येशूचे जीवन व उपाध्यपण
दया दाखविण्याविषयीचा धडा
येशू हा नाईन गावात, जेथे त्याने विधवेच्या मुलाचे पुनरुत्थान केले तेथे किंवा जवळच्या कोणा शहरास भेट देत असावा. तथापि, शिमोन नावाच्या एका परुश्याला, येशूला, एवढी आश्चर्यकर्मे करणारा माणूस आहे तरी कोण म्हणून जवळून बघण्याची इच्छा होते. याकरताच, तो येशूला आपल्या घरी जेवण्यास येण्याचे निमंत्रण देतो.
येशूने पूर्वी जकातदार व पापी लोकांच्या घरी भोजन केले होते. आता जे शिमोनाच्या घरी असतील तेथील लोकांना सेवा सादर करण्याची चांगली संधि आहे असे समजून येशू या आमंत्रणाचा स्विकार करतो. पण जेव्हा तो शिमोनाच्या घरी प्रवेश करतो तेव्हा पाहुण्याचे जे सर्वसाधारण स्वागत त्या काळी होत असे ते येशूला मिळत नाही.
गालीलच्या रस्त्यावरुन जात असता पायातील चपला गरम व धुळीने माखलेल्या बनत. तेव्हा पाहुण्यांचे स्वागत करताना गार पाण्याने त्यांचे पाय धुणे ही पाहुणचाराची पद्धत त्या काळी रुढ होती. पण येशू येतो त्यावेळी त्याचे पाय धुण्यात येत नाहीत. तसेच त्याला साधारणपणे देण्यात येणारे आलिंगन देखील दिले जात नाही. याचप्रमाणे प्रघातानुसार त्याच्या केसांसाठी तेल सुद्धा दिले जात नाही.
आता जेवणाच्या वेळी मेजाभोवती सर्व पाहुणे रेलून बसलेले असता एक स्त्री गुपचूप त्या खोलीत येते. ही स्त्री वाईट कामे करणारी बाई आहे असे लोकांना माहीत असते. कदाचित या स्त्रीने येशूचे शिक्षण ऐकले असावे; तिच्या कानावर त्याचे ‘अहो, कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व विसाव्यासाठी मजकडे या’ हे शब्द पडले असतील. त्यामुळेच तिने जे पाहिले व ऐकले त्याने भारावून जाऊन ती येशूचा शोध घेत येथे येते.
ती स्त्री येशूच्या मागे मेजाकडे येते, त्याच्या पायाजवळ गुडघ्यावर बसते. तिचे अश्रू त्याच्या पायावर ओघळतात तेव्हा ती आपल्या केसांनी त्याचे पाय पुसते. तिने सोबत आणलेल्या कुपीत सुगंधी तेल असते. ती येशूच्या पायाचा मुका घेते आणि त्याच्या पायांवर तेल ओतते. हे सगळे बघून शिमोनाला बराच राग येतो. तो मनात म्हणतोः “हा मनुष्य संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे याने ओळखले असते.”
त्याचे विचार ओळखून येशू म्हणतोः “शिमोना, मला तुझ्यासोबत काही बोलावयाचे आहे.”
“गुरुजी, बोला.” असे तो उत्तरतो.
“एका सावकाराचे दोन कर्जदार होते,” येशू बोलू लागतो. “एकाला पाचशे रुपये देणे होते व एकाला पन्नास होते. देणे फेडावयास त्यांच्याजवळ काहीही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांस ते सोडले. तर त्यातून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?”
“मला वाटतं,” असे शिमोन म्हणतो. कदाचित प्रश्न इतका गहन नसावा असा आविर्भाव तो यातून दाखवीत असावा. “ज्याला अधिक सोडले तो.”
“होय, तू बरोबर सांगितलेस,” असे येशू म्हणतो. आता तो त्या स्त्रीकडे आपले लक्ष वळवितो आणि शिमोनाला म्हणतोः “तू या स्त्रीला बघतो ना? मी तुझ्या घरी आलो तेव्हा तू मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही. पण हिने आपल्या आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले. तू माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबविले नाही. तू माझ्या मस्तकाला तेल लाविले नाही; परंतु हिने माझ्या पायास सुगंधी तेल लाविले.”
या स्त्रीने अशा पद्धतीने आपल्या गतकाळच्या अनैतिक कृत्यांविषयीचा अंतःकरणपूर्वक पश्चाताप झाल्याचा पुरावा दर्शविला. यामुळेच येशूने असा समारोप दिलाः “ह्या कारणास्तव मी तुला सांगतो की, हिची जी पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली आहे. कारण हिने फार प्रीती केली; ज्याला थोडक्याची क्षमा झाली आहे तो थोडी प्रीती करतो.”
येथे येशू अनैतिकपणाला मुभा वा मान्यता देत नाही. उलटपक्षी ही घटना, ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चुका केल्या, पण ज्यांना आता त्याविषयी वाईट वाटते आणि जे यापासून विसावा मिळावा म्हणून ख्रिस्ताकडे येतात त्यांच्याविषयी त्याला केवढा कळवळा होता हे प्रकटविते. आता येशू त्या स्त्रीला खरा विसावा प्रदान करण्यात म्हणतोः “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. . . . तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.” लूक ७:३६-५०; मत्तय ११:२८-३०.
◆ येशूचे शिमोन या यजमानाकरवी कसे स्वागत होते?
◆ कोण येशूचा शोध घेत येते व का?
◆ येशू कोणता दाखला देतो, आणि त्याचा अवलंब तो कसा स्पष्ट करतो?