खरे सौंदर्य तुम्हाला ते खुलविता येईल
देखणेपणाविषयी पवित्र शास्त्रात पुरुष व स्त्रियांसाठी सूचना आहेत. पुरुषासाठी ते म्हणते: “बल हे तरुणांस भूषण आहे.” नीतीसूत्रे २०:२९) होय, तरुणाचे बल व त्याचा उत्साह हा खूपच आर्जविणारा ठरू शकतो. पण जेव्हा हा तारुण्याचा जोम सरतो तेव्हा काय होते? पवित्र शास्त्रातील दुसरे नीतीसूत्रे म्हणते: “पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.” (नीतीसूत्रे १६:३१) धार्मिकता ही आंतरिक सौंदर्याचा गाभा होय. कोणा युवकाने ती विकसित केली तर ती, त्याच्या तारुण्याच्या आकर्षक जोम लयास गेल्यावरही त्याच्यासोबत राहात असते.
स्त्रियांविषयी पवित्र शास्त्र म्हणते: “सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, यहोवाचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते.” (नीतीसूत्रे ३१:३०) देखणी आखर्षक युवती ही हर्षदायक सोबती असू शकेल. पण या शारीरिक आकर्षणामागे ढोंग व स्वार्थी हव्यास असला तर काय? अशावेळी ते सौंदर्य केवळ वरपांगी ठरते व ते आपल्यामध्ये ती अंतरिक कुरुपता दडवते. शारीरिक आकर्षण कालपरत्वे लुप्त होते तेव्हा काय उरते? सौंदर्याला, ‘यहोवाचे भय बाळगणे’ या पायावर आधारलेल्या व न कोमेजणाऱ्या आंतरिक रुपाची साथ मिळाली तर ते केवढे चांगले ठरेल!
व्यक्तीमत्वातील बदल
हे अंतरिक रुप खुलविता येणे शक्य आहे का? होय. खरे म्हणजे ख्रिश्चनांनी तर ते केलेच पाहिजे. देव खऱ्या सौंदर्याचा चाहता आहे. “त्याने हरएक वस्तु आपापल्या समयी सुंदर बनविली आहे.” (उपदेशक ३:११, रिव्हाईज्ड स्टँडर्ड व्हर्शन) ज्यांची वर्तणूक आंतरिक गुणांचे फसवे प्रदर्शन करते अशांची उपासना तो स्वीकारणार नाही.
प्रेषित पौलाने कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्रातील शब्द आंतरिक रुप खुलविण्याची गरज प्रतिपादित करतात. प्रथम, तो हा बोध करतो: “क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका. जुने व्यक्तीमत्व त्यांच्या कृतींसह काढून टाका.” होय. जे असे वर्तन करतात ते देवाला व सरळ विचार राखणाऱ्या लोकांना अप्रिय आहेत. पौल यानंतर पुढे म्हणतो: “आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवे केले जाणे नवे व्यक्तीमत्व परिधान करा.” (कलस्सैकर ३:८-१०) देवाच्या उद्देशासोबत समरस असणारी विचारसरणी आम्ही ‘परिधान केली’ पाहिजे. पण ते “नवे व्यक्तीमत्व” याची गुणलक्षणे कोणती आहेत?
ख्रिस्ती गुण
ज्यामुळे सुंदर व्यक्तीमत्व बनते अशा पुष्कळ गुणांची यादी पवित्र शास्त्र पुरविते. तथापि, या आंतरिक सौंदर्याचा पाया येशूच्या या शब्दात सापडतो: “‘तू आपला देव यहोवा ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीती कर.’ हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखीच प्रीती कर.’” (मत्तय २२:३७-३९) देवावरील प्रेम आम्हास त्यास संतुष्ट असणारी व्यक्ती बनण्यास लावते. हे प्रेम त्याच्याविषयी इतरांना बोलण्यास व त्यांनी आपल्या निर्माणकर्त्याला जाणावे म्हणून अशांना मदत करण्यास चालना देणारे ठरते.—यशया ५२:७.
नवे व्यक्तीमत्व बनविण्यास पोषक असणारे आणखी काही गुण प्रेषित पौलाने वर्णिले आहेत: “प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दया, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता व इंद्रियदमन. अशाविरुद्ध नियमशास्त्र नाही.”—गलतीकर ५:२२, २३.
याखेरीज, पवित्र शास्त्र पतींना खासपणे म्हणते: “जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. . . . पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा.” (इफिसकर ५:२३, २५) बायकांना पवित्र शास्त्र म्हणते: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. . . . पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.” (इफिसकर ५:२२, २३) पती आपली जबाबदारी प्रेमळपणे, निस्वार्थतेने व संयमशीलतेने पार पाडतो तेव्हा ते कौटुंबिक जीवन केवढे आकर्षक बनते बरे! शिवाय, पत्नीही तिचे आंतरिक रुप, त्याला प्रेमळपणे पाठिंबा देऊन प्रकट करते, ती स्पर्धक वृत्ती आणि सारखी कुरकुर करणे यांचे प्रदर्शन करीत नाही तेव्हा पतीला त्याची भूमिका उचितपणे पार पाडण्यास केवढे सोपे जाते बरे! अशा वातावरणातील कौटुंबिक जीवन खरेच हर्षवर्धक असते.
या आधीच्या लेखात उल्लेखिलेल्या उदाहरणात यातील काही गुण कसे कार्यान्वित होतात ते दाखविले गेले आहे. शुलेमकरीण मुलीने शलमोनाच्या दरबारातील झगमगाट झुगारुन देऊन आपल्या मेंढपाळ युवकाविषयी असणारे खोल प्रेम व निश्चयीपणा दाखविला. योसेफाने आपल्यातील चांगुलपणा, त्याचा धनी पोटीपर याच्याविरुद्ध पाप न करण्याने दाखवून दिला. पोटीफरच्या बायकोकडून फसले न जाता त्याने तेथून पळ काढून आपल्यातला इंद्रियदमन दाखविले. त्याप्रमाणे त्याच्या जीवनात कठीण प्रसंग उद्भवले तेव्हा त्याकडून खिन्न न होता सौम्यता, शांती व सहनशीलता या गुणांचे प्रदर्शन केले.
कुरुप जगातील सौंदर्य
असे हे सुंदर गुण आज व्यावहारिक आहेत का? पुष्कळांना तसे वाटत नाही. उलटपक्षी, ते राहात असलेल्या स्वार्थी जगात गुरफडून जाऊन त्याच्या सारखीच कठोर वृत्ती दाखवितात. टिकाव धरण्यासाठी निर्दयी, आकांक्षी, मी-पणा आणि जेवढे मिळते तेवढे हडप करीत रहावे असेच त्यांना वाटते.
याच्या विरोधात पवित्र शास्त्र उत्तेजन देते: “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धदीने काहीही करू नका, तरी लिनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा.” (फिलिप्पैकर २:३, ४) ही सुंदर सूचना मानवजात सर्वसाधारणपणे अनुसरीत नसल्यामुळेच आजचा मानवी समाज ढासळत चालला आहे.
याखेरीज, सध्याच्या जगात एखाद्या व्यक्तीचे यशापयश हे पैसा व त्याचे स्थान यावर गृहीत धरले जाते. श्रीमंत माणसास यशवंत मानले जाते. पण, खऱ्या अर्थाने पाहिल्यास, कोणी श्रीमंत आहे वा गरीब याला तितके महत्त्व नाही. संपत्तीचे धोकेही आहेत. पवित्र शास्त्र इशारा देते: “जे धनवान होऊ पाहतात ते स्वतःस पुष्कळशा विध्वंसात व पाशात घालतात.” ते पुढे म्हणते की, “पैशांचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे.”—१ तीमथ्य ६:९, १०.
अर्थात, स्वार्थी, हव्यासी, जडवादी व निर्दयी लोक आज “यशप्राप्ती”चा तात्कालिक उपभोग घेत आहेत. पण याला खरी यशप्राप्ती म्हणता येणार नाही. कारण अशा कुरुप जावनाक्रमणाची, वैयक्तीक कुख्याति, विवाहात फूट, आजारीपणा आणि साधारण विफलता ही किंमत द्यावी लागते व ती फारच मोठी आहे. मनुष्यास देवाच्या प्रतिरुपाप्रमाणे बनविण्यात आले होते. पण जेव्हा माणूस देवाने आरंभाला त्याजमध्ये घातलेल्या गुणांविरुद्ध बंड पुकारतो तेव्हा तो व्यक्तीगत सुख कधीही संपादू शकणार नाही.—उत्पत्ती १:२७.
आंतरिक सौंदर्य खुलविणे
तर मग, आम्हाला या जगाच्या वाईट प्रभावाचा प्रतिकार करून कुलीन इश्वरी गुण कसे खुलविता येतील? पौलाने, ‘प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता व इंद्रियदमन’ या गुणांची यादी दिली तेव्हा असे म्हटले की, ही “आत्म्याची फलप्राप्ती” आहे. (गलतीकर ५:२२, २३) यास्तव, आपल्या आंतरिक गुणांचे सौंदर्य खुलवावयाचे आहे तर यासाठी देवाच्या आत्म्याची गरज आहे.
ते कसे साध्य करता येईल? पवित्र शास्त्र हे वस्तुतः देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे. त्याचा अभ्यास करताना आम्हाला या गुणांचा परिचय घडतो व मग यांची जोपासना करावी ही इच्छा आपणात बळावते. (२ तीमथ्य ३:१६) यहोवाचे साक्षीदार नेहमीच अशा कामास मदत करण्यास आनंदी आहेत. कारण लोकांना पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यास मदत करणे हा त्यांच्या उपाध्यपणाचा भाग असल्याचे ते मानतात. आम्ही स्वतःचे केलेले प्रामाणिक स्वपरिक्षण आपण कोठे उणे आहोत हे पाहण्यास आम्हाला समर्थ करील. आम्हाला या अवगुणांवर मात करण्यासाठी देवाच्या आत्म्याच्या मदतीसाठी प्रार्थना करता येईल. देवाच्या सहउपासकांसोबत एकत्र येणे हे आम्हास आमच्या निश्चयास पाठिंबा देईल व येथेही देवाचा आत्मा आम्हाला मदत देईल कारण येशूने म्हटले त्याप्रमाणे, “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नामात एकत्र येतात तेथे मी आहे.”—मत्तय १८:२०.
एक सुंदर जग पुढे आहे
आम्हाला सध्या आमच्या अपूर्णतेवर परिपूर्ण रितीने मात करता येणे कोणालाही जमणे शक्य नाही. पण आपण जर हे आंतरिक सौंदर्य खुलविले तर देव आमच्या परिश्रमांना आशीर्वादित करील. तो आम्हास अद्भुतरित्या प्रतिफळ देईल. पवित्रशास्त्र आम्हाला, लवकरच एक नवे व्यवस्थीकरण आणण्याचा देवाचा उद्देश असल्याचे स्पष्ट करते. ते सध्याच्या जगापेक्षा वेगळेच असेल. त्यामध्ये “नीतीमान पृथ्वीचे वतन पावतील; तीत ते सर्वदा वास करतील.” (स्तोत्रसंहिता ३७:२९) येशूनेही हेच म्हटले: “जे सौम्य ते धन्य; कारण त्यांस पृथ्वीचे वतन मिळेल.”—मत्तय ५:५.
त्या काळी, सध्याच्या व्यवस्थीकरणाच्या बेढब स्वरुपाची स्पर्धक वृत्ती आणि स्वार्थीपणा यांची जागा सुंदर शांती व प्रसन्नचित्त ही गुणलक्षणे घेतील. “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी यहोवाच्या ज्ञानाने [ही] पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९) खरेच, देव “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील; यापुढे मरण हे नाही; शोक, विलाप व पीडा हीही नाहीत; कारण पहिले होऊन गेले.”—प्रकटीकरण २१:४.
अशी ही परिस्थिती तुम्हाला अपीलदायक वाटते का? ती शक्य आहे, कारण तेव्हा पृथ्वीवर राहणे देवावरील व शेजाऱ्यावरील प्रेम यावर आधारलेले आंतरिक सौंदर्य आपणामध्ये सामावून असतील. शिवाय देवाने हे अभिवचन दिले आहे की, जे त्याची सेवा करतात, “नवे व्यक्तीमत्व” जोपासतात आणि त्याचे दर्जे अनुसरण्याचा कसून प्रयत्न करतात ते त्या अभिवचनांची पूर्ति पाहतील. देखणेपणा व शारीरिक सौंदर्य आशा प्रकारचे आशीर्वाद कधीही आणू शकत नाहीत. तेव्हा, जे समृद्ध व दीर्घकाल टिकणारे आहे ते आंतरिक सौंदर्य आताच खुलविण्याचे केवढे चांगले कारण आहे बरे! हे असे सौंदर्य आहे जे योग्य विचारसरणीच्या मानवांना आणि स्वतः देवाला प्रिय वाटते.
[६ पानांवरील चित्रं]
शारिरीक सुंदर असणाऱ्या लोकांनी स्वार्थी व लुबाडणूक करणारे बनण्याचे टाळावे. उलटपक्षी, त्यांनी देवाला संतुष्ट करणारे आंतरिक सौंदर्य जोपासावे