रोमकर सर्वात उत्तम अशी वार्ता मिळवतात
एखादा पापी मनुष्य कशाप्रकारे देवाच्या दृष्टीत नीतीमान ठरेल व सार्वकाळचे जीवन मिळवू शकेल? या प्रश्नाने आमच्या समान शकाच्या पहिल्या शतकात चोहोकडे चर्चेचे सत्र उठविले होते. तुम्हाला त्याचे उत्तर माहीत आहे का? तुम्हाला ते माहीत असो वा नसो, तरी या विषयास प्रेषित पौलाने, पवित्र शास्त्रातील रोमकरांस पत्र या पुस्तकात ज्या कौशल्याने हाताळले आहे ते स्वतः वाचणे हे तुम्हाकरिता योग्यतेचे ठरेल. असे केल्यामुळे तुम्हाला विश्वास, कर्मे, नीतीमत्व व जीवन यातील महत्त्वाचे दुवे लक्षात येण्यास मदत मिळेल.
पौल व रोमकर
रोमकरांस पत्र हे इ. स. ५६ मध्ये पौलाने रोममधील ख्रिश्चनांना लिहिलेले पत्र आहे. त्याने हे पत्र का लिहिले असावे? पौलाने इ. स. ५६ पर्यंत रोमला भेट दिली नव्हती तरी तेथील अनेक ख्रिश्चनांशी तो चांगला परिचित असावा हे, त्याने त्याच्या पत्रात त्यांचा नावाने उल्लेख केलेला आढळतो, यावरुन स्पष्ट आहे. याशिवाय, रोममधील त्याच्या ख्रिस्ती बांधवांना तेथे जाऊन उत्तेजन देण्याची त्याची उत्कट इच्छा होती; तसेच स्पेनला जाण्यास त्याजकरिता ज्या यात्रेची आखणी झाली होती तीत रोममध्ये थोडासा मुक्काम करावा असेही तो योजीत असावा.—रोमकर १:११, १२; १५:२२-२४.
तथापि, हे पत्र लिहिण्यामागील पौलाचा प्रमुख उद्देश हा होता की त्या महत्त्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर द्यावेः जीवनाप्रत नेणाऱ्या नीतीमत्तेची प्राप्ती लोकांना कशी करता येईल? याचे उत्तर हे सर्वात उत्तम अशी वार्ता बनते. विश्वासाच्या आधारावर नीतीमत्त्व मोजण्यात येते. हाच मुद्दा पौल स्पष्ट करतो व त्याच्या पत्राचा विषय स्पष्ट करण्यात तो म्हणतोः “मला सुवार्तेची लाज वाटली नाही; कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारणाप्रीत्यर्थ देवाचे सामर्थ्य अशी आहे. प्रथम यहुद्यांस मग हेल्लेण्यांस. कारण तिच्यात देवाचे न्यायत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते. ‘नीतीमान विश्वासाने वाचेल,’ अशा शास्त्रलेख आहे.”—रोमकर १:१६, १७.
विश्वास व नियमशास्त्र
नीतीमत्व हे विश्वासाकरवी जमेस धरले जाते हे पहिल्या शतकात सर्वांनाच कबुल नव्हते. तोंडी बडबडणारा एक छोटा गट यावर जोर देऊन होता की, काही अधिक हवे आहे. यहोवाने मोशेद्वारेचे नियमशास्त्र पुरविलेले नाही का? मग, प्रत्येक जन त्या ईश्वरप्रेरित तरतुदीच्या अधीन झाल्याविना नीतीमान कसा ठरू शकेल? (पहा गलतीकर ४:९-११, २१; ५:२.) इ. स. ४९ मध्ये नियमशास्त्राच्या अधीन राहण्याच्या प्रश्नाबद्दल यरुशलेमातील नियमन मंडळाच्या सभेत बरीच चर्चा झाली व ते या निर्णयास पोहंचले की, जे विदेशी सुवार्तेचा स्वीकार करतात अशांनी सुंता करवून घेण्याची तसेच यहुदी नियमशास्त्राच्या अधीन राहण्याची गरज नाही.—प्रे. कृत्ये १५:१, २, २८, २९.
यानंतर सुमारे सात वर्षांनी पौलाने रोमकरांना हे पत्र पाठवून त्या लक्षणीय निर्णयावर अधिक भर दिला. खरे म्हणजे, तो याहीपेक्षा पुढे गेला. विदेशी ख्रिश्चनांसाठी नियमशास्त्र जरुरीचे नव्हते इतकेच नसून जे यहुदी त्याचे आज्ञापालन करण्यावर विसंबून होते ते जीवनासाठी नीतीमान ठरणार नाहीत असेही त्याने प्रतिपादिले.
विश्वासाद्वारे नीतीमत्वाची प्राप्ती
आपण जसजसे रोमकरांस पत्र हे वाचत राहाल तसतसे आपल्या लक्षात येईल की, पौल केवढ्या काळजीने हे प्रकरण गुंफतो व आपल्या विधानांना अनेक इब्री शास्त्रवचनांची अवतरणे जोडतो. आपल्या प्रेरित शिकवणींचा स्वीकार करण्यास कठीण वाटणाऱ्या यहुद्यांसोबत बोलताना तो आपुलकी व सहानुभूती दाखवितो. (रोमकर ३:१, २; ९:१-३) तरीसुद्धा तो आपली बाजू अगदी स्पष्ट शब्दात व निर्विवाद युक्तीवादाने समोर मांडीत होता.
रोमकरांस पत्राच्या १ ते ४ अध्यायामध्ये पौल या सत्यासह सुरवात करतो की, प्रत्येकजण पापाधीन आहे. यास्तव मनुष्यजातीस नीतीमान घोषित करण्याचा एकमेव मार्ग विश्वासावर आधारीत आहे. हे खरे की, यहुदी स्वतःस नीतीमान ठरविण्यात नियमशास्त्राचे पालन करण्याची शिकस्त करीत होते. पण ते निष्फळ ठरले. यासाठीच पौल मोठ्या धैर्याने म्हणतोः “यहुदी व हेल्लेणी ही उभयता पापवश आहेत.” तो या अप्रिय सत्याची सिद्धता अनेक शास्त्रवचनांचे पुरावे सादर करून करतो.—रोमकर ३:९.
जर “कोणी मनुष्य नियमशास्त्रातील कर्मांनी नीतीमान ठरणार नाही,” मग काय आशा आहे? देव स्वतः काही माणसांना येशूच्या खंडणी यज्ञार्पणाच्या आधारावर नीतीमानाचे बक्षिस जाहीर करतो. (रोमकर ३:२०, २४) हे बक्षिस मिळविण्याच्या पात्रतेचे ठरण्यासाठी त्यांनी त्या यज्ञार्पणावर विश्वास ठेवला पाहिजे. विश्वासाच्या आधारावर नीतीमान असल्याचे घोषित करणे ही शिकवण काहीशी नवी होती का? मुळीच नाही. कारण अब्राहाम तर नियमशास्त्राची स्थापना होण्याआधीपासून त्याच्याठायीच्या विश्वासामुळे नीतीमान ठरविला गेला.—रोमकर ४:३.
विश्वासाचे महत्त्व पटविल्यावर पौल ५ व्या अध्यायात ख्रिस्ती विश्वासाच्या मूळाधाराची चर्चा करतो. हा येशू आहे व याचे नीतीमान चारित्र्य, जे कोणी त्याच्यावर विश्वास प्रकट करतात अशांचा आदामाच्या पापापासूनच्या हर दुषित परिणामापासून बचाव करते. अशाप्रकारे, “जसा एका अपराधाने सर्व मनुष्यावर दंडाज्ञेचा परिणाम झाला, तसा नीतीमान ठरविले जाण्याच्या एका ठरावाने सर्व मनुष्यांवर जीवनदायी नीतीमत्व हा परिणाम झाला.”—रोमकर ५:१८.
आक्षेपांना उत्तरे
मग, जरी ख्रिस्ती नियमशास्त्राधीन नाहीत तरी त्यांना, पुढे सरसावून पापे करीत राहण्यात व काहीही झाले तरी देवाच्या विपुल कृपेमुळे नीतीमान घोषित असल्याचे जमेस धरण्यापासून कोणती गोष्ट रोखू शकते? या आक्षेपाचे पौल रोमकरांस पत्र अध्याय ६ मध्ये उत्तर देतो. ख्रिश्चन हे त्यांच्या गत आयुष्यातील पापी मार्गांना मेलेले असतात. त्यांना येशूमध्ये मिळालेले नवजीवन पार्थिवतेच्या कमतरतांशी झुंज देण्याची जबाबदारी त्यांच्यावर लादते. “तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून आपल्या मर्त्य शरीरात पापसत्ता चालू देऊ नका.”—रोमकर ६:१२.
पण निदान यहुदी तरी मोशेच्या नियमशास्त्रास चिकटून राहू शकतील का? पौल अध्याय ७ मध्ये अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने विवेचीत करतो की ते तसे नाही. जशी कोणी विवाहीत स्त्री आपल्या पतीच्या मृत्युनंतर त्याच्या पतिनियमांपासून मोकळी होते त्याचप्रमाणे येशूच्या मृत्युमुळे विश्वासू यहुद्यांना नियमशास्त्राच्या अधीनतेपासून मोकळे करण्यात आले आहे.
पौल म्हणतोः “तुम्हीही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्रास मेलेले आहा.”—रोमकर ७:४.
याचा असा अर्थ होतो का की, नियमशास्त्रात काही चूक होती? कधीच नाही. नियमशास्त्र परिपूर्ण होते. तर अडचण ही होती की, अपूर्ण मानव नियमशास्त्राचे पालन करू शकत नव्हते. “आपणाला ठाऊक आहे की, नियमशास्त्र हे आध्यात्मिक स्वरुपाचे आहे,” असे पौल लिहितो. “आणि मी तर दैहिक, पापाला विकलेला असा आहे.” अपूर्ण मानव देवाकडील परिपूर्ण नियमशास्त्र पालन करू शकत नव्हते व यामुळेच ते त्याकरवी धिक्कारले गेले होते. तर मग, हे केवढे आश्चर्यजनक आहे की, “जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत अशांना आता दंडाज्ञा नाही”! अभिषिक्त ख्रिश्चनांना पवित्र आत्म्याद्वारे देवाचे पुत्र होण्यास दत्तक घेण्यात आले. यहोवाचा आत्मा त्यांना शारीरिक कमतरतांशी सामना करण्यात साहाय्य करतो. “देवाच्या निवडलेल्या लोकांवर कोण दोषारोप ठेवील? नीतीमान ठरविणारा” देव आहे. (रोमकर ७:१४; ८:१, ३३) देवाच्या प्रीतीपासून त्यांना कोणीही वेगळे करू शकत नाही.
नीतीमत्ता व पार्थिव यहुदी
जर यापुढे नियमशास्त्राची गरज राहिलेली नाही तर मग, इस्राएल राष्ट्राची काय दशा आहे? इस्राएलांचे पुनर्वसन होण्याविषयीची जी अभिवचने देण्यात आली त्या शास्त्रवचनांचे काय? या प्रश्नांची हाताळणी रोमकरांच्या पत्रातील अध्याय ९ ते ११ मध्ये करण्यात आली आहे. इब्री शास्त्रवचनांनी भाकित केले होते की, इस्राएलांपैकी केवळ थोड्यांचाच बचाव होईल आणि देव आपले लक्ष विदेश्यांकडे वळवील. याच्याच एकमतात, इस्राएलांच्या तारणाबाबत करण्यात आलेल्या भाकितांची पूर्णता पार्थिव इस्राएलात नव्हे तर ख्रिस्ती मंडळी, जेथे विश्वासू पार्थिव यहुदी व सरळ मनाचे विदेशी आहेत त्यांच्यामध्ये झालेली आहे.—रोमकर १०:१९-२१; ११:१, ५, १७-२४.
नीतीमत्तेची तत्त्वे
रोमकरांच्या पत्राच्या १२ ते १५ अध्यायात पौल अशा काही व्यावहारिक मार्गांची चर्चा करतो ज्यामध्ये अभिषिक्त ख्रिस्तीजन त्यांना नीतीमान घोषित करण्यात आलेल्या पाचारणाच्या अनुषंगाने आपले जीवन व्यतित करू शकतात. उदाहरणार्थ, तो म्हणतोः “तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका तर मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ द्या.” (रोकमर १२:१, २) आम्ही चांगल्या गोष्टींवर विश्वस्त राहावे व वाईटाने वाईटाला जिंकण्याचा मनोदय राखू नये. “वाईटाने जिंकला जाऊ नको,” असे पौल लिहितो, “तर बऱ्याने वाईटाला जिंक.”—रोमकर १२:२१.
पौलाच्या काळात रोम हे राजकीय सत्तेचे मुख्य केंद्र होते. या कारणासाठीच पौलाने ख्रिश्चनांना सूज्ञपणे असा उपदेश केलाः “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यास मान्य असावे. कारण देवापासून नाही असा अधिकारच नाही.” (रोमकर १३:१) ख्रिश्चनांचा आपसातील व्यवहार हा नीतीमत्तेच्या अनुषंगाने जीवन व्यतित करण्याचा एक भाग आहे. “एकमेकांवर प्रीती करणे याशिवाय कोणी कोणाचे ऋणी असू नका,” असे पौल सांगतो, “कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो तो नियमशास्त्र पूर्णपणे पाळितो.”—रोमकर १३:८.
यासोबत, ख्रिश्चनांनी एकमेकांच्या विवेकाबद्दल न्यायदंडाची दृष्टी नव्हे तर विचारशील वृत्ती राखावी. पौल विनवितोः “तर मग, जेणेकरून शांती व परस्परांची अभिवृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे.” (रोमकर १४:१९) ख्रिस्ती जीवनाच्या सर्वांगाला लागू पडेल असा हा केवढा उत्तम उपदेश बरे! मग, १६ व्या अध्यायात पौल व्यक्तीगत अभिवादन व समारोपाचा बोध व उत्तेजन प्रस्तुत करतो.
अभिषिक्त व दुसरी मेंढरे यांजसाठी
रोमकरांस पत्र यात जो विषय हाताळलेला आहे तो जसा पहिल्या शतकात महत्त्वाचा होता तसाच तो आजही महत्त्वपूर्ण आहे. यहोवाच्या सर्व सेवकांना नीतीमत्ता व सार्वकालिक जीवन या गोष्टी अगत्याच्या वाटतात. हे खरे की, रोमकरांस पत्र हे अभिषिक्त ख्रिश्चनांना लिहिलेले आहे, पण आज अधिक संख्येचे यहोवाचे साक्षीदार “मोठा लोकसमुदाय” वर्गातून असून त्यांची आशा पृथ्वीवरील जीवनाची आहे. (प्रकटीकरण ७:९) असे असले तरीही हे पत्र त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा संदेश देऊन आहे. तो काय आहे?
रोमकरांस पत्र हे पुस्तक शाबीत करते की, ख्रिश्चनांना विश्वासाद्वारे नीतीमान ठरविण्यात येते. अभिषिक्तांसाठी हा नीतीमानपणा स्वर्गीय राज्यात येशूसोबत सहराजे यानात्याने असण्यात परिणामित होतो. पण मोठ्या लोकसमुदायातील सदस्यांनाही नीतीमान ठरविण्यात येते ते या अर्थी की, जसा कुलपिता अब्राहाम होता तसेच हेही ‘देवाचे मित्र’ बनतात. (याकोब २:२१-२३) त्यांचा हा नीतीमानपणा त्यांना मोठ्या संकटातून बचावण्यात परिणामित होतो व तो अभिषिक्तांप्रमाणेच येशूच्या रक्तावरील विश्वासावर आधारीत आहे. (स्तोत्रसंहिता ३७:११; योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९, १४) यास्तव, पौलाने रोमकरांस पत्रात जी समर्थनीय चर्चा मांडली ती इतर मेंढरे त्याचप्रमाणे अभिषिक्तांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच आम्हास नीतीमान असे ठरविण्यात आल्यामुळे या पुस्तकातील उत्तम उपदेशाच्या एकमतात जगणे हे सर्व ख्रिश्चनांसाठी महत्त्वाचे आहे.
न्यूटन मार्शल हॉल व आयरविंग फ्रान्सीस वुड या दोघा डॉक्टरांनी संपादित केलेले द बुक ऑफ लाईफ हे पुस्तक म्हणतेः “चर्चा व धर्मतत्त्वे या बाजूंनी पाहता, [रोमकर] हे पुस्तक पौलाच्या प्रेरित शिक्षणामधील सर्वात उच्च श्रेणीत पोचते. ते शिष्टाचारयुक्त, व्यावहारिक तसेच अधिकारयुक्त असे आहे. . . . या पत्राचे अध्ययन त्यातील समृद्ध व मुबलक प्रतिफळ देते.” मग, आपण स्वतः हे पुस्तक वाचून त्यातील “सुवार्ता” मिळवून आनंदी का होऊ नये; कारण तिच्यामध्येच “तारणाप्रीत्यर्थ देवाचे सामर्थ्य” आहे.—रोमकर १:१६.
[२६ पानावरील चौकट/चित्रं]
“देवापासून नाही असा [ऐहिक] अधिकारच नाही.” याचा असा अर्थ होत नाही की, देव प्रत्येक अधिपतीची वैयक्तीकपणे नेमणूक करीत असतो. याउलट, हे ऐहिक अधिकारी केवळ देवाच्या परवानगीनेच अस्तित्वात आहेत. अनेक प्रकरणात, मानवी अधिपतींचे देवाकरवी आधीच भाकित करण्यात आले होते व त्यांची अगाऊच माहिती कळविली गेली व याप्रकारे ते “त्यांच्या सापेक्ष दर्जावरील अधिकारपदावर देवाने नेमलेले” असे होते.—रोमकर १३:१.
[२७ पानावरील चौकट/चित्रं]
ख्रिश्चनांना सांगण्यात आले आहे की, “तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताला परिधान करा.” याचा अर्थ त्यांनी येशूच्या पावलांस काळजीपूर्वक अनुसरले पाहिजे, आणि आपल्या जीवनात शारीरिक नव्हे तर आध्यात्मिक आवडीस प्रथम स्थान देण्यात त्याचे अनुकरण केले पाहिजे. अशामुळे “देहवासना तृप्त करण्यासाठी तरतुदी” केल्या जाणार नाहीत.—रोमकर १३:१४.
[२७ पानावरील चौकट/चित्रं]
पौलाने रोमकरांना “पवित्र चुंबनाने एकमेकांस सलाम करा”वयास सांगितले. पण याकरवी तो कोणा एका नव्या ख्रिस्ती पद्धतीची प्रस्थापना करीत नव्हता, आणि नवी रुढी पाडीत नव्हता. पौलाच्या काळी कपाळाचे, ओठांचे किंवा हाताचे चुंबन घेणे हे एकमेकांस अभिवादन करण्याचे, जिव्हाळा प्रदर्शित करण्याचे किंवा आदर दाखविण्याचे एक चिन्ह होते. अशाप्रकारे पौल येथे त्याच्या काळी जी सर्वसाधारण प्रथा प्रचलित होती त्याचा उल्लेख करीत होता.—रोमकर १६:१६.