आज मृत असणारे लक्षावधी लोक पुन्हा जिवंत होतील
आज मृत असणारे लक्षावधी लोक पुन्हा जिवंत होतील—अंतःकरणास चेतविणारी केवढी ही आशा! पण ती खरी आहे का? तुमची खात्री कशाने पटू शकेल? कोणा अभिवचनावर विश्वास ठेवायचा आहे तर मग, जो ते वचन देतो तो ते पूर्ण करण्यास तयार व समर्थ आहे याची पहिली खात्री करून घेतली पाहिजे. तर मग, आज मृत असणारे लक्षावधी लोक पुन्हा जिवंत होतील, असे वचन देणारा कोण आहे?
इ. स. ३१च्या वसंत ऋतुमध्ये येशू ख्रिस्ताने हे निर्भिडपणे घोषित केले की यहोवा देवाने त्याला मृतांना परत जिवंत करण्याची शक्ती दिलेली आहे. येशूने हे खात्रीपूर्वक म्हटलेः “जसा पिता मेलेल्यांस उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यास जिवंत करतो. याविषयी आश्चर्य करु नका, कारण असा समय येत आहे की, त्यात कबरेतील सर्व मनुष्य त्याची [येशूची] वाणी ऐकतील . . . आणि . . . बाहेर येतील.” (योहान ५:२१, २८, २९) होय, येशू ख्रिस्ताने हे अभिवचन दिलेले आहे की, आज मृत असणारे लक्षावधी लोक याच पृथ्वीवर पुन्हा जिवंत होतील व त्यांच्यासमोर येथे सर्वदा राहण्याचे भवितव्य असेल. (योहान ३:१६; १७:३; पडताळा स्तोत्रसंहिता ३७:२९ व मत्तय ५:५.) स्वतः येशूनेच हे अभिवचन दिलेले असल्यामुळे त्याची ते पूर्ण करण्याची इच्छा असू शकेल हे आपण समजू शकतो. पण प्रश्न हा आहे की, तो ते करण्यास समर्थ आहे का?
पवित्र शास्त्रातील अहवालानुसार, येशूने ते अभिवचन देण्याच्या घटकेपर्यंत कोणाही व्यक्तीला जिवंत केलेले नव्हते. पण यानंतर दोनपेक्षा कमी वर्षात, तो पुनरुत्थान घडवून आणू शकतो व तशी त्याची इच्छाही आहे हे त्याने मोठ्या सामर्थ्यशाली मार्गाने प्रदर्शित केले.
“लाजरा, बाहेर ये”
तो हृदयस्पर्शी प्रसंग होता. लाजर गंभीरपणे आजारी होता. त्याच्या मरीया व मार्था या दोघा बहिणींनी यार्देन नदीपलिकडे असलेल्या येशूला निरोप पाठविलाः “प्रभूजी, ज्याच्यावर आपले प्रेम आहे, तो आजारी आहे.” (योहान ११:३) होय, येशूचे त्या कुटुंबावर खूप प्रेम होते. त्यांच्या बेथानी येथील घरी त्याचे बहुतेक वारंवार येणेजाणे होते. (लूक १०:३८-४२; पडताळा लूक ९:५८.) पण आता तर येशूचा हा प्रिय मित्र लाजर फार आजारी होता.
तर, येशूने काय करावे असे मरीया व मार्था अपेक्षित होत्या? त्यांनी त्याला बेथानीस येण्याला विनंती केली नाही. पण त्यांना ठाऊक होते की, येशूचे लाजरावर खूप प्रेम आहे. मग, आपल्या दुखणाईत मित्राला भेटावे असे येशूला वाटणार नाही का? त्यामुळे येशू त्याला अद्भूतरित्या बरे करील याची त्या दोघा बहिणींना पुरेपूर खात्री होती. खरे म्हणजे, आतापर्यंतच्या आपल्या सेवकपणात येशूने बरे करण्याचे पुष्कळ चमत्कार केले होते आणि यामध्ये अंतर हे त्याच्यासाठी कसलेच अडखळण बनले नव्हते. (पडताळा मत्तय ८:५-१३.) मग, तो त्याच्या प्रिय मित्रासाठी काहीच करणार नाही का? तरीपण येशू बेथानीस लगेच निघण्याआधी, होता तेथे आणखी दोन दिवस राहिला.—योहान ११:५, ६.
निरोप पाठविल्यावर काही वेळाने लाजर मेला, कदाचित येशूला जेव्हा तो निरोप मिळाला असावा तेव्हाच हे झाले असावे. (पडताळा योहान ११:३, ६, १७.) पण त्यानंतर निरोपाची गरज नव्हती. येशूला समजले की, लाजर कधी वारला व त्याबद्दल काही करावयाचा त्याचा हेतु होता. लाजारच्या मृत्युबद्दल बोलताना त्याने शिष्यांस म्हटलेः “आपला मित्र लाजर निजला आहे; मी त्याला झोपेतून उठवावयास जातो.” (योहान ११:११) येशूने या आधी दोघांस, दोन्ही वेळा ते वारल्याच्या थोड्याच वेळेनंतर परत जिवंत केले होते.a परंतु या खेपेला मात्र वेगळेच होते. येशू बेथानीस येईपर्यंत त्याचा प्रिय मित्र दिवंगत होऊन चार दिवस झाले होते. (योहान ११:१७, ३९) ज्याला मरुन एवढा काळ झाला व ज्याचे शरीर कुजू लागले होते अशा कोणास येशू परत जिवंत करू शकेल का?
येशू येत आहे हे ऐकून चपळ मार्था त्वरेने त्याला भेटावयास सामोरी गेली. (पडताळा लूक १०:३८-४२.) येशूला भेटताच तिचे अंतःकरण उचंबळून आले व ती म्हणालीः “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” तरी आता तिने आपला विश्वास व्यक्त करुन म्हटलेः “जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपणाला देईल, हे मला ठाऊक आहे.” तिच्या दुःखातिशयाने भावनाविवश होऊन येशूने तिला खात्री दिलीः “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” तिने भावी पुनरुत्थानावरील आपला विश्वास दर्शविला तेव्हा येशूने अगदी स्पष्ट शब्दात तिला सांगितलेः “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.”—योहान ११:२०-२५.
कबरेजवळ पोहंचल्यावर येशूने खुणवून सांगितले की, तोंडावर ठेवलेली धोंड बाजूला काढावी. सुरवातीला मार्थेने आक्षेप घेतलाः “प्रभुजी, आता त्याला दुर्गंधि येत असेल. कारण त्याला चार दिवस झाले आहेत.” पण येशूने तिला खात्री देऊन म्हटलेः “तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?” मग, मोठ्याने प्रार्थना केल्यावर त्याने आज्ञा केलीः “लाजरा, बाहेर ये.” येशूची आज्ञा ऐकताच, लाजर, मरुन चार दिवस झाले होते तरी, बाहेर आला!—योहान ११:३८-४४.
हे खरेच घडले का?
लाजरास परत जिवंत केल्याचा वृत्तांत योहानाच्या शुभवर्तमानात एक ऐतिहासिक घटना म्हणून दिलेली आहे. त्याचा तपशील एवढा स्पष्ट आहे की, त्याला अतिशयोक्ती म्हणता येणार नाही. त्याच्या ऐतिहासिक मोलाबद्दल प्रश्न करणे म्हणजे पवित्र शास्त्रातील चमत्कारांबद्दल, ज्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या स्वतःच्या पुनरुत्थानाचाही समावेश आहे, त्याबद्दल प्रश्न करणे होय.b आणि येशूचे पुनरुत्थान नाकारणे म्हणजे संपूर्ण ख्रिस्ती विश्वासाचा धिक्कार करणे होईल.—१ करिंथकर १५:१३-१५.
खरे म्हणजे, तुमचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास असेल तर पुनरुत्थानावर विश्वास बाळगण्याबद्दल तुम्हाला कोणतीच अडचण वाटणार नाही. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती आपल्या अंतिम इच्छेची तसेच साक्षीची व्हिडीओ टेप करू शकतो. मग, त्याच्या मृत्युनंतर त्याचे नातेवाईक व मित्र ती चालवून त्यामध्ये त्या व्यक्तीला मालमत्ता कशी हाताळावी हे समजावून सांगताना पाहू व ऐकू शकतात. शंभर वर्षांआधी ही सोय विचारशक्तीपलिकडील होती. आजही, जे या जगात दूर भागात राहतात अशांना व्हिडीओ रेकॉर्डिंगचा “चमत्कार” समजशक्तीच्या पलिकडील आहे. सृष्टीकर्त्याने प्रस्थापित केलेल्या विज्ञानशास्त्रीय तत्त्वांचा उपयोग करुन मानव जर चलतचित्रांची व ध्वनिची फीत तयार करू शकतो तर सृष्टीकर्ता यापेक्षा कितीतरी अधिक करु शकणार नाही का? तर मग, ज्याने जीवनाची उत्पत्ती केली आहे तो एखाद्या व्यक्तीला नवे शरीर पुरवून त्याचे व्यक्तीमत्व परत त्यामध्ये रुजवून त्याला परत जिवंत करण्याची क्षमता राखून आहे हे मानणे व्यवहार्य ठरणार नाही का?
लाजराला परत जिवंत करण्याचा चमत्कार घडल्यामुळे येशू व पुनरुत्थानावरील विश्वासात भर पडली. (योहान ११:४१, ४२; १२:९-११, १७-१९) हा चमत्कार, यहोवा देव व त्याचा पुत्र यांची पुनरुत्थान घडवून आणण्याची किती कळकळीची इच्छा आहे हे मोठ्या हृदयस्पर्शी रितीने कळवितो.
‘देवास उत्कंठा असेल’
लाजराच्या मृत्युबद्दल येशूने जी प्रतिक्रिया प्रदर्शित केली ती देवाच्या पुत्राठायी असणाऱ्या अत्यंत प्रेमळ गुणास व्यक्त करीत होती. या प्रसंगी ज्या गहन भावना त्याच्याठायी उचंबळून आल्या त्या हे सूचित करीत होत्या की, त्याला मृतास उठविण्याची केवढी तीव्र इच्छा होती. आम्ही वाचतोः “येशू होता तेथे मरीया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली: ‘प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.’ येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहुद्यांना रडता पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला, आणि म्हणालाः ‘तुम्ही त्यास कोठे ठेवले आहे?’ ते त्याला म्हणालेः ‘प्रभुजी, येऊन पाहा.’ येशू रडला. यावरुन यहूदी म्हणाले: ‘पाहा, याचे त्याजवर किती तरी प्रेम होते.’”—योहान ११:३२-३६.
येशूठायी असणारी अंतःकरण सहानुभूति येथे तीन आविर्भावांनी दर्शविली आहेः “आत्म्यात खवळला,” “विव्हळ झाला,” व “रडला.” या हृदयस्पर्शी प्रसंगाचे वर्णन करण्यासाठी प्रेषित योहानाने मूळ भाषेतील ज्या शब्दांचा येथे उपयोग केला ते, येशू किती भावनावश झाला होता ते सूचित करतात.
“आत्म्यात खवळला,” यासाठी जो ग्रीक शब्द उपयोगात आणला तो (एम.ब्री.माʹओ.माय) या क्रियापदापासून आहे जो अत्यंत दुःख किंवा तीव्रतेने परिणाम झालेला सुचवितो. पवित्र शास्त्र भाष्यकर्ता विल्यम बर्कले म्हणतातः “सर्वसाधारण श्रेष्ठ दर्जाचे ग्रीक भाषेत [एम.ब्री.माʹओ.माय] या शब्दाचा साधारणपणे घोड्याचे फुरफुरणे व्यक्त करण्यास उपयोग करतात. येथे त्याचा अर्थ एवढाच होतो की, येशूच्या अंतस्थ भावना एवढ्या तीव्रतेने दुखविल्या गेल्या की नकळत तो कण्हला; व त्याचा गंभीर आवाज अंतःकरणातून उमटला.”
ज्याचे भाषांतर “विव्हळ” असे केले तो ग्रीक भाषेतील शब्द (टारसʹसो) यापासून आहे, जो अंतःकरणाची व्यग्रता निदर्शित करतो. द न्यू थायर्स ग्रीक-इंग्लिश लेक्सिकन ऑफ द न्यू टेस्टमेंटनुसार त्याचा अर्थ “एखाद्यास अंतस्थ क्षोभ होणे, . . . दुःखाने विव्हळ होणे, शोकग्रस्त होणे” असा होता. “रडला,” ही संज्ञा ग्रीक क्रियापद (डा.क्रायʹओ) यापासून आहे व त्याचा अर्थ “अश्रू गाळणे, शांतपणे रडणे,” असा होतो. हे, योहान ११:३३ नुसार मरीया व तिजसोबत असणारे यहूदी लोक ज्याप्रकारे ‘रडले’ होते त्यासारखे नव्हते. तेथे ग्रीक भाषेतील (क्लायʹओ पासूनचा) शब्द उपयोगात आणलेला आहे, ज्याचा अर्थ मोठ्याने किंवा ऐकू जाईल असे रडणे, असा होतो.c
यास्तव, आपला प्रिय मित्र लाजर वारला आहे व लाजरची बहीण एवढे दुःख करीत असल्याचे बघून येशू हळहळला. येशूचे अंतःकरण दुःखी भावनांनी एवढे दाट भरले गेले की, त्याच्या डोळ्यांना अश्रूंचा पाझर फुटला. हे लक्षणीय आहे की, येशूने या प्रसंगाआधी दोघा जणांना परत जिवंत केले होते व आताही तो लाजराच्या बाबतीत तेच करून दाखविणार होता. (योहान ११:११, २३, २५) तरी सुद्धा विशेष हे की या प्रसंगी तो “रडला.” याद्वारे हे दिसते की, मानवी जिवांस परत जिवंत करणे हे येशूचे सरावाचे काम नव्हते. तर या प्रसंगी त्याने ज्या हळव्या व तीव्र भावना व्यक्त केल्या त्याकरवी, मृत्युच्या विध्वंसक परिणामापासून मोकळीक मिळवून देण्याची केवढी तीव्र इच्छा तो बाळगून होता हे कळते.
ज्या अर्थी, येशू हा ‘यहोवा देवाचे हुबेहुब प्रतिरुप आहे,’ त्या अर्थी तो आमच्या स्वर्गीय पित्यापेक्षा काही कमी करील अशी अपेक्षा करु शकणार नाही. (इब्रीयांस १:३) यहोवा स्वतः पुनरुत्थान घडविण्यास केवढा उत्सुक आहे त्याबद्दल विश्वासू ईयोबाने असे म्हटले होतेः “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय? . . . तू मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईल. मी जो तुझ्या हातची कृति त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.” (ईयोब १४:१४, १५) “तुला उत्कंठा लागेल,” याकरता जे मूळ भाषेतील शब्द उपयोगात आणले आहेत ते कळकळीची आस्था व इच्छा व्यक्त करतात. (उत्पत्ती ३१:३०; स्तोत्रसंहिता ८४:२) यहोवा स्वतः मोठ्या आतुरतेने पुनरुत्थानाच्या घटनेची अपेक्षा करीत असावा हे स्पष्ट आहे.
तर मग, आम्ही पुनरुत्थानाच्या अभिवचनावर खरोखरी विश्वास ठेवू शकतो का? यहोवा व त्याचा पुत्र हे दोघेही ते घडवून आणण्यात तयार व समर्थ आहेत यात काहीच संशय नाही. याचा तुम्हाकरता काय अर्थ होतो? तुम्हापुढे तुमच्या मृत प्रियजनास परत याच पृथ्वीवर शांतीदायक परिस्थितीत पुनर्मिलनाचे भवितव्य राखून ठेवलेले आहे.
हीच आशा आता, रॉबर्टा (आधीच्या लेखात उल्लेखिण्यात आलेली) बाळगून आहे. तिची आई वारल्यानंतर अनेक वर्षांनी तिला यहोवाच्या साक्षीदारांनी पवित्र शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करण्यास मदत दिली. ती आठवतेः “पुनरुत्थानाच्या आशेबद्दल चांगली समज झाल्यावर मी खूप रडले. मी माझ्या आईला परत भेटू शकेन, हे जाणणे केवढे आश्चर्यकारक आहे.” तुमच्याही अंतःकरणाला तुमच्या कोणा प्रियजनाला भेटण्याची ओढ लागलेली असेल, तर या आश्चर्यकारक भवितव्याबाबत अधिक माहिती मिळवावी असे तुम्हाला नक्की वाटेल यात संशय नसणार.
[तळटीपा]
a योहान ५:२८, २९ मध्ये लिखित असणारे येशूचे अभिवचन ते लाजराचा मृत्यु यामधील काळात, येशूने नाईनच्या विधवेच्या मुलास व याईरच्या मुलीला जिवंत केले.—लूक ७:११-१७; ८:४०-५६.
b द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? या वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीच्या पुस्तकातील अध्याय ६वा, “द मिरॅकल्स्—डीड दे रिअली हॅपन?” पहा.
c मोठ्याने रडणे या संदर्भात जो ग्रीक शब्द (क्लायʹओ) उपयोगात आणला जातो तो येशूने यरुशलेमाच्या येणाऱ्या नाशाबद्दल आधीच भाकित केले त्यावेळी उपयोगात आणला गेला हे पहाणे मनोवेधक आहे. लूकचा अहवाल म्हणतोः “मग तो नगराजवळ [यरुशलेम] आल्यावर, ते पाहून त्याकरता रडला.”—लूक १९:४१.
[५ पानांवरील चित्रं]
याईरच्या मुलीचे येशूने केलेले पुनरुत्थान मृतांच्या भावी पुनरुत्थानाच्या आशेवर विश्वास ठेवण्याचा आधार देते
[६ पानांवरील चित्रं]
लाजरच्या मृत्युमुळे येशूला मनस्वी दुःख झाले होते
[७ पानांवरील चित्रं]
जे प्रत्यक्ष पुनरुत्थान होताना पाहतील त्यांचा आनंद, नाईन गावातील विधवेच्या मृत मुलास येशूने परत जिवंत केले त्यावेळेच्या आनंदासारखा असेल