जेव्हा मृत्यु कोणा प्रियजनास हिरावून घेतो
“माझी आई १९८१ मध्ये कर्करोगाने वारली. ती माझी सावत्र आई होती. तिच्या मृत्युमुळे मजवर व माझ्या सावत्र भावावर मोठा तडाखा बसला. त्यावेळी मी १७ वर्षांची तर माझा भाऊ ११ वर्षांचा होता. मला आई नसल्यामुळे खूप चुकल्यासारखे होते. माझी वाढ कॅथोलिक विश्वासात झाली, आणि असे सांगण्यात आले होते की ती आता स्वर्गात आहे. तिजसोबत असावे म्हणून मी आपले जीवन संपविण्याचा विचार करीत होते. माझी आई माझी खरी मैत्रिण होती.”—रॉबर्टा, वय वर्षे २५.
असा अनुभव कधी आपणास आलेला आहे का? तर कोणा प्रियजनास गमावल्यामुळे केवढे दुःख होते याची तीव्र जाणीव तुम्हास घडली असेल. कोणा प्रियजनास असे हिरावून नेण्याची मरणाठायी एवढी शक्ती असावी हे केवढे अयोग्य वाटते. आणि जेव्हा तसे घडते, तेव्हा ज्याच्याशी आम्ही इतक्या आवडीने बोलत होतो, हसत होतो, आलिंगन देत होतो त्या प्रिय व्यक्तीला आता गमावले आहे हा विचारच सहन होत नाही. रॉबर्टाने म्हटले तसे, तुमचे प्रियजन वर स्वर्गात गेले आहेत असे कोणी तुम्हास सांगितले तरी ते दुःख विसरले जात नाही.
पण तेच, असे आपल्याला कळले की, अगदी नजीकच्या काळात आमचे आमच्या मृत प्रियजनांशी पुनर्मिलन होईल, आणि तेही स्वर्गात नव्हे, तर या पृथ्वीवर शांतीदायक व नीतीमान वातावरणात होईल तर आपणास कसे वाटेल? तसेच आपल्याला असे समजले की, तेथून पुढे मानवासमोर परिपूर्ण आरोग्य अनुभवण्याचे भवितव्य असेल व लोक कधीच मरणार नाही, मग काय? ‘खरीच, केवढी ही विचारप्रवर्तक विचारसरणी!’ असेच तुम्ही म्हणाल.
तथापि, मागे इ. स. तील पहिल्या शतकात येशू ख्रिस्ताने अगदी निर्भिडपणे म्हटले होतेः “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.” (योहान ११:२५) ते, मृतांना पुन्हा जिवंत केले जाईल हे अभिवचन होते. तो केवढा थरारक अनुभव असेल!
तरी देखील, तुम्हाला याचे नवल वाटत असेलः ‘अशा अभिवचनावर विश्वास ठेवण्यास काही मूलभूत आधार आहे का? हे केवळ कानाला गोड लागणारे विचार नाहीत याची मला कशी खात्री होऊ शकेल? तसेच यावर विश्वास ठेवण्यास काही मूळाधार असला तरी त्याच्या पूर्णतेचा मजसाठी व माझ्या प्रियजनासाठी काय अर्थ होणार?’ या व इतर प्रश्नांची चर्चा पुढील लेख करील.