माझ्या जीवनाने अनुभवलेला “यहोवाचा हात”
लॉरेन्स थॉम्पसनद्वारे निवेदित.
एके रात्री १९४६ मध्ये, माझे पप्पा आणि मी, उत्तर ध्रुवप्रदेशात आकाशात दिसणाऱ्या प्रकाशाचे पट्टे पाहत कारमध्ये बसलो होतो. यहोवाची उच्चता आणि आमची क्षुद्रता याविषयी आम्ही बोललो. कॅनडा येथे यहोवाच्या साक्षीदारांवरील कामावर बंदी असतानाच्या वर्षांमधील घटना आम्ही पुनः अनुभवल्या. यहोवाने त्या वर्षांच्या दरम्यान त्याच्या लोकांना कशारितीने टिकवून ठेवले व मार्गदर्शित केले ते पप्पांनी माझ्यावर बिंबवले.
मी केवळ १३ वर्षांचा असूनही, पप्पा जे काही सांगत होते त्या वास्तविकतेबद्दल गुणग्राहकता दाखवू शकत होतो. आणखी प्रचार कार्याच्या होण्याच्या निकडीची आणि विस्तृतपणाची जाणीव देखील त्यांनी माझ्यावर बिंबवली. पप्पांनी, गणना ११:२३ व्या वचनाचा उल्लेख केला आणि खरोखर, यहोवाचा हात कधीही उणा पडत नाही यावर जोर देऊन मला सांगितले. केवळ त्याच्यावरील आमच्या विश्वासाचा आणि भरवश्याचा अभाव, तो आमच्यासाठी जे काही करणार आहे याला मर्यादा घालते. मी कधीही विसरणार नाही असे ते अमूल्य बाप-लेकाचे संभाषण होते.
वॉचटावर प्रकाशनांचा अभ्यास करणे, खासकरून १९३९ मध्ये प्रकाशित झालेल्या तारण (इंग्रजी) ह्या पुस्तकाने माझ्या पूर्वीच्या जीवनाला अत्यंत प्रभावीत केले. त्या पुस्तकाच्या प्रास्थाविक नाट्यमय दाखल्याचा मला कधीही विसर पडणार नाही. तो असा होता: “उतारुंनी गच्च भरलेली, एक वेगवान पॅसेंजर ट्रेन, ताशी १६० किलोमीटर वेगाने धावत होती. तिला नदीवरील एक पुल पार करायचा होता, ज्याला १८० अंशाचे वळण होते, व ज्यामुळे ट्रेनच्या अगदी शेवटल्या डब्यात बसलेले प्रवासी, इंजिनला पाहू शकत होते. शेवटल्या डब्यात बसलेल्या दोन पुरूषांनी, दूरवर असलेल्या पुलाच्या शेवटच्या कमानीला आग लागून ती नदीत कोसळत असल्याचे पाहिले. त्यांनी हे जाणले की ते खूप मोठ्या धोक्याला सामोरे जात आहेत. ती खरोखर आणीबाणीची परिस्थिती होती. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाश्यांचे जीव वाचवण्यासाठी गाडीला वेळीच थांबवता येऊ शकत होते का?”
या दृष्टांताला लागू केल्यावर, त्या पुस्तकाने असा समारोप केला: “याचप्रकारे, आज, पृथ्वीवरील सर्व रा आणि लोक सर्वात मोठ्या आणीबाणीच्या परिस्थितीच्या अगदी सामोरे आले आहेत. हर्मगिद्दोनाद्वारे येणारा नाश फार जवळ आहे हा इशारा, देवाने आज्ञापिल्याप्रमाणे त्यांना दिला जात आहे. . . . यास्तव, सर्वांना इशारा दिल्यामुळे, प्रत्येकाने तो जो मार्ग स्वीकारणार आहे, त्याची निवड केली पाहिजे.”
ती वेगवान ट्रेन, तो जळणारा पूल आणि प्रचारकार्याची निकड, या सर्व गोष्टी माझ्या मनात अशा कोरल्या गेल्या आहेत की त्यांना पुसून टाकणे शक्य नाही.
सुरवातीचे प्रचारकार्य
मी पाच वर्षांचा असताना, म्हणजे १९३८ मध्ये प्रचारकार्यात सहभाग घेऊ लागलो. हेन्री आणि ॲलिस ट्वेड हे दोन पायनियर (पूर्ण वेळेचे सेवक) मला त्यांच्यासोबत घेऊन जात असत, आणि आम्ही लोकांसोबत बोलण्यात दिवसाला १० ते १२ तास खर्च करत होतो. यहोवाच्या सेवेतील त्या सर्व दिवसांचा मी पूर्णपणे आनंद लुटला. यास्तव, पुढील वर्षी पप्पा आणि मम्मीने मला प्रचारक होण्यास व मी केलेल्या कार्याचा अहवाल देण्यासाठी अनुमती दिली तेव्हा तर मी रोमांचित झालो.
त्या सुरवातीच्या दिवसांमध्ये आम्ही, खोट्या धर्माला उघड करणाऱ्या व देवाच्या राज्याची घोषणा करणाऱ्या घोषणाफलकांना गळ्यात अडकवून, शहराच्या हमरस्त्यावर वार्ता संचलनाच्या कामात भाग घेत होतो. आम्ही हातवाही ग्रामोफोनवर थेट घरमालकाच्या दारापाशी उभे राहून पवित्र शास्त्र आधारित संदेश ऐकवत होतो. आम्ही वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष, जे. एफ रदरफोर्ड, यांची भाषणे ऐकवत होतो, त्यातील काही मला तोंडपाठ झाली होती. त्यांनी म्हटलेल्या या शब्दांची मला अजूनही आठवण आहे की, “असे बहुधा म्हटले जाते की, धर्म एक पाश आणि गोंधळ आहे!”
कॅनडामध्ये आमच्या कामावर बंदी
यहोवाच्या साक्षीदारांच्या कामावर नात्झी जर्मनी आणि इतर राष्ट्रांमध्ये बंदी असल्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान कॅनडात देखील बंदी आणली गेली. यास्तव, आम्ही फक्त पवित्र शास्त्राचा उपयोग केला व पवित्र शास्त्राच्या सूचनांना आज्ञाधारकता दाखवून आमचे ईश्वर अधिकृत काम चालू ठेवले. (मत्तय २८:१९, २०; प्रे. कृत्ये ५:२९) आमच्या सभांवर आणि घरांवर पोलिसांच्या छापांचा सामना करण्यासाठी आम्ही शिकलो. न्यायाधीशांसमोर उभे राहून साक्ष देण्यास व उलट तपासणी करणाऱ्यांना उत्तर देण्यात आम्ही अनुभवी झालो.
माझा थोरला भाऊ जिम आणि मी, चालत्या गाडीतून दारात आणि अंगणात पुस्तिका टाकण्यात अगदी तरबेज झालो. यासोबतच अमेरिकेतील संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी सीमारेषा पार करणाऱ्यांसाठी सर्व तयारी करून देणारे सेवक म्हणून, तर काही वेळा पहारेकरी म्हणून काम केले.
आमचे घर पोर्ट आर्थर (आता थंडर बे), ऑनटरीओ शहराच्या बाहेरील बाजूला, झाडी व झुडपांनी घेरलेल्या एका मोठ्या एकरात होते. आमच्याकडे एक गाय, एक वासरू, डुक्करे आणि कोंबड्या होत्या, जे तरूण समख्रिश्चनांना मदत करण्यासाठी आमच्या कामाला उत्तम मायावरण ठरले. कारण या तरूण ख्रिश्चनांचा, देवाच्या राज्याचा प्रचार केल्याबद्दल अटक करण्यासाठी पाठलाग करण्यात येत होता.
रात्रीच्या वेळी, तरूण ख्रिश्चनांना घेऊन जाणाऱ्या मोटारगाड्या, ट्रक्स, आणि अनुयान आमच्या निवांत पटांगणावर येत जात होत्या. आम्ही या युवकांची राहण्याची व्यवस्था करत असू, त्यांना लपवत असू, वेषांतर करत असू, त्यांना खावयास देऊन पुन्हा त्यांच्या मार्गावर त्यांना लावत असू. माझे पप्पा, मम्मी तसेच असे इतर पूर्वीचे सहकर्मचारी, पूर्ण जीवाने काम करणारे सेवक होते, ज्यांनी यहोवा देवाची सेवा व त्याच्यावर प्रीती करण्यासाठी माझ्या कोवळ्या हृदयाला आकार दिला.
यहोवाला, मी माझे जीवन ऑगस्ट १९४१ मध्ये समर्पित केले व वनराईत असलेल्या एका लहानशा तलावात माझा बाप्तिस्मा झाला. लहानश्या दिव्याच्या उजेडात एका खोलीत आमच्यासारखे पुष्कळ जण ह्या घटनेला एकत्रित झाले होते. संशयास्पद असे दिसल्यामुळे, पोलिस शोधदीप घेऊन संपूर्ण तलावाला गस्त घालण्यासाठी आले, परंतु त्यांना आमचा ठावठिकाणा लागला नाही.
पूर्णवेळेच्या सेवेचे अनेक पैलू
मी १९५१ मध्ये, माध्यामिक शाळेतून पद्वीधर झालो व कोबर्ग, ऑनटरीओ, येथे पायनियर नेमणूक घेण्यासाठी जवळजवळ १,६०० किलोमीटर प्रवास केला. तेथील मंडळी छोटीशी होती, आणि मला कोणी पायनियर सोबती नव्हता. परंतु यहोवाचा हात उणा नाही याची आठवण ठेवून, मी एक खोली भाड्याने घेतली, स्वतःचा स्वयंपाक करीत होतो, व यहोवाची सेवा करण्यात खूप हर्षित होतो. त्याच्या पुढच्या वर्षी मला टोरेंटो येथील वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तरात काम करण्यासाठी निमंत्रण आले. तेथे मी अनेक मौल्यवान धडे शिकलो ज्यांनी मला भवितव्यातील राज्य सेवेसाठी शुद्ध केले.
टोरेंटो येथे एक वर्षासाठी पायनियर म्हणून काम केल्यावर, मी लूसी ट्रुड्यू हिला भेटलो, आम्ही दोघांनी विवाह केला व १९५४ च्या हिवाळ्यात आम्हाला लेवीस, क्यूबेक येथे पायनियर नेमणूक मिळाली. तेथे कडाक्याच्या थंडीचे हवामान होते, जमावाचे आणि पोलिसांचे सतावणे, धाकदपटशाही होते, आणि फ्रेंच भाषा शिकणे हे एक आव्हान होते. या सर्व गोष्टींमध्ये यहोवाचा हात कधीही उणा पडला नाही, म्हणूनच कणखर परिस्थिती असताना देखील आमच्यावर अनेक आशीर्वाद होते.
उदाहरणार्थ, १९५५ मधील मोठ्या आंतरराष्ट्रीय युरोपियन संमेलनांना उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची ने-आण करण्यासाठी संस्थेने योजलेल्या दोन जहाजांचे, (अरोसे स्टार व अरोसे कुल्म) निरीक्षण करण्यासाठी आम्हाला सांगण्यात आले. संस्थेचा व्यापार मिळण्याच्या आतुरतेने, जहाज कंपनीचे कार्यकारी अधूनमधून आम्हाला अतिथ्यशीलपणा दाखवत, जो त्या काळी क्युबेक मधील तणावपूर्ण सेवेतून सुखकर विश्रांतीचा काळ होता.
मला, १९५५ च्या शरदऋतुत, फिरते पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी आमंत्रण देण्यात आले, आणि आम्ही तो हिवाळा, उत्तरेच्या अतिथंड ऑनटरीओ येथील, दूरच्या मंडळ्यांना भेटी देण्यात घालवला. त्याच्या पुढील वर्षी आम्ही, अमेरिकेतील वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियडला उपस्थित राहिलो आणि त्यानंतर, आम्हाला ब्राझिल, दक्षिण अमेरिकेत मिशनरी म्हणून नेमण्यात आले.
आमच्या ह्या नव्या नेमणूकीत आम्ही अगदी जोमाने कार्य करण्यास आरंभ केला व लागलीच पोर्तुगीज भाषेत प्रचार करू व शिकवू लागलो. मला १९५७ च्या सुरवातीला पुन्हा एकदा फिरते पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी नेमण्यात आले. आता, उत्तरेच्या गारठ्याऐवजी, अतिउष्णतेशी आम्हाला झगडावे लागले. अनेक वेळा चालत असताना आमच्या बुटांतील तप्त वाळू काढण्यासाठी किंवा आणखी शक्ती यावी म्हणून ऊसाचे कांडे तोडून ते खाण्यासाठी आम्हाला मध्येच थांबावे लागत होते. परंतु यासोबत आशीर्वादही होते.
रॉझेंटी फॉझू शहरातील पोलिसांच्या मुख्य अधिकाऱ्यासोबत मी बोललो, आणि त्याने सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देऊन शहराच्या मोकळ्या चौकात सर्वांना येण्यास सांगितले. मोठ्या आकाराची पाने असलेल्या व फुलांनी बहरलेल्या झाडाच्या सावलीत मी, सर्व शहरवासीयांना पवित्र शास्त्राचे एक व्याख्यान दिले. आज तेथे साक्षीदारांची एक मंडळी आहे.
ब्राझिलमध्ये आमच्या मुलांचे संगोपन करणे
लूसी १९५८ मध्ये गरोदर राहिली, तेव्हा आम्ही ज्युझ डी फोरा येथे स्थायिक झालो व खास पायनियर म्हणून कार्य केले. पुढच्या दोन वर्षां दरम्यान, आमच्या दोन मुली सुझन आणि किम जन्मल्या. शहरामध्ये नवलाईची गोष्ट होऊन त्या दोघी आमच्या सेवेकरता खरोखरच एक वरदान ठरल्या. गोट्याच्या रस्त्यावरून आम्ही त्यांची बाबागाडी जशी ढकलत नेत असू तसे, लोक त्यांना पाहण्यासाठी बाहेर येत असत. विषुववृत्ताच्या थोड्या उत्तरेकडील रेसीफ मध्ये, राज्य प्रचारकांची तीव्र आवश्यकता असल्यामुळे, त्या अती तप्त ठिकाणी आम्ही स्थलांतर केले.
साओ पाउलो येथे १९६१ मध्ये होणाऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या साक्षीदारांसाठी मी केवळ विमानातून येण्याजाण्याचीच व्यवस्था केली नाही तर, त्या अविस्मरणीय अधिवेशनाला मला स्वतःला सुद्धा उपस्थित राहता आले. परंतु, विमानाने भरारी घेतल्यावर २० मिनिटांनी, आमचे विमान केबीनच्या आजूबाजूला प्रवाश्यांना फेकत, अचानकपणे पृथ्वीच्या दिशेने कोसळू लागले. विमानाच्या आतील भागाचा नाश झाला होता; बांधून ठेवलेल्या बैठका अगदी मुळापासून उचकटून बाहेर आल्या, आणि त्यामुळे प्रवाश्यांना इजा झाली व ते रक्तबंबाळही होऊ लागले. आनंदाची गोष्ट म्हणजे, वैमानिकाने विमानाला खाली पूर्णपणे कोसळण्यापासून वाचवले, आणि आम्ही सुखरूपपणे जमिनीवर उतरलो. आमच्यातील कोणासही इतका जबर मार बसला नव्हता की ज्यामुळे आम्हाला दुसऱ्या विमानातून साओ पाउलोला पुढे जाणे अशक्य झाले. आम्ही एका अजब अधिवेशनाचा आनंद लुटला, परंतु मी कानाला खडा लावला की मी पुन्हा कधीही विमानाने प्रवास करणार नाही!
तथापि, अधिवेशनानंतर घरी आल्यावर, माझ्यासाठी आणखी एक नेमणूक तयार होती. पायुआय राज्यातील तेरेसीनाच्या गर्द जंगलात होणाऱ्या अधिवेशनाची देखरेख मला करावयाची होती. मला तेथे विमानाने जावे लागणार होते. मला जरी भीती वाटत असली तरी, यहोवाच्या सामर्थ्यावर पूर्णपणे विसंबून मी ती नेमणूक स्वीकारली.
आमचा मुलगा ग्रेग, १९६२ मध्ये रेसीफ येथे जन्मला. माझे कुटुंब आता वाढल्यामुळे मला पायनियर म्हणून राहता आले नसले तरी, मी त्या छोट्याशा मंडळीवर सकारात्मक प्रभाव पाडण्यास झटू शकत होतो. सेवेमध्ये आमच्यासोबत आमची मुले देखील भाग घेण्यास नेहमी उत्सुक होती कारण आम्ही त्यांच्यामध्ये तशी आवडच निर्माण केली होती. प्रत्येक जण, वयाच्या तिसऱ्या वर्षापासून, दारांवर सादरता करू शकत होता. सभा किंवा क्षेत्र कार्य कधीही न चुकवण्याचा सराव आम्ही स्वतःला लावून घेतला होता. कुटुंबातील कोणी एक आजारी असेल तर त्याच्यासोबत केवळ एक जण घरात राही व या व्यतिरिक्त बाकी सर्वजण सभेला किंवा क्षेत्रकार्यात उपस्थित राहत.
अनेक वर्षांपासून, कुटुंब या नात्याने आम्ही मुलांच्या शालेय जीवनाविषयी, आणि जीवनातील त्यांच्या ध्येयासंबंधी, तसेच यहोवाच्या संस्थेशी निगडीत असणाऱ्या जीवनाच्या मार्गासाठी त्यांना तयार करत नियमितपणे चर्चा करत असू. दूरदर्शनसारख्या दुर्बल करणाऱ्या प्रभावासमोर त्यांना सोडून न जाण्याची आम्ही दक्षता घेत होतो. आमची मुले त्यांच्या किशोरावस्थेत येईपर्यंत आमच्या घरात दूरदर्शन संच नव्हता. आमची तेवढी ऐपत असली तरी, आम्ही ती भौतिक गोष्टींसाठी वाया घालवली नाही. उदाहरणार्थ, तिघांनी आळीपाळीने वापरावी यासाठी आम्ही केवळ एकच सायकल विकत घेतली.
आम्ही होता होईल तितक्या सर्व गोष्टी एकत्र मिळून केल्या, जसे की, बास्केटबॉल खेळणे, पोहणे, व कुटुंबाला सहलीला नेणे, वगैरे. आमच्या सहली ख्रिस्ती अधिवेशनांना उपस्थित राहणे किंवा विविध राष्ट्रांतील बेथेल गृहांना भेटी देण्याच्या संबंधात होत्या. या सहलींनी आम्हाला एकत्र मिळून मनमोकळेपणाने बोलण्यास वेळ दिला ज्यामुळे लूसी आणि मी, आमच्या मुलांच्या अंतःकरणात काय आहे ते जाणू शकलो. त्या आल्हाददायक वर्षांसाठी आम्ही यहोवाचे खूप आभार मानतो!
अखेरीस, लूसीच्या तब्येतीवर विषुववृत्ताजवळच्या उष्णकटिबंधात घालवलेल्या दहा वर्षांचा अपायकारक परिणाम झाला. यास्तव आम्ही दक्षिणेकडील, पराना राज्याच्या कुरीटीबा या अधिक सौम्य वातावरणात नेमणूकीच्या बदलीचा स्वीकार केला.
कॅनडाकडे पुनरागमन
ब्राझिल येथे जवळजवळ २० वर्षां नंतर १९७७ मध्ये, माझ्या आजारी असलेल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी मी, लूसी आणि आमची लेकरे कॅनडाला परतलो. आमच्या कुटुंबांसाठी ते किती वेगळे सांस्कृतिक वातावरण होते! परंतु आध्यात्मिकरित्या ते वातावरण वेगळे नव्हते, कारण आम्ही आमच्या प्रेमळ ख्रिस्ती बंधुवर्गासोबत तोच नित्यक्रम राखून होतो.
कॅनडात आमच्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश करून घेणारी पूर्ण वेळची सेवा ही एक बाब बनली कारण, आमच्या मुली आळीपाळीने पूर्ण वेळेच्या पायनियर सेवेत उतरल्या. आम्ही सर्वांनी आमच्या कौटुंबिक प्रयत्नासाठी हातभार लावला. अर्ध-वेळ नोकरी केल्यावर जी मिळकत येई, ती आम्ही खर्चासाठी साठवून ठेवत असू जेणेकरून, घर चालवण्यासाठी आणि विखुरलेल्या क्षेत्रात जाण्यास वापरण्यात येणाऱ्या तीन मोटार गाड्यांच्या खर्चासाठी तो पैसा वापरता येऊ शकला. दर आठवडी आमच्या कौटुंबिक पवित्र शास्त्राभ्यासानंतर, आम्ही आमच्या कौटुंबिक योजनांची चर्चा करत होतो. अशा चर्चा, आम्ही कोठे जात आहोत व आमच्या जीवनासोबत आम्ही काय करत आहोत याचे स्पष्टीकरण देण्यासाठी सर्वांना मदत करत असत.
