वाचकांचे प्रश्न
काही पवित्र शास्त्रीय आवृत्त्यांमध्ये एकशृंगीय वनचरांचा उल्लेख आला आहे, त्यास पवित्र शास्त्र आधार देते का?
किंग जेम्स, डुए व इतर काही भाषांतरे अशा एकशृंगीय वनचरांचा उल्लेख करतात. पण असे आधुनिक भाषांतराबद्दल आढळत नाही, जे इब्री भाषेनुसारची अचूक माहिती देतात.—स्तोत्रसंहिता २२:२१; २९:६; ९२:१० (२१:२२; २८:६; ९१:११, डुए).
कित्येक शतके एक दंतकथा होती की, एक असा प्राणी आहे ज्याचे शरीर व डोके घोड्याचे, पण पाय मात्र हरिणाचे आणि शेपूट सिंहासारखे आहे. या दंतकथीय प्राण्याचे लक्षवेधी वैशिष्ट्य त्याच्या कपाळावरील वाकलेले एकच शिंग हे आहे.a
“एकशृंगीय प्राण्याचे शिंग हे विषाला प्रतिरोध असणारी औषधी राखून होते असा लोकांचा विश्वास होता, त्यामुळे मध्ययुगीन काळात अशा शिंगापासून तयार करण्यात आलेली पूड खूपच मोठ्या किंमतीत मिळत असे. एकशृंगीय प्राण्याचे चित्र हे गेंड्याबद्दल युरोपियनांच्या कथेतून उद्भवले असे पुष्कळ प्रामाण्यांचे मत आहे.” (द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ) काही अश्शुरी व बाबेलच्या स्मारकात एकशृंगीय प्राण्यांचे चित्र दाखवण्यात आले आहे. ते आता काळवीट, वनबकरा, गाई आणि बैलांच्या प्रतिमा असून त्या एकच शिंग दिसू शकेल अशा पद्धतीने चितारलेल्या आहेत असे ओळखण्यात आले आहे.
हे पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना मोठे मनोरंजक आहे, कारण शास्त्रवचनात एका अशा प्राण्याचा नऊ वेळा उल्लेख करण्यात आला आहे ज्याला रिʹएमʹ असे इब्री भाषेत म्हणण्यात आले. (गणना २३:२२; २४:८; अनुवाद ३३:१७; ईयोब ३९:९, १०; स्तोत्रसंहिता २२:२१; २९:६; ९२:१०; यशया ३४:७) हा कोणता प्राणी आहे याबद्दल भाषांतरकार बऱ्याच काळापासून अनिश्चित होते. ग्रीक सेप्ट्युजंटने रिʹएमʹचा अर्थ ‘एका शिंगाचे’ किंवा एकशृंगीय असा दिला आहे. लॅटिन व्हलगेटने त्याचे भाषांतर गेंडा असे दिले आहे. इतर भाषांतरे ‘रानबैल,’ ‘जंगली पशु’ किंवा ‘म्हैस’ असा शब्दप्रयोग देतात. रॉबर्ट यंगने आपल्या भाषांतरात “रिम” असे तंतोतंत शब्द लिहिले त्यामुळे वाचकाला अज्ञानात टाकले आहे.
तथापि, आधुनिक प्रामाण्यांनी रिʹएमʹबद्दल असणारा बहुतेक गोंधळ संपुष्टात आणला आहे. कोशकार लूटवीक कोएलेर तसेच वाल्टर बाउमगार्टनर यांनी दाखविले की, त्याचा साधा अर्थ “रानबैल” असा होतो व याची वैज्ञानिक ओळख बॉस् प्रिमिजेनियस अशी देता येते. ही “खूर असलेल्या सस्तन प्राण्यामधील मोठे शिंग असलेली एक जात” आहे. द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटेनिका स्पष्टता देतेः
“जुन्या कराराच्या काव्यमय भाषेत एका बळकट व भरदार शिंग असलेल्या प्राण्याचे वर्णन आहे, ज्याला रिʹएमʹ म्हटले आहे. याचे कित्येक आवृत्यांमध्ये ‘एकशृंगीय’ किंवा ‘गेंडा’ असे भाषांतर दिलेले आहे, पण पुष्कळ आधुनिक भाषांतरे ‘रानबैल’ हा शब्द पसंत करतात, व तो रिʹएमʹ या इब्री शब्दाचा अचूक अर्थ देतो.”
“बैल” या शब्दामुळे नर असा अर्थ संबोधित असल्यामुळे द न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स रिʹएमʹ याचे भाषांतर सतत “रानबैल” असे देते. ही जात १७ व्या शतकात लुप्त झाल्याचे दिसते, पण शास्त्रज्ञांचे अनुमान आहे की, तो दंतकथेतील एकशृंगीय प्राण्यापेक्षा वेगळाच असावा. त्या प्राचीन रानबैलाचे शरीर १.८ मीटर उंच, आणि ३ मीटर लांब होते. त्याचे वजन सुमारे ९०० किलोग्राम असावे, आणि त्याच्या दोन शिंगांपैकीचे प्रत्येक ७५ सेंटिमीटर्स लांब असावे.
हे पवित्र शास्त्रात रिʹएमʹबद्दल किंवा रानबैलाबद्दल जे वर्णन आहे त्याजशी जुळणारे आहे. तो त्याचे बळ व हट्टीपणा (ईयोब ३९:१०, ११) तसेच चपळपणा (गणना २३:२२; २४:८) याबद्दल नावाजलेला होता. त्याला दंतकथेतील एकशृंगीय प्राण्याप्रमाणे एक नव्हे तर दोन शिंगे होती हे स्पष्ट आहे. मोशेने त्याच्या दोन शिंगांचा, योसेफाच्या दोन मुलांपासून जी दोन सामर्थ्यशाली कुळे उद्भवणार होती त्याचे वर्णन करताना उल्लेख केला.—अनुवाद ३३:१७.
यास्तव, दंतकथेत प्रसिद्ध झालेल्या एकशृंगीय प्राण्याच्या कल्पनेला पवित्र शास्त्र आधार देत नाही. ते पवित्र शास्त्र काळी अस्तित्वात राहिलेल्या व अर्वाचीन काळापर्यंत हयात होता त्या प्रचंड रानबैलाचे मर्यादित पण अचूक व भरीव चित्र देते.
[तळटीपा]
a प्राध्यापक पॉल हाउप्ट स्पष्टीकरण देतातः ‘मध्ययुगीन काळातील संग्रह करण्यात आलेले गेंड्याचे शिंग तसेच उत्तर ध्रुवाजवळील समुद्रातील जलचर (ज्याला युनिउर्न मासा किंवा युनिउर्न व्हेल म्हणतात) याचा सुळका हा एकशृंगीय प्राण्याचे शिंग म्हणून ओळखला जातो.’