वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg अध्या. ४० पृ. १८०-१८३
  • त्याने शहराच्या भिंती पुन्हा बांधल्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्याने शहराच्या भिंती पुन्हा बांधल्या
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संशोधन करा
  • शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा
  • मनन करण्यासाठी
  • आणखी शिका
  • ‘बऱ्‍याने वाइटाला जिंका’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • नहेम्या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • यरुशलेमच्या भिंती
    बायबलमधून शिकू या!
  • जेरूसलेमच्या वेशी
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg अध्या. ४० पृ. १८०-१८३

४० नहेम्या

त्याने शहराच्या भिंती पुन्हा बांधल्या

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

पर्शिया साम्राज्याच्या शूशन शहरात नहेम्या राहत होता. पण त्याचा जीव मात्र दूरवर असलेल्या यरुशलेम शहरात अडकला होता. ते शहर त्याच्यासाठी जीव की प्राण होतं. कारण यहोवाचं मंदिर तिथे होतं. बराच काळ बंदिवासात घालवल्यानंतर देवाचे लोक पुन्हा यरुशलेम शहरात आले होते. पण तरी शुद्ध उपासना म्हणावी तशी सुरू झाली नव्हती. यरुशलेमच्या भिंतींची पडझड झाली होती आणि त्या काळात मजबूत भिंती नसलेल्या शहरावर शत्रू सहज आक्रमण करू शकत होते. त्यामुळे तिथे राहायला लोकांना इतकं सुरक्षित वाटत नव्हतं.

पर्शियाचा राजा अर्तहशश्‍त याच्या राजवाड्यात नहेम्या एक मोठा अधिकारी होता. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो यहोवाचा विश्‍वासू सेवक होता. एकदा नहेम्याचा भाऊ त्याला भेटायला आला. आणि त्याने त्याला एक वाईट बातमी दिली. त्याने सांगितलं, की यरुशलेम शहर “फार वाईट” अवस्थेत आहे. शहराच्या भिंती अजूनही पडलेल्याच आहेत आणि लोकसुद्धा “लाजिरवाण्या परिस्थितीत” आहेत.

हे ऐकून नहेम्या दुःखात बुडून गेला. याबद्दल त्याने नंतर लिहिलं: “हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस शोक करत राहिलो.” मग नहेम्या यहोवाला प्रार्थनेत अशी विनंती करू लागला, की यहोवाने त्याच्या लोकांची आठवण करावी आणि त्यांना मदत करावी. नंतर जेव्हा नहेम्या नेहमीप्रमाणे राजाला द्राक्षारस देत होता, तेव्हा राजाने त्याच्याकडे पाहून विचारलं, की त्याचा चेहरा इतका उदास का आहे? त्या वेळी नहेम्या घाबरला होता, पण तरीही तो राजाशी बोलला. त्याने राजाला यरुशलेमच्या वाईट स्थितीबद्दल सांगितलं. त्यावर राजाने त्याला विचारलं: “तुझी काय इच्छा आहे, सांग.” तेव्हा नहेम्याने मनातल्या मनात “लगेच स्वर्गातल्या देवाला प्रार्थना केली.” मग त्याने त्या शक्‍तिशाली राजाकडे काही काळाची रजा मागितली. यरुशलेममध्ये जाऊन तिथल्या पडलेल्या भिंती आणि फाटकं पुन्हा बांधण्यासाठी त्याला जायचं होतं. आणि विशेष म्हणजे राजाने त्याला परवानगी दिली!

मग नहेम्या यरुशलेमला निघाला. हा प्रवास खूप लांबचा आणि धोकादायक होता. कारण त्याला शत्रूंच्या प्रदेशातून जावं लागणार होतं. तिथे पोहोचल्यावर त्याने रात्रीच्या वेळी सतर्क राहून शहराच्या पडलेल्या भिंतींची पाहणी केली. मग त्याने त्या भिंती पुन्हा बांधायच्या कामासाठी लोकांना एकत्र केलं आणि त्यांना प्रोत्साहन दिलं. या कामात त्याने स्वतः पुढाकार घेतला. ते पाहून बऱ्‍याच लोकांनी त्याला साथ दिली. यात श्रीमंत आणि प्रतिष्ठीत लोकसुद्धा होते, जसं की सोनार आणि मोठे अधिकारी. एका अधिकाऱ्‍याच्या तर मुलींनीसुद्धा या कामात हातभार लावला.

यहुदी लोकांचे बरेच शत्रू होते. आणि यरुशलेम शहराच्या भिंती पुन्हा बांधल्या जाऊन ते एक सुरक्षित आणि शक्‍तिशाली शहर होऊ नये, म्हणून ते त्यांची निंदा आणि थट्टा करू लागले. एका विरोधकाने तर असंही म्हटलं, की “ते जे बांधकाम करत आहेत त्याच्यावर एखादा कोल्हा चढला, तरी ती दगडी भिंत कोसळेल.” पण नहेम्याने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. उलट तो आपल्या लोकांना धीर देत राहिला.

निंदा, धमक्या आणि भीती घालण्यासाठी केलेल्या युक्त्यांचा सामना करावा लागला तरी त्याने यरुशलेमच्या भिंती पुन्हा बांधल्या

पण शत्रूंचा विरोध वाढतच राहिला. शहराची भिंत निम्मी बांधून पूर्ण झाली तेव्हा एक मोठा धोका निर्माण झाला. शत्रू सगळ्या बाजूंनी यरुशलेम शहरावर हल्ला करायच्या तयारीत होते. त्यामुळे शहराचं संरक्षण करण्यासाठी नहेम्याने काही व्यावहारिक पावलं उचलली. शत्रूंनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांनी थेट हल्ला करायचा विचार सोडून दिला. तेव्हापासून नहेम्या आणि त्याची अर्धी माणसं शस्त्रं घेऊन पहारा देत राहिली. तर उरलेली अर्धी माणसं भिंतीचं बांधकाम करत राहिली. शत्रूंनी मात्र अजूनही हार मानली नव्हती.

यरुशलेमच्या भिंतींचं काम सुरू असताना नहेम्या आणि त्याचा सहायक देखरेख करत आहेत. पुरुष आणि स्त्रिया बांधकामासाठी लागणारं सामान गोळा करून तयार करत असताना तसंच काही माणसं भिंतींना शिड्या लावून मेहनत करत असताना ते पाहत आहेत.

आता त्यांनी एक नवीन युक्‍ती लढवली. त्यांनी नहेम्याला मरणाची भीती घालून यहोवाच्या पवित्र मंदिरात जाऊन लपायला सांगितलं. पण असं करणं यहोवाच्या नियमशास्त्राच्या विरोधात होतं. म्हणून नहेम्या तसं काही करायला तयार झाला नाही. उलट, “असं पळून जाणं मला शोभेल का?” असं म्हणून तो आपलं काम करत राहिला. कारण त्याला माहीत होतं की यहुदी लोक यहोवाच्या इच्छेप्रमाणे करत आहेत आणि त्यांना यहोवाचा पाठिंबा आहे. आणि खरंच यहोवा त्यांच्या पाठीशी होता. कारण फक्‍त ५२ दिवसांत त्यांनी शहराची भिंत बांधून पूर्ण केली आणि हे पाहून शत्रूंची लाजिरवाणी स्थिती झाली.

नहेम्याला आपल्या स्वतःच्या लोकांशी वागतानासुद्धा धैर्य दाखवावं लागलं. लोकांना योग्य प्रकारे यहोवाची उपासना करायला मदत करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. जसं की, श्रीमंत लोक जेव्हा गरिबांना दिलेल्या कर्जावर भरमसाठ व्याज लावत होते, तेव्हा त्याने न घाबरता त्यांची कानउघाडणी केली. तसंच त्याला जेव्हा कळलं, की काही लोकांनी विदेशी बायकांशी लग्न करून देवाची आज्ञा मोडली आहे, तेव्हासुद्धा त्याने कडक शब्दांत त्यांची चूक दाखवून दिली आणि देवाची आज्ञा किती महत्त्वाची आहे ते पटवून दिलं.

पण यासोबतच नहेम्याने आपल्या लोकांना खूप दिलासासुद्धा दिला. उदाहरणार्थ, शहराची भिंत बांधून झाल्यावर लोक यहोवाचं नियमशास्त्र ऐकायला एकत्र आले. त्यातल्या गोष्टी ऐकून ते खूप दुःखी झाले. कारण यहोवाच्या आज्ञांपासून आपण किती भरकटलोय हे त्यांच्या लक्षात आलं. पण नहेम्याने त्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगून धीर दिला. तो म्हणाला: “यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो.” नहेम्याला माहीत होतं, की आनंदी देवाची सेवा केल्यामुळे लोकांना खरा आनंद मिळेल. आणि हा आनंदच त्यांना सामर्थ देईल! आजसुद्धा जेव्हा आपल्या जीवनात समस्या येतात तेव्हा यहोवाकडून मिळणारा आनंदच आपल्याला सामर्थ्य आणि धैर्य देऊ शकतो.

याबद्दल बायबलमधून वाचा:

  • नहेम्या १:१–६:१९; ८:१-१८; १३:२३-३१

चर्चेसाठी:

नहेम्याने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?

संशोधन करा

  1. १. नहेम्या राजाचा प्यालेबरदार होता. याचा अर्थ तो फक्‍त राजाचा एक साधारण सेवक होता का? (टेहळणी बुरूज१० ७/१ ९ ¶५-७-wcgr) १

    National Museum of Iran, Tehran, Iran/Bridgeman Images

    चित्र १: पर्शियन काळातल्या भिंतीवर कोरलेल्या एका चित्रात महान दारयावेश राजाचा (अर्तहशश्‍त राजाचा आजोबा) प्यालेबरदार दाखवला आहे

  2. २. शल्लूमच्या मुली तकोवाच्या प्रतिष्ठित लोकांपेक्षा वेगळ्या कशा होत्या? (नहे. ३:५, १२; टेहळणी बुरूज१९.१० २३ ¶११)

  3. ३. ओझी वाहून नेणारे एका हाताने काम करायचे आणि दुसऱ्‍या हाताने शस्त्र पकडायचे. त्यांना हे कसं जमायचं? (नहे. ४:१७, १८; टेहळणी बुरूज०६ २/१ ९ ¶१) २

    एका कामगाराने एका हाताने आपल्या खांद्यावर सामानाची टोपली धरली आहे तर दुसऱ्‍या हाताने त्याच्या कंबरेला लावलेली तलवार पकडली आहे.

    चित्र २

  4. ४. काही यहुदी मुलांना हिब्रू भाषा बोलता येत नव्हती याची नहेम्याला काळजी का वाटत होती? (नहे. १३:२३-२७; टेहळणी बुरूज१६.१० १४ ¶४)

शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा

  • मंडळीतले वडील खाली दिलेल्या गोष्टींच्या बाबतीत नहेम्याचं अनुकरण कसं करू शकतात?

    • यहोवावर भरवसा ठेवण्याच्या बाबतीत (नहे. १:४-११; ४:१४; १३:१-३)

    • इतर भावांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या बाबतीत (नहे. ४:१५, २१-२३)

    • मंडळीतल्या भाऊबहिणींचं ऐकण्याच्या बाबतीत (नहे. ५:१-७) ३

      राज्यसभागृहात दोन बहिणी त्यांच्या समस्येबद्दल मंडळीतल्या वडिलांशी बोलत असताना ते त्यांचं लक्ष देऊन ऐकत आहेत.

      चित्र ३

  • नहेम्याने आपल्या लोकांची मदत करण्यासाठी स्वतःचं आरामदायी जीवन सोडून दिलं होतं. यासाठी यहोवाने त्याला आशीर्वाद दिले. यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

  • आणखी कोणत्या मार्गांनी तुम्ही नहेम्याच्या धैर्याचं अनुकरण करू शकता?

मनन करण्यासाठी

  • या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

  • या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?

  • नहेम्याचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्याला काय विचारेन?

आणखी शिका

प्रार्थनेत किती ताकद असते हे नहेम्याकडून आपल्याला कसं शिकायला मिळतं?

“देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं” (वेब सिरीझ “बायबल अभ्यासाचा उपक्रम”-wcgr)

शत्रूंच्या सतत होणाऱ्‍या विरोधाचा नहेम्याने धैर्याने कसा सामना केला हे या नाट्यरूपांतरात पाहा.

नहेम्या: यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो—भाग १—निवडक भाग (५:२२)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा