वाचकांचे प्रश्न
◼ येशू वधस्तंभावर वारला तेव्हा नियमशास्त्र करार रद्द झाला का, आणि त्याच्या जागी नव्या कराराची प्रस्थापना केव्हा झाली?
पुष्कळांनी हाच प्रश्न विचारला आहे. याविषयी त्यांच्या मनात बहुधा या तीन घटना असाव्यातः निसान १४, इ. स. ३३ च्या दुपारी येशूचा वधस्तंभावर झालेला मृत्यु, त्याचे स्वर्गात आपल्या जीवनी रक्ताचे मोल सादर करणे, आणि इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा ओतिला जाणे. पण, शास्त्रवचनीयदृष्ट्या नियमशास्त्र कराराची समाप्ती होऊन पेंटेकॉस्टच्या वेळी नव्या कराराची प्रस्थापना झाली. कसे ते आपण पाहू या.
यहोवाने भाकित केले होते की तो नियमशास्त्र करार काढून टाकून त्याच्याऐवजी “एक नवा करार” करणार; यामुळे पापांची पूर्ण क्षमा होणार. हे नियमशास्त्र करारात होणे शक्य नव्हते. (यिर्मया ३१:३१-३४) तर मग, हा बदल केव्हा घडला?
यासाठी प्रथमतः जुना करार म्हणजे नियमशास्त्र करार, त्याच्या उद्देशाची पूर्णता झाली आहे म्हणून काढून टाकण्यास हवा होता. (गलतीकर ३:१९, २४, २५) प्रेषित पौलाने लिहिलेः “त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले.” (कलस्सैकर २:१३, १४) याचा हा अर्थ होतो का की, जेव्हा येशू वारला त्याच क्षणी नियमशास्त्र करार काढून टाकण्यात आला व त्याची जागा नव्या कराराने घेतली?
नाही, कारण नव्या कराराची प्रस्थापना सुयोग्य त्या बलिदानाने आणि नव्या राष्ट्राच्या, आध्यात्मिक इस्राएलाच्या सोबत व्हावयाची होती. (इब्रीयांस ८:५, ६; ९:१५-२२) येशूचे पुनरुत्थान निसान १६ तारखेस घडले आणि ४० दिवसानंतर त्याचे स्वर्गारोहण झाले. (प्रे. कृत्ये १:३-९) त्याचे स्वर्गारोहण झाल्यावर दहा दिवसांनी म्हणजे पेंटेकॉस्टच्या दिवशी येशूने आपल्या शिष्यांवर पित्यापासून ‘वचन मिळालेला पवित्र आत्मा’ ओतला, आणि तेव्हा आध्यात्मिक राष्ट्र अस्तित्वात आले. (प्रे. कृत्ये २:३३) देव येशू ख्रिस्त या मध्यस्ताकरवी आध्यात्मिक इस्राएलांसोबत नवा करार करतो.
हे सर्व प्रसंग लक्षात घेता नवीन कराराने कोणत्या वेळी नियमशास्त्राची जागा घेतली?
येशूच्या मरणाकरवी नियमशास्त्र संपुष्टात आले असे म्हणू शकणार नाही, कारण येशूचे आत्मिक जीवनासाठी पुनरुत्थान झाले त्यानंतर चाळीस दिवसपर्यंत त्याचे शिष्य नियमशास्त्र पाळतच होते. याशिवाय, नियमशास्त्राचा आणखी एक महत्त्वाचा भाग होता, तो असा की, दर वर्षी प्रमुख याजक एकदा परमपवित्र स्थानात जाई. हे येशूच्या स्वर्गारोहणास चित्रित करते. तेथे स्वर्गात, देवाच्या सन्मुख, त्याला नव्या कराराचा मध्यस्त या नात्याने आपल्या खंडणी यज्ञार्पणाचे मोल देता आले. (इब्रीयांस ९:२३, २४) यामुळेच, यिर्मया ३१:३१-३४ च्या पूर्णतेला अनुलक्षून नव्या कराराच्या प्रस्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
जेव्हा यहोवाने खंडणी यज्ञार्पणाचा स्वीकार करण्याची हालचाल केली तेव्हापासून नवा करार कार्यवाहित झाला. त्याने येशूच्या विश्वासू शिष्यांवर आपला पवित्र आत्मा पाठवून राज्याच्या करारासाठी एकत्र करण्यात आलेल्या आध्यात्मिक इस्राएलांचे नवे राष्ट्र उदयास आणले. (लूक २२:२९; प्रे. कृत्ये २:१-४) यामुळे हे दिसले की, देवाने नियमशास्त्र करार रद्द ठरविला, जणू त्याला, येशू ज्या वधस्तंभावर वारला त्यावर खिळून रद्द केले. तद्वत, इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या वेळी नवे राष्ट्र, आध्यात्मिक इस्राएलाचा उदय झाला तेव्हा नियमशास्त्र करार संपुष्टात आला.—इब्रीयांस ७:१२; ८:१, २.
प्रश्नाला दिलेल्या मूलभूत उत्तराच्या पलिकडे जाऊन आपण हे न्याहाळू शकतो की, इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्ट समयी नव्या कराराची अमलबजावणी सुरु झाली आणि नियमशास्त्र करार रद्द करण्यात आला तेव्हा लगेचच देवाने स्वाभाविक इस्राएलांकडे आपली पाठ फिरविली नाही. उदाहरणार्थ, अब्राहामाच्या कराराच्या अनुषंगाने यहोवा देवाने, भाकित असणारी “७० सप्तके” जेव्हा इ. स. ३६ मध्ये संपली तोपर्यंत यहुदी, परीवर्तित आणि शमरोन्यांच्या बाबतीत खास कृपा दाखवली. (उत्पत्ती १२:१-३; १५:१८; २२:१८; दानीएल ९:२७; प्रे. कृत्ये १०:९-२८, ४४-४८) काही अभिषिक्त यहुदी ख्रिश्चनांना, इ. स. ३३ नंतर नियमशास्त्राचे पालन करण्याची काही गरज नाही या वस्तुस्थितीशी जुळवून घेण्यास काही काळ लागला; आणि हे इ. स. ४९ मध्ये नियमन मंडळापुढे जो प्रश्न विचारविनिमयासाठी पाठवण्यात आला होता त्याकरवी दिसून येते. (प्रे. कृत्ये १५:१, २) नियमशास्त्र पूर्णपणे रद्द झाले आहे ही गोष्ट इ. स. ७० मध्ये, जेव्हा मंदिर व नियमशास्त्राच्या अनुषंगाने असणाऱ्या वंशावळीचा सर्व अहवाल रोमी लोकांनी नष्ट केला तेव्हा निःसंशये सिद्ध झाली.—मत्तय २३:३८.