वचनयुक्त देशाचे देखावे
एलाचे खोरे जेथे दाविदाने एका धिप्पाडास वधिले!
पवित्र शास्त्रात काही चित्तथरारक अहवाल आहेत. यापैकीचा एक सांगतो की, कशाप्रकारे “दाविदाने गोफणगुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावर [धिप्पाड गल्याथ] सरशी केली.” (१ शमुवेल १७:५०) हे एलाच्या खोऱ्यात घडले.
पण हे खोरे कोठे आहे व ते कशासारखे दिसते? हे जाणून घेतल्यामुळे, इस्राएलाचा भावी राजा म्हणून ज्याचा अभिषेक करण्यात आला त्या मुलाने संपादिलेल्या विजयाचे चित्र तुमच्या डोळ्यांपुढे तरळू लागेल. देवाने नंतर दाविदासोबत चिरकालिक आशीर्वाद प्रदान करू शकेल अशा एका राज्याचा करार केला आणि यामुळेच आपल्याला एला खोऱ्यात जे काही घडले ते शिकून घेण्याची अधिक पुष्टी दिली पाहिजे.
पलिष्टी कनानच्या समुद्र किनाऱ्यालगत राहात होते. इस्राएल (यरुशलेमाच्या दक्षिणेकडील) यहुदी पर्वतांवर आपला ताबा राखून होते. तर आता तुम्हाला दिसेल की, शत्रू पश्चिमेकडे खाली तळवटीत होता तर देवाचे सेवक पूर्वेकडे वरच्या प्रदेशात राहात होते. त्यांच्यामध्ये खालील भागाला असणाऱ्या टेकड्या, ज्यांना शेफेला असे म्हणत तो वादग्रस्त भाग होता. पलिष्टी इस्राएलांवर कसा हल्ला करू शकत होते? वास्तविक मार्ग म्हणजे पूर्व-पश्चिमेची खिंड होती, ज्यामधील महत्त्वाचा टप्पा एलाचे खोरे होते. त्याचा विस्तार गाद व एक्रोन या त्यांच्या शहरातील पठारातून शेफेलमधून सुमारे १५ मैल दूर पर्वतातून यरुशलेम व बेथलहेमची वायव्य दिशा इतका होता.a
या चित्राकडे पाहून कल्पना करा की, पलिष्टी या डोंगराकडे असणाऱ्या सपाट खोऱ्यात पोहंचले आहेत. त्यांना थोपविण्यासाठी इस्राएली लोक यहुदीयाच्या वायव्य दिशेकडून आले आहेत. आता ते दूरदूर उभे आहेत, पण का? “पलिष्टी एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले व दुसऱ्या बाजच्या पहाडावर इस्राएल लोक उभे राहिले. त्या दोन डोंगराच्या मध्ये एक खोरे होते.”—१ शमुवेल १७:३.
खोऱ्यात हे कोठे घडले ते आम्हास ठाऊक नसले तरी हे पलिष्टी या चित्रात खाली उजव्या बाजूच्या पहाडावर उभे असल्याची कल्पना करा. शौलाचे सैन्य डोंगराच्या पलिकडे तपकिरी रंगाच्या शेतापर्यंत आले असावेत. सैन्याच्या कोणत्याही तुकडीस खोरे उतरुन विरुद्ध दिशेला उंच ठिकाणी असणाऱ्या शत्रुपक्षावर हल्ला चढविता येणे शक्य नाही. अशाप्रकारे त्यांचे हे एकमेकांपासूनचे दूर उभे राहणे एका महिन्यापेक्षा अधिक काळ टिकले. पण हे केव्हा संपणार होते?
प्रत्येक सकाळी व सायंकाळी गल्याथ हा नऊ फूट उंचीचा पलिष्ट्यांचा पराक्रमी योद्धा या खोऱ्यात येऊन शौलाच्या सैन्यास टोमणे देऊन एकटाच युद्धाचे आव्हान देत होता. पण कोणाही इस्राएलाला त्याला उत्तर देण्याचा हिय्या झाला नाही. सरतेशेवटी तेथील छावणीत दावीद नावाचा एक मेंढपाळ बेथलहेमाहून आपल्या भावांसाठी जेवण घेऊन आला. त्याने अवमानकारक आव्हानास कसली प्रतिक्रिया दाखवली? “हा कोण बेसुंती पलिष्टी की ज्याने जिवंत देवाच्या सैन्यास टोमणे द्यावेत?” असे तो बोलला. (१ शमुवेल १७:४-३०) दाविदाने तोच दृष्टीकोण व्यक्त केला, जो यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९० च्या पंचांगातील वार्षिक वचनात प्रतिबिंबीत होत आहेः “चांगले धैर्य बाळगा व म्हणाः ‘यहोवा माझा साहाय्यकर्ता आहे.’” —इब्रीयांस १३:६; स्तोत्रसंहिता ५६:११; ११८:६.
शौल राजाने जेव्हा ऐकले की हा मुलगा काही शस्त्र नसताना आणि युद्ध विद्येत पारंगत नाही अशा स्थितीमध्ये गल्याथला सामोरा जाणार आहे, तेव्हा त्याने आपली शस्त्रास्त्रे त्याला देऊ केली. पण दाविदाने ते नाकारले आणि केवळ मेंढपाळाची काठी, एक गोफण व खोऱ्यातील पाच गुळगुळीत गोटे घेऊन त्याने त्या धिप्पाडाविरुद्ध जाण्याची तयारी दर्शविली. हे गोटे कशाप्रमाणे दिसत होते? ते दिसायला द्राक्षे किंवा जैतुनाची फळे यांच्या आकाराएवढे होते. जे गोफणगोटे उत्खननात मिळाले ते केवळ २ ते ३ इंच इतके गोलाकार होते व जणू लहान संत्र्याप्रमाणे दिसत होते. असे हे गोटे गोफणीतून तासास १०० ते १५० मैल इतक्या वेगाने जात असत.
त्या खोऱ्यात दोन्ही सैन्य समोरासमोर उभे असताना पुढे काय झाले ते तुम्ही वाचलेच असेल. दाविद ओरडून म्हणालाः “तू तरवार, भाला व बरची घेऊन मजवर चढून आला आहेस. पण तू इस्राएली सैन्याच्या देवास तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश यहोवाच्या नावाने मी तुजकडे आलो आहे.” यहोवाने विजय दिला. त्या मुलाने आपल्या गोफणीतून गोटा इतक्या शक्तीशालीपणे गल्याथाच्या कपाळाकडे नेम धरुन मारला की तो लगेच खाली कोसळला व मरण पावला. मग तो मेंढपाळ पुढे धावला व त्याने त्या धिप्पाडाची तरवार उपसून त्याचे डोके छाटून टाकले.—१ शमुवेल १७:३१-५१.
दाविदाचा आत्मविश्वास व देवावरील भाव याने प्रोत्साहीत होऊन इस्राएल लोक त्यांच्या गोंधळलेल्या शत्रूंवर चालून गेले. त्यांनी त्यांचा पाठलाग शेफेलामधून करीत त्यांना पलिष्टी देशापर्यंत हाकून लावले.—१ शमुवेल १७:५२, ५३.
यानंतर यहुदामध्ये जो आनंदीआनंद व जल्लोष झाला असावा त्याची कल्पना करा. त्यावेळी देवाच्या लोकांनी पर्वतामधून पश्चिमेकडे एलाचे खोरे व शेफेलाकडे बघितले असेल. हे खाली दाखविलेल्या आधुनिक काळच्या हेब्रोनाजवळील विभागातून दिसलेले दृश्य असावे. बदाम वृक्षांचा सुंदर फुललेला पांढरा बहर बघून किती आनंद वाटतो, पण तेच देवाच्या शत्रूंवर मिळविण्यात आलेला विजय हा त्याहूनही अधिक नेत्रदिपक होता. इस्राएली स्त्रिया अगदी उचितपणे हे म्हणू शकल्याः “शौलाने हजारो वधिले, तर दाविदाने लाखो,” ज्यात त्याने एला खोऱ्यात वधिलेल्या धिप्पाडाचाही समावेश आहे.—१ शमुवेल १८:७.
[तळटीपा]
a हेच चित्र यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९० च्या कॅलेंडर मध्ये मोठ्या आकारात पहावयास मिळेल व यासोबत मुखपृष्ठावरील नकाशात त्याची जागाही दिसेल.