तुम्ही जीवनाची धाव कशी धावत आहात?
“शर्यतीत धावणारे सर्व धावतात; पण एकालाच पैज मिळते हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्हास ती मिळेल अशी धावा.”—१ करिंथकर ९:२४.
१. आपल्या ख्रिस्ती मार्गाक्रमणास पवित्र शास्त्र कशाची उपमा देते?
आपल्या सार्वकालिक जीवनाच्या शोधाला पवित्र शास्त्र एका शर्यतीची किंवा धावेची उपमा देते. प्रेषित पौलाने आपल्या जीवनाच्या शेवटी असे म्हटलेः “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे.” त्याने आपल्या सहख्रिश्चनांना तेच करावे असे म्हटले. त्याने त्यांना सांगितलेः “आपणही सर्व दडपण व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.”—२ तीमथ्य ४:७; इब्रीयांस १२:१.
२. जीवनाच्या शर्यतीत कोणती उत्साहवर्धक सुरवात आपल्याला पहायला मिळते?
२ ही उपमा खरोखरीच उचित प्रकारातील आहे कारण यात सुरवात, नेमून दिलेला मार्ग व समाप्तीची रेषा किंवा ध्येय आहे. हेच आमच्या जीवनाकडे आम्ही करीत असलेल्या आध्यात्मिक प्रगतिला अनुलक्षून आहे. आपण पाहिले आहे त्याप्रमाणे हजारो लोक जीवनाच्या शर्यतीत दर वर्षी चांगली सुरवात करीत आहेत. मागील पाच वर्षात, १३,३६,४२९ लोकांनी समर्पण व पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन या शर्यतीत प्रवेश केला. अशी ही उत्साही सुरवात खरोखरीच उत्तेजनात्मक आहे. तथापि, ही शर्यत संपेपर्यंत व नेमून दिलेली रेषा पार करीपर्यंत त्यात टिकून राहणे हे महत्त्वाचे आहे. हे तुम्ही करीत आहात का?
जीवनाची धाव
३, ४. (अ) शर्यतीत धावत राहण्याच्या महत्त्वावर पौलाने कसा भर दिला? (ब) काहींनी पौलाच्या सल्ल्याकडे कसे दुर्लक्ष केले?
३ स्वतःला या धावेवर ठेवण्याच्या महत्त्वावर जोर देताना पौलाने हा सल्ला दिलाः “शर्यतीत धावणारे सर्व धावतात; पण एकालाच पैज मिळते हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्हास ती मिळेल अशी धावा.”—१ करिंथकर ९:२४.
४ प्राचीन खेळात केवळ एकालाच बक्षिस मिळत होते हे खरे. तथापि, जीवनाच्या शर्यतीत मात्र प्रत्येकजण बक्षिस मिळण्याच्या पात्रतेचा ठरू शकतो. पण ती संपेपर्यंत तिजमध्ये टिकून राहणे हे जरुरीचे आहे! पुष्कळांनी आपल्या जीवनाचा अंत होईपर्यंत या शर्यतीत प्रेषित पौलाप्रमाणेच टिकाव धरून ठेवला हे आनंदाचे आहे. आणि लाखो जण अद्याप या शर्यतीत धावत आहेत. परंतु, काहींनी ती रेषा गाठेपर्यंत आपली प्रगति करण्यात पुढे मजल मारली नाही. उलटपक्षी, त्यांनी इतर गोष्टींना आपल्या मार्गात अडथळा बनवले आणि यामुळे एकतर ते या शर्यतीतून बाहेर पडले किंवा काही मार्गाने ते धावण्यास अपात्र ठरले. (गलतीकर ५:७) या गोष्टीमुळे, आम्हाला, जीवनाच्या शर्यतीत आपण कसे धावत आहोत याबद्दल विचार करण्यास कारण दिले पाहिजे.
५. पौल जीवनाच्या शर्यतीची तुलना स्पर्धक खेळाशी करीत होता का? विवेचीत करा.
