस्थापना

इतका प्रखर विरोध असताना देखील, आशिया मायनर मधील ख्रिश्‍चनांनी, प्रभूचे सांज भोजन कधी साजरे करावयाचे या विषयावरील त्यांचे मत वेगळे ठेवले. इतर ठिकाणी तफावतींनी हळूवारपणे शिरकाव केला होता. काहींनी निसान १४ पासून रविवारपर्यंतच्या संपूर्ण काळाला साजरे केले. इतर काही, हा प्रसंग पुष्कळदा—दर आठवडी रविवारी साजरा करू लागले.

आर्लसच्या (फ्रान्स) परिषदेने सा. यु. ३१४ मध्ये, रोमी व्यवस्था जबरदस्तीने लागू केली आणि इतर कोणत्याही विकल्पाला दाबून टाकले. चौदावा दिवस पाळणाऱ्‍यांतील उरलेल्यांनी या कृत्याला साथ देण्यास नकार दिला. मूर्तीपूजक सम्राट कॉन्स्टंटाईनने सा. यु. ३२५ मध्ये, त्याच्या साम्राज्यातील ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांमध्ये विभाजन करणारी ही गोष्ट तसेच इतर बाबींना सोडवण्यासाठी, निकाचे परिषद नावाची धर्माधिकाऱ्‍यांची एक सभा भरवली. आशिया मायनर मधील सर्वांनी रोमी रूढीला अनुसरावे, असा हुकूम त्या मंडळाने दिला.

यहूदी दिनदर्शिकेवरील तारखेनुसार ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक विधी साजरा करण्याचे टाळण्यासाठी पुढारलेल्या प्रमुख्य वादातील एका वादाकडे लक्ष देणे चित्तवेधक गोष्ट आहे. के. जे. हेफील यांचे ख्रिस्ती मंडळाचा इतिहास (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “ज्या यहूद्यांचे हात सर्वात भीतीदायक गुन्ह्यांनी रंगलेले होते, व मने अंधळी झाली होती, त्या लोकांच्या रूढीला अनुसरणे, विशेषत: सर्व सणांतील अतिपवित्र सण, साजरा करण्यास ते पात्र नाहीत असे घोषित केले गेले.” अशा स्थितीमध्ये असणे म्हणजे, “‘सभास्थानाला अधिनता’ दाखवण्याची अपमानित स्थिती ग्रहण करणे हे पाहिले गेल्यामुळे चर्च अधिकारी त्रस्त झाले” असे जे. जस्टर स्टडीया पॅटरीसटीका, खंड ४, १९६१, पृ. ४१२, मध्ये म्हणतात.

हा निव्वळ ज्यू विरोध वाद होता! येशू ज्या दिवशी मरण पावला त्याच दिवसाला त्याच्या मृत्यूचे स्मारक म्हणून पाळणाऱ्‍या लोकांना यहूदी धर्माचे लोक या दृष्टिने पाहण्यात येऊ लागले. येशू स्वतः एक यहूदी होता व मानवजातीसाठी त्याचे जीवन अर्पण करून त्या दिवसाला त्याने अर्थपूर्ण बनवले होते हे विसरण्यात आले. तेव्हा पासून, चौदावा दिवस पाळणाऱ्‍यांचा पाखंडी आणि तट पाडणारे म्हणून धिक्कार करण्यात आला व त्यांचा छळ केला गेला. ॲन्टियॉकच्या मंडळाने सा.यु. ३४१ मध्ये, त्या सर्वांना बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. तरीही, सा.यु. ४०० मध्ये चौदावा दिवस पाळणाऱ्‍यांतील पुष्कळ होते, आणि तेथून पुढे ते अल्पसंख्येच्या गटांमध्ये चिकाटीने राहिले.

त्या दिवसांपासून, ख्रिस्ती धर्मजगत येशूच्या मूळ व्यवस्थेकडे पुन्हा येण्यास अयशस्वी ठरले आहेत. प्राध्यापक विल्यम ब्राईट यांनी कबूल केले की: “उत्तम शुक्रवार हा प्रभूने सहन केलेल्या यातना याच्या संदर्भात खास दिवस म्हणून पाळला जाऊ लागला तेव्हा त्याला, संत पौलाने ज्या यज्ञार्पित मरणाच्या अनुषंगाने ‘पास्ख’बद्दल लिहिले होते त्याचा संबंध नाहीसा झाला. उलट त्यांनी ‘पास्ख’ सणाला व पुनरूत्थान सणाला अगदी मोकळेपणाने जोडले व अशाप्रकारे ग्रीक भाषा आणि ख्रिस्ती धर्मजगतातील लॅटिन भाषा यांच्याभाषेनुरूप गोंधळाच्या कल्पना व विधी प्रस्थापित झाले.” चर्च पाळकांचे युग (इंग्रजी) खंड १, पृष्ठ १०२.

आजच्या दिवसाबद्दल काय?

तुम्ही कदाचित विचाराल, ‘या सर्व वर्षांनंतर, स्मारक विधी कधी साजरा करावा ही महत्त्वाची गोष्ट आहे का?’ होय ती महत्त्वाची आहे. सत्तेसाठी झटणाऱ्‍या करारी लोकांनी बदल केले. येशू ख्रिस्ताची आज्ञा पाळण्याऐवजी लोकांनी त्यांच्या स्वतःच्या कल्पना अनुसरल्या. स्पष्टपणे प्रेषित पौलाने दिलेला इशारा पूर्ण झाला: “मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रुर लांडगे तुम्हामध्ये [ख्रिश्‍चनांमध्ये] शिरतील, हे मी जाणून आहे. तुम्हांपैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.”—प्रे. कृत्ये २०:२९, ३०.

आज्ञाधारकतेची बाब वादाचा विषय आहे. येशूने ख्रिश्‍चनांनी साजरा करण्यासाठी केवळ एकाच सणाची स्थापना केली. तो सण कधी आणि कसा साजरा करावा याची पूर्णपणे स्पष्टता पवित्र शास्त्र देते. तर मग, त्यात फेरबदल करण्याचा हक्क कोणाला आहे? ह्‍या बाबतीत हातमिळवणी करण्यापेक्षा आधीच्या चौदावा दिवस पाळणाऱ्‍यांनी छळ आणि बहिष्कृत होणे सहन केले.

येशूच्या इच्छेचा आदर करणारे व त्याने ज्या दिवशी त्याच्या मृत्यूच्या स्मारक विधीची स्थापना केली तोच दिवस पाळणारे ख्रिस्तीजन आजही पृथ्वीवर आहेत हे जाणणे तुम्हास आवडेल. ह्‍या वर्षी, यहोवाचे साक्षीदार संपूर्ण पृथ्वीवर त्यांच्या राज्य सभागृहांमध्ये, निसान १४ ची सुरवात होते त्या मार्च २६, रोजी शनिवारी संध्याकाळी ६.०० नंतर एकत्र भेटणार आहेत. या अतिशय अर्थपूर्ण वेळेत काय केले जावे याविषयी येशूने जे सांगितले होते तेच हुबेहूब ते करतील. तर मग, त्यांच्या सोबत तुम्ही देखील प्रभूचे सांज भोजन साजरे का करू नये? ह्‍या विधीला उपस्थित राहून येशू ख्रिस्ताच्या इच्छेचा तुम्ही आदर करता हे दाखवू शकाल.

[तळटीपा]

a यहूदी वर्षाचा पहिला महिना, निसान, नवा चंद्र दिसू लागल्यावर चालू झाला. यास्तव, निसान १४ ही तारीख नेहमी पौर्णिमेला येत राहिली.

[६ पानांवरील चौकट]

“ती अमूल्य खंडणी”

येशू ख्रिस्ताचे खंडणी यज्ञार्पण केवळ एका शिकवणीपेक्षा अधिक असे आहे. येशूने स्वतःबद्दल म्हटले: “मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही; तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्‍तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे.” (मार्क १०:४५) त्याने असेही स्पष्टीकरण दिले: “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) खंडणी, मृतांसाठी पुनरूत्थानाचा व अनंतकाळ जीवनाच्या आशेचा मार्ग खुला करते.—योहान ५:२८, २९.

प्रभूचे सांज भोजन साजरे करताना येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचे स्मरण करणे अतिमहत्त्वाचे आहे. त्याचे बलिदान कितीतरी गोष्टी साध्य करते! ईश्‍वरी पालकांद्वारे प्रशिक्षण प्राप्त केलेल्या व अनेक वर्षांपासून देवाच्या सत्यात चालत असणाऱ्‍या एका विवाहीत स्त्रीने अशा शब्दात तिची मनपूर्वक कृतज्ञता व्यक्‍त केली:

“स्मारक विधीच्या दिनाची आम्ही वाट पाहत असतो. प्रत्येक वर्षी तो अधिक खास दिन होत असतो. मला, २० वर्षांपूर्वी माझ्या प्रिय वडिलांच्या शवपेटीकडे पाहत उभी असल्याचे व खंडणीसाठी हृदयापासून कृतज्ञता व्यक्‍त केल्याचे अजूनही आठवते. यापूर्वी ते केवळ पुस्तकी ज्ञान वाटत होते. मला सर्व शास्त्रवचने व त्यांचे स्पष्टीकरण कसे द्यायचे हेही माहीत होते! परंतु मृत्यूची आस्थाशून्य वस्तुस्थिती मला भासली तेव्हा, त्या अमुल्य खंडणीद्वारे आमच्यासाठी काय साध्य होणार आहे याचा विचार स्पष्ट झाल्यामुळे माझे हृदय आनंदाने भरून गेले.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा