वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 १०/१ पृ. २१-२५
  • शांतीकारक फळ देणारी शिस्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शांतीकारक फळ देणारी शिस्त
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एवढा दृढ पवित्रा का?
  • पूर्ण रुपाने काट द्यावी का?
  • नातेवाईकांबद्दल काय?
  • न्यायालयाचा निकाल
  • शिस्त—अनेक फायदे
  • एखाद्या नातेवाईकाला बहिष्कृत केले जाते तेव्हा ख्रिस्ती एकनिष्ठा दाखवा
    आमची राज्य सेवा—२००२
  • बहिष्कृत व्यक्‍तीशी कसे वागावे
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • बहिष्कृत करणे—एक प्रेमळ तरतूद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • आपली जवळची व्यक्‍ती यहोवाला सोडून जाते तेव्हा . . .
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 १०/१ पृ. २१-२५

शांतीकारक फळ देणारी शिस्त

“लावली जाणारी कोणतीहि शिस्त तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतीमत्व हे शांतीकारक फळ देते.”—इब्रीयांस १२:११.

१, २. (अ) इब्रीयांस १२:९-११ नुसार देव प्रेमळपणे काय करतो? (ब) शिस्तीसंबंधीचे एक उदाहरण कोणते आहे व त्यापासून कोणता परिणाम उद्‌भवू शकतो?

आपल्या बालपणाचा जरा विचार करा. तुमच्या पालकांनी तुम्हाला कधी शिस्त लावल्याचे आठवते का? आम्हापैकी बहुतेकांना ते आठवेल. प्रेषित पौलाने याच उदाहरणाचा वापर करुन देवाकडून मिळणाऱ्‍या शिस्तीविषयीचे विवेचन केले. ते आपल्याला इब्रीयांस पत्र १२:९-११ मध्ये वाचायला मिळते.

२ देवाकडून मिळणारी पितृत्वाची शिस्त आमच्या आध्यात्मिक जीवनावर परिणाम घडवते. तिचे विविध प्रकार आहेत. यापैकीचा एक म्हणजे ज्याला देवाच्या दर्जांनुरुप जगण्याची इच्छा नाही वा जो तसे करण्याचे नाकारतो अशा व्यक्‍तीला ख्रिस्ती मंडळीतून काढून टाकणे हा होय. इतक्या जोरदारपणे शिक्षा मिळालेल्या वा शिस्त लाभलेल्या व्यक्‍तीमध्ये पश्‍चाताप घडून तो मागे वळण्याची क्रिया घडते. या दरम्यान निष्ठावंतांच्या मंडळीसही शिस्त लाभते ती या अर्थी की, यांनाही देवाच्या उच्च दर्जांनुरुप राहण्याचे महत्व शिकायला मिळते.—१ तिमथ्यी १:२०.

३. बहिष्कृतपणाविषयी काहींमध्ये कोणती प्रतिक्रिया घडते?

३ पण मग, ‘एखाद्यास बहिष्कृत करणे व त्या बहिष्कृत झालेल्या व्यक्‍तीबरोबर बोलण्याचे नाकारणे हे निष्ठुरतेचे वाटत नाही का?’ असे कोणी कदाचित विचारील. असाच दृष्टीकोन एका न्यायालयीन प्रकरणात सामोरा आला. हे प्रकरण एका स्त्रीचे होते जिचे पालक पूर्वी यहोवाचे साक्षीदार होते. हे पालक बहिष्कृत करण्यात आले होते. ती स्त्री बहिष्कृत झाली नव्हती पण तिने मंडळीतून आपले सभासदत्व रद्द करण्याविषयीचे पत्र मंडळीला देऊन मंडळीपासून स्वतःला स्वेच्छेने अलिप्त करुन घेतले. याकारणास्तव ही स्त्री यहोवाची साक्षीदार नाही असे मंडळीला साध्या सूचनेद्वारे कळविण्यात आले. ती दुसरीकडे राहायला गेली आणि जेव्हा बऱ्‍याच वर्षानंतर परतली तेव्हा तिला असे दिसले की कोणीही तिच्याबरोबर बोलत नाही. तेव्हा तिने हे प्रकरण कोर्टात नेले. याचा काय निकाल लागला व त्याचा तुम्हावर कोणता परिणाम झाला असता? या गोष्टीची योग्य ती समज होण्यासाठी आपण, पवित्र शास्त्र बहिष्कृतपणासारख्या विषयाबद्दल काय म्हणते त्याचे आधी परिक्षण करु या.

एवढा दृढ पवित्रा का?

४. मंडळीमध्ये काहींच्या बाबतीत कधी कधी काय घडते? (गलतीकर ६:१; यहुदा २३)

४ बहुतेक खरे ख्रिस्ती देव व त्याच्या नीतीमान कायद्यांना निष्ठावंतपणे दृढ धरुन आहेत. (१ थेस्सलनीकाकर १:२-७; इब्रीयांस ६:१०) तरीपण कधीतरी कोणी सत्याच्या मार्गापासून बहकतो. उदाहरणार्थ, ख्रिस्ती वडीलांकडून मदत मिळाली तरी तो पश्‍चाताप न पावता देवाच्या कायद्याचा भंग करतो. किंवा तो खोटे शिक्षण देऊन वा मंडळीतून स्वतःला अलिप्त करुन विश्‍वास नाकारतो. अशा वेळी काय केले जाण्यास हवे? अशाच गोष्टी प्रेषित जिवंत होते त्या काळीही घडल्या. यासाठीच आपण त्यांनी याविषयी काय लिखाण केले ते बघू या.

५, ६. (अ) जे गंभीर पापे करतात आणि पश्‍चाताप दाखवीत नाहीत अशाबरोबर दळणवळण राखण्याच्या बाबतीत आम्हाला कोणती सूज्ञ सूचना आहे? (मत्तय १८:१७) (ब) आम्हापुढे कोणते प्रश्‍न सामोरे आहेत?

५ करिंथमध्ये एक असा मनुष्य होता ज्याला अनैतिक गोष्टींचा पश्‍चाताप वाटत नव्हता, त्यामुळे पौलाने मंडळीला हे लिहिलेः “बंधु म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरु नये; त्याच्या पंक्‍तीसहि बसू नये.” (१ करिंथकर ५:११-१३) हीच गोष्ट जो धर्मत्यागी बनतो त्याविषयी देखील आचरली पाहिजे, जसे की हुमनायबद्दल म्हटले आहेः “तट पाडणाऱ्‍या माणसाला एकदा दोनदा बोध करुन मग त्याला वर्ज्य करा. असला माणूस बिघडलेला आहे आणि त्याने स्वतःच स्वतःला दोषी ठरविले असून तो पाप करीत राहतो.” (तीतास ३:१०, ११; १ तीमथ्यी १:१९, २०) याचप्रमाणे जो मंडळीस धिक्कारतो त्याच्यापासूनहि अशाचप्रकाराने दूर राहणे बरेः “आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले.”—१ योहान २:१८, १९.

६ अशा लोकांना पश्‍चाताप घडून ते परत वळतील व त्यांना मंडळीत परत घेता येईल ही आशा केली जाते. (प्रे. कृत्ये ३:१९) पण मध्यंतरात ख्रिश्‍चनांनी अशा लोकांबरोबर मर्यादित स्वरुपाचा सहवास राखावा की त्यांच्यापासून स्वतःला अगदीच वेगळे राखावे? जर वेगळे राखायचे आहे तर का?

पूर्ण रुपाने काट द्यावी का?

७. पाप्यांच्या दोन प्रकारच्या वर्गाविषयी आमची वागणूक कशी भिन्‍न स्वरुपाची राहील?

७ ख्रिस्तीजन स्वतःला लोकांपासून वेगळे ठेवीत नाही. आमचे शेजारी, कामावरील मित्र, शाळकरी मित्र व इतरांसोबत आमचा नेहमी संपर्क येतो व शिवाय काही जरी ‘व्यभिचारी, लोभी, वित्त हरण करणारे वा मूर्तिपूजक’ आहेत तरीही अशांना आम्ही साक्ष ही देतोच. पौलानेही म्हटले की आम्हाला यांचा संपर्क पूर्णतेने टाळता येणार नाही कारण, मग ‘आम्हाला या जगातून निघून जावे लागेल.’ तरीपण तो म्हणतो की, “बंधु म्हटलेला असा कोणी” या दशेत आहे तर मग परिस्थिती भिन्‍न आहे. या कारणास्तव, “तशाची संगत धरु नये; त्याच्या पंक्‍तीसही बसू नये.”—१ करिंथकर ५:९-११; मार्क २:१३-१७.

८. दूर राहण्याविषयी प्रेषित योहानाने कोणता सल्ला दिला?

८ ख्रिश्‍चनांनी अशा प्रकारच्या व्यक्‍तींना केवढे कटाक्षाने टाळले पाहिजे त्याविषयीचा जोर व्यक्‍त करणारी अशीच सूचना प्रेषित योहानाच्या लिखाणात आपल्याला आढळते. तो म्हणतोः “ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. . . . हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारु नका. कारण जो त्याचे स्वागत [ग्रीक, खायरो] करतो तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो.”a—२ योहान ९-११.

९, १०. (अ) पश्‍चाताप व्यक्‍त न करणाऱ्‍या इस्त्राएलाचे काय होत असे व का? (ब) पापाविषयीचा पश्‍चाताप न दाखविलेल्या बहिष्कृत व्यक्‍तीसोबत राखल्या जाणाऱ्‍या दळणवळणाच्या बाबतीत जी व्यवस्था आहे तिजबद्दल आपल्याला कसे वाटले पाहिजे? (२ पेत्र २:२०-२२)

९ आजही एवढा दृढ पवित्रा का जरुरीचा आहे? देवाने इस्त्राएलांना दिलेल्या कायद्यात जी कटुपणे काट देण्याची पध्दत सांगण्यात आली होती ती विचारात घ्या. कित्येक गंभीर प्रकरणात स्वेच्छेने नियमभंग करणाऱ्‍यांना ठार केले जाई. (लेवीय २०:१०; गणना १५:३०, ३१) असे केले जाई तेव्हा इतर एवढेच काय पण त्याच्या नातेवाईकांना सुध्दा त्या मृत झालेल्या अपराध्यासोबत बोलता येणे अशक्य होते. (लेवीय १९:१-४; अनुवाद १३:१-५; १७:१-७) त्या काळी राहणारे निष्ठावान इस्त्राएल आमच्यासारखेच, आम्हाला ज्या भावना आहेत त्याच मनोभावनेचे लोक होते तरीपण त्यांना हे ठाऊक होते की देव हा न्यायी व प्रेमळ आहे व त्याच्या कायद्यांनी त्यांची नैतिक व आध्यात्मिक शुध्दता राखली होती. या कारणास्तव कोणा अपराध्यास पूर्णपणे काट दिली पाहिजे अशी त्याच्याकडील व्यवस्था ही मुलभूतपणे चांगली व बरोबरची होती हे त्यांना मान्य होते.—इयोब ३४:१०-१२.

१० याच्याच अनुषंगाने, पापाविषयीचा पश्‍चाताप न दाखविलेल्या कोणा बहिष्कृतासोबत ख्रिश्‍चनांनी सहवास राखण्याचे टाळावे ही देवाकडील व्यवस्था आम्हासाठी संरक्षणयुक्‍त आहे हे आम्हाला खात्रीलायक वाटले पाहिजे. “जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहा तसे तुम्ही नवा गोळा व्हावे.” (१ करिंथकर ५:७) ज्यांनी मुद्दाम आपणाला अलिप्त करुन घेतले आहे अशाही लोकांचा संपर्क टाळण्याकरवी ख्रिस्तीजणांना त्यांच्या टीकात्मक, अरसिक वा धर्मत्यागी दृष्टीकोणांपासून स्वतःला वाचविता येईल.—इब्रीयांस १२:१५, १६.

नातेवाईकांबद्दल काय?

११, १२. (अ) इस्त्राएलात कोणा अपराध्यास ठार केले जाई तेव्हा याचा त्याच्या नातेवाईकांवर कोणता परिणाम होत असावा? (ब) आज्ञाधारकपणाचे फायदे विवेचीत करा.

११ अपराधी लोकांना काढून टाकण्याच्या आपल्या नीतीमान कायद्याच्या अमलबजावणीमुळे संबंधित नातेवाईकांवर परिणाम होतो याची देवाला जाणीव आहे. वर सांगितले आहेच की जेव्हा एखाद्या अपराध्याला ठार मारले जाई तेव्हा कौटुंबिक सहवास अशक्य बनत होता. खरे म्हणजे मुलगा मद्यपी व खादाड असला तर त्याला न्यायाधिशांपुढे आणणे हे त्याच्या आईवडीलांचे कर्तव्य होते व तेथेही तो पश्‍चाताप व्यक्‍त करीत नाही तर “आपल्यामधून . . . दुष्टाईचे निर्मूलन करावे” म्हणून त्याला ठार मारण्याच्या न्याय्य कृतीमध्ये या पालकांनीही सहभाग घ्यावयाचा होता. (अनुवाद २१:१८-२१) असा प्रसंग कोणा पालकावर आलाच तर ते त्यांना किती कठीण वाटत असावे याची तुम्हाला कल्पना करता येईल. याशिवाय त्या अपराध्याचे भाऊ, बहिणी वा आजोबा-आजीला ते कसे वाटत असेल याचीही कल्पना करा. तरीपण, कौटुंबिक जिव्हाळ्‌याच्या आधी नीतीमान देवास निष्ठा व्यक्‍त करणे ही गोष्ट त्यांच्यासाठी जीवनप्रदायक ठरु शकत होती.

१२ मोशेकरवीच्या देवाच्या नेतृत्वाविरुध्द बंड करणारा कोरह या प्रमुखाचे उदाहरण लक्षात आणा. यहोवाने आपल्या पूर्ण न्यायत्वास अनुसरुन कोरह मेलाच पाहिजे असे म्हटले. पण सर्व निष्ठावंतांना असे सांगण्यात आलेः “तुम्ही या दुष्ट मनुष्यांच्या तंबूंपासून निघून जा. त्यांच्या कोणा वस्तुला शिवू नका, नाहीतर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल.” देवाच्या इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष करणाऱ्‍या नातेवाईकांचा त्या बंडखोरांसोबत नाश झाला. पण कोरहच्या काही नातेवाईकांनी यहोवास निष्ठावंत राहण्याचे पसंद केले व यामुळे त्यांचे जीवन वाचले व त्यांना भावी काळात आशीर्वाद मिळाले.—गणना १६:१६-३३; २६:९-११; २ इतिहास २०:१९.

१३. कुटुंबातील कोणा सदस्याला बहिष्कृत करण्यात आले आहे किंवा त्यानेच स्वतःला अलिप्त करुन घेतले आहे अशावेळी निष्ठावंत ख्रिस्ती कसा प्रतिसाद देतील?

१३ ख्रिस्ती मंडळीतून बाहेर घालवून दिल्यामुळे त्वरीत मृत्यु येत नाही यामुळे कौटुंबिक नाते चालूच राहते. अशाप्रकारे बहिष्कृत झालेला वा स्वतःच अलिप्त करुन घेतलेला कोणी माणूस आपल्या घरी त्याची ख्रिस्ती बायको व विश्‍वासू मुले यांजबरोबर राहील. अशावेळी देवाचा न्याय व मंडळीने केलेली हालचाल यांच्याविषयी आदर राखून आता बायको व मुले ही गोष्ट समजून घेतील की त्यांच्यामध्ये व घरच्या यजमानामध्ये एकेकाळी असणारे आध्यात्मिक बंध यजमानांनीच आता बदलविलेले आहे. तथापि, बहिष्कृत होण्यामुळे त्यांच्यातील रक्‍ताचे वा वैवाहिक नाते संपत नसल्यामुळे सर्वसाधारण कौटुंबिक जिव्हाळा व दळणवळण चालू राहू शकते.

१४. कुटुंबाच्या बाहेर राहणाऱ्‍या कोणा बहिष्कृत झालेल्या वा स्वतःस अलिप्त करुन घेतलेल्या नातेवाईकासोबतचा आमचा व्यवहार कसा असावा याविषयी कोणत्या इश्‍वरी सल्ल्याने आम्हास मार्गदर्शित करावे?

१४ तथापि, बहिष्कृत झालेला किंवा स्वतःला अलिप्त करुन घेणारा हा असा माणूस आहे जो घरचा यजमान नसून त्या घराशी संबंधित असणारा नातेवाईक आहे व तो दुसरीकडे राहतो, तेव्हा मात्र परिस्थिती वेगळी असते. अशा या नातेवाईकासोबत कोणताही संपर्क न राखणे हे शक्य आहे. जरी काही कुटुंबिय गोष्टीकरता जरुरीचा संपर्क आलाच तरीही तो या इश्‍वरी तत्वाच्या अनुषंगाने कमीत कमी राखला पाहिजेः “बंधु म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी [वा कोणा गंभीर पापाबद्दल दोषी] असला तर . . . त्याच्या पंक्‍तीसही बसू नये.”—१ करिंथकर ५:११.

१५. अशा प्रकरणात नातेवाईक आपल्या भावनांना कसा संयम घालू शकतात? (स्तोत्रसंहिता १५:१-५; मार्क १०:२९, ३०)

१५ कुटुंबाचे बंध व जिव्हाळा यामुळे हे बरेच जड जाईल हे समजण्याजोगे आहे. आजोबाआजींना आपल्या नातवंडाविषयी जिव्हाळा वाटतोच. तरीपण ही निष्ठावंतपणाची परिक्षाच आहे जे पान क्रमांक २१ वर ज्या भगिनीचे उदाहरण आहे त्यात दिसते. बहिष्कृत झालेल्या नातेवाईकाने जे दुःख व त्रास ओढावून आणला आहे तो कोणास जाणवत असल्यास त्याने कोरहच्या नातेवाईकांनी जे उदाहरण घालून दिले आहे त्यापासून समाधान व उत्तेजन मिळवावे.—स्तोत्रसंहिता ८४:१०-१२.b

न्यायालयाचा निकाल

१६-१८. आधी उल्लेखिलेल्या न्यायालयीन प्रकरणात कोणता निर्णय दिला गेला व त्याशिवाय न्यायालयाने आणखी कोणते मत मांडले?

१६ तुम्हाला त्या न्यायालयीन प्रकरणाचा निकाल जाणून घ्यावासा वाटेल जे त्या स्त्रीविषयीचे होते. तिने आपला विश्‍वासाचा त्याग केल्यावर किंवा तिने स्वतःला मंडळीतून अलिप्त केल्यानंतर तिचे पूर्वीचे मित्र तिच्याशी संभाषण करीत नाही असे दिसले तेव्हा ती बरीच विचलीत झाली होती.

१७ ते प्रकरण न्यायालयीन सुनावणीसाठी जाण्याआधी संयुक्‍त जिल्हा न्यायालयाने तिच्या विरुध्द निकाल दिला होता. हा निकाल, न्यायालये चर्चने केलेल्या कारवाईमध्ये पडत नाहीत या आधारावर देण्यात आला होता. या कारणास्तव त्या स्त्रीने अपील केले होते. अपीलाच्या संयुक्‍त न्यायालयानेc दिलेला निकाल (अमेरिकन घटनेच्या) पहिल्या दुरुस्ती विधेयकातील विस्तारित कारणांवर आधारलेला होता. त्यात म्हटले गेलेः “यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्‍वासात एखादी गोष्ट वर्ज्य करणे वा त्यापासून स्वतःला दूर ठेवणे ही चाल असल्यामुळे आम्हाला असे दिसते की अमेरिकेच्या घटनेतील ‘मुक्‍त अवलंबनाच्या’ तरतूदीनुसार . . . [तिच्या] दाव्याला प्रतिबंध लागतो. दूर राहणे किंवा टाळणे ही प्रतिवाद्याने स्विकारलेली भूमिका घटनेत बध्द आहे. या कारणास्तव आम्ही [जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्‌यास] आपली मान्यता देतो.”

१८ न्यायालयाने आपले मत मांडताना आणखी पुढे म्हटलेः “यहोवाच्या साक्षीदारांनी शास्त्रनियमांच्या प्रतिपादनानुसार दूर राहण्याची प्रथा स्विकारली आहे, आणि या शास्त्रनियमांवर त्यांनी काढलेल्या प्रतिपादनावर पुनर्प्रतिपादन करण्याचा आम्हाला अधिकार नाही. . . . प्रतिवाद्यांना आपल्या धार्मिक विश्‍वासाचा अंगीकार मुक्‍तपणे करण्याचा अधिकार आहे . . . कोणा चर्चमधील सदस्यांच्या (किंवा पूर्वीच्या सदस्यांच्या) आपसातल्या नातेसंबंधाची छाननी बहुधा न्यायालये करीत नाहीत. आपल्या सभासदांवर किंवा पूर्वीच्या सभासदांवर शिस्त बजावण्याची मुभा चर्चला आहे. आम्ही [अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी] न्यायाधीश जॅकसन यांच्या निर्वाळ्‌याशी सहमत आहोत, ज्यांनी म्हटले की, ‘एखाद्या विश्‍वासधारकाच्या सभासदांशी संलग्न असणाऱ्‍या सर्व धार्मिक हालचाली मुक्‍त—सर्वतोपरि मुक्‍त असल्या पाहिजेत.’ . . . (त्या स्त्रीने) ज्या चर्चच्या सभासदांचा त्याग केला त्यांनी हे ठरविले की यापुढे तिचा सहवास राखावयाचा नाही. अशी ही निवड करण्याची स्वतंत्रता त्यांना आहे असे आमचे मत आहे.”

१९, २०. मंडळीतून दूर करण्यात आलेल्या व्यक्‍तीला न्यायालयातर्फे नुकसान भरपाई का मिळविता येत नाही?

१९ अपीलाच्या न्यायालयाने हे दर्शविले की, आपले पूर्वीचे परिचित आपणासोबत संभाषण करीत नसल्यामुळे त्या स्त्रीला दुःख वाटत असले तरीही, “तिच्या या आकलन न होणाऱ्‍या वा भावनात्मक दुखापतीची नुकसान भरपाई ही यहोवाच्या साक्षीदारांवर धर्माचे मुक्‍त पालन करण्याच्या हक्कावर घटनेच्या बाहेर असणारा प्रतिबंध घालणारी गोष्ट ठरेल. . . . धर्माचे मुक्‍त पालन करण्याच्या गोष्टीस घटनेने जी हमी पुरविली आहे त्यानुसार [तिला] झालेल्या दुखापतीविषयी समाजाने सहानुभूति व्यक्‍त करावी हे उचित ठरेल. याकरवी सर्व नागरिकांना आपल्या इच्छेनुसारचा धर्म निवडण्याचा जो हक्क आहे त्याचे जतन होईल.” या देण्यात आलेल्या निर्वाळ्‌यास नंतर अधिक महत्व आले. ते कसे? कारण त्या स्त्रीने देशातील सर्वोच्च न्यायालयाकडे प्रकरणाच्या सुनावणीकरता याचिका करुन तिच्यावरील निर्णय उलटविण्याची शक्यता धरली. पण नोव्हेंबर १९८७ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारले.

२० अशाप्रकारे या महत्वपूर्ण प्रकरणाने हे निश्‍चित केले की कोणा बहिष्कृत झालेल्या वा स्वतः अलिप्त झालेल्या व्यक्‍तीला दूर केल्यामुळे वा दूर झाल्यामुळे न्यायालयातर्फे यहोवाच्या साक्षीदारांकडून नुकसान भरपाई मिळवता येणार नाही.d आम्ही देवाच्या वचनात वाचीत असलेल्या व अवलंबीत असलेल्या पूर्ण मार्गदर्शनास मंडळी पूर्ण रुपाचा प्रतिसाद देत असल्यामुळे ज्या व्यक्‍तीला आपले नुकसान झाले आहे असे वाटत असते ते त्याच्या वा तिच्या स्वतःच्या कृतीने ओढावून आणलेले असते.

शिस्त—अनेक फायदे

२१. बहिष्कृतपणाविषयी समतोल दृष्टीकोण राखण्याची का गरज आहे?

२१ बाहेरील लोकांस बहिष्कृत झालेल्या व आता ख्रिस्ती मंडळीच्या सभासदांसोबत बोलू न शकणाऱ्‍या अपराध्याविषयी ऐकून कदाचित सहानुभूति वाटू लागेल. पण अशी ही सहानुभूति चुकीची नाही का? यासाठीच त्या अपराध्याला तसेच इतरांनाही जे संभाव्य फायदे मंडळीने घेतलेल्या कृतीने होऊ शकतात ते विचारात घ्या.

२२, २३. बहिष्कृत झालेल्या लोकांविषयी असलेल्या आमच्या दृष्टीकोणात देवाची आज्ञा पाळण्याचे मोल व महत्व विवेचीत करा.

२२ उदाहरणार्थ पान २१ वर आम्ही लिनेटचे विवेचन वाचलेच आहे की तिने मार्गारेट या तिच्या बहिष्कृत झालेल्या बहिणीसोबत ‘असणारा हर प्रकारचा सहवास पूर्णपणे तोडून टाकला.’ तिने व तिच्या ख्रिस्ती नातेवाईकांनी ‘मानले की यहोवाचा मार्ग हा सर्वोत्तम आहे.’ आणि तो तसाच आहे!

२३ लिनेटच्या बहिणीने तिला नंतर म्हटलेः ‘तू ही बहिष्कृतपणाची हालचाल हलकी समजली असती तर मला आता जितक्या लवकरात लवकर मंडळीत परत येण्याची पावले घेता आली, ती घेता आली नसती. माझ्या प्रिय जनांपासून तसेच मंडळीतील माझ्या परिचितांपासून पूर्णपणे वेगळी पडल्यामुळे माझ्यामध्ये पश्‍चाताप व्यक्‍त करण्याची दृढ इच्छा निर्मिली गेली. मी घेतलेला मार्ग किती चुकीचा होता ते मला कळून आले तसेच यहोवाकडे पाठ फिरविणे हेही किती गंभीर आहे ते सुध्दा मला समजले.’

२४. एका भगिनीने बहिष्कृतपणाविषयी जो प्रतिसाद व्यक्‍त केला त्यामुळे तिच्यावर व इतरांवर कसा परिणाम घडला?

२४ दुसऱ्‍या एका प्रकरणात लॉरीच्या पालकांना बहिष्कृत करण्यात आले होते. तरी ती म्हणतेः ‘मी माझा त्यांच्यासोबतचा सहवास कमी केलाच नाही, उलट वाढविला. मग जसजसा वेळ गेला तसतशी मी अक्रियाक बनले. सभेलासुध्दा जाऊ नये एथपर्यंत मी आपली मजल नेली.’ मग तिने टेहळणी बुरुज याच्या जानेवारी व फेब्रुवारी १९८२ च्या अंकांत प्रसिध्द करण्यात आलेले साहित्य वाचले. त्यात करिंथकरांस पहिले पत्र ५:११-१३ आणि दुसरे योहान ९-११ यातील सूचनांवर भर देण्यात आला होता. ‘तेव्हा माझ्यावर जणू एक प्रकाशझोत चकाकला असे मला वाटते,’ असे ती लिहिते. ‘काही तरी बदल मी केलाच पाहिजे हे आता मला समजून आले. आता मला मत्तय १०:३४-३६ ची चांगली समज मिळाली. मी घेतलेला निर्णय कुटुंबासाठी सहजसोपा नव्हता कारण माझा पाच वर्षाचा एकुलता एक मुलगा होता जो माझ्या आईवडीलांचा खूपच लाडका होता.’ असा हा सहवास तोडल्यामुळे पालकांच्या अंतःकरणाला पाझर फुटेल अशी आशा धरता येईल. हेच मार्गारेटच्या पालकांच्या बाबतीत घडले गेले. यात जी शिस्त होती तिने लॉरीलासुध्दा सहाय्य मिळाले. ती म्हणतेः ‘आता मी परत क्षेत्रकार्यात जाते. बदलामुळे माझा विवाह, माझे कुटुंब आणि मी देखील आता दृढ बनले आहे.’

२५. देवाकडील शिस्तीविषयी मंडळीत परत घेण्यात आलेल्या एका व्यक्‍तीने कोणता दृष्टीकोण घेतला?

२५ तसेच जिला बहिष्कृत करण्यात आले होते व नंतर मंडळीत परत घेण्यात आले तिला काय वाटत होते तेहि विचारात घ्या. सँडीने लिहिलेः ‘दोष दाखविणे व बहिष्कृतपणा याविषयीच्या [वर नमूद असलेल्या] लेखाविषयी मी तुमचे खूप आभार मानते. यहोवा आपल्या लोकांवर प्रीती करतो म्हणूनच तो आपली संस्था शुध्द ठेवू इच्छितो याचा मला आनंद वाटतो. बाहेरच्या लोकांना हे निर्दयीपणाचे वाटत असले तरी ही जरुरीची व प्रेमळ गोष्ट आहे. आमचा स्वर्गीय पिता प्रेमळ व क्षमाशील देव आहे याविषयी मला थोर कृतज्ञता वाटते.’

२६. शिस्तीचा स्विकार केल्यामुळे कोणते नीतीमत्तेचे फळ मिळते? (स्तोत्रसंहिता ९४:१०, १२)

२६ अशाप्रकारे, पश्‍चाताप व्यक्‍त न करणाऱ्‍या अपराधी माणसाला मंडळीतून बहिष्कृत करण्यात यावे असे आमचा देव अपेक्षितो तरी याच पाप्याने पश्‍चाताप व्यक्‍त केला व तो मागे फिरला तर तो मंडळीत परत घेतला जाऊ शकतो असेहि तोच देव दाखवितो. (स्वतःस अलिप्त करुन घेतलेल्या व्यक्‍तीलाही मंडळीत परत यावयाचे आहे तर अशीच विनंति केली पाहिजे.) यानंतर त्याचे ख्रिस्तीजनांकडून सांत्वन केले जाण्यास हवे व त्यांनी त्याच्यावर आपली प्रीती दाखवावी. (२ करिंथकर २:५-११; ७:८-१३) होय, पौलाने लिहिले ते अगदी खरे होतेः “लावली जाणारी कोणतीहि शिस्त तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतीमत्व हे शांतीकारक फळ देते.”—इब्रीयांस १२:११.

[तळटीपा]

a  योहानाने येथे वापरलेल्या खाय’रो हा शब्द एक अभिवादन होता. (प्रे. कृत्ये १५:२३; मत्तय २८:९) त्याने (१३ व्या वचनात वापरलेला) आ.स्पा’झो-माय हा शब्द वापरला नाही, ज्याचा, “हातात हात घालणे, अशाप्रकारे भेटणे, स्वागत करणे,” असा अर्थ होतो व त्याद्वारे अगदीच उबदार भेट जसे की मिठी मारणे हाही भाव प्रगट होतो. (लूक १०:४; ११:४३; प्रे. कृत्ये २०:१, ३७; १ थेस्सलनीकाकर ५:२६) तद्वत, २ योहान ११ मध्ये देण्यात आलेले मार्गदर्शन तशाप्रकारच्या लोकांना नुसते “अहो” असे सुध्दा म्हणू नये हे सांगते.—पहा टेहळणी बुरुज, जून १९८६, पृष्ठ ३१.

b  कोणी नातेवाईक बहिष्कृत झाला असल्यास त्याविषयीच्या चर्चेबद्दल टेहळणी बुरुज फेब्रुवारी १, १९८२, पृष्ठे १८-२३ पहा.

c  ८१९ एफ २डी ८७५ (९वे सर्क्यु. १९८७)

d  जरी पुष्कळांनी आपली प्रकरणे कोर्टात नेली तरी कोणत्याही न्यायालयाला यहोवाच्या साक्षीदारांबद्दल, पवित्र शास्त्र आधाराला अनुसरुन असणाऱ्‍या त्यांच्या दूर करण्याच्या प्रथेला प्रतिकूल निवाडा देता आला नाही.

लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे

◻बहिष्कृतपणा हा शिस्तीचा एक प्रकार कोणत्या अर्थी असू शकतो?

◻एखाद्या ख्रिश्‍चनाची कोणा बहिष्कृत व्यक्‍तीसोबची वागणूक ही जगातील पाप्यांसोबतच्या वागणूकीपेक्षा का भिन्‍न असते?

◻कोणा नातेवाईकास जरी बहिष्कृत करण्यात आले तरी कोणते शास्त्रवचनीय मार्गदर्शन लक्षात ठेवण्यास हवे?

◻स्वतःस अलिप्त करुन घेतलेल्या एका व्यक्‍तीने न्यायालयात जे प्रकरण उभे केले त्याच्याविषयी अपील न्यायालयाने कोणता निवाडा दिला?

◻बहिष्कृतपणाबद्दल काहींनी जे व्यक्‍तीगत उद्‌गार काढले आहेत त्यावरुन आम्ही काय शिकतो?

[२१ पानावरील संक्षिप्त आशय]

“मार्गारेट [या माझ्या बहिष्कृत झालेल्या बहीणी] सोबतचा सर्व सहवास पूर्णपणे तोडून टाकणे हे आम्ही यहोवाच्या व्यवस्थेला जो निष्ठावंतपणा दाखवीत आहोत त्याला आव्हान देणारे ठरले. याकरवी, यहोवाचा मार्ग हाच सर्वोत्तम आहे हे खरेपणाने मानण्यास आमच्या कुटुंबाला संधि मिळाली.”—लिनेट.

[२५ पानावरील चौकट]

बहिष्कार—कोणता परिणाम?

प्रेषितांच्या काळालगत होणाऱ्‍या बहिष्कृतपणाचे प्राधान्य व परिणाम याविषयी एडवर्ड गिब्बोन या इंग्लीश इतिहासकारांनी लिहिलेः

“सर्वसाधारण मतांनी प्रस्थापित झालेल्या नियमांचा भंग करणाऱ्‍यास वा त्यांना नाकारणाऱ्‍या कोणास आपल्या वसाहतीतून व तेथे मिळत असलेल्या लाभापासून दूर करावे हा प्रत्येक समाजाचा निसंशये हक्क आहे. . . . अशा या बहिष्काराचे परिणाम शारीरिक व आध्यात्मिक स्वरुपाचे होते. ज्या ख्रिश्‍चनाविषयी हा बहिष्कार जाहीर होई त्याला विश्‍वासूजणांमध्ये कसलाही वाटा मिळत नव्हता. धार्मिक व खाजगी रुपाचे मित्रत्व संपुष्टात येत असे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा