यहोवाबद्दल वाटणारे प्रेम खऱ्या भक्तीला उत्तेजक ठरते
“देवावर प्रीती करणे म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळणे हे आहे.”—१ योहान ५:३.
१, २. आम्ही यहोवाची सेवा कोणत्या उद्देशाने करावी?
जपानमधून भेटीस आलेल्या ८० पाहुण्यांच्या गटाने अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलन सभागृहाला भेट दिली. नयनरम्य परिसर, तसेच निळे पक्षी, कबुतरे आणि आपल्या पंखांच्या हालचालीने गुंजारव निर्माण करणारे भडक रंगाचे पक्षी यांच्या मधुर किलबिलीने या पाहुण्यांना आपल्या थोर निर्माणकर्ता यहोवा देवाच्या अगदी जवळ वाटले. त्यांच्या मार्गदर्शकाला लवकरच आढळले की हा, पायनियर या नात्याने पूर्ण वेळेची सेवा करणाऱ्यांचा गट होता. यामुळे नंतर या गटाला नेहमी विचारला जाणारा प्रश्न विचारण्यात आला की, “जपानमध्ये इतके पायनियर्स का आहेत?” क्षणभर शांतता पसरली गेली. मग, एका युवतीने म्हटलेः “कारण आमचे यहोवावर प्रेम आहे.”
२ यहोवाबद्दल प्रेम—हे आम्हाला त्याच्या सेवेचे केवढे स्फुरण देते! अर्थात, प्रत्येकाला पायनियरींग करता येत नाही हे खरे. खरे म्हणजे आमच्या चाळीस लाख राज्य प्रचारकांपैकी बहुतेकांना तर या हक्काचा अनुभव घेण्यासाठी आपल्या आराखड्यात सुधारणा करणे जमू शकले नाही. तथापि, ज्यांची परिस्थिती मुभा देते अशांना मात्र हे ध्येय साधले. आणि आमच्यापैकी बाकीचे लोक ‘परमेश्वरावर [यहोवा, न्यू.व.] भाव ठेवून, सदाचाराने वागून’ शिष्य बनविण्याच्या कामी काही सहभाग घेऊन आपली प्रीती दाखवतात. (स्तोत्रसंहिता ३७:३, ४) यहोवाचे सर्व समर्पित उपासक, पायनियरींग करीत आहेत अशा सर्वांना आपला प्रेमळ पाठिंबा दाखवून या पायनियर आत्म्याचे संगोपन करण्यात सहभागी होऊ शकतात.—मत्तय २४:१४; २८:१९.
३. ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे बहुतेक लोक व यहोवाचे साक्षीदार यांजमध्ये कोणता लक्षवेधी फरक लक्षात घेण्याजोगा आहे?
३ धर्म हा आपल्या जीवनास एक पुरवणी किंवा जोड आहे असे बहुतेक ख्रिश्चन म्हणणाऱ्या लोकांचे मत आहे. पण, यहोवाचे साक्षीदार देवाबद्दल उत्कट प्रेम प्रदर्शित करतात, जे त्यांना “प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळविण्याची” चालना देते. याला अर्थातच मोठ्या त्यागाची हाक आहे, पण ते त्याग किती योग्य ठरले! (मत्तय ६:३३; १६:२४) ते अगोदर मोशे व नंतर येशू ख्रिस्ताने परत सांगितलेल्या पहिल्या थोर आज्ञेच्या सहमतात आहे की, “आपला देव परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] हा अनन्य परमेश्वर आहे; तू आपला देव परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण बुद्धीने व पूर्ण शक्तीने प्रीती कर.”—मार्क १२:२०, ३०; अनुवाद ६:४, ५.
४, ५. विश्वासू या अर्थी कोणाला गृहीत धरता येऊ शकते, आणि हा विश्वासूपणा कसा दाखविला जाऊ शकतो?
४ वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष एफ्. डब्ल्यु. फ्रान्झ ९८ वर्षे वयाचे असून त्यांनी ७० वर्षे पूर्ण वेळेचे कार्य केले आहे. यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयातील एका कर्मचाऱ्याने नुकतेच म्हटले की, “ब्रदर फ्रान्झ तुमचे विश्वासूपणाचे खूप चांगले उदाहरण आहे.” याला उत्तर देताना ब्रदर फ्रान्झ यांनी म्हटलेः “होय, आपल्याला विश्वासू राहिलेच पाहिजे!” याचा एकंदर सारांश हा की, आम्ही राज्याच्या कार्यहालचालीच्या ज्या प्रकारात सेवा करीत आहोत, त्यामध्ये विश्वासू राहू शकतो.—१ करिंथकर ४:२; गलतीकर ३:९.
५ अर्थातच, पुष्कळांना यहोवाच्या सेवेत अधिक करण्याची इच्छा आहे, परंतु शास्त्रवचनीय जबाबदाऱ्या किंवा आरोग्य समस्या त्यांच्यावर मर्यादा आणतात. तथापि, ज्यांना पायनियर बनणे जमत नाही असे लोक कमी विश्वासू आहेत असे समजता कामा नये. पुष्कळ जण खडतर परिस्थितीत आणि कित्येक वर्षे देखील तग धरुन राहिले आहेत. होय, ते विश्वासू आहेत! त्यांनी यहोवावर आपली प्रीती दाखवली आहे व त्याच्या ईश्वरशासित व्यवस्थेला पूर्णहृदयी पाठिंबा देण्यात परिश्रमाने कार्य केले आहे. यांनी पायनियर कार्यात सूक्ष्म रस दाखविला आहे आणि आपल्या मुलांनाच, संभाव्य पायनियर या नात्याने समजून त्यांना आपल्या जीवनात, इतर सर्व ध्येयांपेक्षा श्रेष्ठ असणारे ध्येय, पायनियरींग घेण्याचे प्रोत्साहन दिले आहे.—पडताळा अनुवाद ३०:१९, २०.
६, ७. १ शमुवेल ३०:१६-२५ मधील नमूद असणारी घटना आज कशी लागू पडते?
६ देवाचे सर्व लोक कृतीचे जे प्रेमळ ऐक्य दाखवीत आहेत त्याचे स्पष्टीकरण १ शमुवेल ३०:१६-२५ मधील वृतांताद्वारे करता येईल. अमालेक्यांविरुद्ध युद्ध करताना दावीद “संध्याकाळपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत . . . त्यांचा संहार करीत राहिला” व त्याने खूप लुट मिळविली. छावणीत परतत असताना दावीदासोबत युद्धास गेलेले काहीजण त्याला म्हणाले की, जे त्यांच्यासोबत युद्धाच्या धुमश्चक्रीत पुढे आले नाहीत अशांना लुटीतील काही भाग देऊ नये. पण दावीद म्हणालाः “या बाबतीत तुमचे कोण ऐकणार? जे लढाईस गेले त्यांस जेवढा वाटा मिळेल तेवढाच जे सामानासुमानापाशी राहिले त्यांसही मिळेल; त्यांस सारखाच वाटा मिळेल.”
७ हेच तत्त्व आजही लागू होणारे आहे. पायनियर आमच्या आध्यात्मिक लढतीत सामोरे आहेत. पण मंडळीत बाकीचे सर्व आपला संपूर्ण व निष्ठावंत पाठिंबा त्यांना देऊन आहेत. त्यांनी १९९१ मध्ये एकत्रपणे केलेल्या कार्यहालचालीचा भव्य परिणाम मिळाला आहे; तो आपल्याला यहोवाच्या साक्षीदारांचे १९९२चे वार्षिक अहवाल पुस्तक यात पाहता येईल.
उल्लेखनीय अहवाल
८. (अ) जागतिक अहवाल एकंदर प्रचारक व त्यांनी यहोवाच्या सेवेत खर्च केलेल्या तासांबद्दल काय प्रकटवितो? (ब) अहवालात नव्यानेच दिसणाऱ्या देशांबद्दल तुम्ही कोणत्या लक्षवेधी गोष्टी हेरल्या आहेत?
८ होय, वार्षिक अहवाल पुस्तक यातील तो अहवाल दाखवितो की, यहोवाच्या आवेशी उपासकांनी एकत्र मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे १९९१ मध्ये जागतिक थरारक वाढ होण्यात केवढा सहभाग मिळू शकला. ४२,७८,८२० प्रचारकांचे वैभवशाली नवे शिखर गाठण्यात आले—ही ६.५ टक्के वाढ आहे. यांनी ९५,१८,७०,०२१ तासांचे कार्य केले. तसेच जेथे पूर्वी आमच्या कार्यावर बंदी होती पण आता पहिल्यांदाच जागतिक अहवालात ज्या देशांची नावे आली आहेत तेथील आमच्या बांधवांनी केवढा प्रयत्न केला त्याकडे लक्ष द्या. ते, अंगोला, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, रोमानिया व यु.एस.एस.आर हे देश आहेत.
९, १०. (अ) पायनियरांनी कठीण काळाच्या आव्हानाला कसा प्रतिसाद दिला? (ब) पायनियर सेवेत उतरण्यासाठी कोणते प्रोत्साहन दिले आहे?
९ अलिकडील वर्षात पायनियर आत्मा सर्व जगभर पसरलेला आहे. जेथे अलिकडेच भक्तीस्वातंत्र्य बहाल केले गेले आहे त्या देशात देखील पायनियरांचा आकडा वाढत आहे. कठीण आर्थिक परिस्थिती असली तरी त्यामुळे दृढनिश्चयी साक्षीदार यहोवाच्या भक्तीमध्ये आपणापाशी आहे ते सर्व देऊ करण्यात मागे हटत नाहीत. (पडताळा २ करिंथकर ११:२३, २७.) दर महिन्यात सर्व राज्य प्रचारकांपैकी १४ टक्के लोक पायनियर होते. ७,८०,२०२ हा पायनियरांचा उच्चांक आहे व तो सर्व प्रचारकांची १८ टक्के वाढ दाखवितो.
१० पायनियरांना अनुभवण्यास मिळणारा आनंद बघून इतरांना देखील ही सेवा घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. तुम्ही अद्याप पायनियरींग केलेली नसल्यास तुम्हाला यहोवाबद्दल वाटणारे प्रेम, आपण यशया ६:८ मध्ये वाचतो तसे, “हा मी आहे! मला पाठीव,” असे म्हणण्यास उद्युक्त करते का? किंवा तुमच्या परिश्रमी पवित्र शास्त्र अभ्यासामुळे देवाचे वचन तुमच्या अंतःकरणात ही ज्वलंत इच्छा निर्माण करू शकेल का की, ज्यामुळे तुम्हाला पायनियर कार्यात पाऊल उचलता येईल? परिक्षाप्रसंगात यहोवाच्या वचनाने यिर्मयाला चालना दिली; त्यामुळे तो स्वतःला आवर घालू शकला नाही.—यिर्मया २०:९.
मानवजातीकरता प्रेमळ सेवा
११. पवित्र शास्त्र अभ्यासाचे कार्य कसे वृद्धींगत झाले आहे?
११ वर्षाच्या अहवालातील एक ठळक गोष्ट म्हणजे मोफत घरगुती पवित्र शास्त्र अभ्यासाच्या संख्येतील वाढ. दर महिन्याला जगभर ३९,४७,२६१ पवित्र शास्त्र अभ्यास नियमितरित्या चालविले गेले. ही अशी प्रेमळ व्यवस्था आहे ज्यामुळे यहोवाचे साक्षीदार, त्यांना घरोघरच्या कार्यात आढळणाऱ्या आस्थेचा मागोवा घेऊन आस्थेवाईक व्यक्तींना पुढील मदत देऊ शकतात. प्रेषित पौलाने दाखविलेल्या उत्कटतेप्रमाणेच आम्हाला देखील सर्व प्रकारातील राष्ट्रीयत्व, वंशीय पार्श्वभूमि असणाऱ्या लोकांसोबत पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्यात आनंद वाटतो. त्याने ‘यहूदी व हेल्लेणी यांना कसून साक्ष’ देण्यात, सत्याच्या शिक्षणात बरेच तास खर्च केले असावेत. (प्रे. कृत्ये २०:२०, २१) हेच आजही आहे. यहोवाचे साक्षीदार “सर्व मनुष्यांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहंचावे” म्हणून मदत करीत आहेत.—१ तीमथ्य २:४.
१२-१४. युरोपामधून कोणते आनंदी अहवाल ऐकण्यात येत आहेत?
