तुमच्या प्रार्थना केवढ्या अर्थभरीत आहेत?
“मी अगदी अंतःकरणापासून तुझा धावा करतो; हे यहोवा, तू माझे ऐक.”—स्तोत्रसंहिता ११९:१४५.
१, २. (अ) येशूने प्रार्थनेविषयी कोणता दाखला दिला? (ब) दोन प्रार्थनांमधून येशूने कोणता निष्कर्ष काढला, आणि हे आम्हासाठी काय सांगते?
निर्माणकर्ता यहोवा देव कोणत्या प्रकारच्या प्रार्थना ऐकतो? देवाने प्रार्थना ऐकावयाची आहे तर त्यासाठी कोणती मुलभूत गरज आहे ते येशू ख्रिस्ताने एका दाखल्यात स्पष्ट केले आहे. येशूने म्हटले की दोन माणसे यरुशलेमातील मंदिरात प्रार्थना करीत होती. यापैकीचा एक मोठा प्रतिष्ठित परुशी होता तर दुसरा तुच्छ मानलेला जकातदार होता. परुश्याने अशी प्रार्थना म्हटलीः “हे देवा, इतर मनुष्ये . . . किंवा या जकातदारासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.” पण तो लीन जकातदार “आपल्या उरावर मारून घेऊन म्हणालाः ‘हे देवा, मज पापी मनुष्यावर दया कर.’”—लूक १८:९-१३.
२ या दोन प्रार्थनांवर विवेचन मांडताना येशूने म्हटलेः “मी तुम्हास सांगतो, हा [जकातदार] त्या दुसऱ्यापेक्षा [परुशी] निर्दोषी ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नीच केला जाईल आणि जो काणी आपणाला नीच करतो तो उंच केला जाईल.” (लूक १८:१४) अशाप्रकारे येशूने हे स्पष्टरित्या दाखविले की आमच्या स्वर्गीय पित्यास नुसती प्रार्थना करून उपयोगी नाही. आम्ही ती कशी करतो—म्हणजे आमची मानसिक प्रवृत्ती काय आहे—ते देखील महत्वाचे आहे.
३. (अ) प्रार्थनेविषयीचे काही मुलभूत नियम सांगा. (ब) प्रार्थनेची विविध स्वरुपे कोणती?
३ प्रार्थना हा खराच मौल्यवान, गहन, गंभीर स्वरूपाचा हक्क आहे आणि सर्व माहितगार ख्रिश्चन याविषयीच्या मुलभूत नियमांशी परिचित आहेत. प्रार्थना केवळ एकच खरा देव यहोवा याला उद्देशून करण्यास हव्या. त्या त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नामाने म्हटल्या पाहिजेत. त्या स्विकृत होण्यासाठी त्या विश्वासाने सादर केल्या पाहिजे. होय, “देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे.” याशिवाय प्रार्थना ह्या देवाच्या इच्छेच्या एकमतात असल्या पाहिजेत. (इब्रीयांस ११:६; स्तोत्रसंहिता ६५:२; मत्तय १७:२०; योहान १४:६, १४; १ योहान ५:१४) तसेच शास्त्रात मिळणाऱ्या उदाहरणांद्वारे आपण हे शिकतो की, प्रार्थना या स्तुति, आभारप्रदर्शन, याचना आणि नम्र विनंत्या या स्वरुपात असू शकतात.—लूक १०:२१; इफिसकर ५:२०; फिलिप्पैकर ४:६; इब्रीयांस ५:७.
अर्थभरीत प्रार्थनेची उदाहरणे
४. (अ) मोशे आणि यहोशवा यांनी अर्थभरीत प्रार्थनेची कोणती उदाहरणे पुरविली? (ब) दावीद आणि हिज्किया राजा यांचीही कोणती उदाहरणे आहेत? (क) या प्रार्थनांमध्ये कोणती सर्वसाधारण गोष्ट दिसून येते?
४ आम्हाला गहन समस्यांना सामोरे जावे लागते, गंभीर निर्णय घेण्याची पाळी येते, गंभीर चुका आमच्या हातून घडल्या गेल्या किंवा आमच्या जीवनाला धोका संभवला आहे अशा वेळी आमच्या प्रार्थना अधिक तळमळीच्या बनून त्या अर्थभरीत होतात. दहा अल्पविश्वासी हेरांनी सांगितलेला नकारात्मक अहवाल ऐकून इस्त्राएलांनी बंड केले तेव्हा यहोवाने मोशेला म्हटले की यांचा तो समूळ नाश करणार. त्यावेळी मोशाने अगदी कळकळीने व अर्थभरीतपणे यहोवाला प्रार्थना करून त्याने त्याच्या नावाखातर अशी हालचाल करू नये अशी काकळूत केली. (गणना १४:११-१९) आखानाच्या लोभामुळे इस्त्राएलांना आय येथे पराभव पत्करावा लागला तेव्हा यहोशवाने देखील यहोवाच्या नामाखातर अगदी भावपूर्ण याचना यहोवाला केली. (यहोशवा ७:६-९) दावीदाची कित्येक स्तोत्रे कळकळीच्या प्रार्थनेच्या स्वरुपात आहेत. याचे लक्षणीय उदाहरण म्हणजे ५१ वे स्तोत्र. अश्शुरचा राजा सन्हेरीब याने यहुदाला वेढा घातला तेव्हा हिज्किया राजाने केलेली प्रार्थना हे अर्थभरीत प्रार्थनेचे आणखी एक उदाहरण आहे आणि येथे देखील यहोवाचे नाम गोवलेले होते.—यशया ३७:१४-२०.
५. यहोवाच्या आणखी काही सेवकांनी अर्थभरीत प्रार्थना म्हटल्याची कोणती उदाहरणे आम्हापाशी आहेत?
५ विलापगीताचे पुस्तक हे देखील यिर्मयाने आपल्या लोकांच्याखातर केलेली दीर्घ व तळमळीची प्रार्थना असे म्हटले जाऊ शकते कारण यातही यहोवाला वारंवार उद्देशून म्हणण्यात आले आहे. (विलापगीत १:२०; २:२०; ३:४०-४५, ५५-६६; ५:१-२२) एज्रा व दानिएल यांनीही आपल्या लोकांखातर तळमळीच्या प्रार्थना म्हटल्या. यात त्यांनी राष्ट्राच्या चुकांची कबुली दिली आणि क्षमेकरता याचना केली. (एज्रा ९:५-१५; दानिएल ९:४-१९) तसेच योना मोठ्या माशाच्या पोटात होता त्यावेळी त्याने जी प्रार्थना म्हटली तीही कळकळीची आणि अर्थभरीत होती हे आपल्याला खात्रीने म्हणता येईल.—योना २:१-९.
६. (अ) येशूने अर्थभरीत प्रार्थनांविषयीची कोणती अर्थभरीत उदाहरणे मांडली? (ब) आमच्या प्रार्थना अर्थभरीत व्हावयाच्या असतील तर कोणत्या मुलभूत गोष्टीची गरज आहे?
६ बारा प्रेषितांची निवड करण्याआधी येशूने सबंध रात्र प्रार्थनेत घालविली ते यासाठी की निवड करताना पित्याच्या इच्छेनुरूप केले जावे. (लूक ६:१२-१६) येशूचा विश्वासघात झाला त्या रात्री येशूने केलेली प्रार्थना सुद्धा मोठी अर्थभरीत आहे. तिचे लिखाण योहानाच्या १७ व्या अध्यायात आहे. ज्यांनी या प्रार्थना म्हटल्या त्यांचे यहोवा देवासोबत किती चांगले नातेसंबंध राखले होते त्याची प्रभावशाली साक्ष आपल्याला त्यांच्या प्रार्थंनांवरून मिळते. तद्वत, आमच्या प्रार्थनादेखील जर अर्थभरीत व्हावयाच्या आहेत तर ही मुलभूत गरज पूर्ण व्हावयास हवी. शिवाय त्या यहोवापुढे ‘प्रबळ’ ठरावयाच्या आहेत तर त्या कळकळीच्या व अर्थभरीत असल्याच पाहिजेत.—याकोब ५:१६, द जरुसलेम बायबल.
मानवी अपूर्णतेमुळे वैगुण्य
७. आमच्या प्रार्थनांविषयी आम्हाला कोणते प्रश्न विचारता येतील?
७ आम्ही पाहिले आहेच की तणावपूर्ण परिस्थितीत असताना आमच्या प्रार्थना अधिक कळकळीच्या व अर्थभरीत होत असतात. पण आमच्या दरदिवशीच्या प्रार्थनांविषयी काय? त्या, आमचा स्वर्गातील पिता यहोवा देव याच्यासोबत आम्ही उबदार व निकटचे नातेसंबंध राखून आहोत हे दाखवून देतात का? ‘आमच्या प्रार्थनांचा देवाला काही अर्थ व्हावयाचा आहे तर तो आम्हालाही वाटला पाहिजे’ हे खऱ्या अर्थाने म्हणण्यात आले आहे. आम्ही प्रार्थना विचारपूर्वकतेने करतो का आणि त्या आमच्या लाक्षणिक अंतःकरणापासून येतात का?
८. मानवी अपूर्णतेमुळे आमच्या प्रार्थनात कोणते वैगुण्य येऊ शकते?
८ आमच्या प्रार्थना अगदी सहजपणे बिघडल्या जाऊ शकतात. आमचा अनुवंशिकरित्या अपूर्ण कल असल्यामुळे आमचे अंतःकरण सहजगत्या आम्हाला फसवू शकते आणि मग प्रार्थनेतील गुणवत्ता हरपली जाते. (यिर्मया १७:९) आपण थोडासा थांबून विचार केला तर आमच्या प्रार्थना सरसकट, ठराविक साच्याच्या, नेहमीची करण्याकडे आमचा कल झुकलेला आहे असे आपल्याला दिसेल. किंवा त्यात कदाचित काही गोष्टींचा वारंवार पुनरुच्चार होत आहे असे दिसेल. ही गोष्ट, येशूने ‘परराष्ट्रातील लोक’ जो अयोग्य मार्ग अनुसरुन असल्याचे म्हटले, ते आमच्या लक्षात आणते. (मत्तय ६:७, ८) आमच्या प्रार्थना विशिष्ट गोष्टी वा व्यक्तींऐवजी सर्वसामान्य गोष्टींना सामावून असल्याचे कळून येईल.
९. आमच्या प्रार्थनांच्या बाबतीत आणखी कोणते धोके आहेत, आणि असे धोके कोणत्या एका कारणामुळे निसंशये संभवतात?
९ कधी कधी आम्ही आमच्या प्रार्थना फारच घाईने करीत आहोत असे दिसून येईल. पण हे परिक्षण लक्षणीय आहे की, “तुम्हाला प्रार्थनेला सवड काढता येत नाही तर इतर गोष्टींनाहि खरीच सवड काढता येणार नाही इतके तुम्ही कामात आहात.” आम्ही विशिष्ट वाक्ये पाठ करून ती प्रार्थनेच्या वेळी उच्चारु नयेत. तसेच कोणा यहोवाच्या साक्षीदाराने जाहीर स्थळी आपल्या प्रार्थना वाचू नयेत. हे सर्व धोके, आम्ही ज्यास आपल्या प्रार्थना करतो त्या यहोवा देवाला प्रत्यक्ष पाहू शकत नसल्यामुळे संभवतात हे खरे आहे. तरीपण अशा प्रार्थनांमुळे तो संतुष्ट होईल असे आम्ही अपेक्षू नये व शिवाय अशा प्रार्थनांचा आम्हाला देखील काही लाभ मिळत नाही.
वैगुण्यावर मात करणे
१०. (अ) कोणत्या स्वरुपाची प्रवृत्ती प्रार्थनेच्या महत्वपूर्णतेसंबंधाने रसिकतेची उणीव दाखविते? (ब) कोणती शास्त्रवचनीय घटना येथे परिक्षिली आहे?
१० आम्ही आमच्या दैनंदिन प्रार्थनांचे महत्व जाणले आणि आमच्या स्वर्गातील पित्यासोबत चांगले नातेसंबंध राखले तर वर उल्लेखिलेल्या धोक्यांच्या बाबतीत आपल्याला दक्ष राहता येईल. याचा फायदा एका गोष्टीत असा होईल की, आम्ही, आम्हाला इतर बरीच कामे आहेत त्यामुळे प्रार्थना घाईने करतो ही प्रवृत्ती दाखविणार नाही. विश्वाचा सार्वभौम यहोवा देव याच्यासोबत बोलणी करणे यापेक्षा आणखी कोणते महत्वाचे काम आहे? कधी कधी वेळ अपुरा असतो हे खरे. उदाहरणार्थ, अर्तहशस्त राजाने आपला प्यालेबरदार नेहम्या याला विचारणा केली की, “तुझी विनंति काय आहे?” तेव्हा नेहम्याने ‘स्वर्गीच्या देवाची लगेच प्रार्थना केली.’ (नेहम्या २:४) राजा त्याच्याकडून त्वरीत उत्तराची अपेक्षा करीत होता म्हणून त्याला मोठी प्रार्थना करता आली नाही. तरीपण ती अर्थभरीत आणि अंतःकरणापासून केलेली होती हे आम्हाला निश्चयाने म्हणता येईल कारण यहोवाने त्याला लागलेच उत्तर दिले. (नेहम्या २:५, ६) अशा क्वचित प्रसंगाशिवाय आम्ही आमच्या प्रार्थनांना वेळ दिला पाहिजे आणि बाकीच्या गोष्टींना थांबवून ठेवले पाहिजे. प्रार्थना नेहमीच घाईने म्हणण्याचा आमचा प्रघात आहे तर प्रार्थनेच्या मूल्याविषयीची तेवढी रसिकता आम्हाठायी नाही हे स्पष्ट दिसेल.
११. आम्ही आणखी कोणता एक धोका टाळला पाहिजे, आणि येशूने याविषयीचे कोणते सुंदर उदाहरण दिले?
११ आणखी एक धोका म्हणजे प्रार्थनेत सर्वसामान्य गोष्टींचा वारंवार पुनरुच्चार करणे आम्ही टाळले पाहिजे. अशा या प्रार्थना, प्रार्थनेविषयीच्या हक्काला योग्य तो न्याय देत नाहीत. येशूने याबद्दल आपल्या नमुनेदार प्रार्थनेत एक चांगले उदाहरण घालून दिले आहे. त्याने सात विशिष्ट याचनांचा यात उल्लेख केला आहेः तीन धार्मिकतेचा विजय होण्याविषयी, एक आमच्या भौतिक गरजेविषयी आणि तीन आमच्या आध्यात्मिक कल्याणाविषयी.—मत्तय ६:९-१३.
१२. प्रार्थनेत स्पष्ट असण्याच्या बाबतीत पौल कोणते उदाहरण पुरवितो?
१२ याच अनुषंगाने प्रेषित पौलाने देखील सुंदर उदाहरण घालून दिले आहे. इतरांनी त्याच्यासाठी ‘जसे त्याने बोलले पाहिजे ते त्याला प्रशस्तपणे बोलता यावे’ म्हणून प्रार्थना करावी अशी विनंति केली. (इफिसकर ६:१८-२०) इतरांसाठी त्याने केलेल्या प्रार्थनेत देखील त्याने स्पष्ट स्वरुपाचे वक्तव्य केले. “माझी ही प्रार्थना आहे की,” पौल म्हणाला, “तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोतर अतिशय वाढावी, असे की, तुम्ही अधिक महत्वपूर्ण गोष्टींची खात्री करावी, ख्रिस्ताच्या दिवसासाठी सात्विक व निर्दोष असावे आणि देवाचे गौरव व स्तुति व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी नीतीमत्वाची फळे त्यांनी तुम्ही भरून जावे.”—फिलिप्पैकर १:९-११.
१३. यहोवास केल्या जाणाऱ्या विविध सेवेच्या बाबतीत आम्हाला अर्थभरीत प्रार्थना कशा म्हणता येतील?
१३ होय, आमच्या प्रार्थनेत विशिष्ट गोष्टींचा उल्लेख असावा आणि याकरता आम्ही आमच्या प्रार्थनेविषयी विचार केला पाहिजे. (पडताळा नीतीसूत्रे १५:२८.) क्षेत्रकार्यात असताना आम्ही देवाला, आमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद यावा यासाठीच नव्हे तर सूज्ञान, चातुर्य, उदारपणा, मोकळेपणाने बोलणे किंवा साक्षीकार्यात प्रभावीपणे साक्ष देण्याविषयीच्या ज्या कमतरता आम्हात आहेत त्यावर मात करण्यात मदत मिळावी म्हणूनही प्रार्थना करावी. यासोबत, आम्हास देवाने नीतीमत्तेसोठी भुकेले व तान्हेले असणाऱ्या कोणाकडे निरवावे यासाठी प्रार्थना करू शकत नाही का? जाहीर भाषण देण्याआधी, वा कार्यमार्गदर्शक सभेचा काही भाग हाताळण्याआधी किंवा इश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेतील आमची नेमणूक पूर्ण करण्याआधी आम्ही यहोवाला, त्याने त्याचा पवित्र आत्मा आम्हामध्ये विपुलतेने वास करावा यासाठी प्रार्थना करू शकतो. ते का? यासाठी की आम्हाला आत्मविश्वास असावा व आमचा तोल संभाळता यावा आणि आम्ही उत्कटता आणि विश्वसनीयतेने आपले भाषण सादर करून आमच्या देवाच्या नामाला सन्मान प्राप्त करून द्यावा आणि आमच्या बांधवांची उभारणी घडावी. या सर्व प्रार्थनेत आम्ही आपले विचार मांडताना आपल्या मनाची स्थिती उत्तम राखावी हे जरुरीचे आहे.
१४. ज्या शारीरिक दुर्बळता मात करण्यास कठीण वाटतात अशांच्या बाबतीत आपली मनोवृत्ति कशी असावी?
१४ आमच्या आध्यात्मिकतेसोबत लढणाऱ्या आणि मात करण्यास कठीण वाटणाऱ्या अशा काही शारीरिक दुर्बळता आम्हाठायी आहेत का? तर मग याचा स्पष्टरितीने आम्ही आमच्या प्रार्थनात उल्लेख करावा; आणि निराश न होता आम्ही देवाने आमची क्षमा करून आम्हाला मदत द्यावी याविषयीची नम्रपणे याचना करण्याचा कधीही कंटाळा करू नये. आम्ही देवाला त्या दुर्बळतेबद्दल कितीही वेळा प्रार्थना करीत असलो तरीही अशा प्रसंगात, लहान मुलगा अडचणीत सापडला तेव्हा आपल्या वडिलांकडे ज्या उत्कटतेने धाव घेतो त्याप्रमाणे आम्ही यहोवाकडे येण्याची इच्छा केली पाहिजे. आम्ही प्रामाणिक असलो तर यहोवा आम्हाला जरूर मदत देईल आणि त्याने आमची क्षमा केली आहे याची जाणीवही पुरवील. अशा वेळी, पौलाला सुद्धा समस्या होती हे जे त्याने कबूल केले त्यापासून आपल्याला सांत्वन मिळविता येईल.—रोमकर ७:२१-२५.
अर्थभरीत प्रार्थना करण्यात सहाय्यक ठरणाऱ्या गोष्टी
१५. आम्ही कोणत्या मनोदयाने यहोवा देवाला प्रार्थना करावी?
१५ आमच्या प्रार्थना खऱ्याच अर्थभरीत ठरण्यासाठी आम्ही सर्व बाहेरील विचार आमच्या मनातून दूर केले पाहिजे आणि या गोष्टीची जाणीव राखावी की आता आपण थोर देव यहोवा याच्या सान्निध्यात येत आहोत. आम्ही त्याच्यापाशी अत्यंत आदराने आले पाहिजे आणि त्याचा भयप्रेरित दरारा जाणला पाहिजे. यहोवाने मोशेला सांगितले होते की, कोणाही माणसाला देवाला पाहता येत नाही आणि जिवंत राहता येणार नाही. (निर्गम ३३:२०) या कारणास्तव अत्यंत नम्रभावाने व भिडस्तपणे आम्ही त्याच्या समीप यावे. हाच मुद्दा येशूने परुशी व जकातदार यांच्या दाखल्यात आवर्जून सांगितला. (मीखा ६:८; लूक १८:९-१४) यहोवा आपल्याला खरा वाटण्यास हवा. मोशेपाशी जी मनोवृत्ती होती तीच आपल्यापाशीही असावी की, “जो अदृश्य आहे त्याला जणू काय पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (इब्रीयांस ११:२७) अशी ही लक्षणे, आमचे आमच्या स्वर्गातील पित्यासोबत चांगले नातेसंबंध आहेत याची साक्ष देतात.
१६. अर्थभरीत प्रार्थना म्हणण्यात आमचे अंतःकरण कोणती भूमिका करते?
१६ आम्ही आपले अंतःकरण प्रीतीने ओतप्रोत भरले आणि यहोवाविषयीचा कळवळा राखून त्याच्याकडे आलो तर आमच्या प्रार्थना अर्थभरीत होतील. उदाहरणार्थ, स्तोत्रकर्त्या दावीदाने २३ आणि १०३ स्तोत्रात यहोवा देवाविषयीची केवढी रसिकता आणि प्रेम व्यक्त केले बरे! दावीदाने थोर मेंढपाळ यहोवा देवासोबत उत्तम नातेसंबंध राखले होते हे निर्विवाद आहे. इश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत आपण उबदार रितीने आणि भावनेने बोलावे असा आपल्याला सल्ला दिला जातो. ही गोष्ट आम्ही शास्त्रवचनांचे वाचन करतो आणि आपल्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना करतो तेव्हा प्रामुख्यत्वे दृष्टीगोचर झाली पाहिजे. होय, दावीदाला वाटले तसेच आम्हाला सुद्धा वाटले पाहिजे. त्याने प्रार्थना केलीः “हे यहोवा, तुझ्या वाटा मला दाखीव; तुझे मार्ग मला प्रकट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने. मला शिक्षण दे, कारण तू माझा उद्धारक देव आहेस.” प्रार्थनेत आम्हाला कसे वाटायला हवे ते आणखी एका स्तोत्रकर्त्याच्या उद्गारामुळे आपल्याला कळते. तो म्हणालाः “मी अगदी अंतःकरणापासून तुझा धावा करतो; हे यहोवा, तू माझे ऐक.”—स्तोत्रसंहिता २५:४, ५; ११९:१४५.
१७. आमच्या प्रार्थनेत आम्हाला पुनरावृत्ति कशी टाळता येईल?
१७ आमच्या प्रार्थना अर्थभरीत व्हाव्यात आणि त्यात पुनरावृत्ति टाळावी यासाठी त्यातील विचारांच्या माहितीत बदल राखला पाहिजे. दिवसासाठी असणारे वचन किंवा आम्ही वाचन करीत असलेले एखादे ख्रिस्ती प्रकाशन आम्हाला काही विचार सुचवील. टेहळणी बुरुज, जाहीर व्याख्यान, संमेलन किंवा अधिवेशन यांचे शीर्षक आमचा हा विशिष्ट उद्देश पूर्ण करू शकेल.
१८. आमच्या प्रार्थना अधिक अर्थभरीत होण्यासाठी पवित्र शास्त्रीय वचने व उदाहरणांच्या अनुषंगाने आपण काय करू शकतो?
१८ आम्हाला प्रार्थनेच्या आत्म्याशी जुळते घेता यावे आणि त्या अधिक अर्थभरीत कराव्या यासाठी आमची शारीरिक स्थिती बदलणे सुयुक्त वाटेल. जाहीरपणे केल्या जाणाऱ्या प्रार्थनेत, अर्थातच, आपण आपली डोकी लववितो. पण आमच्या व्यक्तिगत प्रार्थनांसाठी काहींना वैयक्तिकपणे वा कौटुंबिकरित्या एकत्र येऊन यहोवापुढे गुडघे टेकून प्रार्थना करणे बरे वाटते, कारण अशी स्थिती, नम्र मानसिक वृत्ति राखण्यात अधिक उपयुक्त ठरते. स्तोत्रसंहिता ९५:६ मध्ये आपल्याला असे आर्जविण्यात आले आहेः “याहो, या, यहोवा जो आपला उत्पन्नकर्ता, त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू, त्याची भक्ती करू, त्यापुढे नमन करू.” यहोवाच्या मंदिराचे समर्पण करताना शलमोनाने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दानिएलाने प्रार्थना करताना गुडघे टेकून करण्याचा प्रघात ठेवला.—२ इतिहास ६:१३; दानिएल ६:१०.
१९. ज्यांना जाहीरपणे प्रार्थना करण्याची जबाबदारी आहे अशांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे बरे?
१९ प्रार्थनेचे मूल्य ओळखून नियुक्त वडीलांनी, मंडळीच्या वतीने जाहीर प्रार्थना करण्यासाठी कोणाला आमंत्रित करावे याविषयीचा योग्य निवाडा राखण्यास हवा. मंडळीचे प्रतिनिधित्व करणारा बाप्तिस्मा झालेला पुरुष प्रौढ ख्रिस्ती उपाध्याय असला पाहिजे. त्याच्या प्रार्थनेकरवी, तो देवासोबत सुंदर नातेसंबंध राखून असल्याचे प्रदर्शित झाले पाहिजे. ज्यांना प्रार्थना करण्यास बोलाविले जाते अशांनी आपली प्रार्थना सर्वांना ऐकली जात आहे याचा विचार राखावा, कारण ते केवळ स्वतःसाठी नव्हे तर सबंध मंडळीसाठी प्रार्थना करीत असतात. मंडळीने ही प्रार्थना ऐकलीच नाही तर ते शेवटाला “आमेन” तरी कसे म्हणणार? (१ करिंथकरास १४:१६) अर्थात, इतरांनी अर्थपूर्णतेने “आमेन” असे म्हणावयाचे आहे तर यांनी प्रार्थना होतेवेळी आपले लक्ष इकडेतिकडे वावरु न देता ती लक्षपूर्वक ऐकली पाहिजे व ती जणू आपलीच बनविली पाहिजे. याबद्दल सावधानीचा इशारा असा आहे की, ह्या प्रार्थना यहोवा देवाला केल्या जात असल्यामुळे यांचा वापर श्रोतेगणांना प्रचार म्हणून किंवा स्वतःच्या व्यक्तिगत कल्पना सादर करण्यासाठी होऊ नये.
२०. मोठ्याने करण्यात येणाऱ्या अर्थभरीत प्रार्थना ऐकणाऱ्यांना आशीर्वाद अशा ठरत असल्यामुळे कोणते प्रस्ताव सुचविण्यात आले आहेत?
२० मोठ्याने केल्या जाणाऱ्या प्रार्थना अर्थभरीत असतात तेव्हा त्या ऐकणाऱ्याला आशीर्वाद देत असतात. हे असे असल्यामुळे विवाहीत जोडपे आणि कुटुंबे यांनी निदान एक तरी सर्वसाधारण प्रार्थना करावी हे बरे आहे. यात एक जण म्हणजे सहसा कुटुंब चालक दुसऱ्यासाठी किंवा बाकीच्या लोकांसाठी प्रार्थना करील.
२१. आमच्या प्रार्थना अर्थभरीत होण्यासाठी आणखी कोणत्या एका गोष्टीचा विचार राखला पाहिजे?
२१ आमच्या प्रार्थना खऱ्याच अर्थभरीत ठरण्यासाठी आणखी एका गोष्टीचा विचार करणे आहे. तो हा की, आम्ही आमच्या प्रार्थनांशी सुसंगत असले पाहिजे. याचा अर्थ काय होतो? हाच की आम्ही आमच्या प्रार्थनेनुसार जगले पाहिजे आणि ज्यासाठी प्रार्थना केली आहे त्यानुरुप काम केले पाहिजे. प्रार्थनेविषयीची ही माहिती आपण पुढील लेखात विचारात घेणार आहोत.
तुम्ही कसा प्रतिसाद द्याल?
◻ शास्त्रवचनात लिखित असणाऱ्या अर्थभरीत प्रार्थनांपैकी काही कोणत्या आहेत?
◻ मानवी अपूर्णतेमुळे आमच्या प्रार्थनांत वैगुण्य कसे येऊ शकते?
◻ आमच्या प्रार्थनांतील काही वैगुण्यावर आम्हाला कशी मात करता येईल?
◻ अर्थभरीत प्रार्थना सादर करण्यातील काही साहाय्यक गोष्टी कोणत्या आहेत?