“खंबीर हो व खूप हिंमत धर”
“त्यांना भिऊ नका, कारण तुमच्या बाजूने युद्ध करणारा तुमचा देव यहोवा आहे.”—अनुवाद ३:२२.
१. (अ) अरण्यवासातील प्रयाणानंतर इस्राएल आता कोणत्या दशेत आले होते? (ब) यावेळी मोशाने कसले जोरदार आव्हान केले?
इस्राएलांच्या इतिहासात अति गंभीर घटना घडण्याचा काळ आला. देवाच्या पवित्र राष्ट्राने आता वचनयुक्त देशात प्रवेश मिळविण्याची तयारी करण्यास हवी होती! ४० वर्षभर मोशाने इस्राएलांना मोठ्या व भयप्रद अरण्यामधून निरविले होते. पण आता मवाबाच्या देशात यार्देन नदीच्या प्रदेशी त्याने देवाच्या लोकांपुढे आपले शेवटले भाषण दिले. त्याचे वय आता १२० वर्षांचे झाले होते तरी “त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृति क्षीण झाली नव्हती;” आणि त्याच्या आवाजातील प्रभावीपणा सुद्धा कमी झाला नव्हता. मोशाने यहोवाच्या नियमांचे प्रबळपणे केलेले वक्तव्य तसेच लोक देशाच्या वतन प्राप्तीसाठी जात असताना त्याने त्यांना खंबीर होण्याविषयी केलेले जोरदार आव्हान ऐकून त्याचा होणारा वारस यहोशवा त्याचप्रमाणे बाकीचे इस्राएल यांना मोठी थरारी भरली असावी.—अनुवाद १:१–५, १९, २१, २९, ३०; ३:२२; ३१:६, ७, २३; ३४:७.
२. या गोष्टींचा अहवाल आज आमच्याकरिता बोधकारक आहे हे आम्हाला कसे कळते?
२ त्या बऱ्याच काळाआधी घडलेल्या घटना निव्वळ ऐतिहासिक आहेत का? मुळीच नाही! प्रेषित पौल आम्हाला सांगतो: “जे काही शास्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपणास शिक्षण मिळण्याकरता लिहिले, यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेच्या व समाधानाच्यायोगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी.” (रोमकर १५:४) या अहवालाची आधुनिक काळची साम्यता आहे. ती आज आम्हास आध्यात्मिक युद्धासाठी बळकट करू शकते. “ज्या आपल्यावर युगांचा शेवट आला आहे त्या आपल्या इशाऱ्यासाठी” ती उचित ठरते आणि आपल्याला सैतानाचे पाश टाळण्याची मदत सुद्धा देते.—१ करिंथकर १०:११; १ पेत्र ४:७.
यहोशवाचे सामर्थ्य—कोणत्या उगमाकडून
३, ४. (अ) आम्ही निर्भिडता वाढविण्याची का गरज आहे? (ब) हे आम्हाला कसे करता येईल?!
३ अगदी लवकरच देवाचे लोक यहोवाच्या नव्या व्यवस्थीकरणात कूच करतील. ज्या घटना जगातील वातावरणास वळण देत आहेत त्या दृष्टीने बघता आता आम्ही निर्भिडपणा वाढविण्याची गरज आहे. पण हे आम्हास कसे जमेल? यहोशवाने वचनयुक्त देशात जाण्याची सिद्धता केली त्यावेळी देवाने त्याला सूचना केली: ‘मात्र तू खंबीर हो व खूप हिंमत धर, आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको. म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर; म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल.”—यहोशवा १:७, ८.
४ अहा, यात ते गुपित आहे! पवित्र शास्त्राचे दररोज वाचन करा. त्यात आम्हासाठी देवाचे नियम दिले आहेत. त्यावर मनन करा. त्याचे निर्बंध ऐका. स्वतःला सभोवताली पसरलेल्या जडवादी, अनैतिक जगात लोटून देऊ नका. ज्या परिस्थितीत असलेले तुम्हास आढळते तेथे राहून सूज्ञतेने वागा. देववचनाच्या अभ्यासाद्वारे प्राप्त केलेले अचूक ज्ञान व आध्यात्मिक समज याचा व्यवहारिकपणे अवलंब करा. त्याविषयी इतरांसोबत बोला. असे करण्याद्वारे व यहोवावर विसंबून राहिल्यामुळे तुम्हाला ‘खंबीर होता येईल, खूप हिंमत धरता येईल व आपल्या मार्गात यशस्वी होता येईल.’—पडताळा स्तोत्रसंहिता १:१–३; ९३:५; ११९:१६५–१६८.
५. (अ) यहोशवाप्रमाणे आज युवक उपाध्यायांना बळ कसे मिळू शकते? (ब) आजच्या युवक साक्षीदारांपुढे कोणते सुंदर ध्येय आहे?
५ यहोशवा “तरूणपणापासून मोशेचा सेवक होता.” (गणना ११:२८) अशा या जवळीकीमुळेच त्याला आध्यात्मिक बळ मिळाले असावे यात काही शंका नाही. याचप्रमाणे आजचे तरूण उपाध्याय आपले भक्तिमान पालक, पायनियर्स, दीर्घकाळापासून असणारे साक्षीदार व यहोवाच्या इतर निष्ठावंत सेवकांसोबत कार्य करून बळ प्राप्त करून घेऊ शकतात. अशा या आवेशी लोकांबरोबर घरोघरचे साक्षीकार्य करण्यात आगळा आनंद मिळतो व हे आमच्या युवकांमध्ये प्रौढता वाढवून त्यांना उपाध्यपणात पुढे सरसावण्याची मदत देते. (प्रे. कृत्ये २०:२०, २१; यशया ४०:२८–३१) यहोवाच्या राज्याच्या खातर पूर्ण वेळेची सेवा करणे यापेक्षा आणखी कोणते सुंदर ध्येय युवक साक्षीदारांना आहे बरे!—स्तोत्रसंहिता ३५:१८; १४५:१०–१२.
६. अमालेक्यांविरूद्ध काढलेल्या मोहीमेत यहोशवा आम्हासाठी कसा उदाहरण ठरला?
६ मोशाने यहोशवाला अमालेक्यांविरूद्ध लढण्यास पाठविले तेव्हा “मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले.” तो आज्ञाधारक होता; याकरताच तो विजय मिळवू शकला. याचप्रमाणे आम्हीही, देवाच्या संस्थेकडून प्राप्त होणाऱ्या लढतीच्या सूचना काळजीपूर्वक पाळल्या तर यहोवाच्या विजयोत्सवात सहभागी होऊ शकू. यहोवाने मोशेला म्हटले की अमालेक्यांविरूद्ध देवाने मिळविलेल्या विजयाचे स्मरण राहावे याकरता ही घटना एका पुस्तकात लिहून ठेवावी व यहोशवास ऐकवावी. अर्थातच, यहोशवानेही हीच विजयी घटना दुसऱ्यांच्या कानी ऐकवून यहोवाची थोरवी वाढविली असावी. याचप्रमाणे आज आम्ही सार्वभौम प्रभू यहोवाची महत्कृत्ये विदीत करून दुष्टांवर येत असलेला “सूडाचा दिवस” सुद्धा घोषित करावा.—निर्गम १७:१०, १३, १४; यशया ६१:१, २; स्तोत्रसंहिता १४५:१–४.
७, ८. (अ) कनानातून परतल्यावर यहोशवा व कालेब यांनी कोणता आत्मविश्वास व्यक्त केला? (ब) त्यावेळी यहोवाने परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली त्याकडून आम्हाला कोणता इशारा व कोणते उत्तेजन मिळते?
७ वचनयुक्त देशाची पाहणी करण्यासाठी मोशेने पाठविलेल्या १२ हेरात यहोशवाचाही समावेश होता. परतल्यावर दहा हेरांनी कनानी लोकांबद्दल फार मोठी भीती व्यक्त केली आणि आपण मिसरात परत जाऊ या असे लोकांना चिथाविले. परंतु, यहोशवा व कालेब यांनी मात्र मोठ्या धैर्याने घोषित केले: “यहोवा आमच्यावर प्रसन्न आहे तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला निश्चये नेईल आणि तो देश आम्हास देईल. तुम्ही यहोवाविरूद्ध बंड मात्र करू नका; आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका. कारण ते आमचे भक्ष्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे पण आमच्याबरोबर यहोवा आहे. त्यांची भीती बाळगू नका.”—गणना १३:१–१४:३८.
८ तथापि इस्राएलांच्या मंडळीने कुरकुर चालूच ठेवली त्यामुळे यहोवाने हस्तक्षेप करून त्या भीतीग्रस्त इस्राएलांना ४० वर्षे अरण्यात भटकण्याचा दंड दिला. कालेब व यहोशवा शिवाय युद्धास गेलेली सर्व माणसे वचनयुक्त देश न पाहता मरण पावली. हा आम्हासाठी केवढा इशारा! आपण यहोवाच्या व्यवस्थेविरूद्ध कधीही कुरकुर करू नये. आमच्या साक्षीचे क्षेत्र कठीण असले तरी आपण धैर्यवान व बळकट होऊन लोकांच्या घरोघर जीवन वाचविणारा राज्याचा संदेश पोहोचवू या. आपण त्या आधुनिक काळच्या धर्मत्याग्यांसारखे होऊ नये, जे जाहीरपणे साक्षीकार्यात भाग घेण्याऐवजी आपल्या बंधूंविषयी निंदात्मकपणे बोलत राहतात आणि नमुनेदार मिसर म्हणजे सध्याचे जग याच्या मार्गाकडे परत धावतात.—गणना १४:१–४, २६–३०; लूक १२:४५, ४६; पडताळा प्रे. कृत्ये ५:२७–२९, ४१, ४२.
यहोवाचे नाम आघाडीवर!
९. यहोशवा आपल्या नव्या नावानुरूप कसा जगला?
९ पवित्र शास्त्र १२ हेरांची नावे देताना त्यामध्ये यहोशवाचे नाव होशा असे देते ज्याचा अर्थ “तारण” आहे. पण याच वेळेला अहवाल म्हणतो: नूनाचा मुलगा होशा ह्याचे नाव मोशेने यहोशवा [म्हणजे, ‘यहोवा तारण आहे’] असे ठेविले.” मोशेने अशाप्रकारे यहोवाच्या नावावर का भर दिला? कारण त्या नावाच्या विजयोत्सवामध्ये यहोशवाने प्रमुख भाग घेतला होता. मोशेने इस्राएलांना नंतर जे आवर्जून सांगितले की, “तू आपला देव यहोवा याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर” त्याच्या आज्ञापालनाच्या बाबतीत यहोशवा एक जिवंत उदाहरण ठरला होता. हे करण्यात “यहोवा तारण आहे” याचे प्रदर्शन करण्याचा हक्क त्याला मिळाला होता.—गणना १३:८, १६; अनुवाद ६:५.
१०. (अ) यहोवाच्या नामाचा तुम्हासाठी काय अर्थ होतो? (ब) यहोवाने यहोशवास आणखी जे म्हटले त्याकडून आम्ही कसे बळ प्राप्त करू शकतो?
१० यहोवा हे अत्यंत मोलवान नाम असून ते सर्व स्तुतीला पात्र आहे असे आम्ही स्वतः मानीत नाही का? त्याच्या अभिवचनाच्या पूर्णतेच्या बाबतीत त्याचे सुविख्यात नाम “तो घडवून आणतो” असा अर्थ देते. त्याची राज्याविषयीची अभिवचने केवढी उबदार आहेत! यास्तव यहोशवासारखा आवेश राखून आम्हीही, ज्यांना देवाच्या शुद्ध व धार्मिक अशा नव्या व्यवथीकरणाची आशा कवटाळावयाची आहे त्यांच्यापुढे यहोवाचे नाम व त्याचे उद्देश धरले पाहिजे. आजच्या या त्रस्त काळात, यहोवाने यहोशवाला आणखी जे शब्द सांगितले त्यापासून आम्हाला बळ मिळाले पाहिजे. तो म्हणतो: “मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरू नको. कारण तू जाशील तिकडे तुझा देव यहोवा तुझ्याबरोबर असेल.”—यहोशवा १:९.a
११. (अ) येशूने यरूशलेमात गाढवीवर बसून प्रवेश केला तेव्हा त्याच्या नावाच्या अर्थावर कसा भर दिला गेला? (ब) येशूने यहोवाचे नाम कसे मानले व हे काय दाखविते?
११ येशूवा वा यहोशवा या नामाचा ग्रीक भाषेतील समांतरीत शब्द येशू आहे व याचाहि अर्थ “यहोवा तारण आहे” असाच होतो. येशू ख्रिस्ताद्वारेच यहोवा मानवजातीस तारण प्रदान करतो. इ.स. ३३ मध्ये येशूने गाढवीच्या शिंगरावर बसून यरूशलेमात प्रवेश केला त्यावेळी जमावाने जयजयकार केला: “आमचे तारण कर, हे देवा अशी आम्ही तुला विनंति करतो. यहोवाच्या नामाने येणारा धन्यवादित असो.” (मार्क ११:९; जखर्या ९:९) यहोशवा येशूचा खरा नमुना ठरला, आणि येशूने “आम्ही त्याच्या पावलांस अनुसरावे म्हणून आम्हापुढे कित्ता ठेवला आहे.” (१ पेत्र २:२१) यहोशवा प्रमाणे येशूनेही यहोवाचे नाम आदरणीय मानले व ते नाव उंचावून धरले. आपल्या शिष्यांसमवेत केलेल्या शेवटच्या प्रार्थनेत त्याने दोनदा देवाच्या नामावर असे म्हणून भर दिला: “जी मनुष्ये तू मला जगातून दिली त्यांस मी तुझे नाम प्रकट केले . . . मी त्यांना तुझे नाम कळविले आणि कळवीन यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी व मी त्यांच्या ऐक्यात राहावे.” (योहान १७:६, २६) ते नाव इतरांना कळविण्याचा आम्हास केवढा हक्क आहे!
१२. कोणती महत्कृत्ये घडण्याची आम्ही वाट पाहून आहोत व का?
१२ पवित्र शास्त्रात यहोशवाच्या निष्ठावंत नेतृत्वाचा अहवाल आपण वाचतो तेव्हा आपल्या मनात थोर यहोशवा, येशू ख्रिस्त देवाच्या लोकांचे आज नेतृत्व करीत असल्याचे येते. ‘यहोवाच्या विजयोत्सवाचा दिवस’ आता समीप आहे. या दिवसानंतर येणाऱ्या नव्या धार्मिक व्यवस्थीकरणाच्या अभिवचनाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत आहोत! (२ पेत्र ३:१०:–१३, १७, १८) याकरता आम्ही यहोवाच्या अद्र्भित कृत्यांची मोठ्या आत्मविश्वासाने वाट बघून आहोत. ती महत्कृत्ये, त्याने यहोशवाच्या काळी केली त्यापेक्षा अधिक महान असतील.
यहोवाचा यार्देन येथील चमत्कार
१३. (अ) यार्देनेच्या पूर्वभागाला इस्राएलांपुढे कोणती असंभवनीय परिस्थिती उभी राहिली? (ब) इस्राएलाच्या आज्ञाधारकपणाचे कोणते बक्षीस लाभले?
१३ तो इ.स. पू. १४७३चा हंगामाचा काळ होता आणि यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती. आता तरूण व वृद्ध, स्त्री, पुरुष, मुले असे लक्षावधी जीव यातून कसे पार होऊ शकतील? तरी यहोवाने यहोशवाला आज्ञा केली: “उठ, व . . . ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा.” लोकांनीही यहोशवाला म्हटले: “जे काही करण्याची आज्ञा तू आम्हाला केली, ते सर्व आम्ही करू.” इस्राएलांनी तळ उठविला. प्रथमतः याजकवर्ग कराराचा कोश घेऊन निघाले. हा कोश काळजीपूर्वक रित्या आच्छादिलेला होता. तो त्यांच्यामध्ये यहोवाच्या अस्तित्वाचे प्रतीक होता. यहोवाने त्यांच्यामध्ये ‘अद्र्भित कृत्य’ केले. “कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहोचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले . . . तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर . . . साठून चढले.” जे पाणी खाली होते ते मृत समुद्राकडे “अगदी वाहून गेले.” मग “लोक . . . पार उतरून गेले.” (यहोशवा १:२, १६; ३:५–१६) खरेच आश्चर्यावह असे अद्र्भित कृत्य!
१४. आजच्या काळात कोणती समांतरता दिसते आणि साक्ष देण्याचा कोणता परिणाम दिसून आला आहे?
१४ दुथडी भरून वाहणाऱ्या यार्देनेची आज समांतरता मानवजातीच्या पुरात दिसते जो आता हर्मगिद्दोनच्या दिशेकडे नाशाप्रत वाहवत जात आहे. (पडताळा यशया ५७:२०; प्रकटीकरण १७:१५) मानवजात खाईत पडण्याच्या उंबरठ्यावर उभी असताना यहोवा आपल्या लोकांची मजबुती करीत आहे. यांची संख्या आता ३० लाख आहे, ती यहोशवा सोबत कूच केलेल्या देवाच्या लोकांशी साम्यतेची ठरते.—पडताळा हबक्कुक २:३.
१५. (अ) प्राचीन काळातील याजकांनी जी कृति केली त्याच्याशी सदृश्य असणारी आजच्या काळातील कृति कोणती आहे? (ब) या चित्रात “मोठा लोकसमुदाय” याचे प्रतीक कोठे दिसते?
१५ लाखो इस्राएल त्या नदीतून पार जात असता “यहोवाच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले.” याकरवी ते यहोवा देवाने केलेल्या हस्तक्षेपाचे प्रतिनीधित्व करीत होते. (यहोशवा ३:१७) १९१९ मध्ये अभिषिक्त शेषाच्या एका छोट्या तुकडीने मानवजातीच्या “पाण्यात“ निभर्डिपणे पाय रोवले. ‘राजा व त्याचे राज्य याची जाहिरात करा, जाहिरात करा, जाहिरात करा’ या १९२२ च्या आव्हानाला त्यांनी निर्भिडपणे उत्तर देऊन म्हटले: “हा मी आहे, मला पाठीव.” यहोवाने त्यांना हमी दिली: “तू जलातून चालशील तेव्हा मी तुजबरोबर असेन. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत.” १९३१ मध्ये त्याने त्यांना यहोवाचे साक्षीदार हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. (यशया ६:८; ४३:२, १२) जे यार्देन नदी पार करणार होते त्यात लेवीय नसणारे इस्राएल लोक आणि मिसरातून मोशेसोबत निघालेल्या इस्राएलेत्तरांचा “मोठा मिश्र समुदाय” होता. याचप्रमाणे आज “मोठा लोकसमुदाय” देवाच्या नव्या व्यवस्थेत पार जाण्याच्या तयारीत आहे तर आध्यात्मिक याजक वर्गातील शेष आपल्या विश्वासाचे उदाहरण राखून “स्थिर व अढळ” उभे आहेत.—निर्गम १२:३८; प्रकटीकरण ७:९; १ करिंथकर १५:५८.
चमत्काराचे स्मरण ठेवणे
१६. (अ) यार्देनेकडे घडलेल्या चमत्काराचे कसे स्मरण ठेवले गेले? (ब) हे आज यहोवाच्या अद्र्भित कृत्यांविषयी काय सुचविते?
१६ यार्देनेमध्ये घडलेल्या या चमत्काराचे स्मरण ठेवण्याचे यहोवाने सांगितले. त्याने इस्राएलाच्या वंशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १२ पुरुषांना नदीच्या पात्रातून १२ धोंडे आणून गिल्गालच्या पश्चिम किनाऱ्यावर त्याची रास करावयाला लावली. ही रास यहोवाचे नाम व त्याची अद्र्भित कृत्ये यांचे स्मरण देणारे स्मारक ठरणार होती. इस्राएलाच्या भावी संतानाना सांगावयाचे होते की हे स्मारक “यहोवाचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील लोकांना [कळावे] आणि तुमचा देव यहोवा याचा तुम्हाला निरंतर धाक वाटेल” याकरता होते. (यहोशवा ४:१–८; २०–२४) आधुनिक काळात राजकीय व धार्मिक नेत्यांनी खडतर हल्ले केले तरी त्यातून आपल्या लोकांना वाचविण्यासाठी देवाने जी अद्र्भित कृत्ये केली ती स्मारक या नात्याने याचे स्मरण देतात की तो आपल्या लोकांबरोबर आहे. याशिवाय त्याच्या नावाच्या गौरवाप्रीत्यर्थ आज जी कृत्ये तो भव्यतेने करीत आहे त्यांचे स्मरण त्याच्या नव्या व्यवस्थेत चिरकालपणे होत राहील यात काही शंका नाही.—प्रकटीकरण १२:१५, १६; स्तोत्रसंहिता १३५:६, १३.
१७. (अ) यहोशवाने आणखी कोणते स्मारक रचले? (ब) आज अशाप्रकारचा कोणता पुरावा मानवजातीस धुडकावून लावता येत नाही?
१७ आणखी एक स्मारक योग्यतेचे होते: “यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा धोंडे उभे केले. ते आज पर्यंत तेथे आहेत.” याजक नदीच्या पात्रातून बाहेर आले आणि यहोवाने पुराचे पाणी परत वाहू दिले तेव्हा ते त्या १२ साक्षीच्या धोंडया भोवती कुरळ्या वळणाने वाहू लागले. (यहोशवा ४:९) त्यानंतर त्या पाण्याला त्या धोंडयांचे अस्तित्व झुगारता आले नाही. याच प्रमाणे आज मानवजात हर्मगिद्दोनच्या “मृत समुद्रा”कडे अधिक वेगाने धावत आहे. पण तिला, यहोवाच्या साक्षीदारांनी “एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर” राहून जी साक्षीची रास उभारली आहे तिच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. (फिलिप्पैकर १:२७, २८) उपलब्ध असणारा या १९८६ वर्षापर्यंतचा ६७ वर्षांचा अहवाल दाखवितो की यहोवाच्या साक्षीदारांनी जगभरातील वितरणाकरता २०० पेक्षा अधिक भाषांत ५७,००,००,००० पुस्तके तसेच ६,४०,००,००,००० पेक्षा अधिक वॉचटावर व अवेक! मासिकांचे प्रकाशन केले. शिवाय लाखो वार्षिक वर्गण्याही मिळवल्या. स्मारकरूपी केवढी ही भव्य साक्ष!
१८. (अ) याजकवर्गाने आज कोणते गुण प्रदर्शित केले आहेत? (ब) देवाच्या सर्व लोकांना कशामुळे चालना मिळाली?
१८ या १९८६ वर्षापर्यंत साक्षीकार्य चालू राहिले आहे याचा आम्हाला आनंद वाटतो. देवाच्या इच्छेप्रमाणे करणे हे खरेच परिश्रमाचे काम होते जसे की त्या १२ पुरुषांनी स्मारक चिन्ह म्हणून धोंडे उचलून गिल्गालपर्यंत आपल्या खांदी वाहून आणले होते. तरीपण वाढत्या अशा पायनियर आत्म्याने देवाच्या आधुनिक काळच्या लोकांना एकवटले आहे व त्यांना ‘खंबीर होण्याची व खूप हिंमत धरण्याची’ चालना दिली.—स्तोत्रसंहिता २७:१४; ३१:२४; सफन्या ३:९.
१९. यहोशवाच्या काळातील आणखी काही घटनांची उजळणी करताना आम्ही कोणता आत्मविश्वास असू द्यावा?
१९ यहोशवाच्या काळातील आणखी काही घटनांनी आम्हाला पुढे जात राहण्याचे आणि यहोवा आपल्या लोकांखातर आणखी अद्र्भित कृत्ये करील याचा आत्मविश्वास वाढवीत राहण्याचे प्रोत्साहन द्यावे. यापैकीच्या काहींची माहिती पुढील लेखात सापडेल.
[तळटीपा]
a आशेर गोल्डनबर्ग मिटर ॲण्ड इट्स् सिग्निफिकन्स इन द बायबल (इब्री) यात लिहीतात की, मंदिराच्या पहिल्या काळात नावे ही सर्व साधारणपणे मोठी होती व त्यात पवित्र नामाच्या आद्याक्षरांचा समावेश होता. याकरवी यहोवाला निष्ठावंतपणा दाखवण्याचे सूचित होई. ते म्हणतात: “पेंटेटॉच मध्ये मोशाने हेरांना पाठविताना होशा–बिन–नून याचे नाव बदलून ते ‘यहोशवा’ ठेवले याकरवी त्याने न्याहाळले की [यहोशवा] [यहोवाचा] विश्वासघात करणार नाही.”
यहोशवाच्या काळातील घटनांबद्दल विचार करताना—
◻ त्यांच्याकडे ऐतिहासिक दृष्टीने बघण्यापेक्षा अधिकपणे का पाहण्यास हवे?
◻ आम्हाला खंबीरता व आध्यात्मिक बळ कसे वाढवता येईल?
◻ यहोशवाने आम्हासाठी कोणता सुंदर नमुना सोडला?
◻ यहोशवा कोणकोणत्या बाबतीत येशूची प्रतिछाया ठरतो?
◻ यार्देनेपाशी घडलेल्या कोणत्या घटना आज समांतरित आहेत?