वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १/१ पृ. ३-६
  • ते खरोखर मृतांसोबत बोलतात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ते खरोखर मृतांसोबत बोलतात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शौलाच्या प्रकरणात काय घडले?
  • हे खरेच शक्य आहे का?
  • परंतु त्यांचा उगम कोणता आहे?
  • मृतांसोबत बोलण्याची काही गरज आहे का?
  • दुरात्मे प्रबल आहेत
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १/१ पृ. ३-६

ते खरोखर मृतांसोबत बोलतात का?

ब्राझीलमधील फुटबॉल संघ काही वेळेस चेटक्यांद्वारे मदत मिळवण्याचा प्रयत्न करतात. का बरे? प्रतिस्पर्धी संघ जिंकेल याच्या भयामुळे सल्ला मिळविण्यासाठी. एका वर्तमानपत्रानुसार “सर्व प्रकारच्या समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी अलौकिकाशी थेट संधान बांधण्याच्या संधीचा लाखो लोकांवर प्रखर प्रभाव पडतो.” काही देशात उच्च पदस्थ राज्यकर्ते, कलाकार व व्यापारी नियमितपणे दुरात्म्यांचा सल्ला विचारतात. व्याधीवर उपाय शोधण्यासाठी किंवा आर्थिक समस्येवर तोडगा शोधण्याच्या प्रयत्नात अनेकजण मृतांचा सल्ला मिळविण्याची खटपट करतात. मृतांना अधिक ज्ञान असते असा समज आहे.

पण मृतांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे का? असे करणे खरोखरी शक्य आहे का? त्यात काही धोका संभवतो का? पवित्र शास्त्र काय म्हणते ते पाहिल्यास तुम्ही चकित होण्याचा संभव आहे.

शौलाच्या प्रकरणात काय घडले?

पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या या खऱ्‍याखुऱ्‍या अनुभवाचा विचार कराः पलिष्टी शत्रुच्या भयामुळे, प्राचीन इस्त्राएलांचा राजा शौल याने एन-दोर मधील चेटकिणीची मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला मृत संदेष्टा शमुवेलासोबत संपर्क साधण्यास सांगितले. बाह्‍या नसलेला झगा परिधान केलेल्या एका वृद्धाचे तिने केलेले वर्णन ऐकून ते भूत शमुवेलाचे असावे असे शौलास वाटले. पण त्याच्याकडील संदेश काय होता? इस्त्राएलांना पलिष्ट्यांच्या हाती देण्यात येईल व दुसऱ्‍या दिवशी शौल व त्याचे पुत्र “शमुवेला”सोबत असतील. पलिष्ट्यांशी लढताना ते मारले जातील असे सूचित करण्यात आले. (१ शमुवेल २८:४-१९) तसेच घडले का?

नाही. पलिष्ट्यांसोबतच्या लढाईत शौल फार जखमी झाला, पण तो आत्महत्या करून मेला. (१ शमुवेल ३१:१-४) शौलाचे सर्व पुत्र त्याच्यासोबत मरतील या भाकिताच्या उलट त्याचा पुत्र इशबोशेथ वाचला.

मृताकडे विचारणा करणे हे मुळात योग्य होते का? नाही. ते योग्य नव्हते. शास्त्रवचने आम्हास सांगतातः “शौलाने यहोवाचा अपराध केला . . . आणि . . . भूतविद्याप्रवीण स्त्रीचा त्याने सल्ला घेतला. या सर्वांमुळे तो मेला.” (१ इतिहास १०:१३, १४) आपण यापासून काही शिकू शकतो का? होय, चेटकिणीला मृताकडे विचारणा करण्यास लावल्यामुळे शौल मरण पावला. का बरे? हे केल्यामुळे त्याने देवाचा हा सुस्पष्ट कायदा अवमानिलाः “पंचाक्षरी, छाछू करणारा अथवा मृतात्म्याला विचारणा असा तुम्हामध्ये कोणी असू नये. कारण जो कोणी असली कृत्ये करतो त्याचा यहोवाला वीट आहे.” (अनुवाद १८:११, १२) मृताकडे विचारपूस करण्याचा देवास वीट आहे? या प्रश्‍नाचे उत्तर पाहण्याआधी आपण विचारूः

हे खरेच शक्य आहे का?

कोणास मृतासोबत बोलायचे असल्यास मेलेले प्रत्यक्षात जिवंत असले पाहिजेत. त्यांना अमर जीव असला पाहिजे. तथापि, पवित्र शास्त्र म्हणतेः “यहोवा देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात प्राणवायु फुंकिला तेव्हा मनुष्य जिवंत जीव झाला.” (उत्पत्ती २:७, न्यू. व.) यास्तव, मनुष्य हा स्वतः जीव आहे. त्याला त्याच्या मृत्युनंतर जिवंत राहील असा अमर जीव नाही. वस्तुतः शास्त्रवचने म्हणतातः “जो जीव पाप करेल—तो स्वतः मरेल.” (यहेज्केल १८:४, न्यू. व.) याहून अधिक देवाचे वचन म्हणतेः “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; परंतु मृतांस तर काहीच कळत नाही. . . . ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्‍तिप्रयुक्‍ति, बुद्धी व ज्ञान यांचे नाव नाही.” मानवजातीची सर्वसाधारण कबर म्हणजेच अधोलोक.—उपदेशक ९:५, १०.

अधिक ज्ञान असणे तर दूरच राहिले, मृतांना तर शुद्धही नसते. याकरताच त्यांच्यासोबत बोलणे अशक्य आहे. मृतात्म्याला विचारण्याविरूध्द देवाने दिलेल्या कायद्यानुसार वागण्याने आपल्याला फसवणूकीपासून संरक्षण मिळते. तथापि, शौल राजाचा अनुभव दाखवितो त्याप्रमाणे आत्मिक आसमंतातून संदेश येणे शक्य आहे.

परंतु त्यांचा उगम कोणता आहे?

एक गोष्ट म्हणजे मृतासोबत संपर्क साधण्याचा दावा करणाऱ्‍यांत फसवाफसवी ही सर्व साधारण गोष्ट आहे. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ माहिती देतेः “असे दाखवून देण्यात आले आहे की, दुरात्मे जिवंत लोकांशी बोलू शकतात यावर विश्‍वास बसावा म्हणून चेटके लोकांची फसवणूक करतात. चेटक्यांच्या बैठकीत काय घडते यावर शास्त्रज्ञांनी बरेच स्पष्टीकरण सादर केले आहे. उदाहरणार्थ, काही चेटके स्वतःच बोलून इतर कोणीतरी बोलल्याचे भासवितात. काही मदतनिसांचा किंवा विविध प्रकारच्या फसव्या उपकरणांचा वापर करतात. इतर मोहनिद्रेचा उपयोग करतात. चेटक्यांच्या बैठकीस जाणाऱ्‍या लोकांना त्यांच्या मृत प्रिय जनांशी संपर्क साधण्याची उत्कट इच्छा असते. अशा इच्छेमुळे चेटक्याने दिलेला कोणताहि संदेश आत्मिक जगाकडून आलेला असावा अशी त्यांची ठाम समजूत होते.”

परंतु, आपण फक्‍त याच तऱ्‍हेने विचार करावा का? नाही. मृताकडे विचारपूस करण्याविरूद्ध देवाचा न्यायदंड आम्हास विशेष रितीने संरक्षण देतो. आत्मिक क्षेत्रातून संदेश येतात खरे, पण त्यांचा उगम, मानवजातीस बहकविण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या शक्‍तीशाली प्राण्यांत आहे. पवित्र शास्त्रात त्यांना म्हटले आहेः दुरात्मे, म्हणजेच दियाबल सैतान व भूते म्हणून ओळखले जाणारे अवज्ञाकारी दूत. (इफिसकर ६:१२) शौल राजाने एन-दोर मध्ये भूतविद्याप्रवीण स्त्रीस भेट दिली तेव्हा आपण मृत संदेष्टा शमुवेल असल्याची बतावणी दुरात्म्याने केली होती.

शौलाच्या प्रकरणात स्पष्ट केल्याप्रमाणे, दुरात्म्याजवळ सांगण्यास फायदेकारक असे काहीच नाही व त्याची तथाकथित मदत क्षणभंगुर असते. त्यांचा अधिपति दियाबल याप्रमाणे ते लबाड आहेत. (मार्क ३:२२; योहान ८:४४) याबाबत दिवंगत ब्रिटीश मानसशास्त्र संशोधक सर आर्थर केनन डॉइल यांनी लिहिलेः “खेदाची गोष्ट अशी की दुष्ट व खोडसाळ बुद्धिमंतांच्या धादांत व बुद्धिपुरस्सर लबाडीला आपणास तोंड द्यावे लागते. माझा कयास आहे की या विषयाचा तपास करणाऱ्‍या प्रत्येकाला बुद्धिपुरस्सर लबाडीचा अनुभव आला आहे. क्वचित त्यात चांगले व खरे संदेशहि मिसळलेले असतात.” (द न्यू रेवेलेशन, पृष्ठ ७२) अर्थात, आपणास फसवले जावे असे तुम्हास वाटत नाही, होय ना?

आता याचा विचार कराः इतिहास आपल्याला गुलामांचा व्यापार व त्यातील हालांविषयी सांगतो. कोणीही स्वखुषीने त्रास व मानखंडना स्विकारील का? अर्थातच नाही. मग, आपण स्वतःस दुरात्म्यांचे गुलाम होऊ द्यावे का? ते केवळ लबाडी करीत नाहीत तर लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतात व त्यांना हिंसाचार व खून करण्याच्या वाटेला लावतात. उदाहरणार्थ, ब्राझीलमध्ये परनामबुको येथे जोस याने म्हटलेः ‘एक दुरात्मा त्याच्यामध्ये शिरला व तो त्याच्या एका वर्षाच्या मुलीस ठार करण्यास त्यावर बळजबरी करू लागला.’ होय, दुरात्म्यांशी संबंध ठेवल्यास त्याचा परिणाम अशा दास्यत्वात होऊ शकतो. गतकाळातील दुःखी गुलामांना जशी स्वातंत्र्याची ओढ लागली होती त्याप्रमाणे सध्या दुरात्म्यांनी गुलाम बनविलेल्यांनी मुक्‍तीची इच्छा केली पाहिजे. ही मुक्‍तता प्राप्त करण्याचा एक मार्ग म्हणजे चेटक्यांची मसलत व मृतासोबत बोलण्याचा प्रयत्न करण्यापासून परावृत्त व्हावे. तसे पाहिल्यास . . .

मृतांसोबत बोलण्याची काही गरज आहे का?

नाही. कारण आपण निराधार नाही. आपल्या पित्यावर विसंबणाऱ्‍या मुलांप्रमाणे, सात्विक लोकांना मदत करण्यात आनंद मानणाऱ्‍या आपल्या स्वर्गातील पित्याकडे आपण मुक्‍तपणे मदतीची याचना करू शकतो. (लूक ११:९-१३) देवाचा संदेष्टा यशया याने लिहिलेः “ते तुम्हा लोकांस म्हणतीलः ‘भूतवैद्यांस व छाछू करणाऱ्‍या मांत्रिकास विचारावयास जा.’ तेव्हा म्हणाः ‘लोकांनी आपल्या देवाला विचारु नये काय? जिवंताकरता मेलेल्यास विचारावे काय? धर्मशास्त्र व विधि याकडे पहा!’”—यशया ८:१९, २०.

होय, आपण त्याच्या इच्छेनुसार वागल्यास आणि दुरात्म्यांशी संपर्क ठेवण्यास नकार दिल्यास आपल्याला यहोवा देवावर भरवसा ठेवण्यास भक्कम आधार आहे. ख्रिस्ती शिष्य याकोब याने लिहिलेः “यास्तव, देवाच्या अधीन व्हा; सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.” (याकोब ४:७) यहोवाच्या साक्षीदारांबरोबर पवित्र शास्त्र अभ्यास केल्यानंतर, २८ वर्षे चेटूक करणाऱ्‍या माणसाने म्हटलेः “चेटूक सोडून देणाऱ्‍यांनी, दियाबल काय करील याचे भय कधीही बाळगू नये, तर त्याऐवजी यहोवा देवावर भाव ठेवावा.”

देवाच्या वचनापासून मिळणाऱ्‍या सत्याने मन भरल्याने व त्यानुसार आचरण केल्याने आपल्याला “देवाची [आध्यात्मिक] शस्त्रसामुग्री धारण” करता येईल. यामुळे आपल्याला “सैतानाच्या डावपेचापुढे टिकाव धरता येईल” आणि आपण दुरात्म्यांचे दास होणार नाही. (इफिसकर ६:११) याहून अधिक म्हणजे, नियमितपणे यहोवाला प्रार्थना करण्यामुळे दुरात्म्यांच्या उपद्रवाविरुद्ध शक्‍तीशाली संरक्षण मिळते.—नीतीसूत्रे १८:१०.

मृताविषयीची खरी परिस्थिती जाणणे केवढे समाधानकारक आहे बरे! मृत्यु महानिद्रेप्रमाणे आहे. (योहान ११:११) येशू ख्रिस्ताने खात्री दिली की, मृतांचे पुनरुत्थान होईल.—योहान ५:२८, २९.

चेटुक करणारा एक माणूस, त्याची पत्नी व मुले असे सर्व शास्त्रवचनातून शिकले की कोणासही मृतासोबत किंवा त्याची बतावणी करणाऱ्‍या सोबत बोलणी करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. हे कुटुंब व त्यांच्यासारख्या जगभरातील इतर पुष्कळांप्रमाणे तुम्हीसुद्धा आध्यात्मिक मुक्‍तीचा आनंद लुटू शकता. (योहान ८:३२) मृताबाबतचे सत्य व मानवजातीबाबतचा देवाचा उद्देश शिका. यानंतर जेथे तुम्ही पुनरूत्थित प्रियजनांसोबत बोलू शकाल व शांतीपूर्ण परिस्थितीमध्ये चिरकालिक जीवनाचा आनंद लुटाल अशा यहोवाच्या नव्या व्यवस्थीकरणाची आशा धराल.—यशया २५:८.

[४ पानांवरील चित्रं]

मृत संदेष्टा शमुवेलाकडून शौल राजाने संदेशाची विचारणा केली तेव्हा खरोखरी कोण बोलत होता?

[६ पानावरील चौकट]

एक रसिक वृद्धा

“वृद्धजनांची काळजी कोण घेईल?” यावरील जून १, १९८७ चा द वॉचटावर चा अंक वाचल्यावर एका ७९ वर्षे वयाच्या जपानी महिलेने पुढील पत्र लिहिलेः

माझ्या माननीय बांधवांना,

वृद्धजनांबाबतचा जून १, १९८७ च्या अंकाचा अभ्यास केल्यानंतर ते साहित्य फारच समजूतदार व दयापूर्ण असल्याचे मला आढळले. मी परिच्छेद ११ वर पोहंचले तेव्हा मला माझा रुमाल घ्यावा लागला कारण मी खूप रडले व ते आवरता आवरेना. ते अश्रु गाढ कृतज्ञतेचे होते. केवढे ते प्रेम व दया! स्तोत्र १५० म्हणते तेच मी करू शकले—याहची स्तुति करा! वृद्ध लोकांना दया दाखविण्याविषयी हे तपशीलासह मननशील लेख प्रसिद्ध केल्याबद्दल मी नम्रपणे कृतज्ञता व्यक्‍त करते. अर्थात, तुम्ही प्रत्येक महिन्यात प्रसिद्ध करणाऱ्‍या उत्तम लेखाबद्दल मी तुमची ऋणी आहे. माझी रसिकता स्पष्टपणे व्यक्‍त करण्यास पुरेसे शब्द नाहीत. पुन्हा मी तुमची आभारी आहे.

सुदैवाने आमच्या मंडळीतील सर्व जण फार प्रेमळ व दयाळू आहेत. ते प्रचारकार्यात मला घरापासून त्यांच्या मोटरीतून घेऊन जातात व पुन्हा आणून सोडतात. त्यांच्या दयाळू सेवेमुळे मी सहाय्यक पायनियर आहे. मी अशा विलोभनीय व सुरक्षित संस्थेत असल्याच्या प्रत्येक दिवसासाठी ऋणी आहे.

वृद्ध लोकांची संख्या वाढत आहे पण लोकांना ते अधिकाधिक नकोसे होत आहेत अशा आजच्या जगात, इतक्या प्रेमळ देवाकडून मिळणाऱ्‍या आशीर्वादांहून अधिक मोलवान असे काही नाही. शक्य तेवढ्या अधिक लोकांना सत्य शिकविण्यास मला मिळावे म्हणजे तेही आम्हासोबत आनंदित होतील हीच माझी प्रार्थना आहे.

यहोवाची स्तुति असो व माझ्या प्रिय बांधवांनो तुम्हास धन्यवाद. माझ्या क्लिष्ट हस्ताक्षराबद्दल माझी क्षमा करा. त्याची मला लाज वाटते. यहोवा तुम्हास आशीर्वाद व उत्तम आरोग्य देवो.

एक निरुपयोगी वृद्धा,

[सही] नोगामी

अशाप्रकारचे शब्द व प्रतिक्रिया या वास्तविकतेची खात्री देतात की ख्रिस्ती प्रेमास सीमा किंवा वयाची अट नाही. यहोवाचे साक्षीदार, तरुण व वृद्ध, येशूच्या विधानाप्रमाणे जीवन कंठून त्यांचे शिष्यत्व प्रदर्शित करतातः “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे सर्व जण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा