३९ एस्तेर
“मला मरावं लागलं तरी चालेल”
एक तरुण मुलगी राजदरबाराकडे चालली आहे. राजा आपल्या दरबारात राजासनावर बसला आहे. या तरुणीला माहीत आहे, की राजाने बोलवल्याशिवाय आपण जर त्याच्यासमोर जायचं धाडस केलं, तर आपल्याला ठार मारलं जाऊ शकतं. त्यामुळे तिला खूप भीती वाटत आहे. पण तरीही ती त्या दिशेने चालत राहते. ही तरुण मुलगी कोण आहे? आणि तिला राजासमोर जायची गरज का पडते?
या तरुण मुलीचं नाव होतं एस्तेर. ती लहान असतानाच तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या तिच्या चुलत भावाने, म्हणजे मर्दखयने तिचा “आपली मुलगी म्हणून सांभाळ केला होता.” ते पर्शिया साम्राजातल्या शूशन या राजधानी शहरात राहत होते. तिथेच मर्दखय राजाचा सेवक म्हणून काम करत होता. आणि तिथेच एस्तेर लहानाची मोठी झाली होती. “ती दिसायला अतिशय सुंदर आणि बांधेसूद होती.”
एकदा अहश्वेरोश राजाने (कदाचित झेरेक्सिस I) आपल्यासाठी एक नवीन बायको निवडायचं ठरवलं. आणि त्यासाठी त्याने आपल्या सेवकांना संपूर्ण साम्राज्यातून तरुण आणि सुंदर कुमारींना शोधून आणायला सांगितलं. या सेवकांनी जेव्हा एस्तेरचं विलक्षण सौंदर्य पाहिलं तेव्हा ते तिला राजवाड्यात घेऊन आले. पण ते लोक तिला घेऊन जाण्याआधी मर्दखयने तिला अशी सूचना दिली, की ती यहुदी असल्याचं तिने ‘कोणालाही सांगू नये.’
राजमहालात “ज्यांनी ज्यांनी एस्तेरला पाहिलं त्या सर्वांना ती आवडली.” १२ महिन्यांचे सौंदर्य-उपचार संपल्यानंतर तिला राजासमोर नेण्यात आलं. तिला पाहून राजा तिच्यावर खूप प्रसन्न झाला आणि इतर सर्व कुमारींपेक्षा ती त्याला जास्त आवडली. अशा प्रकारे ती त्या शक्तिशाली जागतिक साम्राज्याची राणी बनली! पण असं असलं तरी मर्दखयने सांगितल्याप्रमाणे ती यहुदी असल्याचं तिने कोणालाही सांगितलं नाही.
त्याच काळात, राजाने हामान नावाच्या एका माणसाला आपल्या खालोखाल नेमलं होतं. आणि आपल्या सगळ्या सेवकांनी त्याला वाकून नमन करावं असा हुकूम दिला होता. पण मर्दखय हा देवाचा विश्वासू सेवक असल्यामुळे त्याने हामानला नमन करायला साफ नकार दिला. असं दिसतं, की यहोवाने ज्या राष्ट्राला आपला शत्रू म्हणून दोषी ठरवलं होतं त्याच राष्ट्रातून हामान असावा. कारण काहीही असलं, तरी हामान मर्दखयवर भयंकर चिडला आणि पर्शियाच्या साम्राज्यातून सगळ्या यहुदी लोकांचं नामोनिशाण मिटवून टाकायचा त्याने एक क्रूर कट रचला. मर्दखयला या गोष्टीची भनक लागली तेव्हा त्याने दुःखाने आपले कपडे फाडले आणि तो शोक करू लागला. मग त्याने एस्तेरला एक निरोप पाठवला. त्याने तिला राजासमोर जाऊन आपल्या लोकांच्या वतीने बोलून त्यांचा जीव वाचवायची विनंती केली. पण एस्तेरसाठी ही एक खूप मोठी परीक्षा ठरणार होती.
एस्तेरने मर्दखयला सांगितलं की राजाने बोलवल्याशिवाय ती जर त्याच्यासमोर गेली तर तिला मृत्युदंड मिळू शकतो. शिवाय, राजा किती तापट स्वभावाचा आहे हे सगळ्यांना माहीत होतं. पण मर्दखयने तिचं मनोबल वाढवलं आणि तिला सांगितलं, की कदाचित या गोष्टीसाठीच, म्हणजे यहोवाच्या लोकांना वाचवण्यासाठीच ती राणी बनली असावी. एस्तेरने मग आपलं धैर्य एकवटलं आणि ती म्हणाली की यासाठी “मला मरावं लागलं तरी चालेल.” तिने मर्दखयला फक्त एवढी विनंती केली, की तिच्या लोकांनी तिच्यासाठी तीन दिवस उपास करावा. साहजिकच या काळात तिने आणि इतरांनीसुद्धा तिच्यासाठी बऱ्याच प्रार्थना केल्या असतील.
मग एस्तेर राजासमोर गेली. राजाने तिला आतल्या अंगणात राजकक्षासमोर उभं असल्याचं पाहिलं. पण विशेष म्हणजे तो तिच्यावर चिडला नाही. त्यामुळे तिला मृत्युदंड मिळणार नव्हता. उलट राजाने तिला काय हवंय असं विचारलं. तेव्हा तिने राजाला आणि हामानला तिने तयार केलेल्या एका मेजवानीला बोलवलं. ते तिच्याकडे गेले तेव्हा ती खूप सांभाळून आणि विचार करून वागली. त्या वेळी फारसं काही न बोलता तिने फक्त त्यांना दुसऱ्या दिवशीसुद्धा मेजवानीला यायचं आमंत्रण दिलं. हामानने या मधल्या वेळेचा उपयोग मर्दखयविरुद्ध आणखी कट रचण्यासाठी केला. त्याला मर्दखयला वधस्तंभावर लटकवलेलं पाहायचं होतं. पण हामानने धूर्तपणे केलेला कट शेवटी त्याच्यावरच खूप वाईट रितीने उलटणार होता.
आपल्या लोकांचं नामोनिशाण मिटवण्यासाठी जो कट रचण्यात आला तो थांबवण्यासाठी तिला एका शक्तिशाली सम्राटाचं मन वळवावं लागलं
दुसऱ्या मेजवानीच्या वेळी, अहश्वेरोश राजाने एस्तेरला पुन्हा एकदा “सांग तुला काय हवंय?” असं विचारलं. या वेळी मात्र एस्तेरने त्याला सगळं काही सांगितलं. तिने आदराने राजाला सांगितलं की तिला आणि तिच्या लोकांना मारून टाकण्यासाठी एक कट रचण्यात आलाय. ती म्हणाली की मी शांत राहिले असते, पण या कटामुळे राजाचंच मोठं नुकसान होणार आहे आणि म्हणून मी बोलत आहे. हे ऐकून राजाला धक्काच बसला आणि कट रचणारा कोण आहे असं त्याने तिला विचारलं. तेव्हा तो दुष्ट माणूस दुसरा-तिसरा कोणी नसून हामानच आहे असं तिने उघड केलं. हे ऐकून रागाने पेटून उठलेल्या राजाने लगेच हामानला मृत्युदंड द्यायचा हुकूम सोडला. आणि हामानने मर्दखयला लटकवण्यासाठी जो वधस्तंभ उभा केला होता त्यावर हामानलाच लटकवण्यात आलं.
आपण पर्शियाच्या साम्राज्यातून मदर्खयचं आणि देवाच्या सगळ्या लोकांचं नामोनिशाण मिटवून टाकू शकतो असं हामानला वाटलं होतं. पण उलट हामानसोबतच यहोवाच्या इतर बऱ्याच शत्रूंचं नामोनिशण मिटलं. अशा प्रकारे, यहोवाने विश्वास आणि धैर्य असलेल्या एका तरुण स्त्रीचा वापर करून पुन्हा एकदा आपल्या लोकांचं संरक्षण केलं.
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
एस्तेरने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. हा अहवाल ऐतिहासिक दृष्टीने खरा आहे हे कशावरून कळतं? (अनुकरण अध्या. १६, चौकट) १
Ungnad, Arthur. “Neubabylonische Privaturkunden aus der Sammlung Amherst.” Archiv für Orientforschung, vol. 19, 1959, pp. 74–82
चित्र १: मारडूका (मर्दखय) असं लिहिलेली पर्शियन काळातली एक दगडी पाटी
२. मर्दखयने हामानला वाकून नमन करायला नकार का दिला असेल? (अनुकरण अध्या. १५ ¶१८)
३. यहुद्यांचं नामोनिशाण मिटवून टाकण्यात सैतानाचा आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांचा हात होता हे कशावरून दिसतं? (सावध राहा०२ ९/८ ७ ¶३-८ ¶२-wcgr) २
Cube. Lot of Yahali, puru. Neo-Assyrian Clay. (YPM BC 021122). Courtesy of the Peabody Museum, Division of Anthropology, Babylonian Collection, Yale University; peabody.yale.edu
चित्र २: चिठ्ठ्या टाकण्यासाठी वापरण्यात येणारा एक प्राचीन काळातला फासा
४. एस्तेर आणि मर्दखयने कोणती भविष्यवाणी पूर्ण करायला मदत केली? (अनुकरण अध्या. १६, चौकट)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
यहोवाची उपासना करणाऱ्या लोकांपासून दूर असतानाही एस्तेरने समंजसपणे वागायच्या आणि आज्ञा पाळायच्या बाबतीत चांगलं उदाहरण मांडलं. यावरून आज तरुण लोक काय शिकू शकतात?
एस्तेरने आपल्या पतीशी धीराने, आदराने आणि प्रामाणिकपणे बोलून त्याचं मन जिंकलं. आज ख्रिस्ती पत्नी तिच्या या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतात? ३
चित्र ३
आणखी कोणत्या मार्गांनी तुम्ही एस्तेरच्या धैर्याचं तुमच्या जीवनात अनुकरण करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
एस्तेरचं पुनरुत्थान झाल्यावर मी तिला काय विचारेन?
आणखी शिका
या सांगीत-व्हिडिओमध्ये, मुलं एस्तेरकडून काय शिकू शकतात ते पाहा.
आजच्या काळात काही भाऊबहिणींनी कशा प्रकारे एस्तेरच्या उदाहरणाचं अनुकरण करून आपल्या भाऊबहिणींचं संरक्षण केलं आहे?
धीर धरल्यामुळे ज्यांना अभिवचनांचा वारसा मिळाला त्यांच्यासारखं वागा—मर्दखय आणि एस्तेर (३:०५)