पवित्र शास्त्र काळातील तरुण सेवक
पवित्र शास्त्र अशा चांगल्या तरुणांविषयी सांगते, ज्यांनी देवाची सेवा गंभीरपणे केली व यामुळे त्यांना समृद्ध आशीर्वाद मिळाले. आम्ही तरुण, वयस्कर किंवा वृद्ध असू, आम्हाला या सुंदर पवित्र शास्त्रीय उदाहरणांकडून मोठे उत्तेजन मिळू शकते.
योसेफला मिसरात दास म्हणून विकण्यात आले तेव्हा तो केवळ १७ वर्षांचा होता. तेथे, आपल्या कुटुंबापासून दूर असता तसेच त्याला जाणणाऱ्या लोकांच्या नजरेआड असतानाही त्याने आपली सचोटी राखली. पोटीफरच्या बायकोने त्याला भुरळ घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने म्हटलेः “एवढे घोर कर्म करून मी देवाचा अपराधी कसा होऊ?” त्याच्या काळातील अत्यंत प्रबळ राजा फारो याजसमोर देखील त्याने फारोच्या स्वप्नाचा उलगडा करण्याचे श्रेय देवाला देऊ केले. यासाठी त्याला समृद्ध आशीर्वाद मिळाले. देवाने योसेफाचा उपयोग मिसरी तसेच त्याच्या कुटुंबियांना दुष्काळामुळे येणाऱ्या मरणापासून वाचवण्यासाठी तसेच आपला बाप याकोब व त्याचे घराणे यांना खाली मिसरात आणण्यासाठी केला.—उत्पत्ती ३७:२; ३९:७-९; ४१:१५, १६, ३२.
मोशे व इतर विश्वासू तरुण
फारोच्या मुलीने मोशेला आपला पुत्र म्हणून स्वीकारले, पण मोशेची आई व बाप यांना त्याला खऱ्या देवाविषयीचे शिक्षण देता आले. पवित्र शास्त्र म्हणते की, मोशे मोठा झाला तेव्हा त्याने “आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याचे नाकारले, पापाचे क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले.” देवाने मोशेचा, त्याच्या लोकांना मिसरातून बाहेर काढण्यासाठी, सिनाय डोंगरावर नियमशास्त्र देण्यासाठी आणि पवित्र शास्त्राच्या प्रमुख भागांचे लिखाण करण्यासाठी उपयोग करून घेतला. तुमचे वय कितीही असो, तुम्ही मोशेप्रमाणेच देवाची सेवा करण्याचा निश्चय राखून आहात का?—इब्रीयांस ११:२३-२९; निर्गम २:१-१०.
देवाचा नियम सर्व इस्राएलांना वाचून दाखवण्यात आला तेव्हा त्यांच्याबरोबर तो “मुलाबाळांनी” ऐकल्याचे शास्त्रवचने सांगतात. (अनुवाद ३१:१०-१३) नेहम्याच्या काळी, “ऐकून समजण्याचे सामर्थ्य” असणारे लोक “पहाटेपासून दोन प्रहरपर्यंत” नियमशास्त्राचे श्रवण करण्यासाठी उभे होते. (नेहम्या ८:१-८) येथे उपस्थित असणाऱ्या लहानांना जरी सर्व गोष्टींची समज मिळाली नसेल तरी, आपल्याला यहोवा देवावर प्रेम करायचे आहे, त्याची भक्ती करायची आहे व त्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत या गोष्टी समजल्या असतील. तुमचे वय कितीही असो, तुम्ही देवाच्या वचनाची चर्चा होते त्या अधिवेशन किंवा संमेलनात लक्ष देऊन ऐकले आहे का? त्या तरुण इस्राएली मुलांप्रमाणे तुम्हीही देवाच्या आज्ञा पाळण्यामधील मोल जाणले आहे का?
दावीद, योशिया व यिर्मया
देवाने आठ भावांपैकी अगदी तरुण त्या दावीदाला खास कार्यासाठी निवडले व त्याच्याविषयी म्हटलेः “माझ्या मनासारखा इशायाचा पुत्र दावीद मला मिळाला आहे. तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.” देवाने त्याला आपल्या लोकांचा “मेंढपाळ” म्हणून निवडले, आणि दावीदाने ती सेवा पूर्ण केली, सोबत कित्येक वर्षे यहोवाविषयी आपले प्रेम सिद्ध करून दाखवले. त्याने ७० पेक्षा अधिक स्तोत्रांची रचना केली व तो येशू ख्रिस्ताचा पूर्वज बनला. आता, तुम्ही तरुण किंवा वयस्कर असला तरीही तुम्ही दावीदाप्रमाणेच देवाच्या मार्गांची आवड धरता का व त्याच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही करता का?—प्रे. कृत्ये १३:२२; स्तोत्रसंहिता ७८:७०, ७१; १ शमुवेल १६:१०, ११; लूक ३:२३, ३१.
योशीया राजा झाला तेव्हा तो केवळ आठ वर्षांचा होता. तो १५ वर्षांचा “अल्पवयी असताच आपला पूर्वज दावीद याच्या देवाच्या भजनी लागला.” २० वर्षांचा होण्याआधीच त्याने खोट्या भक्तीचे उच्चाटन करण्याच्या मोहिमा काढल्या. नंतर त्याने मंदिराची दुरुस्ती केली व देशात खऱ्या भक्तीची पुनर्स्थापना केली. आम्ही वाचतोः “त्याच्या सर्व कारकिर्दीत त्यांनी आपल्या वाडवडिलांचा देव यहोवा यास अनुसरावयाचे सोडले नाही.” आम्हा सर्वांना अर्थातच, योशीयासारखे राजे होता येणार नाही, पण आम्ही खोट्या भक्तीविरुद्ध दृढ उभे राहून देवाची सेवा करू शकतो, जरी आमचे वय कितीही असले तरी.—२ इतिहास ३४:३, ८, ३३.
सर्वसमर्थ देवाने यिर्मयास म्हटलेः “मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे.” पण यिर्मयाने आक्षेप घेऊन म्हटले की, तो खूपच लहान आहे व त्याला संदेष्टा होता येणार नाही. तो म्हणालाः “अहा, सार्वभौम प्रभु यहोवा, पाहा, मला बोलावयाचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे.” यहोवाने प्रत्युत्तर दिलेः “‘मी केवळ बाळ आहे,’ असे म्हणू नको; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याजकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल.” मग, ४० पेक्षा अधिक वर्षे यिर्मयाने तेच केले; त्याला ते काम करण्याचे सोडून द्यावेसे वाटले तरी ते त्याला जमेना. देवाचे वचन “[त्याच्या] हाडात कोंडलेला अग्नि जळत आहे” याप्रमाणे झाले. त्याला बोलणे भाग पडले! तुमच्या बाबतीत बघता, तुम्ही कितीही वयाचे असला तरी, यिर्मयाप्रमाणे आपला विश्वास वाढवीत आहात का, व त्याच्याप्रमाणे देवाच्या सेवेत पुढे जात आहात का?—यिर्मया १:४-८; २०:९.
दानीएल, येशू व तीमथ्य
दानीएलाविषयी तुम्ही ऐकले नाही काय? बाबेलचा सामर्थ्यशाली राजा नबुखद्नेस्सर याच्या दरबारी ज्या ‘मुलांना’ बंदिवान म्हणून आणण्यात आले त्यामध्ये दानीएल हा २० पेक्षा कमी वयाचा असावा. दानीएल तरुण होता, तरी देवाचे आज्ञापालन करण्याचा त्याचा निश्चय होता. देवाच्या नियमांचा भंग होईल असे भोजन करून स्वतःला विटाळविण्याचे तसेच मूर्तिपूजक संस्कारांनी स्वतःला भ्रष्टाविण्याचे दानीएल व त्याच्या सोबत्यांनी नाकारले. सुमारे ८० वर्षे दानीएल डळमळला नाही. देवाला प्रार्थना करण्याचे थांबविण्याचे नाकारण्यापर्यंत त्याने आपली सचोटी राखली. असे केल्यामुळे त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्याची पाळी आली तरीही ही सचोटी त्याने राखली. तुम्ही देवाची सेवा तशीच त्याची प्रार्थना करणे हे तेवढे गंभीर समजता का? ते समजलेच पाहिजे.—दानीएल १:३, ४, ८; ६:१०, १६, २२.
येशू १२ वर्षांचा असताना तो यरुशलेम मंदिरात धार्मिक शिक्षकांच्या मध्ये बसून “त्यांचे भाषण ऐकताना व त्यांस प्रश्न करताना . . . आढळला. [तरुण येशूचे] सर्व श्रोतेजन त्याच्या बुद्धीवरुन व उत्तरावरून थक्क झाले.” मंदिरातील वडीलजनांमार्फतची शास्त्रवचनीय चर्चा तुम्हाला येशूसारखीच मनोरंजक वाटली असती का? तुमची समज व उत्तरे याद्वारे इतर लोक चकित झाले असते का? आज असे कित्येक तरुण साक्षीदार आहेत, जे अभ्यास करतात, ख्रिस्ती सभांमध्ये चांगले श्रवण करतात व त्यात सहभाग घेतात, त्यांच्याठायी इतके शास्त्रचनीय ज्ञान आहे जे वयस्करांना आश्चर्यचकित करते.—लूक २:४२, ४६, ४७.
तुम्ही तीमथ्यासारखे आहात का, ज्याला बालपणापासून “पवित्र शास्त्राची माहिती” शिकवण्यात आली होती? तो तरुण झाला तेव्हा तो निदान दोन तरी मंडळ्यातील “बंधुवर्गाकडून नावाजलेला होता.” प्रेषित पौलाने तीमथ्याला आपल्या कार्यासाठी एक हमाल म्हणून नव्हे तर पौल इतरांना शिक्षण देत असता त्याला मदत करावी या हेतूने सोबत घेतले. अशा हक्कासाठी तुमची निवड होऊ शकेल का? तुमच्या कार्याविषयी केवळ तुमच्याच मंडळीत नव्हे तर दुसऱ्या मंडळीत देखील तुम्ही “नावाजलेले” आहात का?—२ तीमथ्य ३:१५; प्रे. कृत्ये १६:१-४.
तुम्हाला कोणत्या प्रकारचे भवितव्य हवे आहे?
आजच्या तरुणांना योसेफ, मोशे, दावीद व इतरांसारखे विश्वासू होता येईल का? होय, होता येईल. हे खरे की पुष्कळ तरुणांना मजेत वेळ घालवावासा वाटतो. पण इतर तरुण आपले तारुण्य सूज्ञपणे वापरुन देवाची ओळख तसेच आपणासाठी त्याची इच्छा काय आहे ते जाणून घेत आहेत. हे तरुण हा पवित्र शास्त्रीय भविष्यवाद पूर्ण करतातः “तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात. . . . तुझे तरुण पहाटेच्या दहिंवरासारखे येऊन मिळतात.”—स्तोत्रसंहिता ११०:३.
असे हे सुंदर तरुण आपल्या वयोमानापेक्षा अधिक सूज्ञता दाखवितात, कारण देव यांना सध्याचे जीवन यशस्वी करण्यासाठी मदत करतो व तो त्यांना येणाऱ्या नव्या जगात वैभवी भवितव्याची आशा देतो. (१ तीमथ्य ४:८) तर मग, पवित्र शास्त्रात उल्लेखिलेल्या त्या तरुणांप्रमाणेच आजच्या आधुनिक तरुणांना कसा विश्वास संपादता येईल? तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे तर “यहोवाच्या सेवेतील आनंदी युवक” हा या मासिकाच्या २७ पानावर देण्यात आलेला लेख वाचण्याचे तुम्हाला निमंत्रण देत आहोत.
[५ पानांवरील चित्रं]
तरुण मोशेला मिसरच्या संपत्तीची भुरळ पडली नाही
[५ पानांवरील चित्रं]
तरुण दावीद देवाच्या पसंतीस उतरलेला होता
[६ पानांवरील चित्रं]
“मी केवळ बाळ आहे,” असे यिर्मयाला वाटले होते तरी त्याने अप्रिय संदेशाची मोठ्या निर्भिडपणे घोषणा केली
[६ पानांवरील चित्रं]
१२ वर्षांचा असताना येशूने, देववचनाविषयी असणाऱ्या त्याच्या समजूतीने वडीलधाऱ्यांना चकित केले
[७ पानांवरील चित्रं]
इस्राएल लोकात देवाच्या नियमांचे वाचन करण्यात आले तेव्हा ते लहान मुलांनी देखील ऐकले. तुम्ही ऐकता का?