राज्य घोषकांचा वृत्तांत
विरोधास न जुमानता सायप्रसमध्ये सुवार्तेची भरभराट होते
प्रेषित पौलाने देवाच्या राज्याची सुवार्ता कुप्र (सायप्रस) येथे सांगितली. (प्रे. कृत्ये १३:४-१२) हे इ. स. ४७-४८ दरम्यान घडले. आज या सुंदर बेटावर राज्याच्या सुवार्तेचा प्रचार १,१५४ यहोवाचे साक्षीदार करीत आहेत. १९८८ मध्ये एप्रिल महिन्यात २,५७० लोक प्रभुच्या सांजभोजनाच्या विधीस आले होते. याद्वारे हे स्पष्ट आहे की, या बेटावर प्रामाणिक व देवाचे भय धरणारे लोक आहेत. यहोवाच्या साक्षीदारांकरवी दिल्या जाणाऱ्या शांतीप्रिय संदेशाचे बहुत लोक स्वागत करीत असले तरी येथे येशूच्या काळातील यहुदी धर्मपुढाऱ्यांप्रमाणे विरोध करणारे कर्मठ ग्रीक धर्मपुढारी आहेत. (योहान १५:२०) सायप्रसमधील शाखा दप्तर कळवतेः “पूर्वी नव्हते इतक्या अधिकपणे ग्रीक कर्मठ चर्च आमच्या प्रचार कार्यात बाधा घालण्याचा निर्धार राखून आहे.” यानंतर अहवाल दाखवितो की, पाळकवर्ग बांधवांना त्यांच्या घरोघरच्या प्रचार कार्यात कसा जेरीस आणीत आहे व त्यांना चिथावण्या देऊन वादविवादात गुंतवण्याचा प्रयत्न करतो. मग, ते बांधवांवर दंगा माजवीत असल्याचा आरोप करतात, पण यामुळे बांधव चिडून न जाता तेथून शांतपणे निघून जातात.
वस्तुतः अनेक वेळा पाळकांकरवी करण्यात आलेला विरोध त्यांच्यावरच उलटतो. हे या उदाहरणात दिसून येतेः “काही महिन्यांआधी एका स्त्रीने यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला. आता अलिकडेच तिचा पतीही यात सामील झाला. एका वेदांत शिक्षकाने या जोडप्याला भेट दिली आणि यांनी आपला पवित्र शास्त्राभ्यास बंद करावा यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. या वेदांत्याने त्रैक्य या विषयावर स्पष्टीकरण करण्याचा यत्न केला. काही वेळाने पतीने त्यांना मध्येच थांबविले व म्हटलेः ‘तुम्ही म्हणता की, येशू आता स्वर्गात शारीरिक रुपात आहे व त्याचवेळी देव जो आत्मिक रुपात आहे त्याच्याशी एक आहे हे काही मला समजत नाही.’ तेव्हा वेदांत्याने उत्तर दिलेः ‘तुम्हाला सगळ्याच गोष्टी समजण्याची आवश्यकता नाही.’ तेव्हा आस्थेवाईक व्यक्तीने म्हटलेः ‘पण माझी ही समजूत आहे की, येशू स्वतः देव नसून तो देवाचा पुत्र आहे. तेव्हा मला त्रैक्याविषयी आणखी काही ऐकायचे नाही.’ तेव्हा ते वेदांती उठले व रागाने म्हणालेः ‘तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्र अभ्यासात बरेच पुढे गेलेले दिसता. तुम्ही बदलू शकणार नाही.’
आता या आस्थेवाईक माणसाची बायको सर्व सभांना येते व तिचा “यहोवावर भाव ठेवा” या प्रांतिय अधिवेशनात बाप्तिस्मा झाला. तिचा पती अभ्यासात प्रगति करीत आहे व सभांना येत आहे.
“अशाप्रकारे पाळक जरी बरेच प्रयत्न करीत आहेत तरी त्यांना आपले ध्येय पुरे करता येत नाही,” असे सायप्रस येथील शाखा दप्तर कळवते. ते पुढे म्हणतेः “उलटपक्षी आम्हाला आता दिसू लागले आहे की, आस्थेवाईक अधिक संख्येने सभांना येत आहेत. तसेच बंधूजनांचा शक्य तितक्या अधिक प्रामाणिक हृदयाच्या लोकांना सुवार्ता कळविण्याचा निर्धार आहे.” यहोवा आपल्या निष्ठावंतांना पाठबळ देत आहे. हे त्याने यिर्मया १:१९ मध्ये आधीच कळविले होतेः “ते तुजबरोबर सामना करतील पण तुजवर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण ‘तुझा बचाव करण्यास मी तुजबरोबर आहे,’ असे यहोवा म्हणतो.”