निर्दयी अश्शुर दुसरे प्रबळ जागतिक साम्राज्य
प्राचीन अश्शूरी राजांच्या राजवाड्यांचे भूगर्भसंशोधकांनी केलेल्या उत्खननामुळे पवित्र शास्त्रातील इतिहासाच्या अचूकतेविषयीचा तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. हे संशोधन पवित्र शास्त्राच्या इतिहासाविषयी काय प्रगट करते आणि याचा तुम्हासाठी काय अर्थ होऊ शकतो?
अश्शुरी लोक बरेच क्रुद्ध व युद्धपिपासू लोक होते. त्यांनी आपले व्याप्त व कठोर साम्राज्य आपल्या स्वगृहाकडून मेसोपोटेमियाच्या तळवटीवरील उत्तरेपर्यंत विस्तारले होते. यांचा पवित्र शास्त्रात पुष्कळ वेळा उल्लेख आला व त्यात ते यहुदा व इस्राएलांचे शत्रु असल्याचे दाखविण्यात आले आहे.
या प्राचीन लोकांविषयी अधिक माहिती करुन घेतल्यामुळे पवित्र शास्त्र जे म्हणते ते समजण्यास आम्हाला निश्चितच मदत मिळेल. अश्शुरचा स्वतःचा अहवाल देखील पवित्र शास्त्र इतिहास व भविष्यवादांना पुष्टी देणारा आहे. पण या अश्शुरी लोकांचा उद्भव कसा झाला?
मोठ्या पापण्या व दाढ्या असणारे हे लोक नोहाचा पुतण्या अश्शुर याचे वंशज होत. खरे म्हणजे या इब्री शब्दाचा “अश्शुर” व “अश्शुरी” असाही अर्थ होतो. पवित्र शास्त्रात “यहोवाविरुद्ध बलवान पारधी” याप्रकारे ख्यातनाम असणारा निम्रोद याने निनवे आणि कालह ही शहरे वसविली. ही दोन शहरे व सोबत अश्शुर व खोर्साबाद नंतर अश्शुरी साम्राज्याच्या राजधान्या झाल्या.—उत्पत्ती १०:८-१२, २२.
नहूमच्या पुस्तकाचा आरंभ असा आहेः अश्शुरची राजधानी “निनवेविषयीची देववाणी.” ती का? कारण संदेष्टा नहूम याने नंतर म्हटले की, निनवे “रक्तपाती नगरी, कपट व खून यांनी भरली आहे.” (नहूम १:१; ३:१) तो ही अतिशयोक्ती करीत होता का? मुळीच नाही!
क्रुरपणा ही अश्शुरी लोकांची निरुपम ख्याति होती. त्यांच्या मोठमोठ्या राजवाड्यांतील चित्रे त्यांना लुटमार, एकामागून एक शहरे जाळपोळ व नासधूस करणारे असल्याचे चित्रित करतात. त्यांच्या अश्शुरनसीरपाल या राजाने सबंध खांब शत्रुंच्या कातडीने भरून टाकल्याचे मोठ्या गर्वाने म्हटले होते. तो म्हणतोः “यापैकीच्या पुष्कळ बंदिवानांना तर मी आगीत जाळले. . . . मी काहींचे नाक, काहींचे कान व बोटे कापून काढले; पुष्कळांचे डोळे फोडले. मी जिवंतांचा एक खांब रचला तर दुसरा नुसत्या डोक्यांचा रचला.”
धार्मिक प्रभाव
हो, हे लोक खूपच धार्मिक होते. प्राचीन अश्शुरी लोकांविषयी असे म्हणण्यात आलेः “लढाया करणे हा राष्ट्राचा उद्योग होता आणि याजक युद्धाला अविश्रांत चेतवीत होते. यांना विजयातील लूटीचा सहभाग मिळे. . . . ही धुळधाणीची शर्यत अधिकाधिक धार्मिक स्वरुपाची होती.”—एन्शंट सिटीज्, लेखक डब्ल्यु. बी. राईट, पृष्ठ २५.
अश्शुरने आपला धर्म बाबेलपासून उचलला. द इलस्ट्रेटेड बायबल डिक्शनरी म्हणतेः “बहुतेक प्रकारात अश्शुरी धर्म बाबेलोनियाच्या धर्मापासून किंचित वेगळा होता; तो तेथूनच त्याने आरंभिला.” लंडनमधील ब्रिटीश संग्रहालयात असणारा एक अश्शुरी शिक्का त्याच्या राष्ट्रीय देव अश्शुर तीन डोके असल्याचे दाखवितो. उपासनेत तीन देवांचे त्रेक्य हा विश्वास सर्वसाधारण होता. यास्तव त्यांच्या क्रुर व हिंसाचाराच्या अहवालामुळेच पवित्र शास्त्र संदेष्टा नहूम याने जे लिहिले की, खरा देव यहोवा हा अश्शुरांचा “सूड घेणारा व क्रोधाविष्ट आहे” ते नवलाईचे नव्हते.—नहूम १:२.
निनवे पडले तेव्हा त्याचा इतका विध्वंस झाला की काही शतके त्याचे ठिकाणही विसरले गेले. काही टिकाकारांनी पवित्र शास्त्राविषयी टिका करुन म्हटले की हे शहर अस्तित्वातच नव्हते. पण ते तर होते! ते पुन्हा शोधून काढण्यात आले आणि तेथे भूगर्भसंशोधकांना जे आढळले ते मोठे चित्तथरारक होते!
मोठे राजवाडे शोधून काढले गेले
१८४३ मध्ये परराष्ट्रातील सरकारी प्रतिनिधि पॉल एमिल बोट्टा यांनी खोर्साबाद येथे उत्खनन केले. त्यांना वाटले की ते प्राचीन निनवे आहे. पण उलटपक्षी त्यांना पवित्र शास्त्रात यशया २०:१ मध्ये ज्याचा उल्लेख आहे त्या “अश्शुर देशाचा राजा सर्गोन” याचे भव्य राजवाडे आढळले. पवित्र शास्त्रात राजाविषयीचा हा केवळ एकच प्राचीन उल्लेख म्हणून टिकाकारांनी पवित्र शास्त्र चुकीचे असल्याचे प्रतिपादित केले. पण सर्गोन तर अस्तित्वात होता, आणि आता उत्खनन करणाऱ्यांना त्याचा २०० खोल्या असणारा राजवाडा तसेच शिलालेख व इतर गोष्टींचा अप्रतिम खजिना मिळाला होता. यात सर्गोनच्या बखरीही आहेत त्यात अश्शुरी दृष्टीकोनातून असणाऱ्या घटना आहेत ज्या पवित्र शास्त्रातील घटनांना पुष्टी देतात. १९ व्या शतकाच्या मध्यापासून सर्गोन हा अश्शुरी राजा, जरी त्याच्याविषयी असणारी माहिती अपूर्ण आहे तरी मशहुर झाला आहे.
यानंतर १८४७ मध्ये खोर्साबादपासून नैऋत्येकडे १२ मैलावर असणाऱ्या निनवेमधील सन्हेरीबचा राजवाडा ऑस्टीन हेन्री लेयार्ड यांनी शोधून काढला. हा तोच सन्हेरीब आहे ज्याने यरुशलेमाचा अगदी हिंसकपणे विरोध केला होता व याचाच पवित्र शास्त्रात १३ वेळेला नावाने उल्लेख आहे. त्याच्या या राजवाड्याच्या ७१ खोल्या लेयार्ड यांनी शोधल्या. हा राजवाडा युद्धे, विजय आणि धार्मिक विधि यांच्या चित्रांनी भव्यपणे सुशोभित होता.
आणखी आश्चर्यकारक गोष्ट ही की, भूगर्भसंशोधकांनी सन्हेरीबची स्वतःची बखर—मातीच्या नळकांड्यावर वा त्रिपार्श्वकाचेवर केलेल्या घटनांचा वार्षिक अहवाल शोधून काढला. यापैकीची एक बखर शिकागोच्या विश्वविद्यालयातील ओरिएन्टल इन्स्टिट्यूटमध्ये तर दुसरी ब्रिटीश संग्रहालयात टेलर प्रिझ्म येथे आहे.
ही सर्व संशोधने काय सांगतात? हेच की, पवित्र शास्त्र या लोकांविषयी आणि त्यांचा ज्या घटनांशी संबंध आला असे सांगते त्या सर्व खऱ्या आहेत—यात अश्शुरी शासनकर्त्यांची नावेही आहेत!
अश्शुरी राजे
या प्राचीन राजांची नावे तुम्हाला कदाचित विचित्र वाटतील, परंतु यापैकींच्या सात जणांची ओळख करुन घेणे चांगले आहे कारण त्यांची ही नावे पवित्र शास्त्रात नमूद असणाऱ्या घटनांसोबत अगदीच परिचित आहेत.
शलमनेस्सर ३ हा आपला बाप अश्शुरनसीरपाल याच्यानंतर गादीवर आला. निम्रुद (कालह) येथे आढळलेला त्याचा ब्लॅक ऑबिलिस्क नावाचा प्रसिद्ध मनोरा ब्रिटीश संग्रहालयात आहे. या मनोऱ्यावर काही भागात इस्राएलचा राजा येहू बहुधा गुप्त हेराकडून त्याला खंडणी देत असल्याचे चित्र आहे.—२ राजे १०:३१-३३ मध्ये सांगण्यात आलेली परिस्थिती पडताळा.
नंतर याच शतकात सुमारे इ. स. पू. ८४४ मध्ये योना संदेष्ट्याला निनवेकडे येणाऱ्या नाशाविषयीचा इशारा देण्यास पाठविण्यात आले.a या शहराने पश्चाताप केला व त्याचा बचाव झाला. हे जेव्हा घडले तेव्हा निनवेमध्ये कोणता राजा होता हे जरी आपल्याला निश्चितपणे कळून येत नाही तरी पण हा काळ अश्शुरी आक्रमक हालचालींचा पडता काळ होता हे जाणून घेणे लक्षवेधक आहे.
तिग्लथ पिल्सर ३ (पूल या नावाने ओळखला जाणारा) हा पवित्र शास्त्रात नावाने उल्लेखिलेला पहिला अश्शुरी राजा आहे. त्याने मनेहमच्या कारकीर्दीत (इ. स. पू. ७९१-७८०) उत्तरेकडे असणाऱ्या इस्राएलाच्या राज्यावर स्वारी केली. पवित्र शास्त्र म्हणते की, त्याने हा वेढा उठवावा यासाठी मनेहमानने त्याला एक हजार किक्कार चांदी दिली.—२ राजे १५:१९, २०.
कालह येथे सापडलेल्या तिग्लथ पिल्सरच्या स्वतःच्या बखरीत तो पवित्र शास्त्र विधानाला पुष्टी देण्यात म्हणतोः “मला शोमरोनच्या मनेहमानकडून खंडणी मिळाली.”
शोमरोन पडते
तथापि, शोमरोन आणि इस्राएलाचे उत्तरेकडील दहा वंशीय राज्य केवळ अश्शुराच्याच त्रासात सापडले नाही, तर त्यांना स्वर्ग व पृथ्वीचा निर्माता यहोवा देव यालाही तोंड द्यावे लागले. ते त्याच्या भक्तीपासून वेगळे होऊन बालाच्या बेबंदशाही व मद्याने धुंद उपासनेकडे वळले होते. (होशेय २:१३) यहोवाच्या संदेष्ट्यांकडून त्यांना भरपूर इशारा मिळाला होता तरीही त्यांनी मागे वळण्याचे नाकारले. याकरताच होशेय संदेष्ट्याने हे लिहिलेः “शोमरोन व त्याचा राजा नाश पावला आहे. ते पाण्यावर तरंगणाऱ्या ढलप्यासारखे झाले आहेत.” (होशेय १०:७; २ राजे १७:७, १२-१८) अश्शुरने इस्राएलचे असे केले होते असे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते आणि हेच अश्शुरी लोकांचा स्वतःचा अहवालही सांगतो, जो आपण पाहणार आहोत.
शलमनेस्सर ५ हा तिग्लथ पिल्सरनंतर पुढे आला व याने इस्राएलाच्या दहा वंशीय राज्यावर स्वारी केली आणि शोमरोन या मजबूत तटाच्या शहराला वेढा दिला. यहोवाच्या संदेष्ट्याने जे घडणार म्हणून सांगितले होते त्याप्रमाणे तीन वर्षांनी (इ. स. पू. ७४० मध्ये) शोमरोन पडले. —मीखा १:१, ६; २ राजे १७:५.
सर्गोन २ शलमनेस्सर नंतर आला आणि याने शोमरोनावरील आपली स्वारी संपविली. त्याच्या राज्यकारभाराच्या पहिल्याच वर्षी शोमरोन पडले असे सांगण्यात येते. पवित्र शास्त्र म्हणते की शोमरोन पडल्यावर अश्शुरच्या राजाने “इस्राएल लोकांस अश्शूर देशी बंदिवान करुन” नेले. (२ राजे १७:६) खोर्साबाद येथे आढळलेले अश्शुरी लिखाण याची ग्वाही देते. त्यामध्ये सर्गोन म्हणतोः “मी शोमरोनास वेढा देऊन ते काबीज केले आणि त्यातील २७,२९० लोकांना बंदिवान करुन नेले.”
पवित्र शास्त्र पुढे म्हणते की, इस्राएल लोक निघून गेल्यावर अश्शुरच्या राजाने इतर प्रदेशातून लोक आणले आणि त्यांना त्याने “इस्राएल लोकांच्या जागी शोमरोनातील नगरातून वसविले. . . . त्यातील नगरात ते राहू लागले.”—२ राजे १७:२४.
अश्शुरी अहवाल याची पुष्टी देतो का? होय. सर्गोनची निम्रुद मनोऱ्यावर लिखित असणारी स्वतःची बखर म्हणतेः “मी शोमरोन शहराचे पुनर्वसन केले. . . . मी येथे स्वतःच्या हातांनी इतर देशात पादाक्रांत केलेले लोक आणून वसविले.”—इलस्ट्रेशन्स ऑफ ओल्ड टेस्टमेंट हिस्ट्री, लेखक आर. डी. बर्नेट, पृष्ठ ५२.
यरुशलेमाचा बचाव होतो
सन्हेरीब हा सर्गोनचा मुलगा आणि वारस पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना सुपरिचित आहे. इ. स. पू. ७३२ मध्ये या लष्करी बळाचा विचार राखणाऱ्या राजाने यहुदाच्या दक्षिणेकडील राज्यावर युद्धाच्या यंत्रांचा मोठा मोर्चा आणला.
पवित्र शास्त्र म्हणते की, “अश्शुरचा राजा सन्हेरीब याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली.” यामुळे यहुदाचा राजा हिज्किया भीतीने गांगरला आणि त्याने “अश्शूरच्या राजाला लाखीश येथे” सांगणे पाठविले आणि बरीच मोठी खंडणी पाठविली.—२ राजे १८:१३, १४.
सन्हेरीबने लाखीश येथे असल्याचे समर्थन केले का? होय, निश्चितपणे. भूगर्भ संशोधकांनी निनवे येथे शोधून काढलेल्या त्याच्या भव्य राजवाड्यातील मोठ्या फळीवरील वेढ्याची चित्रे काढल्याचे आढळले. ब्रिटीश संग्रहालयात असणारी ही चित्रांची फळी लाखीशवर हल्ला होत असल्याचे चित्र दाखविते. रहिवासी शरणागति पत्करल्याचेही दाखविले आहे. बंदिवानांना नेले जात आहे आणि काहींना खांबावर टांगण्यात आले आहे असे चित्रित आहे. इतर काहीजण, ज्याला पवित्र शास्त्र नावाने संबोधिते त्या सन्हेरीबला मानवंदना देत आहेत. शिलालेखावरील पाचरीच्या आकाराचे लिखाण म्हणतेः “सन्हेरीब हा जगाचा राजा, अश्शुरचा राजा निमेडू-राजासनावर बसला आणि त्याने लाखीशहून आणलेल्या लुटीची न्याहाळणी केली.”
पवित्र शास्त्र म्हणते की, हिज्कीया राजाने “तीनशे किक्कार चांदी व तीस किक्कार सोने खंडणी” दिली. (२ राजे १८:१४, १५) या रकमेची पुष्टी सन्हेरीबच्या बखरीत आहे, मात्र येथे त्याने “८०० किक्कार चांदी” मिळाल्याचे म्हटले.
एवढी मोठी रक्कम मिळाली तरी अश्शूरच्या राजाचे संदेशवाहक यरुशलेमाच्या तटापाशी उभे राहिले व त्यांनी यहोवा देवाची थट्टा केली आणि पवित्र नगराला भीती घातली. यरुशलेमाच्या आत असलेल्या यशयाद्वारे यहोवाने सन्हेरीबाविषयी हे कळविलेः “तो या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही. तो ढाल घेऊन त्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही. ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल; त्याचा ह्या नगरात प्रवेश होणार नाही.”—२ राजे १८:१७-१९:८, ३२, ३३.
मग, यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे सन्हेरीबास अडविले का? होय, अगदी त्याच रात्री देवाच्या दूताने १,८५,००० अश्शुरी सैन्याला ठार केले! सन्हेरीब पळ काढून निनवेस आला आणि कालांतराने तो निस्रोख या त्याच्या देवापुढे दंडवत घालीत असता त्याच्या दोन मुलांनी त्याचा संहार केला.—२ राजे १९:३५-३७.
अर्थातच, आपल्या सैन्याला लाभलेल्या या पराजयाची शेखी सन्हेरीब कधीच मिरवणार नाही. पण तो काय म्हणतो ते पाहणे मनोरंजक आहे. ओरिएन्टल इन्स्टिट्युट येथील तसेच टेलरच्या मनोऱ्यावर असणारी त्याची बखर म्हणतेः “हिज्कीया यहुदी माझ्या अंकित झाला नाही. मी त्याच्या ४६ मजबूत शहरांवर, मजबूत किल्ल्यांवर आणि आजूबाजूच्या पुष्कळ खेड्यांवर वेढा घातला आणि (ते) जिंकून घेतले. मी यरुशलेमात, त्याच्या राजधानीत पक्षी पिंजऱ्यात अडकतो त्याप्रमाणे कैद झालो.” सन्हेरीब म्हणतो की, “माझ्या प्रभुत्वाच्या भयप्रेरित वैभवाने” हिज्किया गांगरला. तरीपण त्याने “मजबूत शहरे” आणि “छोटी खेडी” जिंकून घेतल्याचे जे म्हटले आहे तसे हिज्कीयाला वा यरुशलेमास काबीज केल्याचे म्हटले नाही. ते का बरे? कारण पवित्र शास्त्र दाखविते त्याप्रमाणे सन्हेरीबने पाठविलेल्या त्याच्या चांगल्या सैन्याचा नाश झाला होता!
एसर-हद्दोन सन्हेरीबचा धाकटा पुत्र व वारस याचा पवित्र शास्त्रात दुसरे राजे, एज्रा आणि यशया येथे तीन वेळा उल्लेख आहे. अश्शुरने यहुदी राजा मनश्शे याला पकडले असा पवित्र शास्त्र उल्लेख करते. भूगर्भसंशोधकांना अशी अश्शुरी यादी मिळाली ज्यात एसर-हद्दोन याला ज्यांनी खंडणी दिली त्यामध्ये “यहुदाचा राजा मनश्शे” याचाही समावेश करुन आहे.—२ इतिहास ३३:११.
अश्शुरबनीपाल, एसर-हद्दोनचा मुलगा एज्रा ४:१० मधील उल्लेखाप्रमाणे “महान व प्रतापी आसनपर” असाही ओळखण्यात येत होता. याने अश्शूरी साम्राज्याचा विस्तार होता होईल तितका केला.
जागतिक साम्राज्याचा अंत
अश्शुरच्या दुष्टाईमुळे त्याच्या नाशाविषयीचे फर्मान झाले. यहोवाचा संदेष्टा नहूम याने लिहिले की, त्याची राजधानी निनवेच्या “नदीकडील दरवाजे खुले [होतील] आणि राजवाडा [कोसळेल].” सोने व चांदी लुटण्यात येतील आणि शहर धुळीस मिळेल आणि लोक म्हणतीलः “निनवे उजाड झाली आहे, तिजसाठी कोण शोक करील?”—नहूम २:६-१०; ३:७.
हे सुद्धा घडले का? निनवेच्या विजेत्याला ते उत्तर देऊ द्या. इ. स. पू. ६३२ मध्ये बाबेलोनी व मेदी लोकांनी अश्शूरी राजधानीवरील आपला कटू सूड पूर्ण केला. बाबेलोनी इतिहास कळवितोः “शहर व मंदिराच्या वाहून नेण्यात आलेल्या मोठ्या लुटीमुळे शहर खिंडार बनले.”
ती गर्विष्ठ राजधानी जेथे उभी होती तेथे आज दोन भग्न खिंडारे उभी आहेत. ते या गोष्टीची साक्ष देत स्तब्धपणे उभे आहेत की, कोणाही राष्ट्राला—गर्विष्ठ व हिंसक अश्शुरला देखील—यहोवाच्या भविष्यवादांना पूर्ण होण्यापासून बांध घालता येणार नाही.
[तळटीपा]
a तारखांविषयी पवित्र शास्त्रात दाखविण्यात आलेला कालक्रम आम्ही मान्य करतो. हा कालक्रम, कमी विश्वासपात्र स्रोतावर आधारलेल्या कालक्रमापासून वेगळा आहे. पवित्र शास्त्र कालक्रमणाविषयीच्या सविस्तर चर्चेसाठी पहा, एड टु बायबल अंडरस्टँडिंग पृष्ठे ३२२-४८, विशेषेरित्या अश्शुरचा विभाग पृष्ठे ३२५-६.
[२६ पानावरील नकाशा]
[For fully formatted text, see publication]
मोठा समुद्र
अश्शूरी साम्राज्य
निनवे
दिमिष्क
शोमरोन
मिसर
लाखीश
यरुशलेम
बाबेल
अरेबिया
[२७ पानांवरील चित्रं]
ठार करण्यात आलेल्या सिंहांवर राजा अश्शुरबनीपाल द्राक्षारसाचे अर्पण ओतत आहे. हे तुम्हाला निम्रोदची आठवण करुन देते का?
[२८ पानांवरील चित्रं]
अश्शूरी चित्र, लाखीश या यहुद्यांच्या मजबूत शहरावर यंत्राचे मोर्चे लावण्यात आल्याचे दाखविते
[२८ पानांवरील चित्रं]
तेल लाखीश. नैऋत्येकडे असलेल्या या महत्वपूर्ण ठाण्याने डोंगरावर वसलेल्या यहुदी शहराला, अश्शुरने वेढा देऊन ते हस्तगत करण्यापर्यंत संरक्षण दिले
[२९ पानांवरील चित्रं]
सर्गोन २ चे शिलाचित्र (डावीकडे) अश्शुरी अधिकाऱ्यासमोर उभा असलेला मुकुटधारी राजपुत्र सन्हेरीब असावा