सैतानी भक्ती आमच्या काळातील
सैतानाला सुद्धा आपली भक्ती व्हावी ही इच्छा आहे यात कोणताच संशय नाही. येशूची परिक्षा घेत असता त्याने त्याला केवळ एका अटीवर एक मोठे बक्षीस देण्याची तयारी दर्शविलीः “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व तुला देईन.” (मत्तय ४:९) अर्थात, येशूने ते स्पष्ट नाकारले, पण असे हे अनुकरण सर्वांनीच केले नाही. आमच्या या आधुनिक जगात सैतानी भक्तीचा फैलाव चोहोकडे वाढत आहे.
उदाहणार्थ, कॅनडामध्ये द कॅलगरी हेराल्ड या वर्तमानपत्राने “दियाबलाचे शिष्य” या शिर्षकाखाली एक लेखमाला चालविली होती. या वर्तमानपत्राने एका पोलिस चौकशीचा आधार घेऊन म्हटलेः “ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यांच्याकरवी मला हे कळाले की, समाजातील कोणा विशिष्ट गटापुरताच हा सैतानी धर्म राहिलेला नाही. तर कॅलगरी पोलिस सर्व्हिंस आणि रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिस यांच्या संयुक्त गुप्तहेर खात्याने जी माहिती मिळविली तिजनुसार एकट्या कॅलगरी शहरात सुमारे ५,००० लोक या सैतानी धर्मपद्धतींना अनुसरीत आहेत.”
दुसऱ्या एका वर्तमान पत्राने दिलेल्या अहवालानुसार कळते की, अमेरिका व युरोपात अनेक रुपात हा सैतानी धर्म चोहोकडे डोके वर काढीत आहे. एवढेच काय पण पोलिस खातेही या सैतानी धर्मात रस बाळगून आहेत. ते का बरे? कारण अनेक गुन्ह्यांचा व सैतानी रुढींचा अगदी जवळचा संबंध असल्याचे अनेक प्रकरणात आढळले. अगदी अलिकडेच, एका पोलिस जासूदाने असे म्हटल्याचे प्रसिद्ध झालेः “आम्ही, जसे कोणी ख्रिस्ती, यहुदी किंवा इस्लाम या धर्मावर विश्वास ठेवून चालतात त्याचप्रमाणे या [सैतानी] धर्मावर विश्वास ठेवून चालणाऱ्या लोकांची हाताळणी करीत आहोत. तुम्ही पाहता ते गुन्हे, गुन्हा करावा म्हणून नव्हे तर धर्माखातर घडत असलेले गुन्हे आहेत.”
याचे एक उल्लेखनीय उदाहरण १९६९ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्नियात मेनसन टोळीने केलेले खून हे आहे. जेफ्री रसेल या इतिहास प्राध्यापकांच्या मते, “मेनसन टोळी ख्रिस्त व सैतान असल्याचा दावा करी. . . . या मेनसन टोळीच्या टेक्स वॉटसन या अनुयायाने शारोन टेटचा खून करताना म्हटलेः ‘मी सैतान आहे; मी येथे दियाबलाची कामगिरी करायला आलो आहे.’” पण हा सैतानी धर्म इतक्या उघडपणे नेहमी वावरत नाही.
चेटूक, भूतविद्या व जादूटोणा
खरेच, सैतानी भक्ती ही केवळ त्याचे नाव घेऊन त्याची उपासना करण्यापुरती मर्यादित नाही. प्रेषित पौलाने इशारा दिला की, “विदेशी लोक जो यज्ञ करतात तो देवाला नव्हे तर दुरात्म्यांना करतात.” (१ करिंथकर १०:२०) दुरात्म्यांना करण्यात येणारी भक्ती ही वास्तविकपणे सैतानाचीच भक्ती आहे कारण सैतानाला “भूतांचा अधिकारी” म्हटलेले आहे. (मार्क ३:२२) तर मग, “विदेशी लोक” किंवा “राष्ट्रे” यांच्या कोणत्या प्रघातांना भूताच्या भक्तीचे किंवा सैतानी भक्तीचे प्रकार म्हणून ओळखता येऊ शकेल? देवाने इस्राएलांना जे सांगितले होते ते आम्हाला काही उदाहरणे देऊ शकेलः “दैवज्ञ, शकून सांगणारा, जादुगार, चेटकी, मांत्रिक, देवऋषी, पंचाक्षरी अथवा इलमी असा तुमच्यापैकी कोणी नसावा. जो कोणी असली कृत्ये करतो त्याचा यहोवाला वीट आहे.”—अनुवाद १८:१०-१२.
अशाप्रकारे, आम्हाला याद्वारे, ब्राझिल तसेच हाईतीमध्ये रक्ताची अर्पणे आणि तेथील उपाध्याय आत्म्याशी संपर्क साधण्यात जे मंत्रतंत्र उपयोगात आणीत आहेत त्याविषयी सावधानतेचा इशारा मिळतो. याचप्रमाणे अमेरिकेत क्युबी लोक जो सॅनेटेरिया प्रकार अनुसरतात त्याविषयी देखील सावधान राहण्याचा इशारा मिळतो. तसेच, जे चेटूक मृतांसोबत संपर्क साधण्याचा दावा करुन आहेत व त्याकरवी जे जिवंत आहे त्यांना दहशत उभारतात त्यांच्याविषयी देखील सावधानी राखण्याचा इशारा मिळतो.—पडताळा १ शमुवेल २८:३-२०.
अफ्रिकेतील अनेक भागात चेटूक प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेत चेटुक वैद्य चोहोकडे आपले वर्चस्व गाजवून आहेत, आणि लोक देखील यांना मानतात. अलिकडेच काही वर्तमानपत्रात, काही लोकांना जमावाने जिवंत जाळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, ज्यामध्ये जमावाचा हा आरोप होता की त्या लोकांनी वीज निर्माण करुन अनेक खेडूतांना भस्मसात केले! स्थानिक चेटूक वैद्याने निरपराध लोकांवर या “अनैसर्गिक” कृत्याचा दोष देऊन त्यांना जाळण्यासाठी झाडाला बांधून टाकले. चेटूक किंवा जादूटोण्यावरील हा विश्वास दुरात्मिक भक्तीशी संबंधित आहे.
तथापि, ही चेटुकगिरी केवळ आफ्रिकेपुरतीच मर्यादित नाही. १९८५ मध्ये अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये सुधारणागृहात शिक्षा भोगणारा हर्बट डी. डेटमर याला व्हर्जिनियाच्या पूर्व प्रांतातील प्रांतिय न्यायालयाने त्याचे धार्मिक विधि तुरुंगात पार पाडता यावेत म्हणून त्याचा विशिष्ठ पेहराव इतर चीजवस्तुंचा वापर करता यावा म्हणून मान्यता दिली. पण त्याचा धर्म कोणता होता? न्यायालयातील टिपणीनुसार तो “चर्च ऑफ व्हिक्का” (सर्वसाधारणपणे ओळखला जाणारा चेटुक धर्म) याचा सदस्य होता. यानुसार डेटमर याला त्याच्या भक्ती गंधक, चंदन, समुद्र मीठ किंवा आयोडीनविना असलेले मीठ; मेणबत्त्या, धूप, एक गजर करणारे घड्याळ व एक पांढरा झगा ही वापरण्याची कायद्याने परवानगी मिळाली.
होय, जे काही प्रसिद्ध झाले आहे त्याच्या अनुषंगाने पाहता चेटूकप्रकार पाश्चात्य देशात सर्वत्र पसरलेले आहेत. मँचेस्टर गार्डियन वीकली या ब्रिटीश वर्तमानपत्राने म्हटलेः “पाच वर्षांपूर्वी असा अंदाज होता की ब्रिटनमध्ये सुमारे ६०,००० चेटुक असावेत; पण आज [१९८५ मध्ये] काही चेटुकांच्या जबानीनुसार हा आकडा ८०,००० पर्यंत गेला आहे. प्रिडीक्शन या ज्योतिषशास्त्र व जादूविषयक मासिकाचा खप ३२,००० पेक्षा अधिक आहे.”
सैतानी धर्म व संगीत
मेफिस्तोफेलिस—द डेवील इन द मॉडर्न वर्ल्ड या पुस्तकात प्राध्यापक रसेल आपले लक्ष आणखी एका मार्गाकडे नेतात ज्याकरवी सैतानाचे उद्देश वाढविले जात आहेत. ते लिहितातः “खुल्या रुपाने वावरणारा सैतानी धर्म १९७० च्या दशकात ऱ्हास पावला, पण सैतानी धर्माच्या मूळ सांस्कृतिक प्रथा १९८० च्या पुढे ‘वजनदार धातु’च्या रॉक संगीताकरवी चालत राहिल्या. या संगीतात दियाबलाचे नाव वेळोवेळी उच्चारुन क्रुरता, मादकद्रव, कुरुपता, निराशा, स्वउपभोग, हिंसा, गोंधळ आणि निर्जिवपणा यांच्यावर अधिक भर दिला जातो.”—तिरपे अक्षरवळण आमचे.
ज्या संगीतकारांनी आपल्या संगीतात सैतानी धर्माची मूलतत्वे समाविष्ट केली ते कदाचित त्याविषयी इतके गंभीर झाले नसावेत. लोकांना कदाचित धक्का द्यावा किंवा वातावरणाबाहेर न्यावे हा त्यांचा कयास राहिला असावा. तरीपण, काही हळव्या व्यक्तींवर याचा जबरदस्त परिणाम झालेला आहे. प्राध्यापक रसेल यांनी हे परिक्षिले आहेः “अर्धगंभीरपणातील हा दुरात्मिक विचारांचा प्रचार जसजसा पसरत आहे, तसतसा वेडसर व दुर्बल मनावर तो परिणाम करत आहे. याचा परिणाम त्या नीचवृत्तीच्या भयानक गुन्ह्यात दिसत आहे, ज्यात कोवळ्या लेकरांना भ्रष्टविणे, पशूंचे विच्छेदन हेही समाविष्ट आहे.”
अलिकडेच एका प्रकरणाने न्यूयॉर्कवासियांना विस्मित केले. वर्तमानपत्रातील माहितीनुसार एका १४ वर्षांच्या मुलाने “सैतानी धर्मविचारांनी आपले मन व्यापून” आपल्या आईस प्रथम भोसकून ठार केले व नंतर स्वतः आत्महत्त्या केली. मॅक्लीन या मासिकात कॅनडातील एका कौटुंबिक सल्लागाराने म्हटले की, बहकलेले विचार बाळगणाऱ्या अनेक संत्रस्त मुलामुलींनी कबूल केलेः “आम्ही मादक द्रव व वजनदार धातुच्या विविध प्रकारच्या रॉक संगीताच्या संगतीत सैतानी धर्मरुढीही अनुसरतो.”
छंद नव्हे
सबंध अमेरिकेस सध्याला चॅनलींग नावाच्या छंदाने पछाडले आहे. “चॅनल”च्या एका समारंभात सहभागी व्हावे यासाठी लोक शेकडो डॉलर देण्यास तयार आहेत. हे चॅनल म्हणजे माध्यम (ज्यात सहसा स्त्रिया असतात), जेथे ती स्त्री लोकांच्या पूर्वज मृत व्यक्तीसोबत संपर्क साधू शकते असा दावा केला जातो. यापैकीच्या एका चॅनलविषयी वर्तमानपत्र म्हणते की, हे कार्यक्रम “वेळोवेळी उपग्रह व्यवस्थापनाच्या आधारे सुमारे अर्धा डझन शहरात एकाच वेळी हजारो लोकांना दाखविण्यात येतात.” ही प्रथा, पवित्र शास्त्रातील त्या उपदेशाच्या अगदी विरुद्ध आहे जेथे म्हटले आहे की, चेटूक व शकून सांगणाऱ्यांपासून दूर रहा. याप्रकारे या भक्तीविषयी, ती दुरात्मिक आहे असेच म्हटले जाऊ शकते. इतर सर्व प्रकारातील भूतविद्येप्रमाणे ही भक्ती सुद्धा मानवी जीव अमर आहे या सैतानी लबाडीवर आधारलेली आहे.—उपदेशक ९:५; यहेज्केल १८:४, २०.
द्वेषाने भरलेल्या जगावर असणारा दियाबलाचा प्रभाव
या विसाव्या शतकातील मानवजातीची भयानक परिस्थिती पाहून सैतानी प्रभावाने आपला अतिरेक तर गाठलेला नाही ना, असा प्रश्न मनात डोकावतो. प्राध्यापक रसेल याविषयी बोलताना म्हणतातः “आज अणूशस्त्र साठे, पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत पृष्ठवंशीय प्राण्याला ठार करुन सत्तर टक्के उरेल या प्रमाणात असताही आम्ही हट्टाने अशा एका युद्धाच्या तयारीत गुंतलेलो आहोत जे कोणाही व्यक्तीला, राष्ट्राला किंवा राजकारणीय डावपेचांना फायदेकारक न ठरता उलट करोडोंना भयानक मरणाच्या खाईत लोटेल. यामागे अशी कोणती शक्ती आहे जी या मार्गाला दरदिवशी अधिक धोकादायक बनवीत राहते? या ग्रहाचा अणु शस्त्राकरवी नाश घडावा हे कोणाच्या फायद्याचे असेल? केवळ तीच शक्ती जी अगदी सुरवातीपासून या गोलार्धाच्या नाशाची क्रुर स्वप्ने व कुटील योजना राखून आहे.”
तर मग, ती शक्ती कोणती किंवा कोण आहे? ते प्राध्यापक आपल्याच शब्दात याचे उत्तर देताना म्हणतातः “दियाबल हा आत्मिक प्राणी असून देवाच्या या जगाची आपल्या शक्तीनुसार शक्य तेवढी हानी व नाचक्की करावी याच्या मागे लागून आहे. जी शक्ती आम्हास अणूशस्त्रे विस्तारित करण्यास आर्जविते ती हीच शक्ती तर नसावी ना जी नेहमी आपण ती नसल्याचे सोंग धारण करते? आमच्या गोलार्धावरील कठीण परिस्थिती लक्षात घेता ही शक्यता आम्हाला डावलून लावता येणार नाही.” ख्रिस्तीजन तर ही शक्यता नक्कीच डावलणार नाहीत! येशूने स्वतःच या जगावरील सैतानाच्या त्या प्रभावाची ओळख देताना म्हटले की, तो “या जगाचा अधिकारी आहे.” (योहान १२:३१) सैतानाच्या आजच्या मनःस्थितीविषयीचे वर्णन करताना प्रकटीकरणाचे पुस्तक म्हणते की, “आपला काळ अतिशय थोडा आहे असे समजून [तो] अतिशय संतप्त झालेला आहे.” (प्रकटीकरण १२:१२) आमच्या काळात हा सैतान काय साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे याचा उल्लेख करताना हेच पुस्तक म्हणते की, तो या जगाच्या अधिपतींना “त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी एकत्र करावयास” दुरात्मिक प्रचाराचा उपयोग करुन घेत आहे. (प्रकटीकरण १६:१४) आम्ही, मानवजात आपल्या नाशाच्या योजना करण्यात मूर्खपणाने इतकी का खटपट करीत आहे हे समजण्याचा प्रयत्न केला तर दियाबल सैतानाच्या प्रभावास नजरेआड करु शकणार नाही.
प्रेषित पौलाने, सैतानाला “अंतरिक्षेचा (किंवा वातावरणाचा) राज्याधिपती, म्हणजे “आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती” आणि “या युगाचा देव” असे संबोधिले आहे. (इफिसकर २:२; २ करिंथकर ४:४) या कारणास्तव, आजच्या “पुढारलेल्या” विज्ञानशास्त्रीय युगातील अशी ही रानटी कृत्ये, जसे की, दोन जागतिक महायुद्धे, युरोप आणि कम्पुचियातील घातपाती कृत्ये, आफ्रिकेतील राजकारणी डावपेचांनी घडविलेला दुष्काळ, जगव्याप्तपणे धर्म व जातीभेदाची पाडण्यात आलेली खिंडारे, तसेच द्वेषभाव, खून व पद्धतशीरपणे छळ, मादक द्रवांचे सेवन यामुळे मानवजातीला हळूवारपणे गुन्हेगारीकडे नेणे व यासारखे आणखी काही प्रकार, कोणी दुरात्मिक प्रभाव मानवजातीला देवापासून दूर नेऊन गोलार्धव्याप्त आत्महत्त्या करण्यासाठी प्रवृत्त करीत नाही ना, याचे पुष्कळांना नवल वाटते यात काही शंका नाही.
तर मग, हा सैतान कोण आहे? तो प्रत्यक्षात काय करु इच्छितो? आम्हाला व्यक्तीशः याविषयी काय करता येण्याजोगे आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी आम्ही आपणास पुढील लेख विचारात घेण्याचे निमंत्रण देत आहोत.
[७ पानांवरील चित्रं]
देवाचे लोक सैतानी स्वरुपाचे संगीत टाळून हितकारक मनोरंजन स्विकारतात