समर्पण व बाप्तिस्म्याद्वारे देवाबरोबर शांती मिळविणे
“यहोवा त्याला म्हणाला: ‘. . . ज्यावर चिन्ह असेल त्यांस स्पर्श करू नको.’”—यहेज्केल ९:४, ६.
१, २. (अ) सर्वसाधारण लोक देवाबरोबर शांतीसंबंधात का नाहीत? (ब) अशा या शांतीची प्राप्ती करणे सर्वासाठी महत्वपूर्ण का आहे?
देवाबरोबर शांतीची प्राप्ती? पण का? खरेतर खूपच थोडे लोक असे आहेत की ज्यांना आपण देवाविरुद्ध आहोत असे वाटत असते. पण देवाचा खरा शत्रू असून एखाद्यास त्याची जाणीव नसते असे काही घडू शकते का? प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना याची स्पष्टता करताना म्हटले: “आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो. आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.”—इफिसकर २:३.
२ याचप्रमाणे आजही देवास संतुष्ट करण्याची तुमची स्वतःची इच्छा असली तरी आदामापासून अनुवंशिकतेने लाभलेले पाप तुमच्या दृष्टीकोणावर परिणाम करते व तुम्हाला “दैहिक वासनांना अनुरूप” असे वागण्यास प्रलोभित करते. तुम्ही कोणा यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास घेणारे आस्थेवाईक असाल किंवा अद्याप बाप्तिस्मा न झालेले युवक असाल ज्यांचे पालक साक्षीदार आहेत, तरीसुद्धा स्व–केंद्रित व ‘मला वाटते त्याप्रमाणे वागीन’ ही प्रवृत्ती तुमच्या जीवनमानावर प्रभुत्व गाजवून राहिली असेल व याकरवीच तुम्हाला देवापासून दुरावलेल्या स्थितीत राहण्यासाठी प्रवृत्त केले जात असेल. अशाप्रकारचे मार्गाक्रमण राखणारा कोणीही माणूस “स्वतःकरता क्रोध साठवून ठेवत” असतो. (रोमकर २:५; कलस्सैकर १:२१; ३:५–८) लवकरच देव, त्याच्या त्वरेने येत असलेल्या “क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवशी” आपला राग पूर्णपणे व्यक्त करील. (रोमकर १:२८–२:६) तर मग, तुम्हाला देवासोबतची शांती कशी प्राप्त करता येईल व त्याच्या “क्रोधाच्या दिवसा”पासून कसे वाचता येईल?
शांतीसाठी असणारा पाया
३. देवाने समेटाचा आधार कसा पुरविला?
३ याबद्दलची मदत देण्यात यहोवाने स्वतः पहिले पाऊल उचलले. “त्याने तुम्हाआम्हावर प्रीती केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्चित व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले.” (१ योहान ४:१०) येशूचे यज्ञार्पित मरण हे प्रायश्चित आहे, म्हणजे ते देवाच्या न्यायास पूर्ण किंवा संतुष्ट करते. यामुळे पापाच्या पश्चातापाचा ओघाओघाने देव व मनुष्य याजमधील वैरत्वास काढून टाकण्याचा कायदेशीर आधार सापडतो. होय, प्रेषित पौलाने लिहिले त्याप्रमाणे “देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्युद्वारे आपला समेट” होणे शक्य आहे.—रोमकर ५:८–१०.
४. यहेज्केलाला अद्यावत असा कोणता दृष्टांत दिला गेला, व तो आम्हास का महत्वाचा आहे?
४ तरीपण ख्रिस्ताच्या यज्ञार्पणापासून व्यक्तिगतपणे लाभ प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही काही विशिष्ट पावले स्वतः उचलली पाहिजे. याची माहिती आम्हाला यहेज्केल संदेष्ट्यास दिलेल्या नाट्यमय दृष्टांतात सूचित केलेली आहे. तो दृष्टांत आता आमच्या काळी देवाच्या “क्रोधाचा दिवस” समीप येत आहे तेव्हा पूर्ण होत आहे. देवाकडील न्यायदंड बजावणारे सैन्य सहा शस्त्रधारी मनुष्यरूपाने दृष्टांतात चितारले आहे. देवाच्या रागाची अंमलबजावणी यांच्याकरवी होण्याआधी सचिवाची दऊत असणाऱ्या सातव्या पुरुषाला अशी आज्ञा दिली गेली: “‘नगरामूधन जा. . . . जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यामुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर.’ मला ऐकू यईसे तो त्या बाकीच्यांना (सहा शस्त्रधारी पुरुषांस) म्हणाला: ‘त्याच्या मागून नगरात जा व संहार करा. . . . पण ज्यावर चिन्ह असेल त्यांस स्पर्श करू नका.’”—यहेज्केल ९:१–६.
५. कशामुळे पश्चातापाकडे निरविले जाते?
५ ‘चिन्ह करून’ सुरक्षितता लाभलेले हे लोक आधी त्रस्त झाले होते, कारण खऱ्या देवाची उपासना करीत असल्याचा दावा करणाऱ्यांनी “देश जुलमाच्या कृत्यांनी भरून” टाकला होता व ते लैंगिक अनैतिकता, मूर्तिपूजा, आणि इतर सर्व प्रकारातील चुकीची कृत्ये आचरीत होते. (यहेज्केल ८:५–१८; यिर्मया ७:९) याचप्रमाणे आज ज्यांना “चिन्ह” करून घ्यायचे आहे अशांनी प्रथमतः पवित्र शास्त्राचा अभ्यास करून देवाच्या दर्जांचे मोल जाणले पाहिजे आणि देवाचा अपमान करणारे शिक्षण व प्रथा याबद्दल “उसासे टाकून विलाप” केला पाहिजे म्हणजे अंतःकरणपूर्वक दुःखित होण्यास हवे. कदाचित अजाणपणात काहींनी चुकीची कृत्ये करण्यात किंवा त्यांना पाठबळ देण्यात आपला सहभाग दिला असेल. तथापि ते आता या कृत्यांकडे देव ज्या दृष्टीने बघतो त्याच दृष्टीने म्हणजे घृणितपणे बघतात. (रोमकर १:२४–३२; यशया २:४; प्रकटीकरण १८:४; योहान १५:१९) या वाढीव गुणग्राहकतेमुळे त्याला देवाबरोबर शांती प्राप्त करण्यातील पहिल्या पावलाप्रत—पश्चाताप—निरविले जाते. प्रेषित पेत्राने आर्जविले: “तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा; अशासाठी की विश्रांतीचे समय [क्रोधाऐवजी] यहोवा जवळून यावे.” (प्रे. कृत्ये ३:१९) अशी ही क्षमाशीलता केवढी उत्साहवर्धक आहे बरे!
“चिन्ह” प्राप्त करणे
६. प्राचीन काळी काही लोकांवर कोणत्या कारणास्तव चिन्ह करीत?
६ देवाच्या क्रोधापासून बचाव मिळविण्यासाठी “उसासे टाकून विलाप” करणाऱ्यांनी आपल्या कपाळावर चिन्ह करून घ्यावयाचे होते. (यहेज्केल ९:४) प्राचीन काळी दासाच्या कपाळावर चिन्ह करीत की ज्यामुळे त्याची स्पष्ट ओळख मिळे, कपाळ व इतर जागी केलेल्या काळी विशिष्ठ खुणा एखादी व्यक्ती कोणत्या विशिष्ठ दैवताची भक्ति करीत असे ते समजून येई.a (पडताळा यशया ४४:५) तर मग आज आमच्या काही स्पष्ट व जीवनप्रदायक असे कोणते चिन्ह आहे जे ते धारण करणाऱ्याच्या बाबतीत तो यहोवाचा खरा उपासक व दास आहे हे स्पष्टरित्या दाखवील?
७. ते लाक्षणिक चिन्ह काय आहे?
७ तुमच्या उघड्या कपाळावरील दिसून येणारे लाक्षणिक चिन्ह हे दर्शविते की, (१) तुम्ही येशू ख्रिस्ताचे समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले शिष्य आहात आणि (२) तुम्ही ख्रिस्तासारखे नवे व्यक्तित्व परिधान केले आहे. (इफिसकर ४:२०–२४) अशा प्रकारे ज्यांनी “चिन्ह” करून घेतले आहे त्यांनी प्रथम समर्पण करण्याची गरज असते हे पाहता या समर्पणात काय काय समाविष्ट असते ते आम्ही जाणून घेतले पाहिजे. येशू विवेचीत करतो: “कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे.”—मार्क ८:३४.
८, ९. (अ) ‘स्वतःचा आत्मत्याग करणे’ याचा काय अर्थ होतो? (ब) समर्पणाच्या बाबतीत कशाची अपेक्षा असते ते कसे चित्रित करता येईल?
८ ज्या ग्रीक शब्दाचे भाषांतर “आत्मत्याग” आहे त्याचा अर्थ, “सर्वतोपरि नाकारणे” किंवा “धिक्कारणे” असा होतो. या कारणास्तव “आपला आत्मत्याग” करणे म्हणजे एखादा विशिष्ट सुखविलास वा उपभोग अधूनमधून घेत राहण्याचे टाळणे एवढेच नव्हे तर त्यापेक्षाहि अधिक आहे. त्याचा स्पष्ट अर्थ हा आहे की जेव्हा तुमच्या जीवनावर तुमच्या व्यक्तिगत इच्छा व महत्वाकांक्षा वर्चस्व गाजवू लागतात तेव्हा स्वतःला नाही, म्हणण्याची इच्छा राखणे. येशूच्या त्या शब्दांचा अर्थ केवढा विस्तारित होता हे त्याचे विविध भाषेत झालेल्या भाषांतराच्या परिक्षणाद्वारे कळू शकते: “स्वतःचे अंतःकरण जे करण्याची इच्छा धरते त्याला थांबविणे” (झेल्ताल, मेक्सिको), “यापुढे स्वतःच्या मालकीचे कधीही न राहणे” (क’आनजोबल, ग्वातेमाला), आणि “स्वतःपासून पाठ फिरविणे” (जावानीस, इंडोनेशिया). होय, हे काही वेगवेगळ्या गोष्टींकरता स्वतःने दिलेली मंजुरी नाही तर ते पूर्ण रूपाचे समर्पण आहे.
९ सुसान नावाची ख्रिस्ती स्त्री, जी पूर्वी स्वतंत्र बाण्याची होती, ती विवेचीत करते की तिला समर्पणाचा कोणता अर्थ लाभला: “मी मला स्वतःला इतर कोणाला तरी शरणार्थी झाले. यहोवा आता माझ्या मार्गाक्रमणावर नियंत्रण ठेवतो, काय करायचे ते तो मला सांगतो आणि जीवनातल्या प्रधानतेचा अग्रक्रम दाखवितो.” अशाच प्रकारचे संपूर्ण समर्पण यहोवाला करण्याची तुमची इच्छा आहे का? हे लक्षात ठेवा की ते लाक्षणिक चिन्ह, तुम्ही देवाच्या “मालकीचे” आहात, तुम्ही आपल्या धन्याचे आनंदी दास आहात याची ओळख देते.—पडताळा निर्गम २१:५, ६; रोमकर १४:८.
१०. समर्पण करण्याआधी कोणत्या गोष्टीचा विचार केला जाण्यास हवा?
१० “तुमच्या मध्ये असा कोण आहे की त्याला बुरूज बांधवयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?” असे येशूने विचारले. (लूक १४:२८) तर मग, तुम्हाला ख्रिस्ती सभांना नियमितरित्या उपस्थित राहण्याची (इब्रीयांस १०:२५), देवाने आपल्या सेवकांसाठी लावून दिलेल्या उच्च नैतिक दर्जाचे पालन करण्याची (१ थेस्सलनीकाकर ४:३, ४, ७), राज्य प्रचाराच्या कामात तुम्हाला शक्य होईल तितका सहभाग घेण्याची, एखादे ध्येय निवडताना किंवा जीवनात काही ध्येये ठेवताना देवाच्या इच्छेला प्राधान्य देण्याची (मत्तय ६:३३; उपदेशक १२:१), आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांची काळजी करण्याची (इफिसकर ५:२२–६:४; १ तिमथ्यी ५:८) इच्छा आहे का? एकदा तुम्ही प्रार्थनेद्वारे व्यक्तिगतपणे तुमच्या जीवनाचे समर्पण केले तर यापुढील दुसरे पाऊल इतरांना या विषयीची शासकीय हमी देते.
बाप्तिस्मा—कोणासाठी?
११. बाप्तिस्मा कशाचे द्योतक आहे व त्याकरवी काय साध्य केले जाते?
११ येशूने आज्ञापिले की त्याच्या अनुयायांचा बाप्तिस्मा व्हावा. (मत्तय २८:१९, २०) त्यांना पाण्यात पूर्णपणे बुडवून वर काढायचे होते. दफन व पुनरूत्थानाप्रमाणे बाप्तिस्मा हा त्या व्यक्तिने आपल्या स्वयंकेंद्रित जीवनाला मुकणे वा मरणे आणि देवाची इच्छा करण्यासाठी परत जिवंत होणे याला तंतोतंतपणे चित्रित करतो. बाप्तिम्सा घेण्याद्वारे तुम्ही स्वतःला एक यहोवाचा साक्षीदार आहात आणि देवाच्या जगभरातील मंडळ्यांसोबतचा सहवास राखणारे आहात अशी ओळख देता.b बाप्तिस्मा हा देवाबरोबर केलेल्या निश्चयपूर्वक कराराची पुष्टी देतो. (पडताळा निर्गम १९:३–८) तुमचे जीवन त्याच्या कायद्याशी सुसंगत असलेच पाहिजे. (स्तोत्रसंहिता १५; १ करिंथकर ६:९–११) तुम्हास देवाचे सेवक असल्याची नियुक्ति देणारा बाप्तिस्मा हा, तुम्ही आता देवाबरोबर शांतीसंबंधात आहात म्हणून “शुद्ध विवेक भावासाठी देवाकडे याचना करणे” याला सुद्धा सूचित करतो.—१ पेत्र ३:२१.
१२. आपल्या पालकाच्या “चिन्हा”खाली मुले कोठवर सुरक्षित असू शकतात?
१२ युवकांचाही बाप्तिस्म्याकरता विचार होण्यास हवा का? दृष्टांतातील सहा शस्त्रधारी पुरुषांना यहोवाने काय म्हटले होते ते लक्षात घ्या: “वृद्ध, तरूण व कुमारी, मुले व स्त्रिया यांची निखालस कत्तल करा; पण ज्यावर चिन्ह असेल त्यास स्पर्श करू नका.” (यहेज्केल ९:६) अर्थातच ज्यांना स्वतः समर्पण करता येत नाही अशा बालकांना, त्याचे पालक जर मुलांना यहोवावर प्रीती करण्यासाठी योग्य शिक्षण देऊन वाढ करीत असतील व मुलेही त्यांना आज्ञाधारकपणे प्रतिसाद देत असतील तर या पालकावरील “चिन्हा”मुळे त्यांचे रक्षण होईल. (१ करिंथकर ७:१४) तथापि, मूल व्यक्तिगत निवड करू शकण्याएवढे बुद्धिमान आहे आणि त्याला “चांगले करणे कळत” आहे तर तो आपल्या पालकाच्या “चिन्हा”खाली दीर्घकाळाकरता सुरक्षित राहू शकेल असे समजू नका.—याकोब ४:१७.
१३. कोणी युवक बाप्तिस्मा घेण्यास लायक आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी कशाकशाचा विचार होण्यास हवा?
१३ समर्पणाआधी त्या युवकाला त्यात ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्या विषयीचे पुरेसे ज्ञान असणे जरूरीचे आहे व त्याने देवाबरोबरचा व्यक्तिगत नातेसंबंध साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला पवित्र शास्त्रीय तत्वांचे आकलन व्हावयास हवे व त्यांना त्याने जडून राहिले पाहिजे. शिवाय त्याला हेही ज्ञात असावयास हवे की त्या विषयीच्या कोणत्याही भंगाबद्दल त्याला जाब द्यावा लागेल. तसेच आपला विश्वास इतरांमध्ये सहभागी करण्याविषयी त्याला पुरेसा अनुभव असण्यास हवा आणि हे खऱ्या उपासनेचे महत्वपूर्ण अंग आहे हे त्याने जाणलेच पाहिजे; देवाची सेवा करण्याची त्याची खरी इच्छा असली पाहिजे. अर्थातच प्रौढासारखी प्रौढता त्याने दाखवावी हे त्याच्याबाबतीत अपेक्षिले जाणार नाही पण जी आध्यात्मिक प्रगती तो साध्य करतो ती व्यवहार्य व वाढती असली पाहिजे.
१४. एका युवकाने आपला बाप्तिस्मा संरक्षण आहे असे का जाणले?
१४ एखाद्याला आपली “ऐपत आहे” असे दिसले तर युवक या नात्याने समर्पण करण्यात त्याला अडचणीत पडल्यासारखे वाटणारच नाही. बहुतेक सर्व ख्रिश्चनांच्या बाबतीत बाप्तिस्म्यानंतर त्या विषयीची रसिकता अधिक वाढत राहते. “युवक या नात्याने बाप्तिस्मा घेणे मजकरता संरक्षक ठरले.” असे डेव्हीड म्हणतो. “मी प्रौढ होत राहिलो तेव्हा बाप्तिस्मा न झालेल्या मंडळीतील युवकांबद्दल मी हे बघितले की यांना मंडळीतील वडीलांच्या अधिकारपणाचे काहीच गांभिर्य वाटत नव्हते, याचा परिणाम हा झाला की ते वाईट वागणुकीत अडकले. मला मात्र नित्याने याचे स्मरण होत होते की मी देवाला माझे जीवन समर्पित केले आहे. माझे जीवन मी आधीच देऊन टाकले आहे त्यामुळे मला त्या युवकांचा मागोवा घेता येऊ शकत नाही.”
१५. (अ) युवकाला खऱ्या उपासनेविषयीचा गंभीर दृष्टीकोण राखणे शक्य आहे हे आम्हास कसे समजते? (ब) याबद्दल पालक कशी सर्वोत्तम मदत देऊ शकतात?
१५ “पण माझ्या मुलाने किंवा मुलीने युवक असताना बाप्तिस्मा घेतला पण नंतर तो किंवा तिचा उत्साह कमी झाला तर काय?” असा अचंबा कदाचित काही पालकांना वाटत असेल. अर्थातच कोणा युवकाने आपल्या पालकांना संतुष्ट करण्यासाठी व कोणा मित्राने बाप्तिस्मा घेतला आहे म्हणून बाप्तिस्मा घेऊ नये. योसेफ, शमुवेल, योशिया राजा आणि येशू युवक असताना या सर्वानी देवाच्या उपासनेविषयीचा गंभीर दृष्टीकोण ग्रहण केला होता व ते त्याला जडून होते. (उत्पत्ती ३७:२; ३९:१–३; १ शमुवेल १:२४–२८; २:१८–२१; २ इतिहास ३४:३; लूक २:४२–४९) आधुनिक काळात जीन या मुलीचा बाप्तिस्मा झाला तेव्हा ती केवळ दहा वर्षांची होती. काहीं वर्षांनी तिला असा प्रश्न केला गेला की, तिने उचललेले पाऊल तिला खरेच कळले होते का, तेव्हा ती म्हणाली: “होय, मी यहोवावर प्रीती करीत आहे हे मला ठाऊक होते. येशूने आम्हासाठी जे केले त्याची रसिकता मजठायी आहे व मला यहोवाची सेवा करण्याची इच्छा आहे.” आपल्या बाप्तिस्म्यानंतर तिने सुमारे ४० वर्षे विश्वासूपणे सेवा केली. प्रत्येक युवक भिन्न आहे; कोणीही त्याच्या विषयीची वयोमर्यादा ठरवू शकत नाही. पालकांनी आपल्या मुलांच्या अंतःकरणाप्रत शिरण्याचा प्रयत्न करण्यास हवा व त्याला किंवा तिला इश्वरी भक्तीची वाढ करण्यासाठी मदत दिली पाहिजे.c त्यांनी त्यांच्यासमोर केवळ समर्पण व बाप्तिस्म्याचे लक्ष्य ठेवू नये तर भक्कम उपासक बनण्यासाठी त्यांची बळकटी करावी.
अडखळणांवर मात करणे
१६. मस्तकी ज्ञानापेक्षा अधिकाची का गरज आहे?
१६ पवित्र शास्त्रीय ज्ञान आवश्यक असले तरी “चिन्ह” यात मस्तकी ज्ञानापेक्षा अधिक समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, यहेज्केलास देण्यात आलेल्या दृष्टांतात खोट्या देवांस धूप दाखविण्याच्या कारणामुळे ज्या वडीलांची हत्या झाल्याचे दाखविलेले आहे त्यांना यहोवाच्या लिखित वचनाचे विस्तारीत ज्ञान नक्कीच होते. तरीपण बंद दरवाज्याच्या आतील खोलीत त्यांनी आचरलेली कृत्येच हे दाखवीत होते की ते यहोवाचे खरे उपासक नव्हते. (यहेज्केल ८:७–१२; ९:६) तद्वत, बचावासाठी “चिन्ह करून घ्यावयाचे आहे” तर “सत्यापासून निर्माण होणारे नीतीमत्व व निष्ठावंतपणा ह्यांनी युक्त असणारे देवाच्या इच्छेच्या सदृश्य निर्माण झालेले नवे व्यक्तित्व धारण” करण्याची गरज आहे.—इफिसकर ४:२२–२४.
१७. (अ) काहींना कोणते अडखळण बाप्तिस्मा घेण्यापासून मागे ठेवते? (ब) याकोब ४:८च्या सूचनेचा कसा अवलंब करता येईल?
१७ तुमचा पापीष्ठ देह हे एक जबरदस्त अडखळण आहे. (रोमकर ८:७, ८) गंभीर अशा शारीरिक अशक्तपणावर ताबा न ठेवल्यामुळे किंवा निषिद्ध अशा जागतिक सुखविलासाची इच्छा करीत राहिल्यामुळे काहींनी स्वतःला बाप्तिस्मा घेण्यापासून मागे रोखून धरले. (याकोब ४:१, ४) असे हे लोक बहुमूल्य नातेसंबंध गमावून आहेत. देवाचे वचन सल्ला देते: ‘देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.” (याकोब ४:८) बुद्धिमान हालचालीची जरूरी आहे. याचे उदाहरण पाहू जाता, एका माणसाने पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु केला. त्याने १६ वर्षे मद्य व मादक द्रव्ये यांचा सराव केला होता की ज्यामुळे तो मरणप्राय असा आजारी झाला. परंतु निश्चयाने त्याने त्याच्या या वाईट सवयीवर ताबा मिळविला. “आता मी समर्पणाप्रत प्रगती करीत असता एका स्त्री ने मला तिच्यासोबत संबंध धरण्यास गळ घातली. तो खरोखर एक मोहपाश होता,” त्याने कबूल केले. “मी तिला म्हटले की, ‘मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करीत आहे तर मी हे करू शकणार नाही.’ तेव्हा तिला मी वेडा झालो आहे असे वाटले.” असा हा प्रतिसाद कशामुळे उद्भवला गेला बरे? “माझी मद्यापासून सुटका करण्यात मला यहोवाने कशी मदत दिली होती ते मी पाहिले आहे. त्याने आणखी इतर मार्गीसुद्धा माझी मदत केली. त्यामुळे मी यहोवासमीप येत गेलो. मला त्याला निराश करता येत नव्हते.” हा मनुष्य देवासमीप आला.
१८. अडखळणांवर मात करण्याची खरी किल्ली कोणती आहे?
१८ तुम्हाला किती माहीत आहे ते नव्हे तर जे माहीत आहे त्यावर तुम्ही किती प्रेम करता ते महत्वाचे आहे. स्तोत्रसंहिता ११९:१६५ म्हणते: “तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना [नुसते माहीत असणाऱ्यांना नव्हे] फार शांती असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही.” देवाच्या नियमावर प्रेम करणे, आपल्या जीवनात त्याचे महत्व खोलवर जाणून घेणे ही ती खरी किल्ली आहे.—यशया ४८:१७, १८.
१९, २०. (अ) कोणत्या अडखळणावर मात करायची आहे व त्याविषयी आम्हाला कोणती हमी आहे? (ब) सर्व अडखळणांवर यशस्वीरित्या मात करणे कोणता परिणाम घडवून आणील?
१९ अर्थातच आणखी इतर अडखळणे व समस्या ह्या उद्भवतील. “यापैकीचे मोठे अडखळण,” वर उल्लेखिलेला बंधु म्हणाला, “मला वाटणारी माणसांची भीती हे होते. माझे असे काही जगीक ‘मित्र’ होते ज्यांच्यासोबत मी दारु घेई. त्यामुळे त्यांना आता असे म्हणणे की मी माझे जीवन देवाला समर्पित करण्याचा निश्चय केला असल्यामुळे त्यांच्या बरोबरीचा सहवास आता तोडावा लागत आहे, ही गोष्ट मोठी कठीण वाटत होती.” (नीतीसूत्रे २९:२५) इतरांना आपल्या कौटुंबिक सदस्यांची कुचेष्टा सहन करावी लागली. जिने आपल्या पतीच्या विरोधावर मात केली त्या नव्यानेच बाप्तिस्मा झालेल्या एका भगिनीने असे म्हटले: “एका मोठ्या अडखळणाऐवजी मला एकाच वेळी कित्येक लहानसहान अडखळणांना तोंड द्यावे लागले.” उद्भवणाऱ्या प्रत्येक अडखळणावर यशस्वीरित्या व विश्वासूरित्या मात करणे तुमचे अंतःकरण बळकट करील. देवाच्या नियमांवर प्रीती करणाऱ्यांना मात न करता येईल असे कोणतेही अडखळण नसेल याची खात्री असू द्या!—लूक १६:१०.
२० तुम्ही प्रत्येक अडखळणावर सरशी कराल तेव्हा तुम्हाला “फार शांती” मिळेल. (स्तोत्रसंहिता ११९:१६५) होय, तुम्ही ‘आपल्या मार्गाने निर्भय जाल. . . . तुमची झोप सुखाची होईल. अकस्मात आलेल्या धोक्याला तसेच दुष्टाच्या धाडीला भिण्याची गरज राहणार नाही. कारण यहोवा तुमचा रक्षणकर्ता होईल.’—नीतीसूत्रे ३:२३–२६.
[तळटीपा]
a यहेज्केलाच्या दृष्टांताच्या सुमारे १५० वर्षांनी हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने, हर्क्युलस दैवताच्या भक्तांवर करण्यात येणारे चिन्ह त्यांचे संरक्षण करते असे मानले जात होते हे निरिक्षिल्यानंतर लिहिले: “कोणा माणसाच्या दासाने (हर्क्युलसच्या देवळात) आश्रय घेतला व त्याने आपणावर पवित्र चिन्ह करून घेतले व त्या देवाचा भक्त बनला तर त्याच्यावर हात टाकणे हे कायदेशीर नव्हे.”
b अलिकडेच बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना विचारण्यात येणारे प्रश्न सोपे केले गेले की ज्याकरवी त्या उमेदवारांना देव व त्याची पृथ्वीवरील संस्था याजबरोबरच्या जवळीकीच्या नातेसंबंधात येण्यात कशाचा समावेश असतो ते पूर्णपणे आकलन होऊन त्याची उत्तरे देता येतील.
c दी वॉचटावरच्या ऑगस्ट १५, १९८५ अंकामधील “ट्रेन युवर चाइल्ड टु डेव्हलप गॉड्ली डिव्होशन” हा लेख पहा.
उजळणीसाठी मुद्दे
◻ देव आम्हाला त्याच्या बरोबर शांती मिळविण्यात कशी मदत देतो?
◻ जीवन वाचविणारे लाक्षणिक चिन्ह कोणते आहे?
◻ समर्पण व बाप्तिस्म्याची कोणती अर्थसूचकता आहे?
◻ कोणत्या प्रकारच्या अडखळणांना तोंड देणे आहे पण यावर कशी मात करता येऊ शकेल?
[१९ पानांवरील चित्रं]
बुडविणे की पाणी शिंपडणे?
येशूच्या बाप्तिस्म्याविषयीचा अहवाल, तो “पाण्यातून वर आला” असे म्हणतो. (मार्क १:१०) येशूचा बुडवून बाप्तिस्मा झाला ही वस्तुस्थिती त्या बा’प्ति.स्मा या ग्रीक शब्दाच्या अर्थासोबत जुळणारी आहे. हा शब्द बा.प्ति’झो या शब्दाकडून तयार झाला असून “बुडणे, बुडविणे” असा त्याचा अर्थ होतो. त्याचा वापर बुडणाऱ्या जहाजाचे वर्णन करण्यासाठी केला जाई. ल्युसियन या दुसऱ्या शतकातील लेखकाने यासारखाच शब्द एक मनुष्य दुसऱ्याला डुबवीत आहे हे दाखविण्यासाठी केला: “त्याला इतके खोल डुबविले (बा.प्ति’झो–न्टा) की तो परत वर येऊ शकला नाही.” द न्यू इन्टरनॅशनल डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट थिऑलॉजी निर्वाळा देते: “प्रतिकूल प्रतिपादने असली तरी हे दिसते की, यहुदी व ख्रिस्ती संदर्भानुरूप असणारा बाप्तिझो या शब्दाचा साधारण अर्थ ‘बुडणे’ असा होतो आणि आता बाप्तिस्म्याकरता तो पारिभाषिक शब्द बनला असला तरी त्यात अंतर्भूत असणारा बुडविण्याचा विचार हा तसाच राहतो.”