आमचा मुलगा ग्रेग याचेही, त्याच्या थोरल्या बहिणींप्रमाणेच, पूर्ण वेळेच्या सेवेचे ध्येय होते. तो पाच वर्षांचा होता तेव्हापासूनच, बेथेल म्हटलेल्या संस्थेच्या शाखा दप्तरात काम करण्याची त्याची इच्छा असल्याचे तो नेहमी बोलून दाखवत असे. तो त्याचे ध्येय कधीच विसरला नाही, आणि माध्यमिक शाळेतून पद्वीधर झाल्यावर, त्याने त्याच्या आईला आणि मला विचारले: “मी बेथेल सेवेसाठी अर्ज करावा असे तुम्हाला वाटते का?”
आमच्या मुलाला सोडण्यासाठी आमच मन तुटलं, परंतु तरीही मनाला सावरून आम्ही मागेपुढे न पाहता उत्तर दिले: “तू बेथेलमध्ये, म्हणजेच, यहोवाच्या संस्थेच्या अगदी मुख्य ठिकाणी, जितका अधिक काळ राहशील तेवढ्याच अधिक रितीने यहोवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेशील.” दोन महिन्यातच तो कॅनडाच्या बेथेलमध्ये गेला. तो गेला ते वर्ष १९८० हे होते, आणि तेव्हांपासून आजपर्यंत तो तेथेच आहे.
लूसी आणि माझ्यासाठी, १९८० ह्या वर्षाने नवे आव्हान दिले. आम्ही दोघांनी जेथून सुरवात केली होती तेथेच पोंहचलो, म्हणजे आता आम्ही दोघेच राहिलो होतो. कारण सूझनचा विवाह झाला होता आणि ती तिच्या पतीसोबत पायनियरींग करत होती, शिवाय किम आणि ग्रेग हे दोघही बेथेलमध्ये काम करत होते. मग आम्ही काय करावे? ह्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला १९८१ मध्ये, कॅनडाच्या जवळजवळ २,००० किलोमीटरच्या पलिकडे पसरलेल्या एका पोर्तुगीज विभागात काम करण्याचे आमंत्रण दिले तेव्हा तात्काळ मिळाले. आजही आम्ही या प्रवासी कामाचा आनंद लुटत आहोत.
त्यानंतर, किमने विवाह केला व ती गिलियडला उपस्थित राहिली, आणि सध्या तिच्या पतीसोबत ब्राझिल येथे विभागीय कार्यात सेवा करत आहे. सूझन तिच्या पतीसोबत कॅनडातच आहे. ते दोघेही त्यांच्या दोन मुलांचे संगोपन करत आहेत, व तिचा पती पायनियरींग करत आहे. आमचे कुटुंब पूर्ण वेळेच्या सेवेतील विविध नेमणूकींमुळे अलिकडच्या काळात इतरत्र विखुरलेले असले तरी, आम्ही आध्यात्मिक तसेच भावनात्मकरीत्या एकमेकांच्या निकट आहोत.
लूसी आणि मी, आमच्या कुटुंबासमवेत, शुद्ध पृथ्वीवरील उज्ज्वल भवितव्याची वाट पाहून आहोत. (२ पेत्र ३:१३) गतकाळातील मोशेप्रमाणे, आम्हीसुद्धा गणना ११:२३ मधील अलंकारिक प्रश्नाच्या उत्तराच्या सत्यतेला प्रत्यक्ष अनुभवले आहे की: “यहोवाचा हात काय तोकडा पडला आहे? माझे म्हणणे तुझ्या प्रत्ययास येते की नाही हे तू आता पाहशील.” निश्चये, यहोवाला त्याच्या सेवकांच्या पूर्ण अंतःकरणाने केलेल्या सेवेबद्दल आशीर्वाद देण्यापासून काहीही अडथळा आणू शकत नाही.
[२५ पानांवरील चित्रं]
माझी पत्नी लूसी, हिच्यासोबत