३७ दानीएल
त्याने स्वतःला अशुद्ध होऊ दिलं नाही
दानीएल आपल्या मायदेशापासून दूर एका परक्या देशात राहत होता. बाबेलच्या लोकांनी यहूदामधून बऱ्याच कुटुंबांना बंदी बनवून बाबेलला आणलं होतं. त्यांत दानीएलचं कुटुंबही होतं. हा लांबचा प्रवास करण्यासाठी त्यांना जवळपास चार महिने लागले असतील. मग या बंदिवानांमधून दानीएल आणि आणखी काही तरुणांना त्यांच्या कुटुंबांपासून दूर बाबेलच्या राजमहालात आणण्यात आलं. लवकरच दानीएल आणि त्याच्या तीन मित्रांना, म्हणजे हनन्या, मीशाएल आणि अजऱ्या यांना आपल्याला इथे का आणण्यात आलंय हे लक्षात आलं. त्यांना समजलं, की आपल्याला बाबेलच्या लोकांसारखं बनवण्यासाठी इथे आणलंय.
आपल्या देशापासून आणि कुटुंबापासून दूर असताना यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी दानीएलला धैर्याची खूप गरज होती
सगळ्यात आधी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने मुख्य राजदरबारी अश्पनज याला या तरुणांची नावं बदलायला सांगितलं. सहसा बरीच हिब्रू नावं खऱ्या देवाची स्तुती होईल अशा अर्थाची असायची. जसं की, “दानीएल” या नावाचा अर्थ “देव माझा न्यायाधीश आहे” असा होता. पण बाबेलच्या लोकांमध्ये सर्रासपणे त्यांच्या खोट्या देवांची स्तुती होईल अशा अर्थाची नावं दिली जायची. म्हणून दानीएलचं नाव बदलून त्याला बेल्टशस्सर असं नाव देण्यात आलं. या नावाचा अर्थ, “राजाच्या जिवाचं रक्षण होवो” असा व्हायचा. आणि असं दिसतं, की हे नाव त्यांचा खोटा देव बेल याला केल्या जाणाऱ्या प्रार्थनेचा भाग होतं. यासोबतच, बाबेलच्या राजाने या तरुणांच्या मनात बाबेलची संस्कृती रुजवायचासुद्धा प्रयत्न केला. त्याने असा आदेश दिला, की या तरुणांना बाबेलच्या लोकांची भाषा लिहायला-वाचायला शिकवली जावी. म्हणजे मग त्यांना राजदरबारात सेवा करता येईल. यासाठी राजाने अश्पनजला त्यांच्यावर नेमलं. पण ही फक्त सुरुवात होती.
राजाला जी शाही मेजवानी दिली जाते तीच मेजवानी आणि राजाला जो द्राक्षारस दिला जातो तोच द्राक्षारस दररोज त्या तरुणांनाही दिला जावा अशी आज्ञा राजाने दिली. काही तरुणांना असं वाटलं असेल, की एवढी खास वागणूक मिळणं खूप मानाची गोष्ट आहे. पण दानीएलला तसं वाटलं नाही. उलट, या गोष्टी आपल्यासाठी आणि आपल्या तीन मित्रांसाठी धोकादायक ठरू शकतात असं त्याला वाटलं. का बरं?
दानीएलने कदाचित या गोष्टींचा विचार केला असेल: ‘यहोवाच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण काही गोष्टी खातपीत नाही हे या लोकांना चांगलं माहीत आहे. मग, देवाने ज्या गोष्टी अशुद्ध ठरवल्या आहेत त्या गोष्टी खायला देऊन ते आपल्याला देवाची आज्ञा मोडायला तर लावणार नाहीत ना? आणि ज्या प्राण्यांचं मांस ते आपल्याला खायला देतील, त्यांचं रक्त त्यांनी पूर्णपणे वाहू दिलं असेल का, की रक्ताचं सेवन न करण्याची आज्ञा ते आपल्याला मोडायला लावतील? किंवा मग, खोट्या दैवतांना वाहिलेलं अन्न ते आपल्याला खायला तर देत नसतील ना? तसंच, आपण जर दररोज द्राक्षारस पीत राहिलो तर आपण त्याच्या आहारी तर जाणार नाही ना, आणि त्यामुळे आपल्याला नीट विचार करायला, योग्य निर्णय घ्यायला कठीण होईल का?’a
दानीएलने याबद्दल नक्कीच यहोवाला खूप प्रार्थना केली असेल आणि आपल्या तीन मित्रांचा सल्लाही घेतला असेल. काहीही झालं तरी यहोवाचं मन आनंदित करायचा त्याने “आपल्या मनात पक्का निश्चय केला होता.” मग तो अश्पनजशी खूप आदराने आणि समंजसपणे बोलला. त्याने त्याला अशी विनंती केली, की राजाच्या मेजवानीतल्या गोष्टी खाण्यापासून आपल्याला आणि आपल्या तीन मित्रांना सूट मिळावी. यहोवा दानीएलसोबत होता. आणि त्याने मुख्य राजदरबाऱ्याच्या मनात दानीएलविषयी कृपा आणि दया उत्पन्न केली. पण मुख्य राजदरबाऱ्याला अशी चिंता होती, की राजाने सांगितलेलं अन्न जर आपण त्यांना दिलं नाही, तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि त्यासाठी राजा आपल्यालाच जबाबदार ठरवेल. त्या वेळी दानीएल त्याला काही बोलला नाही. पण नंतर त्याने अश्पनजने नेमलेल्या कारभाऱ्याला धैर्याने एक उपाय सुचवला. त्याने म्हटलं: “कृपा करून तुमच्या या सेवकांना फक्त शाकाहारी अन्न आणि पाणी द्या. अशी दहा दिवस आमची परीक्षा घेऊन बघा. त्यानंतर जे तरुण राजाच्या पक्वान्नांतून खातात त्यांच्याशी आमची तुलना करा, आणि कोण चांगलं दिसतं ते बघा.” त्यावर तो कारभारी तयार झाला!
दहा दिवसांनी या गोष्टीचा परिणाम अगदी स्पष्ट दिसून आला. दानीएल आणि त्याचे तीन मित्र इतर सगळ्या तरुणांपेक्षा जास्त चांगले दिसत होते. हा छोटासा प्रयोग इतका यशस्वी होता, की पुढे त्यांना हाच आहार द्यायचं ठरवण्यात आलं. खरंच, या चार तरुणांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि धैर्यामुळे यहोवाचा आशीर्वाद त्यांच्यावर होता, ही गोष्ट ते कधीच विसरले नसतील.
पुढे दानीएलच्या तीन मित्रांना एका भयंकर प्रसंगाला तोंड द्यावं लागलं आणि यामुळे त्यांच्या धैर्याची परीक्षा झाली. याबद्दल आपण पुढच्या अध्यायात पाहणारच आहोत. पण दानीएलबद्दल बोलायचं झालं तर तो जवळपास १०० वर्षांचा होऊन मरेपर्यंत त्यालाही वेगवेगळ्या परीक्षांचा सामना करून धैर्य दाखवावं लागलं. उदाहरणार्थ, देवाने नबुखद्नेस्सरला दोन स्वप्नं दाखवली होती. त्या स्वप्नांचा या राजासाठी आणि त्याच्या राज्यासाठी वाईट अर्थ होता. पण तरीसुद्धा दानीएलला त्या स्वप्नांचा अर्थ त्या गर्विष्ठ राजाला सांगावा लागला. याच्या काही दशकांनंतर बेलशस्सर राजाच्या काळात देवाने राजमहालाच्या भिंतीवर एक संदेश लिहिला होता. हा संदेश राजासाठी वाईट बातमी होती. तरीसुद्धा दानीएलने राजाला त्याचा अर्थ सांगितला. आणि जेव्हा दानीएल खूप वयस्कर होता तेव्हा त्याला भुकेल्या सिंहांच्या गुहेत टाकण्यात आलं. तेव्हासुद्धा त्याच्या धैर्याची खूप मोठी परीक्षा झाली. पण या प्रत्येक परीक्षेत त्याने तरुण असताना जसं धैर्य दाखवलं होतं, तसंच धैर्य दाखवलं. म्हणूनच यहोवाच्या एका स्वर्गदूताने त्याला ‘अतिप्रिय माणूस’ असं म्हटलं!
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
दानीएलने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. दानीएल १:१ आणि यिर्मया २५:१ यांतला फरक कसा स्पष्ट करता येईल? (डॅनिएल्स प्रॉफसी अध्या. २ ¶१४-१५-wcgr)
२. दानीएल १:२ म्हणतं, की नबुखद्नेस्सरच्या देवाचं एक भांडार होतं. याबद्दल एक प्राचीन लिखाण काय म्हणतं? (दानी. १:२; इन्साइट “भांडार” ¶३-wcgr) १
© The Trustees of the British Museum. Licensed under CC BY-NC-SA 4.0. Source. Modifications: Box added
चित्र १: नबुखद्नेस्सर राजाने मरोदख दैवताच्या मंदिरातल्या ‘भांडाराचा’ उल्लेख केला असं सांगणारं एक प्राचीन लिखाण
३. बाबेलमधले जादूगार कायकाय करायचे? (दानी. १:२०; इन्साइट “जादूगार आणि भूतविद्या करणारे” ¶२-६-wcgr) २
चित्र २: बॅबिलोनमध्ये सापडलेली एक दगडी पाटी. भुताने पछाडलंय असं समजल्या जाणाऱ्या व्यक्तीला “बरं” कसं करायचंय हे त्यात सांगितलंय
४. दानीएल आणि त्याच्या तीन मित्रांना दिलेल्या शाकाहारी अन्नात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा? (दानी. १:१२; डॅनिएल्स प्रॉफसी अध्या. ३ ¶२५-wcgr)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
दानीएल त्याच्या कुटुंबापासून दूर असतानाही यहोवाला विश्वासू राहिला. त्याच्या या उदाहरणातून आज तरुणांना काय शिकायला मिळतं?
परीक्षा होण्याआधी दानीएलने यहोवाला विश्वासू राहायचा “मनात पक्का निश्चय केला होता.” यामुळे त्याला धैर्य दाखवायला कशी मदत झाली? (दानी. १:८) आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो? ३
चित्र ३
आणखी कोणत्या मार्गांनी तुम्ही दानीएलच्या धैर्याचं तुमच्या जीवनात अनुकरण करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
दानीएलचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्याला काय विचारेन?
आणखी शिका
बायबलमधल्या या अहवालात सांगितलेल्या घटनांचं नाट्यरूपांतर पाहा.
दानीएल: आयुष्यभर देवाला विश्वासू राहिला—भाग १—निवडक भाग (१३:०७)
तरुण लोक आज दानीएलसारखं धैर्य आणि एकनिष्ठा कशी दाखवू शकतात?
a निर्गम ३४:१५; लेवीय ७:२६; ११:१-७; गणना २५:२; नीतिवचनं २०:१ ही वचनं पाहा.