“शांतीची सांथ”?
“शांतीची सांथ.” “आहा, किती शांततापूर्ण जग.” “शांती सर्वत्र व्यापून गेली आहे.” मागील एक दोन वर्षांतील वर्तमानपत्रातील या मथळ्यांनी वाचकांना आश्चर्यचकित केले. सगळ्या जगासाठी हा अंधःकारमय व नाशकारक बातम्यांकडून आशावादाकडे नेणारा बदल थक्क करून सोडणारा होता. असे काय घडत होते?
आश्चर्यकारक रितीने बऱ्याच महत्त्वपूर्ण वादविषयांचा शेवट झाला आहे किंवा काही महिन्यांच्या कालावधीतच त्यांची तीव्रता कमी झाली. आफ्रिकेतील अंगोलामध्ये शांतीची ‘स्थापना झाली.’ मध्य आशियामध्ये सोवियत युनियनने अफगाणिस्तानमधून आपले सैन्य काढून घेतले आहे. मध्य अमेरिकेत निकारागुआ सरकार व कॉन्ट्रा बंडखोर यामधील लढाई थंडावली आहे. दक्षिणपूर्व आशियामध्ये व्हिएतनामने काम्पुचियामधून सैन्य काढून घेण्यास मान्यता दिली आहे. या शांतीच्या साथीचा मध्यपूर्वेतही जाऊन पोहंचला आहे, कारण इराक व इराणमधील रक्तक्षुधित युद्धही अखेरीस थांबले आहे.
कदाचित, प्रबळ सत्तांमधील नव्याने उत्पन्न झालेले वातावरणही लक्षवेधी आहे. ४० वर्षांच्या शीतयुद्धानंतर सोवियत युनियन व अमेरिका यांच्यामधील शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न; एकमेकांच्या हितसंबंधातील वक्तव्य व परस्परांतील शांतीसाठी उचललेली खंबीर पावले पाहून त्यावर विश्वास ठेवणे अवघड झाले होते. विशेष म्हणजे, द इकॉनॉमिस्ट या पुस्तकानुसार आतापर्यंतच्या नमूद इतिहासामध्ये युरोपमधील हाच एक असा दीर्घ कालखंड आहे ज्यात युद्धे झालेली नाहीत. खरेच, शांती आता प्रसिद्धीच्या झोतात आहे.
याचा काय अर्थ होतो? राजकीय नेते “आमच्या काळात शांती” प्रस्थापित करण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत का? हे उद्गार ५२ वर्षांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान नेव्हील चेंबरलेन यांनी काढले होते. पण याच्या थोड्याच अवधीत दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले व मग, ते शब्द क्रूरतापूर्ण उपरोधिक असे सिद्ध झाले. मग, आता तरी दीर्घ कालवधीनंतर ते खरे ठरत आहेत का?