१२ पूर्व युरोपातील पवित्र शास्त्र अभ्यासाच्या वाढत्या कार्यहालचालीचा अहवाल किती उत्तेजक आहे! आमच्या बांधवांना कित्येक दशके येथे लहानलहान गटात एकत्र भेटावे लागत होते आणि सबंध गटासाठी वॉचटावर मासिकाची जुनी जीर्ण झालेली एकच प्रत अभ्यासासाठी उपलब्ध असे. पण आता या देशात पवित्र शास्त्र व त्यावरील प्रकाशने यांचा महापूर वाहत आहे. यामुळे आम्हाला गीतरत्नातील एका कडव्याचे स्मरण घडते, जे २:४ मध्ये आहे, किंग जेम्स व्हर्शनः “त्याने [ख्रिस्त] मला आपल्या [आध्यात्मिक] पानगृहात आणिले. त्याने मजवर प्रेमध्वजा फडकाविली.” आता मासिकाच्या स्वतःच्या प्रती असल्यामुळे बहुतेक जण “सत्याचे वचन नीट सांगण्यास” तरबेज झाले आहेत.—२ तीमथ्य २:१५.
१३ रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथील एका मंडळीतील १०३ प्रचारकांनी नुकताच ३०० पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याचा अहवाल दिला. हे पवित्र शास्त्र अभ्यास चालविल्यामुळे केवळ आठ महिन्यात ५३ नव्या साक्षीदारांचा बाप्तिस्मा झाला. मंडळीतील अर्ध्यापेक्षा अधिक जण सत्यामध्ये केवळ आठ किंवा त्यापेक्षाही कमी महिन्यांचे आहेत! त्यांच्यामध्ये वडील नाही—फक्त एकच उपाध्य सेवक त्यांच्या आध्यात्मिक वाढीची काळजी घेत आहे.
१४ एस्टोनिया येथील एका राज्य प्रचारकाला पवित्र शास्त्र अभ्यास घेणाऱ्या एका गृहिणीने विचारले की, तिला या अभ्यासाला काही मित्रांना आमंत्रित करता येईल का. साक्षीदार दुसऱ्यांदा अभ्यास घेण्यासाठी पुढल्या आठवडी आली तेव्हा तिला दिसले की तेथे ५० पेक्षा अधिक जण उपस्थित आहेत! इतक्या लोकांनी जी आस्था दाखवली त्याची काळजी करण्यासाठी अर्थातच नंतर खास व्यवस्था आखावी लागली.
१५. स्मारकविधीची उपस्थिती व बाप्तिस्मा याबद्दल काय म्हणता येईल?
१५ आज जे अभ्यास करीत आहेत त्यापैकी बहुतेकांना ख्रिस्ती सहवासाचा आनंद येशू ख्रिस्ताच्या स्मारकविधीला उपस्थित राहण्यामुळे मिळत आहे. गेल्या वर्षी या समारंभाची उपस्थिती पहिल्यांदाच १,००,००,०००च्याही पुढे गेली; या आनंदाच्या प्रसंगी जगभर ६६,२०७ मंडळ्यात १,०६,५०,१५८ उपस्थित होते. लॅटिन अमेरिकन, आफ्रिकन व पूर्व युरोपीय देशातील उपस्थिती राज्य प्रचारकांच्या तिप्पट किंवा चौपट होती. आता आपल्याला या वर्षीच्या शुक्रवार, एप्रिल १७ रोजी होणाऱ्या स्मारकविधीची तयारी केली पाहिजे. या स्मारकविधीला उपस्थित राहणारे नवे पवित्र शास्त्र विद्यार्थी मोठ्या संख्येने बाप्तिस्म्याप्रत आपली प्रगति करीत राहतील अशी आम्ही आशा बाळगतो. १९९१ मधील बाप्तिस्म्याबद्दल पाहू जाता ३,००,९४५ लोकांनी यहोवा देवाला पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे आपले समर्पण जाहीर केले.
ईश्वरी स्वातंत्र्याचे चाहते
१६. “स्वातंत्र्याचे चाहते” प्रांतिय अधिवेशनाचे कोणते थराराक अनुभव हाती आले आहेत?
१६ १९९१ सेवा वर्षाची एक लक्षवेधी घटना म्हणजे “स्वातंत्र्याचे चाहते” प्रांतिय अधिवेशनाची मालिका, जी आता उत्तर गोलार्धात संपुष्टात आली असून १९९२ मध्ये दक्षिण गोलार्धात होत आहे. पूर्व युरोपीय देशात प्रथमतःच संमेलनाचा संपूर्ण कार्यक्रम सादर करण्यात आला; येथे आमचे बांधव, त्यांना यहोवाच्या स्तुतीप्रीत्यर्थ नव्यानेच मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल आनंदी झालेले आहेत. ऑक्टोबर १९९१ पर्यंत झालेल्या ५४ राष्ट्रांतील पहिल्या ७०५ अधिवेशनांची ४७,७४,९३७ उपस्थितीचा अहवाल हाती आला आहे.
१७, १८. (अ) यहोवाचे उपासक कोणत्या स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत व कशाची अपेक्षा करीत आहेत? (ब) ईश्वरी स्वातंत्र्य जगीक स्वातंत्र्यापेक्षा कसे वेगळे आहे?
१७ येशूने आपल्या शिष्यांना म्हटले होतेः “सत्य तुम्हास स्वतंत्र करील.” (योहान ८:३२) आज पवित्र शास्त्रीय सत्याने लाखोंना ख्रिस्ती धर्मजगताच्या तत्त्वप्रणालींपासून मुक्त केले आहे. या लाखोंना शिकायला मिळाले की, यहोवाने येशूच्या यज्ञार्पणाच्या केलेल्या तरतुदीमुळे मानवजातीला “नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या लेकरांची गौरवयुक्त मुक्तता” मिळण्याची शक्यता होईल. (रोमकर ८:१९-२२) ते केवढे भव्य स्वातंत्र्य असेल—नंदनवनमय पृथ्वीवरील अनंतकालिक जीवन, जेथे यहोवाने प्रेमळपणे ठरवून दिलेल्या योग्य मर्यादा राहतील!—यशया २५:६-८; पडताळा प्रे. कृत्ये १७:२४-२६.
१८ यहोवाचे साक्षीदार आज ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहेत व लवकरच देवाच्या नव्या व्यवस्थीकरणात अधिक मुबलकपणे ज्याचा अनुभव घेणार आहेत ते आमचा देव यहोवा यापासून आहेत. (२ करिंथकर ३:१७) ते कोणाही राजकीय किंवा क्रांतीकारी हालचालीवर विसंबून नाहीत. (याकोब १:१७) या मुद्याबद्दल कोणताही गैरसमज होऊ नये याची दक्षता राखावी म्हणूनच पूर्व युरोपीय देशात यहोवाच्या साक्षीदारांनी जे बिल्ले स्वतःवर लावले होते त्याचे शिर्षक, “ईश्वरी स्वातंत्र्याचे चाहते प्रांतिय अधिवेशन” असे होते.
यहोवाबद्दल वाटणारे उत्कट प्रेम
१९. यहोवासोबत प्रार्थनेद्वारे साधलेली जवळीक आम्हाला कशी मदत करू शकते?
१९ यहोवाबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम तसेच त्याजवरील आमची भिस्त यामुळे आम्ही प्रार्थनेद्वारे त्याच्या निकट राहू. यहोवासोबत राखलेल्या या जवळिकीमुळेच आमच्या बांधवांना पुष्कळ त्रास व छळ सहन करण्यास मदत दिली. (स्तोत्रसंहिता २५:१४, १५) येशूने सुद्धा आपल्या परिक्षेच्या अत्यंत कठीण काळात आपल्या पित्याशी प्रार्थनेद्वारेच जवळीक राखली. (लूक २२:३९-४६) प्रार्थनेद्वारे साध्य होणाऱ्या यहोवासोबतच्या या जवळीकीमुळेच स्तेफनाला आपल्या हुतात्मिक मरणाच्या यातना सहन करता आल्या. त्याला दगडमार होण्याच्या बेतात असता त्याने आकाशाकडे पाहिले आणि म्हटलेः “पाहा, आकाश उघडले आहे, व मनुष्याचा पुत्र [येशू] देवाच्या उजवीकडे उभा राहिला आहे असे माझ्या दृष्टीस पडते.”—प्रे. कृत्ये ७:५६.
२०-२२. देव प्रार्थना ऐकतो याचे एक अनुभव कसे स्पष्टीकरण देतो?
२० यहोवा आपल्या इच्छेच्या सहमतात केल्या जाणाऱ्या प्रार्थना ऐकत असतो. हे यहोवाच्या साक्षीदारांना वेळोवेळी अनुभवास आले आहे. उदाहरणार्थ, जेथे यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला बंदी आहे अशा एका आफ्रिकी देशात एक खास पायनियर आपणासोबत राज्य प्रकाशने तसेच वितरणासाठी पाकिटांचे मोठे पोते घेऊन उत्तर दिशेकडे बसने प्रवास करीत होता. बसमध्ये जो कर्मचारी सामान घेत होता त्याने या बंधूला विचारलेः “यात काय आहे?” या बंधूच्या मनात जी पाहिली गोष्ट आली ती त्याने याप्रकारे बोलून दाखवलीः “टपाल.”
२१ मार्गावर असता बस नेहमीच्या नाक्यावरुन भरधाव पुढे गेली तेव्हा रहदारीच्या पोलिसांनी तिचा पाठलाग केला व तिला थांबवले. काही चोरटा माल यातून नेला जात आहे असे त्यांना वाटले. त्यांनी सर्व प्रवाशांना बाहेर येण्याची आज्ञा केली व सर्व सामानांची तपासणी घेतली जावी असे सांगितले. यामुळे केवढी अडचण निर्माण झाली! लोकांची कुरकुर सुरु झाली असता आपला बंधू काही अंतर दूर गेला, त्याने आपल्या गुडघ्यावर टेकून यहोवाला प्रार्थना केली. तो जमावाकडे परतला तेव्हा प्रत्येक प्रवाशाचे समान उघडून कसून तपासणी चालली होती. बंधूचे पोते उघडण्याची वेळी आली तेव्हा पुन्हा त्याने यहोवाला मदतीसाठी प्रार्थना केली.
२२ “हे कोणाचे पोते आहे व त्यात काय आहे?” पोलिस मोठ्याने ओरडला. बंधू बोलण्याआधीच बसच्या सेवकाने उत्तर दिले व म्हटलेः “हे —— टपाल कचेरीतून —— टपाल कचेरीकडे नेण्यात येणारे टपाल आहे.” “ठीक आहे,” अधिकारी म्हणाला. त्याने ते पोते उचलून सेवकाच्या हाती दिले. “हे पोते चांगल्या सुरक्षित जागी ठेव.” त्याने सेवकाला म्हटले. हे ऐकून खास पायनियरने पुन्हा आपले गुडघे टेकून प्रार्थना ऐकणारा देव यहोवा याला उपकारस्मरण केले.—स्तोत्रसंहिता ६५:२; नीतीसूत्रे १५:२९.
२३. यहोवाने काय दाखवून दिले आहे, तरी कधी कधी तो पूर्ण रुपाचा छळ गुदरण्यास का मुभा देतो?
२३ तथापि, याचा हा अर्थ नाही की, यहोवाचे लोक आपत्तीकारक घटना घडण्यापासून सर्वतोपरी मुक्त असतात. पवित्र शास्त्र काळी तसेच आजही काही विशिष्ट प्रसंगात यहोवाने आपल्या लोकांची मुक्तता करु शकतो याचा प्रत्यय दिला आहे. पण, सचोटीच्या वादविषयाचा निकाल लावण्याच्या अनुषंगाने तो कधी कधी छळास त्याचा पूर्ण मार्ग आक्रमू देण्याची मुभा देतो. (पडताळा मत्तय २६:३९.) शिवाय, पवित्र शास्त्रावर आधारलेले व्यावहारिक ज्ञान मोलाचे असले तरी यहोवा आपल्या लोकांना अपघात, मुलकी झगडे किंवा गुन्हेगारी यापासून सहजासहजी सुरक्षित ठेवीत नाही. (नीतीसूत्रे २२:३; उपदेशक ९:११) तरीपण आपण एका गोष्टीबद्दल आत्मविश्वास राखू शकतो व तो हा की, आम्हाला परिक्षाप्रसंगातून सोडवण्यात येवो वा न येवो, आमच्या विश्वासूपणाला जरुर आहे तर पुनरुत्थानाद्वारे प्रतिफळ मिळू शकेल.—मत्तय १०:२१, २२; २४:१३.
२४. यहोवाने कोणती प्रेमळ दाने दिली आहेत, आणि आम्ही त्याच्या प्रेमाला कसा प्रतिसाद द्यावा?
२४ यहोवाच्या प्रेमळ देणग्या किती अद्भूत आहेत! त्याने मानवजातीला ही पृथ्वी व तिजवरील दिलेल्या गोष्टी त्याच्या प्रेमाच्या उल्लेखनीय वक्तव्य करतात. (स्तोत्रसंहिता १०४:१, १३-१६; ११५:१६) तसेच देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त याला खंडणी म्हणून मानवजातीची पाप व मरण यापासून मुक्तता करण्यासाठी दिले ही त्याची अत्यंत प्रेमळ व कनवाळू देणगी आहे. “देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठविले आहे, यासाठी की, आपण त्याच्या द्वारे जिवंत राहावे. यामध्ये देवाची प्रीती आपल्या ठायी प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच. आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हावर प्रीती केली आणि स्वपुत्राला आपल्या पातकांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून पाठविले.” (१ योहान ४:९, १०) या प्रेमाला प्रतिसाद म्हणून आम्ही आपणाकडून ही खात्री द्यावी की, “मरण, जीवन, देवदूत, अधिपति, वर्तमान अगर भविष्य अशा गोष्टी, बले, आकाश, पाताळ किंवा कोणतीही दुसरी सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभु याच्यामध्ये जी देवाची आपल्यावरील प्रीती आहे तिच्यापासून वेगळे करावयास समर्थ होणार नाही.”—रोमकर ८:३८, ३९.
लेखाची उजळणी
▫ विश्वासू असणे म्हणजे काय?
▫ यहोवाबद्दलचे प्रेम आपल्याला कोणकोणत्या कार्यात दाखवता येईल?
▫ सेवा कार्याच्या अहवालातील कोणत्या गोष्टी तुम्हाला अत्यंत आस्थेच्या वाटतात?
▫ यहोवाच्या प्रेमळ देणग्यांबद्दल आपण कशी रसिकता दाखवू शकतो?
[१३ पानांवरील चौकट]
इतके पायनियर्स का?
साधारण २,६०० वर्षांपासून जपानी लोक सम्राटाचे कट्टर उपासक होते असे कळविण्यात येते. केवळ आमच्या २०व्या शतकात तीस लाखापेक्षा अधिक जपान्यांनी लढता लढता आपल्या जीवनाचे बलिदान केले; कारण आपल्या सम्राट देवाप्रीत्यर्थ मरण्यापेक्षा इतर कोणताही मोठा सन्मान नाही असे त्यांना वाटत होते. तथापि, दुसऱ्या जागतिक युद्धात बुद्ध-शिंटो लष्कर पराजित झाले आणि त्यानंतर सम्राटाने आपल्या देवत्वाचा दावा त्यागला. मग, या धार्मिक पोकळीस कशाने भरविले? यहोवाच्या साक्षीदारांच्या मिशनऱ्यांनी तसेच नंतर स्थानिक साक्षीदारांनी चालविलेल्या पवित्र शास्त्र अभ्यासामुळे पुष्कळ लोकांना खरा देव यहोवा याच्या प्राप्तीची तसेच त्याला स्वतःच्या जीवनाचे समर्पण करण्याची मदत मिळाली. या सर्मपणाचे त्या जपानी साक्षीदारांना खूपच मोल वाटते. गत काळात त्यांनी आपले जीवन सम्राट देवाला यज्ञार्पित केले होते, तर आता पायनियर या नात्याने विश्वाचा निर्माता व जिवंत देव, सेनाधीश प्रभू यहोवा याची उपासना करण्यात आपली शक्ती ते केवढ्या निष्ठेने खर्च करीत आहेत!
[१४ पानांवरील चित्रं]
ईश्वरी स्वातंत्र्याचे चाहते—प्राग्यु येथे ऑगस्ट ९-११, १९९१ दरम्यान अधिवेशनात उपस्थित असलेले यहोवाचे उपासक