समृद्ध देशात स्थलांतरीत होण्याची किंमत मोजणे
परदेशातील व्यवसायासाठी मुलाखती घेणाऱ्या कार्यालयाची दृश्ये सर्वसाधारणपणे दृष्टीस पडतात. येथील प्रतीक्षालय लोकांनी भरुन गेले आहे व प्रत्येकजण आपल्या मुलाखतीची पाळी केव्हा येईल ते अधीरतेने वाट बघत बसलेला दिसतो. त्या छोट्या पण महत्त्वाच्या मुलाखतीवर यांना पाश्चिमात्य देशात औद्योगिक प्रदेशात जाण्याचा परवाना मिळू शकेल की नाही हे ठरविण्यात येईल. पुष्कळांना मनोमन वाटत असते की, हे समृद्धीचे तिकीट आहे. “मी तर आता चार वर्षे काम करीत आलो आहे, पण आतापर्यंत साधा रेडिओ घेऊ शकलो नाही,” अशी एका आफ्रिकी तरुणाने तक्रार केली. “मी जर इंग्लंड किंवा अमेरिकेत असतो तर आतापर्यंत मला एक कार असती व राहायला स्वतःचे असे सुंदर घरही असते.”
विकसनशील देशात अनेक गरीब लोकांठायी अशा प्रकारच्या भावना का उद्भवत असतात ते समजण्याजोगे आहे. एकतर, ते राहतात त्या ठिकाणी नोकरी मिळणे मुष्किलीचे झालेले असते व शिवाय पगार तर खूपच कमी असतो. जे काही साचविलेले असते ते महागाई खाऊन टाकते. राहण्यासाठी घरे दुर्मिळ आणि आहेत ती लोकांनी भरुन गेलेली आहेत. श्रीमंत राष्ट्रातील लोकांनी टाकून दिलेले कपडे काहींना परिधान करावे लागतात. पुष्कळांना आपण आर्थिक कचाट्यात सापडलेले असल्याचे दिसते.
अशा लोकांना समृद्ध पश्चिमी रा कशी खूणवत आहेत! सेईरा लिओन येथील एक तरुण म्हणालाः “परदेशी जाऊन आलेल्या लोकांनी आपली हकीकत आम्हाला सांगितली, त्यामुळे आपण देखील तेथे जाऊन तेथील औद्योगिक क्षेत्रे बघावीत असा लोभ व धैर्य आम्हाठायी जडले आहे. लोकांनी आम्हाला म्हटले की, तेथे जाऊन तुम्हाला बरेच कष्ट करावे लागतील, पण पैसा मात्र खोऱ्याने उपसता येईल. मग, स्वतःचा चरितार्थ चांगला चालेल इतकेच काय पण मोटारकार आणि आणखी मनोरंजनाची साधने मिळवता येतील. आणि जर तुम्ही सोबत दोन हजार डॉलर्स घेऊन परतलाच, तर येथेही आपला व्यवसाय सुरु करता येईल आणि चतुर्भूज होता येईल.”
अशी ही विचारसरणी देवाच्या काही सेवकांठायीही उद्भवलेली आहे हे पाहणे आश्चर्याचे नाही. एका आफ्रिकन भगिनीने म्हटलेः “जे परदेशी गेले त्यांचे किती बरे झाले त्याबद्दलची संभाषणे आम्ही देवाच्या संस्थेमध्ये असणारे तरुण लोक ऐकतो. तेव्हा कधीकधी मलाही असा विचार येतो, ‘माझे काय? मी येथे त्रासात का राहात आहे? मी परदेशी जावे का, किंवा येथेच राहावे?’”
तुम्ही गरीब देशात वास्तव्यास असाल तर तुम्हालाही वाटत असेल की असे स्थलांतर केल्यास तुमचे जीवन सुधरु शकेल का. तथापि, हे लक्षात घ्या की, विदेशी राष्ट्रात जाऊन स्थायिक होणे हा मोठा प्रकल्प आहे. तो खर्चिक व गंभीर देखील आहे. त्यात नवी भाषा शिकणे, नव्या कामाचे प्रावीण्य संपादणे, नव्या संस्कृतीस जुळवून घेणे, परक्या लोकांविषयी स्थानिक लोक जो अहंभाव दाखवीत असतात तो सहन करणे, आणि एकंदरीत नवाच जीवनमार्ग शिकून घेणे या गोष्टी समाविष्ट आहेत. तरीही अनेक ख्रिश्चनांनी यात यशस्वीता मिळविली आहे व ते आपल्या नव्या स्वगृही असणाऱ्या मंडळ्यांसाठी खरा ठेवा असल्याचे शाबीत झाले आहे आणि ते अनुकरणीय प्रचारक, पायनियर्स, वडील व उपाध्य सेवकांच्या रुपात सेवा करीत आहेत.
तरीपण सर्वांनाच अशी ही यशस्वीता मिळू शकली नाही. परदेशी जाण्यासाठी घेतलेला त्रास व चिंता यामुळे काहींसाठी आध्यात्मिक विनाशाचा परिणाम घडला. तेव्हा हे स्पष्ट आहे की, असे हे स्थलांतर गंभीर व प्रार्थनाशील विचार केल्याशिवाय केले जाऊ नये. पवित्र शास्त्र नीतीसूत्रे ३:५, ६ यात असा सल्ला देतेः “तू आपल्या अगदी मनापासून [अंतःकरणापासून, न्यू.व.] परमेश्वरावर [यहोवा, न्यू.व.] भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” होय, आपण यहोवाच्या इच्छेनुरुप कृती करीत आहोत ही खात्री केली पाहिजे. (याकोब ४:१३-१५) तसेच येशूने आपल्या श्रोत्यांना जेव्हा म्हटले की, त्यांनी ‘खर्चाचा अंदाज’ केला पाहिजे, तेव्हा त्याने तुम्हाला मदत देण्यासाठी व्यावहारिक सल्ला दिला होता हे तुम्ही विचारात घेतले पाहिजे. (लूक १४:२८) यात आर्थिक गोष्टींच्या विचारापेक्षा अधिक काही समाविष्ट आहे. परदेशी जाण्यामुळे आपल्याला केवढी आध्यात्मिक किंमत मोजावी लागेल हेही लक्षात घेतले पाहिजे.
परदेशातील जीवनाची वास्तवता
कोठे जाण्याआधी, तेथे गेल्यावर आपल्याला कशाकशाला तोंड द्यावे लागेल याबद्दल चांगली व व्यवहार्य कल्पना करण्यास हवी. शक्य आहे तर आधी तेथे प्राथमिक भेट देऊन तेथील परिस्थिती कशी आहे हे प्रत्यक्ष बघा. अन्यथा, तुम्हाला दुसऱ्याने दिलेल्या माहितीवर विसंबून राहावे लागेल. पवित्र शास्त्र इशारा देऊन म्हणतेः “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो, शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो.”—नीतीसूत्रे १४:१५.
पाश्चिमात्य जगातील जीवन कसे असते याची माहिती काहींनी चित्रपट व दूरदर्शनवरील कार्यक्रमांनी मिळवली आहे. यामुळे तेथे प्रत्येक जण श्रीमंत आहे, त्याला प्रत्येकाला नवी कार आहे व राहायला सुंदर घर आहे असा त्यांचा ग्रह तयार झालेला आहे. तथापि, वस्तुस्थिती वेगळीच आहे. कित्येक समृद्ध देशात कमालीचे दारिद्य्र, बेघरपणा व बेकारी आहे. तेथील अगदी गरीब स्थितीत राहणारे जन नव्यानेच स्थलांतर होऊन आलेले लोक असल्याचे दिसतात. एका गरीब देशातील अमेरिकेचे परराष्ट्रीय कार्यालयातील एक सल्लागार अधिकारी म्हणतातः “अमेरिकेत स्थायिक होणे हे किती अडचणीचे आहे हे लोकांना कळत नाही. काही पत्राने कळवतात की, त्यांचे किती चांगले चालले आहे—त्यांनी दोन कार व घर कसे विकत घेतले—पण वस्तुतः ते खरेपणाने झगडत आहेत.”
