मेद-पारस—पवित्र शास्त्र इतिहासातील चवथी मोठी जागतिक सत्ता
पवित्र शास्त्रात कथन केलेल्या अनेक घटनात मेद-पारस सामील होते. पवित्र शास्त्रातील अनेक भाकितात देखील त्यांचा उल्लेख आहे. प्राचीन काळच्या या चित्तवेधक लोकांबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळवाविशी वाटते का?
प्राचीन काळचे मेद-पारस युद्ध मोहिमेवर निघाले! त्यांच्या आघाडीस सम्राट कोरेश होता. हा आधीपासूनच एका साम्राज्याचे अधिपत्य आपणाकडे राखून होता. आता त्याने आपले लक्ष त्या काळातील प्रमुख जागतिक सत्ता, बलाढ्य बाबेल याजकडे वळवले.
बाबेलच्या राजधानीच्या शहरात बेलशस्सर राजा, पवित्र शास्त्र म्हणते त्याप्रमाणे, “द्राक्षारस पिऊन” आपल्या एक हजार सरदारांसोबत मेजवानीत मग्न होता. हे सर्व यहोवाच्या मंदिरातून लुटून आणलेल्या पवित्र पात्रातून मोठ्या चैनीने द्राक्षारस पीत होते आणि आपल्या दैवतांच्या मूर्तीसमोर त्यांची प्रशंसा करीत होते. (दानीएल ५:१-४) बाबेलच्या भक्कम वेशीच्या आत सुरक्षित असल्याचे त्यांना वाटत होते.
तथापि, बाहेर कोरेशच्या लष्कराने बाबेलमधून वाहणाऱ्या फरात नदीच्या पात्रास भिन्न दिशेला वळविले. यामुळे जो नैसर्गिक अडथळा होता तो दूर झाला आणि त्याचे सैन्य नदीच्या पात्रातून चिखल तुडवीत नदीसमोर असणाऱ्या उघड्या दरवाजातून प्रवेश करुन थेट शहरात पोहंचले. सूर्य उगवण्याआधीच बेलशस्सर मारला गेला, बाबेल पडले आणि मेद-पारस ही पवित्र शास्त्र इतिहासातील चवथी बलाढ्य जागतिक सत्ता बनली. पण हे मेद-पारस कोण होते?
मेद हे अश्शूरच्या पूर्वेकडील डोंगराळ भागातील पठारातील होते. अश्शुरच्या काही चित्रात हे दिसतात, ज्यात सैनिक वापरतात तसा तंग सदरा घालून त्यावर मेंढरांच्या कातड्याचा कोट घालीत. पायात घोट्यापर्यंतच्या लेसची मोठी पादत्राणे असावयाची, कारण त्यांच्या पठारी माळवदावर धनगराच्या कामास हा पोषाख अगदी योग्य होता. मेदांनी तसा आपला काहीच हस्तलिखित इतिहास मागे सोडला नाही. आपल्याला यांच्याविषयी जे काही शिकायला मिळते ते, पवित्र शास्त्र, अश्शुरचे लिखाण व ग्रीकच्या महशूर इतिहासकारांच्या नोंदी यामधून समजते. पारसी लोक मुळात पर्शियन खाडीच्या उत्तरेकडील भागात भटके जीवन कंठीत होते. त्यांचे साम्राज्य भरभराटीस लागले तेव्हा त्यांची सांस्कृतिक पसंती, ऐषाराम व विलास या गोष्टीही फारच वेगाने बदलत गेल्या.
सुरवातीला मेदांचे वर्चस्व होते, पण इ.स.पूर्वी ५५० मध्ये पारसाचा बलवान कोरेश याने मेदचा राजा अस्त्यागजवर वेगवान विजय मिळविला. कोरेशने दोन्ही जमातीच्या लोकांच्या संस्कृतीचे व नियमांचे मिश्रण केले; त्यांची राज्ये एकमेकांना जोडली व त्यांच्या आक्रमक मोहिमांचा व्याप वाढवला. मेद पारसाच्या अंकित होते तरी ते साम्राज्य दुहेरी सत्तेच्या रुपाने चाले. मेदी सर्व उच्च अधिकृत पदे सांभाळीत व पारसांच्या लष्करांचेही नेतृत्व करीत. विदेशी लोक त्यांना मेद-पारस असे म्हणत; किंवा त्यातील एखादी संज्ञा वापरायची असली तर नुसते “मेदी” म्हणत.
मेद व पारसने बाबेलवर हल्ला करण्याआधी दानीएल संदेष्ट्यास या द्वयी राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन शिंगाच्या एडक्याचा दृष्टांत देण्यात आला. दानीएलाने नमूद केलेः “ती दोन्ही शिंगे मोठाली होती. त्यातले एक दुसऱ्याहून मोठे असून मागाहून निघाले होते.” या एडक्याच्या ओळखीबद्दल कोणताच संशय नव्हता, कारण देवदूताने दानीएलास सांगितलेः “दाने शिंगे असलेला एडका तू पाहिला; ते मेदय व पारस यांचे राजे.”—दानीएल ८:३, २०.
बाबेल पडले तेव्हा दानीएल शहरात होता आणि त्याने मेद व पारस यांचे आगमन प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले. दारयावेश मेदी हा नव्यानेच पादाक्रांत केलेल्या नगराचा पहिला राजा झाला. त्याने १२० प्रांताधिकाऱ्याची नेमणूक केली व त्यांजवर तीन अध्यक्ष नेमले. दानीएल हा त्या तिघांपैकी एक होता. (दानीएल ५:३०-६:३) बाबेल पडण्याआधी व त्यानंतर दानीएलास असणारा उच्च पदाधिकार लक्षात घेता, दोन शतकांआधी जो इब्री भविष्यवाद देण्यात आला होता की, बाबेल हे कोरेश नामे गृहस्थाकरवी पादाक्रांत केले जाईल, त्याविषयीची माहिती कोरेशपर्यंत पोहंचली गेली नसेल अशी कल्पनादेखील करता येणार नाही.—यशया ४५:१-३.
यरुशलेमाची पुनर्स्थापना झाली
बाबेलच्या पतनामुळे आणखी एका शहराचे उत्थान होण्यास संधि मिळाली. ते शहर यरुशलेम होते. बाबेलने यरुशलेमाचा इ.स.पू. ६०७ मध्ये नाश केल्यापासून सुमारे ७० वर्षे ते ओसाड अवस्थेत पडून होते. पवित्र शास्त्रातील भविष्यवादांनी म्हटले होते की, कोरेशकरवी यरुशलेमाची परत उभारणी केली जाईल व मंदिराचा पाया घालण्यात येईल.—यशया ४४:२८.
हे असेच घडले का? होय. एज्रा या याजक, प्रामाण्य आणि लेखकाने आपल्या अहवालात म्हटले की, कोरेशने एक जाहीरनामा काढून त्यात म्हटले की, यहोवाच्या भक्तांनी “यरुशलेमास जाऊन इस्राएलाचा देव यहोवा याचे मंदिर बांधावे. यरुशलेमेत जो आहे तोच खरा देव होय.” (एज्रा १:३) सुमारे ५०,००० लोकांनी चार महिन्यांचा परतीचा प्रवास करुन ते यरुशलेमास परतले व त्यांनी आपणासोबत मंदिर भांडारातील मौल्यवान वस्तुदेखील आणल्या. यरुशलेम पडले त्याच्या ७० वर्षांनी म्हणजे इ.स.पू. ५३७ मध्ये देशात परत लोकवस्ती होण्यास सुरवात झाली.—यिर्मया २५:११, १२; २९:१०.
अशाप्रकारचा जाहीरनामा हा कोरेशच्या राजनीतीचाच भाग होता हे पुराणवस्तु संशोधकांनी शाबीत केले आहे. बाबेलच्या भग्न अवशेषात त्यांना एक चिकनमातीचा स्तंभ सापडला, त्यावरील लेखात कोरेशने म्हटले होतेः “मी (या सर्वांना) पवित्र शहरात पाठविले. . . . तेथील पवित्रस्थाने व तेथे अस्तित्वात असणाऱ्या प्रतिमा बऱ्याच काळ भग्नावस्थेत पडून आहेत. मी त्यांच्यासाठी एक कायमचे पवित्रस्थान स्थापिले. (याशिवाय) मी तेथील रहिवाशांना एकत्र केले व त्यांना (त्यांच्या) वसाहती परत दिल्या.”
यहुद्यांचे शत्रू शोमरोन्यांनी काही काळानंतर मंदिर पुर्नउभारणीच्या कामावर बादशाही फर्मानाकरवी बंदी घातली. पण हाग्गय व जखर्या या यहोवाच्या संदेष्ट्यांनी लोकांना चेतविले आणि बांधणीकामाला परत सुरवात झाली. “दारयावेश राजाने” मंदीर पुनर्स्थापनेचा अधिकृत हुकुम असणारा कोरेशचा मूळ जाहीरनामा शोधून काढण्याचे फर्मान काढले. पवित्र शास्त्र म्हणते की, कोरेशचे उन्हाळी विश्रामस्थान जेथे होते त्या अखमथा नगरात एक गुंडाळी सापडली, त्यामध्ये मंदिर बांधकामाचा तपशील व अधिकृत परवानगी होती. हे बांधकाम पारसाचा राजा दारयावेश पहिला याच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी पूर्ण झाले.—एज्रा ४:४-७, २१; ६:१-१५.
वैभवाचे पुरावे
आधी उल्लेखिलेल्या दृष्टांतात दानीएलाने पाहिले होते की, मेद-पारसाचा दोन शिंगे असलेला “एडका पश्चिमेस, उत्तरेस व दक्षिणेस धडका मारीत आहे. . . . कोणी पशु [इतर राष्ट्रे] त्यासमोर उभा राहीना व त्याच्या तडाख्यातून सोडवावयाचे कोणास सामर्थ्य नव्हते. तो आपल्या मनास येई तसे करी, असा तो प्रबल झाला.” (दानीएल ८:४) निदान दारयावेश राजाच्या काळापर्यंत हा दृष्टांत पूर्ण झाला असे म्हणता येईल. त्याच्या पराक्रमाविषयीची साक्ष, बाबेल व अखमाथा यांच्यामधील जुन्या रस्त्यावर बिसिटून येथे दिसत असलेला मोठया सुळक्यावरील स्तंभात महान दारयावेशचे लिखाण सापडते त्यात मिळते. बाबेलवर विजय मिळविण्यासोबत मेद-पारस “एडक्या”ने तीन दिशेकडील क्षेत्र काबीज केलेः उत्तरेकडे अश्शुरपर्यंत, पश्चिमेकडे आशिया मायनर आणि दक्षिणेकडे मिसरपर्यंत.
अखमाथा या उन्हाळी विश्रामास्थानाच्या जवळजवळ ४०० मैल आग्नेय दिशेला पर्सेपोलीस येथे पारसाच्या राजांनी एक अतिभव्य राजवाडा बांधला. एका शिलाचित्रात दारयावेश आपल्या सिंहासनावर बसलेला दिसतो आणि खाली दिलेल्या लेखात तो मोठ्या गर्वाने सांगतोः “मी दारयावेश, महान राजा, राजांचा राजा व सर्व देशांचा राजा . . . याने हा राजवाडा बांधला आहे.” या राजवाड्याचे काही अवशिष्ट भाग अद्याप आपल्या जागी उभे आहेत. दुसरे राजधानीचे शहर सुसा (शुशन) होते, जे बाबेल, अखमाथा आणि पर्सेपोलीस यांच्या मध्यावर वसविले होते. येथेही महान दारयावेश राजाने आणखी एक भव्य महाल उभारला.
दारयावेशनंतर त्याचा मुलगा झरक्सीझ राजा बनला. हा पवित्र शास्त्रातील एस्तेर पुस्तकात “अहश्वेरोश” या नावाने उल्लेखित आहे. त्यात म्हटले आहेत की, या अहश्वेरोशाचे “साम्राज्य हिंदुस्तानापासून कुशापर्यंत होते. ज्याचा अंमल एकशे सत्तावीस प्रांतावर होता.” तो “शुशन राजवाड्यातील आपल्या सिंहासनावर” बसून राज्य करी. येथेच या अहश्वेरोशने एस्तेर या तरुण सौंदर्यवतीला आपली राणी बनविले. (एस्तेर १:१, २; २:१७) पॅरीस येथील लोव्हरी वस्तुसंग्रालयात आपल्याला या महालाच्या उंच बुरुजावर एक सजविलेला बैल तसेच धनुर्धारी पारसी गर्वाने उभा असल्याचे तसेच सभोवताली अनेक सजविलेली जनावरे उभी असल्याचे दृश्य बघायला मिळते. पांढऱ्या दगडावर खोदकाम केलेल्या मूर्त्या, जडजवाहिरे आणि इतर मौल्यवान वस्तु तेथे पाहिल्यावर, पवित्र शास्त्रात, एस्तेरला आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी जी प्रचंड सौंदर्यप्रसाधने पुरविण्यात आली होती ते, तसेच शुशन राजवाड्यातील ऐषारामाचे जे वर्णन मिळते ते खरे असल्याचे कळते.—एस्तेर १:७; २:९, १२, १३.
या झरक्सीझच्या ग्रीक द्वेष्ट्यांनी काही आख्यायिका पसरविल्या होत्या ज्यात वैवाहिक अडचणी आणि पारसाचा राजावर त्याच्या विशिष्ट राजदरबाऱ्यांमार्फत प्राबल्य घडत आहे अशा गोष्टींचा समावेश होता. या आख्यायिकांमुळे वस्तुस्थिती गोंधळविली असेल वा ती विपरीत केली असेल तरी त्या कहाण्यामुळे एस्तेर पुस्तकातील काही मूलभूत मुद्दे स्पष्ट होण्यास मदत मिळते, जसे की, गर्विष्ठ वश्ती राणीला राजाने पदभ्रष्ट करुन तिच्याजागी एस्तेरला का घेतले तसेच एस्तेरचा चुलता मर्दखय हा राज्यात उच्चपदापर्यंत का पोहंचला.—एस्तेर १:१२, १९; २:१७; १०:३.
यहोवाच्या भक्तांना मनमिळाऊपणा दाखविला
इ.स.पू. ४६८ मध्ये झरक्सीझच्या जागी अर्तहशश्त (लाँगीमेनस) राजा झाला व त्याने अधिकृत याजक एज्राला, जो कोरेशने यहुद्यांची सुटका केल्यावर बाबेलातच राहात होता त्याला, यरुशलेमात जाऊन तेथे यहोवाच्या शुद्ध भक्तीला चालना द्यावी म्हणून अधिकार पत्र देऊन रवाना केले. सुमारे १,५०० पुरुष व त्यांचे कुटुंबिय म्हणजे सुमारे ६,००० माणसे एज्रासोबत गेली व त्यांनी आपणासोबत यहोवाच्या मंदिराकरता अनेक मोठी दाने नेली.—एज्रा ७:१, ६, ११-२६.
तसेच शूशन महालात याच अर्तहशश्तने त्याच्या कारकीर्दीच्या २० व्या वर्षी (इ.स.पू. ४५५) नेहम्याची विनंति मान्य केली की त्याला परत यरुशलेमास जाऊन त्याच्या वेशीची व नगराची डागडुजी करण्यास परत पाठवावे. अशाप्रकारे दानीएलाकरवी जो “सत्तर सप्तके” वर्षांचा भविष्यवाद दिला होता त्याची सुरवात झाली, जो येशूचा “मसीहा, अधिपती” या नात्याचे पदार्पण इ.स. २९ मध्ये अगदी बिनचूकपणे वेळेवर होण्याकडे अंगूली दर्शवित होता.a—दानीएल ९:२४, २५; नेहम्या १:१; २:१-९.
अरेमिक भाषेत पपायरसवर लिहिलेली काही कागदपत्रे, मिसरच्या नाईल नदीच्या किनाऱ्यावर एलीफंटाईन बेटावर सापडली. या कागदपत्रात, पवित्र शास्त्र लेखक एज्रा व नेहम्या यांनी पर्शियन कारकीर्दीचे जे वर्णन केले आहे ते अगदी बिनचूक असल्याचे आढळले. बिब्लिकल आर्किऑलॉजी या ग्रंथात प्राध्यापक जी. अरनेस्ट म्हणतातः “आता . . . आम्हास पूर्ण कळले की एज्राच्या दिवसातील अरेमिक भाषा ही केवळ त्या काळाची भाषा होती व तीच सरकारी कागदपत्रे सर्वसाधारणपणे पर्शियन कारकिर्दीशी संबंधीत होती.” शाही पारसाच्या एका दस्तऐवजात मिसरमधील यहुदी वसाहतीस वल्हांडण सण वेळेवर साजरा करण्याचा पर्शियन हुकुम होता.
मेद-पारस ग्रीससमोर नमतात
दानीएलाने दृष्टांतात, मेद-पारस यांचे प्रतिनिधित्व दोन शिंगे असलेला एडका करीत असल्याचे पाहिले. पुढे त्याने जे पाहिले ते घडण्याच्या दोन शतके आधीच नमूद करुन ठेवले की, “पश्चिम दिशेकडून (सूर्य मावळतीकडून) एक बकरा” आला. तो एवढ्या वेगाने आक्रमन करीत होता की, “त्याने जमिनीस पाय लाविला नाही.” या वेगवान बकऱ्याने “त्या एडक्यास धडक मारली व त्याची दोन्ही शिंगे मोडून टाकिली. त्याच्यापुढे टिकाव धरण्याची त्या एडक्याला शक्ती नव्हती.” (दानीएल ८:५-७) हेच मेद-पारसाचे झाले अशी ग्वाही इतिहास देतो का?
होय, इ.स.पू. ३३४ मध्ये थोर सिकंदर ग्रीसमधून बाहेर पडला व त्याने आपला मार्ग पश्चिमेकडे आक्रमला. एखादा बकरा जसा चपळाईने विजेच्या वेगात धावतो तसेच भरधाव सुटून त्याने आशियातील पर्शियन अधिपत्यावर एकामागून एक विजय मिळविले. सरतेशवटी इ.स.पूर्वी ३३१ मध्ये गाऊगामेला येथे त्याने पर्शियाच्या लाखो सैन्याला उधळले. त्यांचा नेता दारयावेश तिसरा पळून गेला, पण नंतर लवकरच त्याचा त्याच्याच मित्रांनी वध केला. चवथी जागतिक सत्ता पडली, तिची शिंगे मोडण्यात आली आणि सिकंदरचे साम्राज्य पवित्र शास्त्रातील पाचवी जागतिक सत्ता बनले. त्याची चर्चा नोव्हेंबर १, १९८९ च्या अंकात केली जाईल.
मेद-पारसाची जागतिक सत्ता सुमारे दोनशे वर्षे चालली—बाबेलास इ.स.पू. ५३९ मधील त्या रात्री उलटविल्यानंतर सिकंदरने ते पाडीपर्यंत. हा कालावधी तेवढ्याच लांब मुदतीचा आहे, ज्यात फ्रेंच यादवी घडली आणि अमेरिकन राज्याची स्थापना झाली. तसे पाहता, तुलनात्मक अगदी कमी दिसणाऱ्या या काळातच, जरी हेतुपुरस्सर नव्हते तरी मेद-पारस यांचा यहोवा देवाच्या संकल्पित योजनांशी बराच संबंध आला. शिवाय याकरवीच त्याच्या अनेक निश्चित भविष्यवादांची परिपूर्तीही झाली.
[तळटीपा]
a या भविष्यवादाची व त्याच्या पूर्णतेची अधिक माहिती “तुझे राज्य येवो” या वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात पृष्ठ ५६-६६ पर्यंत मिळेल.
[२९ पानांवरील नकाशा]
[For fully formatted text, see publication]
मेद-पारसाचे साम्राज्य
यरुशलेम
बाबेल
अखमथा
सुसा (शुशन)
पर्सेपोलीस
मिसर
हिंदुस्तान
[चित्रं]
पर्शियाची सांप्रदायिक राजधानी पर्सेपोलीस याचे अवशेष
[पानांवरील चित्रं ३२]
इराणमधील कोरेशचे थडगे