आम्हाला विश्वास व ज्ञानाची का जरुरी आहे
याकोबाचे पत्र यातील ठळक वैशिष्ट्ये
परिक्षा प्रसंगात असताना यहोवाच्या सेवकांना सहनशीलतेची गरज आहे. त्यांनी ईश्वरी मर्जी गमावू शकणारी सर्व पापे टाळण्यास हवीत. हे मुद्दे याकोबाचे पत्र यात जोरदारपणे सांगण्यात आले असून त्यामध्ये सरळ गोष्टी करण्याची हाक देण्यात आली आहे. याकरता विश्वास व स्वर्गीय ज्ञानाची जरुरी आहे.
या पत्राचा लेखक आपली ओळख, येशूच्या ज्या दोन प्रेषितांची नावे याकोब अशी होती, त्यापैकी एक असल्याची देत नाही. पण तो स्वतःविषयी ‘देवाचा व ख्रिस्ताचा दास’ असल्याचे म्हणतो. याचप्रकारे, येशूचा सावत्र भाऊ यहुदा आपणाविषयी, “येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधु” असे संबोधितो. (याकोब १:१; यहुदा १; मत्तय १०:२, ३) अशाप्रकारे हे स्पष्ट आहे की, हे पत्र येशूचा सावत्र भाऊ याकोब याने लिहिलेले आहे.—मार्क ६:३.
या पत्रात, यरुशलेमाचा इ. स. ७० मध्ये झालेल्या नाशाविषयीची माहिती नाही. योसेफस हा इतिहासकार सांगतो की, इ. स. ६२ मध्ये रोमी मुखत्यार फेस्त वारल्यावर काही काळातच याकोबाला हुतात्मिक मरण आले. यास्तव हे पत्र इ. स. ६२ च्या आधी लिहिण्यात आले आहे हे उघड आहे. ते आध्यात्मिक इस्राएलांच्या “बारा वंशा”ना उल्लेखून होते; कारण त्यातील मजकूर “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे” यांना अनुलक्षून आहे.—याकोब १:१; २:१; गलतीकर ६:१६.
आपला सल्ला लक्षात राहावा यासाठी याकोब उदाहरणांचा वापर करतो. उदाहरणार्थ, देवाकडे ज्ञानासाठी विनंती करणाऱ्या माणसाने संशय धरू नये, कारण “संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.” (१:५-८) आमच्या जिभेवर नियंत्रण ठेवण्यास हवे, कारण जसे लहान सुकाणू मोठ्या तारवांना दिशा दाखवितात त्याचप्रमाणे ती आम्हाला मार्गाक्रमण करावयास लावणारी आहे. (३:१, ४) तसेच जसा शेतकरी कापणीची वाट पाहात असतो त्याचप्रमाणे परिक्षेसोबत लढा देताना आपणही धीराने सहनशीलता बाळगली पाहिजे.—५:७, ८.
विश्वास, परिक्षा व कार्ये
प्रथमतः याकोब हे स्पष्ट करतो की, आम्हाला परिक्षा आल्या तरी आम्ही आनंदी ख्रिस्ती असू शकतो. (१:१-१८) यापैकीच्या काही परिक्षा, जसे की आजार हा सर्वांना सर्वसाधारण आहे; पण देव व ख्रिस्ताचा दास असण्यामुळे ख्रिश्चनांना परिक्षा सहन कराव्या लागतात. आपण यहोवाकडे विश्वासाने मागत राहिलो तर तो सहन करण्यासाठी आम्हाला सूज्ञान नक्कीच देणार. तो कधीही वाईट गोष्टींकरवी आमची परिक्षा घेत नाही, यामुळे जे चांगले आहे ते मिळविण्यासाठी आपण त्याजवर विसंबून राहू शकतो.
देवाकडील मदत मिळविण्यासाठी आम्हाला त्याची उपासना अशा कार्याद्वारे केली पाहिजे, ज्यामुळे आम्हाठायी असणारा विश्वास प्रदर्शित केला जाईल. (१:१९–२:२६) याकरता, आपण केवळ ऐकणारे नव्हे तर, “वचनाप्रमाणे आचरण करणारे” असले पाहिजे. आम्ही आमची जीभ सांभाळली पाहिजे, अनाथ व विधवांचा कैवार घेतला पाहिजे आणि जगापासून निष्कलंक असावयास हवे. आपण जर श्रीमंतावर मर्जी दाखवीत राहिलो व गरीबांना तुच्छ मानीत राहिलो तर मग, प्रीतीच्या “राजमान्य नियमा”चा भंग करणारे ठरू. अब्राहाम व राहाब यांच्या उदाहरणांद्वारे दिसते त्याप्रमाणे विश्वास हा कार्याद्वारे प्रकट होत असतो हे आपल्याला आठवणीत ठेवले पाहिजे. खरेच, “विश्वास क्रियावाचून निर्जीव आहे.”
स्वर्गीय ज्ञान व प्रार्थना
शिक्षकांनी आपली कर्तव्ये योग्यपणे पार पाडण्यासाठी विश्वास व ज्ञान जरुरीचे आहे. (३:१-१८) शिकवणारे या अर्थी त्यांच्यावर खूप गहन जबाबदारी आहे. त्यांच्याप्रमाणेच, आपणही आपली जीभ ताब्यात ठेवली पाहिजे, यासाठी स्वर्गीय ज्ञान मदत करू शकते.
आम्ही जागतिक प्रवृत्त्यांकडे झुकलो तर ते देवाबरोबरील आमचे नाते वाईट करते हे ज्ञानामुळे आपल्याला समजू शकते. (४:१–५:१२) आम्ही स्वार्थी इच्छा-आकांक्षांची पूर्ति करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच आमच्या बांधवांचा धिक्कार केला आहे तर मग, पश्चाताप करण्याची आवश्यकता आहे. शिवाय या जगाची मैत्री टाळणे हे किती महत्त्वाचे आहे, कारण तो तर आध्यात्मिक व्यभिचार आहे! जडवादीय गोष्टींच्या योजना आखीत राहून आपण देवाच्या इच्छेकडे दुर्लक्ष करू नये, शिवाय अधीर बनणे आणि एकमेकांना दुःखी करणे या गोष्टीविरुद्ध दक्ष राहिले पाहिजे.
कोणी आध्यात्मिक रितीने आजारी आहे तर त्याने मंडळीच्या वडीलांची मदत घ्यावी. (५:१३-२०) त्याने पापे केली असली तर वडीलांच्या प्रार्थना तसेच सूज्ञ सल्ला पश्चाताप्यास आध्यात्मिक आरोग्य पुन्हा प्राप्त करण्याची मदत पुरवू शकेल. खरे पाहता, “पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवितो, तो [पापी माणसाचा] जीव [आध्यात्मिक तसेच चिरकालिक] मरणापासून वाचवील.”
[२९ पानावरील चौकट]
वचनाप्रमाणे आचरण करणेः आपण “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा[वे], केवळ ऐकणारे असू” नये. (याकोब १:२२-२५) केवळ ऐकणारा “आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे.” आपला चेहरा बघून तो तेथून निघून जातो “आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो.” पण ‘वचनाप्रमाणे आचरण करणारा’ ख्रिश्चनांच्या बाबतीत जे जे अपेक्षित आहे त्या देवाच्या परिपूर्ण किंवा संपूर्ण नियमाकडे पाहतो. तो “तसेच करीत राहतो,” म्हणजे त्या नियमाचे परिक्षण करून त्याच्यानुरुप बनण्यासाठी स्वतःच्या दृष्टीकोणात सुधारणा करतो. (स्तोत्रसंहिता ११९:१६) “कृति करणारा” माणूस आरशात बघणाऱ्या व दिसते ते लगेच विसरणाऱ्या माणसापेक्षा कसा भिन्न आहे? कृति करणारा यहोवाचे वचन कृतीत आणतो व त्याची कृपा मिळवितो!—स्तोत्रसंहिता १९:७-११.