राज्य घोषकांचा वृतांत
रेल्वेच्या प्रवासाची आवड असणारा एक तरुण सत्य शिकतो
जर एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचा कल धार्मिकतेकडे असला, तर यहोवा देव, येशू ख्रिस्त व स्वर्गीय देवदूतांचा उपयोग करून अशा मेंढरासमान व्यक्तिचा अखेरीस राज्याच्या सुवार्तेसोबत संपर्क आणण्याचे निश्चित करतो. नियुक्त वेळेत ती व्यक्ती येशूच्या उजवीकडे त्याच्या कृपापसंतीत येऊ शकते. (मत्तय २५:३१-३३) हीच गोष्ट ऑस्ट्रियातील रेल्वेतून दूरदूरच्या ठिकाणी पर्यटनास जाणाऱ्या एका तरुणाच्या बाबतीत घडली, ज्याला अगदी विलक्षण मार्गाने सत्याचा परिचय झाला.
या तरुण गृहस्थाच्या छंदातील सर्वात लक्षवेधक भाग म्हणजे, रेल्वे व्यवस्थापकांच्या परवानगीने रेल्वे-ड्रायव्हरच्या विभागात बसून त्याच्यासोबत प्रवास करणे. तो त्याच्या प्रत्येक प्रवासाचे व्हिडीओ कॅमेराद्वारे छायाचित्रण करून ठेवित असे जेणेकरून तो त्याच्या घरी परत ते पाहू शकत होता. व्हिएन्नापासून सॅल्जबर्ग, येथपर्यंतच्या त्याच्या प्रवासातील इंजिन ड्रायव्हर यहोवाचा साक्षीदारांपैकीचा एक होता. त्याने त्या रेल्वेच्या प्रवासाची आवड असणाऱ्या सोबत राज्याबद्दल बोलण्यास या संधीचा उपयोग केला. प्रथम तो तरुण गृहस्थ, एक इंजिन ड्रायव्हर देव व पवित्र शास्त्र याबद्दल बोलतो आहे हे ऐकून अचंबित झाला. परंतु संपूर्ण प्रवासामध्ये तो इंजिन ड्रायव्हर त्याला जे काय सांगतो याकडे लक्ष देण्याऐवजी त्याचे जास्त लक्ष नैसर्गिक देखावा पाहण्याकडे रोखलेले होते.
घरी परतल्यावर, या तरुणाने त्याचे व्हिडीयो छायाचित्रण एकादा नव्हे तर दहादा पाहिले, कारण तो या प्रवासामध्ये खूपच आस्थेवाईक होता. त्याने आवाजाचेही ध्वनीमुद्रण केले असल्यामुळे, साक्षीदाराने त्याला जे सांगितले होते तेही त्याने वारंवार ऐकले. जितक्यांदा तो व्हिडीयो पाहात होता, तितक्यांदा तो, त्याने जे सांगितले त्याशी परिचित होत गेला. तो यावर आता विचार करु लागला, व शेवटी पवित्र शास्त्रातून जी अत्युत्तम माहिती प्रस्तृत केली होती त्याबद्दल उत्कंठित झाला. त्याला आणखीन जाणून घ्यावयाचे होते.
त्याला त्या इंजिन ड्रायव्हरचे नाव आठवले व तो व्हिएन्ना येथेच कोठेतरी राहतो हे ठाऊक होते. त्यामुळे तो टपाल कचेरीत गेला व तेथे त्या नावाखाली असलेल्या टेलिफोन डिरेक्ट्रीतील यादीप्रमाणे एकामागोमाग एक असे दुरध्वनीचे नंबर त्याने फिरविले. दूरध्वनीला उत्तर देणाऱ्यांना त्याचा प्रश्न असे की: “तुम्ही रेल्वे ड्रायव्हर आहात का?” उत्तर जर नाही असेल तर, तो दुसरा क्रमांक फिरवित असे. शेवटी, त्याला तो इंजिन ड्रायव्हर मिळाला. त्याने त्याला आपली कहाणी ऐकविली व त्याने व्हिडीयोवर ऐकलेल्या पवित्र शास्त्राच्या संदेशाबाबत तो आस्थेवाईक असल्याचेही त्याला सांगितले.
साक्षीदाराने शाखा दप्तराद्वारे त्या तरुण गृहस्थाच्या जवळपास राहणाऱ्याला त्याची भेट घेण्याची योजना आखली. आणि असे घडले की स्थानिक मंडळीमध्ये देखील असा एक साक्षीदार होता, जो रेल्वेमार्गाचा इंजिन ड्रायव्हर होता. या दुसऱ्या इंजिन ड्रायव्हरने त्या रेल्वेच्या प्रवासाची आवड असणाऱ्याला भेट दिली, व पवित्र शास्त्र अभ्यास सुरु झाला. त्या तरुण गृहस्थाचा १९९१ च्या उन्हाळ्यात बाप्तिस्मा झाला.
ही व्यक्ती मनापासून धार्मिकतेवर प्रेम करणारी आहे असे अंतःकरण पारखणाऱ्या, यहोवाने पाहिले असावे. या कारणास्तव, विलक्षण मार्गाने का होईना—त्याने त्याला पवित्र शास्त्रीय सत्याच्या संपर्कात आणले.—१ इतिहास २८:९; योहान १०:२७.