विधवा असले तरी मला खरे समाधान आढळले
लिली आर्थर यांनी दिलेले निवेदन
भारतात उटकमंड येथील एका विभागात यहोवाच्या साक्षीदारांचा एक तरुण सेवक घरोघरचे कार्य करीत होता. स्त्रियांनी कोणा अनोळखी इसमाला दार उघडू नये असा येथील प्रघात आहे. त्यामुळे काही तासानंतर थकलेला, थोडासा निरुत्साही बनलेला तो सेवक घरी जाण्यास निघाला. तथापि, तो थांबला आणि पुढील दारी भेट दिलीच पाहिजे अशी त्याला ओढ वाटली. यानंतर जे घडले, ते, ज्या स्त्रीने त्याच्यासाठी दार उघडले, तिच्याच शब्दातून ते ऐका.
माझी दोन महिन्याची हातात असलेली मुलगी व साधारण दोन वर्षे वयाचा माझ्या बाजूस उभा असलेला मुलगा या स्थितीत मी दार उघडले, आणि पाहिले की, कोणी अनोळखी माणूस दारात उभा आहे. खरे म्हणजे, मी आदल्या रात्री बरीच खिन्न झाले होते. समाधान मिळावे म्हणून मी देवाला प्रार्थना केली होतीः “हे स्वर्गीय पित्या, तू आपल्या वचनाने माझे सांत्वन कर.” आता, तो अनोळखी बोलू लागला. तो म्हणालाः “मी देवाच्या वचनातील सांत्वनाचा व आशेचा संदेश तुमच्यासाठी आणला आहे.” हे ऐकून तर मी आश्चर्यचकितच झाले. हा देवाने पाठविलेला कोणी संदेष्टा असावा असे मला वाटले. तथापि, माझी परिस्थिती अशी काय होती की, ज्यामुळे मी प्रार्थनेच्या द्वारे सांत्वनाचा शोध घेत होते?
पवित्र शास्त्रीय सत्य शिकणे
दक्षिण भारतातील सुंदर अशा निलगिरी पर्वतातील गुडालूर खेड्यात १९२२ मध्ये माझा जन्म झाला. मी तीन वर्षांची होत्ये तेव्हा माझी आई मरण पावली. नंतर, प्रॉटेस्टंट पंथाचे पाळक असणाऱ्या माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले. आम्ही बोलायला लागलो तोच वडिलांनी मला व माझ्या भावाबहिणींना प्रार्थना करायला शिकवले. मी चार वर्षांची होत्ये तेव्हा, वडील आपल्या बाकावर पवित्र शास्त्र वाचण्यास बसत तेव्हा मी जमिनीवर बसून माझे पवित्र शास्त्र वाचीत असे.
मोठी झाल्यावर मी शिक्षिका बनले. मी २१ वर्षांची झाल्यावर माझे लग्न झाले. आम्हाला सुंदर या पुत्राचा व रत्ना या मुलीचा लाभ झाला. रत्ना जन्मल्यावर माझे पति खूपच आजारी पडले व काही काळातच त्यांचा देहांत झाला. आता वयाच्या २४ व्या वर्षी मी दोन लहान मुलांची जबाबदारी असताना अचानक विधवा बनले.
यानंतर मी देवाला त्याच्या वचनातून मला सांत्वन देण्याबद्दलची कळकळीची विनंती केली. आणि आता दुसऱ्याच दिवशी त्या यहोवाच्या साक्षीदार सेवकाने माझी भेट घेतली. मी त्याला आत बोलावले आणि त्याच्याकडून “देव सत्य होवो” हे प्रकाशन घेतले. त्या रात्री मी त्या प्रकाशनाचे वाचन केले व असे दिसले की, यात यहोवा हे नाव आहे. ते मला अपरिचित होते. त्या सेवकाने पुन्हा येऊन माझी भेट घेतली व त्याने पवित्र शास्त्रातून मला दाखविले की, ते देवाचे नाव आहे.
लवकरच मला शिकायला मिळाले की, त्र्यैक्य व नरकाग्नी या शिकवणी पवित्र शास्त्रातून नाहीत. देवाच्या राज्याखाली पृथ्वी नंदनवन होईल, आणि मेलेले प्रियजन पुनरुत्थान प्राप्त होऊन परततील हे जाणून मला मोठे सांत्वन व आशा लाभली. अधिक महत्त्वाचे ते हे की, ज्याने माझी प्रार्थना ऐकली व जो माझ्या मदतीस धावून आला त्या खऱ्या देवाला म्हणजे यहोवाला मी ओळखू लागले व त्याजवर माझी प्रीती जडली.
नव्याने मिळालेल्या ज्ञानाची सहभागिता करणे
मला याचे नवल वाटायला लागले की, देवाचे नाव असणारी ती शास्त्रवचने माझ्या नजरेतून कशी चुकली. तसेच माझ्या वाचनात नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची स्पष्ट आशा कशी बघू शकले नाही याचेही मला नवल वाटले. मी प्रॉटेस्टंट मिशनऱ्यांच्या शाळेत शिकवीत होते, त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापक बाईंना मी ती शास्त्रवचने दाखवली. (निर्गम ६:३; स्तोत्रसंहिता ३७:२९; ८३:१८; यशया ११:६-९; प्रकटीकरण २१:३, ४) मी असेही म्हटले की, कसेतरी आपले त्याकडे दुर्लक्ष झाले होते. पण माझ्या म्हणण्यामुळे त्यांच्या चर्येवर कसलाही भाव दिसला नाही तेव्हा मला खरोखरीच आश्चर्य वाटले.
मग, मी दुसऱ्या शहरात राहणाऱ्या आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेला ही शास्त्रवचने लिहून पाठवली व त्यांच्यासोबत बोलण्याची संधि मिळावी अशी विनंती केली. त्यांनी लिहिले की, त्यांचे वडील, जे इंग्लंडमधून शिक्षण घेऊन आलेले प्रख्यात पाळक होते, ते याविषयीची चर्चा मजसोबत करतील. या मुख्याध्यापिकेचा एक भाऊ नामांकित बिशप होता.
मी सर्व मुद्दे, शास्त्रवचने यांची तयारी केली; सोबत “देव सत्य होवो” हे पुस्तक घेतले आणि मुलांसह या दुसऱ्या शहरी आले. मी मोठ्या उत्सुकतेने यहोवा कोण आहे, त्र्यैक्य का नाही व इतर शिकलेल्या गोष्टींचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी ते थोडा वेळ ऐकले पण एकही शब्द काढला नाही. मग, इंग्लंडचे पाळक म्हणालेः “मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन.” त्यानंतर त्यांनी प्रार्थना केली व मला पाठवून दिले.
रस्त्यावरील साक्षीकार्य
एके दिवशी यहोवाच्या साक्षीदारांच्या सेवकाने मला द वॉचटावर व अवेक! ही मासिके हाती धरुन रस्त्यावरील साक्षीकार्य करण्यासाठी निमंत्रण दिले. मी त्याला म्हटले की, मला हे कधीच जमणार नाही. भारतात एखादी स्त्री कोठे रस्त्यावर उभी राहिली किंवा घरोघरी जात असलेली पाहण्यात आली तर तिच्याविषयी लोक वाईट ते बोलतात. यामुळे त्या स्त्रीची निंदा तर होतेच पण त्यासोबत तिच्या कुटुंबाचीही नालस्ती होते. मला माझ्या वडीलांविषयी खूपच प्रीती व आदर वाटत होता, त्यामुळे त्यांची निंदा व्हावी असे मला वाटत नव्हते.
पण, त्या सेवकाने मला पवित्र शास्त्रातील एक वचन दाखविले, जे असे म्हणतेः “माझ्या मुला, सूज्ञ होऊन माझे अंतःकरण हर्षित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्याला मी प्रत्त्युतर देईन.” (नीतीसूत्रे २७:११, किंग जेम्स व्हर्शन) त्याने म्हटलेः “तुम्हाला यहोवाचे अंतःकरण, त्याच्याबद्दल व त्याच्या राज्याबद्दल जाहीर ग्वाही देऊन आनंदी करता येईल.” इतर सर्व गोष्टींपेक्षा यहोवाचे अंतःकरण आनंदी करण्याचा विचार प्रबळ वाटून मी मासिकांची पिशवी घेतली, व रस्त्यावरील साक्षीकार्य करण्यासाठी त्याच्या बरोबर गेले. मी ते कसे केले हे आजवर मला सुचत नाही. हे १९४६ मध्ये माझा संपर्क आल्यावर साधारण चार महिन्यांनी घडले.
भयावर मात करण्यास उत्तेजन दिले गेले
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर म्हणजे मद्रासच्या सीमेवर एके ठिकाणी १९४७ मध्ये मी शिकवणीचे एक काम पत्करले व या शहरी माझ्या मुलांसहित स्थलांतरीत झाले. येथे यहोवाच्या साक्षीदारांचा आठ जणांचा एक गट नियमितपणे एकत्र येत होता. येथे सभेला जाण्यासाठी आम्हाला २५ किलोमीटर्सचा प्रवास करावा लागे. त्या काळी भारतात स्त्रिया एकट्या प्रवास करीत नसत. त्या आपल्या पतींवर वा नातेवाईकांवर अवलंबून राहात. मला तर बसमध्ये कसे चढायचे, तिकीट कसे घ्यायचे व बसमधून कसे उतरायचे इत्यादि गोष्टी ठाऊक नव्हत्या. मला सारखे वाटायचे की, मी यहोवाची सेवा करावी. पण कशी? मी प्रार्थना केलीः “हे यहोवा देवा, मला तुझी सेवा न करता जीवन जगता येणे शक्य नाही. पण एक भारतीय स्त्री म्हणून मला घरोघर जाणेही अगदी अशक्य आहे.”
या द्विधा मनःस्थितीतून यहोवा मला मरणाद्वारे मुक्त करील अशी मी आशा धरली. तथापि, मी पवित्र शास्त्रातून काहीतरी वाचावे असे ठरविले. मी पवित्र शास्त्र सहज उघडले, तो यिर्मयाचे पुस्तक आले आणि तेथे जे वाचले ते असे होतेः “मी बाळ आहे असे म्हणू नको. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याजकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल. त्यांस भिऊ नको. तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे.”—यिर्मया १:७, ८.
त्यावेळी मला, यहोवा माझ्यासोबत खरोखरीच बोलत आहे असे वाटले. त्यामुळे मी धाडस बांधले व चटकन घरातील शिवणयंत्राकडे जाऊन मासिके घेऊन जाण्यासाठी एक पिशवी शिवली. मग, कळकळीची प्रार्थना केल्यावर मी घरोघर एकटीच गेले, आणि आश्चर्य ते काय, त्या दिवशी मी माझी सर्वच प्रकाशने वितरीत केली आणि एक पवित्र शास्त्र अभ्यास देखील सुरु केला. तेव्हा मी माझ्या जीवनात यहोवालाच प्रथम स्थान देण्याचा व त्याजवरच आपली निष्ठा व आत्मविश्चास राखण्याचा निर्णय घेतला. लोक कुजबुजत होते तरी, जाहीर प्रचार कार्य हे माझ्या जीवनाचा एक नित्य भाग बनले. विरोध झाला तरी माझ्या कार्याने काहींवर चांगलीच छाप पाडली.
हे, एकदा मी व माझी मुलगी, नंतर पुन्हा मद्रासमध्ये कित्येक वर्षानंतर घरोघरचे साक्षीकार्य करण्यासाठी गेलो तेव्हा दिसून आले. उच्च न्यायालयात न्यायाधीश असणाऱ्या एका हिन्दू सभ्य गृहस्थांनी माझे वय चुकीचे गृहीत धरुन मला म्हटलेः “तुमचा जन्म होण्यापूर्वी मी ह्या मासिकांसोबत परिचित आहे. ३० वर्षांपूर्वी माऊंट रस्त्यावर एक स्त्री उभी राहून नियमितपणे ही मासिके सादर करीत असे.” त्यांना वर्गणी भरायची होती.
दुसऱ्या एका घरी, सेवानिवृत्त अधिकारी असणाऱ्या एका हिंदू ब्राम्हणांनी आम्हाला आत बोलावले. ते म्हणालेः “फार फार वर्षापूर्वी एक स्त्री माऊंट रस्त्यावर द वॉचटावर मासिक सादर करीत असे. तुम्ही जे काही सादर करीत आहात, ते मी तिच्या सन्मानाप्रीत्यर्थ घेतो.” मला स्मित करावे लागले, कारण ज्या स्त्रीबद्दल त्या दोघांनी बोलणी केली होती. ती स्त्री मीच होते हे मला ठाऊक होते.
