तुम्ही सत्याला बिलगून राहाल का?
तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला असल्यास तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारून त्याचे समाधान करून घेतले पाहिजे. तो प्रश्न हा की, हे सत्य आहे का? ते सत्य आहे हे तुम्हाला उमगल्यावर तुम्ही त्याला बिलगून राहाल का? अशाच प्रकारचे प्रश्न येशू ख्रिस्त व त्याच्या प्रेषितांच्या काळी लोकांसमोर आले.
येशू विषयीचा प्रचार प्रेषितांनी केला तेव्हा लोकांची प्रतिक्रिया कोणती दिसली? ख्रिस्ताचे राज्य, त्याचे चमत्कार, त्याचे खंडणी यज्ञार्पण, त्याचे पुनरूत्थान व सार्वकालिक जीवन याविषयीची सुवार्ता त्यांना चांगली वाटली व पुष्कळांनी ती आनंदाने ग्रहण करून तिचा सत्य म्हणून स्वीकार केला. पण बहुसंख्यांकांनी ते स्विकारले नाही. खरे म्हणजे, त्या काळी ख्रिस्ती संघटनेबद्दल लोक सर्वत्र “विरूद्ध” बोलत होते. (प्रे. कृत्ये २८:२२) याचा अर्थ, येशूच्या शिष्यांनी शिकविलेल्या सत्याचा स्वीकार करणे म्हणजे लोकप्रीय मतांच्या विरूद्ध जाणे व विरोधाचा सामना करणे असा होणार होता. यासाठी आस्थेवाईक लोकांनी ख्रिस्ती शिकवणी सत्य असल्याबद्दल स्वतःची खात्री करून घ्यावयाची होती. केवळ यामुळेच त्यांना दृढ भूमिका घेता येणार होती.
पौल व बर्णबा यांनी आशिया मायनर मधील अंत्युखिया येथे भेट दिली तेव्हा लोकांनी मोठ्या उत्सुकतेने त्यांचे ऐकून घेतले. पवित्र शास्त्र अहवाल म्हणतो: “ते बाहेर जात असता लोकांनी विनंती केली की, आम्हाला पुढल्या शब्बाथ दिवशी ह्या गोष्टी सांगाव्या. पुढल्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व नगर यहोवाचे वचन ऐकावयाला जमले.” (प्रे. कृत्ये १३: ४२, ४४) पण जेव्हा त्यांना समजले की काही विरोधकांनी प्रेषितांविरूद्ध भूमिका घेतली आहे तेव्हा बऱ्याच लोकांचा उत्साह मावळला.
प्रेषितांची कृत्ये याच्या १३ व्या अध्यायाचे ४५ वे वचन म्हणते: “लोकसमुदायाला पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले.” मग ५० वे वचन म्हणते: “तेव्हा यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथविले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले.” असा हा छळ उद्भवला असताना पुढे येशूच्या अनुयायांचे ऐकावे की न ऐकावे हे ठरविणे त्या आस्थेवाईकांना भाग होते. जे ऐकून सत्य असल्याचा त्यांनी स्वीकार केला होता त्याची त्यांनी एकतर जोपासना करायची होती वा त्याविषयी आपले कान बंद करायचे होते.
आजचा विरोध
पहिल्या शतकात ख्रिस्ती लोकांचा विरोध झाला त्याचप्रमाणे आज, यहोवाचे साक्षीदार आस्थेवाईक लोकांना जे शास्त्रवचनीय सत्य शिकवीत आहेत त्याविषयी त्यांचे कान बंद करण्यासाठी सध्या विरोधक काम करीत आहेत. लोकांनी साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करू नये याकरता त्यांचे मित्र, नातेवाईक व धार्मिक नेते यथाशक्ती प्रयत्न करीत आहेत. कोणताही शास्त्रवचनीय पुरावा न देता ते म्हणतात की साक्षीदारांची शिकवण खोटी आहे व ते त्यांच्यावर खोटे आरोप करतात.
तर मग आस्थेवाईक लोकांनी काय करावे? मागे अंत्युखिया येथील लोकांनी जसे केले त्याप्रमाणे त्यांनीही विरोधकांच्या शब्दांकरवी आपले कान व मन बंद करावे का? किंवा त्यांनी पवित्र शास्त्राद्वारे स्वतःची ही खात्री करून घ्यावी का की मी जे काही शिकत आहे ते सत्य आहे की नाही?
बिरूया शहरातील लोकांच्याबाबतीत प्रशंसोद्गार काढण्यात आले कारण त्यांनी पौल जे सांगत होता ते सत्य आहे की नाही याची खात्री करण्यासाठी शास्त्रवचनांचा पडताळा करून बघितला. तो सत्य सांगत आहे हे आढळल्यावर त्यांनी त्याबद्दल दृढ भूमिका घेतली. आम्ही असे वाचतो: “[बिरूयातील] लोक थेस्सलनीकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.”—प्रे. कृत्ये १७:१०, ११.
बिरूयाच्या लोकांनी विरोधकांच्या विधानांना सुवार्तेविषयी त्यांची मने बंद करण्यास प्रवृत्त करू दिले नाही. उलटपक्षी, आपण ऐकत असलेल्या गोष्टी खऱ्या आहेत की नाही याविषयी खात्री करून घेण्यासाठी ते दररोज शास्त्रवचनांचा शोध करीत गेले. त्यांना महत्वपूर्ण खजिना प्राप्त झाला होता व ते विरोधकांना तो हिरावू देणार नव्हते. तर मग, आज यहोवाचे साक्षीदार जाहीर करत असलेल्या त्याच सुवार्तेविषयी असाच मार्ग चोखाळणे व्यवहार्य वाटत नाही का?
काही विरोध का करतात?
कधी कधी विरोध करणारे लोक हे, तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता व ज्यांचा आदर करता असे तुमचे सदेच्छु नातेवाईक असतात. आणि तुमच्या कल्याणाविषयी त्यांना सखोल आस्था असल्याची तुमची पूर्ण खात्री आहे. तरीपण तुम्ही यहोवाच्या साक्षीदारासोबत करीत असलेल्या अभ्यासाला ते का विरोध करीत आहेत याचे कारण जाणून घेतले पाहिजे. तुम्ही जे शिकत आहात ते सत्य नाही हे दाखविण्याजोगा दृढ असा शास्त्रवचनीय पुरावा त्यांच्यापाशी आहे का? येशूने जे शिक्षण दिले त्याविषयी अजाण राहून आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांवर विश्वास ठेवल्यामुळे काहींनी येशूला विरोध दर्शविला होता.
येशू वधस्तंभावर होता त्यावेळी जवळून जाणाऱ्या लोकांनी “डोकी हलवीत त्याची अशी निंदा केली: ‘अरे मंदिर मोडून तीन दिवसात बांधणाऱ्या, आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये.’ तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह आपसात थट्टा करीत म्हणाले: ‘त्याने दुसऱ्यांचे तारण केले, त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही! इस्त्राएलाचा राजा ख्रिस्त ह्याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू.’ ” (मार्क १५:२९-३२) अशा या वाईट प्रवृत्तीमागील कारण काय होते?
लोकांनी येशूविषयीचे आपले मत त्यांच्या धर्मपुढाऱ्यांकरवी घडवू दिले. हे धर्मपुढारी येशूचा द्वेष करीत कारण येशूने त्यांना खोटे शिक्षक असे उघड केले होते. खऱ्या देवाचे प्रतिनिधी आहोत असा या धर्मपुढाऱ्यांचा दावा होता पण त्यांची कृती पाहता ती या दाव्याशी सुसंगत नव्हती. या कारणास्तव येशूने त्यांना उघडपणे म्हटले: “तुम्हीही आपल्या संप्रदायेकरून देवाची आज्ञा का मोडता? अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करितात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्यांचे नियम.’ ”—मत्तय १५:३, ७-९.
या कारणास्तव त्या धर्मपुढाऱ्यांनी येशू व त्याने शिकविलेल्या सत्याचा इतका कटु द्वेष केला की त्यांनी त्याचा घात करण्याची योजना केली आणि लोकांना त्याच्या विरूद्ध करण्याचा हर प्रकारे प्रयत्न केला. आज कित्येक धर्मपुढारी तितक्याच प्रखरतेने यहोवाच्या साक्षीदारांचा द्वेष करीत आहेत. जसे आरंभीच्या ख्रिश्चनांच्या बाबतीत होते तसेच आता साक्षीदारांबाबत देखील सर्वत्र “विरूद्ध” बोलले जात आहे. पण या विरोधाला तुम्ही आपल्या विचारसरणीस आकार देऊ द्यावा का?
येशू व त्याच्या प्रेषितांनी ज्याचा प्रचार केला तीच देवाच्या राज्याविषयीची शास्त्रवचनीय सत्ये आज यहोवाच्या साक्षीदारांमार्फत घोषित करण्यात येत आहेत. जगभरात लाखो लोक आपले मित्र, नातेवाईक आणि धर्मपुढारी यांच्या प्रखर विरोधाला न जुमानता या सुवार्तेचा स्वीकार करीत आहेत. राज्य संदेशाचा स्वीकार करणाऱ्यांनी हेच सत्य आहे याविषयीची खात्री स्वतः पटवून घेतली आहे. सत्याला बिलगून राहण्याचा त्यांचा निर्धार आहे.
तद्वत, आपल्याला त्या पहिल्या शतकातील लोकांसारखे का बनू द्यावे ज्यांनी स्वतःला, येशू ख्रिस्ताच्या अप्रसिद्ध अनुयायांकरवी प्रसारित केल्या जाणाऱ्या जीवनदायक शास्त्रवचनीय सत्यापासून परावृत्त ठेवावे यासाठी इतरांना त्यांना वळविण्याची मुभा देऊ दिली? उलटपक्षी, साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करीत राहा. तुम्ही सत्याचे शिक्षण घेत आहात याची स्वतः खात्री पटण्यासाठी देवाच्या लिखित वचनाचा परामर्श घ्या. (योहान ८:३२) देवाच्या मदतीने सत्याला बिलगून राहा.