मोठी बाबेल तिची हत्या
“तिच्या कपाळावर मोठी बाबेल, कळवंतिणींची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते.” “तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ एका दिवशीच येतील; आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल. कारण तिचा न्यायनिवाडा करणारा यहोवा देव सामर्थ्यवान आहे.”—प्रकटीकरण १७:५; १८:८.
आमच्या समान शकाच्या पहिल्या शतकात प्रेषित योहानाच्या लेखणीतून उतरलेल्या या लिखाणाविषयी आम्हाला आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. ही ‘कळवंतिणींची आई’ कोण? तिने देवाचा असा कोणता अपमान केला की ज्यामुळे तिच्यावर एवढा भयंकर न्याय ओढावला आहे? देवाने मोठी बाबेल या गूढात्मक वेश्येवर जे न्यायदंड घोषित केले आहेत ते विध्वंसक आहेत यात शंका नाही. यामुळेच ही वेश्या कोण आहे आणि तिला मिळणारी कर्मगति आम्हावर कसा परिणाम करेल हे आम्हाला निश्चित करता येते.—प्रकटीकरण १८:२१.
मोठी बाबेल कोणाला किंवा कशाला सूचित करते? पवित्र शास्त्र म्हणते की पृथ्वीवरील राजांनी तिच्यासोबत जारकर्म आचरले आहे, तसेच व्यापाऱ्यांनी तिच्यासोबत व्यापार केला. (प्रकटीकरण १८:३) या कारणास्तव ती राजकारण आणि मोठा व्यापार यांचे प्रतिक ठरु शकत नाही. यामुळे जगातील तिसरा व शेवटचा घटक ‘कळवंतिणींची आई’ या शीर्षकाच्या पात्रतेला उरतो व तो म्हणजे सैतानाचे खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य!a
आता हे प्रश्न राहतातः मोठ्या बाबेलची का, कशी आणि केव्हा हत्या होणार? किंवा दुसऱ्या शब्दात म्हणावयाचे झाल्यास या पृथ्वीवरुन खोटा धर्म का, कसा आणि केव्हा लयास जाणार?
ख्रिस्ती धर्मराज्याचा ख्रिस्तेत्तर अहवाल
खोट्या धर्माच्या अहवालाचा आपण विचार केल्यास आम्हाला एका प्राचीन भविष्यवादित उक्तीचे स्मरण घडेलः “ते वाऱ्याची पेरणी करुन वावटळीची कापणी करतात.” (होशेय ८:७) ही गोष्ट ख्रिस्ती प्रेषित पौल याने जे तत्व सांगितले त्याच्याशी जुळणारी आहेः “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही. कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल.” (गलतीकर ६:७) तर मग, खोट्या धर्माने जगव्याप्तपणे कशाची पेरणी केली आहे? आणि तो कसली कापणी करणार?
येशू ख्रिस्ताने हे सांगितले की त्याच्या अनुयायांनी आपल्या शेजाऱ्यावरच नव्हे तर शत्रुंवरही प्रेम करावे. (मत्तय ५:४३, ४४) इब्री शास्त्रवचनांचा संदर्भ घेऊन पौलाने, ख्रिस्तीजनांनी आपल्या शत्रुंना कसे वागवावे ते सांगितले. तो म्हणालाः “‘तुझा शत्रु भुकेला असल्यास त्याला खावयाला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यावयाला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील.’ वाइटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाइटाला जिंक.”—रोमकर १२:२०, २१.
तरीपण, ख्रिस्ती धर्मजगतातील धर्माचा इतिहास द्वेष व रक्तपात यांनी भरला आहे. लूटमार, बलात्कार व मृत्यु यांचा समावेश असणारी प्राचीन व अर्वाचीन धर्मयुद्धे आशीर्वादित झाली व त्यांचे समर्थनही करण्यात आले. उदाहरणार्थ, फॅसिस्ट इटलीचा ॲबिसिनियावरील बलात्कार (१९३५) आणि स्पॅनिश मुलकी युद्धातील फ्रँन्स्कोचे “धर्मयुद्ध” (१९३६-३९) यांच्यावर कॅथोलिक चर्चच्या पदाधिकाऱ्यांनी आशीर्वाद मागितले.
वेदांतीय तफावतींचा झगडा लोकांना खांबावर जाळून संपुष्टात आणला गेला. पवित्र शास्त्राचे अनुवादक विल्यम टिंडेल यांनी इंग्रजी भाषेत आपल्या “नवीन करार” चे भाषांतर प्रसिद्ध केले तेव्हा १५३६ मध्ये त्यांना खांबावर आवळून जाळण्यात आले. याच्या आधी, पोप मार्टीन पाचवे यांच्या हुकुमावरुन धार्मिक पुढाऱ्यांनी सूडभावनेच्या आत्म्याने संचारुन पवित्र शास्त्र अनुवादक वैक्लीफ यांच्या मृत्युच्या ४४ वर्षांनंतर त्यांची हाडे उकरुन काढली व त्यांचे पुन्हा दहन करुन आपले समाधान केले. कॅथोलिक चौकशीसत्र काळी हजारो यहुदी आणि “धर्मवेडे” यांच्याकडून त्यांच्या मालकी हक्काच्या चीजवस्तु काढून घेतल्या गेल्या, त्यांचा छळ करण्यात आला आणि खांबावर जिवंत जाळले—आणि हे सर्व ख्रिस्ताच्या नामात! मायकेल सर्वेटस या स्पॅनिश वेदांत्याना रोमन कॅथोलिक व प्रॉटेस्टंट लोकांनी छळले आणि शेवटी जॉन केल्वीन या प्रॉटेस्टंट धर्मगुरुच्या आज्ञेने खांबावर जिवंत जाळले गेले. या शतकातील दोन जागतिक महायुद्धातील सैन्यांना “ख्रिस्ती” धर्मनेत्यांकरवी आशीर्वाद देण्यात आला आणि त्यांना त्यांच्या स्वदेशाभिमानी धर्माधिकाऱ्यांकरवी, आपल्या पूर्ण शक्तीकरवी संहार करा असे आर्जविण्यात आले.
खऱ्या ख्रिस्ती धर्माचा केवढा हा विपर्यास! प्रेषित पौलाने लिहिलेः “देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक [या अर्थाने] करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा; यहोवाने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा.”—कलस्सैकर ३:१२-१४.
रोममधील ख्रिश्चनांना पौलाने लिहिलेः “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करु नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रिय बंधुनो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहेः ‘सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन, असे यहोवा म्हणतो.’” (रोमकर १२:१७-१९) या ख्रिस्ती तत्वांच्या अनुषंगाने बघता, ख्रिस्तीधर्मराज्य उणे पडले आहे. त्याने द्वेष व ढोंगीपणा यांची पेरणी केली आहे, त्यामुळे त्याला नाशाची कापणी मिळेल.
ख्रिस्तेत्तर धर्म—त्यांचा अहवाल
पण मोठ्या बाबेलमध्ये केवळ ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मांचाच समावेश नाही; त्यापेक्षाही अधिकांचा आहे. या जगाचे सर्व प्रमुख धर्म त्या कुप्रसिद्ध वेश्येच्या रक्तदोषात सहभागी आहेत. उदाहरणार्थ, दुसऱ्या जागतिक महायुद्धात जपानी सैन्याने जो धर्मवेडेपणा आणि जी कामुकतेची मनोवृत्ती दाखवली त्याविषयीचा दोष जपानमधील शिन्टो धर्माला पदरी घ्यावा लागेल. इतिहासकार पॉल जॉनसन म्हणतात की, वागणुकीच्या बाबतीत युरोपियन दर्जाचे प्रभुत्व असणाऱ्या “कठोर व स्पर्धक जगात आपले स्थान मजबूत राखण्यासाठी” त्यांना “एक राष्ट्रीय धर्म आणि शिन्टो व बुशिदो [“लढवय्याचा मार्ग”] हा प्रसिद्ध नैतिक सिद्धान्त आत्मसात करणे अत्यावश्यक वाटले. . . . सम्राटाची भक्ती खासपणे सैन्यबळात नियमित रुपाने प्रस्थापण्यात आली आणि १९२० पासून पुढे सर्व शाळांत कोकुमिन डोटोकु हा नीतीशास्त्राचा राष्ट्रीय सिद्धान्त शिकविण्याचा आरंभ झाला. याचा काय परिणाम दिसला? १९४१ मध्ये जपानने पर्ल बंदरावर बॉम्ब टाकून दुसऱ्या जागतिक महायुद्धात प्रवेश मिळविला तेव्हा “शिन्टोचे . . . जुन्या चालीचे, हळूहळू लुप्त होणारे आणि अल्पसंख्यांकाची धर्मपद्धत असे रुप पालटून आधुनिक, सर्वसत्तावादी असे बनले व अशाप्रकारे या खास वळणामुळे धर्म याने युगाच्या प्रापंचिक दहशतीला प्रतिकार करण्याचे बळ ठरण्याऐवजी त्याचा, दहशतीला अधिक उंचावण्याकरता वापर केला गेला.”
भारतात १९४७ मध्ये जी फाळणी झाली व यातही जो धार्मिक मतभेद समाविष्ठ होता त्याविषयी इतिहासकार जॉनसन म्हणतातः “सुमारे ५० ते ६० लाख लोक आपल्या जिवासाठी वेगवेगळ्या दिशांकडे धावले. . . . तेव्हा १० ते २० लक्ष लोकांचा बळी पडला. आधुनिक मोजणी २ ते ६ लाखाच्या प्रमाणात बसते.” धर्माच्या प्रभावाखाली हत्या आणि अपमान आजही हिंदू समाजात घडत आहेत. बहुधा हरिजन ज्यांना वाळीत टाकलेले किंवा पूर्वी अस्पृश्य समजत तेच श्रीमंत जमिनदारांनी संघटित केलेल्या टोळीच्या हत्येचे सावज बनले आहेत.
हिंदू धर्माचा भूतविद्येच्या प्रकारांशी संबंध आहे. (प्रकटीकरण १८:२३) “सर्वसाधारण हिंदूला मंत्रतंत्राविषयी व त्याच्या पुरस्कर्त्याविषयी वाटणारी विलोभनीयता आणि आदर” याविषयीचे भाष्य करुन भारतीय लेखक सुधीर काकर पुढे म्हणतातः “ज्योतिषी, भविष्य सांगणारा, सूक्ष्मदर्शी, साधु, फकीर आणि इतर देवपुरुषांना अधिक मानण्यात येते कारण यांचा श्रेष्ठ शक्तींसोबत संपर्क आहे असे समजले जाते.”—इंडिया टुडे, एप्रिल ३०, १९८८.
यासोबतच, हिंदू, शीख तसेच इतर पौर्वात्य धर्मात नित्याने झगडे होत आले आहेत. या झगड्यांना प्रत्येक धर्म आपला द्वेष, भांडण आणि हत्या यांची भर टाकीत आहेत. हा मोठ्या बाबेलच्या फलप्राप्तीचा आणखी एक प्रकार आहे.
याचप्रकारे, युद्धे, हत्या आणि दडपशाही याविषयीचा आधुनिक इतिहास पाहिला तर यहुदी धर्माच्या बाबतीत प्रशंसनीय असे काही दिसत नाही. यहुदी धर्माच्या हॅसिडिक पंथाकरवी इतर यहुदी पंथाच्या तसेच यहुद्देत्तर धर्माच्या बाबतीत जो हिंसाचार व्यक्त केला जातो तो याला देवाच्या नजरेत कसलीही प्रशंसा देत नाही.
जागतिक धर्माच्या साम्राज्याचा इतिहास आपण अभ्यासला तर सर्वोच्च न्यायाधिशापाशी मोठ्या बाबेलची हत्या घडवून आणण्याचा कोणता आधार आहे ते आपल्याला सहज दिसेल. होय, “तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्त सापडले.” (प्रकटीकरण १८:२४) खोट्या धर्माने प्रादेशिक व जागतिक युद्धात आपला जो सहभाग दिला त्यामुळे तो ‘पृथ्वीवर वधलेल्या सर्वांच्या रक्ता’मुळे देवाच्या नजरेत दोषी ठरला आहे.
पवित्र शास्त्राने केलेल्या उघड दोषारोपामुळे मोठी बाबेल ही आता, तिने जागतिक शासनकर्त्यांसोबत जो आध्यात्मिक व्यभिचार केला, तिला युद्धात जो रक्तदोष आला आणि तिने ज्या दुरात्मिक प्रथा आचरल्या आहेत त्या ऐतिहासिक अहवालामुळे नाश होण्याच्या पात्रतेची ठरली आहे. याकरताच यहोवा देवाने आपल्या न्यायामुळे हे ठरवून टाकले आहे की, सैतानाचे खोट्या धर्माचे साम्राज्य उलटवून टाकले पाहिजे.—प्रकटीकरण १८:३, २३, २४.
खोटा धर्म कसा लयास जाणार
प्रकटीकरणाचे पुस्तक मोठ्या लाक्षणिक भाषेत मोठ्या बाबेलचा नाश कसा होणार त्याचे वर्णन देते. प्रकटीकरण १७:१६ मध्ये आम्ही वाचतोः “जी दहा शिंगे व जे श्वापद तू पाहिलेस ती कळवंतिणीचा द्वेष करतील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.” ही “दहा शिंगे” सध्या जगाच्या दृश्यात ज्या राजकारणी सत्ता आहेत त्यांना सूचित करतात आणि या सत्ता “किरमिजी रंगाचे श्वापद,” म्हणजे दियाबलाच्या रक्तपाती राजकीय व्यवस्थेची प्रतिमा असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाला आपला पाठिंबा देऊन आहेत.—प्रकटीकरण १६:२; १७:३.b
पवित्र शास्त्राच्या मते, संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न असणाऱ्या राजकीय सत्ता खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्याच्या विरुद्ध उठतील व त्याचा विध्वंस करतील. याचा सर्व खोट्या धर्मांवर परिणाम होईल. खोट्या धर्माने राजकीय आणि सामाजिक स्तरावर जी लुडबूड केली आहे त्याविषयी आपला त्वेष दाखविण्यास सुरुवात केली आहे. काही समाजवादी राष्ट्रांनी नास्तिकवादाकडे आपली भूमिका नेली असून धर्माला अल्बेनियात जणू अस्तित्वविरहीतपणा आणला आहे, किंवा रशिया आणि चीनमध्ये त्याला नमणाऱ्या दासीचे स्वरुप आणले आहे. इतरत्र गरीब देशात राजकीय सत्ताधिशांनी कॅथोलिक पुरोहितांच्या मुक्तीच्या तत्वप्रणालीविषयी कटु विरोध प्रदर्शित केला आहे. याचप्रमाणे वंशीय प्रकरणात गुंतणाऱ्या धर्माच्याविषयी इतरजण दडपण व्यक्त करीत आहेत. इतकेच काय पण तथाकथित मुक्त असणाऱ्या राष्ट्रांत काही राजकारणी मुत्सद्यांनी राजकारण व सामाजिक प्रकरणात उलाढाल करणाऱ्या पुरोहितांविषयी आपली चीड दाखवली आहे.
आता या खोट्या धर्माविषयी कृति करण्यास जगभरातील राजकीय घटकांना कोणती गोष्ट उद्युक्त करीत ते पाहावयाचे आहे. मात्र एक गोष्ट नक्की की, या घटकांकरवी मोठ्या बाबेलची हत्या ही त्यांचीच नव्हे तर देवाचीही इच्छा आहे. प्रकटीकरण १७:१७ म्हणतेः “त्यांनी एकविचाराने वागून देवाची वचने पूर्ण होईपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृति करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले.”—पडताळा यिर्मया ५१:१२, १३.
स्वतःची भूलवणूक होऊ देऊ नका. मोठ्या बाबेलची होणारी हत्या ही केवळ धर्माने दाखविलेला अहंभाव व लुडबूड याविषयी राजकारणाने दाखविलेले शत्रुत्व नसणार. तर हे राजकीय सत्ताधीश खोट्या धर्माचा जगव्याप्त रुपात नाश करणारे देवाकडील निर्हेतुक साधन असणार. होय, “तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहंचली आहे; आणि तिची अनीती देवाने लक्षात आणली आहे.”—प्रकटीकरण १८:५.
गर्विष्ठ खोट्या धर्मास नमवावे असे यहोवा देवाने आज्ञापिले आहे. भविष्यवाद म्हणतोः “ज्या मानाने तिने आपले गौरव केले व विषयभोग घेतला, त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या. कारण ती आपल्या अंतःकरणात म्हणतेः ‘मी राणी होऊन बसले आहे; मी काही विधवा नाही; मी दुःख पाहणारच नाही.’ ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ एका दिवशीच येतील; आणि ती अग्नीत जाळून टाकिली जाईल. कारण तिचा न्यायनिवाडा करणारा यहोवा देव सामर्थ्यवान आहे.”—प्रकटीकरण १८:७, ८.
हत्या केव्हा?
तो ‘एक दिवस’ किंवा त्वरेने हत्या घडवून येण्याचा अल्पकाळ हा समीप आहे. खरे म्हणजे, मोठ्या बाबेलचा नाश झाला की लगेच “आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस” सुरु होतो. (यशया ६१:२) त्यानंतर देवाचे हर्मगिदोनाचे न्यायी युद्ध सुरु होईल. १९१४ पासून घडणाऱ्या जागतिक घटनांचा सर्व पुरावा हे स्पष्ट करतो की, सैतानाच्या व्यवस्थीकरणाची वेळ आता संपत आली आहे. तद्वत, देवाच्या राज्याची राजवट दाराजवळ येऊन ठेपली आहे.—लूक २१:३२-३६; प्रकटीकरण १६:१४-१६.
मोठ्या बाबेलच्या नाशाविषयी खरे उपासक कशी प्रतिक्रिया दर्शवतील? प्रकटीकरण म्हणतेः “हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी आनंद करा, कारण देवाने तिला दंड करुन तुम्हाला न्याय दिला आहे.” (प्रकटीकरण १८:२०) यहोवा देवाचे उद्देश तडीस नेले जातील आणि त्याच्या नावाचे पवित्रीकरण घडेल तेव्हा विश्वभरात आनंदीआनंद होईल. भविष्यवाद म्हणतोः “ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली; ती म्हणालीः ‘अहो लोकहो, तुम्ही यहोवाची स्तुती गा! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत; कारण त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे व नीतीचे आहेत. ज्या मोठ्या कळवंतिणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.’”—प्रकटीकरण १९:१, २.
मोठ्या बाबेलचा विध्वंस व त्यानंतर सैतानी व्यवस्थेच्या उरलेल्या घटकांचा देवाकरवी घडणारा विनाश यामुळे देवाच्या सर्व खऱ्या उपासकांसाठी अमर्याद आशीर्वादांचे दालन खुले होणार. याचा अनुभव पृथ्वीवर पुनरुत्थानप्राप्त जनही घेतील. येशूने या सर्वांना हे अभिवचन दिले होतेः “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हास बंधमुक्त करील.”—योहान ८:३१, ३२; प्रकटीकरण १९:११-२१.
ज्या खोट्या धार्मिक शिक्षणाने कित्येक युगांपासून देवाची निंदा केली आहे त्यापासून खऱ्या उपासकांची केव्हाच मुक्तता झाली आहे. ज्याचे अभिवचन देण्यात आले आहे त्या नीतीमान जगतात त्यांची मरणाच्या भयापासून देखील मुक्तता करण्यात येईल कारण, “देव स्वतः त्याच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; यापुढे मरण हे नाही; शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:३, ४) ज्या गोष्टी पहिल्या होऊन गेल्या त्यामध्ये सैतानाचे खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य, मोठी बाबेल ही सुद्धा असेल.
[तळटीपा]
a मोठी बाबेल कोण आहे त्याच्या ओळखीविषयीचा सविस्तर पुरावा टेहळणी बुरुज मासिकाच्या एप्रिल १, १९८९ अंकात पाहता येईल.
b प्रकटीकरणाच्या या व इतर चिन्हांच्या स्पष्टीकरणासाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्कने प्रसिद्ध केलेले पुस्तक रेवलेशन—इट्स ग्रँड क्लायमॅक्स ॲट हॅण्ड! पहा.
[४ पानांवरील चित्रं]
पवित्र शास्त्राचा अनुवाद केला म्हणून वैक्लीफ व टिंडेल यांचा छळ झाला
[५ पानावरील संक्षिप्त आशय]
“या खास वळणामुळे धर्म याने युगाच्या प्रापंचिक दहशतीला प्रतिकार करण्याचे बळ ठरण्याऐवजी त्याचा, दहशतीला अधिक उंचावण्याकरता वापर केला गेला”