बळकटी व आशीर्वाद
ऑक्टोबर १९४७ रोजी एके दिवशी मी यहोवाला पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे आपले समर्पण केले. त्यावेळी तामिळ राज्यात तामिळ बोलणारी साक्षीदार अशी मी एकटीच होते, परंतु आज तर शेकडो तामिळी स्त्रिया विश्वासू व क्रियाशील अशा यहोवाच्या साक्षीदार आहेत.
माझा बाप्तिस्मा झाल्यानंतर मला चोहोकडून विरोध झाला. माझ्या भावाने लिहिले की, “सर्व सभ्यता व शिष्टाचार यांच्या पलिकडे तू पाऊल टाकले आहे.” ज्या शाळेत मी काम करीत होते तेथून व समाजातही मला विरोध झाला. तथापि, सतत कळकळीच्या प्रार्थनेद्वारे मी यहोवास अधिकच बिलगून राहिले. मध्यरात्री मला कधी अचानक जाग आलीच तर मी चटकन रॉकेलचा दिवा लावून अभ्यास करीत असे.
माझी बळकटी झाली तसतसे मी इतरांसाठी सांत्वन व मदतीचा स्रोत होऊ शकले. मी अभ्यास करणाऱ्या एका वृद्ध हिंदू महिलेने यहोवाच्या भक्तीसंबंधाने दृढ भूमिका घेतली. ती वारली तेव्हा तिच्या घरातील दुसऱ्या एका स्त्रीने असे म्हटलेः “यांनी ज्या देवाची भक्ती करण्याचे निवडले त्याला शेवटपर्यंत आपली निष्ठा दाखवली याचा आम्हाला मोठा आनंद होतो.”
आणखी एका स्त्रीसोबत मी अभ्यास करीत असे, जिने कधीच स्मितहास्य केले नव्हते. तिच्या चेहऱ्यावर चिंता व दुःख नेहमीच दिसत. पण यहोवाविषयी शिकवल्यानंतर मी तिला त्याला प्रार्थना करण्याचे उत्तेजन दिले व म्हटले की, तो आमच्या समस्या जाणतो व आमची काळजी वाहतो. पुढच्या आठवडी तिची भेट घेतल्यावर तिचा चेहरा उजळलेला दिसला. “मी यहोवाची प्रार्थना करीत आहे,” ती म्हणाली. “आणि मला मनाची व अंतःकरणाची शांती मिळाली आहे.” तिने आपले जीवन यहोवास समर्पित केले आणि कित्येक अडचणी असल्या तरी ती विश्वासू राहिली आहे.
जबाबदाऱ्यांचा समतोलपणा राखणे
दोन लहान मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी असल्यामुळे, एक पायनियर या नात्याने यहोवाची पूर्ण वेळेची सेवा करण्याचे मजकडून होणार नाही याची मला कल्पना आली. पण मग, सेवेचे एक नवे दालन उघडण्यात आले. पवित्र शास्त्र प्रकाशनांचे तामिळ भाषेत भाषांतर करण्यासाठी कोणी तरी हवा होता. मी, यहोवाच्या मदतीने, या नेमणूकीस पूर्ण करू शकले व याच वेळी शिक्षिका या नात्याने प्रापंचिक काम करुन मुलांची काळजी घेऊ शकले, घरची कामे करु शकले, सर्व सभांना जाऊ शकले व क्षेत्रकार्यात भाग घेऊ शकले. सरतेशेवटी, मुले मोठी झाल्यावर मी खास पायनियर होऊ शकले व ही सेवा गेल्या ३३ वर्षांपासून मी करीत आहे.
सुंदर व रत्ना ही माझी मुले लहान होती तेव्हा त्यांच्या हृदयी यहोवाकरता प्रीती व जीवनातील प्रत्येक पैलूत यहोवाची आस्था प्रधान स्थानी ठेवण्याची इच्छा, बिंबवण्यासाठी प्रयत्न केला. सकाळी उठल्यावर ज्याच्यासोबत प्रथम बोलायचे आणि रात्री झोपण्याआधी ज्याच्याबरोबर बोलायचे तो यहोवा आहे, हे त्यांना ठाऊक होते. त्यांना हेही ठाऊक होते की, शाळेचा गृहपाठ असला तरी ख्रिस्ती सभा व क्षेत्रकार्याची तयारी ही दूर करायची नव्हती. शाळेचा अभ्यास चांगला करण्याचे मी त्यांना उत्तेजन दिले तरी उच्च श्रेणी मिळवावी याबद्दल मी कधीही जोर धरला नाही, न जाणो, कदाचित ते हीच गोष्ट ते आपल्या जीवनात अग्रभागी धरतील अशी मला भीती वाटली.
मुलांचा बाप्तिस्मा झाल्यावर त्यांनी शाळेच्या सुटीचा उपयोग पायनियरींग करण्यासाठी केला. मी रत्नाला उपदेश केला की तिने मजसारखी भित्री व लाजाळू न होता धैर्यवान व्हावे. तिचे माध्यमिक शाळेचे शिक्षण व व्यावसायिक तालीम पूर्ण झाल्यावर तिने पायनियरींग सुरु केली व ती खास पायनियर बनली. काही काळातच तिचा रिचर्ड गॅब्रीएल या फिरत्या देखरेख्यांशी विवाह झाला, जे आता भारतातील वॉचटावर सोसायटीमध्ये शाखा दप्तराचे संयोजक म्हणून काम बघत आहेत. ते, त्यांची बायको व यांची मुलगी अबीगेईल हे भारतातील शाखा दप्तरात पूर्ण वेळेचे काम करीत आहेत व मुलगा ॲन्ड्रू सुवार्तेचा एक प्रचारक आहे.
तथापि, सुंदर १८ वर्षांचा होता, तेव्हा त्याने यहोवाच्या साक्षीदारांचा सहवास सोडला. यामुळे मी किती दुःखी झाले. यानंतरची पुढील वर्षे मला सतत यातना होत गेल्या. मी सतत यहोवाची विनवणी करीत राहिले की, जर त्याची वाढ करण्यात माझ्या हातून काही चूक झाली असल्यास त्याने माझी क्षमा करावी, आणि सुंदरला ताळ्यावर आणावे की, ज्याद्वारे तो परत येऊ शकेल. पण काही काळातच, सर्व आशा विफोल ठरल्या. मग, १३ वर्षानंतर तो परत आला व मला म्हणालाः “आई, काळजी करू नको. मी चांगला वागेन.”
यानंतर, लागलेच सुंदरने आध्यात्मिक प्रौढ बनण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले. त्याने इतकी प्रगति घडवून आणली की, यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीची देखरेख त्याच्यावर सोपवण्यात आली. पुढे पायनियर होण्यासाठी त्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली. आता तो व त्याची बायको एस्तेर, भारताच्या दक्षिणेकडील बंगलोर शहरात एकत्र मिळून सेवा करीत आहेत.
आयुष्यभरचे सांत्वन
गेल्या कित्येक वर्षांत मला ज्या त्रास किंवा अडचणींमधून जावे लागले त्याबद्दल मी यहोवाचे आभार मानते. कारण या अनुभवांशिवाय यहोवाच्या चांगुलतेचा इतका विपुल अनुभव मला मिळू शकला नसता. त्याची दया, त्याची कळकळ व सहानुभूति या गोष्टींचाही मला अनुभव मिळू शकला. (याकोब ५:११) “अनाथ व विधवा” यांची यहोवा किती चांगलेपणाने काळजी घेतो हे पवित्र शास्त्रात वाचणे अंतःकरणास उबविते. (अनुवाद २४:१९-२१) पण प्रत्यक्षात त्याची काळजी व कळकळ यांचा अनुभव घेणे याच्याशी कशाचीही तुलना होऊ शकत नाही.
मी यहोवावर पूर्ण विश्वास ठेवण्यास, तसेच स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून न राहता, आपल्या सर्व मार्गात त्याची आठवण करण्यास शिकले आहे. (स्तोत्रसंहिता ४३:५; नीतीसूत्रे ३:५, ६) एक तरुण विधवा असताना मी देवाला त्याच्या वचनांद्वारे सांत्वन मिळावे म्हणून प्रार्थना केली होती. आता ६९ वर्षांची झालेली असताना मी खरेपणाने असे म्हणू शकते की, पवित्र शास्त्राची समज होण्यात व त्यातील सल्ला लागू करण्यामध्ये मला जे सांत्वन मिळू शकले ते खरेच अगम्य आहे.
[२७ पानांवरील चित्रं]
लिली आर्थर आपल्या कुटुंबियासह