इतर ठिकाणी देखील अशीच परिस्थिती दिसते. ज्यांनी लंडनमध्ये राहून आपला अभ्यासक्रम पुरा केला ते पश्चिम आफ्रिकेचे एक प्राध्यापक साहर सोरई म्हणतातः “आफ्रिकेतून निघून इंग्लंडमध्ये स्थायिक होणे सोपे नाही. येथे स्थलांतरीत झालेले बरेच लोक अगदी गरीबीचे जीवन जगत आहेत. त्यांच्या चर्येवरील रेषांवरुन तुम्हाला याची कल्पना येऊ शकेल. काहींना तर एक साधा फोन करण्यासाठी २० पेन्स मिळविण्याची मुष्कील होते. ते एका खोलीत आणखी पुष्कळ जणांसोबत राहून दिवस काढतात; तेथे उब मिळण्यासाठी केवळ लहान हिटर असतो. त्यांना निव्वळ हलकी कामे मिळतात, पण तीही त्यांचा खर्च भागवण्यासाठी पुरेशी मिळकत देत नाहीत. गरीबीतून सुटका मिळावी या हेतूने आफ्रिका सोडणाऱ्यांना युरोपामध्ये झोपडीत जगावे लागत आहे.”
नव्या देशात स्थायिक होण्याबरोबर जो आर्थिक दबाव असतो तो अगदी सहजपणे एखाद्याची आध्यात्मिक वाढ खुंटवतो. (मत्तय १३:२२) हे खरे की, परिश्रम करावे अशी पवित्र शास्त्र शिफारस करते. (नीतीसूत्रे १०:४; १३:४) पण परदेशात जाणारे आपल्या आर्थिक ध्येयांची पूर्ति करण्यासाठी किंवा निदान आपल्या चरितार्थासाठी दोन काय तीन कामे हाती घेतात. यामुळे देवाची भक्ती जोपासण्यासाठी थोडा किंवा वेळच राहात नाही. मग, ख्रिस्ती सभा, पवित्र शास्त्र अभ्यास आणि पवित्र शास्त्रीय सत्याची इतरांमध्ये सहभागी या गोष्टी दुर्लक्षित होतात. अशावेळी, येशू ख्रिस्ताचे हे शब्द अगदी खडतरपणे खरे असल्याचे जाणवतात की, “तुमच्याने देवाची आणि धनाची सेवा करवत नाही.”—मत्तय ६:२४.
नैतिक दबाव
तुम्ही ज्या नव्या देशाबद्दल संभाव्य विचार करीत आहात तेथील नैतिक वातावरण कसे असेल याचाही विचार केला पाहिजे. पवित्र शास्त्र लोटाविषयी म्हणते की, त्याने यार्देनच्या तळवटीवर राहण्याचे पसंद केले. त्याने घेतलेला निर्णय नैतिक दृष्टीकोणातून सूज्ञ स्वरुपाचा वाटत होता; कारण तेथे “सर्वत्र महामूर पाणी [होते] . . . [आणि] सर्व प्रदेश परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] बागेसारखा . . . होता.” (उत्पत्ती १३:१०) तथापि, लोटाचे नवे शेजारी “परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] महाअपराधी” होते; ते लैंगिक अनैतिक कृत्यात गढलेले होते! (उत्पत्ती १३:१३) याचा परिणाम, “तो धार्मिक माणूस त्यांच्यामध्ये राहात होता, तेव्हा त्यांची अधार्मिक कृत्ये पाहून व त्यांविषयी ऐकून त्याचा धर्मशील जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता.”—२ पेत्र २:८.
याचप्रमाणे, आज तुम्ही पश्चिमी जगतात केलेले स्थलांतर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला तुम्ही राहात होता त्यापेक्षा अधिक रितीने नैतिक दबाव व मोहपाश यांना सामोरे आणील. तसेच, पूर्वीपेक्षा येथे कदाचित वृद्ध लोकांना सन्माननीय वागणूक मिळू शकणार नाही. वडीलधाऱ्यांबद्दल आदर दाखविण्याचे प्रोत्साहन मिळू शकणार नाही. शिवाय शेजारी देखील एकमेकांबद्दल खूपच अल्प आस्था बाळगणारे असतील. या गोष्टींचा तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर कसा परिणाम होणार? याबद्दल देखील प्रार्थनापूर्वक विचार होणे जरुरीचे आहे.
पालकांची अनुपस्थिती
काही पालकांनी आपल्या कुटुंबियांना मागे ठेवून परदेशी जाण्याची निवड केली. आपण एकदा नव्या जागी स्थायिक झाल्यावर मग कुटुंबासाठी आर्थिक सहकार्य पाठवता येईल किंवा अमाप पैसा मिळवून घरी परत येता येईल असा त्यांचा मनोदय असावा. पण अशी ही गोष्ट सूज्ञ स्वरुपाची आहे का?
शास्त्रवचने पालकांना आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजा पुरवण्याचे आर्जवतात, आणि अगदीच तुरळक प्रकरणात पालकाला अशा तरतुदीसाठी परदेशात काम करण्याशिवाय दुसरा इलाज नसेल. (१ तीमथ्य ५:८) तरीही, पालकांना आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेण्याचे बंधन आहे. देवाचे वचन म्हणतेः “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांस चिडवू नका, तर प्रभूचे [यहोवा, न्यू.व.] शिक्षण व बोध यांच्यायोगे त्यांचा प्रतिपाल करा.”—इफिसकर ६:४.
कोणी बाप आपल्या कुटुंबापासून महिने किंवा वर्षे दूर राहिला तर हे त्याला परिणामकारकपणे साध्य करता येऊ शकेल का? बहुधा नाही. यास्तव, तुमच्या अनुपस्थितीमुळे तुमच्या मुलांवर जो परिणाम घडेल त्याची तुलना मिळवलेल्या कोणा भौतिक लाभांशी होऊ शकेल काय याचा तुम्ही विचार केला पाहिजे. तसेच, परदेशात स्थायिक होणाऱ्यांना सहसा हे आढळते की, त्यांना वाटले तसे आपले “भाग्य” मिळवणे हे तितकेसे सोपे नाही. कोणा स्थायिकाला आपल्या कुटुंबाच्या प्रवासासाठी रक्कम देता आली नाही तर त्यांचा आपसातील दुरावा वर्षे जाता मोठा होत राहतो. यामुळे अधिक गंभीर नैतिक धोके उद्भवू शकतात. (पडताळा १ करिंथकर ७:१-५.) अशा या सत्त्वपरिक्षेच्या स्थितीत काही लैंगिक अनैतिकतेस बळी पडले आहेत हे दुःखाचे आहे.
देवाच्या तरतुदीवरील आत्मविश्वास
जगाची आर्थिक परिस्थिती बिघडत असता, आपला त्याग केला जाईल अशी भीती बाळगण्याचे कारण नाही हे देवाच्या सेवकांनी हे लक्षात ठेवणे चांगले. येशूने म्हटलेः “‘काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे,’ असे म्हणत काळजी करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवावयास विदेशी लोक खटपट करतात. या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे यांबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील.”—मत्तया ६:३१-३३.
यहोवाचे साक्षीदार सुवार्तेची आवेशाने घोषणा करून देवाच्या राज्याच्या आस्थेची सेवा करीत आहेत. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) कित्येक गरीब राष्ट्रात राज्य घोषकांची मोठी गरज आहे. तेथे खासपणे प्रौढ वडील व उपाध्य सेवकांची गरज आहे. तर, जेथे इतकी गरज नाही अशा आर्थिकदृष्ट्या भरभराट असलेल्या देशात जाण्यापेक्षा पुष्कळांनी आपल्याच राष्ट्रात राहण्याची निवड स्वीकारली. अशांना काय प्रतिफळ मिळाले?
अलेथिया ही पश्चिम आफ्रिकेत राहणारी व ३० वर्षे पूर्ण वेळेची सेवा करणारी सेविका म्हणतेः “मला परदेशी जीवन व्यतित करण्याची संधी चालून आली. पण मी ती न स्वीकारण्याचे कारण म्हणजे मला माझ्या लोकांसोबत तसेच नातेवाईकांसोबत राहण्याचे आवडते. त्यांना सत्य शिकवण्याची मदत देण्यात मला आनंद वाटतो, यामुळे आम्ही एकत्रपणे यहोवाची सेवा करु शकतो. येथे राहून मला एकाही गोष्टीची वाण पडली नाही आणि मला कशाचाही पस्तावा वाटत नाही.”
अशाचप्रकारे, विनिफ्रेड ही देखील एका आफ्रिकी देशात राहते. येथील शारीरिक राहणीमान हे जगातील सर्वात कमी पातळीवर असणारे समजले जाते. पण आता ४२ वर्षांच्या पूर्ण वेळेच्या कार्यानंतर ती म्हणतेः “आर्थिकदृष्ट्या सगळ्याच गोष्टी कह्यात ठेवणे हे नेहमी सोपे नाही. सैतान सर्व गोष्टी कठीण करतो, पण यहोवाने नेहमीच माझी तरतूद केली आहे व माझ्या गरजांची काळजी वाहिली आहे.”
प्राचीन काळच्या अब्राहामाबद्दल असे म्हणण्यात आले आहे की, “[देवाने] दिलेले वचन पूर्ण करावयासही तो समर्थ आहे असा त्याचा पूर्ण निश्चय होता.” (रोमकर ४:२१) तर मग, तुम्ही आपल्या जीवनात राज्य आस्थेला प्रथम स्थान देत असता यहोवा अशाचप्रकारे त्याचे वचन पूर्ण करील व तुमची काळजी वाहील असा तुम्हाला आत्मविश्वास वाटतो का? “सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा [देवाच्या] मुखीचे शास्त्र मला मोलवान वाटते,” असे जे स्तोत्रकर्त्याने लिहिले त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? (स्तोत्रसंहिता ११९:७२) किंवा प्रेषित पौलाने १ ले तीमथ्य ६:८ मध्ये दिलेली सूचना अधिक पूर्णतेने लागू करण्याची तुमच्या बाबतीत गरज आहे? ती सूचना म्हणतेः “आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्याने तृप्त असावे.” शिवाय नवीन वातावरणात जाण्यापेक्षा सध्या आहात त्याच वातावरणातून अधिक ते प्राप्त करण्याची सूज्ञ गोष्ट करणे चांगले नसेल का?
कित्येक देशातील आर्थिक परिस्थिती ख्रिश्चनांवर अधिक त्रास आणीत असेल. त्यामुळे, गोविलेल्या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केल्यावर जर एखाद्या कुटुंबाने दुसऱ्या जागी स्थलांतरीत होण्याचा विचार केला असेल तर त्याबद्दल इतरांनी टिका करण्याचे कारण नाही. (गलतीकर ६:५) तेथे बाकी राहणारे, सध्याच्या व्यवस्थीकरणापासून येणारा त्रास सहन करण्यासाठी यहोवाकडे मदत मागण्याचे चालू ठेवू शकतात व दरम्यान देव त्यांना जे आध्यात्मिक आशीर्वाद देतो त्यामध्ये आनंद करु शकतात. लवकरच या जगाचे अन्याय व त्याची अन्यायी कृत्ये यांचे देवाचे राज्य समूळ उच्चाटन करणार आहे हे लक्षात ठेवा. तेव्हा स्तोत्रकर्त्याने लिहिले त्याप्रमाणे घडून येईल की, “तू आपली मूठ उघडून सर्व प्राणिमात्रांची इच्छा पूरी करतोस.”—स्तोत्रसंहिता १४५:१६.