अलंकार मार्कच्या शुभवर्तमानातील
यहोवाच्या आत्म्याने मार्कला येशूच्या भूतल जीवनाचा व उपाध्यपणाचा कृतिसंपन्न अहवाल लिहिण्यास प्रेरित केले. जरी हे शुभवर्तमान, मार्क हाच याचा लेखक असल्याचा कोठेच उल्लेख करीत नाही तरी याचा पुरावा आम्हास, ज्यांचे लिखाण आमच्या समान शकाच्या पहिल्या चार शतकापर्यंत पोहोचले होते त्या पेपीयस्, जस्टीन मार्टर, टर्टुलियन, ओरीजीन, इसेबियस व यांच्यासारखाच इतर लेखकांच्या लिखाणात आढळतो.
परंपरागत मतानुसार, प्रेषित पेत्राने या शुभवर्तमानाबद्दलची मूलभूत माहिती पुरविलेली आहे. ओरीजीन म्हणतात, मार्कचे लिखाण “पेत्राच्या सुचनानुसारचे असावे.” पण मार्ककरिता दुसरेही मुळाधार उपलब्ध असावेत, कारण शिष्यांच्या सभा त्याच्या आईच्या घरी भरत होत्या. प्रत्यक्षात तो “तरुण” मार्क असावा ज्याने येशूला धरुन नेणाऱ्यांना हुलकावणी दिली होती. याशिवाय, त्याची कदाचित ख्रिस्ताशी व्यक्तीगत ओळखही असावी.—मार्क १४:५१, ५२; प्रे. कृत्ये १२:१२.
कोणासाठी लिहिले?
मार्कने त्याचे लिखाण प्रामुख्यत्वे विदेशीय वाचकांना विचारात घेऊन केलेले असावे. उदाहरणार्थ, थोडक्यात पण पूर्ण असणारी लिखाणाची शैली ही रोमी स्वभावाला साजेशी होती. त्याने “कुर्बान” म्हणजे “देवास अर्पिलेले दान” असा अर्थ दिला (७:११) आणि जैतुनाच्या डोंगरावरुन मंदिर दिसू शकत होते हे सूचित केले. (१३:३) मार्कने हेही स्पष्ट केले की, परुशी “उपास करीत होते,” व सदूकी हे “पुनरुत्थान नाही असे म्हणणारे” होते. (२:१८; १२:१८) अशा स्पष्टीकरणाची यहुदी वाचकांना गरज नव्हती.
हे खरे की, मार्क शुभवर्तमानाचे वाचन सर्वांस फायदेकारक ठरु शकते. पण त्याच्या पार्श्वभूमीतील वैशिष्ट्ये कळल्यास त्यातील काही अलंकाराची आम्हाठायी रसिकता वाढेल.
अद्भूत चमत्कार करणारा देवाचा पुत्र
मार्क त्या अनेक चमत्कारांचा उल्लेख करतो जे ख्रिस्ताने देवाच्या शक्तीद्वारा केले. उदाहरणार्थ, एके प्रसंगी एका घरात इतके लोक जमले होते की, एका पक्षघाती मनुष्याला येशूकडे बरे होण्यास आत नेता येईना, म्हणून त्यांनी छप्पर उस्तरुन (खोदून) काढले व वाट करुन तेथून त्याला येशूजवळ सोडले. (२:४) घरात बरीच दाटी झालेली होती म्हणून त्याला जिन्याने किंवा घराबाहेरील पायऱ्यांनी वर नेले असावे. पण छप्पर उस्तरण्याची किंवा खोदून काढण्याची का गरज भासली? कारण, बहुतेक छप्परे माळवदासारखी सपाट होती व ती तुळईवर बसवीत, आणि एका भींतीपासून ते पलिकडील भींतीपर्यंतच्या तुळ्यांच्यामध्ये तिरपे वासे जाडलेले असत व यांना वेळूच्या पानांच्या डहाळ्यांनी झाकत. त्याजवर चिकनमातीचा जाड थर लावीत. याकरताच, त्या पक्षघाती माणसाला येशूच्या पुढ्यात सोडण्याकरिता या चिकणमातीच्या छपरास खोदून उघडावे लागले. पण हे सर्व कष्ट केल्यावर केवढे अद्भूत आशीर्वाद लाभले! ख्रिस्ताने त्या मनुष्याला तत्काळ बरे केले आणि सर्व उपस्थितांनी देवाचे गौरव केले. (२:१-१२) यहोवाचा हा पुत्र नवीन जगात केवढे विस्मयकारक रोगनिवारण करणारे चमत्कार करील याची ही केवढी निश्चित शाश्वती!
येशू मचव्यावर असताना त्याने आणखी एक चमत्कार करुन दाखविला. यावेळी तो “उशास घेऊन” झोपला होता. जेव्हा गालील समुद्रात वादळ उठले व बोट डगमगू लागली तेव्हा त्याला मध्येच उठविले गेले व त्याने त्या वादळास शांत केले. (४:३५-४१) ज्या उशीचा येथे उल्लेख आहे ती, आज बिछान्यावर जी मऊ कापसाची उशी घेतात तशापैकीची नव्हती हे सुव्यक्त आहे. तर कदाचित वल्हेकरी बसण्यासाठी जो लोकरीच्या आच्छादनाचा पाट घेत तो किंवा जहाजाच्या मागे बसण्याकरता असलेला लोड असावा. काही असो, पण येशूने ज्या हुकमी आवाजात समुद्राला म्हटलेः “उगा रहा. शांत हो,” त्यावरुन, तेथे जे सर्व उपस्थित होते त्यांना विश्वासाचा प्रत्यक्ष पुरावा दिसला, कारण “वारा पडला व अगदी निवांत झाले.”
दकापलीस येथील उपाध्यपण
गालील समुद्र पार करुन येशूने दकापलीस किंवा दहा नगरांच्या प्रदेशात प्रवेश केला. या सर्व नगरात जरी यहुदी रहिवाशांची लोकसंख्या अधिक होती तरी, तेथे ग्रीक किंवा हेल्लेणी सांस्कृतिक केंद्रे होती. तेथे, गरसेकरांच्या देशात, “कबरात राहात” होता त्या भूतग्रस्त माणसाला येशूने दुरात्मिक प्रभावापासून मोकळे केले.—५:१-२०.
काही वेळा, डोंगरात खोदलेल्या कबरा वेडे, गुन्हेगार यांच्या लपून राहण्याच्या जागा किंवा गरीबांची वसतीस्थाने होती. (पडताळा यशया २२:१६; ६५:२-४.) १९ व्या शतकातील संशोधन कामानुसार, येशू जेथे या भुताटकीने झपाटलेल्या माणसाला भेटला त्या स्थळी भेट देणारा एक पर्यटक म्हणतोः “ती कबर आतून सुमारे आठ फूट उंचीची होती. आत उतरण्यास चांगल्या पायऱ्या केलेल्या होत्या. आतील जागा बारा पावले लांबीरुंदीची होती. पण प्रकाश आत येण्याची कोणतीच सोय नसल्यामुळे फक्त दारातून येणाऱ्या उजेडात जेवढे दिसत होते तेवढेच पाहू शकलो. शिवाय इतर ठिकाणी होत्या तशीच आतली खोली आहे का हे दिसू शकले नाही. एखादी यथास्थित दगडी शवपेटी आताही तेथे राहू शकत होती, पण आता त्याचा उपयोग एक कुटुंब धान्य व इतर वस्तु ठेवण्याचे कोठार म्हणून करीत होते. अशा प्रकारे निर्जन पडलेली कबर आता वस्ती करण्याकरता सुरक्षित, थंडाव्याचे सोयीस्कर स्थान बनले आहे.”
येशू व संप्रदाय
एके प्रसंगी, परुशी व काही सदुक्यांनी अशी तक्रार केली की, येशूचे शिष्य हात न धुता जेवतात. विदेशी वाचकांच्या लक्षात यावे म्हणून मार्क येथे विवेचन देतो की, परुशी व इतर यहुदी घोट्यापर्यंत हात धुतल्याशिवाय जेवीत नसत. बाजारातून परतल्यावर स्नान केल्यावाचून किंवा पाणी शिंपडल्याविना व प्याले, घागरी व पितळेची भांडी पाण्यात बुडवून विसळविल्याविना त्यातून जेवीत नसत.—७:१-४.
जेवणाआधी स्वतःवर पाणी शिंपडून घेतल्यानंतरही हे यहुदी प्याले, घागरी व पितळेची भांडी बाप्तिस्म्यासमान पूर्णपणे पाण्यात बुडवून काढीत. ते केवढे संप्रदायप्रेमी होते याचे उदाहरण देण्यात जॉन लाईटफूट प्रथम राब्बींच्या कामाचा आढावा घेऊन पुढे म्हणतात की, केवढे पाणी घ्यावयाचे, कोणत्या पद्धतीने अंगावर ओतावयाचे व धुण्यास केवढा वेळ द्यावयाचा या तपशीलाकडे ते फाजील लक्ष पुरवीत. हेच लाईटफूट एका मुळाधाराचे अवतरण घेऊन लिहितात की, काही यहुदी जेवणाआधी, “शिब्ता”करवीचा डंस चुकविता यावा म्हणून एवढ्या काळजीपूर्वक धुणे करीत. शिब्ता हा “एक दुरात्मा असल्याचे समजले जाई, जो पुरुषांच्या हातावर रात्री बसतो व कोणी हात न धुता अन्नास शिवला तर तो दुरात्मा अन्नावर बसतो व धोक्याचे बनवितो.” मग, येशूने शास्त्री व परुशांना “देवाची आज्ञा सोडून मनुष्याचा सांप्रदाय अनुसरीत” म्हणून धिक्कारले यात नवल ते काय!—७:५-८.
येशूची अंतिम जाहीर उपाध्यसेवा
येशूचे गालील प्रांतातील नंतरचे उपाध्यपण व त्याने पेरियामध्ये केलेली कामे यांचा उल्लेख केल्यावर मार्क आमचे लक्ष यरुशलेमातील व त्यासभोवतालच्या परिसरात ज्या घटना घडल्या त्यांच्याकडे केंद्रित करतो. उदाहरणार्थ, तो एका प्रसंगाचा उल्लेख करतो ज्यात येशू मंदिर भांडारासमोर बसून लोक भांडारात पैका कसा टाकतात ते पाहात होता. येशूने पाहिले की, एका दरिद्री विधवेने “दोन टोल्या” टाकल्या. तरीही, त्याने म्हटले की, तिने ‘सर्वांपेक्षा अधिक टाकिले.’ कारण इतरांनी आपल्या समृद्धीतून टाकले, परंतु तिने ‘आपली सर्व उपजिविका टाकली.’ (१२:४१-४४) ग्रीक भाषेच्या शास्त्रवचनानुसार तिने दोन लेप्ता दान केल्या होत्या. एक लेप्ता हे छोटेसे तांब्याचे किंवा ब्राँझचे यहुदी नाणे होते; आज त्याला जणू बाजार किंमत नाही. पण या दरिद्री बाईने तिला जे शक्य होते ते केले व त्याद्वारा खऱ्या भक्तीस निस्वार्थपणे पाठिंबा देण्यातील उत्तम उदाहरण समोर मांडले.—२ करिंथकर ९:६, ७.
येशूचे उपाध्यपण संपण्याच्या बेतात होते तेव्हा पंतय पिलाताने त्याला प्रश्न विचारले. या पंतय पिलाताचे नाव व “प्रिफेक्ट” हा किताब, १९६१ मध्ये कैसरीया येथे सापडलेल्या शिलालेखात आढळले. यहुदासारख्या बाहेरील प्रांतावर राज्यपाल (प्रिफेक्ट) याला लष्करी अधिकार होते, शिवाय आर्थिक व्यवस्था व न्यायाधिशाचे कामही पहावे लागे. ख्रिस्ताला सोडून देण्याचा अधिकारही त्याला होता. पण तो येशूच्या शत्रूच्या आहारी गेला व लोकसमुदायाला खुश करावे या हेतूने खुनी बंडखोर बरब्बाला सोडून दिले आणि येशूला वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले.—१५:१-१५.
पिलाताचे नंतरचे जीवन व त्याचे मरण याविषयीच्या अनेक दंतकथा, परंपरागत विचार प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, इतिहासकार युसेबियस लिहितातः “आमच्या मुक्तीदात्याच्या दिवसात राज्यपाल असणारा पिलात अशा काही घटनात गुरफटला गेला की, त्याला स्वतःलाच स्वहस्ते शिक्षा करुन घ्यावी लागली व मरणदंड सोसावा लागला. यावरुन हे कळते की, त्याजवर दंडाज्ञा बजावण्यात ईश्वरी न्यायाने दिरंगाई केली नाही.” असे सर्व जरी घडले असावे तरी येशूचे मरण हे सर्वात महत्त्वपूर्ण होते. ख्रिस्ताच्या मरणप्रसंगी व त्या घटकेस घडलेल्या अद्भूत घटनांच्या वेळी हजर असलेल्या रोमी लष्कराच्या अधिपतीने (शतपतीने) अगदी सत्यतेत हे बोलून दाखविलेः “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.”—१५:३३-३९.