यहोवाच्या सेवेतील आनंदी युवक
“आपली वागणूक शुद्ध व सरळ आहे की नाही हे मूलसुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करते.” —नीतीसूत्रे २०:११, न्यू इंटरनॅशनल व्हर्शन.
१. पवित्र शास्त्र शमुवेलाबद्दल कोणत्या उल्लेखनीय गोष्टी सांगते?
शमुवेल बाळाने शिलो येथील यहोवाच्या निवासमंडपात “सेवा” सुरु केली तेव्हा तो केवळ तीन ते पाच वर्षांचा असावा. त्याच्या कामामधील एक, “यहोवाच्या मंदिराची कवाडे” उघडणे हे होते. पवित्र शास्त्र म्हणते की, “शमुवेल बाळ हा वाढत गेला, यहोवा व मानव त्याच्यावर प्रसन्न होते.” मोठा झाल्यावर त्याने इस्राएलाला खऱ्या भक्तीमध्ये परत आणले. त्याने देवाची सेवा “आपल्या आयुष्यभर” केली. तो “वृद्ध होऊन [त्याचे] केस पिकले” तरीही लोकांना आर्जवीत राहिला की, “यहोवाचे भय धरा व सत्याने व जिवेभावे त्याची सेवा करा.” शमुवेलाविषयी पवित्र शास्त्र जे म्हणते तेच लोकांनी तुम्हाविषयी बोलून दाखविले तर ते किती चांगले वाटेल, होना?—१ शमुवेल १:२४; २:१८, २६; ३:१५; ७:२-४, १५; १२:२, २४.
२. यहोवाच्या लोकांच्या सभांमध्ये आज बालके काय शिकतात?
२ तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक आहात किंवा ख्रिस्ती सभांना येणाऱ्यांपैकी आहात तर हा अभ्यास जेथे चालत आहे त्या राज्य सभागृहात सभोवार बघा. तुम्हाला सर्व वयाचे लोक दिसतील. काही तर “वृद्ध होऊन केस पिकले”ले लोक असतील. शिवाय पालक, युवक, लहान मुले व हातातील बालके देखील येथे दिसतील. ही बालके देखील शिकतात का? होय, येथील लोकांना जरा विचारुन बघा की, त्यांना लहानपणी येथे आणले होते का? ते आपल्या लहानपणाविषयी हेच प्रामाणिकपणे सांगतील की, त्यांना देवाबद्दल आदर राखण्यास, लोकांविषयी प्रेम व्यक्त करण्यास व जेथे देवाची भक्ती होते त्या जागेची कदर करण्याविषयी शिकवण्यात आले. वेळ जातो तसे ही बालके अद्भुत सत्ये शिकू लागतात. कित्येक युवकांनी ज्ञान व समज प्राप्त करून घेतल्यावर, ते “कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण” या गटात आले. यांना स्तोत्रकर्त्याने “यहोवाच्या नावाचे स्तवन” करण्याचे आर्जविले, कारण “केवळ त्याचेच नाम उच्च आहे.”—स्तोत्रसंहिता १४८:१२, १३.
३. पवित्र शास्त्रातील माहिती असणारे युवक, ज्यांना ती माहिती नाही अशा युवकांपेक्षा कसे भिन्न आहेत?
३ ज्यांचे पालक आपल्या मुलांना नियमितपणे सभांना घेऊन येत आहेत अशा मुलांपैकी तुम्ही आहात तर तुम्ही खरेच धन्य आहात. जगाच्या समस्येमुळे बरेच युवक गोंधळात पडले आहेत. मानव पृथ्वी नष्ट करील याचे भय काहींना वाटते. पण देव हे घडू देणार नाही हे तुम्हाला माहीत आहे. या सुंदर पृथ्वीग्रहाची तो मानवाला यापुढे अधिक नासाडी करू देणार नाही. हे घडू देण्याऐवजी पवित्र शास्त्राप्रमाणे, देव, “पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश कर”णार आहे. देवाच्या धार्मिक नव्या जगाचे तेजोमय भवितव्य अगदी जवळ आले आहे हे तुम्हाला ठाऊक आहे.—प्रकटीकरण ११:१८; स्तोत्रसंहिता ३७:२९; २ पेत्र ३:१३.
तुमचा स्वतःचा विश्वास
४. देवाचे मार्ग जाणून घेणे हे युवकांवर कोणती जबाबदारी टाकते, आणि शमुवेल बाळ याबाबतीत कसे सुंदर उदाहरण ठरला?
४ पहिल्यांदा तुमच्या पालकांनी ख्रिस्ती सत्याचे मार्गाक्रमण स्वीकारले असेल. नंतर त्यांनी तुम्हाला ख्रिस्ती सभांना आणले असेल; आणि त्यांच्यामुळेच तुम्हीही ईश्वरी सेवेमध्ये भाग घेतला असावा. तरी वेळ जात आहे तसतसा यहोवाची सेवा करणे व त्याचे आज्ञापालन करणे हा तुमचा आनंद होऊ शकतो. शमुवेल बाळाच्या आईने त्याला जीवनाची चांगली सुरवात करून दिली होती, पण पुढे मार्गाक्रमण करीत राहणे हे त्याच्या हातात होते. आम्ही असे वाचतोः “आपली वागणूक शुद्ध व सरळ आहे की नाही हे मूलसुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करते.”—नीतीसूत्रे २०:११, न्यू.इं.व्ह.
५. (अ) पवित्र शास्त्र किती महत्त्वाचे आहे? (ब) देवाच्या लिखित वचनाच्या मूल्याविषयी पौलाने तीमथ्याला काय म्हटले?
५ देव आम्हाकडून कशाची अपेक्षा करतो ते शास्त्रवचने आम्हास सांगतात. ती त्याला कसे संतुष्ट करावे, तसेच ज्यामुळे आमचे भले होऊ शकेल अशी पुष्कळ माहिती देतात. प्रेषित पौलाने तीमथ्य या आपल्या तरुण सोबत्याला असे म्हटलेः “प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक व नीतीशिक्षण याकरता उपयोगी आहेत. त्यांच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामास सज्ज होतो.”—२ तीमथ्य ३:१६, १७.
६. ज्ञान व ईश्वरी सूज्ञान याच्या महत्त्वपूर्णतेविषयी नीतीसूत्राचे पुस्तक काय सांगते?
६ पवित्र शास्त्र असेही म्हणते की, “बोध ऐकून शहाणे व्हा.” ते म्हणते की, देवाच्या आज्ञा “साठवून ठेव,” “विवेकाला हाक मार,” आणि गुप्त धनाचा शोध करतो तसे समजबुद्धीचा “शोध कर.” हा सल्ला अनुसरल्यास, “यहोवाच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.” आम्हाला हा देखील सल्ला आढळतोः “आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत. बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अव्हेर करू नका. जो . . . माझे ऐकतो तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते, आणि त्याला यहोवाची दया प्राप्त होते.” तर मग, पवित्र शास्त्राला तुम्ही इतके मोलवान समजता का, व ते जे काही म्हणते ते शिकून घेण्यासाठी आवश्यक तो प्रयत्न करता का?—नीतीसूत्रे २:१-५; ८:३२-३५.
ज्ञान मिळवा
७. आम्ही शिकून घेतल्या पाहिजेत अशा महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत?
७ काही तरुण लोक तर सध्या चालत असलेल्या सामन्याविषयीचा ताजा स्कोअर लगेच सांगू शकतील किंवा ते त्यांना आवडणारे संगीत लगेच गुणगुणत म्हणू लागतील. या गोष्टीत त्यांना रस असल्यामुळे ते या सर्व गोष्टी सहजपण शिकू व आठवू शकतात. पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा की, यांना देवाविषयी कितपत माहिती आहे? देवाने जे केले आहे त्याचा विचार करा. त्याने विश्व घडवले. घटना घडण्याच्या कित्येक काळाआधी त्याने लोक काय करतील व काय घडेल याचे भाकित केले. पवित्र शास्त्र केवळ देवाविषयीची माहिती देत नाही तर ते, आम्ही त्याला कसे संतुष्ट करू शकतो याचेही शिक्षण देते. सध्या आनंदी जीवन कसे अनुभवावे व देवाच्या धार्मिक नव्या जगात सार्वकालिक जीवनाची प्राप्ती कशी मिळवावी हे देखील ते दाखविते. या गोष्टी, सामना कोणी जिंकला किंवा सध्याचे नावाजलेले गायक, गायिका आणि संगीतकार कोण आहेत हे जाणण्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या नाहीत काय?—यशया ४२:५, ९; ४६:९, १०; आमोस ३:७.
८. योशिया व येशू या दोघांनीही कोणते चांगले उदाहरण मांडले?
८ तरुण योशिया राजा १५ वर्षांचा होता तेव्हा तो “आपला पूर्वज दावीद याच्या देवाच्या भजनी लागला.” येशू १२ वर्षांचा असताना तो यहोवाच्या “मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांस प्रश्न करताना” आढळला.a तुमचे वय कितीही असो, तुम्ही योशिया व येशूप्रमाणे, देवाने केलेल्या व तो अद्याप करणाऱ्या गोष्टींबद्दलची आवड स्वतःमध्ये उभारली आहे का?—२ इतिहास ३४:३; लूक २:४६.
९. (अ) पुष्कळ युवकांना कोणती समस्या आहे? (ब) कशामुळे वाचन व अभ्यास सोपा होईल, व हे खरे असल्याचे व्यक्तीशः तुम्हाला आढळले आहे का?
९ परंतु, तुम्ही म्हणाल, ‘अभ्यास. हा तर खूपच कठीण वाटतो.’ वाचन सुधारण्यासाठी कित्येक लोक, मग ते तरुण असोत वा वृद्ध, पुरेसे वाचन कधीच करीत नाहीत. जितके अधिक तुम्ही वाचाल तितके वाचन अधिक सोपे होईल. तसेच जितका अधिक अभ्यास कराल तितका तो सोपा वाटेल. अभ्यासामुळे तुम्ही शिकलेल्या गोष्टीत भर टाकता; त्या तुम्हाला सहज समजू लागतात व त्या स्मरणात ठेवता येतात.
१०. (अ) ख्रिस्ती सभांपासून तुम्हाला अधिक कसे प्राप्त करून घेता येईल? (ब) याबद्दल तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे?
१० देवाबद्दल अधिक शिकून घेण्यामध्ये काय तुम्हाला साहाय्य देऊ शकेल? यासाठी, कदाचित तुम्हाला अधिक नियमितपणे ख्रिस्ती सभांना हजर राहिले पाहिजे. सभेची तुम्हाला अगाऊ तयारी करता येईल का, व त्यामध्ये भाग घेता येईल का? उदाहरणार्थ, या धड्यात जी शास्त्रवचने दिली आहेत पण अवतरीत केलेली नाहीत, ती काढून त्यांचे वाचन करून तुम्हाला धड्याविषयी अधिक खोल ज्ञान मिळवता येईल का? ती प्रत्येक शास्त्रवचने त्या विशिष्ट परिच्छेदाला किंवा धड्याला कोणती अधिक पूरक माहिती देतात याविषयीचे स्मरण राहावे म्हणून एक किंवा दोन शब्द तुम्ही समासामध्ये लिहून ठेवले आहेत का? या शास्त्रवचनांपैकी एकावर तरी आपले अभिप्राय समाविष्ट करण्याची सवय तुम्ही स्वतःला लावली आहे का? हे तुम्हाला शास्त्रवचनीय चर्चेविषयी केवढा रस वाटतो ते दाखवील. ज्यांनी कित्येक वर्षे नियमितपणे सभांना आपली उपस्थिती दाखविली ते मंडळीचे एक वडील म्हणतातः “मी ज्याची तयारी केली नाही अशा धड्यावर आपले मन एकाग्र करूच शकत नाही. पण ज्याची मी कसून तयारी केली तो धडा मात्र सभेत पूर्ण आनंद देतो.”
११. पवित्र शास्त्रावर आधारलेल्या भाषणांपासून तुम्ही कसे अधिक मिळवू शकाल, व हे का महत्त्वपूर्ण आहे?
११ पवित्र शास्त्रीय भाषण ऐकत असता, तुम्ही त्याची त्रोटक नोंद करता का की, ज्यामुळे भाषण कसे पुढे नेले जात आहे त्याचे पृथ्थकरण करता येईल व आपले लक्ष देखील भाषणावर राहू शकेल? जे ऐकता ते, आधी जे ऐकले आहे त्याच्याशी जोडून बघता का, म्हणजे ते तुम्हाला अधिक सहजपणे समजू शकेल व चांगले लक्षात राहू शकेल? येशूने अशी प्रार्थना केलीः “सार्वकालिक जीवन हेच आहे की, त्यांनी जो तू एकच सत्य देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे ज्ञान संपादावे.” (योहान १७:३) जीवनाकडे निरविणारे सर्वोत्तम ज्ञान तुम्हाला मिळवता येणे शक्य नाही का? याबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते ते पहाः “ज्ञान यहोवा देतो; त्याच्या मुखातून ज्ञान व सूज्ञता येतात. ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल. विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला संभाळील.”—नीतीसूत्रे २:६, १०, ११.
रसिकतेमध्ये वाढ करा
१२. देवाने आम्हासाठी कोणकोणत्या उल्लेखनीय गोष्टी केल्या?
१२ देवाने आम्हासाठी केलेल्या गोष्टींबद्दल खरीच आवड आम्हाला वाटते का? त्याने या सुंदर पृथ्वीची निर्मिती केली व तिजवर जीवनाची तयारी केली. त्यानेच आमच्या पहिल्या पालकांना निर्मिले व त्यांच्यामुळेच आमचा जन्म होऊ शकला. त्याने आम्हाला कुटुंबाचा तसेच आमच्या प्रेमळ मंडळीचा सहवास दिला. (उत्पत्ती १:२७, २८; योहान १३:३५; इब्रीयांस १०:२५) देवाने आपला एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर पाठवून आम्हास त्याच्याद्वारे त्याच्याविषयीचे अधिक शिक्षण दिले आणि खंडणीची व्यवस्थाही केली की ज्यामुळे सार्वकालिक जीवन मिळवणे हे शक्य झाले. अशा या अद्भुत देणग्यांबद्दल तुम्हाला खरीच रसिकता वाटते का? या गोष्टी तुम्हाला त्याच्याविषयी अधिक शिकून घेण्याबद्दल तसेच त्याची सेवा करण्याच्या निमंत्रणास प्रतिसाद देण्याला प्रवृत्त करतात का?—मत्तय २०:२८; योहान १:१८; रोमकर ५:२१.
१३. देव लोकांबद्दल आस्थेवाईक आहे असे तुम्हाला का वाटते?
१३ विश्वाच्या निर्मात्यास लोकांबद्दल रस वाटतो. त्याने अब्राहामाला “माझा मित्र” म्हटले आणि तो मोशेला म्हणालाः “तुझे नाव मला परिचित आहे.” (यशया ४१:८; निर्गम ३३:१२) प्रकटीकरणाचे पुस्तक सुचविते की, देवाकडे एक लाक्षणिक पुस्तक, “जीवनाचे पुस्तक” आहे व त्यामध्ये “जगाच्या स्थापनेपासून” त्याच्या विश्वासू सेवकांची नावे नमूद करण्यात आली आहेत. तुमचे नाव तेथे लिहिले जाईल का?—प्रकटीकरण ३:५; १७:८; २ तीमथ्य २:१९.
१४. देवाच्या तत्त्वांचे पालन केल्यामुळे तुमचे जीवन कसे सुधरले जाईल?
१४ देवाची तत्त्वे कार्य घडवून आणतात. त्याच्या पद्धतीने आपण सारे काही केल्यास पुष्कळ समस्या टाळता येतात—अनैतिकता, मादक औषधांचे व्यसन, दारुबाजी, नकोशी गर्भधारणा, लैंगिक आजार, हिंसाचार, खून व यासारखी अनेक कृत्ये, ज्याची यादी वाढतच राहणार. देवाच्या मार्गाचे अनुकरण केल्यास तुम्हाला खरे मित्र व आनंदी जीवन मिळेल. हे मिळविणे योग्य नाही का? (१ करिंथकर ६:९-११) युवकांनाही, देवाच्या मार्गानेच आपली कामे करण्यामुळे चांगले ते करण्याचे अधिक बळ मिळू शकेल. पवित्र शास्त्र म्हणतेः “निष्ठावंताशी तू [यहोवा] निष्ठेने वागतोस.” ते आम्हास आणखी ही खात्री देते की, तो ‘आपल्या निष्ठावंतांस सोडणार नाही,’ आणि “आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.”—स्तोत्रसंहिता १८:२५; ३७:२८; ९४:१४; यशया ४०:२९-३१.
देवाची सेवा करीत पुढे व्हा
१५. शलमोनाने युवकांसाठी कोणता ईश्वरी सल्ला दिला?
१५ तुमची ध्येये ही, मरत चाललेल्या जुन्या जगाशी निगडीत आहेत की, नव्या धार्मिक जगाशी? तुम्ही देवाचे ऐकता की, जगीकदृष्ट्या शहाणे पण देवाच्या मताविरुद्ध बोलणाऱ्या लोकांचे ऐकता? देव व त्याची सेवा याच्यापुढे तुमच्या जीवनात मनोरंजन, उच्च शिक्षण, किंवा वेळ घेणारी प्रापंचिक ध्येये येतात? सूज्ञ राजा शलमोनाने उपदेशकाचे पुस्तक लिहून त्यामध्ये जीवनात कोणती गोष्ट सर्वप्रथम आली पाहिजे त्याचे परिक्षण केले. तो शेवटी सांगतोः “आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की, त्यात, ‘मला काही सुख नाही,’ असे तू म्हणशील. आता सर्व काही तुम्ही ऐकले आहे. सर्वांचे सार हेच की, खऱ्या देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१, १३.
१६. युवकांना अधिक हक्काची प्राप्ती कशी मिळवता येईल?
१६ तुम्हाला ठाऊक असणारे सर्व वयस्कर ख्रिस्ती बांधव—वडीलजन, पायनियर्स, आणि तुमचे विभागीय व प्रांतीय देखरेखे—एकेकाळी मुले होते. आज त्यांना ज्या आशीर्वादांचा अनुभव मिळत आहे, तो त्यांना कशामुळे मिळाला बरे? त्यांनी देवावर आपली प्रीती दाखवली व त्याची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. यापैकीच्या पुष्कळांनी आपल्या युवकावस्थेत हाताशी असणारा अधिक वेळ ज्ञान व अनुभवाची प्राप्ती करण्यासाठी वापरला. त्यांनी सभेकरता अभ्यासाची पूर्वतयारी केली व त्यामध्ये भाग घेतला. त्यांनी शिक्षण देण्यात देखील सहभाग घेतला व मग त्यांनी अधिक हक्क मिळविले—पायनियरिंग, बेथेल सेवा, किंवा इतर फलदायी हालचाली. ते काही आपण म्हणतो तसे ‘सुपर युवक’ नव्हते; त्यांना देखील तुमच्यापाशी असणाऱ्या सर्वसाधारण आस्था व चिंता होत्या. तथापि, त्यांनी या सूचनेचा अवलंब स्वतःसाठी केलाः “जे काही तुम्ही करता, ते मनुष्यांसाठी म्हणून नका, तर यहोवासाठी म्हणून जिवेभावे करा.”—कलस्सैकर ३:२३; पडताळा लूक १०:२७; २ तीमथ्य २:१५.
१७. तरुणांना देवाच्या सेवेत कशामुळे साहाय्य मिळू शकते?
१७ तर, तुम्हाबद्दल काय? तुम्हाला ईश्वरी गोष्टीचा खराच रस वाटतो का? जे आपल्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान देतात अशांमध्ये तुम्ही आपले मित्र निवडता का? तुम्ही इतरांना आपणासोबत ख्रिस्ती कार्यात सहभागी होण्याचे आमंत्रण देता का? तुम्ही ख्रिस्ती सेवकपणात इतर वयस्कर, अधिक अनुभवी बांधवाबरोबर जाता का की, ज्याद्वारे तुम्हाला त्यांच्याकडून शिकता येईल, त्यांचा आनंद अनुभवता येईल आणि त्यांच्या सत्कृत्यांकडून उत्तेजन मिळवता येईल? एका साक्षीदार युवतीला तो दिवस, २० वर्षांपूर्वीचा, चांगला आठवतो, जेव्हा एका वयस्कर व्यक्तीने तिला आपणासोबत क्षेत्रकार्याला येण्याचे उबदार आमंत्रण दिले होते. ती म्हणते की, तो तिच्या जीवनाला वळण देणारा टप्पा ठरला. ती पुढे म्हणतेः “आता पहिल्यांदाच मी जात होते कारण, माझे पालक मला सोबत घेऊन जात होते म्हणून नव्हे तर माझी तशी इच्छा झाली होती.”
१८. बाप्तिस्मा घेण्याआधी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?
१८ तुम्ही देवाच्या विचाराने सर्व गोष्टी करीत राहून आपली प्रगति करीत असाल तर मग, नक्कीच लवकर बाप्तिस्मा घेण्याचा विचार कराल. हे लक्षात घ्या की, हा बाप्तिस्मा काही तुमचे नवयौवनातून युवकावस्थेत पदार्पण करण्याचा विधी नव्हे. तुम्ही वाढीस लागले आहात हे तो दाखवीत नाही व शिवाय तुमच्या मित्रांनी तो घेतला आहे म्हणून तुम्ही घेतला पाहिजे असे नाही. बाप्तिस्मा होण्याआधी तुम्हापाशी सत्याचे मूलभूत ज्ञान असावयास हवे व तुम्ही देवाच्या वचनाच्या सहमतात जीवन व्यतित करीत राहिले पाहिजे. हे ज्ञान इतरांमध्ये सहभागी करण्याचा व्यवहार्य अनुभव तुम्हाला असला पाहिजे आणि हे काम खऱ्या भक्तीमधील महत्त्वपूर्ण अंग आहे हे तुम्ही जाणले पाहिजे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) याशिवाय, तुम्ही आणखी हे जाणले पाहिजे की, हे महत्त्वपूर्ण असे ख्रिस्ती पाऊल उचलल्यावर तुमच्या बाबतीत पवित्र शास्त्राच्या नीतीमान नैतिक तत्त्वांनुरुप आपले जीवन जगण्याची अपेक्षा धरली जाईल.b तुम्ही आपल्या अंतःकरणात आपले जीवन आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला समर्पित केलेले असण्यास हवे.—पडताळा स्तोत्रसंहिता ४०:८, ९.
१९. एखाद्या व्यक्तीचा केव्हा बाप्तिस्मा होण्यास हवा?
१९ जेव्हा तुम्ही हे निश्चितपणे ठरवता की, माझ्या उर्वरित आयुष्यात काहीही झाले तरी मी देवाचीच सेवा करीन, तेव्हा तुम्हाला बाप्तिस्म्याचे पाऊल उचलता येईल. देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी तुम्ही यहोवा देवाला येशू ख्रिस्तामार्फत आपले पूर्ण, उघडपणे आणि कसलीही अट न ठेवता स्वतःचे समर्पण केले आहे याचे बाप्तिस्मा हे जाहीर चिन्ह आहे. एका ख्रिस्ती वडीलांना तो, जवळजवळ अर्ध्या शतकाआधीचा, दिवस आठवतो, जेव्हा त्यांना ही जाणीव झाली की, “याबद्दल मला काहीतरी केलेच पाहिजे!” मिखेल हा न्यूकॅसल, इंग्लंडमध्ये काही वर्षांआधी बाप्तिस्मा घेतलेला युवक म्हणतोः “मला १३ व्या वर्षी ही जाणीव झाली की, मी आपल्या जीवनाचे समर्पण करून बाप्तिस्मा घेतला पाहिजे; देवाची सेवा करणे यापेक्षा दुसरे कोणतेच काम मी करणार नाही.”
२०. (अ) हजारो युवकांनी कोणते सुंदर उदाहरण आधीच मांडले आहे? (ब) या पावलाविषयी कोणता दृष्टीकोण घ्यावा?
२० अलिकडेच हजारो युवकांचा बाप्तिस्मा झालेला आहे. त्यांनी देवाच्या वचनाचा अभ्यास केला व त्याचे मार्ग शिकून घेतले व मग, त्यांनी इतर कित्येक वयस्करांसोबत मिळून, देवास केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून जाहीरपणे आनंदाने पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. त्यांना ठाऊक आहे की, बाप्तिस्मा हा शेवट नव्हे तर खऱ्या समर्पित जीवनाक्रमणाची सुरवात आहे, त्यामुळे त्यांचा यहोवाची सेवा सदासर्वदा करीत राहण्याचा निश्चय आहे.
[तळटीपा]
a पृष्ठ ४ वरील “पवित्र शास्त्र काळातील तरुण सेवक” हा लेख बघा.
b याचा हा अर्थ नाही की, ‘माझा अजून बाप्तिस्मा झालेला नाही,’ हे म्हणणे तुम्हाला अधार्मिक कामे करण्याची सूट देईल. देव आम्हाकडून जे अपेक्षितो त्याची माहिती कळल्यावर लगेच त्याच्या आज्ञा मानण्याची जबाबदारी आम्हावर येते.—याकोब ४:१७.
तुम्हाला कसे उत्तर देता येईल?
◻ देवाच्या वचनाचे ज्ञान मिळवणे हे इतके महत्त्वाचे का आहे?
◻ ख्रिस्ती सभांमधून तुम्हाला अधिक गोष्टी कशा मिळवता येतील?
◻ देवाकडून मिळणारे कोणते आशीर्वाद आम्हाला त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास समर्थक ठरले पाहिजेत?
◻ तुम्हाला देवाच्या सेवेत पुढे कसे जाता येईल?
◻ एखाद्याचा बाप्तिस्मा केव्हा होण्यास हवा?