वाचकांचे प्रश्न
◼ कोणी ख्रिश्चन लांच [पवित्र शास्त्रात धिक्कारण्यात आलेली] आणि एखाद्या सेवेबद्दल दिली जाणारी “बक्षिशी” यातील फरक कसा दाखवू शकेल?
विशिष्ट प्रथा विविध जागी भिन्न असतात याची आम्ही जाण राखली पाहिजे. एखाद्या देशात स्विकारण्यात आलेली पद्धत दुसरीकडे बेकायदेशीर वा अयोग्यही ठरू शकते. उदाहरणार्थ, कोणा देशात अधिकाऱ्यासमोर लवून प्रणिपात केला जात असेल पण तेच दुसऱ्या देशात हीच गोष्ट मूर्तिपूजा म्हणून जमेस धरली जाऊ शकेल.a याचप्रमाणे एखाद्या देशात “बक्षिशी” देण्याची प्रथा स्वीकृत वाटत असेल पण हीच प्रथा दुसरीकडे मोठी धक्कादायक वा बेकायदेशीर मानली जाऊ शकते. या भिन्न गोष्टी लक्षात घ्यायच्या असल्या तरी ख्रिश्चनांनी लाच घेण्या देण्याविषयी देवाच्या सूचनेचा अवलंब केलाच पाहिजे.
लाच म्हणजे काय व त्याविषयी पवित्र शास्त्र काय म्हणते? द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ म्हणते: “लाच याचा अर्थ मूल्य असणारी कोणतीही गोष्ट विश्वसनीय पदावर असणाऱ्या व्यक्तीस देणे वा सादर करणे हा आहे. याद्वारे ती लाच घेणारा लाच देणाऱ्याकरता त्याचे वा तिचे कर्तव्य किंवा कायदा भंग करीत असतो.” अशा प्रकारे कोणा न्यायधिशाला, त्यांच्या निर्णयावर प्रभुत्व राखावे व विपरीत न्याय द्यावा या करता पैसे (वा देणगी) देऊ करणे ही लाच आहे. याचप्रमाणे कायद्याचा हेतु सफल होऊ नये पैसे म्हणून देणे ही सुद्धा लाच आहे. ती कोणा इमारत वा वाहन परिक्षकाने घडलेल्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करावे म्हणून त्याला दिली जाते.
देव लाचेचा धिक्कार करतो यासाठीच त्याने इस्राएली शास्त्यांना म्हटले होते: “विपरीत न्याय करू नये, पक्षपात करू नये आणि लांच घेऊ नये, कारण लांच शहाण्यांचे डोळे अंधळे करते आणि नीतीमानाच्या दाव्याचा विपर्यास करते.” (अनुवाद १६:१९; पडताळा नीतीसूत्रे १७:२३; यशया १:२३; ५:२३; १ शमुवेल ८:३–५) यहोवा स्वतः या गोष्टीचा नमुना देतो कारण त्याच्याकडे “काही अधर्म नाही; तो कोणाचे तोंड पाहून न्याय करीत नाही की लाच घेत नाही.” (२ इतिहास १९:७; अनुवाद १०:१७) तद्वत, देवाची मर्जी संपादित करण्याची इच्छा धरणाऱ्याची इच्छा धरणाऱ्या ख्रिश्चनांनी लाच नाकारली पाहिजे.—पडताळा प्रे. कृत्ये २४:२६.
जगभरात सर्वत्र लोक लाचेचा निषेध दर्शवीत असले व त्याविषयीचे कायदे आहेत तरी वर दाखविलेल्या प्रश्नात प्रतिबिंबित होणारी समस्या पुष्कळांना भेडसावत आहे. त्यांना ठाऊक असते की त्यांच्या देशातील सर्वसाधारण अधिकाऱ्यांकडून आपले काम करवून घेण्यासाठी वा ते व्यवस्थितपणे होण्यासाठी “बक्षिशी” देण्याची गरज असते. उदाहरणार्थ, चलन फुगवटा असणाऱ्या एका देशाविषयी द वॉल स्ट्रीट जरनल म्हणते: “वरचा खर्च भागविण्याकरता जी रोकड हवी असते त्यासाठी सरकारी कर्मचारी लहानसहान भ्रष्टाचार आचरतात. एका राज्याच्या प्रतिनिधि कार्यालायाचे प्रमुख म्हणतात की, ‘एखादा फॉर्म हवा असेल तरी त्याकरता पैसे द्यावेच लागतात.’ तसेच आंतरराष्ट्रीय विमान तळावर गोंधळलेल्या विदेशी यात्रेकरू प्रवाश्यांनी आपले उड्डाण चुकवू नये याकरता त्यांच्या पासपोर्टवर शिक्का मारण्यासाठी अधिकारी २० डॉलर्स घेतात.”
यू.एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट याने नुकतेच जगभरात सर्वत्र प्रचलित असणारी नोकरशाही व त्यांची कमाई याविषयीचे विवेचन मांडले. उदाहरणार्थ, त्याने म्हटले: “आपल्या मुलास शाळेत दाखल होता यावे, इस्पितळात जागा मिळावी एवढेच काय पण आगगाडीत आरक्षण मिळावे म्हणून सध्याच्या काळी भारतीयास बाजूने पैसे अधिकाऱ्याला द्यावे लागतात. याविषयीची आणखी उदाहरणे अशी आहेत:
—एखाद्या उद्योजकाला आपला व्यवसाय सुरु करण्याआधी परवाना लागतो. तो सरकारी कार्यालायात शासकीय फी तर भरतोच तरीपण सर्वांना याची माहिती आहे की जोपर्यंत “बक्षिशी” सरकवली जात नाही तोपर्यंत त्याचे कागदपत्र ढिगाऱ्याच्या तळाशीच राहणार. तो गृहस्थ आपले कागदपत्र विचारार्थ वा कारवाईसाठी इतरांपेक्षा आधी घेतले जावेत असे म्हणत नसला तरी सर्वसाधारण “बक्षिशी” टिकवली की त्याचे कागदपत्र व्यवस्थित हाताळले जातात.
—काही देशात लोकांना ठाऊक आहे की रहदारीवरील नियंत्रण राखणाऱ्या अधिकाऱ्यांना कमी वेतन मिळते पण ते “चहापाण्याचा खर्च” मात्र उकळतात. कोणी अधिकारी वाहन चालकाला थांबवून म्हणतो की त्याने नियम मोडला त्यामुळे त्याने दंड भरला पाहिजे. चालक आवर्जून म्हणतो त्याने कोणताहि नियम मोडला नाही तेव्हा अधिकारी तंबी देतो की प्रकरण कोर्टात गेले तर तेथे अधिकाऱ्याशी उद्घट वर्तन केल्याचा गुन्हाही दाखल होईल. त्यामुळे पुष्कळ जण ‘नकोबाबा, ही नसती भानगड’ असा विचार करून, ‘दंडा’ची रक्कम सर्वसाधारण कर समजून देतात. दुसरे मात्र तो नाकारतात आणि होईल ते स्विकारण्याची तयारी दाखवतात.
—केरकचरा उचलून नेण्याचे काम पालिकेचे असते. तरीपण कचरा काढणाऱ्या माणसाला घरमालकाने “बक्षिशी” द्यावी हा र्सवसाधारण प्रघात बनला आहे. जो कोणी ती देत नाही त्याचा कचरा ‘विसरला’ जातो व त्याला आरोग्यास बाधा निर्माण करणाऱ्या परिस्थिती बद्दल जबाबदार धरून दंड भरण्यास लावले जाते.
अशा या समस्या दाखवितात की अधिकार पदावर असणारे पुष्कळ जण अनीतीने पैसा मिळविण्यासाठी आपल्या शासकीय पदाचा वापर करतात. (उपदेशक ८:९) ख्रिश्चन देवाच्या नव्या नीतीमान व्यवस्थेची इच्छा धरीत असले तरी ती येईपर्यंत त्यांना सद्य व्यवस्थेचा सामना करावा लागत आहे. (२ पेत्र ३:१३) याचा अर्थ, त्यांनी स्थानिक परिस्थितीस ओळखणे असा असेल जेथे आपले काम करून देण्यासाठी सार्वजनिक सेवक बक्षिशी अपेक्षितात. तरीपण, जेथे अशी सर्वसाधारण स्थिति आहे त्या देशात सुद्धा परीक्षक व आयात मालावर कर आकारणारे अधिकारी यांना यहोवाच्या साक्षीदारांनी, कायद्यानुरूप ज्या गोष्टीची त्यांना प्राप्ती करण्याचा हक्क आहे त्यासाठी “बक्षिशी” देण्याचे नाकारले. ते आपल्या या भूमिकेविषयी मशहूर असल्यामुळे त्यांना तीच वागणूक मिळते जी बहुतेक लोक पैसे देऊन मिळवितात. (नीतीसूत्रे १०:९) तरीपण, प्रत्येक ख्रिश्चनाने स्थानिक परिस्थितीस अनुसरून स्वतःला पवित्र शास्त्रीय प्रशिक्षित विवेकास मार्गदर्शित होऊ द्यावे. शेजाऱ्यांबद्दलचे प्रेम ही गोष्ट सुद्धा ध्यानात घेतली जाण्यास हवी. (मत्तय २२:३९) “बक्षिशी”चा वापर रांगेतून एकदम पुढे जाण्यासाठी तसेच जे थांबून आहेत, त्यांच्या आधीच आपला नंबर मिळविण्यासाठी उपयोगात आणणे हे प्रेमळपणाचे कृत्य नसणार. इतरांनी आम्हाला जशी वागणूक द्यावी असे आम्हाला वाटते तीच वागणूक आम्हीही त्यांच्याबाबतीत दाखवावी अशी येशूने सूचना दिली. (मत्तय ७:१२) काही ख्रिश्चनांना वाटेल की रांगेत त्यांचा नंबर आल्यावर तेथील देशाच्या रिवाजाप्रमाणे अधिकाऱ्याला आपले काम उरकण्यासाठी “बक्षिशी” देता येईल. अर्थातच ज्या देशात अशी “बक्षिसी” प्रचलीत नाही किंवा ती साधारणपणे लोकात धक्कादायक मानली जाते त्यावेळेस मात्र प्रेमळ ख्रिस्तीजन दुसऱ्यांना अडखळण होऊ नये अशीच हालचाल करील.—१ करिंथकर १०:३१–३३.
आणखी एक गोष्ट, कायद्यास आज्ञाधारकता ही आहे. येशूने म्हटले: “कैसराचे ते कैसराला, पण देवाचे ते देवाला द्या.”b (मार्क १२:१७; तसेच मत्तय १७:२४–२७ सुद्धा पहा.) नियमाचा भंग करीत नाही अशा कोणा ख्रिश्चनाने सरकारी कर्मचारी वा दुसरा कोणी अधिकारी याला “बक्षिशी” देणे ही एक गोष्ट आहे. पण ख्रिश्चनाने वस्तुतः नियमाचा भंग केला असला तर काय? या प्रकरणात, अधिकाऱ्याने नियमाच्या झालेल्या अवमानाकडे दुर्लक्ष करावे म्हणून लाच देण्याकरता तो उत्तम विवेक भाव तरी कसा राखू शकेल बरे? आपण सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भय मानावे असे प्रेषित पौलाने लिहिले कारण त्यांना “वाईट करणाऱ्यांस दंड देण्याचा” हक्क आहे. (रोमकर १३:३, ४) पौलाची स्वतःची भूमिका अशी होती की, त्याने चूक केली तर त्याबद्दल योग्य ती शिक्षा तो पत्करणार. (प्रे. कृत्ये २५:१०, ११) तद्वत, ज्या ख्रिश्चनाकडून रहदारीचा नियम मोडला गेला आहे त्याला अधिकारी वा न्यायाधिशांनी सांगितलेला दंड वा फी भरावी लागेल.
पौलाने असेही म्हटले की सरकार ‘तुमच्या हितासाठी सेवक आहे.’ काही अधिकारी लोभिष्ठ असले तरी सरकार सर्वसाधारणपणे जनतेची सेवा सादर करीत असते. उदाहरणार्थ, वाहन रस्त्यावर चालण्याजोगे आहे की नाही तसेच इमारती अग्नि प्रतिबंधक नियमानुसार बांधल्या गेल्या की नाहीत याचे परीक्षण अधिकारी करीत असतात. तद्वत कोणा ख्रिश्चनाला वाटते की तो अधिकाऱ्याला त्याने आकारलेल्या बिलाच्या फी सोबत “बक्षिशी” देऊ शकतो व हे कायद्यात बसणारे आहे तर ही गोष्ट कोणा परिक्षण अधिकाऱ्याला नियमाच्या झालेल्या भंगाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जी लाच दिली जाते त्यापेक्षा खूपच वेगळी आहे.
ख्रिस्तीजन कोणत्याहि देशात राहात असले तरी त्यांनी स्थानिक परिस्थितीत दळणवळण ठेवताना व्यवहारिक सूज्ञता राखण्यास हवी. जे “देवाच्या मंडपात वस्ती करू इच्छितात व त्याच्या पवित्र डोंगरावर राहू इच्छितात त्यांना लाच देण्याचे धोरण अवलंबिता येणार नाही हे देवाच्या सेवकांनी लक्षात ठेवले पाहिजे. (स्तोत्रसंहिता १५:१, ५) हक्काची अशी योग्य सेवा प्राप्त करून घेण्यासाठी किंवा अधिकाऱ्यांनी अयोग्य वागणूक देऊ नये याकरता “बक्षिशी” देण्याबद्दल पाहता ख्रिश्चनाने त्याचा विवेक त्याला जे करण्याची मुभा देतो त्यानुरूप कृति आचरावी व त्याकरवी निष्पण्ण होणाऱ्या गुंतागुंतीची जबाबदारी पत्करली पाहिजे. त्याने असा मार्ग चोखाळण्यास हवा की ज्याद्वारे त्याच्या स्वतःचा विवेकभाव चांगला राहील व ख्रिश्चनत्वाच्या चांगल्या नामास काळिमा लागणार नाही आणि इतरांचे अडखळण होणार नाही.—२ करिंथकर ६:३
[तळटीपा]
a “वाचकांचे प्रश्न” दी वॉचटावर, जून १ १९६८.
b ख्रिस्ती मंडळीतील वडिलांना चोरी, खून वा अनैतिकता या विषयींच्या इश्वरी कायद्यांचा भंग हाताळण्या विषयीची जबाबदारी आहे. तरीपण मंडळीतील वडिलांनी कैसरची नियमावली व कायदेकानू लागू करावेत असे देवाने अपेक्षिले नाही. या कारणास्तव, फरार झालेल्या ओनेसिमला रोमी कायद्याखाली रोमी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याच्या बंधनात आहोत असे पौलाला वाटले नाही. (फिलेमोन १०, १५) अर्थातच, जो प्रापंचिक कायद्याचा निंद्य स्वरूपात भंग करतो व ज्याची कायदेभंग करणारा अशी ख्याति झाली आहे तो चांगला उदाहरण नाही त्यामुळे बहिष्कृत सुद्धा केला जाऊ शकतो. (१ तिमथ्यी ३:२, ७, १०) कोणी कायद्याचा भंग करण्यात कोणाचा मृत्यु घडवून आणला असेल तर रक्तदोषी ठरल्यामुळे मंडळीकरवीची तपासणी होण्यास हवी.