५ असा प्रश्न विचारला जाऊ शकतोः “पैज एकालाच मिळते” असे पौलाने जे म्हटले त्यावेळी त्याच्या मनात काय असावे? आपण आधीच पाहिले त्याप्रमाणे जे जीवनाच्या शर्यतीत उतरले आहेत त्यापैकीच्या केवळ एकासच सार्वकालिक जीवनाचे बक्षिस मिळेल हा त्याच्या म्हणण्याचा मुळीच अर्थ नव्हता. ते तसे असू शकणार नाही. कारण वेळोवेळी त्याने, सर्व लोकांचे तारण व्हावे अशी देवाची इच्छा आहे हे दाखवून दिले. (रोमकर ५:१८; १ तीमथ्य २:३, ४; ४:१०; तीतास २:११) नाही, जीवनाची शर्यत ही स्पर्धात्मक असून त्यातील प्रत्येक जण इतरांना मागे टाकण्याचा प्रयत्न करतो असे तो म्हणत नव्हता. करिंथकरांना ही चांगली कल्पना होती की, इस्थमियन खेळात भाग घेणाऱ्या खेळाडूत अशी स्पर्धक वृत्ती होती. हा खेळ सध्याच्या ऑलिम्पिक स्पर्धेपेक्षा त्या काळी दर्जेदार होता असे मानले जाते. तर मग, पौलाच्या मनात काय असावे?
६. धावक व शर्यत याबद्दल पौलाची चर्चा कशाबद्दल होती हे संदर्भ कसे दाखवतो?
६ धावकाचे उदाहरण देण्यामध्ये पौल मूलभूतरित्या तारणासाठी स्वतःच्या संभाव्यतेबद्दलची चर्चा करीत होता. आधीच्या वचनात, त्याने, परिश्रम केल्याचे व खूप कष्ट घेतल्याचे कळवले आहे. (१ करिंथकर ९:१९-२२) मग, तो २३व्या वचनात म्हणालाः “मी सर्व काही सुवार्तेकरिता करतो. यासाठी की मी इतरांबरोबर तिचा अंशभागी व्हावे.” आपल्याला प्रेषित म्हणून निवडले आहे किंवा इतरांना प्रचार करण्यात त्याने खूप वर्षे घालवली आहेत म्हणून आपल्याला तारणाची हमी आहे असे नाही, हे त्याला जाणवले होते. वस्तुतः सुवार्तेच्या आशीर्वादात सहभागी होण्यासाठी सुवार्तेसाठी त्याला जे काही करता येणे शक्य आहे ते त्याने करायचे चालू ठेवण्यास हवे होते. आपण जिंकणार या आत्मविश्वासाने, इस्थमियन शर्यतीत पायी धावणाऱ्यांसारखे परिश्रम घेत त्याला पुढे जायचे होते. मगच, त्याला ‘पैज मिळणार होती.’—१ करिंथकर ९:२४अ.
७. “तुम्हास ती [पैज] मिळेल अशी धाव”ण्यात कशाची गरज आहे?
७ याकडून आपल्याला खूप काही शिकता येते. शर्यतीत भाग घेणाऱ्या सर्वांनाच जिंकण्याची इच्छा असली तरी ज्यांनी जिंकण्याचा पण घेतला आहे अशांनाच ती शक्यता आहे. यासोबतच, आपण शर्यतीत सामील आहोत म्हणून आत्मसंतुष्ट नसावे. ‘आपण सत्यात आहो,’ म्हणून सर्वकाही चांगले होईल असे आम्हास वाटू देऊ नये. आपणाला आपण ख्रिस्ती म्हणत असू, पण ख्रिस्ती आहोत हे सिद्ध करण्यासाठी काही सत्त्व आपल्याकडे आहे का? उदाहरणार्थ, एका ख्रिश्चनाने जे काही केले पाहिजे ते म्हणजे, ख्रिस्ती सभांना हजर असणे, क्षेत्रकार्यात सहभागी होणे इत्यादि आपण करतो का? जर होय, तर ते प्रशंसनीय आहे, आणि अशा चांगल्या सवयामध्ये आपण जडून राहिले पाहिजे. पण, आपण जे करीत आहोत त्यापासून अधिक लाभ उचलणे शक्य आहे का? उदाहरणार्थ, सभांमध्ये अभिप्राय मांडण्याची आपली नेहमीच तयारी असते का? जे शिकतो ते आपल्या व्यक्तिगत जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करतो का? आपण आपली कुशलता वाढविण्याकडे लक्ष देतो का की, ज्यामुळे क्षेत्रात अडथळा सामोरा आला तरी देखील आपल्याला कसून साक्ष देता येईल? आस्थेवाईक लोकांना पुनर्भेटी देण्याचे व पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याचे आव्हान आम्ही स्वीकारतो का? “तुम्हास ती [पैज] मिळेल अशी धावा,” असा पौलाचा सल्ला आहे.—१ करिंथकर ९:२४ब.
सर्व बाबतीत संयम राखा
८. पौलाला आपल्या सह ख्रिश्चनांना ‘सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन’ करण्याचे विचार लिहिण्यात कशामुळे चालना मिळाली असावी?
८ आपल्या जीवनमानात पौलाने पुष्कळांना या जीवनाच्या शर्यतीत मंद झाल्याचे, तिजपासून दूर गेल्याचे किंवा ती सोडून दिल्याचे बघितले. (१ तीमथ्य १:१९, २०; इब्रीयांस २:१) याकरताच तर त्याने आपल्या सह ख्रिश्चनांना, ते खूप मेहनती व सातत्याच्या शर्यतीत आहे याचे वारंवार स्मरण दिले. (इफिसकर ६:१२; १ तीमथ्य ६:१२) त्याने धावकाचे उदाहरण आणखी पुढे नेऊन असे म्हटलेः “प्रत्येक मल्लयुद्ध करणारा सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करितो.” (१ करिंथकर ९:२५अ) असे म्हणताना पौल, करिंथकरांना माहीत असलेल्या गोष्टीची समांतरता घेत होता. इस्थमियन खेळात स्पर्धकांना घ्यावी लागणारी कठोर तालीम ही ती गोष्ट होती.
९, १०. (अ) इस्थमियन खेळातील स्पर्धकांचे वर्णन एक साहित्य कसे देते? (ब) या वर्णनातील कोणती गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे?
९ स्पर्धकांना जी तालीम मिळत असे त्याचे सविस्तर वर्णन असे आहेः
“दहा महिन्याच्या कालावधीत मिळणाऱ्या शिक्षणामध्ये सर्व नियम व प्रतिबंध यासाठी तो कोणतीही तक्रार न करता संतुष्टतेने राजी होत होता. कारण या शिक्षणाशिवाय त्याला स्पर्धा करता येणे शक्य नव्हते . . . तो त्याचे कष्ट, थकवा आणि उपासमार या सगळ्यांचा अभिमान बाळगतो. त्याच्या यशाची संभाव्यता यत्किंचितही डावलून लावू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून अत्यंत काटेकोरपणे दूर राहण्यामध्ये त्याला मोठा अभिमान वाटतो. तो शारीरिक व्यायाम करताना होणाऱ्या जोरजोराच्या श्वासोच्व्छसामध्ये इतरांना खाण्यात दंग झालेले, आंघोळीचा आनंद घेत असलेले, सुखविलासात बुडालेले बघतो; पण याची तणिक इर्षा त्याला वाटते, कारण त्याचे मन बक्षिसाकडे लागलेले आहे, आणि त्यासाठी असणारी ही खडतर तालीम अनिवार्य आहे. या खडतर शिक्षणापासून थोडीशी उसंत त्याने घेतली तर त्याची संधि हुकणार हे त्याला चांगले माहीत आहे.”—द एक्स्पोझिटर्स बायबल, खंड ५, पृ. ६७४.
१० स्वत्यागाचा हा खडतर जीवनक्रम शिक्षण घेणाऱ्यासाठी ‘मोठ्या अभिमानाची गोष्ट’ आहे ही येथे लक्षवेधी बाब आहे. दुसरे लोक जो आराम व सुखविलास अनुभवतात त्याची याला मुळीच “ईर्ष्या वाटत नाही.” यापासून आपल्याला काही धडा घेता येईल का? होय. निश्चितपणे!
११. जीवनाच्या शर्यतीत गुंतलो असता आपण कोणते अयोग्य दृष्टिकोण दूर केले पाहिजेत?
११ येशू जे म्हणाला होता ते आठवा की, “नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आत जाणारे बहुत आहेत. जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे, आणि ज्यांस तो सापडतो ते थोडके आहे.” (मत्तय ७:१३, १४) तुम्ही ‘संकोचित मार्गाने’ चालला असता दुसऱ्या मार्गाने जाणाऱ्यांना जी मोकळीक व स्वस्थता मिळते तिच्याबद्दल तुम्हाला इर्ष्या वाटते का? इतर जे काही करतात ते तितके वाईट असे नाही, त्याचा अनुभव घेण्यापासून आपण वंचित झालो आहोत असे तुम्हाला वाटायला लागते का? आपण हा जो शिक्षणक्रम घेत आहोत त्यामागील कारण लक्षात ठेवण्यात अपयशी झालो तर आपल्याला ते अगदी सहजपणे वाटायला लागते. “ते नाशवंत मुगूट मिळविण्यासाठी असे करतात; आपण तर अविनाशी मुगूट मिळविण्यासाठी करितो,” असे पौलाने म्हटले.—१ करिंथकर ९:२५ब.
१२. लोकांनी मिळवलेले गौरव व किर्ती या गोष्टी इस्थमियन खेळात दिल्या जाणाऱ्या कोमेजणाऱ्या मुकूटासारख्या आहेत असे का म्हणता येते?
१२ इस्थमियन खेळात विजय मिळवणाऱ्याला इस्थमियन पाईन वृक्षाचा किंवा इतर कोणत्याही वनस्पतींच्या फुलांची माळ मिळत असे, जी काही दिवस वा आठवड्यांपर्यंत राहात असे. अर्थात या कोमेजणाऱ्या फुलांच्या प्राप्तीस्तव तो स्पर्धक खेळत नव्हता, तर विजयामुळे मिळणारा सन्मान, गौरव व किर्ती यासाठी तो झटत होता. एक उगम सांगतो की, हा विजेता घरी परतल्यावर त्याचे शौर्य गाजवणारा पुरुष असे स्वागत होत असे. त्याच्या विजयाच्या मिरवणूकीसाठी वाट मिळावी म्हणून शहरातील भिंती पाडल्या जात आणि त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ पुतळे उभारले जात. तथापि, एवढे सर्व होत होते तरी, त्याचे वैभव क्षणभंगूर होते. आज तर खूपच कमी लोकांना, त्या काळी कोणी शौर्य गाजवले होते त्यांची नावे माहीत असतील; आणि पुष्कळांना तर त्यांचे काही विशेष वाटत नाही. यास्तव, जे आपला वेळ, शक्ती, आरोग्य व शिवाय कौटुंबिक सुखाचा त्याग करून या जगात सत्ता, किर्ती व श्रीमंती मिळवतात; पण ज्यांनी देवासोबत आपले ऐश्वर्य राखले नाही, अशा सर्वांना, त्यांचा हा जडवादी “मुकूट” त्यांच्या जीवनाप्रमाणेच नष्ट होत आहे हे दिसेल.—मत्तय ६:१९, २०; लूक १२:१६-२१.
१३. जीवनाच्या शर्यतीत भाग घेणाऱ्याचे जीवनाक्रमण एखाद्या स्पर्धकापेक्षा कसे भिन्न आहे.
१३ स्पर्धकांच्या खेळात भाग घेणारे वर वर्णिलेल्या खडतर तालमीचा सराव घेत असतील, पण थोड्या काळासाठी. एकदा स्पर्धा संपली की, ते पुन्हा आपल्या नित्य दिनचर्येकडे वळतात. आपली कुशलता राखून ठेवण्यासाठी ते अधूनमधून तालीम घेतील, पण खडतर स्व-त्यागाचे तेच मार्गाक्रमण पुन्हा अनुसरू इच्छिणार नाहीत. तथापि, हे जीवनाच्या शर्यतीबद्दल खरे नाही. त्यात भाग घेणाऱ्यांनी तालीम व स्व-त्याग जीवनभर राखला पाहिजे.—१ तीमथ्य ६:६-८.
१४, १५. जीवनाच्या शर्यतीत भाग घेणाऱ्याने सतत संयम का बाळगला पाहिजे?
१४ “कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असल्यास,” येशू आपल्या शिष्यांना व जमलेल्या इतर लोकांना म्हणाला, “त्याने आत्मनिग्रह [किंवा, “त्याने स्वतःला ‘नको,’ असे म्हणावे,” चार्लस् बी. विल्यम यांचे भाषांतर] व आपला वधस्तंभ घेऊन मला [“सतत,” न्यू.व.] अनुसरावे.” (मार्क ८:३४) आपण हे निमंत्रण स्वीकारतो तेव्हा ते “सतत” करण्याची आपली तयारी असली पाहिजे, स्व-त्यागामुळे काही लाभ मिळणार आहेत म्हणून नव्हे तर, एका क्षणाचा असमंजसपणा, चांगला निर्वाळा घेण्यात एखादी चूक ही जे काही उभारण्यात आले ते सर्व गमावू शकते आणि आपले चिरकालिक कल्याण धोक्यात आणू शकते. आध्यात्मिक प्रगति ही सहसा हळूवारपणे केली जाते, पण आपण सतत दक्षता राखली नाही तर ती प्रगति किती लवकर लय पावू शकते!
१५ याशिवाय, पौलाने, आपण “सर्व गोष्टीत” संयम बाळगावा असे आर्जविले. याचा अर्थ, तो संयम आपण जीवनाच्या सर्व क्षेत्रात बाळगण्यास हवा. याला चांगला अर्थ आहे, कारण एखादा प्रशिक्षार्थी चैन करीत राहिला किंवा स्वैराचारीपणे जगत राहिला तर तो घेत असलेले शारीरिक श्रम व यातना यांना काय अर्थ उरतो? अशाचप्रकारे, आपण जीवनाच्या शर्यतीत असता, सर्व बाबतीत संयम बाळगला पाहिजे. कोणी व्यक्ती कदाचित मद्यपान व व्यभिचारीपणा यात संयम राखील पण तो गर्विष्ठ व भांडखोर राहिला तर त्या संयमाचे मोल उरत नाही. कदाचित तो इतरांच्या बाबतीत सहनशील व दयाळू असेल, पण आपल्या खाजगी जीवनात काही गुप्त पापाचरण आचरीत असेल तर काय? संयमामुळे खराच लाभ व्हावयाचा आहे तर तो “सर्व गोष्टीत” आचरला गेला पाहिजे.—पडताळा याकोब २:१०, ११.
‘अनिश्चितपणे धावत राहू नका’
१६. “अनिश्चितपणे धावत नाही,” या संज्ञेचा काय अर्थ होतो?
१६ जीवनाच्या शर्यतीत यशस्वी होण्यासाठी परिश्रमांची जी शिकस्त करावी लागते ते पाहता, पौल पुढे म्हणालाः “मीही तसाच धावतो; म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तशी कुस्तीही करतो; म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्र्हार करीत नाही.” (१ करिंथकर ९:२६) “अनिश्चित” या शब्दाचा शब्दशः अर्थ, “अस्पष्ट,” (किंग्डम इंटरलिनियर) “न दिसण्याजोगा,” (लँजे यांचे विवेचन) असा होतो. अशाप्रकारे, “अनिश्चितपणे धावत नाही,” याचा अर्थ, प्रत्येक प्रेक्षकाला तो धावक कोणत्या दिशेने धावत आहे हे स्पष्ट दिसले पाहिजे. द अँकर बायबल ही संज्ञा “नागमोडी वळणे घेत नव्हे,” अशी देते. तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यालगत पावलांच्या ठशांचे निरिक्षण केले व हे दिसले की, हे ठसे वेळोवेळी वळणे घेत आहेत, कधी कधी तर मागेही जात आहेत, तर तो माणूस धावत होता अशी कल्पनाही मुळी तुम्हाला येणार नाही, आणि तो निश्चितपणे कोठेही जात नव्हता. पण तेच तुम्ही ठशांच्या सरळ रांगा बघितल्या प्रत्येक ठसा हा मागच्या ठशाच्या समांतर पुढे आहे व त्यामध्ये सारखे अंतर आहे तर हे ठसे एका निश्चित ठिकाणाकडे जाणाऱ्या माणसाचे आहेत हे तुम्ही निर्विवादपणे सांगू शकता.
१७. (अ) पौलाने, तो “अनिश्चितपणे धावत नाही” हे कसे दाखवले? (ब) याबाबतीत आम्हाला पौलाचे कसे उदाहरण अनुसरता येईल?
१७ पौल ‘अनिश्चितपणे धावत नव्हता’ हे त्याच्या जीवनाद्वारे स्पष्ट दिसते. तो ख्रिस्ती सेवक व प्रेषित आहे हे दाखवण्याजोगा भरपूर पुरावा त्याच्याकडे होता. त्याचे एकच उद्दिष्ट होते व ते मिळवण्यासाठी त्याने जीवनभर सतत प्रयत्न केले. त्याला किर्ती, सत्ता, श्रीमंती किंवा आराम मिळवता आला असता पण यामुळे तो विचलित झाला नाही. (प्रे. कृत्ये २०:२४; १ करिंथकर ९:२; २ करिंथकर ३:२, ३; फिलिप्पैकर ३:८, १३, १४) तुम्ही तुमच्या जीवनाकडे मागे वळून बघितल्यास तुम्हाला कोणता मार्ग दिसतो? ती सरळ रेषा दिसते की, निरर्थकपणे भटकणारी व वळणे घेणारी रेषा? तुम्ही जीवनाच्या शर्यतीत पुढे जात आहात याचा काही पुरावा दिसतो का? आपण या शर्यतीत, निरर्थकपणे काही करता यावे म्हणून आलो नाही, तर ती पूर्ण करावी यासाठी उतरलो आहो हे लक्षात असू द्या.
१८. (अ) आपण “वाऱ्यावर मुष्टिप्र्हार करीत” आहोत याची तुलना कशासोबत होऊ शकते? (ब) हे घातक का आहे?
१८ पौलाने आणखी एका खेळाची समांतरता घेऊन पुढे म्हटलेः “तशी कुस्तीही करितो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्र्हार करीत नाही.” (१ करिंथकर ९:२६ब) जीवनासाठी असलेल्या आपल्या स्पर्धेत आपल्याला खूप शत्रू आहेत; यात सैतान, हे जग आणि आमची स्वतःची अपूर्णता याही गोष्टी येतात. प्राचीन काळच्या कुस्तीगिराप्रमाणे आपण यांना नेम धरुन गुद्दे लगावले पाहिजे. या लढतीत यहोवा देव आम्हाला तालीम देतो व मदत करतो हे आनंदाचे आहे. तो, त्याचे वचन, पवित्र शास्त्राधारीत प्रकाशने आणि ख्रिस्ती सभांच्याद्वारे आपल्याला सूचना देत असतो. आपण पवित्र शास्त्र वाचत राहिलो, सभांना जात राहिलो आणि जे शिकतो ते आचरणात आणले नाही तर आम्ही आमचे प्रयत्न निरर्थक घालवीत नाही का, म्हणजे “वाऱ्यावर मुष्टिप्र्हार करीत” नाही का? असे होत असल्यास आपल्याला खूप धोका आहे. आपल्याला वाटत राहते की, आपण लढत देत आहोत व त्याद्वारे सुरक्षिततेचा आभास देखील वाटत राहतो, पण खरे पाहता आम्ही आमच्या शत्रूंना पराजित करीत नसतो. या गोष्टीबद्दलचा सल्ला शिष्य याकोबाने दिला आहे. तो म्हणतोः “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा; केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुमची भुलवणूक होते.” “वाऱ्यावर मुष्टिप्र्हार” केल्यामुळे आमच्या शत्रूंना तडाखा बसणार नाही, तसेच “केवळ ऐकणारे” असल्यामुळे आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहोत याची खात्री होऊ शकणार नाही.—याकोब १:२२; १ शमुवेल १५:२२; मत्तय ७:२४, २५.
१९. आपण अपात्र ठरत नाही याबद्दल कशी खात्री राखू शकतो?
१९ शेवटी, पौलाने आपल्या यशाचे हे गूज प्रकट केलेः “मी आपल्या शरीराला बुकलून त्यास दास करून ठेवितो; असे न केल्यास मी दुसऱ्यांस घोषणा केल्यावर कदाचित मीच अपात्र ठरेन.” (१ करिंथकर ९:२७) आपल्या शरीराला आपणावर धनी बनण्यास मुभा देण्याऐवजी पौलाप्रमाणे आपणही त्याच्यावर प्रभूत्व मिळवले पाहिजे. सर्व शारीरिक प्रवृत्त्या, आकांक्षा व इच्छा मुळासकट उपटून टाकण्यास हव्या. (रोमकर ८:५-८; याकोब १:१४, १५) हे जरा त्रासाचेच वाटेल कारण, “बुकलून ठेवतो” याचा अनुवाद ज्या शब्दापासून आहे त्याचा खरा अर्थ “तडाखा देणे” असा होतो. (किंग्डम इंटरलिनियर) तद्वत, पतित शरीराच्या इच्छेपुढे नमते घेऊन मरण्यापेक्षा जणू डोळ्यालाच तडाखा देऊन मिळणाऱ्या असाहाय्य स्थितीत जीवन जगणे हे तितके बरे नव्हे का?—पडताळा मत्तय ५:२८, २९; १८:९; १ योहान २:१५-१७.
२०. जीवनाच्या शर्यतीत आपण आता कसे धावत आहोत याचे परिक्षण करणे हे खासपणे का तातडीचे आहे?
२० आज आपण, धावण्याची शर्यत समाप्त होण्याच्या रेषेजवळ आलो आहोत. बक्षिसे देण्याची वेळ आली आहे. अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी हे बक्षिस “ख्रिस्त येशूमध्ये देवाचे . . . वरील पाचारण” आहे. (फिलिप्पैकर ३:१४) मोठ्या लोकसमुदायाच्या लोकांना ते बक्षिस नंदनवन बनलेल्या पृथ्वीवरील चिरकालिक जीवन हे आहे. आता परिस्थिती इतकी पणाला लागली असल्यामळे आपणही, पौलाप्रमाणेच हा निर्धार राखू या की, आपण ‘अपात्र ठरु नये.’ आपण सर्वांनीच ही आज्ञा स्वतःला लावावी की, ‘तुम्हास ते [बक्षिस] मिळेल असे धावा.’—१ करिंथकर ९:२४, २७.
तुम्हास आठवते का?
◻ ख्रिश्चनाच्या जीवनाची तुलना एका शर्यतीसोबत करणे का योग्य आहे?
◻ जीवनाची शर्यत ही धावण्याच्या शर्यतीपेक्षा कशी वेगळी आहे?
◻ आपण सतत व “सर्व गोष्टीत” संयम का बाळगण्यास हवा?
◻ एखादा “अनिश्चितपणे धावत नाही” हे कसे दिसू शकेल?
◻ “वाऱ्यावर मुष्टिप्र्हार करीत” राहणे हे का धोकादायक आहे?
[१६ पानांवरील चित्रं]
विजेत्याचा मुकूट तसेच त्याचे गौरव व सन्मान या गोष्टी कोमेजणाऱ्या आहेत