वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १/१ पृ. २१-२६
  • “आमचा देव यहोवा ह्‍याचीच आम्ही सेवा करणार”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आमचा देव यहोवा ह्‍याचीच आम्ही सेवा करणार”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चाणाक्षपणे हालचाल करणे
  • संघटनात्मक पाठबळ
  • यहोवा इस्राएलांसाठी लढतो
  • आमचा निर्धार
  • यहोशवाच्या स्मरणात राहिलेल्या गोष्टी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोशवाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • “खंबीर हो व खूप हिंमत धर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • यहोशवा आणि गिबोनी लोक
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १/१ पृ. २१-२६

“आमचा देव यहोवा ह्‍याचीच आम्ही सेवा करणार”

“मी आणि माझे घराणे तर यहोवाची सेवा करणार.”—यहोशवा २४:१५.

१. यहोशवाचे पुस्तक आमच्यासाठी उत्तेजन व संरक्षणात्मक कसे ठरते?

यहोशवा या पुस्तकातील थरारक घटना, “ज्या आम्हावर युगांचा शेवट आला आहे” त्या “आमच्या शिक्षणासाठी” आणि आम्हास उत्तेजन व प्रोत्साहन मिळावे याकरता “उदाहरण” म्हणून लिखित आहेत. (रोमकर १५:४; १ करिंथकर १०:११) त्यात सहनशीलता, विश्‍वास व आज्ञाधारकपणा हे इश्‍वरी गुण ठळकपणे मांडण्यात आले आहेत. “विश्‍वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस फेऱ्‍या घालण्यात आल्यावर ते पडले. राहाब कसबिणीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्‍वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्‍यांबरोबर तिचा नाश झाला नाही.” (इब्रीयांस ११:३०, ३१) आज देवाचे कार्य संपवता यावे म्हणून यहोशवा, राहाब व त्या काळच्या इतर निष्ठावंत लोकांच्या विश्‍वासाने आम्हाला निर्भिड व बळकट राहण्याचे उत्तेजन देण्यास हवे.—यहोशवा १०:२५; योहान ४:३४.

२. (अ) यहोशवाने बारीक तपशीला विषयीही कसा आज्ञाधारकपणा दाखविला? (ब) एबाल व गरिज्जीम डोंगरावर काय घडले?

२ आय शहरावर निर्णायक विजय प्राप्त केल्यावर यहोशवाने अनुवाद २७:१–२८:६८ मधील लिखित सूचनांकडे लक्ष दिले. त्याने एबाल डोंगरावर अखंड दगडांची एक वेदी बांधली आणि येथे त्याने ही आज्ञा पूर्ण केली: “तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन कर आणि आपला देव यहोवा ह्‍याच्या समोर आनंद कर.” दुसऱ्‍या दगडांचे स्मारक उभारले गेले त्यावर चुना लावला गेला आणि नियमशास्त्राची वचने त्यावर लिहिण्यात आली. यानंतर वंशांची विभागणी करण्यात आली; एक गट “लोकांना आशिर्वाद देण्यासाठी” गरिज्जीम डोंगरावर उभा राहिला व दुसरा “शापवचने ऐकविण्याकरता एबाल डोंगरावर” उभा राहिला. लेव्यांनी आपला आवाज उंचावून आज्ञाभंगासाठी असणारी शापवचने ऐकविली आणि सर्व लोकांनी “आमेन!” असा प्रतिसाद दिला. यानंतर आज्ञाधारकपणाबद्दल असणारी आशीर्वादाची वचने सांगितली गेली. पण इस्राएलांनी ‘नियमशास्त्राची लिहिलेली वचने काळजीपूर्वक पाळली नाहीत आणि यहोवा देवाच्या प्रतापी व भययोग्य नामाचे भय बाळगले नाही’ तर त्यावर व्याधि येणार होत्या!—यहोशवा ८:३२–३५.

३, ४. (अ) इस्राएलाच्या मार्गाक्रमणामुळे आज आपल्याला कोणता प्रबळ धडा मिळतो? (ब) त्याच त्याच गोष्टी परत ऐकण्याचा आम्हाला कंटाळा का येऊ देऊ नये? (क) “अरूंद दरवाज्याने” प्रवेश करण्यासाठी कशाची जरूरी आहे?

३ इस्राएलांनी ‘नियमशास्त्राची लिहिलेली वचने’ पाळली का? मोशाने वारंवार आवर्जून सांगितले आणि यहोशवाने त्यावर भर दिला तरी ते अगदी शोचनीयपणे मागे पडले. यात आम्हासाठी आज केवढा प्रबळ धडा आहे! सतत इशारे दिले तरी काही जण असे असतातच की ज्यांना वाटते की देवाचे नियम ‘धाब्यावर बसवता येतील’ आणि आपला बचाव होईल. केवढी ही मूर्खता! इस्राएलांच्या गत अनुभवाकडे निर्देश करून पौलाने म्हटले: “आपण उभे आहो असे ज्यास वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.”—१ करिंथकर १०:१२; उपदेशक २:१३.

४ जे इशारे देण्यात आले ते ‘सारखे तेच तेच काय, आम्हाला तर ऐकून नुसता कंटाळा आला’ अशी प्रवृत्ति राखून देवाच्या काही लोकांनी त्याविषयी टीका झोडली. वस्तुतः असेच लोक पहिल्यांदा सैतानाच्या पाशात अडकतात. अनुवाद (इब्री मध्ये, मिश्‍नाह’हात–तोराह’ म्हणजे, “नियमाची पुनरावृत्ति”) या प्रेरित पवित्र शास्त्र पुस्तकात मोशाची चार प्रमुख भाषणे आहेत व यांनी इस्राएलांना अगदी स्पष्ट केले की त्यांनी पूर्वी विदीत केलेले यहोवाचे सर्व नियम पाळले पाहिजे. “आशीर्वाद” कळवताना त्याने सांगितले त्याचप्रमाणे आज्ञाभंगाचा इशारा व “शाप” कळवताना चारदा तरी त्याने ते शब्द ठासून सांगितले. एबाल डोंगरावर यहोशवाने परत इस्राएलांना याची खबरदारी दिली की त्यांनी आज्ञा पाळलीच पाहिजे. याकरवी आम्हीही स्वतः “अरूंद दरवाज्याने आत जाण्याचा” केवढा कसून प्रयत्न करावयास हवा ते दिसत नाही का?—मत्तय ७:१३, १४, २४–२७; २४:२१, २२.

५. आता इस्राएलापुढे कोणता संगनमताचा कट उभा राहिला, आणि याच्याशी समतुल्य असणारी कोणती स्थिती आज आपल्याला पहायला मिळते?

५ आता परत एकदा निर्णायक नाट्य आकार घेऊ लागले होते. यरीहोच्या वेशी उध्वस्त झाल्या होत्या जसे की “मोठ्या संकटा”च्या आरंभाला खोटा धर्म उध्वस्त झालेला असणार. त्याचप्रमाणे आय नगरही पडले होते. पण आता “यार्देनेच्या पश्‍चिमेकडे डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोना समोरील महासमुद्राच्या सबंध किनाऱ्‍यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्‍यांचे सर्व राजे एकोपा करून यहोशवा व इस्राएल ह्‍यांच्याशी लढावयाला जमा झाले.” (यहोशवा ९:१, २) याच्या आधुनिक पुर्णतेमध्ये आम्हाला आढळते की पृथ्वीवरील राष्ट्रां नी आता संयुक्‍त राष्ट्र संघाच्या रूपात आपले संगनमत केले आहे. ते आपल्याच योजनेनुरूप स्वतःकरता शांती व निर्भयता यांचा शोध घेत आहेत पण “यहोवाविरूद्ध व त्याच्या अभिषिक्‍ताविरूद्ध [थोर यहोशवा] . . . उठले आहेत.” (स्तोत्रसंहिता २:१, २) याचा परिणाम काय होणार?

चाणाक्षपणे हालचाल करणे

६, ७. (अ) गिबोन्यांनी कशामध्ये आस्था दाखवली व याकरता त्यांनी कोणती युक्‍ति योजली? (ब) यहोशवाने या प्रकरणाचा शहनिशा कसा केला?

६ पूर्वीच्या राहाबाप्रमाणे आता काही इस्राएलेत्तर लोक बचावासाठी आस्था व्यक्‍त करतात. हे यबुस किंवा यरूशलेम शहराच्या उत्तर भागी असणारे मोठे शहर गिबोन येथील रहिवासी आहेत. त्यांनी यहोवाच्या अद्‌र्भित कृत्याविषयी ऐकले होते व त्यांनी ठरविले की यहोवाच्या मार्गानेच शांती व निर्भयता मिळवावी. पण कशी? त्यांनी गिल्गाल येथील इस्राएलांच्या तळाकडे काही माणसे सुकलेल्या व बुरसलेल्या भाकरी, जुनी, झिजलेली, ठिगळे लावलेले गोणताटे व द्राक्षरसाचे बुधले तसेच पायी झिजलेले जोडे व जुने पुराणे कपडे यासहित पाठविली. यहोशवाकडे आल्यावर ही माणसे त्याला म्हणाली: “तुझा देव यहोवा याचे नाव ऐकून तुझे दास फार दुर देशाहून आले आहेत. त्याची कीर्ति व त्याने . . . जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे.” हे ऐकून “यहोशवाने त्यांच्याशी सलोखा करून त्यांना जीवदान देण्याचा करार केला.”—यहोशवा ९:३–१५.

७ तथापि लवकरच इस्राएलांना कळले की ते गिबोनी लोक असून ‘त्याच्यामध्ये राहत आहेत’! आता यहोशवाने त्यांच्या युक्‍तीबद्दल कोणती प्रतिक्रिया दाखवली? त्याने त्यांच्याबरोबर पूर्वी केलेली आणभाक राखली, ‘त्यांना जिवंत राहू दिले व ते सर्व मंडळीचे लाकूडतोड्ये व पाणक्ये झाले.’—यहोशवा ९:१६–२७; पडताळा अनुवाद २०:१०, ११.

८. गिबोनी लोक कोणकोणत्या बाबतीत “मोठा लोकसमुदाय” याची प्रतिछाया ठरतात?

८ बरेच नथिनीम, जे कालांतराने यहोवाच्या मंदिरी सेवा करीत होते ते गिबोनी कुळातील असावेत. अशाप्रकारे हे गिबोनी आज देवाची, “त्याच्या पवित्र मंदिरात अहोरात्र पवित्र सेवा” करणाऱ्‍या “मोठा लोकसमुदाय” याचे हुबेहुब प्रतिरूप ठरतात. (प्रकटीकरण ७:९, १५) ते कनानासारख्या जगात वस्तीस असले तरी अंतःकरणाने या “जगाचे भाग” नाहीत. आधी त्यांना ख्रिस्तीधर्म राज्यात आढळणाऱ्‍या “बुरसलेल्या” आध्यात्मिक साठ्यावर आपला निर्वाह ठेवावा लागला आणि त्यांना आनंदविणारा “द्राक्षारस” नव्हताच. पण देवाच्या लोकांचा संपर्क आल्यावर त्यांना कळाले की यहोवा त्याच्या साक्षीदारांमार्फत अद्‌र्भित कृत्ये घडवून आणीत आहे. त्यांनी सैतानाच्या जगात भारी लांब पल्ल्याचा प्रवास करून आपली झिजलेली “वस्त्रे” बदलली आणि नव्या व्यक्‍तित्वाचे वस्त्र परिधान करून यहोवाच्या लीन सेवकांची ओळख स्वतःबाबतीत दाखवली.—योहान १४:६; १७:११, १४, १६; इफिसकर ४:२२–२४.

संघटनात्मक पाठबळ

९. (अ) आता कोणती त्रस्त परिस्थिती उद्‌भवली? (ब) यहोशवाने कोणता प्रतिसाद दाखविला आणि त्याला कोणती हमी मिळाली?

९ यरूशलेमाचा राजा अदोनी–सदेक याने ऐकले की गिबोन्यांनी इस्राएलांबरोबर सख्य जोडले आहे, “तेव्हा त्याला फार भीती वाटली, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजधानीसारखे होते . . . तेथले सगळे पुरुष बलाढ्य होते.” त्याने इतर चार राजांसोबत संगनमत करून गिबोनाला वेढा घातला. लागलेच गिबोन्यांनी यहोशवाला अपील केले: “आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हाला मदत कर.” यहोशवाने लगेच प्रतिसाद दिला आणि यहोवानेही त्याला खात्री देऊन म्हटले: “त्यांना भिऊ नको. कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे. त्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.” यहोशवा व त्याच्या युद्धकुशल पुरुषांनी “रातोरात” कूच करून सर्व शत्रूंची एकदम गाळणच उडविली.—यहोशवा १०:१–९.

१०. (अ) गिबोन्यावरील वेढ्यासारखी कोणती सदृश्‍य परिस्थिती आज दिसते? (ब) आधुनिक काळचे गिबोनी कोणता निर्धार व्यक्‍त करतात?

१० त्या पाच राजांप्रमाणे आजच्या काही सरकारच्या प्रमुखांना आपले काही लोक—“बलाढ्य” सुद्धा—थोर यहोशवा व त्याचे नीतीमत्तेचे जगव्याप्त राज्य याकडे वळत आहेत म्हणून खूप राग येतो. या राज्यकर्त्यांना वाटते की, राष्ट्रे एकमेकांसोबत भांडत व झगडत असली तरी राष्ट्रीय सरहद्दी राखल्या गेल्या पाहिजेत. याकरताच ते शांतीप्रिय “मोठा लोकसमुदाय” याला मिळणारा आध्यात्मिक अन्‍नाचा साठा तोडण्याचा, जेथे “अन्‍ना”चे सेवन केले जाते त्या सभांना बंद करण्याचा व इतरांना आध्यात्मिक गोष्टींचे वक्‍तव्य करण्यावर मनाई करण्याचा प्रयत्न करतात. पण हे आधुनिक गिबोनी आध्यात्मिक इस्राएलांना निष्ठावंत राहून म्हणतात: “आम्ही तुम्हाबरोबर येतो.”—जखर्या ८:२३; पडताळा प्रे. कृत्ये ४:१९, २०; ५:२९.

११. आज यहोवाचे साक्षीदार अडचणीची परिस्थिती कशी हाताळीत आहेत?

११ “मोठा लोकसमुदाय” त्याच्या ‘माते’ संस्थेला मदतीचे अपील करतो त्यावेळी ती लगेच व भरपूर प्रमाणात दिली जाते. ज्या चलाखीने यहोवाचे साक्षीदार कामे उरकतात ती इतर गोष्टीतही म्हणजे नैसर्गिक आपत्ती ओढावल्यावर तेथे तातडीने मदत पोहोचविणे, आणि “अन्‍ना”चे वाटप करण्यासाठी राज्य सभागृहे व संम्मेलनाच्या जागा यांची त्वरेने केलली बांधणी येथेही दिसते. गेल्या जून मध्ये न्यूयॉर्क येथे यांकी स्टेडीयमवर अधिवेशनाची आयोजना केली गेली तेव्हा मध्यरात्री बेसबॉलचा खेळ आटोपल्यावर स्वच्छता करणाऱ्‍या स्वयंसेवकाचे मोठे सैन्य आत शिरले. ते स्टेडीयम पूर्वी कधीही दिसले नाही इतके टापटीप व स्वच्छ त्यानंतरच्या चार दिवशी दिसले. यहोवाच्या साक्षीदारातील जबाबदार वडील राज्याच्या सुवार्तेच्या प्रचारामध्ये काही कठीण परिस्थिती उद्‌भवल्यास ती हाताळण्यासाठी लगेच धावतात.—फिलिप्पैकर १:६, ७.

यहोवा इस्राएलांसाठी लढतो

१२. गिबोन्याच्या संरक्षणार्थ इस्राएलांच्यावतीने लढताना यहोवा कोणता चमत्कार सम्पन्‍न करतो? (पडताळा हबक्कुक ३:१, २, ११, १२.)

१२ पण आता गिबोनाकडे बघा. यहोवा शत्रूच्या सैन्यात गोंधळ उडवीत आहे. इस्राएल त्यांचा पाठलाग करीत मोठी कत्तल करीत आहे. आणि आकाशातून काय पडत आहे असे आम्हाला दिसते बरे? मोठमोठ्या गारा! इस्राएली योद्ध्‌यांनी केलेल्या कत्तलीपेक्षा मोठमोठ्या हिमगारांच्या तडाख्याने अधिक ठार होत आहेत. आता ऐका. यहोशवा यहोवा बरोबर बोलत आहे. तो “इस्राएलांच्या डोळ्‌यादेखत” काय म्हणतो? हे: “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो. हे चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्‍यावर स्थिर हो.” आणखी एक अद्‌र्भित चमत्कार! देवाचा सूड पुर्णपणे बजावला जाईपर्यंत “सुमारे एक संपूर्ण दिवस” सूर्य युद्धक्षेत्रावर चकाकत राहिला. आता यहोवाने हा चमत्कार कसा सम्पन्‍न केला वादविवाद करता येणे शक्य नाही. तसे करणे म्हणजे त्याने चवथ्या निर्मितीच्या “दिवशी” दोन मोठ्या ज्योति कशा ‘केल्या’ यावर विवाद करीत बसण्यासारखे आहे. (उत्पत्ती १:१६–१९; स्तोत्रसंहिता १३५:५, ६) लिखित अहवाल निर्णायक स्वरूपाचा आहे: ‘असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही. त्या दिवशी यहोवाने मानवाचा शब्द ऐकला. कारण यहोवा इस्राएलांसाठी लढत होता.”—यहोशवा १०:१०–१४.

१३. यहोशवा आपल्या सेनापतींना आणखी कसले उत्तेजन देतो आणि शेवटचा कोणता परिणाम प्राप्त होतो?

१३ शत्रूचा पाठलाग व हफ़ेचा कळस पाच राजांना पकडून ठार मारण्यात होतो. यावेळी यहोशवा सेनापतींना म्हणतो: “भिऊ नका, कचरू नका, खंबीर व्हा, हिंमत धरा. कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूंचे यहोवा असेच करील.” हे कनानच्या सात राजांच्या बाबतीत आधीच खरे ठरले होते व ते आणखी ज्या २४ राज्यांना उलटवून टाकण्यास आले त्यांच्या बाबतीतही खरे निघाले. अशाप्रकारे सहा वर्षांच्या युद्धांच्या धुमश्‍चक्रीनंतर देशाला विसावा मिळाला.—यहोशवा १०:१६–२५; १२:७–२४.

१४. आम्ही कोणत्या प्रवृत्तीने व आत्मविश्‍वासासह हर्मगिद्दोनास तोंड द्यावे?

१४ आज आपण हर्मगिद्दोनाच्या शेवटल्या युद्धाकरता तोंड देऊन असता, यहोशवा त्याची बलाढय माणसे व इस्राएलांची सर्व सेना याप्रमाणे खंबीर व बळकट होऊ या. यहोवाने जसे कित्येक लाखो इस्राएलांना अपाय न होता वचनयुक्‍त देशात आणले त्याचप्रमाणे तो त्याच्या लाखो निर्भिड लोकांना हर्मगिद्दोनातून बचावून नव्या व्यवस्थेत आणण्यासाठी आणखी भयप्रेरित चमत्कार करील.—प्रकटीकरण ७:१–३, ९, १४; १९:११–२१; २१:१–५.

आमचा निर्धार

१५. देवाच्या नव्या व्यवस्थेत “दुसरी मेंढरे” यांना कोणत्या प्रकारच्या नेमणूकीची अपेक्षा करता येईल?

१५ आता यहोशवाचे वय जवळजवळ ९० वर्षांचे होत आले होते त्यावेळेसच आणखी एक मोठी कामगिरी त्याच्यावर आली. ती, इस्राएल वंशजामध्ये प्रदेश वाटून देण्याची होती. यामुळे जीवन इस्राएलांसाठी सुरळीत होणार होते असे नाही. खरे म्हणजे, कालेबने हेब्रोनचे क्षेत्र मागून घेतले जेथे धिप्पाड अनाकी राहात होते. कालेबची इच्छा होती की यहोवाच्या शत्रूतील शेवटच्याचे पारिपत्य करीपर्यंत स्वतःला देऊ करावे. याकरवी हे सूचित होत नाही की पृथ्वीवर ख्रिस्ताच्या हजार वर्षाच्या राज्यकीर्दीत मानवी शत्रू असतील. पण तेथे काम करायला मात्र असेल. नव्या व्यवस्थीकरणात आपल्याला आरामशीर, आळसाचे जीवनाक्रमण मिळेल अशी अपेक्षा करू नये. “नवी पृथ्वी” यात प्रभूची “दूसरी मेंढरे’ यांना नेमणूक मिळाल्यावर ते या पृथ्वीस सुशोभित करून तिला खरोखरीच नंदनवनाचे रूप देण्याच्या भव्य प्रकल्पात स्वतःला गुंतवून घेतील.—यहोशवा १४:६–१५; मार्क १०:२९, ३०; रोमकर १२:११.

१६. “शरणपुरे” या यहोवाच्या व्यवस्थेद्वारे आज काय सूचित होते?

१६ प्रदेशाची नेमणूक देताना यहोशवाने लेव्यासाठी सहा शहरे, यार्देनेच्या प्रत्येक बाजूस तीन याप्रमाणे राखून ठेवली आहेत. त्यांना “शरणपुरे” म्हणण्यात येते. ही यहोवाची त्या निर्हेतुक मनुष्य हत्त्या करणाऱ्‍यांसाठी योजना होती जेथे तो कोणत्याही एका शहरात पळून जाऊ शकत होता. अशा या गुन्हेगारास आपल्याला देवासमोर शुद्ध विवेक आहे हे सिद्ध करून द्यायचे आहे. याकरता त्याला प्रमुख याजकाच्या मरणापावेतो तेथे राहावे लागणार असते. याप्रमाणेच, या रक्‍तपाती जगाचा पूर्वी सहवास राखल्यामुळे “मोठा लोकसमुदाय” याने देवाबरोबर चांगला विवेकभाव प्राप्त करून घेतला पाहिजे. आपल्या पापांची कबूली देऊन, पश्‍चाताप करून, मागे वळून, यहोवास समर्पण करून आणि पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन ते हा चांगला विवेकभाव प्राप्त करतात. ही भूमिका त्यांनी टिकवून ठेवली पाहिजे. ‘मोठ्या लोकसमुदायाला’ येशू आपले प्रमुख याजकपदाचे काम संपवून लाक्षणिकरित्या मरेपर्यंत, हजार वर्षाच्या राज्य कीर्दीच्या समाप्तीपर्यंत “शहरात” राहण्याची गरज आहे.—यहोशवा २०:१–९; प्रकटीकरण २०:४, ५; १ करिंथकर १५:२२, २५, २६.

१७. कोणत्या आनंदी परिणामाची आज आम्ही अपेक्षा धरून आहोत?

१७ यहोवाने आपले लोक इस्राएल यांना किती अद्‌र्भितपणे आशीर्वादित केले! त्यात बरेच कठीण प्रसंग होते व परीक्षाहि आल्या. पण सरतेशेवटी ते वचनयुक्‍त देशात येऊन दाखल झाले व त्यात राहू लागले. त्यावेळी त्यांची अंतःकरणे यहोवास केवढ्या कृतज्ञतेचे बोल सांगत असतील! आम्ही देवाशी विश्‍वासू राहिल्याचे शाबीत झाल्यावर त्याच्या नव्या व्यवस्थेत, “नव्या पृथ्वी” त प्रवेश करताना आम्हालाही असाच आनंद लाभेल. यहोशवाच्या काळी जसे खरे होते तसे तेव्हाही आमच्या बाबतीत खरे असेल की: “यहोवाने इस्राएल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यातली एकहि निष्फळ झाली नाही; त्या सर्व सिद्धीस गेल्या.” (यहोशवा २१:४५) तुम्हाला या मध्ये आनंदी सहभाग लाभो!

१८. (अ) यहोशवाने इस्राएलांच्या वडिलांसमोर कोणता वृत्तांत परत आठविला? (ब) यहोवाच्या नव्या व्यवस्थेच्या बाबतीत आमची कोणती इच्छा असावयास हवी?

१८ शेवटी ११० वर्षांचा असताना यहोशवाने इस्राएलाच्या वडील जनांना एकत्र आणले. त्याने त्यांना अब्राहामाच्या काळापासून त्यांच्या दिवसापर्यंत यहोवाने आपल्या विश्‍वासू लोकांना केवढ्या अद्‌र्भितपणे आशीर्वादीत केले याचा वृत्तांत कळविला. यहोवाने त्यांना म्हटलेच होते: “जी जमीन तुम्ही कसली नाही ती मी तुम्हाला दिली. जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यात तुम्ही राहात आहा आणि द्राक्षांचे जे मळे व जैतुनाचे बाग तुम्ही लाविले नाहीत त्यांचे उत्पन्‍न तम्ही खात आहा.” एवढी सर्व विपुल तरतुद असताना इस्राएलांनी “यहोवाचे भय धरून त्याची सेवा सात्विकतेने व सत्याने” सदासर्वदा करण्याचे खूपच कारण होते. याचप्रमाणे आम्हीही आता पृथ्वीकरता यहोवाच्या वैभवी नव्या व्यवस्थेची वाट पाहून असता अशीच इच्छा आम्हा प्रत्येकात जागली जाण्यास हवी.—यहोशवा २३:१३, १४.

१९. (अ) यहोशवाने लोकांपुढे आता कोणती निवड ठेवली, आणि लोकांनी याला कसे उत्तर दिले? (ब) आम्ही कोणासारखे असावयास हवे? (क) आम्ही कोणती निवड करावी आणि आमचा काय निर्धार असावा?

१९ यानंतर यहोशवा अगदी साधेपणात लोकांपुढे ही गोष्ट मांडतो: “यहोवाची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा . . . मी आणि माझे घराणे तर यहोवाचीच सेवा करणार.” अगदी याच सुरात आम्हाला व्यक्‍तिगत रित्या, आमच्या विश्‍वास राखणाऱ्‍या कौटुंबिक सदस्यांना, आमच्या मंडळीला, आमचे जगव्याप्त ‘देवाचे घराणे’ याला आपला निर्णय घोषित करता येईल का? निश्‍चितपणे! (इफिसकर २:१९) यहोशवाच्या काळातील लोकांनी त्याला उत्तर दिले: “आमचा देव यहोवा ह्‍याचीच सेवा आम्ही करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार!” (यहोशवा २४:१५, २४) पण हेच लोक काही वर्षे गुदरल्यावर यात अपयशी झाले हे मोठ्या दुःखाचे आहे. यांच्या प्रमाणे असण्याची आम्ही इच्छा धरू नये. उलटपक्षी, आम्ही यहोशवा व त्याचे घराणे, कालेब, गिबोनी लोक व राहाब ह्‍यांच्या सारखे व्हावे. होय, आम्ही यहोवाची सेवा करावी.’ आपण हे खंबीरपणे करीत राहू या आणि हा पूर्ण आत्मविश्‍वास बाळगू की, ‘ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्‍याच्या मध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्‍त करावयाला [कोणीही] समर्थ होणार नाही.”—रोमकर ८:३९.

यहोशवाच्या पुस्तकातून आम्हाला याबाबतीत काय शिकायला मिळते—

◻ वारंवार दिल्या गेलेल्या सूचनांपासून फायदा प्राप्त करून घेण्याविषयी?

◻ आधुनिक काळच्या गिबोन्यांची काळजी घेण्याच्या विषयी?

◻ यहोवा हर्मगिद्दोनात कसे युद्ध करील त्या विषयी?

◻ ‘शरणपुरा’कडे पळून जाण्याच्या गरजे विषयी?

◻ आम्ही कोणाची सेवा करणार याची निवड करण्या विषयी?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा