वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 २/१ पृ. १५-२०
  • “तुम्हास शांती असो”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुम्हास शांती असो”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आजची इश्‍वरी शांती
  • इश्‍वरी शांती तुमचे संरक्षण करील
  • इश्‍वरी शांतीस भेडसावणारे धोके
  • “देवाची शांती” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • “शांतीप्रीत्यर्थ प्रयत्न करुन तिचे अवलंबन करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • शांती—तुम्ही ती कशी मिळवू शकता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • खरी शांती—कोणत्या उगमाकडून?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 २/१ पृ. १५-२०

“तुम्हास शांती असो”

“येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला: ‘तुम्हाला शांती असो.’”—योहान २०:१९.

१. जागतिक शांती आणण्याचे मानवाचे जे प्रयत्न होत आहेत ते अपयशी होण्याचे का दिसत आहे?

“सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) हे योहानाच्या काळी खरे होते आणि आज व्यक्‍तिगत हिंसाचार, दहशतवाद, युद्धे व भ्रष्टाचार यात होत असलेली वाढ बघता याची सत्यता अधिक जाणवते. योहानाचे प्रेरित शब्द मानवी प्रयत्नांद्वारे म्हणजे पोप, राष्ट्रीय नेते व संयुक्‍त राष्ट्रसंघ यांच्याकरवी जागतिक शांतीसाठी जे प्रयत्न होत आहे तिच्या प्राप्तीच्या आशेला काट मारतात. ते का बरे? “‘दुर्जनांस शांती नाही’ असे माझा देव म्हणतो.”—यशया ५७:२१.

२. “शांती” या संज्ञेचा खासपणे इब्री व ग्रीक भाषेत कोणता अर्थबोध होतो?

२ तथापि, “शांती” या शब्दाचा युद्धांचे निर्मूलन यापेक्षा अधिक अर्थबोध होऊ शकतो. शांतीचा अर्थ, “त्रस्त व जाचक विचार किंवा भावना यांच्यापासून मुक्‍त असणारी मानसिक व आध्यात्मिक स्थिती: मनाचा आणि अंतःकरणाचा शांतपणा” असाहि होऊ शकतो. तथापि शांतीसाठी असणारा इब्री (शा.लोम’) व ग्रीक (इ.रे’न) शब्द आणखी विस्तृत अर्थ देतो. त्यात “शांतीने जा” या सारख्या निरोपाच्या उद्‌गारात कल्याणमूलकता सूचित होते. (१ शमुवेल १:१७; २९:७; लूक ७:५०; ८:४८) यामुळे, येशूच्या मरणकाल प्रसंगी उद्‌भवलेल्या क्लेशमय वातावरणात येशूने त्याच्या शिष्यांबद्दल जी प्रेमळ काळजी व्यक्‍त केली त्याची जाण आपल्याला मिळते.

३. पुनरूत्थानानंतर येशूने आपल्या शिष्यांविषयी कशी खोल काळजी व्यक्‍त केली व याचा काय परिणाम घडला?

३ इ.स. ३३च्या निसान १४च्या शुक्रवारी येशूचा मृत्यु घडला. निसान १६ तारखेला त्याचे पुनरूत्थान झाले. त्याला शिष्यांची नेहमी सारखी काळजी होती म्हणून त्यांचा त्याने शोध केला. ते त्याला कोठे आढळले? ते “यहुद्यांच्या भीतीमुळे” दार बंद करून आत बसले होते. ते उत्कंठित परंतु भयग्रस्त होते हे स्पष्ट आहे. पण येशू त्यांना म्हणाला: “तुम्हाला शांती असो.” (योहान २०:१९–२१, २६) नंतर पवित्र आत्म्याद्वारे त्यांची बळकटी झाली. ते मोठ्या धैर्याने प्रचाराची आपली नेमणूक पार पाडू शकले आणि पुष्कळांना इश्‍वरी शांती मिळवून देऊ शकले.

आजची इश्‍वरी शांती

४. या कठीण काळात यहोवाच्या लोकांना मनाची व अंतकरणाची शांती कशी राखता येईल?

४ आम्ही शेवटल्या काळात “कठीण दिवसात” राहात आहोत. (२ तिमथ्यी ३:१) सर्वत्र युद्धे, अन्‍नटंचाई व आजारापासूनचे मृत्यु घडत आहेत हे दिसते त्यामुळे प्रकटीकरणात भाकित असणारे घोडेस्वार पृथ्वीभरात आपली दौड करीत आहेत हे स्पष्ट होते. (प्रकटीकरण ६:३–८) यहोवाच्या लोकांना सुद्धा सभोवार पसरलेल्या परिस्थितीचा परिणाम सहन करावा लागत आहे. तर मग, तुम्हाला मनाची व अंतःकरणाची इश्‍वरी शांती कशी जतन करून ठेवता येईल? शांतीचा व सांत्वनाचा थोर उगम याच्या सान्‍निध्यात स्वतःला ठेवून. या आधीच्या लेखाने हे दाखवून दिलेच आहे की याकरता सतत प्रार्थना व विनंति करीत राहण्याची गरज आहे. त्याद्वारे “सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”—फिलिप्पैकर ४:६, ७.

५. “देवाची शांती” आमची अंतःकरणे राखून ठेव शकते याची पौलला का खात्री होती?

५ ज्याने हे शब्द लिहिले त्या प्रेषित पौलाने स्वतः धोके व अडचणी यांचा सामना केला. त्याला यहुदी व रोम्यांनी तुरुंगात टाकले व मारले. त्याला धोंडमार करण्यात येऊन मृत्यूसाठी सोडून दिले गेले. त्या काळी प्रवास करणे मोठ्या जोखमीचे होते; पौलाला तीन वेळा गलबत फुटण्याचा अनुभव आला, त्याला लुटारुंच्या धोक्याचाहि सामना करावा लागला. त्याला कित्येक जागरणे करावी लागली व थंडी, भूक, तहान यांचा त्रास काढावा लागला. या सर्वांवर त्याला प्रतिदिनी “मंडळ्यांची चिंता” लागून होती. (२ करिंथकर ११:२४–२८) या कारणामुळे पौलाला स्वतःच्या अनुभवाद्वारे हे कळाले की आमची अंतःकरणे राखून ठेवणारी “देवाची शांती” किती महत्वाची आहे.

६. आमच्या निर्माकर्त्यासोबत उबदार, जवळीकीचे संबंध मिळविणे व राखणे का महत्वाचे आहे?

६ “देवाची शांती” याचे विवेचन शांतचित्त व प्रसन्‍नता प्रवर्तित करणारे देवाबरोबरचे चांगले नाते असे करता येऊ शकते. हे ख्रिश्‍चनांना, ते छळ वा संकट सहन करीत असताना खासपणे महत्वाचे आहे. ते का? आम्ही सर्वच अपूर्ण आहोत त्यामुळे समस्या, जाच दबाव आणि विविध प्रकारातील पीछेहाट यांचा त्रास होत असता आम्ही सहजगत्या भयभीत होऊ शकतो. त्यामुळे आम्हाला आमची सचोटी राखण्यात अपयश येऊ शकते. याचा परिणाम देवाच्या नावाची मानहानी होण्यात, यहोवाची मर्जी गमाविण्यात व सार्वकालिक जीवन हातचे निसटण्यात होऊ शकतो. तर मग त्या सर्व आव्हानांना यशस्वीरित्या तोंड देण्यात साहाय्यक ठरणारी “देवाची शांती” प्राप्त करणे किती महत्वाचे आहे बरे! ही शांती, आमच्या स्वर्गीय पित्याने देऊ केलेल्या ‘उत्तम दान व परिपूर्ण देणग्या’ यापैकीची आहे हे आम्हाला खात्रीने म्हणता येईल.—याकोब १:१७.

७, ८. (अ) “देवाची शांती” कशावर आधारीत आहे व ती “सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे” कशी आहे? (ब) ही शांती एका आफ्रिकन बंधुच्या प्रकरणात कशी स्पष्ट झाली?

७ तुम्ही काही लोकांना त्यांचे जीवन शांत व निश्‍चयपूर्वक व्यतित करताना पहिले असेल. हे बहुधा नैसर्गिक क्षमता, कौटुंबिक प्रभाव, संपत्ति, शिक्षण किंवा इतर काही कारणामुळे घडते. तरीपण “देवाने दिलेली शांती” ही फारच वेगळी आहे. ती कोणा अनुकूल स्थितीवर आधारीत नसते तसेच मानवी क्षमता वा विचारधारा यापासून निर्मिली जात नाही. ती देवाकडून उगम पावते व “सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे” आहे. जे.बी. फिलिप्स यांचे भाषांतर फिलिप्पैकर ४:७ वचन याप्रकारे देते: “देवाची शांती . . . सर्व मानवी विचारधारेच्या पलिकडे आहे.” ख्रिस्तीजन गंभीर समस्या, शारीरिक इजा आणि मृत्युसुद्धा ज्या पद्धतीने तोंड देऊन आहेत त्याचा जगातील लोकांना खूप अचंबा वाटतो.

८ या विषयीचे एक उदाहरण आफ्रिका देशात ख्रिस्ती सभा चालविणाऱ्‍या एका यहोवाच्या साक्षीदाराचे आहे. येथे स्थानिक कॅथोलिकामार्फत साक्षीदार अतिरेकी आहेत असा आरोप केला गेला. एकाएकी बंदुका रोखून धरलेले लष्करी सैनिक दृष्टीपथात आले. त्यांनी स्त्रिया व मुलांना घरी पाठविले पण पुरुषांना झोडपण्यास सुरुवात केली. साक्षीदार आठवितो: “आम्हाला कशी वागणूक दिली गेली ते शब्दात वर्णन करून सांगता येणे कठीण आहे. मला तर बंदुकीच्या दस्त्याने असे तडाखे बसले की त्यानंतर साधारण ९० दिवस मला रक्‍ताच्या उलट्या होत होत्या. परंतु मला माझ्या साथीदारांच्या जीवनाविषयीची चिंता वाटत होती. मी प्रार्थना करून यहोवाला यांच्या जीवनाची, त्याच्या मेंढरांची काळजी घेण्याची विनंति केली.” ते सर्व वाचले. खरेच, भयंकर त्रासात शांत राहण्याचे आणि इतरांचा प्रेमळ विचार राखण्याचे हे किती अप्रतिम उदाहरण बरे! आमचा प्रेमळ स्वर्गीय पिता त्याच्या विश्‍वासू सेवकांच्या विनंतीला उत्तर देतो व त्यांना आपली शांती बहाल करतो. वरील प्रकरणात गोंधळलेल्या एका शिपायाने हा शेरा दिला की साक्षीदारांचा देव “खरा असला पाहिजे.”

९. पवित्र शास्त्राचे वाचन व मनन काय परिणाम घडवून आणते?

९ आजच्या या कठीण काळात काही ख्रिश्‍चनांना अशा समस्या भेडसावून आहेत ज्या त्यांना त्रस्त व निराशित करतात. अशा स्थितीत शांती टिकवून ठेवण्याचा उत्तम मार्ग पवित्र शास्त्राचे वाचन व त्यावरील मनन हा आहे. त्याद्वारे त्यांच्याठायी पुढे जाण्यासाठी व टिकून राहण्याचा निर्धार व शक्‍ती मिळते. “देवाचे वचन सजीव, सक्रिय आहे.”—इब्रीयांस ४:१२.

१०. शास्त्रवचने आठवून त्यावर मनन करणे हा आशीर्वाद कसा ठरतो?

१० तथापि, आम्हावर संकट आले व त्यावेळी आम्हापाशी पवित्र शास्त्रच उपलब्ध नसले तर काय? उदाहरणार्थ, ख्रिश्‍चनांची एकाएकी धरपकड होऊन त्यांना तरूंगात डांबले जाते व तेथे पवित्र शास्त्र हाताशी नसते. अशावेळी फिलिप्पैकरांस ४:६, ७; नीतीसूत्रे ३:५, ६; १ पेत्र ५:६, ७ आणि २३ व्या स्तोत्रासारखी शास्त्रवचने स्मरणाने आठवणे हा मोठा आशीर्वाद ठरतो. हे शास्त्रवचनीय उतारे त्यावर मनन करता येऊ शकते याची मोठी धन्यता तुम्हाला वाटणार नाही का? तुरुंगाच्या अंधाऱ्‍या कोठडीत त्यावेळी यहोवा जणू प्रत्यक्षात तुम्हासोबत बोलत आहे असे वाटेल. देवाचे वचन दुखलेल्या मनास बरे करते, कमकुवत हृदयाची मजबूती करते आणि मानसिक उद्विग्नता घालवून शक्‍ती देते. (पहा स्तोत्रसंहिता ११९:१६५.) तद्वत, आम्हाला आता मोकळीक व संधि आहे तर या वेळीच आमच्या मनात शास्त्रवचनांचे रोपण करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

११. नेदरलँडमधील एका बांधवाने आध्यात्मिक अन्‍नाविषयी असणारी गरज कशी दाखवली?

११ नेदरलँडमध्ये नाझींचे वर्चस्व होते त्यावेळी साक्षीदारांना आपली ख्रिस्ती कार्यहालचाल भूमिगतपणे करावी लागे. अशा वेळी आर्थर विंकलर यांनी पवित्र शास्त्राबद्दल खोल रसिकता व्यक्‍त केली. गेस्टापो बंधू विंकलरचा शोध घेत होते. त्यांनी त्यांना पकडल्यावर त्यांच्याकडून हातमिळवणी घडवून आणण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न पसले. त्यानंतर त्यांनी त्याना मारहाण करून बेशुद्ध केले. त्यांचे दात पडलेले, खालचा जबडा मोडलेला व शरीर मारहाणीमुळे काळेनिळे झालेले या अवस्थेत त्यांना अंधार कोठडीत टाकण्यात आले. पण त्यांच्यावर पहारा देणारा रक्षक सहानुभूतिदर्शक व मित्रत्व दाखवणारा होता. बंधु विंकलर यांनी प्रार्थनेद्वारा यहोवाकडिल मार्गदर्शन मागितले. त्यांना आध्यात्मिक अन्‍नाची मोठी गरज वाटली व त्यांनी रक्षकाकडे मदत मागितली. काही वेळात कोठडीचा दरवाजा उघडला गेला व एक पवित्र शास्त्र त्यांच्यापुढे टाकण्यात आले. ब्रदर विंकलर यांनी म्हटले: “सत्याच्या मनोहर वचनांचा मला दररोज किती आनंद मिळत होता . . . मला आध्यात्मिक दृष्टया शक्‍तीमान होत असल्याचे वाटत राहिले.”a

इश्‍वरी शांती तुमचे संरक्षण करील

१२. आमची अंतःकरणे व विचार सुरक्षित राखण्याची खास गरज का आहे?

१२ यहोवा असे अभिवचन देतो की त्याची शांती “तुमची अंतःकरणे व तुमचे विचार . . . राखील.” (फिलिप्पैकर ४:७) हे सुद्धा महत्वाचे आहे! अंतःकरण हे भावना व कल्पना यांचे स्थान आहे. या शेवटल्या दिवसात चिंतेमुळे वाटणारी भीती किंवा वाईट करण्याची लालसा यामुळे आमची अंतःकरणे सहजासहजी दुर्बळ होऊ शकतात. साधारण जीवनमान हे दिवसेंदिवस खालावत आहे. आम्ही सतत दक्ष राहिले पाहिजे. आमची अंतःकरणे दृढ राखण्यासोबत आम्ही आमचे “विचार” देखील बळकट व देवाकरवी त्याचे वचन व मंडळी यांजमार्फत मार्गदर्शित होऊ देण्यास हवे.

१३. आमचे विचार सुरक्षित राखण्यामुळे कोणते फायदे होऊ शकतात?

१३ डब्ल्यु. इ. वाईन यांच्या मते (“विचार” यासाठी असणाऱ्‍या) नो’ए.मा या ग्रीक शब्दाच्या अर्थात “उद्देश” किंवा “योजना” याचा समावेश आहे. (ॲन एक्स्पोझिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट वर्डस) अशा प्रकारे देवाची शांती आमचा ख्रिस्ती उद्देश बळकट करते आणि आमचे मन अवास्तव कारणासाठी बदलण्यास वा कमजोर करण्यापासून रक्षण देते. त्यामुळे नैराश्‍य वा समस्या आम्हाला सहजासहजी दूर लोटू शकत नाही. आम्ही एका खास भुमिकेत राहून जसे की, पूर्ण वेळेचा पायनियर उपाध्याय बनून किंवा जेथे उपाध्यांची गरज आहे तेथे स्थलांतरित होऊन यहोवाची सेवा करण्याचा उद्देश बांधला आहे तर “देवाकडील शांती” आम्हाला त्या उद्देशाप्रत प्रगमन करण्यात मोठी मदतगार ठरेल. (पडताळा लूक १:३; प्रे. कृत्ये १५:३६; १९:२१; रोमकर १५:२२–२४, २८; १ थेस्सलनीकाकर २:१, १८.) आपले मानसिक विचार अधिक दृढ करण्यासाठी देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी त्याचप्रमाणे ख्रिस्ती सहवासात एकत्र मिळण्यासाठी अधिक वेळ द्या. अशामुळे तुम्ही आले मन व अंतःकरण शुद्ध तसेच उभारणीकारक विचारांनी भरता. देवाच्या प्रेरित “सांगण्या” सोबत जडून राहण्यासाठी तुम्ही पुरेसा वेळ देत आहात का? तुम्ही त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे का?

१४. कोणत्या प्रेरित सल्ल्यामुळे आम्ही काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, व का?

१४ “देवाने दिलेली शांती” हिची प्राप्ती व त्याकडून लाभ मिळविण्यात अंतःकरण आणि मन वा मानसिक विचार या दोन्ही गोष्ट समाविष्ट असतात हे तुम्हाला दिसेल. हे या प्रेरित सल्ल्याद्वारे दाखविण्यात आले आहे: “माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव. माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नको. ती आपल्या अंतःकरणात ठेव. कारण ज्यांस ती लाभतात त्यांस ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.”—नीतीसूत्रे ४:२०–२३.

१५. “देवाने दिलेली शांती” आम्ही प्राप्त करण्यात येशू कोणता कार्यभाग पार पाडतो?

१५ यहोवा देवासोबतच्या उबदार व जवळीकीच्या नात्यातून निर्माण होणारी “देवाने दिलेली शांती” आमची अंतःकरणे व विचार “ख्रिस्त येशूमध्ये” राखते. येशू याबद्दल कोणती भूमिका पार पाडतो? पौल विवेचीत करतो: “देव जो आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभु येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले.” (गलतीकर १:३, ४) होय, आम्हास खंडणी लाभावी या करता येशूने प्रेमळपणे आपले जीवन दिले. (मत्तय २०:२८) अशा प्रकारे “ख्रिस्त येशू मध्ये [द्वारे]” आम्ही यहोवास त्याचे समर्पित सेवक या अर्थी स्वीकृत होतो आणि आमचे रक्षण करणाऱ्‍या इश्‍वरी शांतीचा उपभोग घेऊ लागतो.

इश्‍वरी शांतीस भेडसावणारे धोके

१६. “देवाने दिलेली शांती” आम्हाला टिकवून ठेवण्यास साहाय्य मिळू शकेल यासाठी पौलाने कोणता सल्ला दिला?

१६ देवाकडील शांती एकदा मिळाली व तिचा अनुभव घेतल्यावर तिला आपल्याकडे टिकविता येईल याची आपण दक्षता घेतली पाहिजे. पुष्कळ गोष्टी ख्रिश्‍चनांपासून या शांतीला विमुक्‍त करू शकतात. यापैकी अत्यंत साधारण पण अत्यंत धोकेदायक अशा युवकांच्या वासना आहेत. पौलाने तिमथ्याला दुसरे पत्र लिहिले त्यावेळी तिमथ्यी बहुधा तिशीतला असावा. त्याच्यासाठी पौलाने हा सल्ला लिहिला: “तरूणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्‍यांबरोबर नीतीमत्व, विश्‍वास, प्रीती व शांती ह्‍यांच्या पाठीस लाग.”—२ तिमथ्यी २:२२.

१७. यहोवाने लिंगाची जी तरतूद केली तिच्याबद्दल साधारणतः काय घडले आहे?

१७ त्या वासनांमध्ये लैंगिक वासना येतात, ज्यांना केवळ विवाहातच सन्माननीय स्थान असते. तरीपण इतिहासभरात ह्‍या वासनेचा विवाहपूर्व स्थितीत किंवा विवाहाबाहेरील स्थितीत लैंगिक समागमासाठी दुरुपयोग करण्यात आला आणि हे दोन्ही आचार आपल्या सूज्ञ निर्मात्याने निषिद्ध मानले आहेत. (इब्रीयांस १३:४; उत्पत्ती ३४:१–३) लैंगिक अनैतिकतेमध्ये स्वतःला लोटून देण्याचा धोका आजसुद्धा तरूण व वृद्ध ख्रिश्‍चनांपुढे उभा आहे. सध्याच्या काळातील भ्रष्ट जगतात आज कित्येकांना लिंगाचार म्हणजे नुसती शारीरिक वासना वाटते आणि याच कारणास्तव स्त्री व पुरुष वर्गात समलिंगीपणा व पुरुषगामीपणा साधारण दिसत आहेत.—रोमकर १:२४–२७.

१८. काही जणांचे अंतःकरण अद्याप का स्थिर नाही व हे कोठे निरवू शकते?

१८ अशा वातावरणात आम्ही राहात आहोत हीच गोष्ट मुळात आमची अंतःकरणे केवढी मजबूत, स्थिर व यहोवास निष्ठावंत असणारी हवीत त्याचे महत्व स्पष्ट करते. राज्याच्या संदेशाचा स्विकार करणारे काही जण पवित्र शास्त्रातील मुलभूत सत्यांना मानतात आणि यहोवाच्या लोकांसोबत नित्याने सहवास राखतात पण यहोवा, त्याचे वचन आणि त्याची जगव्याप्त मंडळी याबद्दलची रसिकता खोलवर नेत नाहीत. त्यांचे अंतःकरण अद्याप स्थिरावलेले नसते. ते “तरुणपणाच्या वासनांमुळे” सहज मार्गभ्रष्ट होऊ शकतात. काही जण कदाचित व्यभिचार वा जारकर्म करण्याचा मोह टाळू शकतील पण पौलाने बजावल्याप्रमाणे ते “देवावर प्रेम न करता सुखविलासाची आवड धरणारे” बनतात. (२ तिमथ्यी ३:४) व्यक्‍तिगत अभ्यास, ख्रिस्ती सभा आणि राज्याचे कार्य या पेक्षा दुरदर्शनवरील कार्यक्रम बघण्यात, कांदबऱ्‍या वाचण्यात आणि संगीताचे श्रवण करण्यात ते आपला जादा वेळ घालवीत असल्याचे दिसते. यामुळे अगदी सहजपणे आध्यात्मिक दुबळेपणा येतो व मग गंभीर पापात अशांचे पतन घडते.

१९. आमचे वाहवत जाणे टाळण्यासाठी आम्ही काय करावे?

१९ असे लोक, नांगर न घातलेल्या आणि विपत्तीकडे नेणाऱ्‍या प्रवाहात लोटल्या जाणाऱ्‍या होडी सारखे आहेत. अशांनी काय करावे? पौल सांगतो: “ह्‍या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे, नाहीतर आपण वाहवत जाऊ.” (इब्रीयांस २:१) अशाप्रकारे, धोक्यात असणाऱ्‍यांनी देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याकडे, ख्रिस्ती सभांची तयारी करण्यामध्ये व ख्रिस्ती सत्याची इतरांमध्ये सहभागी करण्यासाठी “विशेष लक्ष लाविले पाहिजे.” ‘हा तर चांगला सल्ला आहे. पण मी सध्या या स्थितीत नाही, त्यामुळे मला तो लागू होऊ शकत नाही’ असा विचार येणे हे अर्थातच सहजसोपे आहे. पण असा विचार करण्यापेक्षा आम्ही प्रत्येकाने आपापले अंतःकरण, अंतस्थ विचार तसेच भावना यांची आणखी शुद्धता घडवून आणण्याचा गंभीर विचार करावा आणि “प्रभूचा धावा करणाऱ्‍यांबरोबर नीतीमत्व, विश्‍वास, प्रीती व शांती ह्‍यांच्यापाठीस” लागावे हे केवढे सूज्ञतेचे ठरेल बरे! (२ तिमथ्यी २:२२) यासाठी आम्ही देवाला मार्गदर्शनाची व दृढ मदत देणाऱ्‍या त्याच्या आत्म्याच्या सहाय्याची याचना करावी.

२०. गंभीर पातक करणाऱ्‍याने काय करावे?

२० जे गंभीर पातक करतात व त्यास झाकून ठेवतात असे लोक यहोवाची मर्जी तसेच त्यांनी संपादिलेली “देवाकडील शांती” नक्कीच गमावतील. त्यांची स्वतःची मनःशांतीसुद्धा हरपली जाईल. (पडताळा २ शमुवेल २४:१०; मत्तय ६:२२, २३.) यामुळेच तुम्हाला हे स्पष्टरित्या दिसेल की ज्याने गंभीर पाप आचरले आहे त्याने ते यहोवापाशी व प्रेमळ वडिलांपाशी कबूल करावे. हे वडील त्याला आध्यात्मिक आरोग्य देऊ शकतील. (यशया १:१८, १९; ३२:१, २; याकोब ५:१४, १५) पापाच्या घसरड्या मार्गावर आपला आध्यात्मिक तोल गमविणारा प्रौढ बंधुकरवीची मदत प्राप्त करू लागतो त्यावेळी त्याला त्याचा विवेक डागणी देणार नाही व शिवाय इश्‍वरी शांतीपासूनही तो दूर राहणार नाही.

२१. यहोवास खोल कृतज्ञता व्यक्‍त करण्याजोगे कोणते कारण आज आम्हापाशी आहे आणि आमचा निर्धार काय असावा?

२१ आज यहोवाच्या समर्पित साक्षीदारांपैकी एक असणे हा केवढा मोठा हक्क आहे! आम्हासभोवताली पसरलेले हे सैतानी जगत आता मोडत आहे व छिन्‍नविच्छित्र झाले आहे. ते लवकरच लयास जाईल. आज बहुतेक लोक “जगावर कोसळणाऱ्‍या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे . . . मरणोन्मुख” झाले आहेत. पण आम्ही मात्र आपला “मुक्‍तिसमय जवळ आला आहे” हे ओळखून ‘आपली डोकी वर उंचावू’ शकतो. (लूक २१:२५–२८) “सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलिकडे असणारी . . . शांती” हिच्याबद्दल आम्ही यहोवाचे केवढे ऋणी आहोत हे दाखविण्यासाठी आपण या “शांतीचा देव” याची विश्‍वासूपणे सेवा करण्यासाठी होईल तितके करू या.—रोमकर १५:३३; १ करिंथकर १५:५८.

[तळटीपा]

a  पहा, यहोवाच्या साक्षीदारांचे १९८६चे वार्षिक अहवाल पुस्तक, पृष्ठ १५४–७.

उजळणीचे मुद्दे

◻ “देवाने दिलेली शांती” आज आम्हाला कशी मदत दते व ती “सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे” कशी आहे?

◻ कोणत्या गोष्टी आम्हाला मनःशांती टिकूवन ठेवण्यास साहाय्यक ठरतात?

◻ आज कित्येक ख्रिश्‍चनांना कोणता युक्‍तिबाज धोका भेडसावून आहे व तो कशाप्रत नेतो?

◻ कोणा ख्रिश्‍चनाने गंभीर पातक केले असल्यास त्याने काय करावे?

[१८ पानांवरील चित्रं]

तिला ते खरे असल्याचे पटले

दुसऱ्‍या महायुद्धात नाझींना एल्सा ॲबटच्या पतीला, त्याच्या ख्रिस्ती प्रचारामुळे सॅक्सेनहॉसेन येथील राजकीय बंद्यांच्या छावणीत पाठविले. नंतर मे १९४२ मध्ये गॅस्टापो तिच्या घरी आले, तिच्या लहान मुलीला ते घेऊन गेले व एल्सा हिला वेगवेळ्‌या छावणीत काम व त्रासासाठी पाठविले. ती ही व्यक्‍तिगत साक्ष देते:

“जर्मनीच्या राजकीय बंद्यांच्या छावणीतील माझ्या वास्तव्याने मला आगळा धडा शिकविला. तो हा की, अत्यंत कठीण परिक्षा प्रसंगात असता यहोवाचा आत्मा तुम्हाला केवढी मदत देतो! मला अटक होण्याआधी माझ्या बहिणीकडून आलेले पत्र मी वाचले होते ज्यात म्हटले होते की, खडतर परिक्षाप्रसंगात यहोवाचा आत्मा आपल्याला शांतचित्त देतो. मला वाटले की ती हे अतिशयोक्‍तीचे म्हणणे लिहीत होती. पण जेव्हा मलाच प्रत्यक्षात परिक्षा प्रसंगातून जावे लागले तेव्हा तिचे म्हणणे बरोबर होते याची खात्री मला झाली. ते अगदी तसेच घडले. आपल्याला या गोष्टींचा अनुभव घडेपर्यंत ते विचित्र वाटते. पण ते मजबाबतीत खरेच अनुभवास आले. यहोवा मदत देत असतो.”

[१६ पानांवरील चित्रं]

देवाची शांती आमच्या अंतःकरणाचे रक्षण करू शकते हे पौल अनुभवाने जाणून होता

[१९ पानांवरील चित्रं]

आध्यात्मिकरित्या वाहवत जाण्याच्या धोक्यात तुम्ही आहात का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा