वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es25 पृ. १४७-१६०
  • डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५
  • उपशिर्षक
  • सोमवार, १ डिसेंबर
  • मंगळवार, २ डिसेंबर
  • बुधवार, ३ डिसेंबर
  • गुरुवार, ४ डिसेंबर
  • शुक्रवार, ५ डिसेंबर
  • शनिवार, ६ डिसेंबर
  • रविवार, ७ डिसेंबर
  • सोमवार, ८ डिसेंबर
  • मंगळवार, ९ डिसेंबर
  • बुधवार, १० डिसेंबर
  • गुरुवार, ११ डिसेंबर
  • शुक्रवार, १२ डिसेंबर
  • शनिवार, १३ डिसेंबर
  • रविवार, १४ डिसेंबर
  • सोमवार, १५ डिसेंबर
  • मंगळवार, १६ डिसेंबर
  • बुधवार, १७ डिसेंबर
  • गुरुवार, १८ डिसेंबर
  • शुक्रवार, १९ डिसेंबर
  • शनिवार, २० डिसेंबर
  • रविवार, २१ डिसेंबर
  • सोमवार, २२ डिसेंबर
  • मंगळवार, २३ डिसेंबर
  • बुधवार, २४ डिसेंबर
  • गुरुवार, २५ डिसेंबर
  • शुक्रवार, २६ डिसेंबर
  • शनिवार, २७ डिसेंबर
  • रविवार, २८ डिसेंबर
  • सोमवार, २९ डिसेंबर
  • मंगळवार, ३० डिसेंबर
  • बुधवार, ३१ डिसेंबर
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२५
es25 पृ. १४७-१६०

डिसेंबर

सोमवार, १ डिसेंबर

मेलेल्यांना पुन्हा उठवलं जाईल.—लूक २०:३७.

यहोवाकडे मृत लोकांना जिवंत करण्याची ताकद आहे का? नक्कीच. बायबल म्हणतं की तो “सर्वशक्‍तिमान” आहे. (प्रकटी. १:८) त्यामुळे तो कोणत्याही शत्रूला, अगदी मृत्यूलासुद्धा हरवू शकतो. (१ करिंथ. १५:२६) यहोवा मृत लोकांना जिवंत करू शकतो यावर भरवसा ठेवण्याचं आणखी एक कारण म्हणजे, यहोवाची स्मरणशक्‍ती अमर्याद आहे. बायबलमध्ये म्हटलंय की तो प्रत्येक ताऱ्‍याला त्याच्या नावाने हाक मारतो. (यश. ४०:२६) शिवाय आत्तापर्यंत जितके लोक मेले आहेत ते सगळे त्याच्या आठवणीत आहेत. (ईयो. १४:१३; लूक २०:३८) तो ज्यांचं पुनरुत्थान करणार आहे त्यांच्याबद्दलच्या बारीकसारीक गोष्टीही तो सहज लक्षात ठेवू शकतो; अगदी त्यांचं स्वरूप, त्यांचं व्यक्‍तिमत्व, त्यांच्या जीवनातले अनुभव आणि त्यांच्या सगळ्या आठवणी. खरंच, यहोवाकडे मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याची ताकद आणि इच्छा या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे त्याने दिलेल्या पुनरुत्थानाच्या अभिवचनावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. या अभिवचनावर भरवसा ठेवायचं आणखी एक कारण म्हणजे, यहोवाने हे आधीच करून दाखवलंय. बायबल काळात त्याने बऱ्‍याच विश्‍वासू माणसांना आणि येशूलासुद्धा मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याची ताकद दिली. टेहळणी बुरूज२३.०४ ९-१० ¶७-९

मंगळवार, २ डिसेंबर

तुमचं बोलणं नेहमी प्रेमळ, मिठाने रुचकर केल्यासारखं असावं.—कलस्सै. ४:६.

आपण जर दुसऱ्‍यांसोबत बोलताना समंजसपणे आणि सौम्यतेने बोललो, तर इतर जण आपलं ऐकून घ्यायला तयार असतील आणि चर्चा पुढे सुरू राहील. पण एखाद्याला आपल्या विश्‍वासाबद्दल वादच घालायचा असेल किंवा टीकाच करायची असेल, तर आपल्याला त्याच्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर देण्याची गरज नाही. (नीति. २६:४) पण अशी व्यक्‍ती क्वचितच भेटते. सहसा लोक ऐकून घ्यायला तयार असतात. तर मग, सौम्यतेने बोलल्यामुळे आपल्याला बरेच फायदे होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा आपल्याला आपल्या विश्‍वासाबद्दल प्रश्‍न विचारले जातात किंवा खोचकपणे आपली टीका केली जाते, तेव्हा शांत राहण्यासाठी आणि सौम्यतेने उत्तर देण्यासाठी यहोवाकडे प्रार्थना करा. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जर सौम्यतेने उत्तर दिलं तर वाद होणार नाहीत. मग तुमची मतं वेगवेगळी असली तरीही. शिवाय तुमच्या सौम्य आणि आदरपूर्वक उत्तरामुळे एखादी व्यक्‍ती आपला दृष्टिकोन बदलायला किंवा बायबलचं सत्य समजून घ्यायला तयार होऊ शकते. त्यामुळे आपल्या विश्‍वासाबद्दल विचारलं जातं, तेव्हा “उत्तर देण्यासाठी नेहमी तयार राहा, पण सौम्यतेने आणि मनापासून आदर दाखवून असं करा.” (१ पेत्र ३:१५) नेहमी लक्षात ठेवा, सौम्यता ही तुमची कमजोरी नाही, तर तुमची ताकद आहे! टेहळणी बुरूज२३.०९ १९ ¶१८-१९

बुधवार, ३ डिसेंबर

सहनशीलतेचं वस्त्र घाला.—कलस्सै. ३:१२.

आपण कोणत्या चार मार्गांनी धीराचा गुण दाखवू शकतो याचा विचार करा. पहिला, धीर धरणारी व्यक्‍ती लगेच रागवत नाही. त्या व्यक्‍तीला जेव्हा भडकवलं जातं किंवा ती तणावात असते तेव्हा ती शांत राहते आणि लगेच रागवत नाही. (निर्ग. ३४:६) दुसरा मार्ग म्हणजे, धीर दाखवणारी व्यक्‍ती शांतपणे वाट पाहते. जर एखाद्या गोष्टीला गरजेपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर अशी व्यक्‍ती अस्वस्थ किंवा उतावीळ होण्याचं टाळते. (मत्त. १८:२६, २७) तिसरा मार्ग म्हणजे, धीर धरणारी व्यक्‍ती अविचारीपणे वागत नाही. धीर धरणाऱ्‍या व्यक्‍तीला जेव्हा एक महत्त्वाचं काम करायचं असतं, तेव्हा ती घाईघाईने ते सुरू करत नाही, किंवा ते कसंबसं उरकून टाकत नाही. उलट, ती त्यासाठी पुरेसा वेळ देते आणि आधीपासूनच एक चांगली योजना बनवते. त्यानंतर ठरवलेल्या वेळेत ती ते काम पूर्ण करते. चौथा मार्ग म्हणजे, धीर धरणारी व्यक्‍ती कुठलीही तक्रार न करता परीक्षांचा सामना सहनशीलतेने करते. धीर धरणारी व्यक्‍ती सहनशीलतेने परीक्षांचा सामना करत राहते आणि आशावादी दृष्टिकोन ठेवते. (कलस्सै. १:११) ख्रिस्ती या नात्याने आपण सगळ्यांनीच या मार्गांनी धीर दाखवला पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०८ २०-२१ ¶३-६

गुरुवार, ४ डिसेंबर

हृदयांचं परीक्षण करणारा यहोवा आहे.—नीति. १७:३.

आपल्या हृदयाचं रक्षण करण्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे, की यहोवा आपल्या हृदयाचं परीक्षण करतो. याचा अर्थ इतर जण आपल्याला जसं पाहतात, त्याच्याही पलीकडे जाऊन आपण आतून कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत हे तो पाहतो. त्याने त्याच्या वचनात बऱ्‍याच बुद्धीच्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. या गोष्टी मानल्यामुळे त्याला आनंद होतो आणि आपल्याला जीवन मिळू शकतं. (योहा. ४:१४) आपण जर या गोष्टींवर मनन करत राहिलो, तर सैतानाच्या या जगात विषाप्रमाणे पसरलेल्या अनैतिक आणि खोट्या गोष्टींसाठी आपल्या मनात जागा उरणार नाही. (१ योहा. ५:१८, १९) आपण जर यहोवाच्या आणखी जवळ गेलो तर त्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम आणि आदर आणखी वाढेल. आपल्या स्वर्गीय पित्याला आवडणार नाही अशी कोणतीही गोष्ट करायची आपली इच्छा नाही. त्यामुळे पाप करायच्या विचाराचीसुद्धा आपल्याला घृणा वाटेल. क्रोएशीयामध्ये राहणाऱ्‍या मार्टा नावाच्या बहिणीला एकदा अनैतिक काम करायचा मोह झाला होता. ती म्हणते: “मला नीट विचार करता येत नव्हता आणि पाप करून मिळणारं क्षणिक सुख भोगायचा मोह आवरणं मला कठीण जात होतं. पण यहोवाची भीती मनात असल्यामुळे माझं संरक्षण झालं.” यहोवाची भीती असल्यामुळे या बहिणीचं संरक्षण कसं होऊ शकलं? मार्टा म्हणते, की या गोष्टीचे कोणते वाईट परिणाम तिला भोगावे लागतील यावर तिने विचार केला. आपणही तेच करू शकतो. टेहळणी बुरूज२३.०६ २०-२१ ¶३-४

शुक्रवार, ५ डिसेंबर

“मी त्या राष्ट्रांना दाखवून देईन, की मी एक पवित्र देव आहे. तेव्हा त्यांना कळून येईल, की मी यहोवा आहे.”—यहे. ३६:२३.

आपल्या नावाला पवित्र करणं आणि आपल्यावर लागलेले सगळे आरोप मिटवणं हा यहोवाचा उद्देश आहे हे येशूला माहीत होतं. म्हणूनच त्याने आपल्या अनुयायांना अशी प्रार्थना करायला शिकवलं: “हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.” (मत्त. ६:९) यहोवाच्या संपूर्ण सृष्टीला तोंड द्यावा लागणारा हा सगळ्यात मोठा वादविषय आहे हे येशूला माहीत होतं. यहोवाचं नाव पवित्र करण्यासाठी येशूने जितकं केलं तितकं या विश्‍वातल्या दुसऱ्‍या कोणत्याच व्यक्‍तीने केलं नाही. तरीसुद्धा येशूला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या शत्रूंनी त्याच्यावर कोणता आरोप लावला? यहोवाच्या नावाची निंदा करण्याचा! आपल्या स्वर्गातल्या पित्याच्या पवित्र नावाची बदनामी करणं किंवा त्याची निंदा करणं हे सर्वात मोठं पाप आहे याची येशूला जाणीव होती. त्यामुळे जेव्हा त्याच्यावर अशा प्रकारचा आरोप लावण्यात आला आणि त्याला दोषी ठरवण्यात आलं तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला. कदाचित हेसुद्धा एक महत्त्वाचं कारण होतं, ज्यामुळे त्याला अटक व्हायच्या काही काळाआधी ‘त्याच्या मनाला यातना’ होत होत्या.—लूक २२:४१-४४. टेहळणी बुरूज२४.०२ ११ ¶११

शनिवार, ६ डिसेंबर

घर बुद्धीने बांधलं जातं.—नीति. २४:३.

जीवनाच्या शर्यतीत धावत असताना आपण आपल्या नातेवाइकांपेक्षा यहोवावर आणि येशूवर जास्त प्रेम केलं पाहिजे. (मत्त. १०:३७) पण याचा अर्थ असा होत नाही, की आपण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांकडे दुर्लक्ष करावं आणि देवाचं आणि ख्रिस्ताचं मन आनंदित करण्यात त्या आड येत आहेत असं समजावं. उलट, देवाचं आणि ख्रिस्ताचं मन आनंदित करण्यासाठी आपण आपल्या कुटुंबातली भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली पाहिजे. (१ तीम. ५:४, ८) असं केल्यामुळे आपण आनंदी होऊ. कारण यहोवाने आपल्याला अशा प्रकारेच बनवलं आहे, की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी पार पाडल्यामुळे कुटुंब आनंदी होईल. जसं की, जेव्हा पती-पत्नी एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांचा आदर करतात, पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात आणि त्यांना प्रशिक्षण देतात, तसंच मुलं जेव्हा पालकांच्या आधीन राहतात तेव्हा पूर्ण कुटुंब आनंदी राहतं. (इफिस. ५:३३; ६:१, ४) कुटुंबात तुमची कोणतीही जबाबदारी असली तरी, स्वतःच्या भावनांवर, तुम्ही ज्या संस्कृतीत वाढला आहात त्यावर किंवा स्वतःला जाणकार म्हणून घेणाऱ्‍या लोकांच्या सल्ल्यांवर अवलंबून राहू नका. तर बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्यांवर आणि त्यातून मिळणाऱ्‍या बुद्धीवर अवलंबून राहा. तसंच, बायबलवर आधारित प्रकाशनांचासुद्धा वापर करा. त्यांमध्ये बायबलची तत्वं कशी लागू करायची याबद्दल व्यावहारिक सल्ले दिले आहेत. टेहळणी बुरूज२३.०८ २८ ¶६-७

रविवार, ७ डिसेंबर

सर्व आज्ञांचं काळजीपूर्वक पालन करण्यासाठी त्यावर रात्रंदिवस मनन कर. असं केलंस तर तू यशस्वी होशील आणि सुज्ञपणे वागशील.—यहो. १:८.

तरुण बहिणींनी काही व्यावहारिक कौशल्यं शिकून घेणंही खूप गरजेचं आहे. एक तरुण बहीण जेव्हा लहानपणापासूनच अशी कौशल्यं शिकते, तेव्हा तिला आयुष्यभर त्याचा फायदा होतो. उदाहरणार्थ, चांगल्या प्रकारे लिहायला आणि वाचायला शिका. काही संस्कृतींमध्ये स्त्रियांना लिहिता-वाचता येणं गरजेचं नाही असं समजलं जातं. पण सगळ्याच ख्रिश्‍चनांना लिहिता-वाचता येणं गरजेचंय. (१ तीम. ४:१३) त्यामुळे कोणताही अडथळा आला तरी लिहायला-वाचायला शिकायचं सोडू नका. याचा तुम्हाला कसा फायदा होईल? तुम्हाला तुमचा खर्च भागवण्यासाठी नोकरी मिळवता येईल. त्यासोबतच तुम्हाला देवाचं वचन चांगल्या प्रकारे शिकून घेता येईल आणि ते इतरांनाही सांगता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायबल वाचल्यामुळे आणि त्यावर मनन केल्यामुळे यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी घनिष्ठ होईल.—१ तीम. ४:१५. टेहळणी बुरूज२३.१२ २० ¶१०-११

सोमवार, ८ डिसेंबर

देवाची भक्‍ती करत जीवन जगणाऱ्‍या लोकांची परीक्षेतून सुटका कशी करावी हे यहोवाला माहीत आहे.—२ पेत्र २:९.

मोहाचा प्रतिकार करण्यासाठी यहोवाकडे मदत मागा. आपण अपरिपूर्ण असल्यामुळे वाईट गोष्टी करण्याच्या मोहाविरुद्ध आपल्याला सतत झगडावं लागतं. आणि आपला हा संघर्ष आणखी कठीण करण्यासाठी सैतान पुरेपूर प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी सैतान बऱ्‍याचदा खालच्या दर्जाचं मनोरंजन वापरतो. अशा मनोरंजनाचा वापर करून तो आपल्या मनात वाईट विचार पेरतो. अशा विचारांमुळे आपलं मन भ्रष्ट होतं आणि आपल्या हातून गंभीर चूक होऊ शकते. (मार्क ७:२१-२३; याको. १:१४, १५) चुकीच्या गोष्टी करण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज आहे. प्रार्थना कशी करायची हे शिष्यांना शिकवताना येशूने त्यांना अशी विनंती करायलाही सांगितलं: “आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर त्या दुष्टापासून वाचव.” (मत्त. ६:१३) यहोवा आपल्याला मदत करायला तयार आहे. पण त्यासाठी आपण त्याच्याकडे मदत मागितली पाहिजे. तसंच आपण आपल्या प्रार्थनांप्रमाणे वागलंही पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०५ ६-७ ¶१५-१७

मंगळवार, ९ डिसेंबर

तीन धाग्यांनी बनलेली दोरी सहजासहजी तुटत नाही.—उप. ४:१२.

जेव्हा एक विवाहित जोडपं आपल्या स्वर्गातल्या पित्यासोबतच्या नात्याला महत्त्व देतं तेव्हा ते त्याच्याकडून मिळालेला सल्ला पाळायलाही नेहमी तयार असतं. यामुळे, आपसातलं प्रेम कमी होईल अशा गोष्टी टाळायला आणि त्यांवर मात करायला मदत होते. शिवाय, यहोवासोबतचं नातं मजबूत असेल तर ते त्याच्या गुणांचं अनुकरण करायचाही प्रयत्न करतं. जसं की, दयाळूपणा, धीर आणि क्षमा करायची वृत्ती. (इफिस. ४:३२–५:१) पती-पत्नी असे गुण दाखवत राहिले तर त्यांच्यातलं प्रेम बहरत राहील. लेना नावाच्या बहिणीचं लग्नं होऊन २५ पेक्षा जास्त वर्षं झाली आहेत. ती म्हणते, “ज्याचं यहोवासोबत मजबूत नातं आहे अशा व्यक्‍तीवर प्रेम करायला आणि त्याचा आदर करायला जास्त सोपं जातं.” बायबलमधल्या एका उदाहरणाचा विचार करा. भविष्यात येणाऱ्‍या मसीहाचे आईवडील कोण असतील हे निवडताना, यहोवा दावीदच्या वंशातून कोणालाही निवडू शकला असता. पण त्याने खास योसेफ आणि मरीयाला निवडलं. का? कारण त्या दोघांचं यहोवासोबत एक वैयक्‍तिक नातं होतं. आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात ते नेहमी त्याला सगळ्यात जास्त महत्त्व देतील हे यहोवाला माहीत होतं. टेहळणी बुरूज२३.०५ २१ ¶३-४

बुधवार, १० डिसेंबर

जे तुमचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या आज्ञा पाळा.—इब्री १३:१७.

आपला प्रभू येशू हा परिपूर्ण आहे. पण त्याने या पृथ्वीवर ज्यांना आपलं नेतृत्व करण्यासाठी निवडलंय ते परिपूर्ण नाहीत. त्यामुळे त्यांच्या आज्ञा पाळायला आपल्याला कठीण जाऊ शकतं. खासकरून आपल्या इच्छेविरुद्ध ते आपल्याला काही करायला सांगतात तेव्हा. प्रेषित पेत्रलाही एकदा आज्ञा पाळायला कठीण गेलं. एका स्वर्गदूताने मोशेच्या नियमाविरुद्ध असलेले प्राणी त्याला खायला सांगितले, तेव्हा त्याने एकदा नाही तर तीनदा तसं करायला नकार दिला. (प्रे. कार्यं १०:९-१६) का बरं? कारण त्याला हे मार्गदर्शन पटत नव्हतं. पण दुसरीकडे पाहता, यरुशलेममधल्या वडीलजनांनी जेव्हा पौलला सांगितलं, की त्याने चार माणसांना मंदिरात सोबत न्यावं आणि मंदिरात स्वतःचं आणि त्याचं विधीपूर्वक शुद्धीकरण करून घ्यावं, तेव्हा तो आज्ञा पाळायला तयार होता. असं केल्यामुळे हे दिसून येणार होतं, की पौल नियमशास्त्रानुसार वागतोय. पण पौलला हे माहीत होतं की आता ख्रिस्ती, नियमशास्त्राच्या अधीन नाहीत. आणि त्याने काहीच चुकीचं केलं नव्हतं. पण तरीसुद्धा “दुसऱ्‍या दिवशी पौल त्या माणसांना घेऊन गेला आणि त्यांच्यासोबत त्याने स्वतःचं विधीपूर्वक शुद्धीकरण करवून घेतलं.” (प्रे. कार्यं २१:२३, २४, २६) अशा प्रकारे पौलने आज्ञा पाळली म्हणून भाऊबहिणींमधली एकता टिकून राहिली.—रोम. १४:१९, २१. टेहळणी बुरूज२३.१० १० ¶१५-१६

गुरुवार, ११ डिसेंबर

जे यहोवाची भीती बाळगतात, त्यांच्याशी त्याची जवळची मैत्री असते.—स्तो. २५:१४.

चांगल्या मैत्रीसाठी भीती हा गुण महत्त्वाचा आहे असं कदाचित तुम्हाला कधीच वाटणार नाही. तरीसुद्धा या लेखाच्या मुख्य वचनात, ज्यांना यहोवाशी जवळची मैत्री करायची आहे त्यांनी त्याची “भीती” बाळगली पाहिजे असं म्हटलंय. आपण बऱ्‍याच काळापासून यहोवाची सेवा करत असलो तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या मनात त्याच्याबद्दल नेहमी भीती असली पाहिजे. पण देवाबद्दल भीती असणं म्हणजे नेमकं काय? ज्या व्यक्‍तीच्या मनात यहोवाबद्दल योग्य भीती असते, त्याचं यहोवावर प्रेम असतं. आणि त्याला असं काहीही करायचं नसतं ज्यामुळे त्याचं आणि यहोवाचं नातं धोक्यात येईल. येशू कधीच यहोवाला घाबरत नव्हता. (यश. ११:२, ३) तर, त्याच्या मनात यहोवाबद्दल योग्य भीती होती. (इब्री ५:७) तसंच, येशूचं यहोवावर खूप प्रेम होतं. आणि त्याला स्वतःहून त्याची आज्ञा पाळायची होती. (योहा. १४:२१, ३१) येशूसारखाच, आपल्याही मनात यहोवाबद्दल गाढ आदर आहे. आणि त्याचं प्रेम, त्याची बुद्धी, न्याय आणि सामर्थ्य पाहून आपण भारावून जातो. शिवाय, आपल्याला हेही माहीत आहे की यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आणि तो आपल्याला शिकवतो तेव्हा आपण त्याला कसा प्रतिसाद देतो या गोष्टीची त्याला काळजी असते. जेव्हा आपण त्याच्या आज्ञा मोडतो तेव्हा त्याला दुःख होतं. पण जेव्हा आपण त्याच्या इच्छेप्रमाणे करतो तेव्हा त्याला आनंद होतो.—स्तो. ७८:४१; नीति. २७:११. टेहळणी बुरूज२३.०६ १४ ¶१-२; १५ ¶५

शुक्रवार, १२ डिसेंबर

शक्‍तिशाली झाल्यावर त्याचं मन गर्वाने फुगलं आणि हेच त्याच्या नाशाचं कारण ठरलं. तो आपला देव यहोवा याच्याशी अविश्‍वासूपणे वागला.—२ इति. २६:१६.

उज्जीया राजा जेव्हा शक्‍तिशाली बनला तेव्हा यहोवानेच आपल्याला समृद्ध केलंय आणि शक्‍तिशाली बनवलंय हे तो विसरून गेला. यावरून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्याला जे आशीर्वाद आणि बहुमान मिळाले आहेत ते यहोवाकडून आहेत. आपल्याला ज्या गोष्टी करता आल्या त्यांबद्दल बढाई मारण्यापेक्षा आपण त्याचं श्रेय यहोवाला दिलं पाहिजे. (१ करिंथ. ४:७) आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की आपण अपरिपूर्ण आहोत आणि आपल्यालाही कोणीतरी सुधारण्याची गरज पडते. साठीतला एक भाऊ म्हणतो: “मी हे शिकलो की जेव्हा कोणी मला माझ्या चुका दाखवतं, तेव्हा मी ते जास्त मनाला लावून नाही घेतलं पाहिजे. माझ्याकडून जेव्हा काही छोट्या-मोठ्या चुका होतात आणि त्यासाठी जेव्हा मला सुधारलं जातं, तेव्हा मी त्याचं वाईट वाटून घेत नाही. उलट मी त्यातून शिकतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.” खरंच, जेव्हा आपण यहोवाचं भय बाळगतो आणि स्वतःबद्दल नम्र दृष्टिकोन ठेवतो तेव्हा आपलं जीवन आनंदी होतं!—नीति. २२:४. टेहळणी बुरूज२३.०९ १० ¶१०-११

शनिवार, १३ डिसेंबर

देवाची इच्छा पूर्ण केल्यावर, त्याने दिलेल्या अभिवचनाचं प्रतिफळ तुम्हाला मिळावं, म्हणून तुम्हाला धीराची गरज आहे.—इब्री १०:३६.

सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांना धीर दाखवायची गरज होती. दररोजच्या जीवनात येणाऱ्‍या समस्यांसोबतच त्यांना इतर परीक्षांनाही तोंड द्यावं लागत होतं. यहुदी धर्मगुरू आणि रोमी अधिकारी तर त्यांचा छळ करायचेच पण त्यासोबतच त्यांना त्यांच्या कुटुंबातूनसुद्धा विरोध सहन करावा लागायचा. (मत्त. १०:२१) तसंच, मंडळीत धर्मत्यागी लोकांच्या प्रभावाचा आणि फुटी पाडणाऱ्‍या त्यांच्या शिकवणींचा त्यांना सामना करावा लागायचा. (प्रे. कार्यं २०:२९, ३०) तरीसुद्धा अशा परिस्थितीत या ख्रिश्‍चनांनी धीर दाखवला. (प्रकटी. २:३) ते हे कसं करू शकले? त्यांनी ईयोबसारख्या धीर दाखवणाऱ्‍या विश्‍वासू लोकांच्या उदाहरणावर मनन केलं. (याको. ५:१०, ११) बळ मिळावं म्हणून त्यांनी यहोवाकडे प्रार्थना केली. (प्रे. कार्यं ४:२९-३१) आणि धीर दाखवल्यामुळे यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल या गोष्टीकडेसुद्धा त्यांनी लक्ष लावलं. (प्रे. कार्यं ५:४१) देवाच्या वचनात आणि आपल्या प्रकाशनांमध्ये अशा बऱ्‍याच लोकांची उदाहरणं आहेत ज्यांनी धीर दाखवला. आपण जर नेहमी त्यांचा अभ्यास केला तर आपल्यालाही धीर दाखवता येईल. टेहळणी बुरूज२३.०७ ३ ¶५-६

रविवार, १४ डिसेंबर

आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. मग या सगळ्या गोष्टीही तुम्हाला दिल्या जातील.—मत्त. ६:३३.

यहोवा आणि येशू काहीही झालं तरी आपल्याला एकटं सोडणार नाहीत. पेत्रच्या उदाहरणावर विचार करा. पेत्रने येशूला नाकारल्यानंतर तो त्याच्या जीवनाच्या एका अतिशय कठीण वळणावर होता. त्याला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. तो येशूला सोडून देणार होता, की पुढेही त्याचा शिष्य बनून राहणार होता? पेत्रला विश्‍वासात टिकून राहता यावं म्हणून येशूने यहोवाकडे याचना केली होती. याबद्दल येशूने नंतर त्याला सांगितलं आणि याची खातरी करून दिली, की पुढे तो त्याच्या बांधवांचा विश्‍वास मजबूत करेल. (लूक २२:३१, ३२) पेत्रला जेव्हा येशूचे हे शब्द आठवले असतील, तेव्हा त्याला नक्कीच खूप हिंमत मिळाली असेल. असं होऊ शकतं, की आपणही आपल्या आयुष्याच्या एखाद्या कठीण वळणावर असू. अशा वेळी आपल्याला विश्‍वासू राहायला हिंमत देण्यासाठी यहोवा कदाचित प्रेमळ मेंढपाळांचा उपयोग करेल. (इफिस. ४:८, ११) यहोवाने पेत्र आणि इतर प्रेषितांच्या गरजा पूर्ण केल्या. आपणसुद्धा आपल्या जीवनात देवाच्या राज्याला पहिलं स्थान दिलं, तर यहोवा आपल्याही गरजा पूर्ण करेल. टेहळणी बुरूज२३.०९ २४-२५ ¶१४-१५

सोमवार, १५ डिसेंबर

जो गोरगरिबांना मदत करतो, तो यहोवाला उसनं देतो; त्यांच्यावर केलेल्या दयेची तो परतफेड करेल.—नीति. १९:१७.

आपण एखाद्याला छोटीशी मदत जरी केली, तरी यहोवा ती पाहतो. आपण इतरांना जी मदत करतो, तिला तो एक मौल्यवान अर्पण समजतो. आपण जणू यहोवाला उसनं दिलंय असं तो समजतो. आणि त्याची तो नक्की परतफेड करेल. तुम्ही आधी एक सहायक सेवक किंवा वडील म्हणून सेवा केली असेल. भाऊबहिणींवर प्रेम असल्यामुळे तुम्ही जे काही त्यांच्यासाठी केलं, ते यहोवा विसरलेला नाही. (१ करिंथ. १५:५८) आणि तुम्ही आतापण भाऊबहिणींवर जे प्रेम करता, ते तो पाहतो. आपलं यहोवावर आणि भाऊबहिणींवर असलेलं प्रेम वाढत जावं अशी यहोवाची इच्छा आहे. आपण बायबलचं वाचन करून, त्यावर मनन करून आणि नियमितपणे त्याला प्रार्थना करून हे प्रेम वाढवू शकतो. तसंच, भाऊबहिणींना व्यावहारिक मार्गांनी मदत करून आपण त्यांच्यावर असलेलं आपलं प्रेम वाढवू शकतो. जसजसं आपलं हे प्रेम वाढत जाईल, तसतसं आपण यहोवाच्या आणि आपल्या भाऊबहिणींच्या आणखी जवळ येऊ. आणि त्यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचा कायम आनंद घेऊ! टेहळणी बुरूज२३.०७ १० ¶११; ११ ¶१३; १३ ¶१८

मंगळवार, १६ डिसेंबर

प्रत्येक जण स्वतःचा भार वाहील.—गलती. ६:५.

प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे स्वतः ठरवलं पाहिजे. उपचार पद्धती निवडण्याच्या बाबतीत बायबलमध्ये काही मोजकेच नियम दिले आहेत. जसं की, रक्‍त आणि भूतविद्येपासून दूर राहणं. (प्रे. कार्यं १५:२०; गलती. ५:१९, २०) पण इतर उपचार पद्धतींच्या बाबतीत मात्र ख्रिस्ती स्वतःचे निर्णय घेऊ शकतात. आपल्याला कदाचित एखादी विशिष्ट उपचार पद्धतच चांगली आहे असं वाटेल. पण भाऊबहीण उपचाराच्या बाबतीत जे काही निर्णय घेतात, त्यांचा आपण आदर केला पाहिजे. याबाबतीत आपण चार गोष्टी लक्षात ठेवू शकतो. (१) फक्‍त देवाचं राज्यच आरोग्याच्या समस्या पूर्णपणे आणि कायमच्या काढून टाकू शकतं. (यश. ३३:२४) (२) स्वतःसाठी कोणती उपचार पद्धत सगळ्यात चांगली आहे, हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीच्या मनाला ‘पटलेलं’ असलं पाहिजे. (रोम. १४:५) (३) इतरांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत किंवा चुकीचे आहेत हे आपण ठरवत नाही आणि त्यांच्यासाठी अडखळण बनत नाही. (रोम. १४:१३) (४) आपलं आपल्या भाऊबहिणींवर प्रेम असल्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात ठेवतो, की आपल्याला स्वतःचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य जरी असलं, तरी त्यापेक्षा मंडळीची एकता जास्त महत्त्वाची आहे.—रोम. १४:१५, १९, २०. टेहळणी बुरूज२३.०७ २४ ¶१५

बुधवार, १७ डिसेंबर

नाझीर असण्याच्या त्याच्या संपूर्ण काळात तो यहोवासाठी पवित्र आहे.—गण. ६:८.

यात काहीच शंका नाही, की यहोवासोबतचं तुमचं नातं तुमच्यासाठी खूप अनमोल आहे. प्राचीन काळापासून असे बरेच लोक आहेत ज्यांना तुमच्यासारखंच वाटतं. (स्तो. १०४:३३, ३४) यहोवाची उपासना करण्यासाठी त्यांनी बरेच त्याग केले. प्राचीन इस्राएलमध्ये नाझीर किंवा “समर्पित केलेला” म्हणून सेवा करणाऱ्‍यांचीसुद्धा अशीच वृत्ती होती. यहोवाची एका खास पद्धतीने सेवा करण्यासाठी जे इस्राएली लोक आवेशाने काही विशिष्ट त्याग करायचे त्यांच्यासाठी हा शब्द अगदी योग्य होता. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे एखादा पुरुष किंवा स्त्री यहोवाला खास नवस करून काही काळासाठी नाझीर म्हणून सेवा करू शकत होती. (गण. ६:१, २) यहोवाला हा नवस केल्यामुळे किंवा वचन दिल्यामुळे त्यांना अशा काही गोष्टी कराव्या लागायच्या ज्या इतर इस्राएली लोकांना करायची गरज नव्हती. पण मग, एक इस्राएली व्यक्‍ती नाझीर व्हायचा नवस का करायची? कदाचित यहोवावर असलेल्या प्रेमामुळे प्रवृत्त होऊन आणि त्याच्या अनमोल आशीर्वादांची मनापासून कदर असल्यामुळे एखादी इस्राएली व्यक्‍ती असं करत असावी.—अनु. ६:५; १६:१७. टेहळणी बुरूज२४.०२ १४ ¶१-२

गुरुवार, १८ डिसेंबर

तुझ्यावर प्रेम करणाऱ्‍यांवर आणि तुझ्या आज्ञा पाळणाऱ्‍यांवर तू एकनिष्ठ प्रेम करतोस.—दानी. ९:४.

बायबलमध्ये ज्या इब्री शब्दाचं भाषांतर “एकनिष्ठा” किंवा “एकनिष्ठ प्रेम” असं करण्यात आलंय, तो शब्द सहसा देवाचं त्याच्या सेवकांवर किती गाढ प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी वापरण्यात आलाय. तसंच, देवाच्या सेवकांमध्ये एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमासाठीसुद्धा हा शब्द वापरण्यात आलाय. (२ शमु. ९:६, ७) एकनिष्ठा ही एक अशी गोष्ट आहे, जी काळाच्या ओघात आणखी मजबूत होत जाते. दानीएलच्या बाबतीत हे कसं झालं ते आता आपण पाहू या. दानीएलच्या आयुष्यात अशा बऱ्‍याच घटना घडल्या ज्यांमुळे त्याच्या एकनिष्ठेची परीक्षा झाली. पण जेव्हा तो त्याच्या वयाच्या नव्वदीत होता, तेव्हा त्याच्या एकनिष्ठेची सर्वात मोठी परीक्षा झाली. दरबारातल्या अधिकाऱ्‍यांना दानीएल आवडत नव्हता. आणि तो ज्या देवाची उपासना करायचा त्यांचाही ते आदर करत नव्हते. म्हणून त्यांनी दानीएलला ठार मारायचा कट रचला. त्यांनी असं फर्मान काढायला लावलं, ज्यामुळे दानीएल राजाला एकनिष्ठ आहे की त्याच्या देवाला हे दिसणार होतं. आपण राजाला एकनिष्ठ आहोत, हे दाखवण्यासाठी दानीएलला फक्‍त ३० दिवसांसाठी यहोवाला प्रार्थना करायचं थांबवावं लागणार होतं. पण दानीएलने याबाबतीत कोणतीही तडजोड केली नाही.—दानी. ६:१२-१५, २०-२२. टेहळणी बुरूज२३.०८ ५ ¶१०-१२

शुक्रवार, १९ डिसेंबर

एकमेकांवर प्रेम करत राहा.—१ योहा. ४:७.

यहोवाची अशी इच्छा आहे, की आपण आपल्या भाऊबहिणींवर मनापासून प्रेम करत राहावं. समजा एखादा भाऊ किंवा बहीण आपल्याला वाईट वाटेल असं आपल्याशी वागले असतील, तर ते मुद्दामहून वागले, असा विचार आपण नाही केला पाहिजे. उलट, ते नेहमी यहोवाच्या तत्त्वांप्रमाणेच वागायचा प्रयत्न करतात, पण या वेळी चुकून त्यांच्याकडून असं घडलं असेल असा विचार आपण नेहमी केला पाहिजे. (नीति. १२:१८) आपल्या विश्‍वासू सेवकांमध्ये कमतरता असूनसुद्धा देव त्यांच्यावर प्रेम करतो. ते करत असलेल्या चुकांमुळे तो त्यांच्याशी आपलं नातं तोडत नाही किंवा मनात राग धरून बसत नाही. (स्तो. १०३:९) म्हणूनच नेहमी माफ करणाऱ्‍या आपल्या पित्याचं अनुकरण करणं किती महत्त्वाचं आहे! (इफिस. ४:३२–५:१) हे लक्षात घ्या, की अंत जसजसा जवळ येतोय तसतसं आपल्याला आपल्या भाऊबहिणींसोबतचं नातं आणखी मजबूत करावं लागेल. आपला छळ आणखी वाढेल ही अपेक्षा आपण करू शकतो. कदाचित आपल्याला आपल्या विश्‍वासासाठी तुरुंगातसुद्धा टाकलं जाईल. आणि जर असं झालं, तर कधी नव्हे इतकी आपल्याला आपल्या भाऊबहिणींची गरज असेल.—नीति. १७:१७. टेहळणी बुरूज२४.०३ १५-१६ ¶६-७

शनिवार, २० डिसेंबर

माणसाच्या पावलांना यहोवा वाट दाखवतो.—नीति. २०:२४.

बायबलमध्ये यहोवाला विश्‍वासू असलेल्या तरुणांचे अहवाल दिले आहेत. त्यांनी यहोवाशी एक चांगलं नातं जोडलं, त्याची मरजी मिळवली आणि त्यामुळे ते एक चांगलं आणि समाधानी आयुष्य जगले. दावीद हा अशाच तरुणांपैकी एक होता. फार लहान वयात त्याने देवाची सेवा करण्याची निवड केली. आणि नंतर तो यहोवाला एकनिष्ठ असलेला एक राजा बनला. (१ राजे ३:६; ९:४, ५; १४:८) तुम्ही बायबलमधून जर दावीदच्या उदाहरणाचा अभ्यास केला, तर त्याच्या चांगल्या उदाहरणामुळे तुम्हालाही यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. किंवा तुम्ही बायबलमधल्या मार्क आणि तीमथ्य यांच्या उदाहरणांचा अभ्यास करू शकता किंवा याबद्दल एक स्टडी प्रोजेक्ट हातात घेऊ शकता. या अभ्यासातून तुम्हाला दिसून येईल, की फार कमी वयातच त्यांनी यहोवाची सेवा करायचं निवडलं आणि देवाच्या नजरेत एक चांगलं नाव कमवलं. तरुणांनो, तुम्ही आज ज्या प्रकारचं आयुष्य जगता त्यावरून ठरेल की तुमचं पुढचं आयुष्य कसं असेल. तुम्ही जर स्वतःच्या बुद्धीवर भरवसा ठेवण्याऐवजी यहोवावर भरवसा ठेवलात आणि त्याच्यावर अवलंबून राहिलात, तर तो तुम्हाला सुज्ञ निर्णय घ्यायला मदत करेल. त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळतील. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही यहोवाच्या सेवेत जे करता त्याची यहोवा खूप कदर करतो. आणि खरंच, आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याच्या सेवेसाठी आपलं आयुष्य वाहून घेणं यापेक्षा आणखी कोणती चांगली गोष्ट असू शकते? टेहळणी बुरूज२३.०९ १३ ¶१८-१९

रविवार, २१ डिसेंबर

एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.—कलस्सै. ३:१३.

प्रेषित पौलला माहीत होतं, की आपले भाऊबहीण अपरिपूर्ण आहेत. उदाहरणार्थ, तो जेव्हा मंडळीत येऊ लागला तेव्हा बऱ्‍याच जणांनी त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतले होते. (प्रे. कार्यं ९:२६) नंतर, त्याचं नाव खराब करण्यासाठी काही जण त्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल वाईट बोलू लागले. (२ करिंथ. १०:१०) तसंच पौलने एका जबाबदार भावाला चुकीचा निर्णय घेताना पाहिलं. त्यामुळे कदाचित इतर जण अडखळले असतील. (गलती. २:११, १२) आणि पौलसोबत काम करणाऱ्‍या मार्कनेसुद्धा त्याला खूप निराश केलं होतं. (प्रे. कार्यं १५:३७, ३८) यांपैकी कोणत्याही एका कारणामुळे पौल या भाऊबहिणींपासून दूर राहू शकला असता. पण त्याने असं काही केलं नाही. उलट त्याने भाऊबहिणींबद्दल चांगला विचार केला आणि यहोवाची सेवा करत राहिला. मग पौलला टिकून राहायला कोणत्या गोष्टींमुळे मदत झाली? पौलचं भाऊबहिणींवर खूप प्रेम होतं. या प्रेमामुळेच अपरिपूर्णतेऐवजी त्यांच्या चांगल्या गुणांवर त्याला लक्ष देता आलं. आणि याच प्रेमामुळे, आजच्या वचनात जे म्हटलंय त्याप्रमाणे वागायला त्याला मदत झाली. टेहळणी बुरूज२४.०३ १५ ¶४-५

सोमवार, २२ डिसेंबर

प्रभूच्या दासाला भांडण करायची गरज नाही, तर तो सगळ्यांशी सौम्यतेने वागणारा असावा.—२ तीम. २:२४.

सौम्य वृत्ती असणं का महत्त्वाचं आहे, हे आपल्याला बायबलच्या बऱ्‍याच अहवालांमधून कळतं. इसहाकचं उदाहरण घ्या. तो जेव्हा गरार नावाच्या पलिष्टी शहरात राहत होता, तेव्हा त्याच्या आसपास राहणाऱ्‍या पलिष्टी लोकांना त्याचा हेवा वाटू लागला. म्हणून त्यांनी त्याच्या वडिलांनी म्हणजे अब्राहामने बांधलेल्या विहिरी बुजवून टाकल्या. पण त्या विहिरी परत मिळवण्यासाठी इसहाक त्यांच्याशी वाद घालत बसला नाही. त्याऐवजी तो आपल्या कुटुंबाला घेऊन दुसऱ्‍या ठिकाणी राहायला गेला. आणि तिथे त्याने आणखी विहिरी खोदल्या. (उत्प. २६:१२-१८) पण तिथेसुद्धा पलिष्टी लोकांनी या विहिरी आपल्या असल्याचा दावा करून त्याच्याशी भांडण केलं. पण तरीसुद्धा इसहाक त्यांच्याशी शांतीने वागला. (उत्प. २६:१९-२५) मग पलिष्टी लोक त्याला भडकवायचा प्रयत्न करत असतानासुद्धा तो शांत कसा काय राहू शकला? ही गोष्ट तो नक्कीच आपल्या आईवडिलांकडून शिकला असेल. कारण अब्राहाम नेहमी इतरांशी शांतीने वागायचा आणि सारानेसुद्धा ती नेहमी ‘शांत आणि सौम्य’ असल्याचं दाखवून दिलं होतं.—१ पेत्र ३:४-६; उत्प. २१:२२-३४. टेहळणी बुरूज२३.०९ १५ ¶४

मंगळवार, २३ डिसेंबर

मी हे ठरवलंय आणि ते घडवूनही आणीन.—यश. ४६:११.

यहोवाने प्रेमळपणे आपल्या पहिल्या मुलाला पृथ्वीवर त्याच्या राज्याबद्दल शिकवण्यासाठी पाठवलं. तसंच त्याने पाप आणि मृत्यूपासून मानवांची सुटका होण्यासाठी आपल्या मुलाचं जीवन खंडणी बलिदान म्हणून दिलं. मग देवाच्या राज्याचा राजा म्हणून स्वर्गात राज्य करण्यासाठी देवाने येशूला पुन्हा जिवंत केलं. यहोवा येशूच्या राज्याद्वारे पृथ्वीबद्दल असलेला आपला उद्देश पूर्ण करेल. आणि हे करत असताना तो आपल्या नावावर लागलेला कलंक मिटवेल. हाच बायबलचा मुख्य विषय आहे. यहोवाचा उद्देश कधीच बदलत नाही. त्याने आपल्याला अशी खातरी दिली आहे, की तो काहीही करून आपला उद्देश पूर्ण करेल. (यश. ४६:१०, तळटीप; इब्री ६:१७, १८) काळाच्या ओघात तो पृथ्वीला एका सुंदर नंदनवनात बदलून टाकेल, जिथे आदाम आणि हव्वाचे परीपूर्ण आणि नीतिमान वंशज राहतील आणि “सर्वकाळ जीवनाचा आनंद” लुटतील. (स्तो. २२:२६) पण यहोवाला याहीपेक्षा मोठा उद्देश साध्य करायचा आहे. त्याचा अंतिम उद्देश हाच आहे, की स्वर्गात आणि पृथ्वीवर असलेल्या त्याच्या सर्व विश्‍वासू सेवकांना एकत्र करणं. त्यांना एकत्र केल्यानंतर स्वर्गात आणि पृथ्वीवर असलेले त्याचे सर्व विश्‍वासू सेवक त्याला आपला सर्वोच्च शासक मानतील आणि त्याच्या अधीन राहतील. (इफिस. १:८-११) यहोवा ज्या पद्धतीने आपला उद्देश पूर्ण करतो ते पाहून तुम्हाला आश्‍चर्य वाटत नाही का? टेहळणी बुरूज२३.१० २० ¶७-८

बुधवार, २४ डिसेंबर

‘हिंमत धरा कारण मी तुमच्यासोबत आहे,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.—हाग्ग. २:४.

बाबेलमध्ये राहणारे यहुदी यरुशलेमला आले तेव्हा काही काळातच त्यांना तिथल्या अस्थिर राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर त्यांना विरोधाला तोंड द्यावं लागलं. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींना यहोवाचं मंदिर पुन्हा बांधण्याच्या कामावर लक्ष द्यायला कठीण जात होतं. म्हणून यहुदी लोकांचा आवेश पुन्हा वाढवण्यासाठी यहोवा हाग्गय आणि जखऱ्‍या संदेष्ट्याला त्यांच्याकडे पाठवतो. हे संदेष्टे त्यांना प्रोत्साहन देतात आणि याचा त्यांच्यावर खूप चांगला परिणाम होतो. (हाग्ग. १:१; जख. १:१) पण जवळपास ५० वर्षांनंतर यहुदी लोकांचा आवेश पुन्हा खचतो. म्हणून यहोवा, नियमशास्त्राच्या प्रती तयार करण्यात कुशल असलेल्या एज्राला बाबेलमधून यरुशलेमला पाठवतो. तो तिथल्या लोकांना, खऱ्‍या उपासनेला आपल्या जीवनात पहिल्या स्थानी ठेवायचं उत्तेजन देतो. (एज्रा ७:१, ६) हाग्गय आणि जखऱ्‍या यांच्या भविष्यवाण्यांमुळे विरोध होत असतानाही यहोवावर आपला भरवसा टिकवून ठेवण्यासाठी देवाच्या लोकांना मदत झाली. तसंच, आपल्यावरही जेव्हा अचानक समस्या येतात तेव्हा यहोवावर भरवसा ठेवण्यासाठी आपल्यालाही या भविष्यवाण्यांमुळे मदत होऊ शकते.—नीति. २२:१९. टेहळणी बुरूज२३.११ १४-१५ ¶२-३

गुरुवार, २५ डिसेंबर

प्रेमाचं वस्त्र घाला, कारण हे ऐक्याचं परिपूर्ण बंधन आहे.—कलस्सै. ३:१४.

भाऊबहिणींवर असलेलं प्रेम आपण कसं व्यक्‍त करू शकतो? एक मार्ग म्हणजे, इतरांना सांत्वन देणं. आपल्याला जर भाऊबहिणींबद्दल सहानुभूती असेल, तर आपल्याला त्यांना ‘सांत्वन देत राहता’ येईल. (१ थेस्सलनी. ४:१८) पण भाऊबहिणींबद्दलचं प्रेम आपण कसं मजबूत करू शकतो? आपल्याला कठीण वाटत असलं तरी त्यांच्या चुकांची क्षमा करून आपण असं करू शकतो. एकमेकांवर प्रेम करणं खासकरून आज इतकं महत्त्वाचं का आहे? याचं कारण देत पेत्रने म्हटलं: “सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे. म्हणून . . . एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करा.” (१ पेत्र ४:७, ८) या दुष्ट जगाचा अंत जवळ असताना, आपण कोणत्या गोष्टीची अपेक्षा करू शकतो? आपल्या शिष्यांबद्दल बोलताना येशूने म्हटलं: “माझ्या नावामुळे सगळी राष्ट्रं तुमचा द्वेष करतील.” (मत्त. २४:९) या कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आपल्यात एकी असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जर आपल्या भाऊबहिणींवर प्रेम केलं, तर आपल्यात फुटी पाडण्याचा सैतान जो प्रयत्न करतो, त्यात तो अपयशी ठरेल.—फिलिप्पै. २:१, २. टेहळणी बुरूज२३.११ १३ ¶१८-१९

शुक्रवार, २६ डिसेंबर

आम्ही देवाचे सहकारी आहोत.—१ करिंथ. ३:९.

देवाच्या वचनात असलेल्या सत्यांमध्ये जबरदस्त ताकद आहे. जेव्हा आपण यहोवाबद्दल आणि तो नेमका कसा आहे याबद्दल लोकांना सांगतो, तेव्हा त्याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळतात. सैतानाच्या खोट्या गोष्टींमुळे लोकांच्या डोळ्यांवर असलेली पट्टी हळूहळू गळू लागते. आणि ते आपल्याप्रमाणेच आपल्या पित्याचे सुंदर गुण पाहू लागतात. त्याच्या अमर्याद ताकदीमुळे ते थक्क होऊन जातात. (यश. ४०:२६) त्याच्या परिपूर्ण न्यायावर ते भरवसा ठेवू लागतात. (अनु. ३२:४) त्याच्या असीम बुद्धीमुळे त्यांचे डोळे उघडतात. (यश. ५५:९; रोम. ११:३३) आणि तो प्रेमाचं स्वरूप आहे हे समजल्यामुळे त्यांना दिलासा मिळतो. (१ योहा. ४:८) ते जसजसं यहोवाच्या जवळ जाऊ लागतात तसतसं त्याची मुलं या नात्याने अनंतकाळ जगण्याची त्यांची आशा आणखी मजबूत होते. खरंच लोकांना आपल्या स्वर्गातल्या पित्याजवळ आणण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळालाय! शिवाय, आपण जेव्हा या कामात सहभाग घेतो तेव्हा यहोवा आपल्याला त्याचे “सहकारी” मानतो.—१ करिंथ. ३:९. टेहळणी बुरूज२४.०२ १२ ¶१५

शनिवार, २७ डिसेंबर

नवस करून तो न फेडण्यापेक्षा, नवस न केलेलाच बरा.—उप. ५:५.

तुम्ही कदाचित एक बायबल विद्यार्थी असाल किंवा एका साक्षीदार कुटुंबात वाढला असाल. पण तुम्ही बाप्तिस्म्याचा विचार केला आहे का? जर केला असेल तर हे एक चांगलं ध्येय आहे. पण बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्हाला तुमचं जीवन यहोवाला समर्पित करावं लागेल. तुम्ही यहोवाला समर्पण कसं करता? तुम्ही त्याला प्रार्थनेमध्ये असं वचन देता, की इथून पुढे तुम्ही फक्‍त त्याचीच उपासना कराल आणि त्याच्या इच्छेला तुमच्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व द्याल. म्हणजे तुम्ही जणू यहोवाला असं वचन देत असता, की तुम्ही त्याच्यावर ‘पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्‍तीने प्रेम कराल.’ (मार्क १२:३०) तुम्ही यहोवाला केलेलं हे समर्पण फक्‍त तुमच्यामध्ये आणि यहोवामध्ये असतं. याउलट बाप्तिस्मा हा सगळ्यांसमोर घेतला जातो. आणि त्यावरून लोकांना हे दिसून येतं, की तुम्ही यहोवाला तुमचं जीवन समर्पित केलंय. तुम्ही यहोवाला दिलेलं समर्पणाचं वचन खूप गंभीर असल्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि यहोवासुद्धा तुमच्याकडून तीच अपेक्षा करतो.—उप. ५:५. टेहळणी बुरूज२४.०३ २ ¶२; ३ ¶५

रविवार, २८ डिसेंबर

तुमच्यापैकी प्रत्येक जण जसं स्वतःवर प्रेम करतो, तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं. त्याच प्रकारे, पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर करावा.—इफिस. ५:३३.

विवाहात समस्या या असतातच. बायबल स्पष्टपणे सांगतं, की लग्न झालेल्या लोकांना “शारीरिक दुःखं सहन करावी लागतील.” (१ करिंथ. ७:२८) का बरं? कारण लग्न हे वेगवेगळ्या स्वभावाच्या, आवडी-निवडींच्या दोन अपरिपूर्ण लोकांना जवळ आणतं. विवाहसोबती वेगवेगळ्या संस्कृतीतून असतील किंवा वेगवेगळ्या वातावरणात ते लहानाचे मोठे झाले असतील. किंवा कदाचित त्यांच्या काही सवयी ज्या लग्नाच्या आधी दिसत नव्हत्या त्या लग्नानंतर हळूहळू दिसू लागतील. यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे विवाहात वादविवाद निर्माण होऊ शकतात. आपलं कुठे चुकतंय याचा विचार करण्याऐवजी किंवा समस्या एकत्र मिळून सोडवण्याऐवजी विवाहसोबती एकमेकांना दोष देत बसतात. इतकंच काय, तर यावरचा एकमेव तोडगा म्हणजे वेगळं होणं किंवा घटस्फोट घेणं असं त्यांना वाटतं. पण असं केल्यामुळे समस्या सुटेल का? नाही. आपल्या विवाह जोडीदारासोबत राहणं कठीण होत असलं, तरी यहोवाची अशी इच्छा आहे की पती-पत्नीने विवाहाच्या व्यवस्थेचा आदर करावा. टेहळणी बुरूज२४.०३ १६ ¶८; १७ ¶११

सोमवार, २९ डिसेंबर

आशेमुळे पुढे आपली निराशा होणार नाही.—रोम. ५:५.

समर्पण आणि बाप्तिस्मा झाल्यानंतर, तुम्ही जसजसं शिकत गेला आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये प्रगती करत गेला, तसतशी पृथ्वीवरच्या नंदनवनात कायम जगण्याची तुमची आशा आणखी मजबूत होत गेली. (इब्री ५:१३–६:१) रोमकर ५:२-४ मध्ये जे म्हटलंय, त्याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला असेल. तुमच्यासमोर वेगवेगळ्या समस्या आल्या, संकटं आली, पण तुम्ही धीराने त्यांचा सामना केला आणि त्यामुळे तुम्हाला देवाची मान्यता आहे या गोष्टीची जाणीव झाली. आणि देव तुमच्यावर खूश आहे, ही गोष्ट माहीत असल्यामुळे त्याने ज्या गोष्टींचं तुम्हाला अभिवचन दिलंय त्या गोष्टी तुम्हाला नक्की मिळतील याबद्दलची तुमची खातरी आणखी वाढली. तुमची आशा आता आधीपेक्षा जास्त मजबूत झाली. ती तुमच्यासाठी जास्त खरीखुरी आणि जणू ती खास तुमच्यासाठी आहे असं तुम्हाला वाटू लागलं. जीवनातल्या प्रत्येक पैलूवर तिचा जबरदस्त प्रभाव तुम्हाला जाणवू लागला. तुम्ही तुमच्या घरच्यांशी कसं वागता, तुम्ही काय निर्णय घेता, इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या वेळेचा कसा उपयोग करता, या सगळ्या गोष्टींवर तिचा प्रभाव होऊ लागला. देवाची मान्यता मिळाल्यानंतर तुम्हाला जी आशा मिळते त्याबद्दल प्रेषित पौलने एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला. तो खातरी देतो की तुमची आशा नक्की पूर्ण होईल.—रोम. १५:१३. टेहळणी बुरूज२३.१२ १२-१३ ¶१६-१९

मंगळवार, ३० डिसेंबर

[यहोवा] तुझं जीवन स्थिर करणारा आहे.—यश. ३३:६.

एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असताना आपण नेहमी जसं वागतो तसं वागत नाही. आपल्या भावना आणि आपले विचार बदलतात. आपल्या मनात विचारांचं वादळ उठलंय असं आपल्याला वाटू शकतं. आपल्यालाही जेव्हा असं वाटतं तेव्हा यहोवा आपल्याला कशी मदत करतो? तो आपल्याला खातरी देतो, की तो आपलं मन स्थिर करेल. जेव्हा एखादं जहाज वादळात सापडतं, तेव्हा ते कदाचित खूप जोराने हेलकावे खाऊ लागेल. अशा वेळी जहाज स्थिर ठेवण्यासाठी बऱ्‍याच जहाजांना खालून दोन्ही बाजूला पंख्यांसारखी दिसणारी उपकरणं लावली जातात. त्यामुळे जहाज स्थिर ठेवायला मदत होते. तसंच प्रवास करणारे प्रवासी सुरक्षित राहतात आणि त्यांचा प्रवास सुखरूप होतो. पण जहाज पुढे जात राहतं तेव्हाच ही उपकरणं चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्याच प्रकारे संकटाच्या काळातही आपण जेव्हा विश्‍वासूपणे पुढे जात राहतो, तेव्हा यहोवा आपलं मन स्थिर करतो. टेहळणी बुरूज२४.०१ २२ ¶७-८

बुधवार, ३१ डिसेंबर

मी देवावर भरवसा ठेवतो, मी घाबरणार नाही.—स्तो. ५६:४.

जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘यहोवाने आजपर्यंत काय-काय केलंय?’ त्याने बनवलेल्या सृष्टीबद्दल विचार करा. उदाहरणार्थ, त्याने बनवलेल्या पक्ष्यांना आणि फुलांना तुम्ही ‘निरखून पाहता,’ तेव्हा तुम्हाला कळतं, की त्याने त्यांना आपल्या प्रतिरूपात बनवलं नाही आणि ते त्याची उपासनासुद्धा करू शकत नाहीत. पण तरीसुद्धा यहोवा किती प्रेमळपणे त्यांची काळजी घेतो. त्यामुळे यहोवा तुमचीही काळजी घेईल या गोष्टीवरचा तुमचा भरवसा आणखी वाढेल. (मत्त. ६:२५-३२) तसंच, यहोवाने त्याच्या उपासकांसाठी काय केलंय त्याचाही विचार करा. तुम्ही बायबलमधल्या एखाद्या व्यक्‍तीबद्दल अभ्यास करू शकता, ज्याने खूप जबरदस्त विश्‍वास दाखवला. तसंच, अलीकडच्या काळातल्या यहोवाच्या एखाद्या विश्‍वासू सेवकाचा अनुभवही तुम्ही वाचू शकता. यासोबतच यहोवाने आजपर्यंत तुमची कशी काळजी घेतली या गोष्टीवरसुद्धा तुम्ही मनन करू शकता. जसं की यहोवाने तुम्हाला सत्यात कसं आणलं? (योहा. ६:४४) त्याने तुमच्या प्रार्थनांचं उत्तर कसं दिलं? (१ योहा. ५:१४) आणि त्याच्या प्रिय मुलाचं बलिदान दिल्यामुळे तुम्हाला दररोज कसा फायदा होत आहे?—इफि. १:७; इब्री ४:१४-१६. टेहळणी बुरूज२४.०१ ४ ¶६; ७ ¶१७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा