वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 २/१ पृ. १२-१६
  • यहोवाच्या राज्याची निर्भिडपणे घोषणा करा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या राज्याची निर्भिडपणे घोषणा करा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • समविश्‍वासूंची उभारणी केली जाते
  • यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडो
  • जमावाचा हल्ला तरी निश्‍चल
  • अधिपतींसमोर निर्भिडता
  • समुद्रावरील संकटे
  • यहोवाच्या राज्याची घोषणा करीत राहा!
  • “मी कैसराजवळ न्याय मागतो!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • घाबरू नका—यहोवा तुम्हाला साहाय्य करेल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • “मी कैसराकडे न्याय मागतो!”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • “हिंमत धर!”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 २/१ पृ. १२-१६

यहोवाच्या राज्याची निर्भिडपणे घोषणा करा!

“तो . . . जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे . . . स्वागत करीत असे (व) देवाच्या राज्याची घोषणा करीत असे.”—प्रे. कृत्ये २८:३०, ३१.

१, २. प्रेषित पौलाला ईश्‍वरी पाठबळ होते याला काय पुरावा आहे, व त्याने कोणते उदाहरण मांडले?

यहोवा राज्य घोषकांना नेहमीच उंचावून धरतो. हे प्रेषित पौलाच्या बाबतीत केवढे सार्थ होते! त्याला ईश्‍वरी पाठबळ होते म्हणूनच तो सत्ताधिशांपुढे उभा राहू शकला, जमावाच्या हल्ल्याचा सामना करू शकला व यहोवाच्या राज्याची निर्भिडपणे घोषणा करू शकला.

२ रोममध्ये बंदिवान असताना देखील पौल “जे त्याच्याकडे येत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे . . . (व त्यांना) देवाच्या राज्याची घोषणा करीत असे.” (प्रे. कृत्ये २८:३०, ३१) हे आज यहोवाच्या साक्षीदारांसाठी केवढे उत्तम उदाहरण आहे! पवित्र शास्त्रातील प्रे. कृत्ये पुस्तकात शेवटल्या अध्यायांत पौलाच्या उपाध्यपणाविषयी लूकने जे काही कळवले आहे त्यापासून आपणाला बरेच काही शिकता येईल. (२०:१–२८:३१) (या अग्रलेखाचा आपला व्यक्‍तीगत अभ्यास करताना आम्ही आपल्याला हे सुचवितो की, प्रे. कृत्ये या पुस्तकातील जी वचने ठळक अक्षरात दाखविण्यात आली आहेत ती तुम्ही काढून वाचावीत.)

समविश्‍वासूंची उभारणी केली जाते

३. त्रोवस येथे काय घडले, आणि यातून आम्हाला आजच्या काळासाठी कोणती समांतरता घेता येईल?

३ इफिस येथील दंगा शांत झाल्यावर पौलाने आपली तिसरी सुवार्तिक यात्रा पुढे चालू केली. (२०:१-१२) तो सूरियाला तारवात बसून जाणार होता, पण त्याला कळले की, यहूदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट केला आहे. कदाचित त्यांचा विचार असावा की पौल ज्या तारवाने जाणार त्यातच आपणही बसून पौलाला तेथे ठार करावे. यासाठी पौलाने मासेदोनियाचा मार्ग धरला. त्याने त्रोवर येथे एक आठवडा घालवला व तेथील समविश्‍वासूंची उभारणी केली, जशी आज यहोवाच्या साक्षीदारांमधील फिरते देखरेखे करतात. तेथून जाण्याआधी पौल मध्यरात्रीपर्यंत भाषण देत राहिला. त्या घरात युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता. त्याला बहुधा दिवसाच्या कामामुळे बराच थकवा आला असावा व तो पेंगत होता. अशा पेंगलेल्या स्थितीत असताना तो तिसऱ्‍या मजल्यावरून खिडकीतून खाली पडला व मरण पावला; पण पौलाने त्याला पुन्हा जिवंत केले. त्यामुळे केवढा आनंद झाला असावा! याचप्रमाणे, येणाऱ्‍या नव्या जगात जेव्हा लाखोंचे पुनरुत्थान होईल तेव्हाही सर्वत्र केवढा आनंदीआनंद असेल त्याचा विचार करा.—योहान ५:२८, २९.

४. उपाध्यपणाच्या बाबतीत पौलाने इफिसमधील वडीलांना काय काय शिकवले होते?

४ यरुशलेमाच्या वाटेवर मिलेत येथे पौलाने इफिसच्या वडीलांची गाठ घेतली. (२०:१३-२१) त्याने त्यांना “घरोघरी” जाऊन शिकविले, तसेच “आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवणे यासंबंधाने यहूदी व हेल्लेणी ह्‍यांस पूर्ण रुपाने साक्ष दिली” याविषयीचे स्मरण दिले. जे आता वडील झाले होते त्यांनी पश्‍चाताप व्यक्‍त केला होता व विश्‍वास ग्रहण केला होता. प्रेषिताने यांना विश्‍वास न राखणाऱ्‍या लोकांमध्ये घरोघर जाऊन राज्याची घोषणा कशी निर्भिडपणे करावी याची तालीम दिली. असेच उपाध्यपण आज यहोवाचे साक्षीदार पार पाडीत आहेत.

५. (अ) पवित्र आत्म्याकडील मार्गदर्शनास अनुसरण्यामध्ये पौल कसा उदाहरणशील होता? (ब) ‘कळपाकडे लक्ष द्या’ ही सूचना वडीलांना का जरूरीची होती?

५ देवाच्या पवित्र आत्म्याकडील मार्गदर्शनाचा स्वीकार करण्यात पौल उदाहरण असा होता. (२०:२२-३०) ‘पवित्र आत्म्याच्या साक्षीनुसार’ किंवा त्याच्या नेतृत्वास अनुसरून पौल यरुशलेमास जाणार होता व तेथे त्याला बेड्या व संकटे येणार होती. त्याला आपले जीवन प्रिय होते, पण देवास आपली सचोटी राखणे ही गोष्ट त्याला अत्यंत महत्त्वाची वाटत होती. हेच आमच्याही बाबतीत घडण्यास हवे. पौलाने वडीलांना आर्जविले की, ‘ज्या कळपात पवित्र आत्म्याने त्यांना देखरेखे म्हणून नियुक्‍त केले आहे त्याकडे लक्ष द्यावे.’ तो “गेल्यावर” (म्हणजे, वारल्यावर) “क्रूर लांडगे” ‘कळपाची दयामाया करणार नव्हते.’ अशा प्रकारची माणसे वडीलांमधूनच सामोरी येणार होती आणि कमअनुभवी शिष्य त्यांच्या विपरीत गोष्टींचा स्वीकार करणार होते.—२ थेस्सलनीकाकर २:६.

६. (अ) पौल त्या वडीलांना देवाकडे इतक्या आत्मविश्‍वासाने का सोपू शकत होता? (ब) पौलाने प्रे. कृत्ये २०:३५ मधील तत्त्व स्वतःच कसे आचरले?

६ धर्मत्यागापासून दूर राहण्यासाठी वडीलांनी आध्यात्मिकरित्या दक्ष राहण्याची गरज होती. (२०:३१-३८) प्रेषिताने त्यांना इब्री शास्त्रवचने व येशूच्या शिकवणींचे शिक्षण दिले होते; या शिक्षणात पवित्रीकरणाचे सामर्थ्य आहे जे त्यांना स्वर्गीय राज्याचे वतन, “पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये . . . वतन” देण्यास मदतगार ठरत होते. स्वतःसाठी व आपल्या सोबत्यांसाठी तरतूद व्हावी म्हणून काम करून पौलाने वडीलांना उद्योगी असण्याचे उत्तेजन दिले. (प्रे. कृत्ये १८:१-३; १ थेस्सलनीकाकर २:९) आम्हीही असाच मार्ग चोखाळला व इतरांना चिरकालिक जीवन मिळवण्यात मदत केली तर येशूचे हे शब्द आम्हास अधिक आवडतील की, “घेण्यापेक्षा देणे यात अधिक धन्यता आहे.” या विधानाचा मतितार्थ आपल्याला शुभवर्तमानात आढळतो, पण हे शब्द मात्र पौलानेच उद्धृत केले, जे बहुधा त्याला तोंडी किंवा प्रेरणेने कळाले असतील. पौलाप्रमाणेच आपणही स्वार्थत्यागी राहिलो तर आम्हाला अधिक धन्यतेचा अनुभव मिळेल. त्याने स्वतःला इतक्या प्रमाणात देऊ केले होते की, त्याचा वियोग इफिसकरांना सहन झाला नाही; त्यांना भारी दुःख वाटले!

यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडो

७. पौलाने देवाच्या इच्छेच्या अधीन होण्यामध्ये आपले उदाहरण कसे मांडले?

७ पौलाची तिसरी सुवार्तिक यात्रा संपण्याच्या लागास आली (सुमारे इ.स. ५६), तेव्हाही त्याने देवाच्या इच्छेच्या अधीन होण्यात आपले चांगले उदाहरण मांडले. (२१:१-१४) कैसरीया येथे तो व त्याचे सोबती फिलिप्प याच्याकडे राहिले. फिलिप्पाच्या चार मुली “संदेश देत असत,” म्हणजे त्या पवित्र आत्म्याकरवी घटनांचे भाकित करीत होत्या. येथे ख्रिस्ती संदेष्टा अगब याने पौलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले की, तो कमरबंद ज्याचा आहे त्याला यरुशलेमात असेच बांधण्यात येईल व त्याला विदेश्‍यांच्या हाती देतील. “मी नुसता बंधनात पडण्यासच नव्हे, तर प्रभु येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरावयास देखील तयार आहे,” असे पौलाने म्हटले. शिष्यांनी हरकत न घेता म्हटले की, “यहोवाच्या इच्छेप्रमाणे होवो.”

८. आम्हाला चांगला सल्ला स्वीकरण्यास काही वेळा कठीण वाटत असला तर कशाचे स्मरण करावे?

८ देवाने आपल्या उपाध्यपणाकरवी जे कार्य घडवून आणले त्याची माहिती पौलाने यरूशलेमातील वडीलांनी दिली. (२१:१५-२६) आम्हाला चांगला सल्ला स्वीकारण्यास जड वाटत असला तर आपण पौलाने तो कसा स्वीकारला हे आठवू शकतो. परराष्ट्रीयात शिक्षण देताना यहुद्यांना “मोशेचा त्याग करावयास शिकवीत” नव्हता हे सिद्ध करून दाखविण्यासाठी त्याला वडीलांनी सल्ला दिला की, त्याने व्रतस्थ व्हावे व यासाठी स्वतः व इतर चौघांचा खर्च त्याने करावा. हे पौलाने ऐकले. येशूच्या मृत्युद्वारे नियमशास्त्र रद्द झालेले होते तरी नवस करण्याविषयी त्यामध्ये जे सांगण्यात आले ते केल्यामुळे पौल चुकीचे असे काही करीत नव्हता.—रोमकर ७:१२-१४.

जमावाचा हल्ला तरी निश्‍चल

९. जमावाच्या हिंसाचाराविषयी पौल व आजच्या यहोवाच्या साक्षीदारांचे अनुभव यात कोणते साम्य दिसून येते?

९ जमावाच्या हिंसाचारात यहोवाच्या साक्षीदारांनी बहुधा वेळोवेळी देवाला आपली सचोटी राखलेली आहे. (उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांचे १९७५ चे वार्षिक अहवाल पुस्तक, पृष्ठे १८०-९० पहा.) आशिया मायनरमधील यहुद्यांनी पौलाविरुद्ध देखील असाच जमावाचा दंगा उभारला. (२१:२७-४०) त्याच्यासोबत इफिसकर त्रफिम होता व यामुळे त्यांनी पौलावर हा खोटा दोषारोप लादला की, तो हेल्लेण्यांना मंदिरात आणून ते विटाळवितो. पौल ठार होणार होता, पण इतक्यात रोमी पलटणीचा सरदार क्लौद्य लुसिया व त्याच्या शिपायांनी हस्तक्षेप केला व त्यांनी दंगा शमविला. आधी भाकित केल्याप्रमाणे (यहुद्यांमुळे) लुसियाने पौलाला बेड्यात ठेवले. (प्रे. कृत्ये २१:११) प्रेषिताला मंदिरास लागून असलेल्या सरदारांच्या गढीत नेत होते तेव्हा लुसियाला कळले की पौल हा देशद्राही नव्हता, तर तो यहुदी होता व त्याला मंदिराच्या जागेत प्रवेश करण्याचा हक्क होता. पौलाने बोलण्याची परवानगी मिळवल्यावर तो लोकांना इब्री भाषेतून बोलू लागला.

१०. पौलाने यहुद्यांपुढे केलेल्या भाषणाचा काय परिणाम झाला, आणि त्याला चाबकाचा मार का बसू शकला नाही?

१० पौलाने निर्भिड साक्ष दिली. (२२:१-३०) मान्यवर गमलियेलकडून शिक्षण घेतलेला यहुदी अशी त्याने आपणाविषयी ओळख दिली. त्याने पुढे म्हटले की, तो ‘त्या मार्गा’चे अनुकारी असणाऱ्‍यांचा छळ करण्यासाठी दिमिष्काच्या वाटेवर असताना त्याला वैभवी येशू ख्रिस्ताचे दर्शन झाल्यामुळे तो अंधळा झाला, पण हनन्याने त्याची दृष्टी परत आणली. नंतर प्रभुने पौलाला म्हटलेः “जा, मी तुला परराष्ट्रीयांकडे दूर पाठवितो.” या शब्दामुळे आग पेटली. पौल जिवंत राहण्याच्या पात्रतेचा नाही असे ओरडून जमावाने आपली वस्त्रे काढून ती रागाने जमिनीवर मारून आकाशात धूळ उधळली. यामुळे लुसियाने पौलाला गढीत आणण्याची आज्ञा दिली व त्याला चाबकाचा मार देऊन यहुदी त्याच्याविरुद्ध का होते त्याची चौकशी केली. हा चाबूक कातड्याचा व गाठीने विणलेला किंवा त्यात धातू वा हाडांचे तुकडे विणून घातलेले असत. पौलाने जेव्हा असे विचारले की, “रोमन मनुष्याला व तशात ज्याला दोषी ठरविले नाही अशाला तुम्ही फटके मारणे हे कायदेशीर आहे काय?” तेव्हा चाबूक मारण्यापासून आवरला गेला. पौल रोमी नागरिक आहे हे समजल्यामुळे लुसिया खूपच घाबरला व त्याने पौलाला, यहुदी त्याच्याविरुद्ध का होते त्याच्या चौकशीसाठी सन्हेद्रीनपुढे उभे केले.

११. पौल कोणत्या अर्थाने परुशी होता?

११ “मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्‌भावाने वागत आलो आहे,” या वाक्याद्वारे पौलाने आपल्या समर्थनाची सुरवात करताच प्रमुख याजकाने जवळ उभे असणाऱ्‍यांना पौलाच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. (२३:१-१०) पौलाने त्याला म्हटलेः “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील.” “तू देवाच्या प्रमुख याजकाची निंदा करतोस काय?” असे काहींनी विचारले. कदाचित दृष्टी मंदावल्यामुळे पौलाने हनन्याला ओळखले नसावे. पण ती न्यायसभा परुशी व सदुक्यांनी मिळून बनलेली आहे असे जाणून पौल म्हणालाः ‘मी परुशी असून मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्‍यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.’ यामुळे सन्हेद्रीनमध्ये फूट पडली, कारण परुशी पुनरुत्थान मानीत होते तर सदूकी ते मानीत नव्हते. तेव्हा इतकी मोठी गडबड उडाली की, लुसियाला प्रेषिताची सुटका करून घ्यावी लागली.

१२. यरुशलेमात एका जीवघेण्या कटामधून पौल कसा वाचला?

१२ यानंतर पौल एका कटातून वाचला. (२३:११-३५) पौलाचा जीव घेईपर्यंत काही खाणार-पिणार नाही अशी चाळीस यहुद्यांनी शपथ घेतली. ही गोष्ट पौलाच्या भाच्याने त्याला व लुसियाला कळविली. यामुळे लष्करी संरक्षणाखाली प्रेषिताला यहुदियाची राजधानी असलेल्या कैसरिया येथील सुभेदार अँटोनियो फेलिक्स याजकडे नेण्यात आले. पौलाचे ऐकून घेतले जाईल ही हमी दिल्यावर फेलिक्सने त्याला हरोदाचा वाडा, जे सुभेदाराचे मुख्यालय होते तेथे पहारेकऱ्‍यात ठेवले.

अधिपतींसमोर निर्भिडता

१३. पौलाने फेलिक्सला कशाविषयी साक्ष दिली, व कोणता परिणाम झाला?

१३ प्रेषिताने फेलिक्ससमोर आपल्यावरील खोट्या दोषारोपाचे चांगले समर्थन केले व निर्भिडपणे साक्ष दिली. (२४:१-२७) दोष लावणाऱ्‍या यहुद्यांसमोर पौलाने स्पष्ट केले की त्याने जमावाला चिथावणी दिली नव्हती. त्याने म्हटले की, जे जे नियमशास्त्रानुसार व संदेष्ट्यांच्या लेखात आहे त्या सर्वांवर त्याचा विश्‍वास होता तसेच “नीतीमानांचे व अनितीमानांचे पुनरुत्थान होईल” अशी आशा तो धरून होता. पौल यरुशलेमाला दानधर्म (येशूच्या अनुयायांसाठी गोळा केलेले अनुदान, ज्यांना छळामुळे गरीबावस्था आली होती) घेऊन आला होता तसेच तो व्रतस्थ झाला होता. फेलिक्सने खटला लांबणीवर टाकला, पण पौलाने नंतर त्याला व त्याची बायको द्रुसिल्ला (हेरोद अग्रिप्पा १ला याची मुलगी) यांना ख्रिस्त, धार्मिकता, संयम आणि येणारा न्याय याविषयी प्रचार केला. यामुळे घाबरून जाऊन फेलिक्सने पौलाला घालविले. तथापि, नंतर त्याने प्रेषिताला बोलावणे पाठवले ते या हेतूने की, त्याच्याकडून काही लाच घेता येईल. पौल निर्दोष आहे हे फेलिक्सला कळून चुकले होते, पण यहुद्यांची मर्जी राखण्यासाठी त्याने पौलाला बंधनात ठेवले. दोन वर्षांनी फेलिक्सच्या जागी पुर्क्य फेस्त आला.

१४. फेस्तपुढे उभे राहिल्यावर कोणत्या कायदेशीर तरतुदीचा पौलाने स्वतःसाठी वापर केला, आणि याची कोणती साम्यता आज दिसून येते?

१४ पौलाने फेस्तासमोर सुद्धा निर्भिड स्वरुपाची साक्ष दिली. (२५:१-१२) प्रेषित मरणदंडालायक होता तर तो माघार घेणार नव्हता, पण कोणाच्या मर्जीखातर त्याने यहुद्यांच्या स्वाधीन केले जावे हे तो अपेक्षित नव्हता. यामुळेच आपल्या रोमी नागरिकत्वाच्या हक्काचा दावा करून पौलाने म्हटले की, “मी कैसराजवळ न्याय मागतो!” तो रोममध्ये व्हावा अशी त्याची इच्छा होती. (हा काळ निरोच्या आधीचा होता.) त्याचे म्हणणे मान्य झाले व आधी भाकित करण्यात आल्याप्रमाणे त्याला ‘रोममध्येही साक्ष द्यावयाची होती.’ (प्रे. कृत्ये २३:११) यहोवाचे साक्षीदार देखील “सुवार्तेच्या प्रत्युत्तरात व समर्थनात” करता येण्याजोग्या ज्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्यांचा लाभ घेतात.—फिलिप्पैकर १:२७.

१५. (अ) पौल राजा अग्रिप्पा व कैसर यांजपुढे उभा राहिला तेव्हा कोणत्या भविष्यवादाची पूर्णता घडली? (ब) शौल कशाप्रकारे ‘पराणीवर लाथ मारीत होता’?

१५ उत्तरेकडील यहुदियाचा हेरोद अग्रिप्पा राजा व त्याची बहीण बर्णीका (जिच्यासोबत त्याचे व्यभिचारी संबंध होते) कैसरीया येथे फेस्ताला भेटण्यास आले तेव्हा त्यांनी पौलाविषयी ऐकले. (२५:१३–२६:२३) अग्रिप्पा व कैसर यांना साक्ष देण्यामुळे पौलाने, तो राजांसमोर प्रभुचे नाव घेऊन जाईल या भविष्यवादाची पूर्णता केली. (प्रे. कृत्ये ९:१५) दिमिष्कच्या रस्त्यावर जे घडले त्याविषयी अग्रिप्पाला कळविताना पौल म्हणाला की, “पराणीवर लाथ मारणे तुला कठीण,” असे येशूने त्याला म्हटले होते. कोणी उद्दाम बैल जसा पराणीवर मागे लाथा झाडून स्वतःला अपाय करून घेत असे त्याप्रमाणे शौल देखील, देवाचे पाठबळ असणाऱ्‍या येशूच्या अनुयायांविरूद्ध लढून स्वतःला अपाय करून घेत होता.

१६. पौलाच्या साक्षीसंबंधाने फेस्त तसेच अग्रिप्पा यांनी कोणती प्रतिक्रिया दर्शविली?

१६ मग, फेस्त व अग्रिप्पा यांची काय प्रतिक्रिया दिसली? (२६:२४-३२) पुनरुत्थानाचा विषय समजू न शकल्यामुळे पण पौलाचा विश्‍वास बघून फेस्त म्हणालाः “पौला तू वेडा आहेस, विद्येचे अध्ययन फार झाल्यामुळे तुझे डोके फिरले आहे!” आज, यहोवाचे साक्षीदार पौलाप्रमाणेच “खरेपणाच्या व सूज्ञपणाच्या गोष्टी” विदित करीत असले तरीही काही लोक त्यांना वेडे म्हणतात. “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवितोस,” असे अग्रिप्पाने सांगून ती चौकशी संपविली, पण हे कबूल केले की, पौलाने कैसराकडे न्याय मागितला नसता तर त्याची सुटका होऊ शकली असती.

समुद्रावरील संकटे

१७. पौलाच्या रोमकडील प्रवासात त्याला जी समुद्रावरील संकटे अनुभवण्यास मिळाली, त्याचे तुम्हाला कसे वर्णन करता येईल?

१७ रोमच्या प्रवासात पौलाला “समुद्रावरील संकटे” यांचा अनुभव आला. (२ करिंथकर ११:२४-२७) पौलाला यूल्य नावाच्या लष्करी अधिकाऱ्‍याच्या स्वाधीन करण्यात आले. या अधिकाऱ्‍याने इतर कैद्यांना सोबत घेऊन कैसरीया ते रोमचा प्रवास सुरु केला. (२७:१-२६) त्यांचे जहाज सीदोनास लागले तेव्हा पौलाला विश्‍वासात असणाऱ्‍या बांधवांची भेट घेण्याची मुभा देण्यात आली; बांधवांनी त्याला आध्यात्मिकदृष्ट्या हुशारी आणली. (पडताळा ३ योहान १४.) आशिया मायनर येथील मुर्या बंदरात यूल्यने इटलीस जाणाऱ्‍या धान्याच्या जहाजावर सर्व कैद्यांना चढविले. वारा जोराचा होता तरी त्यांनी कसेही लयसा या क्रेत शहरालगत असणाऱ्‍या सुंदर बंदराजवळ जहाज आणले. तेथून निघून फैनिकेकडे वाटचाल करीत असता ईशान्येकडील वारा जहाजाला लागला. आफ्रिकेच्या उत्तरदिशेकडील सुर्ती नावाच्या भाटीवर जाऊन आदळण्याचे त्यांना भय वाटू लागले. यासाठी नावाड्यांनी “शीड उतरले.” वाहवत जाऊ नये यासाठी त्यांनी दोरखंडांनी जहाज आवळले. तरीपण, दुसऱ्‍या दिवशी देखील ते वादळाने हेलकावे खाऊ लागल्यामुळे त्यांनी भरगत टाकून दिले. तिसऱ्‍या दिवशी त्यांनी तारवाचे अवजार टाकून दिले. आता आशा मावळू लागली होती, पण देवाचा दूत पौलाला दिसला व त्याने त्याला सांगितले की, भिऊ नये; कारण त्याला कैसरापुढे उभे रहायचे आहे. तेव्हा सर्व प्रवासी बेटावरील किनाऱ्‍याला सुखरुप पोहंचतील असे पौलाने जेव्हा सर्वांना म्हटले तेव्हा त्यांना किती हायसे वाटले!

१८. पौल व त्याच्यासोबत असणाऱ्‍या प्रवाश्‍यांचे काय झाले?

१८ खलाशी बचावले. (२७:२७-४४) १४ व्या दिवसाच्या मध्यरात्री नावाड्यांना भूप्रदेश जवळ आला आहे असे कळाले. आवाजामुळे त्यांची खात्री झाली. आता खडकावर आदळून जहाज फुटू नये यासाठी नांगर टाकण्यात आले. पौलाच्या विनंतीवरुन सर्व २७६ प्रवाश्‍यांनी अन्‍न घेतले. मग, जहाजावरील गहू समुद्रात टाकून देऊन ते त्यांनी हलके केले. दिवस उजाडल्यावर नावाड्यांनी नांगर कापून टाकले, सुकाणांची बंधने ढिली केली व पुढेच शीड वाऱ्‍यावर सोडले. जहाज समुद्रात वर आलेल्या जमिनीस लागले व वराम लाटांच्या जोराने फुटून गेले. पण सर्वजण निभावून किनाऱ्‍यास पोहंचले.

१९. मिलिता येथे पौलाला काय घडले व तेथे त्याने इतरांसाठी काय केले?

१९ पाऊसामुळे चिंब झालेले व त्रासलेल्या स्थितीत ते सर्व मिलिता बेटावर आले. येथील लोकांनी त्यांच्यावर “विशेष उपकार” केले. (२८:१-१६) पौलाने काटक्यांच्या मोळीवर शेकोटी पेटविली तेव्हा एक साप बाहेर येऊन त्याच्या हातास झोंबू लागला. (आता या मिलिता बेटावर विषारी साप नाहीत, पण तो “विषारी जिवाणू” होता.) मिलितामधील लोक म्हणाले की, पौल हा घातकी माणूस आहे व “न्यायदेवता” त्याला जगू देणार नाही. पण तो कोसळून मेला नाही तसेच सर्वांगाने सुजला नाही हे बघून ते म्हणू लागले की हा कोणी देव आहे. पौलाने नंतर बऱ्‍याच जणांना बरे केले. यात मिलिताचा प्रमुख अधिकारी पुब्ला याचा बाप देखील होता. यानंतर तीन महिन्यांनी पौल, लूक व अरिस्तार्ख हे दयस्कुरै (खलाश्‍यांवर मर्जी दाखविते असे समजले जाणारे कास्टर व पौलूक्स यांचे जुळे दैवत) या निशाणाच्या तारूने निघाले. पुत्युलास आल्यावर यूल्य इतर कैद्यांसोबत पुढे निघाला. रोमच्या राजधानीतून बंधुवर्गास पौल आल्याचे कळले तेव्हा ते त्याला भेटण्यासाठी अप्पियाची पेठ व तीन उतारशाळा येथे आले. पौलाने देवाचे उपकारस्मरण केले व धैर्य धरले. सरतेशेवटी रोममध्ये आल्यावर पौलाला वेगळे राहण्याची परवानगी देण्यात आली, पण शिपायी त्याच्यावर पहारा देत होते.

यहोवाच्या राज्याची घोषणा करीत राहा!

२०. रोममधील आपल्या निवासस्थानी पौलाने स्वतःला काय करण्यात मग्न ठेवले?

२० रोममधील आपल्या निवासस्थानी पौलाने यहोवाच्या राज्याविषयी निर्भिडतेने साक्ष दिली. (२८:१७-३१) त्याने यहुद्यांच्या प्रमुख माणसांना सांगितलेः “इस्राएलाच्या आशेमुळे मी ह्‍या साखळीने बांधलेला आहे.” त्या आशेमध्ये मशीहाचा स्वीकार करण्याचे समाविष्ट आहे, व याच आशेसाठी आपणही त्रास सहन केला पाहिजे. (फिलिप्पैकर १:२९) जरी बहुतेक यहुद्यांनी विश्‍वास धरला नाही तरी पुष्कळ विदेशी लोकांनी व काही यहुदी अवशिष्टांनी आपल्या अंतःकरणाची चांगली स्थिती दाखवली. (यशया ६:९, १०) साधारण दोन वर्षे (सुमारे ५९-६१ इ.स.) पौलाने, त्याला भेटण्यास येणाऱ्‍या सर्वांचे स्वागत केले व त्यांस “तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत (राहिला), आणि प्रभु येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवीत” राहिला.

२१. आपले जीवन संपेपर्यंत पौलाने कसले उदाहरण मांडले?

२१ निरोने पौलाला निर्दोष असे घोषित करून त्याला सोडून दिले. मग, या प्रेषिताने तीमथ्य व तीत यांच्या सहवासामध्ये नव्याने आपले काम सुरु केले. पण पुन्हा त्याला रोममध्ये (सुमारे इ.स. ६५) कैदेत टाकण्यात आले व बहुधा निरोच्या हातून त्याला हुतात्मिक मरण आले. (२ तीमथ्य ४:६-८) पण आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत पौलाने देवराज्याचा निर्भिड घोषक असे आपले उदाहरण मांडले. असाच आत्मा राखून आज देवास समर्पित असणारे सर्वजण यहोवाच्या राज्याची निर्भिडपणे घोषणा करीत राहो!

तुम्ही काय उत्तर देणार?

◻ पौलाने इफिसच्या वडीलांना उपाध्यपणाची कोणती तालीम दिली?

◻ देवाच्या इच्छेच्या अधीन राहण्यामध्ये पौलाने कोणते उदाहरण घालून दिले?

◻ जमावाने केलेल्या दंग्याबाबत पाहता, पौल व आजचे यहोवाचे साक्षीदार यांच्या अनुभवामध्ये कोणते साम्य दिसते?

◻ फेस्त सुभेदारासमोर असताना पौलाने कोणत्या कायदेशीर तरतुदीचा स्वतःसाठी लाभ करून घेतला व याची कोणती आधुनिक समांतरता आहे?

◻ रोममधील आपल्या निवासस्थानी पौल कोणते कार्य करण्यात मग्न राहिला व त्याने कोणते उदाहरण मांडले?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा