वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ३/१ पृ. १०-१५
  • त्यांना जग योग्य नव्हते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांना जग योग्य नव्हते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शास्ते, राजे व संदेष्ट्यांचा विश्‍वास
  • उदाहरणशील विश्‍वासाचे इतर लोक
  • आमच्या विश्‍वासास पूर्ण करणाऱ्‍यास नजरेसमोर ठेवा
  • तुमचा विश्‍वास किती मजबूत आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्‍वास आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “आमचा विश्‍वास वाढवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ३/१ पृ. १०-१५

त्यांना जग योग्य नव्हते

“त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले . . . त्यांना जग योग्य नव्हते.”—इब्रीयांस ११:३७, ३८.

१, २. यहोवाच्या प्राचीन काळच्या साक्षीदारांनी कोणकोत्या परिस्थितीत आपली सचोटी राखली आणि त्यांची कृत्ये देवाच्या आजच्या सेवकांवर कसा परिणाम करतात?

अधार्मिक मानवी समाजाने प्राचीन काळच्या यहोवाच्या साक्षीदारांवर कित्येक संकटे आणली तरी त्यांनी देवाला आपली सचोटी राखली. उदाहरणार्थ, देवाच्या सेवकांना दगडमार केला गेला आणि तरवारीने त्यांची हत्या झाली. त्यांना खूपच निंद्य पद्धतीने वागणूक मिळाली आणि परीक्षा प्रसंग ही आले. तरीसुद्धा त्यांनी आपला विश्‍वास डळमळू दिला नाही. त्यामुळेच प्रेषित पौलाने अगदी सार्थपणे म्हटले की, “त्यांना जग योग्य नव्हते.”—इब्रीयांस ११:३७, ३८.

२ जलप्रलयापूर्वी इश्‍वरी भक्‍ती आचरणारे लोक, कुलपिते व शिवाय मोशे या सर्वांची विश्‍वास प्रेरक कृत्ये यहोवाच्या आधुनिक साक्षीदारांना देवाला विश्‍वासाने सेवा सादर करण्याची चालना देतात. पण इब्रीयांस पत्राच्या ११ व १२ अध्यायात ज्या बाकीच्या लोकांचा उल्लेख आला आहे त्यांच्याविषयी काय? त्यांच्या विश्‍वासाच्या पैलूंचा विचार करण्याद्वारे आम्ही कसा लाभ मिळवू शकू?

शास्ते, राजे व संदेष्ट्यांचा विश्‍वास

३. विश्‍वास कार्याद्वारे सिद्ध करून दाखवला पाहिजे हे यरीहो व राहाब यांच्याशी संबंधित असणाऱ्‍या घटनांद्वारे कसे दिसते?

३ विश्‍वास केवळ श्रद्धा नाही; तो कार्ये किंवा कृतिद्वारे सिद्ध करून दाखवता आला पाहिजे. (वाचा इब्रीयांस ११:३०, ३१.) मोशेच्या मृत्युनंतर इस्राएलांना कनान देशात एका मागोमाग विजय प्राप्त होते गेले, पण याकरता त्यांना आपल्यापरिने हालचाल करावी लागली. उदाहरणार्थ, यहोशवा व इतरांच्या विश्‍वासाने “यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस फेऱ्‍या घालण्यात आल्यावर ते पडले.” परंतु ‘राहाब कसबिणीचा विश्‍वासामुळे अवज्ञा करणाऱ्‍या [यरीहोच्या विश्‍वासहीन नागरिकां] बरोबर नाश झाला नाही.’ ते का? कारण तिने “स्नेहभावाने [इस्राएली] हेरांचा स्वीकार” केला. तिने त्यांना कनान्यांपासून लपवून ठेवून आपला विश्‍वास सिद्ध करून दाखविला. इस्राएलांसमोर “यहोवाने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले” आणि त्यांना त्याने सीहोन व ओग या दोन अमोरी राजांवर कसा विजय मिळवून दिला त्या वृत्तांतावर राहाबचा विश्‍वास दृढ होता. राहाबने स्वतःमध्ये योग्य ते नैतिक बदल घडविले व त्यामुळे तिला तिच्या क्रियाशील विश्‍वासाखातर यरीहो पडले तेव्हा स्वतःचा आणि आपल्या घराण्याचा बचाव होण्याचा आशीर्वाद मिळाला. याशिवाय येशू ख्रिस्ताची पूर्वज होण्याची सुद्धा कृपा तिला मिळाली.—यहोशवा २:१–११; ६:२०–२३; मत्तय १:१, ५; याकोब २:२४–२६.

४. धोक्याच्या स्थितीत विश्‍वासाचे प्रदर्शन करण्याच्या बाबतीत गिदोन व बाराक यांचे अनुभव कसली पुष्टी देतात?

४ धोक्याच्या समयी यहोवावरील पूर्ण स्वरूपाचा भाव प्रकट करून विश्‍वास दाखवता येतो. (वाचा इब्रीयांस ११:३२.) पौलाला कबूल करावे लागले की तो “गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे” याविषयी माहिती देत राहिला तर वेळ पुरणार नाही. त्या लोकांच्या हालचालींनी संकटकाळी देवावर त्यांचे पूर्णपणे विसंबून राहणे व त्यांचा विश्‍वास याचा मुबलक पुरावा दिला. शास्ता गिदोनाने विश्‍वासाने ३०० माणसांच्या छोट्या पथकाद्वारे देवाकडिल सामर्थ्य प्राप्त करून जाच देणाऱ्‍या मिद्यानांचे लष्करी बळ ठेचून टाकले. (शास्ते ७:१–२५) दबोरा संदेष्ट्रीने दिलेल्या प्रोत्साहनामुळे उत्तेजित होऊन शास्ता बाराक व त्याच्या अल्प शस्त्रधारक १०,०००च्या पायदळाने याबीन राजाच्या लष्करी साहित्याने युक्‍त असणाऱ्‍या ९०० युद्ध रथ तसेच सीसऱ्‍याच्या नियंत्रणाखालील प्रबळ लष्करी बळ यावर सरशी मिळविली.—शास्ते ४:१–५:३१.

५. शमशोन व इफताह यांनी आपल्या विश्‍वासाचा प्रत्यय कोणत्या मार्गी दिला की ज्याद्वारे त्यांचा यहोवावर पूर्ण भाव असल्याचा पुरावा दिसला?

५ इस्राएली शास्त्यांच्या काळातील विश्‍वासाचे आणखी एक उदाहरण शमशोनाच्याबाबत आढळते. तो पलिष्ट्यांचा मोठा शत्रू होता. हे खरे की त्याला त्यांच्याकडून अंधत्व व बंदिवास मिळाला. तरीपण हे पलिष्टी त्यांच्या दागोन या खोट्या दैवतास त्याच्या मंदिरी मोठा यज्ञयाग करीत होते त्यावेळी शमशोनाने मंदिराचे खांब निखळवून बहुतेक पलिष्ट्यांचा संहार घडवून आणला. शमशोन या पलिष्ट्यांबरोबरच ठार झाला पण ती त्याची निःसहाय्य आत्महत्या नव्हती. विश्‍वासाने त्याने यहोवावर पूर्ण भाव टाकला आणि देवाच्या व त्याच्या लोकांच्या शत्रूचे पारिपत्य करण्यासाठी बळ मिळावे यासाठी प्रार्थना केली. (शास्ते १६:१८–३०) अम्मोन्यांवर यहोवाने ज्याला विजय मिळवून दिला त्या इफताहाने देखील विश्‍वास प्रदर्शित केला व त्याद्वारे त्याचे यहोवावर पूर्णपणे विसंबून राहणे त्याने दाखविले. अशा प्रकारच्या विश्‍वासामुळेच त्याला देवाला वाहिलेला नवस पूर्ण करता आला व तो त्याने आपल्या मुलीला यहोवाच्या सेवेसाठी शाश्‍वत कुमारी असे देऊन पूर्ण केला.—शास्ते ११:२९–४०.

६. दावीदाने आपला विश्‍वास कसा दाखविला?

६ दावीद हा देखील आपल्या विश्‍वासाबद्दल ख्यातनाम होता. गल्याथ या पलिष्टी धिप्पाडासोबत त्याने सामना केला तेव्हा तो केवळ तरूण होता. ‘तू तरवार, भाला व बरची घेऊन मजवर आला आहेस,’ दावीद म्हणाला. ‘पण सेनाधीश यहोवाच्या नामाने मी तुजकडे आलो आहे.’ होय, दावीद देवावर विसंबून राहिला, त्याने त्या उंच पलिष्ट्याला ठार मारले व तो देवाच्या लोकांच्या आस्थेखातर लढणारा प्रबळ, युद्धकुशल राजा येथवर प्रगती करीत गेला. दावीदाच्या विश्‍वासामुळे तो यहोवाच्या अंतःकरणास पसंद असणारा मनुष्य बनला. (१ शमुवेल १७:४, ४५–५१; प्रे. कृत्ये १३:२२) आपल्या सबंध जीवनमानात शमुवेल व इतर संदेष्ट्यांनी देवावरील मोठा विश्‍वास व त्याजवर विसंबून राहाणे प्रदर्शित केले. (१ शमुवेल १:१९–२८; ७:१५–२७) ही आजच्या तरूण व वृद्ध यहोवाच्या सेवकांसाठी किती सुंदर उदाहरणे आहेत बरे!

७. (अ) कोणी “विश्‍वासाच्या द्वारे राज्ये जिंकली”? (ब) कोणी विश्‍वासाद्वारे “नीतीमत्व आचरले”?

७ विश्‍वासाद्वारे आम्ही हर प्रकारच्या सचोटीच्या परिक्षांना यशस्वीरित्या तोंड देऊ शकतो व इश्‍वरी इच्छेनुरूप असणारी कोणतीही गोष्ट तडीस नेऊ शकतो. (वाचा इब्रीयांस ११:३३, ३४.) विश्‍वासाच्या आणखी कृत्यांचा उल्लेख करताना पौलाच्या मनात शास्ते, राजे व संदेष्टे असावेत हे उघड आहे कारण यांचाच त्याने नावाने उल्लेख केला होता. गिदोन व इफ्ताह या शस्त्यांनी “विश्‍वासाच्या द्वारे राज्ये जिंकली.” हेच दावीद राजाने सुद्धा केले. त्याने पलिष्टी, मवाबी, अरामी, एदोमी व इतरांवर विजय मिळविला. (२ शमुवेल ८:१–१४) विश्‍वासाच्या द्वारेच नीतीमान शास्त्यांनी “नीतीमत्व आचरले.” शमुवेल व इतर संदेष्ट्यांच्या धार्मिक सल्ल्यामुळे निदान काहींना दुष्कृत्ये आचरण्याचे टाळता वा सोडून देता आले.—१ शमुवेल १२:२०–२५; यशया १:१०–२०.

८. दावीदाने कोणते अभिवचन मिळविले व त्याने कशाकडे निरविले?

८ दावीद हा असा होता ज्याने विश्‍वासाच्या द्वारे “अभिवचने मिळविली” यहोवाने त्याला अभिवचन दिले: “तुझी गादी कायमची स्थापित होईल.” (२ शमुवेल ७:११–१६) हे अभिवचन देवाने १९१४ मध्ये मशीही राज्याची स्थापना करून पूर्ण केले.—यशया ९:६, ७; दानीएल ७:१३, १४.

९. कोणत्या परिस्थितीत ‘विश्‍वासाद्वारे सिंहाची तोंडे बंद करण्यात आली’?

९ बादशाही आज्ञा होती तरी दानिएल संदेष्ट्याने आपल्या दैनंदिन प्रथेनुरूप देवास प्रार्थना करण्याचे चालू ठेवून सचोटीच्या परीक्षेला यशस्वीरित्या तोंड दिले. विश्‍वासाद्वारे सचोटी राखणारा या अर्थाने दानिएलाने “सिंहाची तोंड बंद केली.” त्याला जेथे टाकण्यात आले होते त्या सिंहाच्या गुहेतून यहोवाने दानीएलास जिवंत असे बाहेर आणले.—दानीएल ६:४–२३.

१०. विश्‍वासाने कोणी “अग्निची शक्‍ती नाहीशी केली” व असाच विश्‍वास आम्हास काय करण्यास उद्युक्‍त करील?

१० दानीएलाचे तीन सचोटी रक्षक साथीदार शद्रख, मेशख व अबेद्‌नेगो यांनी जणू “अग्नीची शक्‍ती नाहीशी केली.” अति तप्त अशा भट्टीत टाकले जाऊन मृत्युदंड मिळेल अशी भीती घातली असता त्यांनी नबुखद्‌नेस्सर राजाला म्हटले की त्यांचा देव त्यांना यापासून सोडवो वा न सोडवो ते बाबेलोनी दैवतांची सेवा तसेच त्याने स्थापिलेल्या मूर्तीला दंडवत घालणार नाही. यहोवाने त्या भट्टीतील अग्नि शमविला नाही पण त्याची या तीन इब्र्यांना कसलीही झळ पोहंचत नाही हे त्याने केले. (दानीएल ३:१–३०) अशाच स्वरूपाचा विश्‍वास आम्हाला सुद्धा शत्रूच्या हस्ते मरणाचा धोका संभवला तरीही सचोटी राखण्यास बळ देऊ शकतो.—प्रकटीकरण २:१०.

११. (अ) विश्‍वासाद्वारे कोण “तरवारीच्या धारेपासून बचावले?” (ब) कोण विश्‍वासाद्वारे “सबळ” झाले? (क) कोण “लढाईत पराक्रमी झाले” व कोणी “परक्यांची सैन्ये पळविली”?

११ दावीद शौल राजाच्या लोकांच्या ‘तरवारीच्या धारेपासून बचावला.’ (१ शमुवेल १९:९–१७) एलीया व अलिशा संदेष्टे सुद्धा तरवारीद्वारे येणाऱ्‍या मृत्युपासून बचावले. (१ राजे १९:१–३; २ राजे ६:११–२३) पण कोण “दुर्बळांचे सबळ झाले”? इस्राएलाची मिद्यानापासून सोडवूणक करण्याच्या बाबतीत आपण व आपली माणसे खूपच कमजोर आहोत हे गिदोनाने लक्षात आणले. पण त्याला देवाकरवी “सबळ” करण्यात आले व त्याला केवळ ३०० माणसे सोबतीला असताना मोठा विजय मिळाला! (शास्ते ६:१४–१६; ७:२–७, २२) शमशोनाचे डोक्याचे केस कापले गेले त्या “दुर्बळ” अवस्थेतून यहोवाने त्याला “सबळ” बनविले व त्याने कित्येक पलिष्ट्यांचा मृत्यु घडवून आणला. (शास्ते १६:१९–२१, २८–३०; पडताळा शास्ते १५:१३–१९.) लष्करी दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या हिज्किया राजाला दुर्बळ अवस्थेतून “सबळ” अवस्थेत आणले गेले हा सुद्धा पौलाच्या मनात विचार आला असावा. (यशया ३७:१–३८:२२) जे “लढाईत पराक्रमी झाले” त्या देवाच्या सेवकांमध्ये शास्ता इफताह व दावीद राजा येतात. (शास्ते ११:३२, ३३; २ शमुवेल २२:१, २, ३०–३८) शिवाय ज्यांनी ‘परक्यांची सैन्ये पळविली” त्यात बाराक शास्त्याचा समावेश होतो. (शास्ते ४:१४–१६) या सर्व महत्कृत्यांद्वारे आम्हाला हे पटलेच पाहिजे की विश्‍वासाद्वारे आम्ही सचोटीच्या प्रत्येक परीक्षेस यशस्वीरित्या तोंड देऊ शकतो व जे देवाच्या इच्छेच्या सहमतात आहे ते तडीस नेऊ शकतो.

उदाहरणशील विश्‍वासाचे इतर लोक

१२. (अ) कोणत्या “स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरूत्थान झालेली अशी मिळाली”? (ब) काही विश्‍वासी लोकांचे पुनरूत्थान कोणत्या अर्थी “अधिक चांगले” असणार?

१२ विश्‍वासामध्ये पुनरूत्थानाच्या बाबतीत वाटणाऱ्‍या आशेचाहि समावेश आहे, ती आशा आम्हाला देवास सचोटी राखण्यात मदत देते. (वाचा इब्रीयांस ११:३५.) विश्‍वासामुळेच “स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरूत्थान झालेली अशी मिळाली.” विश्‍वास व देवाचे सामर्थ्य याद्वारे एलीयाने सारफथ येथील विधवेच्या पुत्राचे तर अलीशाने शुनेमकरीण स्त्रीच्या मुलाचे पुनरूत्थान केले. (१ राजे १७:१७–२४; २ राजे ४:१७–३७) “आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरूत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले. [शब्दशः, “छड्यांचा मार पत्करला.”]” शास्त्रवचनात नामाचा निर्देश नसणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांना, त्यांनी सुटका होण्यासाठी आपल्या विश्‍वासात हातमिळवणी करण्याचे नाकारले म्हणून मरणापावेतो मार सहन केला. यांना “अधिक चांगले” पुनरूत्थान मिळणार ते या अर्थी की त्यांना (एलीया व अलीशा यांनी ज्यांना पुनरूत्थित केले त्या प्रमाणे)परत मरण्याची गरज नसणार. हे पुनरूत्थान “सनातन पिता” येशू ख्रिस्त याच्या राजवटीत घडेल. त्याच्याच खंडणीच्या आधारावर पृथ्वीवरील चिरकाल जीवनाची संधि खुली होईल.—यशया ९:६; योहान ५:२८, २९.

१३. (अ) “टवाळ्‌या व मारहाण” ही कोणी सहन केली? (ब) कोणी “बंधने व कैद” अनुभवली?

१३ आम्हाठायी विश्‍वास असला तर छळामध्ये टिकून राहण्याचे आम्हाला साध्य होईल. (वाचा इब्रीयांस ११:३६–३८.) आम्हावर छळ आला तेव्हा पुनरूत्थानाच्या आशेचे स्मरण करणे साहाय्य करते व शिवाय देवाने जसे “इतरांना टवाळ्‌या, मारहाण आणि बंधने व कैद ह्‍या परिक्षांचा [किंवा, विश्‍वासाच्या कसोट्यांचा] अनुभव आला” त्यावेळी राखले तसे तो आम्हासही राखील ही जाणीव राखणे सुद्धा उपयुक्‍त ठरते. इसाएली लोक देवाच्या “संदेष्ट्यांची सतत निर्भर्त्सना करीत. शेवटी यहोवाचा कोप त्याच्या लोकांवर भडकला.” (२ इतिहास ३६:१५, १६) मीखाया, अलीशा व इतर देवाच्या सेवकांनी विश्‍वासामुळेच “टवाळ्‌या” सहन केल्या. (१ राजे २२:२४; २ राजे २:२३, २४; स्तोत्रसंहिता ४२:३) इस्राएलांचे राजे व संदेष्टे यांच्या काळी “मारहाण” प्रसिद्ध होती. विरोध्यांनी यिर्मयाला केवळ मुखात लगावले नाही तर त्याला “फटके” सुद्धा मारून अपमान केला. “बंधने व कैद” या गोष्टी त्याच्या तसेच मीखाया व हनानी संदेष्ट्यांचे अनुभव आमच्या नजरेसमोर आणतील. (यिर्मया २०:१, २; ३७:१५; १ राजे १२:११; २२:२६, २७; २ इतिहास १६:७, १०) अशाच स्वरूपाचा विश्‍वास असल्यामुळे यहोवाच्या आधुनिक काळच्या साक्षीदारांना “धार्मिकतेसाठी” असाच छळ सहन करता आला.—१ पेत्र ३:१४.

१४. (अ) “दगडमार झाला” त्यामध्ये कोण होते? (ब) कोणाला “करवतीने चिरले” असावे?

१४ “त्यांना दगडमार केला” असे पौल म्हणाला. यापैकीचा एक विश्‍वास राखणारा मनुष्य यहोयादा याजकाचा मुलगा जखर्या हा होता. देवाच्या आत्म्याने ग्रासून त्याने यहुदाच्या धर्मत्यागी लोकांविषयी प्रखर बोलणे केले. याचा काय परिणाम झाला? त्या लोकांनी कट रचून योवाश राजाच्या आज्ञेने यहोवाच्या मंदिराच्या अंगणात त्यास दगडमार केला. (२ इतिहास २४:२०–२२; मत्तय २३:३३–३५) पौलाने पुढे म्हटले त्यांची: “परिक्षा झाली, करवतीने चिरले.” ‘परीक्षा झालेल्यां’ मध्ये पौलाच्या विचारात मीखाया संदेष्टा असावा. यहुद्यांचा अनिश्‍चित स्वरुपाचा संप्रदाय म्हणतो की मनश्‍शे राजाच्या काळात यशयाला करवतीने चिरले गेले.—१ राजे २२:२४–२८.

१५. कोण “त्रासलेले” होते व कोण “अरण्यातून” भटकत होते?

१५ इतर “तरवारीच्या धारेने मेले.” याचे उदाहरण दुष्ट राजा अहाब याच्या काळी एलीयाचे सह संदेष्टे “तरवारीने ठार” करण्यात आले येथे दिसते. (१ राजे १९:९, १०) एलीया व अलीशा हे त्या विश्‍वासातील माणसांपैकी होते जे “मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत. ते लाचार, पीडित व त्रासलेले असे होते.” (१ राजे १९:५–८, १९; २ राजे १:८; २:१३; पडताळा यिर्मया ३८:६.) छळाचे भक्ष्य या अर्थी जे “अरण्यातून, डोंगरातून, गुहातून व जमिनीतल्या विवरातून भटकत राहत असत” त्यामध्ये केवळ एलीया व अलीशा यांचाच नव्हे तर मूर्तिपूजक राणी इजबेलीने “यहोवाच्या संदेष्ट्यांचा वध” आरंभिला तेव्हा ओबद्याने पन्‍नास पन्‍नास एका गुहेत याप्रमाणे ज्या १०० संदेष्ट्यांना लपवून त्यांना अन्‍नपाणी दिले त्यांचाहि समावेश होतो. (१ राजे १८:४, १३; २ राजे २:१३; ६:१३, ३०, ३१) काय हे सचोटी रक्षक! या कारणास्तव, “त्यांना जग [अधार्मिक मानवी समाज] योग्य नव्हते” असे जे पौलाने म्हटले त्यात नवल नाही!

१६. (अ) ख्रिस्त पूर्व यहोवाच्या साक्षीदारांना ‘अभिवचनानुसार फलप्राप्ती [का] मिळू शकली नाही’? (ब) खिस्ती काळाआधीच्या यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत ‘पूर्ण होणे’ ही गोष्ट कशासोबत संबंधित आहे?

१६ देवाच्या नियुक्‍त वेळी त्याजवर प्रेम करणाऱ्‍या सर्वांना “वचनानुसार फलप्राप्ती” लाभेल अशी खात्री आम्हाला विश्‍वास देतो. (वाचा इब्रीयांस ११:३९, ४०) ख्रिस्ती युगपूर्वीच्या सचोटी रक्षकांबद्दल “त्यांच्या विश्‍वासाविषयी चांगली साक्ष दिली” गेली व ती शास्त्रवचनीय अहवालात जतन झालेली आहे. तरीपण त्यांना पुनरूत्थानाद्वारे देवराज्याच्या राजवटीत चिरकालिक जीवनाची सुसंधि असणाऱ्‍या देवाच्या “वचनानुसार फलप्राप्ती” मिळाली नाही. ते का बरे? कारण “त्यांनी [येशूच्या अभिषिक्‍त अनुयायां] वाचून पूर्ण होऊ नये.” येशूच्या अभिषिक्‍त अनुयायांच्या बाबतीत देवाने “जे अधिक चांगले ते” म्हणजे स्वर्गातील अमर जीवन व ख्रिस्त येशूसोबत सहअधिपती होण्याचा हक्क या गोष्टी ‘पूर्वीच नेमिल्या होत्या.’ १९१४ मधील राज्याच्या प्रस्थापनेनंतर त्यांचे पुनरूत्थान होते वेळी या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना, खिस्ती–पूर्व काळातील यहोवाच्या साक्षीदारांच्या पृथ्वीवरील पुनरूत्थानाआधी ‘पूर्ण केले जात आहे.’ (१ करिंथकर १५:५०–५७; प्रकटीकरण १२:१–५) त्या आरंभाच्या साक्षीदारांनाही जे ‘पूर्ण केले जाणार’ त्याचा संबंध पृथ्वीवरील पुनरूत्थानासोबत असला पाहिजे की ज्याकरवीच त्यांची “नश्‍वरतेपासून मुक्‍तता होऊन” ख्रिस्त येशूच्या हजार वर्षीय राज्यकिर्दीत तो प्रमुख याजक व त्याचे १,४४,००० सह याजक यांजमार्फत सादर केल्या जाणाऱ्‍या सेवेत त्यांना मानवी पूर्णता प्राप्त होण्यात मदत केली जाईल.—रोमकर ८:२०, २१; इब्रीयांस ७:२६; प्रकटीकरण १४:१; २०:४–६.

आमच्या विश्‍वासास पूर्ण करणाऱ्‍यास नजरेसमोर ठेवा

१७, १८. (अ) चिरकालिक जीवनाच्या आमच्या धावेत यशस्वी होता यावे याकरता आम्ही काय केलेच पाहिजे? (ब) येशू ख्रिस्त “आमच्या विश्‍वासाचा पूर्णकर्ता” कसा आहे?

१७ यहोवाच्या ख्रिस्ती युगापुर्वीच्या साक्षीदारांच्या कृत्यांची चर्चा केल्यावर पौल आमचे लक्ष विश्‍वासाच्या सर्वथोर उदाहरणाकडे वळवितो. (वाचा इब्रीयांस १२:१–३.) ‘साक्षीदारांचा हा एवढा प्रचंड मेघ आम्हासभोवती आहे’ हे किती प्रोत्साहनदायक आहे! हे पाहून आम्हाला आमच्या आध्यात्मिक प्रगतीला मंद करणारा सर्व भार लोटून देण्याचे बळ येते. त्यामुळे विश्‍वासाची कमतरता वा तूट निर्माण करणाऱ्‍या सर्व पापांना टाळण्याची आणि सार्वकालिक जीवनाप्रीत्यर्थ असणारी आमची धाव धीराने धावण्याचे साहाय्य मिळते. तरीपण आमचे हे ध्येय गाठण्यासाठी आम्ही आणखी काही करायला हवे. ते काय आहे?

१८ आम्हाला देवाच्या नव्या व्यवस्थीकरणातील सार्वकालिक जीवनासाठीची धाव पुरी करायची आहे तर मग “आपण आपल्या विश्‍वासाचा प्रमुख प्रतिनिधि [वा, मुख्य नेता] तसेच पूर्णकर्ता येशू ह्‍याच्याकडे पाहत असावे.” येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील उपाध्यपण काळाच्या आधी जगलेल्या अब्राहाम व इतर सचोटी रक्षकांचा विश्‍वास अपुरा होता म्हणजे त्यांना मशीहाविषयीच्या भविष्यवादांची समज पूर्ण रूपाने लाभली नव्हती. (पडताळा १ पेत्र १:१०–१२.) पण येशूचा जन्म, उपाध्यपण, मृत्यु व पुनरूत्थान या करवी पुष्कळ मशीही भविष्यवादांची पूर्णता झाली. या कारणास्तव विश्‍वासाचे येशू खिस्ताद्वारे परिपूर्ण अर्थाने “आगमन झाले.” (गलतीकर ३:२४, २५) याशिवाय आपल्या स्वर्गीय स्थानावरून येशूने इ.स. ३३च्या पेंटेकॉस्ट प्रसंगी आपल्या शिष्यांवर पवित्र आत्मा पाठवून त्यांचा विश्‍वास पूर्ण केला व तसेच प्रकटीकरणे पुरवीत राहून तो विश्‍वास प्रगतीशीलपणे बळकट केला. (प्रे. कृत्ये २:३२, ३३; रोमकर १०:१७; प्रकटीकरण १:१, २; २२:१६) या “विश्‍वासू साक्षी” आणि यहोवाच्या साक्षीदारांचा “मुख्य नेता” याविषयी आम्हाला केवढी धन्यता वाटते!—प्रकटीकरण १:५; मत्तय २३:१०.

१९. येशूचा ‘जवळून विचार’ का करण्यास हवा?

१९ विश्‍वासहीन लोकांची निंदा सहन करणे हे सोपे नाही, त्यामुळेच पौलाने आर्जविले: “तुमची मने खचून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरूद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्या [येशू] विषयी जवळून विचार करा.” खरेच, आम्ही “विश्‍वासू साक्षी” येशू ख्रिस्ताला नजरेसमोर ठेवले तर इश्‍वरी इच्छेप्रमाणे करण्यात आम्हाला कधीच थकवा वाटणार नाही.—योहान ४:३४.

२०. इब्रीयांस पत्र ११:१–१२:३ चा विचार करण्याद्वारे तुम्ही विश्‍वासाच्या बाबतीत काय काय शिकू शकला?

२० ‘साक्षीदारांच्या मोठ्या मेघाद्वारे’ आम्हाला विश्‍वासाच्या पैलूबद्दल बरेच काही शिकायला मिळाले. उदाहरणादाखल, हाबेलासारखा विश्‍वास येशूच्या यज्ञार्पणावरील आमची रसिकता वाढवितो. खरा विश्‍वास आम्हाला जसे हनोखाने मोठ्या निर्भिडपणे यहोवाचा संदेश कथित केला त्याप्रमाणे धैर्यवान साक्षीदार बनवितो. नोहाप्रमाणे आम्हाला आमचा विश्‍वास देवाच्या सूचना निकटपणे अनुसरून धार्मिकतेचे उपदेशक या अर्थी सेवा सादर करण्याची चालना देतो. अब्राहामचा विश्‍वास आम्हाला देवाचे आज्ञापालन करण्यासाठी व त्याच्या अभिवचनांवर, जरी त्यापैकीची काही पूर्ण व्हावयाची असली तरी, भाव ठेवण्यास उद्युक्‍त करतो. मोशेचे उदाहरण दाखविते की विश्‍वासामुळे आम्ही जगापासून निष्कलंक राहू शकतो व यहोवाच्या लोकांसोबत आपली भूमिका निष्ठावंतपणे धारण करू शकतो. इस्राएलांचे शास्ते, राजे व संदेष्ट्यांकरवीची कार्ये सिद्ध करतात की देवावरील विश्‍वास आम्हाला छळ व परिक्षाप्रसंग यात टिकवून ठेवू शकतो. याशिवाय येशू ख्रिस्ताचे अप्रतिम उदाहरण आमचा विश्‍वास दृढ व निश्‍चल करू शकतो याकरता केवढे कृतज्ञतेचे वाटते बरे! या कारणास्तव, येशू आमचा नेता याबरोबर तसेच आमच्या देवाकडिल सामर्थ्याद्वारे आपण यहोवाचे साक्षीदार या नात्याने टिकाऊ विश्‍वास प्रदर्शित करीत राहू या.

तुमची उत्तरे काय आहेत?

◻ धोका उद्‌भवला तरी देवावर पूर्णपणे विसंबून राहण्याद्वारे विश्‍वास प्रदर्शित करता येतो हे ख्रिस्तपूर्व यहोवाच्या साक्षीदारांची कोणती कृत्ये शाबीत करतात?

◻ विश्‍वासाद्वारे आम्ही सचोटीच्या हर परीक्षेत यशस्वी होऊ शकतो असे का म्हणता येते?

◻ विश्‍वासाकरवी आम्ही छळात टिकू शकतो याला कोणता पुरावा आहे?

◻ येशूला “आमच्या विश्‍वासाचा पूर्णकर्ता” असे का म्हटले आहे?

◻ विश्‍वासाच्या अनेक पैलूंपैकी काही कोणते आहेत?

[१२, १३ पानांवरील चित्रं]

यहोवावर पूर्ण भाव ठेवून दावीदाने आपला विश्‍वास प्रदर्शित केला. यहोवाच्या लोकांसाठी आज एक उत्तम उदाहरण!

[१४ पानांवरील चित्रं]

पुनरूत्थाना द्वारे स्त्रियांना आपले मृत लोक परत मिळाले. पुनरूत्थानामध्ये विश्‍वास ठेवल्याने, यहोवावर सचोटी राखण्यास मदत होते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा