दारयावेश—न्यायबुद्धी असलेला राजा
आपण केलेल्या बांधकाम प्रकल्पांविषयी एका ख्यातनाम राजाने अशी बढाई मारली: “बॅबिलोनच्या सीमेच्या पूर्वेस मी एक मजबूत भिंत उभी केली. मी एक खंदक खोदले . . . डोंगराला जसं हलवता येणार नाही तशी आशुपाल आणि वीटांची मी एक उंचपुरी भिंत बांधली.” होय, बॅबिलोनच्या नबुखद्नेस्सर राजाने एक मोठा बांधकाम प्रकल्प हाती घेतला होता आणि आपल्या साम्राज्याच्या राजधानीची तटबंदी करण्याकरता बरेच कष्ट घेतले होते. परंतु त्याने विचार केला होता तितके बॅबिलोनचे शहर अजिंक्य ठरले नाही.
सा.यु.पू. ५३९ ऑक्टोबर ५, रोजी जे घडले त्यावरून हे सिद्ध झाले. पर्शियाचा राजा कोरेश दुसरा याने मेदी सैन्यासह बॅबिलोनवर चाल करून त्यावर विजय मिळवला आणि त्याचा खास्दी शासक बेलशस्सर याचा वध केला. विजय मिळवलेल्या या नव्या शहरावर आता कोण पहिला शासक होणार? शहराचा पाडाव झाला तेव्हा शहरताच असलेल्या देवाच्या संदेष्ट्याने अर्थात दानीएलाने लिहिले: “दारयावेश मेदी हा सुमारे बासष्ट वर्षांचा असता राज्यपदारूढ झाला.”—दानीएल ५:३०, ३१.
दारयावेश कोण होता? तो कोणत्या प्रकारचा शासक ठरला? त्याने ७० पेक्षा अधिक वर्षांपासून बॅबिलोनमध्ये कैदेत असलेल्या संदेष्टा दानीएलास कसे वागवले?
अर्धवट इतिहास असलेला राजा
दारयावेश या मेदी राजाची ऐतिहासिक माहिती अर्धवटच आहे. मेद्यांनी जवळजवळ काहीच लिखित नोंद ठेवली नाही. शिवाय, मध्यपूर्वेत खणून काढलेले हजारोहजार कीलाकार लेख अर्धवट माहिती देतात. इतर टिकून राहिलेली प्राचीन लौकिक लिखाणे बोटावर मोजण्याइतकीच आहेत आणि दारयावेशाचा इतिहास व या लिखाणांमध्ये शंभरअधिक वर्षांचा फरक आहे.
तरीसुद्धा पुरावा सुचवतो, की मेदची राजधानी इक्बाटानावर विजय मिळवल्यानंतर पर्शियाचा राजा कोरेश दुसरा याने मेद्यांचा विश्वास जिंकला. तेव्हापासून मेद आणि पर्शियन लोकांनी त्याच्या नेतृत्त्वाखाली एकत्र युद्धे लढली. त्यांच्या संबंधाविषयी, मेद आणि पर्शियन (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात रॉबर्ट कॉलीन्स म्हणतात: “मेद आणि पर्शियन लोकांमध्ये काहीच भेदभाव नव्हता. राज्यात त्यांना सर्रासपणे मोठी पदे देण्यात येई व पर्शियन सैन्यात नेतृत्वाची जागा दिली जाई. विदेशी लोक, मेदी आणि पर्शियन लोकांचा उल्लेख करत तेव्हा, कब्जा केलेले व विजय मिळवलेले असा काहीच फरक करीत नसत.” अशाप्रकारे मेद आणि पर्शिया एकमेकांत इतके मिसळून गेले, की त्यांचे मेदो-पर्शियन साम्राज्यच तयार झाले.—दानीएल ५:२८; ८:३, ४, २०.
बॅबिलोनला धुळीस मिळवण्यात मेद्यांचा सिंहाचा वाटा होता हे मात्र निश्चित आहे. “मेदी वंशातला अहश्वेरोशाचा पुत्र दारयावेश” मेदो-पर्शियन साम्राज्याचा पहिला शासक असल्याचे शास्त्रवचने आपल्याला सांगतात—यात तेव्हा बॅबिलोनचा देखील समावेश होता. (दानीएल ९:१) त्याला “मेदी व पारसी यांच्या कधी न पालटणाऱ्या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे” कायदे स्थापित करण्याचा अधिकार होता. (दानीएल ६:८) बायबल दारयावेशबद्दल जे काही सांगते त्यावरून आपल्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे ओझरते दर्शन होते आणि त्याच्याबद्दलच्या अर्धवट लौकिक माहितीमागचे संबंधित कारणही मिळते.
दानीएलावर मर्जी येते
बॅबिलोनची सत्ता हाती घेतल्यावर लागलीच दारयावेशने “आपल्या सर्व साम्राज्यात एकशेवीस प्रांताधिकारी नेमिले; “त्यांजवर तीन अध्यक्ष नेमिले, दानीएल त्यांपैकी एक होता,” असे बायबल म्हणते. (दानीएल ६:१, २) परंतु, इतर अधिकाऱ्यांना दानीएलाचे हे उच्च पद पाहवत नव्हते. त्याच्या इमानदारीमुळे भ्रष्टाचाराला नक्कीच आळा बसला असावा आणि यामुळे त्यांना त्याचा राग आला असावा. उच्च अधिकाऱ्यांना त्याचा हेवा देखील वाटत असावा कारण दानीएलावर राजाची मर्जी होती आणि त्याला मुख्य मंत्री करण्याचा त्याचा विचार होता.
हे असे घडू नये म्हणून दोन अध्यक्षांनी व प्रांताधिकाऱ्यांनी कायद्याचा आधार घेऊन एक सापळा रचला. ते राजाकडे गेले आणि ३० दिवसांपर्यंत दारयावेश याच्या व्यतिरिक्त “कोणाहि देवाची अथवा मानवाची आराधना” करायची नाही असा हुकूम असलेल्या फर्मानावर त्याची सही मागितली. त्यांनी सुचवले, की जो कोणी या हुकूमाचा भंग करील त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे. हा हुकूम सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या संमतीने निघाला आहे व राजाच्या प्रती त्यांच्या एकनिष्ठेची ती एक अभिव्यक्ती आहे असे दारयावेशला भासवण्यात आले.—दानीएल ६:१-३, ६-८.
दारयावेशने फर्मानावर सही केली आणि आपण काय केले ते त्याला कळले. दानीएलच पहिला होता ज्याने फर्मानाचा भंग केला, कारण त्याने यहोवा देवाला प्रार्थना करण्याचे सोडले नाही. (पडताळा प्रेषितांची कृत्ये ५:२९.) कधी न पालटणाऱ्या या कायद्यातून दानीएलाला सोडवण्याचा राजाने बराच प्रयत्न करूनही विश्वासू दानीएलास सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. दानीएलाला वाचवण्याचे त्याच्या देवाकडे सामर्थ्य आहे असा भरवसा दारयावेशाने बोलून दाखवला.—दानीएल ६:९-१७.
रात्रीपासून उपाशी असलेल्या दारयावेशाला पहाट कधी होते असे झाले होते; तो लगबगीने गुहेकडे गेला. आणि पाहतो तो काय, दानीएल जिवंत होता, त्याला कसलीही हानी झाली नव्हती! दानीएलवर आरोप करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सिंहांच्या गुहेत टाकण्याद्वारे राजाने उचित न्याय दाखवला. राजाने असे फर्मान काढले, की “माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानीएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे.”—दानीएल ६:१८-२७.
स्पष्टतः, दारयावेशाने दानीएलाच्या देवाचा आणि धर्माचा आदर केला व अन्याय दूर करण्यास तो उत्सुक होता. पण, दानीएलावर आरोप करणाऱ्यांना शिक्षा दिल्याने उरलेल्या अध्यक्षकांशी त्याला वैर पत्करावे लागले. शिवाय, ‘दानीएलाच्या देवाचे भय’ बाळगण्याविषयी दारयावेशाने दिलेल्या आदेशामुळे बॅबिलोनचे धर्मपुढारी चांगलेच भडकले असावेत. या सर्व गोष्टींचा शास्त्र्यांवरसुद्धा नक्कीच प्रभाव पडला असणार म्हणूनच दारयावेशाविषयी लौकिक अहवालात त्यांनी फेरफार केले असतील तर त्यात नवल करण्यासारखे काही नाही. पण, दानीएलाच्या पुस्तकातील संक्षिप्त वृत्तान्त आपल्यासमोर दारयावेशाचे प्रामाणिक व न्यायी शासक असे चित्र उभे करतो.