वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ११/१ पृ. १६-२१
  • यहोवा आपली तरवार उपसतो!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आपली तरवार उपसतो!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यरुशलेमावरील न्यायाची भाकिते
  • यहोवा—एक योध्दा
  • यरुशलेम दोषी झाले
  • योग्य शिक्षा
  • दांभिक स्तंभित बनतात
  • यहेज्केल पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग १
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • ऐका यहोवाचा पहारेकरी बोलत आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • “तुमचा अंत जवळ आलाय”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • “त्यांस समजेल की मी यहोवा आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ११/१ पृ. १६-२१

यहोवा आपली तरवार उपसतो!

“सर्व मानवजातीला समजेल की मी यहोवाने आपली तरवार म्यानातून उपसली आहे.”—यहेज्केल २१:५.

१. यहुदा व इस्त्राएल यातील कोणाविरुध्द यहोवाने आपली तरवार उपसली?

यहोवाची तरवार त्याच्या शत्रूंमध्ये भीतीदायक प्रेरणा खरीच निर्मिते. पण जेव्हा त्याने ती यहुदा व इस्त्राएल राज्यांतील शत्रूंविरुध्द उगारली तेव्हा काय घडत आहे ते त्यांना खरेच कळू शकले का? होय, यहोवाने आपली लाक्षणिक तरवार म्यानातून बाहेर काढली आहे हे त्यांना माहीत करुन देण्यात आले.—एज्रा ९:६-९; नेहम्या १:८; ९:२६-३०.

२. यहोवाने आपल्या “तरवारी”विषयी काय म्हटले व याद्वारे कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

२ देवाने आपला संदेष्टा व पहारेकरी यहेज्केल याच्याद्वारे म्हटलेः “सर्व मानवजातीला समजेल की मी यहोवाने आपली तरवार म्यानातून उपसली आहे.” (यहेज्केल २१:५) हे शब्द केवळ प्राचीन काळापुरतेच लागू होतात का? किंवा याचा आज आम्हासाठी काही अर्थ होतो?

यरुशलेमावरील न्यायाची भाकिते

३. यहेज्केलने बाबेलोनियातील बंदिवानांना काय सांगितले व याची आजची आधुनिक समांतरता कोणती दिसते?

३ यहोवाच्या रथाने पुन्हा गमन केले व आता यहेज्केल दुसऱ्‍या ठिकाणी आला. एकंदरीत असे दिसले की यहोवाची रथरुपी स्वर्गीय संस्था ही जैतुनाच्या डोंगरमाथ्यावर आली जेथून तिला सर्व निरिक्षण करता येते. याच ठिकाणाहून येशूने असे नाशाचे भाकित केले जो यरुशलेमावर इ. स. ७० मध्ये आला. हा नाश भविष्यवादितरित्या ख्रिस्तीधर्मजगताच्या अंताचे भाकित करतो. (मार्क १३:१-२०) दृष्टांतात यहेज्केलला खबार नदीपासून घेण्यात आले होते, पण आता देवाच्या आत्म्याद्वारे त्याला पुन्हा बाबेलोनियातील त्याच्या बंदिस्त ठिकाणी आणण्यात आले. तेथे त्याने इतर बंदिवानांना, ‘यहोवाने त्याला जे पाहण्यास लाविले ते सर्व काही विदित केले.’ याचप्रमाणे, आज देवाचा अभिषिक्‍त “पहारेकरी” आणि त्याच्यासोबतीचे साक्षीदार त्या वैभवी रथाच्या चालकाने त्यांना ज्या गोष्टी प्रकटविल्या आहेत त्यांची घोषणा करीत आहेत.—यहेज्केल ११:२२-२५.

४. यहेज्केलच्या लाक्षणिक कृतीसंबंधाने त्याच्या यहुदी बंदिवानांनी कोणता प्रतिसाद व्यक्‍त केला?

४ यहेज्केलने यहुदी बंदिवानांना लाक्षणिक कृतीद्वारे हे प्रकटविले की राष्ट्राचा नाश समीप आलेला आहे. (यहेज्केल १२:१-७ वाचा.) संदेष्ट्याने आपणासोबत “देशांतरास लागणारी सामग्री” वाहिली व हे दाखविले की बंदिवानांना थोडेच सामान आपल्या खांद्यावर वाहून नेता येईल. वेढा घातलेल्या यरुशलेमात लवकरच भयंकर भीती ग्रासणार होती. जरी कित्येकांनी हा इशारा गंभीरपणे घेतला नाही तरीही यहेज्केलला हे लोकांना सांगावयाचे होतेः “इतःपर विलंब लागावयाचा नाही.” आजही इश्‍वरी इशारा व भविष्यवादासंबंधाने लोकात तिटकारा दिसत असला तरीही, त्याच्या होणाऱ्‍या पूर्णतेवर आत्मविश्‍वास ठेवण्यास आम्हाला सत्य शोधकांना सहाय्य करता येईल.—यहेज्केल १२:८-२८.

५. “यहोवाचा दिवस” समीप होता तर कोणता धिक्कार योग्यच होता?

५ यहोवाच्या पहारेकऱ्‍याचे ऐकून न घेणाऱ्‍यांना हे समजलेच पाहिजे की त्यांना यहोवाच्या “तरवारी”चा स्पर्श जाणवेल. यामुळेच, यहुदा व यरुशलेम यांच्या सुरक्षेविषयीची चुकीची कल्पना पसरविणाऱ्‍यांचा धिक्कार करण्यात आला. खोट्या संदेष्ट्यांची तुलना नासधूस करणाऱ्‍या कोल्ह्‌यांसोबत करण्यात आली. तसेच हेही दाखविण्यात आले की लबाड लोक तटावर किंवा लोकांच्या निरर्थक कामावर कच्चा चुना लिंपित होते. खोट्या स्त्री संदेष्ट्र्यांचाही धिक्कार करण्यात आला. “यहोवाचा दिवस” अगदीच समीप होता, त्यामुळे जे ‘त्याच्यापासून वियुक्‍त झाले होते’ किंवा ‘जे देवाला अनुसरण्यापासून मागे हटत होते’ अशांना तो विमुख होणार होता. आम्ही जर यहोवास समर्पित आहोत तर त्याच्या पवित्र सेवेपासून वियुक्‍त होण्याचा विचार आम्हामध्ये कधीही न येवो.—यहेज्केल १३:१-१४:११.

६. यहुदाच्या मार्गभ्रष्ट झालेल्या लोकांना कोणी मानव वाचवू शकत होता का, व ही गोष्ट आम्हास काय शिकविते?

६ यहुदाच्या मार्गभ्रष्ट झालेल्या लोकांना कोणी वाचवू शकत होता का? देव त्यांच्यावर आपली दंडाज्ञा बजावील त्यावेळी धार्मिक नोहा, दानीएल आणि इयोबालाही त्यांना वाचविता आले नसते. तद्वत आम्हाला तारण मिळवावयाचे आहे तर मग आम्ही देवासमोर असणारी आपली व्यक्‍तिगत जबाबदारी उचलली पाहिजे व देवाच्या इच्छेप्रमाणे करीत राहिले पाहिजे.—यहेज्केल १४:१२-२३; रोमकर १४:१२.

७. यहुदाला कशाची उपमा देण्यात आली, पण देव विश्‍वासूजनांसोबत कशाची प्रस्थापना करणार होता?

७ यहुदाचे निवासी विश्‍वासहीन बनल्यामुळे त्याला उत्तम फळ न देणारी आणि केवळ सर्पणाच्या कामी येणारी जंगली द्राक्षलता असे संबोधण्यात आले. (यहेज्केल १५:१-८) याशिवाय त्याला, रस्त्यावर टाकून देण्यात आलेल्या एका नवजात अर्भक मुलीची उपमा दिली गेली, जी देवाला मिसरात आढळली व तिचा त्याने बचाव करुन, तिचे संगोपन करुन तिला यौवनात आणली. यहोवाने तिला आपली स्त्री बनविली पण ती खोट्या दैवतांकडे वळाली, त्यामुळेच तिला आपल्या आध्यात्मिक व्यभिचारास्तव विनाश मिळणार होता. तथापि, यहोवा विश्‍वासू जनांसोबत “सर्वकाळचा करार”—आध्यात्मिक इस्त्राएलांसोबत नवा करार—करणार होता.—यहेज्केल १६:१-६३; यिर्मया ३१:३१-३४; गलतीकर ६:१६.

८. (अ) बाबेलोन व मिसरला कोणाची उपमा दिली गेली? (ब) सिदकियाने मोडलेल्या शपथेचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा?

८ आता बाबेलोन व मिसरच्या प्रबळ सत्ताधिशांना मोठ्या गरुडांची उपमा देण्यात आली. यापैकीच्या एकाने गंधसरुच्या शेंड्याकडील अगदी वरची डहाळी तोडली, याचा अर्थ हा की, यहोयाखीन राजाला पदभ्रष्ट करुन त्याच्या जागी सिदकिया राजाला आणले. सिदकियाने नबुखद्‌नेस्सरास निष्ठावंत राहण्याची शपथ दिली तरीही शेवटी ती त्याने मोडली आणि तो दुसरा मोठा गरुड मिसर याच्या अधिपतीच्या सैन्यबळाकडे मदतीकरता धावला. सिदकियाने शपथ घेताना देवाच्या नामालाही समाविष्ट केले असेल तर ती मोडण्याद्वारे त्याने यहोवाच्या नामाला देखील निंदा आणली. देवावर निंदा आणण्याच्या विचारानेच आमच्या अंगी काटा उभारला पाहिजे की आम्ही त्याला दिलेल्या वचनास कधीही खोटे करता कामा नये. होय, यहोवाचे साक्षीदार हे नाम आम्ही आपणाला लावून घेण्यात खरेच धन्यताप्राप्त लोक आहोत!—यहेज्केल १७:१-२१.

९, १०. (अ) यहेज्केल १७:२२-२४ मध्ये कोणता भविष्यवाद आहे, पण त्याच्या पूर्णतेपासून आपल्याला लाभ मिळवावयाचा आहे तर आपण काय केले पाहिजे? (ब) आमच्या वागणूकीच्या परिणामांबद्दल कोण जबाबदार असतो?

९ यानंतर, अंतःकरणास उबविणारा मशीही भविष्यवाद येतो. (यहेज्केल १७:२२-२४ वाचा.) येथे, ‘कोवळ्या फांद्यात असणारी डहाळी’ मशीही राजा ख्रिस्त येशू आहे. त्याची प्रस्थापना यहोवाने स्वर्गीय सियोन डोंगरावर केली असून तो “उत्तम गंधसरु” होईल, म्हणजे त्याची पृथ्वीवरील राजकीर्द सुरु होईल तेव्हा तो संरक्षण व आशीर्वादांचा स्त्रोत ठरणार. (प्रकटीकरण १४:१) आम्ही याकडे आपले अंतःकरण खरेच लावू शकतो.

१० तथापि, आपल्याला या मशीही भविष्यवादाच्या पूर्णतेकडून लाभ मिळवावयाचा आहे तर आम्ही यहोवासोबत आपले नातेसंबंध चांगले राखले पाहिजे. यहेज्केलच्या बंदिवान लोकांना वाटले की त्यांचे देवासोबत उत्तम स्थान आहे, तद्वत त्यांनी स्वतःवर ओढवलेल्या त्रासासाठी आपल्या पूर्वजांना दोष दिला. पण संदेष्ट्याने याकडे निर्देश केला की प्रत्येकजण स्वतःच्या वागणूकीमुळे उद्‌भवणाऱ्‍या परिणामास्तव स्वतःच जबाबदार आहे. (यहेज्केल १८:१-२९; पडताळा यिर्मया ३१:२८-३०.) हे झाल्यावर एक अपील आले. (यहेज्केल १८:३०-३२ वाचा.) होय, पश्‍चाताप्यांविषयी यहोवा आपला अनुग्रह दर्शवितो आणि कोणाचा नाश व्हावा यात त्याला आनंद वाटत नाही. यासाठीच तो आर्जवितोः ‘लोकहो, तुम्ही परत या व जिवंत राहा.’—पडताळा २ पेत्र ३:९.

११. यहुदाच्या अधिपतींची कोणासोबत तुलना करण्यात आली, आणि यहोवाच्या “तरवारी”चा प्रहार त्याला मिळाला तेव्हा काय होणार होते?

११ यहुदाच्या पतनाविषयीच्या शोकगीतात त्याच्या अधिपतींची तुलना तरुण सिंहासोबत करण्यात आली. यहोआहाज राजा मिसरी दास्यात वारला, यहोयाकीमला नबुखद्‌नेस्सराने पकडून नेले आणि यहोयाखीनास बाबेलात बंदिस्त करण्यात आले. यावेळी नबुखद्‌नेस्सराने सिदकियाला यहुदाच्या सिंहासनावर बसवले पण त्याने बंड केले. तेव्हा पिंजऱ्‍यात बंदिस्त असणाऱ्‍या सिंहासारखे सिदकियाला धरुन बाबेलात आणण्यात आले. त्या भविष्यवादित शोकगीतास अनुसरुन इ. स. पू. ६०७ मध्ये यहुदा निकामी द्राक्षलता बनला व “अधिकार चालविण्याचा राजदंड होण्याजोगा [त्याच्यामध्ये] मजबूत धुमारा एकहि राहिला नाही.” त्याला यहोवाच्या “तरवारी”चा तडाखा मिळाला!—यहेज्केल १९:१-१४; यिर्मया ३९:१-७.

१२. (अ) आपल्या पूर्वजांप्रमाणेच यहेज्केलच्या काळातील लोक कोणती चूक करीत होते? (ब) लोकांनी यहेज्केलला, तो दृष्टांत रचून सांगत तर नाही ना असे का विचारले, आणि यामुळे आम्हाला कोणती ताकीद मिळते?

१२ यहेज्केलकडे “इस्त्राएलाचे वडील” आले तेव्हा त्याने त्यांना देवाचा संदेश सांगितला. त्याने हे निदर्शनास आणून दिले की यहोवाने त्यांची मिसरातून सुटका केली व त्यांना आपले नियमशास्त्र देऊ केले होते तरी त्यांनी त्याचा त्याग केला व मूर्तिपूजा आचरली. वस्तुतः यहेज्केलाच्या काळातील लोक देखील अशाच अपराधाचे दोषी होते त्यामुळे देव स्वतः त्यांचा न्याय करणार होता. तरीपण संशयामुळे तसेच यहेज्केलने जे म्हटले त्याची समज ग्रहण न केल्यामुळे लोकांनी त्याला विचारलेः “हा दृष्टांत सांगणारा नव्हे?” तथापि, त्यांना लवकरच कळणार होते की संदेष्ट्याच्या संदेशात कसलाही दृष्टांत नव्हता. याकरवी आम्हाला हा इशारा मिळाला पाहिजे की शास्त्रवचनीय इशाऱ्‍यांच्या पूर्णतेच्या बाबतीत आम्ही कोणतीही संशयवादी वृत्ति धरु नये.—यहेज्केल २०:१-४९.

यहोवा—एक योध्दा

१३. देवाची “तरवार” कशाला सूचक आहे आणि त्याची तरवार चालविली जाईल तेव्हा “सर्व मानवजातीला” काय कळणार होते?

१३ बंदिवासाच्या सातव्या वर्षी (आब १०, ६११ इ. स. पू), यहुदा व यरुशलेम यांच्याविरुध्द ‘यहोवाच्या दिवशी [होणाऱ्‍या] युद्धाला’ अद्याप अडीच वर्षे राहिली होती. (यहेज्केल १३:५; २०:१) अशावेळी यहोवा या योद्ध्‌याने यहेज्केलद्वारे काय म्हटले ते पहा. (यहेज्केल २१:१-५ वाचा.) देवाची “तरवार”, तो ज्याचा वापर करुन घेणार त्या पृथ्वीवरील माध्यमाला सूचित करते, पण ती त्याच्या स्वर्गीय, रथरुपी संघटनेलाही सूचित करते. यहुदा व यरुशलेम याच्यातील “धार्मिक” तसेच “दुष्कर्मी” व शिवाय देवाच्या लोकांविषयीचा मत्सर बाळगणाऱ्‍या सर्व राष्ट्रांना यहोवाच्या “तरवारी”च्या धारेपुढे नमावे लागेल. होय, यहोवा त्यांच्याविरुद्ध युद्ध करीत आहे हे “सर्व मानवजातीला” कळणार होते.

१४. (अ) यहेज्केलप्रमाणे यहोवाचे अभिषिक्‍त साक्षीदार कशाकडे निर्देश करतात? (ब) ख्रिस्ती धर्मजगतातील अधिपती देवाच्या “तरवारी”पासून बचावले जाणार नाहीत हे कशावरुन सूचित होते?

१४ यहेज्केलप्रमाणे यहोवाचे अभिषिक्‍त साक्षीदार, देव ख्रिस्तीधर्मराज्यास जडून राहणाऱ्‍यांविरुद्ध जी “तरवार” उगारणार आहे त्याकडे लक्ष आकर्षित करीत आहेत. ख्रिस्तीधर्म जगतातील वातावरण हे “इस्त्राएल भूमि” सारखे नमुनेदार झाले आहे. लवकरच या “तरवारी”चा तडाखा खोट्या धर्मांच्या सर्व आचारकर्त्यांना, “दक्षिणोत्तर सर्व मानवजातीला” जाणवेल. यहेज्केलच्या काळातील स्व-मताभिमानी लोकांना, यहोवाची “तरवार” आम्हाविरुद्ध ‘घात करण्यासाठी चालविली जाणार’ नाही असे वाटू देण्याचे कोणतेहि कारण नव्हते. या “तरवारी”ने यहुदाच्या राज्याच्या बादशाही राजवेत्राचा त्याग केला होता तसेच इतर प्रत्येक “झाडा”चा वा राजवेत्राचाहि त्याग केला होता. तर मग हे खात्रीने म्हणता येईल की देवाच्या विनाशकारी सैन्याकरवी ख्रिस्ती धर्मजगतातील अधिपतींना वाचविले जाणार नाही.—यहेज्केल २१:६-१७.

१५. नबुखद्‌नेस्सराचा समावेश असणारी कोणती घटना हे दाखविते की यहोवाच्या “तरवारी”स कोणालाही परतवून लावता येत नाही?

१५ यहोवाच्या “तरवारी”ला कोणालाही, दुरात्म्यांनाही दूर लोटता येणार नाही हे यहेज्केलचा भविष्यवाद पुढे दाखवतो. (यहेज्केल २१:१८-२२ वाचा.) नबुखद्‌नेस्सर राजा जरी दुरात्मप्रेरित दैवज्ञांचा पाठपुरावा करणार होता तरी यहोवा याकडे लक्ष देणार होता की तो अम्मोन्यांची दुर्बळ राजधानी राब्बा येथे नव्हे तर यरुशलेमाकडेच आपला रोख नेणार. भात्यातून तो असा बाण काढणार की ज्याचा रोख यरुशलेमाच्या दिशेकडे असेल. तो तेराफीम (बहुधा मानवी रुपाचे लहानसे दैवत) याचा वापर करणार होता आणि चिरलेल्या पशुच्या काळजावरुन शकुन बघणार होता. ही भूतविद्या आचरली तरीसुद्धा तो यहुदी राजधानीकडे नेणाऱ्‍या मार्गाकडेच जाऊन तिला वेढा घालणार होता. हे खरे की नबुखद्‌नेस्सरने सिदकिया राजाबरोबर करार केला होता तरी आपली शपथ मोडल्यामुळे सिदकिया आणि इतर यहुदी त्याच्या ‘हाती सापडणार होते’ व ते बाबेलात बंदिवान म्हणून नेण्यात येणार होते.—यहेज्केल २१:२३, २४.

१६. (अ) यहेज्केल २१:२५-२७ च्या पूर्णतेच्या अनुषंगाने काय घडले? (ब) विदेश्‍यांचे काळ केव्हा सुरु झाले व ते कोणत्या घटनेद्वारे समाप्त झाले?

१६ बंडखोरपणा आचरल्यामुळे सिदकियाने स्वतःला प्राणघातकपणे जखमी करुन घेतले. (यहेज्केल २१:२५-२७ वाचा.) यहुदी राजाला पदभ्रष्ट करण्यात आले तेव्हा बादशाही शिरोभूषण आणि मुकूट काढला गेला. (२ राजे २५:१-७) यहुदाचे “उंच” असणारे राज्य इ. स. पू. ६०७ मध्ये नाश झाल्यामुळे ‘नीच करण्यात आले.’ आणि मग, “नीच” असणारी विदेशी राज्ये “उंच” झाली व त्यांना देवाच्या नमुनेदार राज्याचा कसलाही अडथळा नसल्यामुळे ती पृथ्वीवर आपला ताबा मुक्‍तपणे गाजवू लागली. (अनुवाद २८:१३, १५, ३६, ४३, ४४) अशाप्रकारे “राष्ट्रांचे नेमस्त काळ”—विदेश्‍यांचा काळ—सुरु झाला, तो देवाने, “ज्याचा हक्क आहे” त्याला म्हणजे येशू ख्रिस्ताला राज्यपद बहाल केले तेव्हा १९१४ मध्ये संपला. (लूक २१:२०-२४; स्तोत्रसंहिता ११०:१, २; दानीएल ४:१५-२८; ७:१३, १४) आज येशू स्वर्गात विराजमान असल्यामुळे आता विदेशी राष्ट्रांना, प्राचीन यरुशलेमाकरवी सूचित असलेल्या दावीदाच्या कायदेशीर वारसाच्या राज्याला पूर्वीप्रमाणे पायाखाली तुडविता येत नाही.—इब्रीयांस १२:२२.

१७. अम्मोनी संदेष्ट्यांकरवी कोणता “खोटा शकुन” सांगण्यात आला होता?

१७ अम्मोन्यांचे संदेष्टे म्हणत होते की अम्मोन्यांची राजधानी राब्बा ही नबुखद्‌नेस्सराच्या तरवारीने होणाऱ्‍या नाशापासून वाचेल. पण हा “खोटा शकुन” होता कारण अम्मोन्यांचा सबंध प्रदेश उध्वस्त होणार होता. आमच्या काळात देवाने हे ठरविले आहे की जसा अम्मोनचा नाश यरुशलेमाच्या नाशानंतर झाला त्याचप्रमाणे राष्ट्रांचा विनाश ख्रिस्तीधर्म जगाचा नाश झाल्यावर होईल.—यहेज्केल २१:२८-३२; प्रकटीकरण १६:१४-१६.

यरुशलेम दोषी झाले

१८. कोणत्या पापांस्तव यहेज्केलने यरुशलेमाचा निषेध केला आणि याविषयीची आमची प्रतिक्रिया कशी असावी?

१८ परत यहोवाचे वचन विदित करताना यहेज्केलने यरुशलेमाचा रक्‍तपात, मूर्तिपूजा, स्वैराचार, अफरातफर आणि देवास विसरणे या पापांस्तव धिक्कार केला. त्याच्या रक्‍तपाती सरदारांनी न्यायाचा खून करण्यापर्यंत आपली मजल नेली, तेव्हा निंदकांनी त्यांच्यावर खोट्या दोषारोपांचा आरोप करुन आपली सुटका साधली. अशा या अपराधामुळे यरुशलेमच्या रहिवाशांची पांगापांग होणार होती. या माहितीने आम्हाला, शक्‍तीचा गैरवापर, स्वैराचार, निंदा आणि इतर कसलेही गंभीर पातक करु नये याकरता आमचा निश्‍चय दृढ केला पाहिजे.—यहेज्केल २२:१-१६.

१९. यहुदातील लोकांना कसे गाळण्यात येणार होते, आणि त्यांचे उच्चाटन समर्थनीय का होते?

१९ यहोवा यहुदाच्या लोकांना भट्टीत गाळणार होता. याकरवी तो त्यांची शुध्दी साधणार नव्हता तर त्याच्या क्रोधाग्नीत तो त्यांना वितळवणार होता. (यहेज्केल २२:१७-२२) हा न्यायदंड षडयंत्र योजणारे संदेष्टे, अधर्मी याजक, लोभिष्ठ राजपुत्र आणि अन्यायी लोकांना मिळण्यास हवाच होता. या सर्वांचा निषेध करण्यात आला. त्यांच्यातील एकही माणूस धार्मिकतेची कास धरुन नव्हता त्यामुळे देव आपल्या क्रोधाग्नीत त्यांना भस्म करणार होता.—यहेज्केल २२:२३-३१

योग्य शिक्षा

२०. कोणत्या लाक्षणिक स्त्रियांवर देवाचा क्रोध भडकणार होता आणि त्यांच्या ओळखीविषयीची कोणती सविस्तर माहिती तुम्हाला सांगता येईल?

२० देवाच्या क्रोधाचा वर्षाव हा आध्यात्मिक व्यभिचाराचा दोष असणाऱ्‍या दोन लाक्षणिक स्त्रियांवर जो न्यायदंड बजावला गेला त्यात दिसून येतो. पहिली स्त्री अहला होती, जी शोमरोन ही राजधानी असलेल्या इस्त्राएलाचे दहा वंशीय राज्य होती. खरे म्हणजे, याकोबाचे ज्येष्ठ मुलगे रऊबेन आणि शिमोन यांच्या वंशजांच्या समावेशासोबत इस्त्राएलाचे बहुतेक वंश येथे असल्यामुळे ती “थोरली” होती. तिच्या बहिणीचे नाव अहलीबा होते व ही यरुशलेम राजधानी असलेल्या यहुदाच्या दोन वंशाचे प्रतिनिधित्व करीत होती. अहला याचा अर्थ “तिचा डेरा” होतो. अहलीबा याचा अर्थ “माझा डेरा तिच्या ठायी आहे” असा होतो व हा अर्थ सुयुक्‍त होता कारण देवाचा डेरा वा मंदीर यहुदात होते.—यहेज्केल २३:१-४.

२१. अहलाने सुरक्षेसाठी कोठे धाव घेतली व हे आम्हाला कोणता इशारा देते?

२१ अहला (इस्त्राएल) हिला अश्‍शुरने इ. स. पू. ७४० मध्ये उलथविले तेव्हा ती अस्तित्वात राहिली नाही. पणे तिने काय केले होते? (यहेज्केल २३:५-७ वाचा.) विश्‍वासहीन बनून अहलेने राजकीय संधानाद्वारे सुरक्षा मिळविण्याचा यत्न केला पण यासाठी तिला तिच्या मित्रांसोबत खोटी भक्‍ती आचरावी लागली व याकरवी “सर्व मूर्तींनी ती भ्रष्ट झाली.” अहल्याच्या या आध्यात्मिक व्यभिचारावरुन आम्ही धडा घेऊन आम्ही आमच्या विश्‍वासास नष्ट करणाऱ्‍या जगाच्या संधानाविषयी दक्ष राहिलेले बरे.—याकोब ४:४; १ योहान २:१५-१७.

२२. अहला व अहलीबाप्रमाणे ख्रिस्ती धर्मजगत काय करीत आहे पण त्याचे काय होणार?

२२ आपल्या बहिणीपेक्षा अधिक पापाचरण राखल्यामुळे अहलीबा (यहुदा) हिला बाबेलच्या हातून इ. स. पू. ६०७ मध्ये राष्ट्रीय विनाश मिळाला. तरवारीपुढे पडलेल्या तिच्या मुलांना बंदिवान करुन नेण्यात आले आणि तिची सर्व राष्ट्रात मोठी नालस्ती झाली. अहला व अहलीबाप्रमाणे ख्रिस्ती धर्मजगत आध्यात्मिक व्यभिचाराचे पाप, ज्या देवाची भक्‍ती करीत असल्याचा त्याचा दावा आहे त्याच्यापुढे आचरीत आहे. प्रॉटेस्टंट धर्म आपल्या विविध पंथांना एकत्र घेऊन आपणाला जगाच्या व्यापार व राजकीय घटकांकरवी त्याची थोरली बहीण रोमन कॅथोलिक याच्यापेक्षा अधिक भ्रष्टावू दिले. या कारणास्तव सबंध ख्रिस्ती धर्मजगताचा विनाश करण्याकडे यहोवाचे लक्ष राहील. याद्वारे लोकांना कळेल की तो सेनाधीश प्रभु यहोवा आहे. ख्रिस्तीधर्म जगताचे स्नेही लवकरच त्याच्यावर हल्ला करतील आणि तो मोठी बाबेल, खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्याचा प्रमुख भाग असल्यामुळे त्यावर देवाची शिक्षा बजावतील ही माहिती ज्ञात असल्यामुळे आम्ही जगाचे सर्व निषिद्ध संबंध दूर करावेत हा आमचा निश्‍चय अधिक दृढ होईल.—यहेज्केल २३:८-४९; प्रकटीकरण १७:१-६, १५-१८.

दांभिक स्तंभित बनतात

२३. इ. स. पू ६०९च्या डिसेंबरच्या उत्तरार्धात देवाने यहेज्केलला दिलेल्या संदेशात यरुशलेमाचे चित्र कसे चितारण्यात आले होते, व याचे काय होणार होते?

२३ नबुखदनेस्सर राजाने यरुशलेमावरील आपला १८ महिन्यांचा वेढा डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धातील ज्या दिवशी आरंभिला अगदी त्या दिवशी (तेबेथ १०, ६०९ इ.स.पू.), यहोवाने यहेज्केलला आणखी एक चित्रमय संदेश दिला. यात वेढा घातलेल्या यरुशलेमाला कढईचे रुप चितारले होते व त्यात शहराचे निवासी ‘शिजविण्यात’ येणार होते. लोकांच्या अनैतिक व घाणेरड्या आचारामुळे त्या लाक्षणिक कढईला “गंज” चढला होता. आता “एकएक” करुन त्या अपराध्यांना यरुशलेमाबाहेर काढण्यात येणार होते व जोपर्यंत त्या शहराचा नाश होत नाही तोपर्यंत तिच्यावरील पीडा थांबणार नव्हत्या. यहोवाने यरुशलेमाचा त्याच्या दुष्कृत्यांच्या आधारावर न्याय केला होता व आता त्याचा नाश होणे बाकी होते. हेच ख्रिस्ती धर्मजगताचेही होणार.—यहेज्केल २४:१-१४.

२४. (अ) बायको वारल्यावर यहेज्केलने दुःख का व्यक्‍त केले नाही? (ब) यहोवाच्या “तरवारी”चा वार ख्रिस्ती धर्मजगतावर पडेल त्यावेळी त्याच्याकडून कशी प्रतिक्रिया दिसेल व त्याला काय समजेल?

२४ आता यहेज्केलला अभूतपूर्व मार्गाने हालचाल करायची होती. (यहेज्केल २४:१५-१८ वाचा.) आपली बायको वारल्यावर संदेष्ट्याने दुःख का व्यक्‍त करावयाचे नव्हते? यरुशलेम, त्यातील निवासी आणि मंदीर यांचा नाश होईल तेव्हा यहुदी किती स्तंभित होतील ते दाखविण्यासाठी. यहेज्केलने याविषयी आधी बरेच काही सांगितले असल्यामुळे तो आणखी काही सांगणार नव्हता. यरुशलेमाचे पतन घडले आहे हे त्याला कोणी येऊन सांगितल्यानंतर तो बोलणार होता. याचप्रकारे, ख्रिस्ती धर्मजगत व त्यातील दांभिक धर्माधिकारी त्याच्या नाशाच्या समयी स्तंभित होतील. एकदा “मोठे संकट” सुरु झाले म्हणजे अभिषिक्‍त पहारेकरी वर्गाने ख्रिस्ती धर्मजगताविषयी जे काही म्हटलेले होते ते पुरे असणार. (मत्तय २४:२१) पण जेव्हा ख्रिस्ती धर्मजगतावर यहोवाच्या “तरवारी”चा वार पडेल तेव्हा स्तंभित बनलेल्या या धर्माधिकाऱ्‍यांना व इतरांना ‘समजेल की तो यहोवा आहे.’—यहेज्केल २४:१९-२७.

तुमचा प्रतिसाद कोणता असेल?

◻ यहुदा व इस्त्राएल यांच्याविरुध्द यहोवाने आपली “तरवार” उपसली तेव्हा काय घडले?

◻ सिदकियाने नबुखद्‌नेस्सरला दिलेली शपथ मोडली त्याचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा?

◻ देवाची “तरवार” कशाला सूचित आहे?

◻ नबुखद्‌नेस्सरच्या बाबतीत घडलेली कोणती घटना हे दाखविते की कोणालाही यहोवाच्या “तरवारी”स परतवून लावता येत नाही?

◻ यहेज्केल २१:२५-२७ च्या पूर्णतेनुसार काय घडले?

◻ बायको वारली तेव्हा यहेज्कलने दुःख प्रदर्शित केले नाही याकरवी काय प्रतिछायित करण्यात आले?

[१८ पानांवरील चित्रं]

सिदकिया राजाने नबुखदनेस्सराला दिलेली शपथ मोडली व त्याला बंदिवान करुन नेण्यात आले तेव्हा कोणत्या भविष्यवादाची पूर्णता आरंभिली गेली?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा