वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १/१ पृ. १५-२०
  • प्रार्थनेला कामाची गरज आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रार्थनेला कामाची गरज आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रार्थनेला कामाची का गरज आहे?
  • काही प्राचीन उदाहरणे
  • येशूचे उदाहरण
  • तत्वाचे अवलंबन करणे
  • प्रार्थना आणि आमचे साक्षीकार्य
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
    बायबल नेमके काय शिकवते?
  • देवाला प्रार्थना करण्याचा बहुमान
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • प्रार्थनेतून मदत कशी मिळवावी
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • तुमच्या प्रार्थना केवढ्या अर्थभरीत आहेत?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १/१ पृ. १५-२०

प्रार्थनेला कामाची गरज आहे

“यहोवा दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो धार्मिकांची प्रार्थना ऐकतो.”—नीतीसूत्रे १५:२९.

१. देवाने आमच्या प्रार्थनेचे उत्तर द्यावयाचे आहे तर कोणती गरज पूर्ण केली पाहिजे?

यहोवाकडील सर्व गरजा सूज्ञ, न्याय्य आणि प्रेमळ आहेत. त्या भारी नाहीत. (१ योहान ५:३) यामध्ये प्रार्थनेविषयीची गरज आहे, ती अशी की आम्ही आमच्या प्रार्थनेनुरुप आपले जीवन व्यतित केले पाहिजे. आमच्या कृतीने यहोवा देवास संतुष्ट करण्यास हवे. जर असे झाले नाही तर तो आमच्या विनंत्या व याचनांना संमतीकारकपणे कसे उत्तर देणार?

२, ३. यशया, यिर्मया आणि मीखा यांच्या लिखाणांचे परिक्षण करता, यहोवाने इस्त्राएलांच्या प्रार्थनांना उत्तर का दिले नाही असे कळते?

२ प्रार्थनेचा हा असा भाग आहे ज्याच्याकडे ख्रिस्ती धर्मराज्यातील बहुतेकांचे दुर्लक्ष होत आहे. अशाच प्रकारचे दुर्लक्ष इस्त्राएलांनी यशयाच्या काळात दाखविले होते. याच कारणास्तव यहोवाने संदेष्ट्याला आपला प्रतिनिधि या नात्याने त्यांना असे कळविण्यास लाविलेः “तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरीही मी ऐकत नाही. . . . आपणास धुवा व स्वच्छ करा. माझ्या डोळ्यापुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करण्यास शिका.” (यशया १:१५-१७) होय, इस्त्राएलांना देवाची कृपापसंती मिळविण्यासाठी त्याला संतुष्ट वाटणाऱ्‍या मार्गाने आपली हालचाल ठेवावयाची होती. तद्वत, “तुम्ही देवास प्रार्थना केल्यावर देवाने तुमचे ऐकावे असे तुम्हास वाटते तर तो जेव्हा बोलतो तेव्हा तुम्हीही त्याचे ऐकणे जरुरीचे आहे” असे जे म्हणण्यात आले ते अगदीच सार्थ आहे.

३ या सत्याच्या बाबतीत यहोवाला आपल्या लोकांना वेळोवेळी स्मरण देण्याची गरज भासली. आम्ही असे वाचतोः “धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान फिरवितो त्याची प्रार्थना देखील [देवाला] वीट आणणारी आहे.” “यहोवा दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो धार्मिकांची प्रार्थना ऐकतो.” (नीतीसूत्रे २८:९; १५:२९) या वस्तुस्थितीमुळेच यिर्मयाने विलाप केलाः “तू [यहोवा] आपणास स्वतःस अभ्राने आच्छादिले. प्रार्थनेचा त्यामधून प्रवेश होत नाही.” (विलापगीत ३:४४) मीखाने जो इशारा वदविला होता तो निश्‍चितार्थाने पूर्ण झालाः “त्या समयी ते यहोवाला आरोळी मारतील तरी तो त्यांचे ऐकावयाचा नाही. तो त्या समयी त्यांना परांड्‌.मुख होईल, कारण त्यांनी दुष्कृत्ये केली आहेत.”—मीखा ३:४; नीतीसूत्रे १:२८-३२.

४. प्रार्थनेनुरुपची कृत्ये आचरली पाहिजेत याविषयीची रसिकता यहोवाच्या लोकांपैकी काही जनांमध्ये नाही हे कशावरुन दिसते?

४ अशाप्रकारे आम्हाला आपल्या प्रार्थनेनुरूप जगणे जरुरीचे आहे. आज या गोष्टीवर अधिक भर देण्याची गरज आहे का? होय, कारण ख्रिस्ती धर्मराज्यातील स्थितीमुळेच नव्हे तर यहोवाच्या समर्पित लोकांतील काहींच्या स्थितीमुळे हे सांगणे जरुरीचे भासत आहे. गेल्या वर्षी सुवार्ता प्रचार करणारे ३० लाखापेक्षा अधिक प्रचारक होते तरी यापैकीच्या ३७,००० पेक्षा अधिक लोकांना, त्यांनी ख्रिस्तीजनास शोभेल अशी वागणूक न आचरल्यामुळे बहिष्कृत करावे लागले. याचा अर्थ हा की, दर ८० मागे एकजण बहिष्कृत झाला. या विशिष्ठांनी प्रार्थना ह्‍या केल्याच असतील. पण ते प्रार्थनांनुरुप हालचाल करीत होते का? मुळीच नाही! पूर्ण वेळेच्या कार्यात काही दशके असणाऱ्‍या काही वडीलांना देखील या वा त्या मार्गाने शिस्त लावण्यात आली. हे किती दुःखाचे आहे! खरेच, “आपण उभे आहोत असे ज्यास वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे” ते या अर्थी की, त्याने अशा मार्गाने हालचाल आक्रमू नये की ज्यामुळे त्याच्या प्रार्थना त्याच्या निर्माणकर्त्यास स्विकृत ठरणार नाहीत.—१ करिंथकर १०:१२.

प्रार्थनेला कामाची का गरज आहे?

५. यहोवाने आमच्या प्रार्थनांना उत्तर द्यावयाचे आहे तर आम्ही आपला प्रांजळपणा कसा सिद्ध करून दाखविला पाहिजे?

५ यहोवा देवाने आमच्या प्रार्थना ऐकावयाच्या आहेत तर आम्ही नैतिकदृष्ट्या व आध्यात्मिक रितीने शुद्ध राहून उपयोगाचे नाही तर आम्ही ज्याकरता प्रार्थना करीत आहोत त्याविषयीचे काम करून आपल्या प्रार्थनेची प्रांजळता सिद्ध करून दाखविली पाहिजे. प्रार्थना ही काही प्रामाणिक, बौध्दिक प्रयत्नांचा पर्याय नव्हे. आम्हाला देवाच्या वचनातील सूचनांचा पराकाष्ठेने अवलंब करून आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाला अनुसरून जे काही करता येणे शक्य आहे ते यहोवा आमच्यासाठी करणार नाही. याबाबतीत आम्हाला करता येण्याजोगे सर्व काही आम्ही केले पाहिजे की ज्यामुळे आमच्या प्रार्थनांना उत्तर देण्याचा त्याला काही आधार मिळेल. तद्वत, जसे एकाने म्हटले की, ‘आम्हाला जेवढे काम करण्याची स्वेच्छा आहे त्यापेक्षा अधिकाची मागणी आपण करू नये,’ ते अगदीच योग्य आहे.

६. आम्ही कोणत्या दोन कारणांसाठी प्रार्थना करावी?

६ तरीपण हा प्रश्‍न येतो कीः ‘आम्ही ज्याविषयी प्रार्थना करतो त्याकरता जर काम करायचेच आहे तर मग प्रार्थना तरी का करावी?’ आम्ही दोन कारणास्तव प्रार्थना करावी. पहिले हे की, आमच्या प्रार्थनेच्या द्वारे, सर्व चांगल्या गोष्टी देवापासून येत असतात याची आम्ही कबूली देत असतो. तोच सर्व चांगल्या व परिपूर्ण देणगींचा—सूर्यप्रकाश, पाऊस, फलदायी ऋतु, आणि आणखी पुष्कळ गोष्टींचा— दाता आहे. (मत्तय ५:४५; प्रे. कृत्ये १४:१६, १७; याकोब १:१७) दुसरे हे की, आमचे प्रयत्न यशस्वी ठरणार की नाही हे यहोवाच्या आशीर्वादावर अवलंबून आहे. स्तोत्रसंहिता १२७:१ मध्ये आम्ही तेच वाचतोः “यहोवा घर बांधीत नाही तर ते बांधणाऱ्‍याचे श्रम व्यर्थ आहे. यहोवा नगर रक्षीत नाही तर पहारेकऱ्‍याचे जागणे व्यर्थ आहे.” हाच मुद्दा प्रेषित पौलाने करिंथकरांस पहिले पत्र ३:६, ७ मध्ये याप्रकारे मांडलाः “मी लाविले, अप्पुलोसाने पाणी घातले, पण देवाने वाढविले. यास्तव लावणारा काही नाही व पाणी घालणाराही काही नाही. तर वाढविणारा देव कायतो आहे.”

काही प्राचीन उदाहरणे

७, ८. (अ) प्रार्थनेसोबत कामेही केली पाहिजे याची रसिकता आपणाठायी आहे हे याकोबाच्या जीवनातील कोणत्या घटनेद्वारे दिसते? (ब) याबाबतीत दावीद राजाने कोणते उदाहरण घालून दिले?

७ यहोवाच्या सेवकांनी ज्यासाठी प्रार्थना केली त्यानुरुपचे काम आचरले हे दाखविण्याजोगी शास्त्रवचनात बरीच प्रकरणे आहेत. तथापि, आपण यापैकीची काही प्रातिनिधिक उदाहरणे पाहू या. अब्राहामाचा नातू याकोब याने ज्येष्ठत्वानुरुपचा आशीर्वाद मिळविला म्हणून त्याचा थोरला भाऊ एसाव याने त्याच्याविषयी आपल्या मनात घातकी द्वेष धरला. (उत्पत्ती २७:४१) सुमारे २० वर्षांनी याकोब पदन-अराम येथून निघून आपल्या मोठ्या घरकुलासमवेत व प्रचंड पशुधन सोबत घेऊन जन्मस्थळी निघाला तेव्हा आपल्याला भेटावयाला एसाव येत आहे हे त्याने ऐकले. एसावाचे वैर स्मरुन याकोबाने भावाच्या रागापासून संरक्षण मिळावे यासाठी यहोवाला मोठ्या कळकळीने प्रार्थना केली. पण यानंतर तो शांत बसला का? नाही. त्याने औदार्याच्या देणग्या आपणापुढे पाठविल्या आणि हा विचार केला की, ‘पुढे भेट पाठवून त्यास शांत करता येईल.’ आणि तसेच घडले. जेव्हा दोघे भाऊ एकमेकांना भेटले तेव्हा एसावाने याकोबाला आलिंगन देऊन त्याचे मुके घेतले.—उत्पत्ती अध्याय ३२, ३३.

८ आम्ही ज्याविषयी प्रार्थना करतो त्याच्या अनुषंगाने काम करावे याचे उदाहरण दाविदाने दिले. त्याचा मुलगा अबशालोम याने त्याच्या राज्यपदाविरूद्ध बंडाळी केली तेव्हा दाविदाचा सल्लागार अहिथोफेल याने अबशालोमाची बाजू धरली. तेव्हा दाविदाने अत्यंत कळकळीने विनवणी केली केली की अहिथोफेलचा सल्ला उधळला जावा. मग दाविदाने नुसती प्रार्थना करून पुरे केले का? नाही, त्याने आपला निष्ठावंत सल्लागार हुशाय याला अबशालोमला जाऊन मिळण्याची आणि त्याकरवी अहिथोफेलचा सल्ला उधळून लावण्याची सूचना केली. आणि अगदी अशाच प्रकारे घडून आले. हुशायने दिलेल्या वाईट सल्ल्याचे अबशालोमने अनुकरण केले; त्याने अहिथोफेलचा सल्ला अमान्य केला.—२ शमुवेल १५:३१-३७; १७:१-१४; १८:६-८.

९. प्रार्थनेला कामाची गरज आहे ह्‍या तत्वाविषयीची रसिकता आपणाठायी आहे हे नेहम्याने कसे दाखविले?

९ आमच्या सूचनेस्तव जे आणखी एक उदाहरण देता येईल ते नेहम्याचे आहे. त्याला यरुशलेमाच्या तटाची पुनर्रचना करण्याचा मोठा प्रकल्प पूर्ण करावयाचा होता. पण बहुतेक शत्रु त्याच्यावर टपून बसले होते. तद्वत, नेहम्याने प्रार्थनाही केली व त्यानुरुपचे कामही केले, जसे आम्ही वाचतोः “आम्ही आपल्या देवाची प्रार्थना केली आणि . . . त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेवली.” तेव्हापासून नेहम्यापाशी असणारे अर्धे तरुण जन संरक्षणाची फळी करून होते तर बाकीचे अर्धे तटाचे काम करीत राहिले.—नेहम्या ४:९, १६.

येशूचे उदाहरण

१०, ११. येशूने असे कोणते उदाहरण पुरविले की ज्याद्वारे हे स्पष्ट झाले की त्याने आपल्या प्रार्थनेच्या अनुषंगाने हालचाल केली?

१० आम्ही प्रार्थना करतो तर त्यानुरुपचे कामही केले पाहिजे याविषयीचे उत्तम उदाहरण येशू ख्रिस्ताने पुरविले. त्याने आम्हास प्रार्थना करण्यास शिकविलेः “तुझे नाम पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) पण येशूला जे करता आले ते सर्व त्याने केले व त्यामुळेच त्याच्या श्रोत्यांना त्याच्या पित्याचे नाम पवित्र मानता आले. याशिवाय, “हे पित्या, तू आपल्या नामाचे गौरव कर” एवढीच प्रार्थना करून येशू शांत बसला नाही. (योहान १२:२८) नाही. आपल्या पित्याच्या नावाचे गौरव व्हावे म्हणून त्याला जे करता आले ते त्याने केले आणि इतरांनाही तसेच करण्याचे प्रोत्साहन दिले.—लूक ५:२३-२६; १७:१२-१५; योहान १७:४.

११ लोकांची आध्यात्मिक गरज किती मोठी आहे ते पाहून येशूने आपल्या शिष्यांना म्हटलेः “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; यास्तव, पिकाच्या धन्याने [यहोवा देवाने] आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्तय ९:३७, ३८) यानंतर येशूने हे प्रकरण तेथेच सोडून दिले का? मुळीच नाही! यांनतर लगेच, त्याने त्याच्या बारा प्रेषितांना जोडीने प्रचार कार्याला वा ‘कापणी’साठी पाठविले. काही काळाने येशूने आणखी ७० सुवार्तिकांना हेच काम करण्यासाठी पाठविले.—मत्तय १०:१-१०; लूक १०:१-९.

तत्वाचे अवलंबन करणे

१२. देवाने आम्हाला दैनंदिन आहार द्यावा या आमच्या प्रार्थनेवर कामाचे कसे प्रभुत्व आहे?

१२ आम्ही आमच्या प्रार्थनेशी सुसंगत असावे, त्यानुरुप असणारी योग्य ती हालचाल करून आपली प्रांजळता दाखवावी हे यहोवा देव स्पष्टपणे अपेक्षितो. येशूने आम्हाला प्रार्थना करावयास शिकविलेः “आमची रोजची भाकर आज आम्हास दे.” (मत्तय ६:११) यास्तव त्याच्या अनुयायांनी देवाकडे यासाठी याचना करणे उचित आहे. पण याकरता काहीही हालचाल न करता, बसल्या जागीच देवाने, आमच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून वाढलेले ताट आणून ठेवावे असे अपेक्षिता येईल का? मुळीच नाही! यासाठीच आम्ही हे वाचतोः “आळशाच्या जिवाला हाव असते,”—व तो त्यासाठी प्रार्थना देखील करतो—“तरी त्याला काही मिळत नाही.” (नीतीसूत्रे १३:४) हाच मुद्दा प्रेषित पौलाने २ थेस्सलनीकाकर ३:१० मध्ये असा सांगितलाः “कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊहि नये.” तद्वत, रोजच्या अन्‍नासाठी प्रार्थना करण्यासोबत काम करण्याची स्वेच्छाही असली पाहिजे. पौलाने काय म्हटले ते लक्षात घ्या की, ज्याची “काम करण्याची इच्छा नसेल” त्याने खाऊ नये. काही असे आहेत ज्यांची काम करण्याची इच्छा आहे पण ते बेकार, आजारी किंवा बरेच वयस्कर आहेत. यांची काम करण्याची इच्छा असते पण परिस्थिती आटोक्याबाहेर असते. तद्वत, असे लोक दैनिक आहारासाठी उचितरित्या प्रार्थना करू शकतात आणि त्याच्या प्राप्तीची आशा करू शकतात.

१३. पवित्र आत्मा मिळावा याकरता केलेल्या प्रार्थनेस यहोवाने उत्तर द्यावयाचे आहे तर आम्ही काय केले पाहिजे?

१३ आम्ही आपल्या स्वर्गातील पित्याकडे पवित्र आत्मा मिळावा यासाठीही प्रार्थना करावी असा सल्ला येशूने दिला. जसे दैहिक पालक आपल्या मुलांना हव्या असणाऱ्‍या चांगल्या गोष्टी देतात त्याचप्रमाणे देवही आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देण्यास अधिक इच्छुक आहे याची खात्री येशूने दिली. (लूक ११:१३) पण आम्ही काहीही प्रयत्न न करता, यहोवा देवाने अगदी अद्‌भुत रितीने पवित्र आत्मा द्यावा असे आम्हाला अपेक्षिता येईल का? नाही! पवित्र आत्मा मिळण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या सर्व गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत. त्यासाठी प्रार्थना करण्यासोबत आम्ही देवाच्या वचनाने स्वतःला सातत्याने भरवीत राहिले पाहिजे. ते का बरे? कारण यहोवा देव त्याच्या पवित्र शास्त्राव्यतिरिक्‍त पवित्र आत्मा देत नाही. तसेच आज यहोवा पृथ्वीवरील त्याचे माध्यम “विश्‍वासू व बुद्धीमान दास”, जो यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळात प्रातिनिधिकपणे दिसतो, त्याकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला पवित्र आत्मा मिळण्याची आशा धरता येणार नाही. या “दासा”च्या मदतीशिवाय आम्ही जे वाचतो त्याचा पूर्ण अर्थ आम्हाला उमगू शकणार नाही व शिवाय जे शिकलो त्याचा कसा अवलंब करावा हेही माहीत होणार नाही.—मत्तय २४:४५-४७.

१४, १५. (अ) ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच्या आमच्या प्रार्थनेला यहोवाने उत्तर द्यावयाचे आहे तर आम्ही कोणते सहकार्य दिले पाहिजे? (ब) हे शलमोन राजाच्या उदाहरणात कसे दिसून आले?

१४ प्रार्थनेला कामाची गरज लागते हे तत्व, येशूचा दूधभाऊ शिष्य याकोब याच्या या शब्दांनाही लागू होतेः “तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो.” (याकोब १:५; मत्तय १३:५५) पण देव आज आपल्याला कोणा अद्‌भूत रितीने ज्ञान देतो का? नाही. प्रथमतः आपल्याठायी सरळ मनोदय असला पाहिजे. त्याविषयी आम्ही वाचतोः “तो दीनांस आपला मार्ग शिकवितो.” (स्तोत्रसंहिता २५:९) पण देव “दीनांस” कसे शिकवितो? त्याच्या वचनाद्वारे. तर मग, आपण देवाचे वचन समजण्यासाठी व त्यानुरुप अवलंब करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे जे नीतीसूत्रे २:१-६ मध्ये स्पष्ट आहेः “माझ्या मुला, जर तू माझी ही वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले अंतःकरण समंजसपणाकडे लावशील, जर तू समजबुद्धीला हाक मारशील, आणि समंजसपणाला बोलावशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करशील, . . . तर यहोवाच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण यहोवा ज्ञान देतो.”

१५ शलमोन राजाने देवाकडे बुद्धीमत्तेसाठी प्रार्थना केली व देवाने त्याच्या प्रार्थनेचे अद्‌भुतरित्या उत्तर दिले, यावेळी प्रार्थनेला कामाची गरज असते या तत्वाचे अवलंबन झाले का? होय, कारण इस्त्राएलाचा राजा या नात्याने शलमोनावर देवाच्या नियमशास्त्राची स्वतःच्या हाताने नक्कल तयार करण्याची, दररोज त्याचे वाचन करण्याची व त्याचा अवलंब आपल्या जीवनात करण्याची जबाबदारी होती. पण जेव्हा शलमोन या सूचनांविरूद्ध गेला व त्याने आपल्या बायका आणि घोडदळ वाढविले तेव्हा त्याची कामे त्याच्या प्रार्थनेच्या अनुषंगाने राहिली नाहीत. तो धर्मत्यागी बनला व एखाद्या ‘मूर्खाप्रमाणे’ वारला.—स्तोत्रसंहिता १४:१; अनुवाद १७:१६-२०; १ राजे १०:२६; ११:३, ४, ११.

१६. आमच्या शारीरिक अशक्‍तपणावर मात करण्यासाठी प्रार्थना करण्यासोबत काम करण्याचीही गरज आहे हे कोणत्या उदाहरणाद्वारे दिसते?

१६ प्रार्थनेला कामाची गरज आहे हे तत्व, आम्ही देवाला आपणातील काही मुळावलेल्या स्वार्थी सवया काढून टाकण्यास मदत मिळावी म्हणून प्रार्थना करतो त्यावेळेही लागू होणारे आहे. एका पायनियर भगिनीने कबूल केले की ती दरदिवशी सकाळी ११ ते दुपारी ३.३० पर्यंत चालणारी नाटकाची मालिका बघत होती. यात दाखविण्यात येणारे अनैतिक कार्यक्रम किती धोकादायक ठरतात हे प्रांतिय अधिवेशनातील एका भाषणात ऐकल्यावर तिने आपले प्रकरण देवापुढे प्रार्थनेने नेले. पण तिला आपल्या सवयीवर मात करण्यात थोडा अधिक वेळ लागला. ते का? कारण ती म्हणाली की, ‘मी माझ्या सवयीवर मात करता यावी म्हणून प्रार्थना करी पण सोबत कार्यक्रम बघणे सुध्दा चालू ठेवत असे. याकरता मी हे ठरविले की मी आपला दिवसभरचा वेळ क्षेत्रकार्यात घालवावा म्हणजे तो मोह येणार नाही. तेव्हा मला बळ आले की सकाळी टीव्ही बंद करावा व तो त्यानंतर दिवसभर बंद राहिला.’ होय, आपल्यातील अशक्‍तपणा घालवून देण्यासाठी प्रार्थना करण्याबरोबरच तिला त्यावर मात करण्यासाठी काम करावे लागले.

प्रार्थना आणि आमचे साक्षीकार्य

१७-१९. (अ) यहोवाचे साक्षीदार आपल्या प्रार्थनेनुरुप काम करतात हे कोणत्या गोष्टीद्वारे दिसते? (ब) एका विशिष्टाचे उदाहरण देखील तोच मुद्दा कसा स्पष्ट करते?

१७ प्रार्थनेला कामाची गरज आहे हे तत्व राज्य प्रचाराच्या कामाशिवाय इतरत्र अधिकपणे कोठेही लागू होणार नाही. यामुळेच, यहोवाचे सर्व साक्षीदार कापणीच्या कामासाठी अधिक कामकरी मिळावेत म्हणून प्रार्थना करतात पण सोबत या कामात ते भागही घेतात. याचा परिणाम हा झाला की त्यांना एकामागून दुसऱ्‍या देशात प्रचंड वाढ अनुभवण्यास मिळाली. याचे एक उदाहरण पाहू जाता, चिलीमध्ये १९३० मध्ये केवळ एकच यहोवाचा साक्षीदार प्रचार करीत होता. आज त्या एका साक्षीदाराचे फक्‍त हजारच नव्हे तर ३०,००० पेक्षा अधिक साक्षीदार झाले आहेत! (यशया ६०:२२) तर हा केवळ प्रार्थनेचा परिणाम होता का? नाही. यात काम समाविष्ट होते. १९८६ मध्ये चिलीतील यहोवाच्या साक्षीदारांनी प्रचाराच्या कामात ६४,९२,००० पेक्षाही अधिक तास खर्च केले!

१८ हीच गोष्ट प्रचारकार्यास बंदी असते तेव्हा लागू होते. येथेही साक्षीदार वाढीसाठी केवळ प्रार्थना करीत नाही तर भूमिगतरित्या कार्य करीत राहतात. त्यामुळेच शासकीय विरोध असताना देखील अशा देशात वाढ अनुभवण्यास मिळाली. यहोवाच्या साक्षीदारांना जेथे शासकीय विरोध आहे त्या ३३ देशात त्यांनी १९८६ या कार्यवर्षात आपल्या प्रचार कार्यात ३,२६,००,००० तास खर्च केले आणि ४.६ टक्के वाढीचा आनंद अनुभवला!

१९ वस्तुतः प्रार्थनेला कामाची गरज आहे हे तत्व व्यक्‍तिगतपणेही लागू होणारे आहे. आम्ही कदाचित आम्हास एखादा पवित्र शास्त्र अभ्यास मिळावा याकरता यहोवास प्रार्थना करीत असू पण तो मिळविण्यासाठी आवश्‍यक असणारी हालचाल मात्र आमच्याकडून घडत नसेल. हाच एक पायनियरचा अनुभव होता. तिला एक पवित्र शास्त्र अभ्यास होता पण आणखी एक असावा म्हणून तिने प्रार्थना केली. पण मग, तिने नुसत्या प्रार्थनेवर ते सोडले का? नाही, तिने आपल्या कार्याच्या नोंदी काळजीपूर्वकतेने केल्या होत्या पण तिला हे दिसले की परत भेट घेतेवेळी ती पवित्र शास्त्र अभ्यासाचा प्रस्ताव मांडीत नव्हती. यावर काम केल्यावर तिला दोन अधिक पवित्र शास्त्र अभ्यास मिळाले.

२०. तर मग प्रार्थनेला कामाची गरज असते हे तत्व सारांशरित्या कसे सांगता येईल?

२० अशाप्रकारे, प्रार्थनेला कामाची गरज आहे हे दाखविणारी आणखी पुष्कळ उदाहरणे देता येतील. उदाहरणार्थ कुटुंब किंवा मंडळीतील व्यक्‍तिगत नातेसंबंधाच्या बाबतीतही सांगता येईल. पण वर सांगण्यात आलेली उदाहरणे, प्रार्थनेस कामाची गरज आहे हे सांगण्यास पुरेशी आहेत. हे अगदी व्यवहार्य आहे. कारण जर आपण आपल्या वागणूकीद्वारे यहोवा देवाला दुखविले तर आमच्या प्रार्थनांना त्यांने संमतीकारक उत्तर द्यावे अशी आपल्याला अपेक्षाच धरता येणार नाही. आपल्याला जे जमू शकणार नाही ते यहोवाने आमच्यासाठी करावे असे आपल्याला वाटते तर आमच्या प्रार्थनेच्या अनुषंगाने होता होईल तेवढे सर्वकाही करण्याचा आमचा प्रयत्न राहिला पाहिजे. यहोवाचे तत्व खरेच सूज्ञ व न्याय्य आहेत. त्यात अर्थ आहे. तद्वत त्यांच्या सहमतात आम्ही आपली हालचाल ठेवणे हे आमच्याच फायद्याचे आहे. (w87 7/15)

तुम्हास आठवते का?

◻ प्रार्थनेविषयीची कोणती गरज इस्त्राएलातील पुष्कळांनी नजरेआड केली होती?

◻ आम्ही ज्याविषयीची इच्छा करतो त्याविषयी प्रार्थना करावी आणि त्याच्या अनुषंगाने कामही करावे असे अपेक्षिण्यात देव अव्यवहार्य का ठरत नाही?

◻ यहोवाच्या सेवकांनी ज्याविषयी प्रार्थना केली त्याविषयी कामही केले हे कोणती प्राचीन उदाहरणे दाखवतात?

◻ पवित्र आत्मा व बुद्धी लाभावी याकरता केलेली प्रार्थना देवाने ऐकावी असे वाटते तर आम्ही काय केले पाहिजे?

◻ प्रार्थनेला कामाची गरज आहे हे तत्व आमच्या क्षेत्रकार्याच्या बाबतीत कसे लागू होते?

[१७ पानांवरील चित्रं]

येशूने आपल्या शिष्यांना कापणीसाठी अधिक कामकरी मिळावेत म्हणून प्रार्थना करायला सांगितले. पण यासोबत त्याने त्यांना प्रचाराच्या किंवा कापणीच्या कामास पाठविले

[१८ पानांवरील चित्रं]

दुरदर्शनवरील कार्यक्रम बघण्यावर ताबा ठेवता यावा यासाठी तुम्ही प्रार्थना करता का? तर मग प्रार्थनेला कामाची गरज आहे या तत्वाचा अवलंब करण्यासाठी तुमचा दुरदर्शन संच बंद करा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा