अध्याय ३५
मोठ्या बाबेलवर दंडाज्ञा बजावणे
१. किरमिजी रंगाच्या श्वापदाचे वर्णन देवदूत कसे देतो व प्रकटीकरणातील चिन्ह समजण्यास कोणत्या प्रकारच्या ज्ञानाची गरज आहे?
प्रकटीकरण १७:३ मधील किरमिजी रंगाच्या श्वापदाबद्दलचे वर्णन केल्यानंतर देवदूत योहानाला पुढे सांगतो: “येथे ज्ञानवंत मनाचे काम आहे. ती सात डोकी म्हणजे सात डोंगर आहेत; त्यांवर ती स्त्री बसली आहे आणि ती डोकी म्हणजे सात राजे आहेत, त्यापैकी पाच पडले आहेत, एक आहे आणि एक अद्याप आला नाही; तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल.” (प्रकटीकरण १७:९, १०) देवदूत येथे वरुन येणाऱ्या ज्ञानाची माहिती देत आहे, ज्या ज्ञानानेच प्रकटीकरणातील चिन्हांची समज प्राप्त होऊ शकते. (याकोब ३:१७) हेच ज्ञान योहान वर्गास व त्यांच्या साथीदारांना आम्ही ज्या काळात जगत आहोत त्याचे गांभीर्य स्पष्ट करून देते. आता पूर्ण होण्याच्या बेतात असलेल्या यहोवाच्या न्यायदंडाबद्दल ते भाविक हृदयात गुणग्राहकता निर्माण करते व यहोवाची सुदृढ भीती बिंबवते. जसे नीतीसूत्रे ९:१० म्हणते: “परमेश्वराचे [यहोवा NW] भय ज्ञानाचा आरंभ होय आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय.” हे ईश्वरी ज्ञान श्वापदाबद्दल आम्हास काय प्रकटविते?
२. किरमिजी रंगाच्या श्वापदाच्या सात डोक्यांचा काय अर्थ आहे व कशा रितीने ‘पाच पडले, एक आहे’?
२ त्या विक्राळ श्वापदाची सात डोकी, सात “डोंगर” किंवा सात “राजे” यांना सूचित करतात. शास्त्रवचनात दोन्हीही संज्ञाचा उपयोग राजकीय सत्तांना सूचित करण्यासाठी केला आहे. (यिर्मया ५१:२४, २५; दानिएल २:३४, ३५, ४४, ४५) बायबलमध्ये सहा जागतिक साम्राज्य: मिसर, अश्शूर, बाबेल, मेद-पारस, ग्रीस व रोम यांनी देवाच्या लोकांवर आपला प्रभाव पाडला असा उल्लेख आहे. ह्यातील पाच, योहानाला प्रकटीकरण मिळण्याच्या काळापर्यंत येऊन गेले होते; पण रोम अजूनही जागतिक साम्राज्य म्हणून ओळखले जात होते. यास्तव, त्यासंबंधाने जे म्हटले की, “पाच पडले आहेत, एक आहे” ते अगदी योग्य ठरले. पण जो “अद्याप आला नाही” त्याबद्दल काय?
३. (अ) रोमी साम्राज्य कसे विभागले गेले? (ब) पश्चिमी जगात कोणता बदल घडला? (क) पवित्र रोमी साम्राज्याला कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे?
३ योहानाच्या दिवसानंतरही रोमी साम्राज्य शंभर वर्षाहून अधिक दिवस टिकले. सा. यु. ३३० मध्ये कॉन्स्टंटाईन सम्राटाने आपली रोममधील राजधानी बायजेंटीयम येथे हलविली व त्याला कॉन्स्टँटिनोपल म्हणून दुसरे नाव दिले. सा. यु. ३९५ मध्ये रोमी साम्राज्य पूर्व व पश्चिम भागात विभागले. सा. यु. ४१० मध्ये, अलारीक, विझीगोत (जर्मनीतील एक जात जे ॲरीयन दर्जाचे “ख्रिस्ती” झाले) याचा राजा याच्या हाती पडले. जर्मनीच्या जातींनी (जे “ख्रिस्ती” आहेत) स्पेन व उत्तर आफ्रिकेतील रोमचा भाग जिंकला. युरोपमध्ये काही शतकांसाठी क्रांती, चकमकी व फेरफार घडत होता. पश्चिमात पुष्कळ प्रसिद्ध सम्राट उदयास आले. जसे की, चार्लमॅग्ने, ज्याने ९ व्या शतकात पोप लिओ तिसरे यांच्या सोबत मित्रत्वाचे संबंध जोडले व फ्रेड्रिक दुसरे यांनी १३ व्या शतकात राज्य केले. पण पवित्र रोमी साम्राज्य म्हटलेले त्यांच्या हुकूमाखाली असणारे राज्य, पूर्वीच्या रोमी साम्राज्याच्या कळसाहून फार लहान होते. हे नवे साम्राज्य असण्यापेक्षा फक्त त्या पुरातन साम्राज्याचे पुढे चालवणे किंवा पुनर्स्थापन होते.
४. पूर्वेकडील साम्राज्यांनी कोणते यश प्राप्त केले पण उत्तर आफ्रिका, स्पेन व सिरिया या पुरातन रोमच्या भागांचे काय झाले?
४ कॉन्स्टँटिनोपलच्या मध्यभागी, पूर्वीय रोमी साम्राज्याने पाश्चिमात्य रोमी साम्राज्याचे पुष्कळ वाईट संबंध सहन केले. सहाव्या शतकात, जस्टीनियन पहिला हा उत्तर आफ्रिकेचा बराचसा भाग पुन्हा एकदा जिंकू शकला व त्याने स्पेन आणि इटलीमध्येही हस्तक्षेप केला. सातव्या शतकात जस्टीनियन दुसरा याने साम्राज्य म्हणून स्लाविक नावाच्या जमातीने जिंकलेले मासेदोनियाचे काही भाग परत मिळविले. तथापि, आठव्या शतकापर्यंत उत्तर आफ्रिका, स्पेन व सिरियातील पुरातन रोमचे पूर्वीचे क्षेत्र इस्लामच्या नव्या साम्राज्याखाली आले आणि अशा तऱ्हेने ते कॉन्स्टँटिनोपल व रोमच्या ताब्यातून निसटले.
५. जरी रोमी शहर सा. यु. ४१० मध्ये पडले, तरी जागतिक दृश्यातून राजनैतिक रोमी साम्राज्याच्या खूणा निघून जाण्यास पुष्कळ शतके कशी लागली?
५ कॉन्स्टँटिनोपलचे शहर काय ते काही काळासाठी टिकले. पर्शीया, अरब, बल्गर्स् व रशिया यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांतून वाचले व सरतेशेवटी १२०३ मध्ये ते पडले—मुस्लिमांच्या नव्हे पण पाश्चिमात्यातील धर्मयुद्ध करणाऱ्यांच्या हाती पडले. तरीही १४५३ मध्ये ते मुस्लिम ऑटोमनचा राजा मेहमद दुसरा याच्या सत्तेखाली आले आणि लगेचच ऑटोमनची किंवा टर्की साम्राज्याची राजधानी बनले. अशारितीने जरी रोमी शहर सा. यु. ४१० मध्ये पडले, तरी जागतिक दृश्यातून राजनैतिक रोमी साम्राज्याच्या खूणा निघून जाण्यास पुष्कळ शतके लागली. तरीपण, पूर्वेकडील श्रद्धाळू चर्चेसवर व रोमच्या पोपसत्ताक पद्धतींवर आधारित असलेल्या धार्मिक साम्राज्यांवर त्याचा पगडा याकडे सूक्ष्मरितीने पाहिल्यास दिसत होता.
६. कोणते नवे साम्राज्य विकसित झाले व त्यातील कोणते साम्राज्य अति यशस्वी झाले?
६ तरीसुद्धा १५ व्या शतकांपर्यंत, काही राष्ट्रे अगदी नवे साम्राज्य उभारण्याचा प्रयत्न करीत होते. या नव्या साम्राज्य सत्ता, पूर्वी असलेल्या रोमी वसाहतीत स्थापण्यात आल्या, तरी तो रोमी साम्राज्याचा उर्वरित चालणारा भाग नव्हता. पोर्तुगल, स्पेन, फ्रान्स व हॉलंड हे सर्व विस्तृत प्रदेशांच्या जागा बनल्या. पण सर्वात यशस्वी होते ब्रिटन, ज्याने एका प्रचंड साम्राज्यावर अध्यक्षता गाजविली ज्यावर ‘सूर्य कधीच मावळला नाही.’ हे साम्राज्य वेगवेगळ्या वेळी उत्तर अमेरिका, आफ्रिका, भारत आणि दक्षिण आशिया व दक्षिण पॅसिफिक यावर पसरले.
७. दुहेरी जागतिक साम्राज्य कसे अस्तित्वात आले व सातवे ‘डोके’ किंवा जागतिक सत्ता किती काळ टिकेल असे योहानाने सांगितले?
७ १९ व्या शतकापर्यंत तर, उत्तर अमेरिकेच्या काही वसाहती स्वतंत्र अमेरिका बनण्यासाठी ब्रिटनमधून निघाल्या. राजनैतिकरित्या नव्या राष्ट्रात व पूर्वी असलेल्या मायदेशात झगडे चालूच राहिले. तथापि, पहिल्या महायुद्धाने, दोन्ही राष्ट्रांना त्यांचा सार्वजनिक फायदा ओळखण्यास भाग पाडले व त्यांच्यामध्ये खास नातेसंबंध जोडून दिले. अशा तऱ्हेने अमेरिका, सर्वात समृद्ध राष्ट्र आणि ग्रेट ब्रिटन, महान जागतिक साम्राज्याचे आसन यांनी बनलेल्या दोन जागतिक सत्ता अस्तित्वात आल्या. येथे आता, सातवे ‘डोके’ किंवा जागतिक सत्ता आहे ती, शेवटल्या काळात व यहोवाच्या साक्षीदारांची जेथे पहिल्यांदा स्थापना झाली त्यावर राज्य करीत आहे. सहावे ‘डोके’ याच्या दीर्घ कारकिर्दीच्या तुलनेत बघता, देवाचे राज्य, अस्तित्वात असणाऱ्या सर्व राष्ट्रांना नाश करूपर्यंत, सातवे “थोडा वेळ” राहते.
आठवा राजा असे का म्हटले आहे?
८, ९. लाक्षणिक किरमिजी रंगाच्या श्वापदाला योहान कसे संबोधतो आणि हे सातापासून कसे झाले?
८ देवदूत पुढे योहानास सांगतो: “जे श्वापद होते आणि नाही तेच आठवा राजा आहे; तो त्या सातांपासून झालेला आहे आणि तो नाशाप्रत जाणार आहे.” (प्रकटीकरण १७:११) लाक्षणिकरित्या संबोधलेले किरमिजी रंगाचे श्वापद, सातांपासून ‘झालेले आहे’, म्हणजेच, त्याचा जन्म किंवा त्याच्या अस्तित्त्वाबद्दल त्या मूळ ‘श्वापदास . . . समुद्रातून बाहेर’ येणाऱ्यास ते उपकार बद्ध आहे, याची हे किरमिजी रंगाचे श्वापद प्रतिमा आहे. ते कशा रितीने? १९१९ मध्ये अँग्लो अमेरिकन सत्ता वर उंचावणारे डोके होते. अगोदरची सहा डोकी पडली होती व प्रबल जागतिक सत्तेची स्थिती आता दोन डोक्यांकडे गेली होती आणि ते आता त्यावर केंद्रित झाले होते. हे सातवे डोके, जागतिक अधिकारांमधील चालू प्रतिनिधी, लिग ऑफ नेशन्सची स्थापना करण्यात त्याचा सक्रिय भाग होता आणि अजूनही संयुक्त राष्ट्रसंघाचे ते महत्त्वाचा योजनाकार व आर्थिक आधार देणारे आहे. अशाप्रकारे, लाक्षणिकपणे किरमिजी रंगाचे श्वापद—तो आठवा राजा—आरंभाच्या सात डोक्यांमधून “झालेला” आहे. अशा दृष्टिने पाहिल्यावर, तो त्या सातापासून झालेला आहे हे वाक्य आधी प्रकटीकरणात कोकऱ्यासारखी दिसणारी दोन शिंगे असणारे श्वापद (अँग्लो अमेरिकन जागतिक सत्ता, मूळच्या श्वापदाचे सातवे डोके) याने मूर्तीला बनविण्याची गळ घातली व ह्या मूर्तीला जीवन दिले त्याच्याशी जुळणारे आहे.—प्रकटीकरण १३:१, ११, १४, १५.
९ लिग ऑफ नेशन्सच्या आरंभीच्या सभासदात ब्रिटनसहीत ग्रीस, इराण (पर्शीया) व इटली (रोम) ह्या भूतपूर्व सरकारांचा समावेश आहे. पूर्वीच्या सहा जागतिक साम्राज्याचा ताबा असलेल्या क्षेत्रावर आता राज्य करणारी सरकारे ही ओघाओघाने श्वापदाच्या मूर्तीला पाठबळ देणारे सदस्य झाली. या कारणास्तव, किरमिजी रंगाचे श्वापद सात जागतिक साम्राज्यातून उदयास आले असे म्हटले जाऊ शकते.
१०. (अ) किरमिजी रंगाचे श्वापद “आठवा राजा” आहे हे कसे म्हटले जाऊ शकते? (ब) एका रशियन नेत्याने संयुक्त राष्ट्रसंघाला स्वतःचा पाठिंबा कसा दर्शविला?
१० किरमिजी रंगाचे श्वापदच “आठवा राजा” आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे, संयुक्त राष्ट्रसंघाची रचना, ते जागतिक सरकार दिसावे यासारखी करण्यात आलेली आहे. काही वेळा असे झाले की, कोरिया, सीनाई द्विपकल्प, काही आफ्रिकन राष्ट्रे व लेबनान येथे आंतरराष्ट्रीय वाद मिटविण्यासाठी सैन्याला पाठवून त्याने जणू सरकारसारखी कार्यवाही केली. पण ती राजाची फक्त मूर्ती आहे. एका धार्मिक मूर्तीप्रमाणे, ज्यांनी त्याला अस्तित्वात आणले, त्याची भक्ती केली व सामर्थ्य दिले या व्यतिरिक्त त्याला सामर्थ्य वा बळ असे काहीच नाही. वेळ प्रसंगी, हे लाक्षणिक श्वापद फार अशक्त झालेले दिसते; पण त्याने, हुकूमशाहींनी वेढलेल्या सदस्यांकडून लिग ऑफ नेशन्सला अथांग डोहात टाकले जाण्याचा अनुभव मिळवला तसा त्याग याने कधीही अनुभवला नाही. (प्रकटीकरण १७:८) इतर क्षेत्रांमध्ये संपूर्णपणे जहाल मते बाळगत असले तरी एका प्रसिद्ध सोविएत नेत्याने १९८७ मध्ये, संयुक्त राष्ट्रसंघास पाठिंबा देण्यामध्ये रोमच्या पोपची सोबत केली. संयुक्त राष्ट्रसंघावर आधारलेल्या “आंतरराष्ट्रीय निर्भयतेसाठी बहुव्यापी योजना” त्याने पुरस्कृत केली. योहानास लवकरच कळणार आहे त्याप्रमाणे अशी एक वेळ येईल जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघ बऱ्याच मोठ्या अधिकाराने हालचाल करील. मग शेवटी, त्याची वेळ आल्यावर, ते “नाशात जाणार आहे.”
तासाभरासाठी दहा राजे
११. लाक्षणिक किरमिजी रंगाच्या श्वापदाच्या दहा शिंगांबद्दल यहोवाचा देवदूत काय सांगतो?
११ प्रकटीकरणाच्या पूर्वीच्या अध्यायात, सहाव्या व सातव्या देवदूतांनी देवाच्या क्रोधाच्या वाट्या ओतल्या. त्यावेळी आम्हास सांगितले गेले होते की पृथ्वीचे राजे, देवाची लढाई हर्मगिदोनासाठी एकत्रित केले जातील व ‘देवासमोर मोठ्या बाबेल नगरीचे स्मरण करण्यात येईल.’ (प्रकटीकरण १६:१, १४, १९) आता आपण देवाचे न्यायदंड त्याजवर कशारितीने बजावले जाणार आहेत त्याची विस्तृत माहिती शिकणार आहोत. यहोवाचा देवदूत योहानाला पुढे जे सांगतो ते ऐका: “जी दहा शिंगे तू पाहिली ती दहा राजे आहेत, त्यांना अद्यापि राज्य मिळाले नाही; तरी त्यांना श्वापदाबरोबर एक तास राजांच्यासारखा अधिकार मिळतो. ते एकविचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात. हे कोकऱ्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकील कारण तो ‘प्रभूंचा प्रभु आणि राजांचा राजा’ आहे आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत. [तेही विजय मिळवतील, NW]”—प्रकटीकरण १७:१२-१४.
१२. (अ) दहा शिंगे कशास चित्रित करतात? (ब) लाक्षणिक दहा शिंगांना “अद्यापि राज्य मिळाले नाही” ते कसे? (क) लाक्षणिक दहा शिंगांना आता “राज्य” कसे आहे व किती काळासाठी?
१२ ती दहा शिंगे संपूर्ण जगावर सध्या वर्चस्व गाजविणाऱ्या आणि जंगली श्वापदाच्या मूर्तिला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजनैतिक सत्तांना चित्रित करतात. योहानाच्या दिवसात, सध्या अस्तित्वात असणाऱ्या, थोडक्याच राष्ट्रांची ओळख होती. जे होते ते मिसर व पर्शीया (इराण) यांची आज पूर्णपणे वेगळीच राजनैतिक उभारणी आहे. या कारणास्तव, पहिल्या शतकात, “दहा शिंगे” यास ‘अद्यापि राज्य मिळाले नव्हते.’ पण आता प्रभूच्या दिवसांमध्ये त्यांना “राज्य” किंवा राजनैतिक अधिकार मिळाला आहे. महान वसाहती असणारी साम्राज्ये ढासळल्याने, विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतर, पुष्कळ नवी राष्ट्रे उदयास आली. हे सर्व व दीर्घ काळापासून असणाऱ्या सत्ता, यहोवा हर्मगिदोनात सर्व जागतिक राजनैतिक अधिकारांचा अंत करण्याच्या आधी श्वापदासोबत—थोड्याच वेळासाठी—‘फक्त तासभर’ राज्य करतील.
१३. कशारितीने ती दहा शिंगे ‘एकविचाराची’ आहेत व हे, कोकऱ्याबद्दल ठामपणे कोणती प्रवृत्ती असल्याची खात्री देते?
१३ आज ह्या दहा शिंगांना प्रवृत्त करणारी बलवान शक्ती म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. देवाच्या राज्याचा स्वीकार करण्यापेक्षा त्यांची राष्ट्रीय प्रभुसत्ता टिकवण्याच्या प्रयत्नात ते ‘एकविचारी’ आहेत. लिग ऑफ नेशन्स व संयुक्त राष्ट्रसंघाला आपली मान्यता दाखविण्यामध्ये त्यांचा हाच हेतू होता की,—जागतिक शांती टिकवण्याचा प्रयत्न करावा व त्यांच्या अस्तित्वाचे संरक्षण करावे. अशी प्रवृत्ती ठामपणे खात्री पुरविते की, ही शिंगे “प्रभूंचा प्रभु आणि राजांचा राजा” असणाऱ्या कोकऱ्यास विरोध करतील, कारण यहोवाने उद्देशिल्यानुसार, येशू ख्रिस्ताच्या नेतृत्वाखालील राज्य, ह्या सर्व राष्ट्रांची थोड्याच वेळात जागा घेईल.—दानीएल ७:१३, १४; मत्तय २४:३०; २५:३१-३३, ४६.
१४. जगाच्या राजांना कोकऱ्याबरोबर युद्ध करणे कसे शक्य आहे व त्याचा परिणाम काय होईल?
१४ खरे पाहता, जागतिक राजे येशू ख्रिस्ताला काहीच करु शकत नाहीत. तो स्वर्गात, त्यांच्यापासून फार दूरवर आहे. पण येशूचे बंधू, स्त्री संतानाचे शेष अजून पृथ्वीवरच आहेत व सहज हल्ला करण्याजोगे आहेत. (प्रकटीकरण १२:१७) पुष्कळ शिंगांनी त्यांचा कटू विरोध केला व अशा तऱ्हेने त्यांनी कोकऱ्यासोबत युद्ध केले. (मत्तय २५:४०, ४५) तथापि, लवकरच देवाचे राज्य “या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील” अशी वेळ येईल. (दानीएल २:४४) तेव्हा पृथ्वीचे सर्व राजे कोकऱ्याबरोबर अंत होईपर्यंत लढतील हे आपण पाहणार आहोत. (प्रकटीकरण १९:११-२१) पण, राष्ट्रे यशस्वी होणार नाहीत हे येथे आपल्याला शिकायला मिळते. जरी ते व किरमिजी रंगाचे श्वापद, संयुक्त राष्ट्रसंघ, “एकविचाराचे” असले तरी “प्रभूंचा प्रभु व राजांचा राजा” याला व अभिषिक्त शेष जे अजून पृथ्वीवर आहेत, ज्यांचे मिळून “पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू” जन बनलेले आहेत, त्यांना पराजित करू शकणार नाही. हे देखील सैतानाच्या धूर्त दोषारोपाला उत्तर देण्यामध्ये आपल्या सचोटी रक्षणाद्वारे विजय मिळवतील.—रोमकर ८:३७-३९; प्रकटीकरण १२:१०, ११.
कलावंतिणीस उद्ध्वस्त करणे
१५. देवदूत कलावंतिणीबद्दल तसेच दहा शिंगांची व श्वापदाची तिच्याबद्दल मनोवृत्ती व कार्य याबद्दल काय म्हणतो?
१५ दहा शिंगाच्या शत्रुत्वाचे लक्ष्य केवळ देवाचे लोक नाहीत. देवदूत आता योहानाचे लक्ष परत कलावंतिणीकडे वेधवतो: “आणखी तो मला म्हणाला, ‘जेथे कलावंतीण बसली आहे, तेथे जे जलप्रवाह तू पाहिले ते, लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत. जी दहा शिंगे व जे श्वापद तू पाहिले ती कलावंतिणीचा द्वेष करितील व तिला ओसाड व नग्न करितील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.’”—प्रकटीकरण १७:१५, १६.
१६. राजनैतिक सरकार जेव्हा मोठ्या बाबेलविरुद्ध उठतील तेव्हा ती तिच्या संरक्षित जलांचा आधार का घेऊ शकणार नाही?
१६ जशी पुरातन बाबेल तिच्या जलांच्या संरक्षणावर अवलंबून होती, तसेच आजही मोठी बाबेल तिचे “लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे” यांच्या प्रचंड सदस्यांवर विसंबून आहे. देवदूत ही गोष्ट येथे योग्यपणेच सांगतो, कारण तो यानंतर, पृथ्वीची राजनैतिक सरकारे मोठ्या बाबेलवर हिंसक आक्रमण करतील अशी धक्कादायक घटना सांगतो. तेव्हा “लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे” काय करतील? देवाचे लोक मोठ्या बाबेलला ताकीद देत आले आहेत की, फरात नदीचे जल आटत जाईल. (प्रकटीकरण १६:१२) सरतेशेवटी, हे जल पूर्णपणे आटून जाईल. तिच्या अत्यंत गरजेच्या वेळी त्या घृणित कलावंतिणीला निश्चित कोणी आधार देणार नाहीत.—यशया ४४:२७; यिर्मया ५०:३८; ५१:३६, ३७.
१७. (अ) मोठ्या बाबेलची संपत्ती तिचा बचाव का करु शकणार नाही? (ब) मोठ्या बाबेलचा अंत मोठ्या सन्मानापलिकडला कसा असेल? (क) दहा शिंगांच्या किंवा वैयक्तिक राष्ट्रांऐवजी, मोठ्या बाबेलच्या विरूद्ध हिंसक वागणूकीत अजून कोण सामील होतो?
१७ मोठ्या बाबेलची अमाप भौतिक संपत्ती निश्चितच, तिचा बचाव करू शकणार नाही. कदाचित त्यामुळे तिचा नाश त्वरीत होईल, कारण दृष्टांत आम्हास दाखवतो की जेव्हा श्वापद व दहा शिंगे तिच्यावर आपला क्रोध ओततात तेव्हा ते तिची राजवैभवी वस्त्रे व दागदागिने काढून टाकतील. ते तिची संपत्ती लुटतील. ते लज्जास्पदरितीने तिच्या खऱ्या रूपास उघड करुन ‘तिला नग्न करितील.’ किती ही नासधूस! तिचा अंत देखील मानसन्मानापासून फार दूरवर असेल. ते तिचा नाश करतील, “तिचे मांस खातील” व निर्जीव सापळ्यासारखी तिची दशा करतील. ते सरतेशेवटी, “तिला अग्नीत जाळून टाकतील.” ती रोगग्रस्त म्हणून कुठलाही संस्कारविधी तिच्यावर न करता तिला जाळून टाकले जाईल! ह्या हिंसक वागणूकीत दहा शिंगांना चित्रित करणारी राष्ट्रे नव्हेत, तर “श्वापद” ही म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघ स्वत: कलावंतिणीचा नाश करण्यात त्यांच्यामध्ये सहभागी आहे. खोट्या धर्माच्या विनाशास, तो अधिकृत अनुज्ञा देईल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १५० पेक्षा अधिक राष्ट्रांनी तर आधीच धर्मांविरूद्ध व खासकरुन ख्रिस्ती धर्मजगताविरुद्ध मत देऊन आपले शत्रुत्व प्रगटविले आहे.
१८. (अ) आधुनिक इतिहासात बाबेली धर्माविरुद्ध जाण्याच्या कोणत्या शक्यता असल्याचे आम्ही पाहिले आहे? (ब) मोठ्या कलावंतिणीवर हल्ला होण्याचे मुख्य कारण कोणते?
१८ राष्ट्रे त्यांच्या पूर्वीच्या जारिणीला असे अपमानकारक का वागवतील? आधुनिक इतिहासात बाबेली धर्म उलटण्याबद्दलची शक्यता आम्ही पाहिली आहे. पूर्वीचे रशिया व चीन यासारख्या देशांमध्ये अधिकृत सरकारी विरोधाने धर्माच्या प्रभावाला फारच कमी केले आहे. युरोपमधील प्रॉटेस्टंट विभागामध्ये उदासीनवृत्ती व अनिश्चितता यामुळे चर्चेस् रिकामी होत चालली आहेत, त्यामुळे धर्म अक्षरशः मृत बनला आहे. विस्तृत कॅथलिक साम्राज्य बंडखोरी व मतभेदाने विभागलेले आहे, ज्याला भेट देणाऱ्या पोपला देखील शांत करण्यात असमर्थता आली. मोठ्या बाबेलवरील हा अंतिम हल्ला देवाचा न बदलणारा न्यायदंड या रुपाने त्या मोठ्या कलावंतिणीवर व्यक्त केला जाईल या गोष्टीला आम्ही दृष्टीआड करू नये.
देवाची वचने पूर्ण करणे
१९. (अ) सा. यु. पू. ६०७ मध्ये धर्मत्यागी यरूशलेमेवर यहोवाने जो दंड बजावला तो, मोठ्या कलावंतिणीवर येणाऱ्या दंडाचे कसे चित्र देतो? (ब) सा. यु. पू. ६०७ नंतर यरुशलेमेची उजाड, निर्जन स्थिती आमच्या दिवसात कशाला चित्रित करते?
१९ यहोवा देव हा न्यायदंड कसा बजावतो? पुरातन काळातील त्याच्या धर्मत्यागी लोकांचे उदाहरण हे समजण्यास मदत करील, त्यांच्याबद्दल त्याने म्हटले: “यरूशेलेमेतल्या संदेष्ट्यांच्या ठायीहि मी एक घोर प्रकार पाहिला आहे; ते जारकर्म करितात व लबाडीने चालतात; ते दुष्कर्म्यांचे हात असे दृढ करितात की त्यांतला कोणी आपल्या दुष्कर्मापासून वळत नाही; ते सर्व मला सदोमासारखे झाले आहेत व त्याचे रहिवासी गमोरासारखे झाले आहेत.” (यिर्मया २३:१४) सा. यु. पू. ६०७ मध्ये यहोवा देवाने त्या आध्यात्मिक व्यभिचारी शहराचे ‘वस्त्रहरण करण्यास, उत्कृष्ट जवाहीर हिसकावून घेण्यास व त्याला नागवी व उघडी करण्यास’ नबुखद्नेस्सराचा उपयोग केला. (यहेज्केल २३:४, २६, २९) त्या काळचे यरूशलेम आजच्या ख्रिस्ती धर्मजगताचा नमुना होते व जसे आधीच्या दृष्टांतात योहानाने पाहिले, त्याप्रमाणे यहोवा ख्रिस्ती धर्मजगतावर व इतर सर्व खोट्या धर्मावर त्याच प्रकारची दंडाज्ञा बजावेल. सा. यु. पू. ६०७ च्या नंतर यरुशलेमेची उजाड, निर्जन स्थिती, धार्मिक ख्रिस्ती धर्मजगताच्या संपत्तीची लूट व लज्जास्पद उघडे झाल्यावर कशी दिसेल ते दाखवते. मोठ्या बाबेलचा उर्वरित भाग यामधून काही चुकणार नाही.
२०. (अ) न्यायदंड बजावण्यासाठी यहोवा पुन्हा एकदा मानवी अधिकाऱ्यांचा उपयोग करील हे योहान कसे दाखवतो? (ब) देवाचा ‘इरादा’ काय आहे? (क) राष्ट्रे त्यांच्या “एकविचाराने” कसे वागतील; पण वस्तुतः कोणाचा इरादा पूर्ण होईल?
२० पुन्हा यहोवा देव मानवी सत्ताधिशांचा न्यायदंड बजावण्यास उपयोग करतो: “त्यांनी एकविचाराने वागून देवाची वचने पूर्ण होईपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृति करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले.” (प्रकटीकरण १७:१७) देवाचा कोणता ‘इरादा’ आहे? मोठ्या बाबेलचा न्यायदंड बजावणाऱ्यांना तिचा संपूर्ण विध्वंस करण्यासाठी एकत्रित करणे. तिच्यावर हल्ला करण्याचा त्यांचा हेतू, हा अर्थातच, त्यांचे ‘एकविचार’ पूर्ण करणे हा असेल यात काही शंकाच नाही. मोठ्या कलावंतिणीवर त्यांचे उलटणे हे त्यांच्या राष्ट्रीय हिताचे आहे असे त्यांना वाटेल. सध्या असणारे संघटित धर्म त्यांच्या प्रभुसत्तेला धोका आहेत असा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये बळावेल. पण वस्तुत:, यहोवा स्वतः ही योजनाबद्ध हालचाल करील. ते त्याच्या जुन्या व्यभिचारी शत्रूचा क्षणातच नाश करण्याच्या त्याच्या इराद्याला पूर्ण करतील!—पडताळा यिर्मया ७:८-११, ३४.
२१. मोठ्या बाबेलचा नाश करण्यासाठी किरमिजी रंगाच्या श्वापदाचा उपयोग केला जाणार आहे, तर राष्ट्रे संयुक्त राष्ट्रसंघाबद्दल काय करतील हे उघड दिसते?
२१ होय, मोठ्या बाबेलचा नाश करण्यासाठी, राष्ट्रे किरमिजी रंगाचे श्वापद, संयुक्त राष्ट्रसंघाचा उपयोग करतील. ते त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीनुसार वागणार नाहीत तर ‘आपले राज्य श्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृति करण्याचे देव [यहोवा, NW] त्यांच्या मनात घालतो.’ जेव्हा वेळ येईल तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाला दृढ करण्याची गरज राष्ट्रे उघडपणे ओळखतील. “देवाची वचने पूर्ण होईपर्यंत” त्याने खोट्या धर्मावर झडप घालून त्याच्याशी यशस्वी लढत देण्यासाठी ते त्याला स्वतःकडे असणारा अधिकार व शक्ती यांच्या रूपाने जणू बळकट दात देतील. अशाप्रकारे ह्या पुरातन कलावंतिणीचा पूर्ण अंत होईल. सरतेशेवटी, ती एकदाची मोकळी होईल!
२२. (अ) प्रकटीकरण १७:१८ मध्ये देवदूत त्याचे विधान ज्या रितीने पूर्ण करतो त्यावरून काय सूचित होते? (ब) उलगडण्यात आलेल्या गूजाबद्दल यहोवाचे साक्षीदार कसा प्रतिसाद देतात?
२२ खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यावर यहोवाचा न्यायदंड निश्चित रुपाने होणार आहे यावर जणू जोर देऊन, देवदूत आपली साक्ष असे म्हणत पूर्ण करतो: “जी स्त्री तू पाहिली ती पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी होय.” (प्रकटीकरण १७:१८) बेलशस्सरच्या काळातील बाबेलासारखी, मोठ्या बाबेलला ‘तागडीत तोलण्यात आले व ती उणी भरली’ आहे. (दानीएल ५:२७, द न्यू इंग्लिश बायबल) तिचे पतन फार वेगाने व अंतिम होईल. यास्तव, किरमिजी रंगाच्या श्वापदाच्या व मोठ्या कलावंतिणीच्या गूजाच्या उलगडण्याबद्दल यहोवाचे साक्षीदार कसा प्रतिसाद देतात? ते प्रामाणिक सत्य शोधकांना “कृपायुक्त” उत्तर देत यहोवाच्या न्यायाच्या दिवसाची घोषणा आवेशाने करण्यात दाखवितात. (कलस्सैकर ४:५, ६; प्रकटीकरण १७:३, ७) जसे आमचा पुढील अध्याय दाखवील त्याप्रमाणे मोठ्या कलावंतिणीचा नाश होताना जे बचावू इच्छितात त्यांनी लवकरात लवकर पाऊल उचलले पाहिजे!
[२५२ पानांवरील चित्रे]
सात जागतिक सत्तांचा अनुक्रम
ईजिप्त
असेरिया
बॅबिलॉन
मेडो- पर्शिया
ग्रीस
रोम
अँग्लो- अमेरिका
[२५४ पानांवरील चित्रे]
“तेच आठवा राजा आहे”
[२५५ पानांवरील चित्रे]
कोकऱ्याकडे पाठ फिरवून, “ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात”
[२५७ पानांवरील चित्रे]
मोठ्या बाबेलचा मुख्य भाग या नात्याने ख्रिस्ती धर्मजगत पूर्ण विध्वंस घडलेल्या पुरातन काळच्या यरुशलेमेसोबत जुळेल